तस्मै_नारायणाखिलगुरो_भगवन्नमस्ते ।।🌸🌺🙏
अनादी काळापासून चालत आलेला पुरातन प्राचीन असा दत्त संप्रदाय.अगदी प्रत्येक युगात दत्तात्रेय प्रभु विविध लिलांद्वारे भक्तांना तारत आले आहेत.विविध रुपात दत्तप्रभु भक्त रक्षणाचे कार्य करीत आले आहेत.या अनादी अशा दत्तसंप्रदायात आजवर असंख्य अधिकारी ,अवतारी महापुरुष ,संत,योगी अवताराला आले व त्यांनी दत्त संप्रदायाला वर्धिष्णू करण्याचे कार्य केले आहे.आजवर झालेल्या या महान अधिकारी महापुरुषांच्या मांदियाळीतील एक महापुरुष म्हणजे सद्गुरु श्री नारायण महाराज केडगावकर.प्रत्यक्ष दत्तप्रभुंचे अनुग्रहीत असलेले महाराज हे एक राजयोगी होते.आज जेष्ठ शुद्ध सप्तमी म्हणजे महाराजांची जन्मतिथी.आज सद्गुरु श्री नारायण महाराजांची १३७ वी जयंती आहे त्या निमित्ताने आपण महाराजांच्या दिव्य चरित्राचे संक्षिप्त रुपात चिंतन करुयात.
महाराजांच्या चरित्राची सुरुवात ही त्यांच्या कुळातील दिव्य परंपरेचे स्मरण केल्या शिवाय होणार नाही.महाराजांसारख्या थोर महापुरुषांनी जे कुळ आपल्या जन्मासाठी निवडले ते कुळ किती थोर असेल याची कल्पना आपल्याला पुढील कुलवर्णनातून येईलच. कर्नाटक प्रांतातील विजापूर जिल्ह्यातील "शिंदगी" नावाचे एक गाव आहे.या गावात एक तेजस्वी , वेदशास्त्रसंपन्न,चारित्र्यवान असा ब्राह्मण राहत असे.परमशिवभक्त असलेला हा ब्राह्मण गावातील श्रीसंगमेश्वराचा अनन्य भक्त होता.त्याची पत्नी ही महापतिव्रता आणि शिवभक्त होती.दोघेही संसारात निस्पृह आणि समाधानी वृत्तीने जिवन व्यतित करत असत. पण एक पुत्रसंतान नसल्याने दोघेही मनोमन दु:खी होते.पुढे शिवकृपेने त्यांना एक पुत्र झाला.पण विधी लिखीत काही तरी वेगळेच होते.पुत्र झाल्याच्या दहाव्या दिवशीच तो ब्राह्मण मृत्यू पावला.त्याच्या आकस्मिक निधनाने त्या साध्वी वर वज्रघातच झाला.तिने मनोमन ठरविले की आता पतिसह सती जायचे.पतीच्या अंतिम संस्कारावेळी ती आपल्या लहान बाळासह स्मशानभूमीत आली.बाळाला एका वृक्षाखाली ठेऊन ती स्त्री सति जाण्यास सज्ज झाली पण तोच अग्नीज्वाळा बघुन ती मुर्छीत पडली.लोकांनी तिला तिच्या घरी आणले पण कुणालाही ते लहान झाडाखाली ठेवलेले बाळ दिसले नाही.घरी आल्यावर काही काळाने ती स्त्री सावध झाली.उठताच तिला आपल्या बाळाची आठवण झाली.तात्काळ ती स्मशानात आली व आपल्या बाळाकडे गेल्यावर ती बघते तर ते बाळ मृत झाले होते.त्याच्या त्या चिमुकल्या देहाला मुग्या ,मुंगळे चिटकले होते.ते बघताच तिने हंबरडा फोडला आणि त्या बाळाच्या शवाला आपल्या हृदयाशी कवटाळले.