नमस्कार_श्रीपाद_दत्तात्रेयाला!!! 🙏🌸☘️🌺
दत्त संप्रदाय,नाथ संप्रदाय, भागवत संप्रदायाचे अध्वर्यू आणि शक्तीपात योग परंपरेतील एक थोर विभूतीमत्व, ज्ञानेश्वरी व संत वाङमयाचे थोर अभ्यासक व भाष्यकार,भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे व भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांचे पूर्णकृपांकित आणि प्रत्यक्ष टेंबे स्वामी महाराजांचेच पूर्णावतार असलेले विसाव्या शतकातील एक अतिशय दिव्य , अलौकिक असे संत योगीराज सद्गुरु माउली श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांची आज १०८ वी जयंती. सद्गुरू मामा माउलींचे संपूर्ण चरित्रच अलौकिक लिलांची खाण आहे.प्रत्येक प्रसंग ,प्रत्येक घटना इतक्या विलक्षण आहेत की बुद्धी स्तिमीत होते.मामांचे माता आणि पिता हेच विलक्षण संतदांम्पत्य होते.मातोश्री पार्वती देवी या तर प्रत्यक्ष भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या अनुग्रहीत यांना स्वामींनी "आमची लेक" म्हणून गौरविले होते.पिताश्री दत्तोपंतांशी प्रत्यक्ष भगवंत संवाद साधायचे.अशा या दिव्य दांम्पत्यापोटी दत्तप्रभुंनी अवतार घेतला यात नवल ते काय??? भगवंतांना अवतार घेण्यासाठी ते कुळ ,ती कुसही तेवढीच पवित्र लागते आणि हे घराणे ,हे दांपत्य असेच दिव्य आणि अलौकिक संतरत्न होते. सद्गुरु श्री मामांच्या चरित्राचे ओझरते दर्शन या लेखातून त्यांनीच आपल्या सर्वांना घडवावे ही प्रार्थना श्रीचरणी करतो.
हे देशपांडे घराणे मुळचे खेड शिवापूरचे पण पुढे कुळ शाखेचा विस्तार झाला व त्यातील एक शाखा ही 'नसरापूर' या भोर संस्थानातील गावी आली.याच गावाजवळ बनेश्वर हे ऐतिहासिक शिवमंदिर आहे तसेच जवळूनच 'शिवगंगा' ही नदी देखील वाहते.मुळचे पराक्रमी व अतिशय धर्मनिष्ठ असे हे घराणे होते.मामांच्या कुळात तिनं पिढ्यांपासून दत्तभक्तीची परंपरा अखंड सुरु होती.मामांचे आजोबा श्री राघोपंत हे एकनिष्ठ दत्तभक्त होते.यांचा पारमार्थिक अधिकार मोठा होता.प्रत्यक्ष दत्तप्रभुंनी यांना आपल्या पादुका प्रसाद रुपात दिल्या होत्या.यावरुन त्यांचा अधिकार व योग्यता लक्षात येते.यांची पत्नी जाणकीबाई या ही अतिशय प्रेमळ व धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या.त्यांना आपल्या वडिलांकडून वारस्याने वैद्यकी व ज्योतिषशास्त्राचे ज्ञान मिळाले होते.त्या या विद्येत पारंगत होत्या.यांच्याच पोटी इ.स १८७३ ला मामांचे पिताश्री श्रीदत्तोपंत यांचा जन्म झाला.दत्तपंत हे अतिशय धार्मिक व सात्विक वृत्तीचे होते.यथावकाश दत्तपंतांचे मौंजीबंधन आदी सर्व संस्कार पार पडले.धर्म शास्त्राचे अध्ययन ही उत्तम रितीने पार पडले.१८८७ साल उजाडले.आता दत्तोपंत अठरा वर्षांचे झाले.जाणकीबाई आता घरी सुन यावी यासाठी शोधास लागल्या.शेवटी त्यांना पुण्यातील सोनटक्के यांची कन्या "बाई" ही आपली सुन म्हणुन पसंत पडली.पुण्यात मोठ्या आनंदात हा विवाह सोहळा पार पडला व सोनटक्क्यांची "बाई" आता देशपांड्यांची "पार्वती" झाली.याच आपल्या मामांच्या मातोश्री आणि सद्गुरु. या पार्वती देवी कुणी सामान्य स्त्री नव्हत्या यांचा अधिकार विलक्षण थोर होता.( मातोश्रींचे महात्म्य आणि अधिकार जर लिहायला बसले तर अनेक लेख होतील आणि शब्द पुरणार नाहीत.सद्गुरु शका ताईंनी मातोश्रींचे "स्वामीतनया" हे अतिशय सुंदर असे चरित्र लिहीले आहे.ते आपण जरुरच वाच.एकमेवाद्वितीय असे ते चरित्र आहे.शब्दमर्यादेस्तव मातोश्रींच्या चरित्राचा विस्तार इथे करणे अशक्यप्राय आहे.) स्वामी आज्ञेने नारायण पंत म्हणजे मातोश्री पार्वती देवींचे वडिल हे आपला सर्व परिवार घेऊन पुण्यात येऊन राहिले व स्वामी कृपेने अतिशय उत्तम स्थिरस्थावर ही झाले.अक्कलकोटवरुन निघतांना छोट्या बाईला श्री स्वामीरायांनी आपल्या मातृवात्सल्याने कुरवाळले,आपल्या उजव्या मांडीवर बसवून कौतुकाने त्यांच्या चेहेऱ्यावरुन हात फिरविला आणि म्हणाले, "ही आमची पोर आहे बरे का!" पुढे पुण्यात आल्यावर स्वामीरायांनी लौकिक दृष्ट्या देह त्याग केल्यावर एक दिवशी प्रगट होऊन मातोश्री पार्वती देवींना व त्यांचे वडिल बंधू नरहरपंत यांना विधिपूर्वक शुभमुहूर्तावर स्वामी कृपेची परंपरेची शक्तीपात दिक्षा देऊन कृतार्थ केले. या दोन्ही भावंडांचा अधिकार आणि यांच्यावर स्वामीरायांची इतकी विलक्षण कृपा होती. स्वामींनी यांना आज्ञा केली होती की नागपंचमीला पुण्यातील शनीपार येथे येणार्या नाथपंथी साधुंना आमच्यानावे शिधा द्यायचा व तो आम्हाला पोचला याची ग्वाही म्हणून आम्ही आपल्या घरी प्रगट होऊ.