Sunday, December 4, 2022

सगुणभगवद्स्वरूप भाग ४:-योगीराज समर्थ सद्गुरु श्री गुळवणी महाराज.🌸🌿🙏🚩

 


सगुणभगवद्स्वरूप भाग ४:-योगीराज समर्थ सद्गुरु श्री गुळवणी महाराज.


शक्तिपाताचा महामेरु | बहुत जनांसी आधारु | 

ब्रम्हस्थितीचा निर्धारु | शांभव योगी ||


पंचम दत्तावतार भगवान श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचे परमशिष्य योगीराज श्री वामनरावजी गुळवणी महाराज हे श्री स्वामी महाराजांच्या शिष्य प्रभावळीतील एक अलौकिक संत रत्न आहेत.श्रीगुळवणी महाराज हे अखंड ब्रह्मचारी व महायोगी होते. श्री महाराजांचे संपूर्ण कुळच हे परमदत्त भक्त व सर्व घरावर नृसिंहवाडीच्या देवांची परमकृपा होती.सद्गुरु योगीराज गुळवणी महाराजांचे जिवन चरित्र इतकं विलक्षण आहे की कुणालाही ते अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही.श्री महाराज समाजात अगदी सामान्य शिक्षक म्हणून वावरले ,इतकेच काय तर सोबतच्या लोकांनाही कळतं नसे की ते महायोगी व हजारो शिष्यांचे गुरुस्थान आहेत.पुण्यातील गोवईकर चाळीतील दहा बाय दहाच्या घरात राहणारे महाराज वाचले की आश्चर्याने सुन्न व्हायला होतं.महाराजांचे चरित्र जिवनाला दिशा देण्याचे रसायन आहे.एका लेखात ते मांडता येणारच नाही. तरी संकल्पानुसार त्यांच्याच कृपेने संक्षिप्त चरित्राचे स्मरण करण्याचा प्रयत्न करित आहे.महाराजांची निस्पृह वृत्ती , दत्तभक्ती,गुरु चरणी अनन्य निष्ठा , साधना व नित्य कर्मावरील श्रद्धा असे अनेक गुण आपल्याला चरित्रात बघायला मिळतात.त्यातील काही भागाचे आज आपण संक्षिप्त रुपात चिंतन करणार आहोत.


दक्षिण महाराष्ट्र व कोंकण यांच्या सिमेवर , कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भोगावती नदीच्या खोर्‍यात वसलेले कौलव या गावी दोनशे वर्षांपूर्वी गुळवणी हे कुटुंब वसत असे.हे वासिष्ठ गोत्रीय ,वैदिक आचारसंपन्न ब्राह्मण कुटुंब होते.या गावात श्रीगुरु महाराज म्हणजे गुळवणी महाराजांचे पणजोबा वेदमूर्ती नागेश भटजी राहत असत.संपूर्ण कौलव गावात हे एकमात्र ब्राह्मण कुटुंब होते.श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला ज्यांची पूजा देवांच्या ही आधी होते ते सद्गुरु श्री नारायण स्वामी महाराज हे नागेश भटजींचे सद्गुरु.

(श्रीनारायण स्वामींच्या चरित्रात नागेश भटजींच्या सह झालेले स्वामींचे लिला प्रसंग विस्तृत रुपात आले आहेत.शब्दविस्तारास्तव येथे ते देत नाही .त्यासाठी आपण कृपया श्री स्वामी महाराजांचे चरित्र जरुर वाचा.)