पूर्वपुण्याई म्हणा वा शिव उपासनेची फलश्रुती म्हणा त्याच स्मशानाजवळून "श्रीपद्मवडेर" नावाचे एक सिद्ध जात होते.त्या स्त्रीचा आक्रोश बघून ते तिच्याजवळ आले.त्यांच्या मनात त्या मातेबद्दल करुणा उत्पन्न झाली.त्यांनी त्या मृत बालकास अमृतमय दृष्टीने बघितले आणि आश्चर्य असे की त्या मृत देहाला चिटकलेल्या मुंग्या नाहीशा झाल्या.श्रीपद्मवडेर संतांनी तो देह शिवमंदिरात नेला व शिवापुढे ठेवला आणि भगवान शिवांची मनोमन प्रार्थना केली.शिवशंकर प्रसन्न झाले व त्यांनी त्या बालकास प्राणदान दिले.पुढे पद्मवडेर यांनी त्या मुलाचे नाव "कट्टिरविलिंग" असे ठेवले. कट्टिरविलिंग म्हणजे मुंग्यांचा राजा.श्रीपद्मवडेर यांनी मातेला सांगितले, "हा मुलगा वेदशास्त्रसंपन्न होईल,याच्या वंशाचा विस्तार होईल व पुढे याच्या वंशात श्रीनारायणाचा अवतार होईल." त्या मातेने त्या बाळास घरी आणले.त्याचे उत्तम प्रकारे संगोपन केले.त्याचे योग्य वेळी उपनयन केले.उत्तम सुलक्षणी मुलगी पाहून त्याचे वयात आल्यावर लग्न लावून दिले.यथाकाळी या बाळाचा वेदशास्त्रसंपन्न कट्टिरविलिंग नावाने उदय झाला.यांना सात मुले व एक मुलगी झाली.कट्टिरविलिंगांच्या एका मुलाचे नाव 'मुद्गलरस' असे होते.त्यांचा पाचवा मुलगा "शंकराप्पा" या शंकराप्पांचा अतिशय मोठा अधिकार .हे थोर शिवभक्त होते.यांनी कांची क्षेत्रीचे "श्रीगुरुनाथंपय्या" या संतांकडून अनुग्रह घेतला.( हा अनुग्रहाचा प्रसंग अतिशय विलक्षण आणि दिव्य आहे.समाधी नंतर परत सद्गुरुंनी शंकराप्पांना समाधीत बोलवून अनुग्रह दिला होता. शब्दविस्तारास्तव हा प्रसंग इथे देने शक्य नाही.तरी आपण तो चरित्रात वाचाच) सद्गुरुंनी शंकराप्पांना "भीमाशंकर" असे नाव दिले.पुढे यांना गुरुकृपेने विलक्षण असे कवित्व स्फुरु लागले.त्यांनी कानडीत श्रीगुरुंवर अनेक पदे रचली.आजही काही पदं ही श्रीक्षेत्र गाणगापूर येथे पालखीच्यावेळी म्हटली जातात.भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आरती ही श्रीभिमाशंकर यांनी रचली आहे. कट्टिरविलिंगाचे तृतीय पुत्र होते कमलरस.हे ही मोठे भगवद भक्त .यांच्या वंशात अनेक संत जन्माला आले म्हणून त्यांचे उपनाम संती असे पडले होते.कमलरसांना एक पुत्र होता.त्याला पाच मुलगे झाले.यातील पाचवा मुलगा होता कृष्णाप्पा.हा महान शिवभक्त होता.याने भगवान शिवशंकरांची कडक उपासना केली.श्रीशंकर प्रसन्न झाले व त्यांनी "तुझ्या वंशात श्रीदत्तात्रेय ,नारायण नावाने अवतार घेतील" असा आशिर्वाद दिला.पुढे कृष्णाप्पास पाच पुत्र झाले.त्यातील सर्वात धाकटे होते भीमाप्पा.याच भिमाप्पांचे पुत्र म्हणून सद्गुरु नारायण महाराज जन्माला आले होते.