पुढे असेच होत असे शनीपारला शिधा दिल्यावर स्वामी माउली मामांकडे प्रत्यक्ष प्रगटत असत. मामा लहान असतांना असाच एक विलक्षण प्रसंग घडला.स्वामी घरी प्रगट झाले व त्यांचे दर्शन मातोश्रींना व नरहरी मामांना झाले.पण मामांना काही स्वामी दिसत नव्हते.तेव्हा मामा रडायला लागले.मातोश्रींजवळ हट्ट करायला लागले.ते म्हटले,"आई तुला जर स्वामी समर्थ दर्शन देतात तर मला का बरे त्यांनी दर्शन देऊ नये?" त्यावर मातोश्री म्हटल्या , "अरे त्यांनी तुला दर्शन देण्यासाठी तुझ्याजवळ पुरेसा तपाचा साठा नाहीये." बाल श्रीपाद तथा मामा लगेच म्हणाले, "जर स्वामी महाराज दर्शन देणार असतील ,तर मी तपाचरण करेण ही खात्री बाळग!" मामांचे हे वाक्य पूर्ण होते न होते तोच या दोघा माय-लेकांपुढे प्रकाश झोतातून भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रगटले.त्यांनी मामांना दर्शन दिले.पुढे मामांनी आपला शब्द आजिवन अखंड पाळला.आपले संपूर्ण जिवनच मामा तप:पूत रितीने ,व्रतस्थ पद्धतीने जगले.श्रीस्वामीरायांच्या शब्दाबाहेर एक क्षणही ते गेले नाही.हे एक विलक्षण दिव्यच आहे.मामांचे वडिल श्रीदत्तोपंत हे प्रत्यक्ष भगवान श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे अनुग्रहीत व कृपा प्राप्त शिष्य होते.यांची प्रतिमासी पौर्णिमेला श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे वारी करण्याचा नियम होता.होणारे अपत्य टिकत नसल्याने दोघांचे ही अंत:करण अतिशय दु:खी होते अशातच १९१२ ला दोघेही श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे देवांच्या दर्शनाला आले.देवांपुढे आपली व्यथा मांडल्यावर त्यांना तात्काळ देवांचा टेंबे स्वामी महाराज यांच्याकडे जाण्याचा आदेश झाला. सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथेच होते. श्रीदत्तोपंत आणि सौ.पार्वतीदेवींना महाराजांनी आशिर्वाद दिला होता की , "यापुढे गर्भ श्रीकृपेने टिकेल.मुलगा होईल.तो ईश्वरसाक्षात्कारी असेल आणि दीर्घायुषी ही असेल.तो थोर दत्तभक्त असेल.तरीही काही कठीण प्रसंग आलाच तर दत्तस्मरण करा.संकटाचे निवारण होईल. परमेश्वरकृपेने सगळे ठीक होईल." लवकरच देवांचा ,श्री स्वामी महाराजांच्या कृपेचा प्रत्यय दत्तोपंत व मातोश्रींना आला.मातोश्रींना दिवस गेले व पोटी एक थोर विभूतीमत्व वाढायला लागले. १९१४ साली मंगळवार दिनांक २३ जून रोजी जेष्ठ महिन्याच्या अमावास्येला मातोश्री पार्वती देवींना प्रसुती वेदना सुरु झाल्या.कळा वाढून लागल्या पण त्यांनी जिवघेणे रुप धारण
केले.मातोश्रींनी श्री स्वामी महाराजांचे स्मरण व धावा सुरु केला.त्याच वेळी इकडे गरुडेश्वरी रात्री अकरा वाजता श्री टेंबे स्वामी महाराज आपला देह ठेवण्याच्या तयारीत होते.ते डोळे मिटणार तेवढ्यात मातोश्रींनी धावा सुरु केला.मिटलेले डोळे स्वामी महाराजांनी क्षणभर उघडले व पुन्हा मिटले.आपला देह तिथेच ठेऊन ते इकडे पुण्यात पार्वतीमातोश्रींपुढे प्रगट झाले.श्री स्वामी महाराजांनी आपला उजवा हात उंचावून पार्वतीदेवींना अभय दिले.त्याबरोबर प्रसुती वेदना थांबल्या.श्री स्वामी महाराज म्हणाले, "काळजी करु नकोस.गुरुवारी मुलगा होईल.त्याचे नाव 'श्रीपाद' ठेव! धीर धर.आमच्या पूर्णांशेकरुन हा मुलगा होईल.तुमचे कल्याण असो!" असे म्हणून स्वामी महाराज अंतर्धान पावले व परत गरुडेश्वरी आले.समाधी घेण्यासाठी पुन्हा डोळे मिटणार तोच जवळ असलेल्या हैदराबादच्या श्री.शंकरराव आजेगांवकरांनी त्यांना विचारले, "महाराज आपण एकदा डोळे मिटलेत.पुन्हा उघडलेत आणि आता परत मिटणार आहात, हे काय ?" त्यावर श्री स्वामी महाराज म्हणाले, "भक्त कार्या करण्यासाठी गेलो होतो!" त्यानंतर साधारण रात्री अकरा वाजता अमावस्या उलटून प्रतिपदा लागल्यावर स्वामी महाराजांनी आपला देह ठेवला.गुरुवारी श्री स्वामी महाराजांच्या परमपवित्र देहाला नर्मदा माईंच्या जलात समर्पित करण्यात आले व इकडे गुरुवारी पहाटेच मातोश्रींना प्रसुती वेदना सुरु झाल्या.गुरुवारी सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी पुत्ररत्न झाले.श्री स्वामी महाराजांनी सांगितलेल्या प्रमाणे मुलाचे नाव "श्रीपाद" असे ठेवण्यात आले.मुलाचे बारसे,कान टोचने हा सर्व विधी देवासमोर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथेच पार पडला.
शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे बाळ श्रीपाद वाढू लागले.१९१६ ला दत्तोपंतांनी आपले बिर्हाड पुन्हा नसरापूर येथे हालविले.नसरापुर येथे असंख्य अलौकिक अशा घटना घडल्या आहेत.पण त्या प्रस्तुत लेखात मांडणे शक्य नाही.मामांच्या बालपणापासून घडलेल्या या घटना मातोश्रींच्या "स्वामीतनया" तसेच मामांच्या "श्रीपाद चरित्रसुधा" "चक्रवर्ती" आणि असंख्य वाङमयाद्वारे विविध ग्रंथातुन मांडल्या आहे आपण त्यातून त्या वाचू शकता.बाल श्रीपाद आपल्या बहिणीकडे बेळगावला गेले होते.तेव्हा पहाटे देवघरात त्यांचे भाऊजी श्री दत्तूअण्णांनी त्यांना आपल्या जागी ध्यानाला बसविले.त्यावेळी ध्यानात बाल श्रीपादाला श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी दर्शन देऊन कृतार्थ केले होते.तसेच सन १९२१ ला सात वर्षाचे श्रीपाद बनेश्वरच्या जंगलात हरवले तेव्हा हातात खुळखुळ्याची काठी ,पांढरी कफनी घातलेल्या थोर सिद्ध असलेल्या बुवा साहेब महाराजांनी दर्शन दिले ,रात्रभर आपल्याजवळ ठेवून घेतले व सकाळी गावात आणून सोडले. श्रीमामांचे बालपण अतिशय विलक्षण गोष्टींनी भरलेले आहे.त्यांची हिमालय यात्रा,नर्मदा परिक्रमा बद्रीनाथ - केदारनाथ यात्रा ही बालपणीच आपल्या पिताश्री समवेत घडली होती.प्रत्येक यात्रेची आपली एक विशेष कथा आहे. संतांचे जिवन म्हणजे आपल्यासाठी एक कवडसाच असतो जो आपल्याला सतत वाट दाखवित असतो.तसेच मामांचे ही जिवन चरित्र आहे.लवकरच एक अघटित घडले.१९२८ चे साल उजाडले व दत्तप्रभुंनी दत्तोपंतांना आदेश केला की आता आपले कार्य पूर्ण करुन देह ठेवावा.त्यामुळे अगदी अकस्मात दत्तोपंतांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.थोड्याच दिवसांत सिताराम पंत म्हणजे मामांचे काका यांनी सर्व जमिन मालमत्तेवर आपला अधिकार सांगितला आणि मातोश्रींना काहीही न देता घराबाहेर काढले.खरंतर मातोश्रींच्या जागी इतर कुणीही असते तर कोर्टात गेले असते पण देवांची इच्छा म्हणून त्या निश्चल वृत्तीने सर्व आघात सहन करत होत्या. पार्वतीदेवींनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा धावा सुरु केला.कृपाळू मायाळू स्वामी माउली आपल्या या लेकीसाठी तात्काळ धावून आले. "डगमगू नकोस.मी तुझ्या सोबत आहे!" असा आशिर्वाद स्वामीरायांनी मातोश्रींच्या दिला व ते अंतर्धान पावले. चौदा वर्षांचा श्रीपाद,पाच वर्षांचा यशवंत अशी स्वतःची दोन मुले आणि एक वर्षांचा नातू यांना घेऊन मातोश्री पुण्यात आपल्या भावाकडे आल्या.पुण्यातील मंडई जवळच न्यायमूर्ती रानडे यांच्या वाड्याजवळ एक खोली त्यांनी भाड्याने घेतली व आपला हा छोटा संसार घेऊन त्या राहू लागल्या.( याच ठिकाणी धनकवडी चे सद्गुरु श्री शंकर महाराज हे मातोश्री व मामांना भेटायला येत असत) खरंतर जवळ भाऊ ,त्यांची मुलगी अनसूया जावाई रामभाऊ कुलकर्णी हे सर्व होते पण त्यांनी कुणाचाही आधार घेतला नाही.कारण मातोश्रींचा भक्कम आधार म्हणजे श्रीभगवंत हेच होते.आपल्या जवळील जे होते ते विकून संसार चालविण्याचा त्या प्रयत्न करु लागल्या.त्यावेळी श्रीपाद हे चवदा वर्षांचे होते. काही काळ शिक्षण घेतले पण आपल्या घरातील आर्थिक स्थिती बघता मामांनी शालेय शिक्षण बंद केले आणि धंदेशिक्षण घेण्यास सुरुवात केली.फावल्या वेळेत साबण ,तेल ते विकत असत.वर्तमानपत्र टाकणे, शिकवण्या घेणे हे ही सुरुच होते.प्रत्येक मार्गाने बाल श्रीपाद आपल्या मातोश्रींना मदत करत असत.मातोश्रींच्या पारमार्थिक अधिकार अतिशय उच्च कोटीचा होता.