श्री सद्गुरु नारायण स्वामी महाराजांची या संपूर्ण घरावर पूर्ण कृपा होती.यांच्याच कृपेने नागेशभट्टांना पुत्र प्राप्ती झाली होते आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलाचे नाव "नारायण" असे ठेवले होते.हे श्री गुळवणी महाराजांचे आजोबा.पुढे यांचा वंशविस्तार झाला व त्यांना चार पुत्र व तीन कन्या झाल्या.जेष्ट अपत्य होते वेदमूर्ती दत्तंभट.हेच योगीराज श्री गुळवणी महाराजांचे पिताश्री.पुढे दत्तंभट हे कौलव‌ गाव सोडून कुडुत्री या गावी आले.दत्तंभट हे पौरोहित्य करणारे दत्तभक्त व परम सात्विक असे ब्राह्मण होते.यथावकाश कुडुत्री येथील उमाबाईंशी‌ त्यांचा विवाह झाला.या श्री गुळवणी महाराजांच्या मातोश्री.हे सत्शिल दत्तभक्त दाम्पत्य सदैव दत्तभक्तीत तल्लीन असत.दर पौर्णिमेला श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे जाण्याचा या दोघांचा ही नियम होता.उमा माता गरोदर होत्या व त्यामुळे त्यांना नृसिंहवाडी येथे देवांच्या दर्शनाला जाणे शक्य नव्हते.त्यामुळे देवांचा पादुका प्रसाद मिळावा म्हणून त्यांनी प्रायोपवेशन सुरु केले आणि आश्चर्य असे की त्यांच्या निष्ठेला प्रसन्न होऊन भक्तवत्सल भक्ताभिमानी कृपासिंधु भगवान श्री नृसिंह सरस्वती दत्त प्रभुंनी त्यांना स्वतः येऊन प्रसाद‌ पादुका दिल्या होत्या.( आजही त्या पादुका पुण्यातील वासुदेव निवासात स्थानापन्न आहेत.) अशा या थोर दत्त भक्तांच्या पोटी मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी शके १८०८ , २३ डिसेंबर १८८६ रोजी गुरुवारी रात्री दत्तसंप्रदायातील या महान विभूतीचा जन्म झाला.या बाळाचे नाव वामन असे ठेवण्यात आले.कुडुत्रीच्या घरातच महाराजांचे बालपण अगदी आनंदात व भक्ती पूर्ण वातावरणात व्यतीत झाले. याचदरम्यान उमा मातोश्रींना कर्करोग झाला.त्यानंतर मातोश्रींनी नृसिंहवाडी येथे जाऊन देवांच्या सेवेत काळ घालवण्याचा निश्चय केला.महाराजांचे मोठे भाऊ शंकर शास्त्री यांनीही मातोश्रींसह वाडीला जाऊन दत्तसेवा करण्याचे ठरविले.पुढे काही दिवसांनी प्रत्यक्ष भगवान दत्तप्रभुंनी संन्यासी रुपात येऊन मातोश्रींच्या हातावर तिर्थ दिले व ते प्राशन करता क्षणी मातोश्रींची पोटातील गाठ फुटली व तो रोग नाहिसा झाला.( हा प्रसंग अतिशय अलौकिक व दिव्य आहे.मी अगदी थोडक्यात दिला पण आपण विस्तृत रुपात जरुर वाचाचं.) या प्रसंगा नंतर काही काळाने महाराजांची सन १८९४ ला मुंज झाली व त्यांचे धार्मिक शिक्षण घरीच सुरु झाले.वैदिक सुक्त, नित्यकर्म बाल वामन शिकला व त्याचबरोबर तारळे या गावे शालेय शिक्षण ही सुरु झाले.या शाळेत श्रीमहाराज इयत्ता चौथी पर्यंत शिकले व पुढील शिक्षण घेण्यासाठी ते कोल्हापूर येथे राजाराम शाळेत गेले.या शाळेत त्यांचे नववी पर्यंत शिक्षण झाले.महाराजांना चित्रकलेत उपजतच गती होती.त्यांनी दोन चित्र कलेच्या परिक्षा ही दिल्या व पहिल्या दोन श्रेणीत ते उत्तीर्ण ही झाले.तृतीय श्रेणीच्या परिक्षेसाठी त्यांनी मुंबई च्या जे.जे.आर्ट स्कुल मध्ये प्रवेश मिळवला.