नरगुंद संस्थानामधील दरेकर नावाचे एक प्रसिद्ध ,शूर सरदार होते.त्यांची कन्या नरसुबाई यांच्याशी भीमाप्पांचा विवाह झाला. या सत्शिल ,भगवतभक्त ,धर्मपरायण आणि दत्त भक्त दांम्पत्यापोटी शालिवाहन शके १८०७ पार्थीव नाम संवत्सर ,मिती अधिक जेष्ठ शुद्ध षष्ठीसह सप्तमी आश्लेषा नक्षत्र ,बुधवार दिनांक २० मे १८८५ रोजी सद्गुरु श्री नारायण महाराजांचा जन्म झाला. पण दुर्दैव असे की महाराजांना त्यांच्या आई वडिलांचे प्रेम जास्त दिवस मिळाले नाही.महाराजांच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांचे वडिल भीमाप्पा यांचे निधन झाले आणि महाराज चार वर्षांचे झाले त्यानंतर त्यांच्या मातोश्रींचे आजाराने निधन झाले.नियतीची योजनाच अशी होती की या अनाथ बालकाच्या प्रेम आश्रयाला पुढे अनेक जिव येऊन सनाथ होणार होते.महाराजांचे यापुढील संगोपन नरगुंद या गावी महाराजांच्या आजोळी आजीकडे झाले. लहानपनापासूनच महाराज ईश्वर भक्तीत तल्लीन होत,भगवंतांच्या नामात रंगून जात.लहान असतांना महाराज मुलांबरोबर विटि - दांडू, खोखो,हुतूतू ,चोर शिपाई इत्यादी खेळ आपल्या मित्रांसोबत खेळत असत.एकदा असेच खेळत असता महाराज आपल्या सवंगड्यांसमवेत एका प्रशस्त गुहेबाहेर येऊन पोचले.त्या गुहेत आत घनदाट अंधकार होता.सर्व मुलांनी आत जाऊन काय आहे हे बघायचे ठरवले व सर्व जन आत गेले.पण महाराज सोडून बाकी सर्व मुले अंधाराला घाबरून बाहेर आली. पण महाराज एकटेच आत गेले.पुढे पुढे गेल्यावर महाराजांना एक चौकोनी गुहा दिसली.पायर्या उतरुन महाराज आत गेले.पहातात तर आत मध्ये भव्य असे दालन होते.चार कोपर्यात चार समया शांतपणे तेवत होत्या.जवळच एका उच्चासनावर एक योगी ध्यानस्थ बसलेले होते.मध्यभागी एक झोपाळा झुलत होता व त्यावर एक मोठा भुजंग बसुन झोके घेत होता.महाराजांना पहाताच तो भुजंग खाली उतरला व शांतपणे निघून गेला.श्रीनारायण महाराज हे त्या झोपाळ्यावर बसले व झोके घेऊ लागले.काही काळ झोके घेऊन ते खाली उतरले व त्यांनी योगीराजांना वंदन केले.त्यानंतर महाराज बाहेर आले.त्यावेळी महाराजांचे वय अवघे ७/८ वर्षा चे होते.
यथावकाश श्रीनारायण महाराजांची वयाच्या आठव्या वर्षी मुंज झाली. महाराजांच्या उपनयनाचे वेळी धारवाडचे वे.शा.सं.पंडित कृष्णशास्त्री उप्पिनबेट्टीगिरी हे हजर होते.मुंज झाल्यापासून महाराजांचा संध्या-गायत्री ,सूर्यनमस्काराचा अखंड नित्यक्रम सुरु झाला.नारायण महाराजांच्या मुंजीच्या सुमारास श्रीगोंदवलेकर महाराजांचा मुक्काम धारवाड येथेच होता.श्री.कृष्णशास्त्री उप्पिनबेट्टीगिरी हे त्यांचे अनुग्रहीत होते.या वेळी एक विलक्षण प्रसंग घडला.महाराजांची मुंज झाल्यावर एक दिवस आजी श्रीनारायाणांना म्हणाली, "श्रीगोंदवलेकर महाराज आले आहेत.तरी माझ्याबरोबर त्यांच्या दर्शनाला चल." त्यावर बाल नारायण म्हणाले, "आम्ही नाही कोणाकडे येणार,ज्याला वाटेल त्यांनी आमच्याकडे यावे." हे ऐकताच आजी रागावली व तिने बाल नारायणाच्या पाठीत धपाटा घातला.आजी काही वेळाने एकटीच महाराजांच्या दर्शनाला गेली.दर्शन घेताच गोंदवलेकर महाराजांनी विचारले, "काय आजी एकट्याच आलात,नातवाला नाही आणलेत?" असे विचारताच आजी शरमिंदा झाल्या व त्यांनी महाराजांना सर्व हकीकत सांगितली.त्यावर गोंदवलेकर महाराज हसून म्हणाले ,"तुमच्या नातवाला सांगा की तू आमच्याकडे येत नाहीस तर आम्हीच तुमच्याकडे येऊ बरं का." दुसर्या दिवशी महाराज श्रीनारायणाला भेटण्यास सकाळी त्यांच्या घरी गेले. महाराज नारायणास म्हणाले, "बाळ मी आलो बरं का तुला भेटायला." असे म्हणून ते श्रीनारायणांकडे पंधरा मिनिटे एक टक पाहत राहिले.