त्या अखंड भगवंतांच्या अनुसंधान स्थिर असत.दत्तुअण्णा गेल्यापासून अखंड बारा वर्षे त्यांनी जमिनीला पाठ लावली नव्हती.एक भुक्त राहून त्या अखंड श्रीस्मरणात तल्लिन असतं.त्यांचा रात्रीचा साधनेचा क्रम ही ठरलेला असे.रात्री आठ ते अकरा त्या बैठकीला म्हणजे साधनेला बसत.अकरा वाजता उठून ,हातपाय धूत व थोडे पाणी पीत.नामस्मरण करीत येरझार्या घालत.रात्री साडेअकरा ते अडीच पर्यंत साधना करत.अडीच ते तिन पुन्हा पाणी पिऊन येरझार्या घालत.पुन्हा तिनं ते पाच साधना करीत.मामा आपल्या मातोश्रींचे हे दिव्य तपाचरण बघत असत.याचा मोठा परिणाम त्यांच्या मनावर झाला होताच.मातोश्रीं नेहमी सांगत की "अनुभव येवो अथवा न येवो, देहाची तिनं चिमूट राख होई पर्यंत साधन करत राहणे हेच शिष्याचे परमकर्तव्य आहे." मातोश्रीं या मामांच्या सद्गुरु.मामांनी तरुणपणी भारतील स्वतंत्र संग्रामात ही भाग घेतला होता.पुण्यात मामांचे मोठे नाव होते पण मातोश्रींनी मामांना मार्गदर्शन करुन त्यांचे अवतारकार्य लक्षात आणून दिले.यथावकाश मातोश्रींनी मामांचे लग्न लावून दिले.खरंतर मामांना लग्न न करता आपल्या उपजत प्रवृत्तीनुसार संन्यास घ्यायचा होता पण तसे न करता संसार करण्याची आज्ञा मातोश्रींची झाली व मामांनी ती शिरसावंद्य मानली. १९४१ ला मातोश्रींनी मामांना मस्तकावर हात ठेवून अनुग्रह दिला.अनुग्रह देल्याक्षणी मामा गुढ समाधीत स्थिर झाले.मामा या दिव्य स्थितीत बराच वेळ होते. समाधी उतरल्यावर त्यांनी मातोश्रींना नमस्कार केला तेव्हा मातोश्री त्यांना म्हणाल्या , "बरोबर बारा वर्षांनी आता सारखा आत्मसुखाचा अनुभव ज्यांच्या सान्निध्यात येईल,ते तुझे मंत्रगुरु असतील असे समज!"तसेच त्यानंतर मामांना कटाक्षाने ज्ञानेश्वर माउलींची सेवा करण्याची आज्ञा मातोश्रीनी दिली.पुढे त्याच वर्षी मातोश्रींनी मामांना समोर बसवून म्हटले, "सख्या ,तुला महात्मे देह कसा ठेवून बाहेर कसे पडतात ते बघायचे ना? मग बैस इथे आणि ध्यान देऊन बघ!" आणि काय आश्चर्य मातोश्रींनी मामांसमोर आपला प्राण कुडीबाहेर नेला व भगवंतांमध्ये विलीन केला.मामांना नेमकं काय घडलं हे लक्षातच आले नाही पण मातोश्रींनी त्याद्वारे आपल्या नश्वर देहाची खोळ सांडलेले होती.हे असे महायोग्यांना ही दुर्लभ असा समाधी सोहळा लिलया करणार्या मातोश्री किती मोठ्या अधिकारी असतील याची साधी कल्पनाही आपण करु शकत नाही.
मातोश्रींनी देह ठेवल्यावर मामा फारच अस्वस्थ झाले.पण मामांची ही दु:खी मनस्थिती ओळखून मातोश्रींनी मामांना भगवंतांच्या रासलिलेचे दर्शन प्रत्यक्ष घडविले होते.तसेच पुढे कामा निमीत्त गुजरात राजकोट येथे असतांना कैवल्यधाम येथे जाऊ लागले.मुळातच योगी असलेल्या मामांना हटयोगाची आवड निर्माण झाली व ते त्याच्यात पारंगत ही झाले.मामा त्यात इतके तरबेज झाले की ,प्राणनिरोधन -योगाच्या आधारे ते स्वतः ला जमिनीत पुरुन घेत आणि त्या अवस्थेत कितीतरी काळ राहात.एकदा मामांनी आपल्याला असेच पुरुन घेतले तोच त्यांना त्या खड्ड्यात मातोश्रींचे दर्शन झाले.त्या मामांना म्हणाल्या, "सख्या,हा आपला मार्ग नाही.जो एकांत तू खड्डयात बसून मिळवतो आहेस ,तो एकांत बाहेर लोकांमध्ये बसून मिळवता आला पाहिजे.बाहेर व्यवहार चालू असतांनाही,आतला एकांत व भगवंतांशी ऐक्य साधता आले पाहिजे." मामांनी यानंतर हा मार्ग सोडला. सन १९३६ पासून १९४८ सालापर्यंत म्हणजे सलग बारा वर्ष मामांनी पडशीची वारी केली.त्यानंतर पुढील बत्तीस वर्षे १९८० सालापर्यंत श्री.केशवराव देशमुख महाराजांच्या दिंडीतून पायी वारी केली.नंतर मात्र अखेर पर्यंत आषाढी एकादशीला बसने किंवा गाडीने मामा पंढरपूरला देवांच्या दर्शनासाठी जात. सन १९४८ ला मामांनी बनेश्वर येथील रम्य शिवालयात आपले पहिले श्रावणाचे अनुष्ठान केले.याच काळात त्यांना भगवान आशुतोष महादेवांचे दिव्य दर्शन घडले होते.पुढे मामा दर वर्षी गिरणार वारीला जात असत