याच दरम्यान थोरले स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज हे संन्यास घेतल्यानंतर दुसर्‍यांदा नृसिंहवाडी येथे आले होते.महाराजांचे मोठे भाऊ शंकर शास्त्री‌ यांनी वामनांना महाराजांची आज्ञा घेऊन वाडीला बोलवून‌ घेतले.हीच या दिव्य गुरु - शिष्याची प्रथम भेट. यानंतर इ.स १९०९ च्या सुमारास श्रीमहाराजांच्या वडिलांचे निधन झाले.वडिलांचे क्रियाकर्म आटोपून काही काळ गेला तोच श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज हे विदर्भातील पवनी या क्षेत्री चातुर्मासासाठी मुक्कामी आहेत असे शंकरशास्त्रींना कळले.ते लगेच पवनीला गेले.श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेने त्यांनी श्री वामनरावजी गुळवणी महाराज,मातोश्री व त्यांच्या लहान भगीनी गोदूताई यांना पवनीला बोलावून घेतले.चातुर्मास्य समाप्तीच्या आदल्या दिवशी अनंत चतुर्दशीला या तिघांनाही श्री थोरल्या स्वामी महाराजांनी मंत्र दिक्षा देऊन कृतार्थ केले. पुढे श्री गुळवणी महाराज गाणगापूर येथे सात गुरुचरित्र सप्ताह करण्यासाठी जातात ,सहा सप्ताह पूर्ण झाल्यावर एक रमल‌ ज्योतिष तेथे आला त्याला महाराजांनी , "मला पुन्हा सद्गुरुंची भेट केव्हा होईल?" हा प्रश्न विचारला त्याने उत्तर दिले , "झाले तर सहा महिन्यांत होईल नाहीतर कधिच नाही." हे ऐकून त्यांना धक्का बसला.सातवा सप्ताह एका दिवसात पूर्ण करुन महाराज ऐकीव माहितीच्या आधारे दक्षिणेकडे पैदल निघाले.जवळपास सातशे कि.मी पैदल प्रवास व सातशे कि.मी वाहनात असा प्रवास करत महाराज हावनूर ला श्री थोरल्या स्वामी महाराजांकडे पोचले.( हा गुरु भेटीचा प्रवास मला महाराजांच्या चरित्रातील मेरुमणी वाटतो.पूर्ण विस्तृत प्रसंग वाचल्यावर आपल्याला महाराजांच्या ठाई असलेली विलक्षण गुरुभक्ती दिसुन येईल.असद्भुत असा हा प्रसंग आहे.) पुढे हावनूर ला महाराजांना श्री थोरल्या स्वामी महाराजांचा जवळपास पंधरा दिवस एकांतात सहवास लाभला.यात त्यांनी श्री स्वामी महाराजांची अनन्य सेवा केली.याच वेळी श्री स्वामी महाराजांनी गुळवणी महाराजांना आपल्या हृदयात दत्तप्रभुंचे दर्शन घडविले होते.त्यावंतर पुन्हा श्री गुळवणी महाराजांना श्रीथोरल्या स्वामी महाराजांचा ओंढ्या नागनाथ येथे सहवास लाभला.पुढे श्री स्वामी महाराजांनी त्यांना दत्त माला मंत्राचे अनुष्ठान करण्यास सांगितले.श्री गुळवणी महाराजांनी श्रीक्षेत्र औदुंबर येथे हे अनुष्ठान ४० दिवसात पूर्ण करुन एक पुरश्चरण पूर्ण केले. सन १९१३ च्या वैशाखात श्री गुळवणी महाराज श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे येऊन सद्गुरु चरणी सेवारत झाले.या वेळी श्री महाराजांनी थोरल्या स्वामी महाराजांची अपार सेवा केली.ही सेवा इतकी विलक्षण होती की आपल्या सर्वांसाठी तो एक आदर्श आहे.( शब्दमर्यादेस्तव तो संक्षिप्त रुपात मांडला आहे.)

पुढे महाराज घरी परतले व लवकरच सन १९१४ साली आषाढ शुद्ध १ रोजी थोरले स्वामी महाराज समाधिस्थ झाले. 

        