श्रीनारायण महाराजांनी त्यांचे दर्शन घेतले, आशिर्वाद घेतला.नंतर गोंदवलेकर महाराज परत आपल्या मुक्कामी परतले. दुसर्या दिवशी गोंदवलेकर महाराज श्री कृष्णशास्त्री उप्पिनबेट्टीगिरी यांना म्हणाले, "शास्त्री महाराज आज तुम्ही नारायणाकडून पाया पडून घेत आहात पण त्यांच्याच पाया पडण्याची पुढे तुमच्यावर वेळ येणार आहे.मुलाच्या डोळ्यांत दैवी तेज आहे.तो पुढे फार मोठा होणार आहे." पुढे एकदा नारायण महाराज जेवायला बसले होते त्यावेळी त्यांनी आजीला भातावर साजूक तुप मागितले.एरवी आनंदाने बोलणारी आजी पानावर बसलेल्या नारायणास रागाने बोलली की, "साजूक तुप हवे आहे काय तुला,जा,त्याऐवजी शेण खा." हे शब्द ऐकताच नारायण महाराज पानाला नमस्कार करुन तात्काळ उठले. स्वाभिमानी असलेल्या महाराजांना हे आजीचे वाक्य अजिबात आवडले नाही ते आजीला म्हणाले , "ईश्वराने जो मानव जन्म दिला आहे तो शेण खाण्यासाठी नाही." असे म्हणून महाराजांनी अंगावरच्या कपड्यावर तात्काळ घर सोडले.जणु महाराजांच्या तप:पूत अवतार कार्याची ही सुरुवातच होती.मुखाने दत्तप्रभुंचे नामस्मरण करत नऊ वर्षांचे महाराज आता घरातुन निघाले.जवळ पैसे नव्हते पण कधी कुणाच्या बैलगाडीतून तर कधी पैदल असा प्रवास करत महाराज सौंदत्तीस येऊन पोचले.इथे प्रत्यक्ष भगवती आदिशक्ती आई रेणुका माउली महाराजांना सगुण रुपात भेटली.तिने बाळ नारायणाला आशिर्वाद दिला व गुप्त झाली.तेथून पुढे महाराज उगुरगोळ गावी आले.परंतु इथे भिक्षेवेळी एक कटू प्रसंग घडला ज्यामुळे महाराज अधिकच अंतर्मुख झाले व भविष्यात कुणाकडेही कशासाठीच याचना करायची नाही असा त्यांनी निश्चयच केला.पुढे प्रवासात महाराजांना दत्त प्रभुंनी घोडेस्वाराच्या रुपात भेट दिली.हा प्रसंग ही विलक्षण आहे.यानंतर नारायण महाराज मलप्रभा नदितीरावर वसलेल्या गुर्लहसूर या गावी आले.या गावी भगवान चिदंबर महाप्रभुंनी स्थापन केलेल्या शिवमंदिरात महाराजांनी मुक्काम केला.तिथेच त्यांची एका यतीशी भेट झाली.महाराजांच्या चेहेर्यावरील हातावरील सुचिन्हे पाहिल्यावर यतिराजांनी त्यांन भविष्य सांगितले. ते म्हटले, "नारायणा,तू फार भाग्यवान आहेस.तू जेथे जाशील,जेथे राहशील तेथे अखेरपर्यंत श्रीदत्त तुझ्या मागे-पुढे बरोबर राहतील.तुझ्या सर्व इच्छा ते पूर्ण करतील.त्यांच्या आशिर्वादाने तु राजयोगी होशील.तुझ्या नावाची नगरी निर्माण होईल.तुझ्या हातून मोठे मोठे यज्ञयाग होतील.मोठे अन्नदान होईल.तू जगात सर्वांना पूज्य होशील." असे सांगून यतिवर्य निघून गेले.पुढे महाराज कुंदगोळ,बेळगाव गावात प्रवास करत शहापूर येथे आले.तेथून नारायण हुबळीस आले.नारायण महाराज मठात येणार त्यावेळी सिद्धारुढ स्वामी महाराज हे प्रवचन करत होते.महाराज मठाजवळ आल्यावर सिद्धारुढ स्वामींनी आपले प्रवचन थांबविले.नारायणाच्या स्वागतासाठी ते दारात आले.श्रीनारायण महाराज त्यांना वंदन करण्यास वाकले तोच सिद्धारुढ स्वामी महाराजांनी त्यांना वरच्यावर धरले व ते म्हणाले, "हे काय ,आपण प्रत्यक्ष देव आहात.आपण मला काय वंदन करतात?" श्रीस्वामींनी श्रीनारायणास तीन चार दिवस मठातच ठेवून घेतले. तेथून पुढे महाराज नरसोबावाडी , औदुंबरवाडी येथे दत्त दर्शनास गेले.तेथून महाराज कोल्हापूर येथे थोर दत्तावतारी महापुरुष श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज म्हणजे कुंभार स्वामी महाराज यांच्या दर्शनास गेल्याची नोंद कुंभार स्वामींचे शिष्य नामदेव महाराजांच्या चरित्रात आहे.