या दरम्यान त्यांना दत्तप्रभुंनी अनेकदा दर्शन देऊन कृतार्थ केले.तसेच मामा अनेकदा हिमालय, विष्णू प्रयाग,देवप्रयाग,मानसरोवर अशा अनेक दिव्य क्षेत्री वारंवार जात राहिले.आदल्या अवतारातही त्यांचे हे सर्व क्षेत्र अतिशय आवडीचे होते.या सर्व वेगवेगळ्या प्रवासाचे अतिशय अलौकिक आणि चमत्कारिक असे प्रवास वर्णन वाचून थक्क व्हायला होते.प्रत्येक प्रवासात श्रीभगवंत मामांच्या सोबत होते आणि याची अनुभूती त्यांना पदोपदी येत होती.या सर्व लिला आपण मामांच्या चरित्रात विस्तृतपणे वाचाव्या ही विनंती.सन १९५३ ला अनपेक्षितपणे देवांच्या कृपेने मामांनी आपल्या जिवनातील पहिले ज्ञानेश्वरी चे प्रवचन केले व त्यांच्या जिवन चरित्राचा एक अलौकिक भाग असलेले या दिव्य प्रवचनमालेचा तो अविरत ज्ञानयज्ञ प्रज्वलित झाला.ज्यामुळे अनेक हृदयात ज्ञानेश्वरी चे ज्ञान रुजल्या गेले. या आधिच मामांना विष्णूप्रयाग येथे श्रीज्ञानेश्वर माउलींनी प्रयाग संगमात आत खोल पाण्यात ओढुन आपले दिव्य दर्शन दिले व ज्ञानेश्वरी चे ज्ञान मामांच्या हृदयात प्रविष्ट केले.मामांना यानंतर ज्ञानेश्वरी चा अर्थ सहज उलगडू लागला.काहीही न वाचताच ज्ञानेश्वरीतील गुढगम्य ज्ञान त्यांना स्फुरले जाऊ लागले. पुढे १९५४ ला मामा पंढरीची वारी करुन सोलापूरला आले.तेथेच त्यांची आपल्या सद्गुरु माउली योगीराज श्री गुळवणी महाराज यांच्याशी भेट झाली.हा पण प्रसंग अतिशय विलक्षण आहे.महाराजांपुढे जाता क्षणी मामांना तोच आत्मानंदाचा दिव्य अनुभव आला जो मातोश्रींनी अनुग्रह दिल्यावर आला होता.या प्रसंगाला बरोबर बारा वर्ष उलटली होती व त्याच वर्षी गुरु महाराजांची भेट मामांना झाली.पुढे गुरुपोर्णिमेला योगीराज श्री गुळवणी महाराजांनी मामांना रीतसर मंत्रदिक्षा दिली,परंपरेचा दिव्य मंत्र दिला व परंपरेचे उत्तराधिकारही दिले.हे सर्व करण्याची टेंबे स्वामी महाराजांनी गुळवणी महाराजांना आज्ञाच झाली होती.पुढे गुळवणी महाराजांनी मामांना कुरवपूर ला अनुष्ठानाला पाठवले.या अनुष्ठान पुर्तीला प्रत्यक्ष भगवान श्रीपाद श्रीवल्लभ प्रभुंनी मामांना दर्शन देऊन आपल्या प्रसाद पादुका दिल्या.त्यानंतर अनेक लिला मामां महाराजांच्या चरित्रात घटीत झाल्या.योगीराज श्री गुळवणी महाराजांची अनन्य भावाने सेवा करुन मामांनी त्यांच्या पूर्ण कृपेला संपादन केले.हा मामांच्या चरित्रातील एक विस्तृत भाग ठरेल एवढा तो दिव्य आहे. एकदा मामा श्री गुळवणी महाराजांसमवेत नारेश्वरला रंगावधूत स्वामी महाराजांच्या भेटीला गेले होते तेव्हा गुळवणी महाराज बापजींना म्हटले होते, "श्रीपादराव म्हणजे प.पू.श्री.थोरल्या महाराजांचीच पूर्ण विभूती समजावी.ही कोणी सामान्य व्यक्ती नाही.श्रीदत्तकृपेचे ते पूर्ण धामच आहे!" १९६१ मामांनी ह.भ.प केशवराव देशमुख महाराजांची हस्तलिखीत गद्य ज्ञानेश्वरीचे गुरु महाराजांच्या आज्ञेने प्रकाशन ही केले.१९६८ साली केशवराव महाराज मामांच्या स्वप्नात आले आपल्या माडीवर ज्ञानेश्वरी चे प्रवचन करण्याची आज्ञा केली. मामांनी महाराजांच्या घरातील भाग असलेली माडी विकत घेतली.