यानंतर ३-४ वर्ष महाराज कोल्हापूर येथे होते.तेथे त्यांनी छायाचित्रांचा व्यवसाय केला,त्यातून पैसा व नावलौकिक ही मिळाला.छत्रपती शाहू महाराज यांचाही आश्रय लाभला. सन १९१७ साली श्री महाराजांना बार्शीच्या शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी लागली.त्यावेळी ते वैद्यमास्तरांकडे राहत होते.ते पंढरीचे वारकरी होते.यामुळे श्रीमहाराजांचा पू.श्रीदासगणू महाराज,पू.सोनुमामा दांडेकर, पू.केशवराव देशमुख महाराज,गुरुदेव‌ रानडे हे सत्पुरुषांचा सहवास लाभला.या शाळेत महाराजांनी १० वर्ष काम केले.याच दरम्यान महाराजांचा योगाभ्यास अखंड चालूच होता.पुढे कुंडलीनी जागृती व त्यातील अभ्यास जाणून घेण्यासाठी त्यांनी आपले जेष्ठ गुरुबंधू सिप्रिचे पू.गोविंदमहाराज पंडित यांना पत्र लिहीले.गोविंद महाराजांनी त्यांना पुढील अभ्यास शिकविण्यास होकार दिला.त्यासाठी सन १९२२ च्या गणेशचतुर्थीला महाराज होशंगाबाद येथे येऊन पोचले.ह्यास काळात होशंगाबाद येथे प.पू. स्वामी चिन्मयानंद सरस्वती हे तरुण बंगाली संन्यासी मंगळवार घाटावर उतरले होते. हेच महाराजांचे शक्तिपाताचे दिक्षा गुरु सद्गुरु प.प.श्री लोकनाथ तिर्थ महाराज.( यांच्या संक्षिप्त चरित्राचा लेख आपण जरुर‌ ब्लॉगला वाचा.) यांच्याशी श्री गुळवणी महाराजांचा परिचय झाला.पुढे कालांतराने ते महाराजांच्या घरी मुक्कामी राहण्यास आले.(प्रसंग व होशंगाबादची हकिकत बरीच मोठी आहे त्यामुळे ती गाळतो आहे.)पुढे लवकरच श्री चिन्मयानंद सरस्वती स्वामी महाराजांनी श्री वामनरावजी गुळवणी महाराजांना शक्तीपाद वेध दिक्षा देऊन कृतार्थ केले.हा चरित्र भाग म्हणजे महाराजांच्या अवताराचे पुढील उत्तर आयुष्यातील दिव्य कार्याचे दर्शन आहे.यात प.पू. चिन्मयानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या या शक्तीपात रुपी गंगेचा प्रवाह महाराजांनी आपल्या डोक्यावर धारण केला व त्या गंगोदकाची धारा दक्षिणेकडे प्रवाहित केले.या शक्तीपात साधनाचा अनुग्रह शेकडो लोकांना देऊन महाराजांनी त्यांना कृतार्थ केले.इ.स १९२४ ला स्वामी चिन्मयानंद सरस्वतींनी गुळवणी महाराजांना दीक्षा गुरुत्व प्रदान केले व संप्रदायाचे कार्य शक्ती कृपेने वर्धिष्णू करण्याची आज्ञा केली.१९२४ साली चिन्मयानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या आज्ञेने महाराजांनी सौ.गोपीकाबाई या एका सुवासिनीला पहिली दिक्षा दिली. महाराजांना नूतन महाविद्यालय पुणे या शाळेत चित्रकला शिक्षकाची नोकरी लागली.पुढे १९२५ नंतर महाराज लवकरच पुण्यात राहण्यास आले.

पुण्यात महाराज नारायण पेठेत असलेल्या गोवईकर चाळीत स्थिरावले.ही पुण्यातील एक सर्वसामान्य चाळ होती.पण महाराजांच्या वास्तव्याने या जागेचे ही भाग्य उजळले.दहा बाय दहाच्या दोन खोल्या म्हणजे महाराजांचा आश्रमच झाला.या दोन खोल्यांत अनेक संत महापुरुष येऊन गेले होते.येथेच सद्गुरुंच्या अनेक जयंती व पुण्यतिथी चे उत्सव साजरे झाले.येथूनच भारतातील लाखो लोकांना दिक्षा प्राप्त झाली होती. पुढे १९६४ साली वासुदेव निवासात स्थानांतरीत होईपर्यंत महाराजांनी इथे वास्तव्य केले होते. नू.महाविद्यालयात नोकरी करतांना कुणालाही कधीही कळले नाही की आपल्या बरोबर काम करणारे गुळवणी मास्तर हे कुणी मोठे महायोगी आहेत.इतकी महाराजांची साधी राहणी असे.१९२७ साली चिन्मयानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी श्रीशंकर पुरुषोत्तम तिर्थ यांच्या कडून दंड घेतला‌ व ते लोकनाथ तिर्थ स्वामी महाराज झाले.१९२८ च्या उन्हाळ्यात यांचा महाराजांच्या याच घरी दोन महिने मुक्काम झाला. पुढे १९५१ पर्यंत वर्षातून एकदा तरी श्री लोकनाथ तिर्थ स्वामी महाराज हे पुण्यास येत असत. एकदा महाराज लोकनाथतिर्थ स्वामी महाराजांच्या नव्या आश्रमाच्या निमित्ताने काशीस गेले.तेथे ते दोन‌ महिने मुक्कामी होते. यावेळी परमगुरु १०८ शंकर पुरुषोत्तम तिर्थ स्वामी महाराजांच्या दर्शनास ते गेले.मग पुढे कधी कधी ते परमगुरुंच्या आश्रमात साधनेला ही जात असत. एकदा महाराज सकाळी पाच वाजता साधनेला बसले असता त्या साधना समाधी तून महाराजांचे उत्थान जवळपास १४ तासांनी सायंकाळी सात वाजता झाले.महाराजांचा इतका विलक्षण अधिकार होता.