तेथून ते दरमजल करत पुण्यास आले.पुण्यात त्यांची आपले मानस आई-वडिल त्रंबकराव व लक्ष्मीबाई यांची भेट झाली.पुढे महाराज बराच काळ आर्वी येथे या माता-पित्याजवळ राहिले.या दाम्पत्याच्या हृदयात महाराजांबद्दल अपार प्रेम माया होती.पुढे आर्वीला काही काळ राहिल्यावर महाराजांना तिथे करमेना.एक दिवशी महाराजांना रात्री यतींराजांचा स्वप्नदृष्टांत झाला आणि त्यात त्यांनी महाराजांना श्रीक्षेत्र गाणगापूर येथे येऊन अनुष्ठान करण्याची आज्ञा केली.पुढे काही चमत्कारिक घडामोडी घडल्या व महाराज दत्त कृपेने गाणगापूर येथे येऊन पोचले.गाणगापूर येथे पोचल्यावर महाराजांनी देवांचे दर्शन घेतले त्यानंतर ते संगमावर आले.संगमाजवळील भस्माच्या डोंगराजवळ एक गुफा कोरली होती त्यातच ते राहू लागले.तिथे आल्यापासून महाराजांचे कडक अनुष्ठान सुरु झाले.रोज संगम स्नान,सुर्य उपासना, गायत्री जप,ध्यानधारणा व दुपारी मठात पादुका दर्शन हा त्यांचा सकाळचा नेम.सायंकाळी मठात सेवा करणे , दत्तप्रभुंचे सुमधूर आवाजात भजन म्हणने हा नेम.पुढे महाराजांवर कृपा करुणा पूर्वक दत्तप्रभुंनी अनुग्रह केला. "बाळंभट्ट" असे नाव सांगून प्रत्यक्ष दत्तप्रभुंनी नारायण महाराजांच्या कानात स्वतः गुरुमंत्र सांगितला.(हा प्रसंग अतिशय विलक्षण आहे.)पुढे काही दिवसांनी दत्तप्रभुंनी नारायण महाराजांना संगमाच्या पैलतिरावर विप्रवेषात दर्शन दिले.यानंतर महाराजांनी दिवस-रात्र गुरुमंत्राच्या अखंड जपाचा निजध्यासच लावला.ते त्याचेच चिंतन ,मनन करु लागले.त्याशिवाय ते कुठल्याही गोष्टीला प्राधान्य देत नव्हते.असाच काळ पुढे जाऊ लागला.पण पुढे एक अघटित घडले.जेवणाची ,शरीराची आबाळ झाल्यामुळे महाराजांना ताप येऊ लागला.हा ताप वाढतच जात होता.यावर इलाज म्हणजे देवांचे तिर्थ आणि अंगारा.पण महिन्याभरात प्रकृती अतिशय ढासाळली.शरीर क्षिण झाले.विपरीत काळ आला व या व्याधी रुपाने महाराजांवर मृत्यू चे गंडांतर आणले.त्यांच्या देहाच्या सर्व क्रिया मंदावल्या.श्रीमहाराजांचे प्राण देह सोडून निघून गेले.लोकांनी महाराजांचा देह स्मशानात आणला.चिता रचली व त्यावर देह ठेवला.श्रीनारायणांना आपण दत्तलोकात गेलो आहोत असे दिसले.तिथे आपण दत्तप्रभुंचे दर्शन घेत आहोत आणि ते आपल्याला आशिर्वाद देते आहेत असे दृश्य त्यांना दिसले.इकडे गाणगापूरात चमत्कार घडला.चलनवलन बंद पडलेल्या शरिरात चैतन्य निर्माण झाले.श्रीनारायणांचे शरीर तेजपुंज दिसु लागले.हे पाहून सर्वांनी महाराजांना घरी आणले.त्याच रात्री दत्तप्रभु महाराजांचे स्वप्नात गेले त्यांनी महाराजांना तीर्थ व एक गोळी खाण्यास दिली.दुसर्या दिवशी त्यांना जोरात एक वांती झाली.त्यातून एक मृत अंगठ्याएवढा जाडीचा व पाच वित लांबीचा सर्प बाहेर पडला.तो इतका विषारी होता की त्यावर बसलेल्या माशा ही तक्षणी मरत होत्या.या गंडांतरातून महाराजांना स्वतः दत्तात्रेय प्रभु भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी बाहेर काढले. यानंतर महाराजांचे शरीर परम तेजस्वी दिसु लागले.काही काळ गेल्यावर महाराजांना भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा दृष्टांत झाला व "नारायणा ,तू जेथून आलास तेथे परत जा.आमचा तुला आशिर्वाद आहे." असे देवांनी म्हटले.तेथून मोठ्या जड अंतःकरणाने ते आर्वीला आले.एक वर्षांच्या मोठ्या वास्तव्याने,तपानंतर महाराज आता परतले होते.महाराजांनी आर्वीला अनेक चमत्कार केले आहेत.शब्दमर्यादेस्तव ते येथे देणे शक्य नाही.