त्याला "श्रीज्ञानेश्वरी निवास" असे नाव ठेवले व पुढे १९ एप्रिल १९७१ ला प.पू.श्रीगुरु महाराजांच्या हातुन त्याचे उद्घाटन केले.मामांनी याच ठिकाणी दररोज ज्ञानेश्वरीवर प्रवचने सुरु झाली.या माडीत मामांच्या मुखातून ज्ञानेश्वरीचे अमृतच स्त्रवत असे.मामांचे प्रवचन ऐकायला बरेच लोक जमत असत.याच दरम्यान मामांचे ज्ञानेश्वरी,कृपा योग या विषयांवर विविध ग्रंथाच्या लेखनाचे काम ही सुरुच होते.ज्ञानेश्वरीतील गुढ रहस्ये मामा अगदी सहज आणि सुंदर शब्दांत श्रोत्यांना समजावून सांगत असत.आचार्य अत्रेंच्या विनंतीवरुन आणि गुरु महाराजांच्या आज्ञेने मामा ज्ञानेश्वरीच्या प्रचारार्थ इंग्लंडमध्ये ही जाऊन आले.तिथे ही मामांनी आपला काटेकोर आचारधर्म पाळला.आपल्या दिनक्रमात कसलाही बदल केला नाही.१९७३ ला मामांना श्रीगुरु महाराजांनी आपले वेगळे स्थान निर्माण करण्याची आज्ञा दिली.भविष्यात शक्तिपात दिक्षेचा होणारा बाजार आणि होणारा गोंधळ यांची पूर्ण कल्पना मामांना दिली.संप्रदायाचे विस्तृत कार्य आपल्याद्वारे होणार आहे याची जाणीव करुन दिली.मामांनी गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून १९७३ लाच "माउली" आश्रमाचे काम सुरु केले. २६ डिसेंबर १९७३ ला माउली आश्रमाची वास्तुशांती करण्यात आली.गुरु महाराजांची प्रकृती ठिक नव्हती त्यामुळे त्यांनी आपल्या पादुका आणि बंद्या रुपयांची थैली एका शिष्याकरवी माउलीत प्रसाद रुपाने पाठवली. पुढल्या वर्षी म्हणजे १९७४ ला प.पू.योगीराज श्री गुळवणी महाराजांनी आपल्या देहाची खोळ सांडली,आपला देह दत्तचरणी लिन केला.त्याआधी गुरु महाराजांनी मामांना अनेक आज्ञा केल्या,संप्रदायाचे कार्य कसे करायचे,सर्व जबाबदारी ही मामांनी कशी पार पाडायची व मामांच्या कडून हे कार्य कशाप्रकारे वाढेल आणि विस्तारेल यांची पूर्ण कल्पना दिली. देह ठेवण्याधी अनेक गोष्टी मामांना सांगुन गुरु महाराजांनी त्यांचे मस्तक कुरवाळत आश्वासन दिले की, "आम्ही सदैव तुमच्या बरोबरच आहोत" व मामांना परत पाठवले.पुढे माउलीतुन अनेक आर्त मुर्मुक्षू जिवांना मामांनी दिक्षा दिल्या.अनेकांच्या पिशाच्च बाधा,ग्रह बाधा ,प्रेत बाधा ,अनेकावीध दु:ख दूर केले.माउलीत अनेक अनुष्ठान केलेत. प्रत्येकावर केलेल्या कृपेचे वर्णन करायचे झाले तर अनेक वर्ष यावर लेखमाला होतील आणि वाचुन कुणीही थक्क होईल इतक्या त्या दिव्य लिला आहेत.मामांनी भक्तांना घेऊन अनेक यात्रा केल्या.या यात्रेत अनेक चमत्कार भक्तांनी अनुभवले.अनेकांना ज्ञानेश्वरी वाचायला,जगायला प्रेरीत केले. मामा हे यज्ञप्रिय होते.मामांनी अनेक ठिकाणी विविध स्वाहाकार केले.त्यातील शतचंडीचा स्वाहाकार,कर्हाडचा महारुद्र स्वाहाकार आणि नृसिंहवाडी येथील अतिरुद्र स्वाहाकार विशेष भव्य झाले.नृसिंहवाडी येथील स्वाहाकारा प्रसंगी योगीराज श्री गुळवणी महाराज स्वतः ज्योतीरुपाने हजर असल्याचे अनेकांनी बघितले.महाराजांनी मामांना दिलेला आपला शब्द पाळला. याच दरम्यान मामांनी आपल्या अतिप्रिय आणि आपले उत्तराधिकारी असलेल्या शिष्यद्वयांना निवडले होते.हे शिष्यद्वय म्हणजे सद्गुरु श्री शकु़ंतला ताई आगटे आणि सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे.पू.मामांनी आपल्या या दोन शिष्य रत्नांवर पूर्ण कृपा केली ,आपले सर्व संप्रदायाचे ज्ञान यांच्या द्वारे करण्याची योजना आखली व ती पूर्णत्वास ही नेली.मामांच्या या दिव्य शिष्यांनी केलेले अलौकिक कार्य आजही अखंड अविरत सुरू आहेच आणि आपल्याला ते दिसुन ही येत आहे.