महाराजांच्या जिवनातील दोन महत्वाचे कार्य म्हणजे त्यांच्या गुरुसेवेचा मुकुटमणीच आहेत.एक म्हणजे थोरले स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांच्या समग्र साहित्य ग्रंथाचे प्रकाशन व दुसरे म्हणजे नृसिंहवाडी येथील श्री दत्तप्रभुंच्या घाटावरील देवळात सभामंडपाचे बांधकाम.महाराजांचे दिक्षा कार्य ,साधना ,आयुष्यातील सर्व इतर कार्य सुरु होतेच पण आपल्या गुरुस्थानी देवांच्या पालखी मार्गावर छत असायला हवे ही तळमळ अनेक वर्ष महाराजांना होतीच व यथावकाश त्यांनी आपली सर्व मिळकत खर्च करुन तो भव्य दिव्य मंडप उभारला.आजही महाराजांची ही सेवा डौलाने दत्त चरणी सेवेत रुजू आहे.तसेच जवळपास चार वर्ष अथक परिश्रम करुन श्री थोरल्या स्वामींचे सर्व ग्रंथ महाराजांनी प्रकाशित केले.१९६१ साली पानशेतचा प्रलय झाला.यात महाराजांनी प्रकाशित केलेले ग्रंथ आणि बरेच सामान खराब झाले‌.पण यानंतर अनेक शिष्य व जवळच्या मंडळींनी पादुकांसाठी तरी एक स्थान असावे असा आग्रह धरला व नाईलाजाने महाराजांनी मग होकार दिला व वासुदेव निवासाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.१९६५ साली ही भव्य वास्तु बांधून तयार झाली व महाराज आपल्या प्राणप्रिय प्रसाद पादुकांसह आश्रमात वास्तुशांती विधी पूर्ण करुन प्रवेश करते झाले.या भव्य दिव्य आश्रमात भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज ही राहून गेले होते.औरवाडच्या श्री टेंब्ये स्वामी महाराजांच्या एकमेव पादुका चार महिने राहून गेल्या होत्या.

ऑगस्ट १९७३ मध्ये प.पू. योगीराज गुळवणी महाराजानी आपल्या जवळील सर्व चांदीची भांडी तसेच त्यांच्या रौप्य तुलेतून जमा झालेली सर्व चांदी मंडप शिल्पाचे इंजिनियर साहेब श्री. वि. मो. वैद्य यांच्याकडे दिली व सांगितले की ही सर्व भांडी आटवून वाडीच्या देवाचे दरवाजे चांदीने मढवा. हीच सर्व चांदी आटवून प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या इच्छेप्रमाणे श्री. दत्तप्रभूंचे दर्शनी दरवाजे चांदीने मढवलेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी आपल्या इष्टदेवासाठी सर्वस्व वेचले पण कुठे ही वाच्यता नाही ! जाहिरात नाही !

पुढे २/३ वर्षानी महाराजांची प्रकृती बिघडू लागली. किरकोळ आजार ताप वगैरे वाढू लागले. भीष्माप्रमाणे महाराज उत्तरायण सुरु होण्याची वाट पाहु लागले. सारे क्लेश शांतपणे सहन करीत होते. विद्या नावाच्या मुलीचा उघड नयन देवा हा अभंग ऐकताना टेंबेस्वामींचे दर्शन होत आहे, असे महाराज म्हणाले आणि लगेचच १५/०१/१९७४ ला दुपारी पाऊण वाजता चिरविश्रांती घेतली. रेडिओवर बातमी आली. सगळीकडे हाहाकार झाला. दुसरे दिवशी अभूतपूर्व व प्रचंड अंत्ययात्रा निघाली व त्यांना आदरांजली वाहण्यात आली.ही मोडकी तोडकी शब्दसुमनांजली श्रीगुरु महाराजांच्या चरणी अर्पण करतो.श्री गुरु महाराजांच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करुन प्रार्थना करतो की त्यांनी आम्हा पामरांकडून साधन करुन घ्यावं व दत्तचरणी ,माउली ज्ञानराजांच्या चरणी आजिवन सेवा करवून घ्यावी.

(खरंतर महाराजांचे चरित्र संक्षिप्त रुपात लिहीने अतिशय अवघड आहे.प्रत्येक प्रसंग‌ हा मला अतिशय प्रिय व चिंतनीय वाटतो.हा लेख म्हणजे महाराजांच्या चरित्राचे अगदी ओझरते दर्शन आहे.महाराजांच्या दिव्य चरित्रातील काहीच घटनांचा धावता उल्लेख केला आहे त्यामुळे तो कुठेतरी तोकडा व अपुरा वाटेल त्याबद्दल क्षमस्व 🙏)

    ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️


श्रीदत्त शरणं मम 🙏🌸🌿

महाराज ज्ञानेश्वर माउली समर्थ 🙏🌸🌿

1 comment:

  1. वासुदेव निवास कोठे आहे पुण्यात

    ReplyDelete

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...