प.पू.मामा महाराजांच्या चरित्रात इतक्या विलक्षण लिला आहेत,इतक्या अचाट लिला आहेत की वाचुन थक्क व्हायला होतं.मामांचा विविध संत मंडळींशी असलेला प्रेम स्नेह हा तर एक लेखमालेचा स्वतंत्र विषय होईल.यावेळी हेळवाकहून प्रकाशित होणारे "अमृतबोध" मासिक याच मामांचा व इतर संतांच्या हृदय संबंधांना समर्पित करण्यात आले आहे.यातून मामांचे इतर संतांशी असलेल्या संबंधाविषयी प्रकाश टाकण्यात आला आहे. जसे नारेश्वर येथील रंगावधूत स्वामी महाराज यांचे शिष्य पंडितजी हे तर मामांना टेंबे स्वामीच मानायचे.त्यांना मामांच्या ठाई अनेकवेळा थोरल्या स्वामींचे दर्शन घडले होते.तसेच नृसिंहवाडी येथील म्हादबा महाराज मामांना दत्तप्रभु मानायचे. फलटन चे गोविंद काका उपळेकर महाराज यांचा विशेष स्नेह मामांवर होता.वेळापूर चे भाईनाथ महाराज मामांना आपल्या भावाप्रमाणे मानत.तर विश्वनाथ बाबा डव्हा,धुंडा महाराज देगलूरकर,मामा साहेब दांडेकर अशा अनेक संत मंडळी मामांना पुज्य मानत असत.प.पू.आनंदमयी मा तर मामांना प्रत्यक्ष भगवदविभूतीच मानत.प.पूअवधूतानंद महाराजांना नृसिंहवाडी येथील दत्तपादुकांवर मामांनी दर्शन दिले होते.आंबेकर महाराज,अमलानंद महाराज हे मामांच्या बद्दल सदैव धन्योद्गार काढत. सन १९८९ च्या चैत्रात श्री स्वामी समर्थ महाराज मामांपुढे प्रगटले आणि त्यांना आदेश दिला की, "पुढल्या वर्षी तुम्हाला आमच्याबरोबर यायचे आहे.उर्वरीत अवतारकार्य भराभर उरकण्याचा प्रयत्न करा.तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला आयुष्य वाढवून देऊ." त्यावर मामांनी समर्थांना नमस्कार करुन म्हटले, "देवा ,माझे शरीर आता खूप थकले आहे.आपल्या आज्ञेप्रमाणे मी वागेन!" हे ऐकताच समर्थांनी मामांना कुरवाळले आणि ते अंतर्धान पावले.मामांनी पुढील एका वर्षात आपले सर्व कार्य आटोपून ,प्रत्येक जबाबदारी आपल्या उत्तराधिकारी सद्गुरु द्वयांना समजावून सांगितली.सगळ्या प्रकल्प आणि संस्थेच्या जबाबदारीतून मामा मोकळे झाले.सर्व कार्याची रुपरेषा मामांनी ठरवली.याचदरम्यान देवांसाठी १९९० ला दत्तधाम या दिव्य दत्तक्षेत्राची निर्मिती केली.त्याठिकाणी भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांसाठी अलौकिक स्थान निर्माण केले.वर्षभरात अनेक भक्तांना भेटून माउलीत भंडार्याला यायचे आहे असे सांगितले.शेवटच्या दिवसात आपल्या प्रिय शिष्य व उत्ताराधिकारी सद्गुरु द्वयांना आपल्या अंतिमक्रिया व प्रसाद पादुका आपल्या बरोबर देण्याची कल्पना दिली.दिनांक २० मार्च मंगळवारी रात्री सुमारे साडे नऊ वाजता श्रीमामांनी सर्व साधकांना प्रेमाने निरोप दिला.रात्री १२ वाजता श्री मामांनी सर्वांना आपापल्यि जागी जाण्यास सांगितले.सर्व गेल्यावर शुचिर्भूत झाले.मग ते आपल्या जागी गादीवर येऊन ,लोडाला टेकून बसले.त्याच वेळी श्री अक्कलकोट स्वामी महाराज व मातोश्री प्रगटल्या.मामांनी "स्वामी" म्हणून हात जोडून नमस्कार केला व "आई" म्हणून नमस्कार केला. दोघांनाही नमस्कार करुन वेगाने सुषुम्नेत प्राण वर खेचले.आंतर-खेचरी मुद्रा लावली.जीभ दातांमध्ये ताणून धरली आणि प्राण ब्रह्मरंध्री नेले.पूर्वाषाढा नक्षत्राचा दुसरा चरण संपण्यापूर्वी त्यांनी योगबलाने देहाची खोळ सांडली. एक महायोगी,दत्तावतारी महासिद्ध, ज्ञानेश्वरी चे थोर भाष्यकार, प्रत्यक्ष दत्तप्रभु आपल्या स्वधामी निघून गेले. श्री रोहन दादा उपळेकर यांनी आपल्या "सद्गुणरत्नाकर प.पू.श्रीमामा" या ग्रंथात मामांच्या दोन अतिशय दिव्य आठवणी दिल्या आहेत त्या इथे देऊन लेखाची समाप्ती करतो.
१) कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्रीमद् चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराज १९८१ साली सातार्यात अकरा महिने राहिले होते.त्यावेळी प.पू.मामा आपल्या उत्तराधिकारी सौ.शकुंतला ताई आगटे यांना बरोबर घेऊन आचार्यांच्या दर्शनाला गेले.प.पू.मामा दर्शनाच्या रांगेत उभे होते.तेवढ्यात स्वतः परमाचार्यांनी आतून एका शिष्याला ; "बाहेर टेंबे स्वामी उभे आहेत,त्यांना सन्मानाने आत घेऊन ये!"असे सांगून पाठविले.तो बाहेर आला पण त्याला कुणी संन्यासी दिसले नाही.त्यामुळे तो परत आत गेला.त्यावर हसून परमाचार्य म्हणाले, "अरे त्यांना आता टेंब्ये स्वामी म्हणत नाहीत,मामा असे म्हणतात." शिष्याने मामांची रांगेत चौकशी केली व मामांना घेऊन तो आत गेला.प्रत्यक्ष शिवावतार परमाचार्यांनी मामांचे अत्यानंदाने स्वागत केले.त्यांना क्षेमालिंगन दिले व दोघेही अस्खलित संस्कृत मध्ये खूप वेळ बोलत होते.वस्तुत: मामा संस्कृत भाषा शिकलेले नव्हते आणि या सर्व वेळेत आचार्य मामांना टेंब्ये स्वामी म्हणूनच संबोधत होते.
२) सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींची कृपा असलेल्या थोर विभूती प.पू.ताई दामले यांना लहानपणी डोळ्यांची व्यथा होती.त्यासाठी त्यांनी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे असतांना प.पू.टेंब्येस्वामी महाराजांचे चरणतिर्थ डोळ्यांत घालण्याचा उपाय केला होता.श्रीस्वामी महाराज कृष्णामाईवर स्नान करुन आले की त्यांची ओली पावले घाटाच्या पायर्यांवर उमटत.ते चरणतिर्थ प.पू.ताई दामले आपल्या पदराने टिपून घेत आणि डोळ्यात घालीत.या उपायाने त्यांची व्याधी पूर्ण दूर झाली.खरे तर त्या असे करतात हे स्वामी महाराजांना माहिती असण्याचा संबंधच नव्हता.पुढे अनेक वर्षांनी प.पू.ताई दामले यांची प.पू.मामांशी एकदा पुण्यात भेट झाली.त्यावेळी दारात पू.मामांच्या पायांवर त्यांनी दूध -पाणी घालून स्वागत केले.प.पू.श्रीमामा घरात आले आणि अचानक मागे वळून प.पू.ताई दामलेंना म्हणाले, "आता ते पाणी पदराने टिपून घ्यायची गरज नाही बरे! आपले काम झाले आहे." या वाक्याचा संदर्भ फक्त ताईंनाच कळला, बाकी कुणालाही कळले नाही.त्याचवेळी प.पू.ताई दामलेंना प.पू.मामांच्या जागी प्रत्यक्ष प.पू.श्री टेंब्ये स्वामी महाराजांचे दिव्य दर्शनही झाले.
Saturday, July 2, 2022
भक्तवत्सल भक्तभिमानी सद्गुरु योगीराज श्री मामा महाराज देशपांडे यांची १०८ वी जयंती🌸🌺🙏☘️
अशा प्रत्यक्ष श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे पूर्णविभूती असलेले सद्गुरु माउली श्री मामा यांच्या दिव्य चरित्र सागरातील काही मोती निवडून त्यांच्याच कृपेने या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला.आजवर कधीही इतका गोंधळ झाला नव्हता ,काय मांडावे ,काय निवडावे या विवंचनेत लिहायलाच नको म्हणून लिखान बंद ही केले.पण पुन्हा चरित्र वाचतांना त्यातील दिव्य लिला पुन्हा प्रेरणा देऊन गेल्या.हा लेख म्हणजे मामा माउलींच्या चरित्राचा एक कणच आहे.आपण जरुर मामांच्या विविध चरित्र आजवर प्रकाशित झालेले साहित्य,आठवणी वाचाच.आपण पुण्यातील सिंहगड रोड वरील मामांच्या निजस्थानी "माउली" आश्रमात जाऊन मामांच्या या दिव्य क्षेत्राच्या पवित्रतेचा ,उर्जेचा लाभ घेऊ शकता,जवळच असलेल्या "श्रीपाद निवास" या वास्तूतुन हे सर्व साहित्य घेऊन वाचु शकता.मी तर म्हणेल एकदा वाचाच. शुद्ध अध्यात्म आणि त्याचे शुद्ध ज्ञान या ग्रंथातून वाचायला मिळते.श्री रोहन दादा उपळेकर यांनी लिहिलेला "सद्गुणरत्नाकर प.पू.श्रीमामा" हा ही अत्यंत वाचणीय ग्रंथ झाला आहे.तो ही जरुर वाचाच.यात अगदी सुटसुटीतपणे मामांच्या एकेक अलौकिक गुणांची मांडणी केली गेली आहे.मी प्रत्येक लिला या एका लेखात लिहीण्यास असमर्थच आहे तरी मामांनीच कृपा करुन हे लिहून घेतलं.प.पू.मामांच्या सुकोमल चरणी ही शब्दसुमनांजली अर्पण करतो आणि इथेच थांबतो.
✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️
Subscribe to:
Post Comments (Atom)
कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸
#कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :- ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :- नाथ संप्रदाय हा आपल्या भ...
-
दाणोलीचे_योगीराज 🙏🌸🌺 भारतात आजवर झालेल्या सर्व संत मांदियाळीतील एक अतिशय विलक्षण आणि अलौकिक असे संत रत्न....
-
आज ऋषीपंचमी गजानन बाबांची ११२ वी पुण्यतिथी 🙏🌺 तब्बल एक शतक लोटून गेले आजच्याच दिवशी शेगावी प्रगटलेला ज्ञानगभस्ती ...
-
शिवावतार_आदमापूर_निवासी_सद्गुरु_श्रीबाळुमामा_महाराजांची_आज_पुण्यतिथी :-🙏🌸🌺🚩 ...
-
नमस्कार_श्रीपाद_दत्तात्रेयाला !!! 🙏🌸☘️🌺 दत्त संप्रदाय,नाथ संप्रदाय, भागवत संप्रदायाचे अध्वर्यू आणि शक्तीपात य...
-
#कथा_ज्ञानदेवांची_भाग१ :- अज्ञानाच्या गाढ निद्रेत निद्रिस्त झालेल्या समाजाला खडबडून जागे करणारा सुर्योदय ज्ञानोबांच्या रुपात महाराष्ट्रान...
-
तस्मै_नारायणाखिलगुरो_भगवन्नमस्ते ।।🌸🌺🙏 अनादी काळापासून चालत आलेला पुरातन प्राचीन असा दत्त संप्रदाय.अगद...
-
सगुणभगवद्स्वरूप भाग ५ :- शांतिसागर दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर. शान्तिर्मूर्तिमती तपोबलधुरा ,योगाग्निशुध्दाशय: । श्रौत...
-
सगुणभगवद्स्वरूप भाग ४:-योगीराज समर्थ सद्गुरु श्री गुळवणी महाराज. शक्तिपाताचा महामेरु | बहुत जनांसी आधारु | ब्रम्हस्थितीचा निर्धारु | शांभ...
-
स्वामी समर्थ माउलींचे प्राकट्य आणि त्या संबंधी तत्कालिन दाखले :- आज चैत्र शुद्ध द्वितीया अक्कलकोट निवासी परब्रह्माचा आज प्रगटदिन.स्वामी माउ...
-
मिरज येथील थोर संत सद्गुरु श्री अण्णाबुवा महाराज यांची आज १५० वी पुण्यतिथी :- हिंदूस्थान ही संतभूमी,...


No comments:
Post a Comment