पुढे शके १८२६ ला नारायण महाराज त्यांच्या एकोणिसाव्या वर्षी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी , औदुंबर येथे आले.औदुंबराहून ते सज्जनगड येथे आले.सज्जनगडावर महाराजांना प्रत्यक्ष समर्थांचे सगुण दर्शन झाले.सज्जनगडावरुन श्री नारायण परत आर्वीला आले.एक दोन वर्षे आर्वी सुपे इथे गेली.सुप्यात अनेक चमत्कार महाराजांनी केले.आता लोक महाराजांना "नारायण देव" म्हणू लागले.एक दिवस सुप्याच्या नानासाहेब देशपांडे या भक्ताबरोबर त्यांच्या शेती असलेल्या वढाणे गावी ते गेले.तेथील रम्य ठिकाण पाहून महाराज तेथेच झोपडी करुन राहू लागले.ते या ठिकाणाला "बेट" असे म्हणत.जवळच एक मोठा औदुंबर वृक्ष होता त्याचे महाराज नित्य नेमाने दर्शन घेत. एक दिवस श्रीनारायण महाराजांना दत्तप्रभुंचा दृष्टांत झाला.देवांनी त्यांना दर्शन दिले व आशिर्वाद देत सांगितले, "नारायणा,तू रोज दर्शन घेत असलेल्या औदुंबर वृक्षाचे खाली आमच्या दिव्य पादुका आहेत.हातभर जमीन उकरुन त्या बाहेर काढ.त्या पादुकांची रोज देव पूजा करीत असतात." देवांनी त्यांना जागाही दाखविली.श्रीमहाराजांनी ही हकीकत देशपांडे दाम्पत्यांना सांगितली.त्या दोघांसमवेत ते त्या जागी गेले.दृष्टांताप्रमाणे त्यांनी ती जागा हातभर उकरली.तोच एका दगडावर लहान,छोट्या व सुकुमार पादुका दिसल्या.त्या पादुकांची ताजी व सुवासिक फुले वाहून कुणीतरी नुकतीच पूजा केली होती.हे पाहून महाराजांना अत्यानंद झाला.तो दिवस होता आषाढ शुद्ध दशमी,शके १८२७ म्हणजे इ.स.१९०५. महाराजांनी त्या पादुकांची पुजा केली व महाराजांनी आषाढ शुद्ध पौर्णिमा शके १८२७ मध्ये पादुकांची स्थापना केली.पादुकांच्या पुढे एक पडवी बांधली व तेथेच सर्व लोक पूजा,ध्यान ,भजन वगैरे करीत असत.
आषाढ शुद्ध पौर्णिमेस एक अतिशय दिव्य गोष्ट घडली.बेलापूर येथील बनात एक महान सत्पुरुष श्रीविद्यानंद स्वामी महाराज समाधिस्थ झाले.समाधी घेण्यापूर्वी ते आपल्या शिष्यांना म्हणाले, "यापुढे आम्ही तुम्हाला नारायणाचे रुपात दर्शन देऊ.बेटातील बालयोगी नारायण म्हणजे आम्हीच आहोत." पादुकेची वार्ता सर्वत्र वार्या सारखी पसरली .लोक आता नारायणास नारायण महाराज संबोधू लागले. पुढे दत्ताज्ञेने महाराज पुण्यातील श्रीमाळी महाराज यांच्या भेटीसाठी पुण्यात आले होते. दिवसागणिक लोकांना महाराजांच्या कृपेचे विलक्षण अनुभव येऊ लागले.चितोपंत जोगळेकर या नास्तिक माणसापुढे तर "दत्त" म्हणून हातातून तिर्थ काढले होते.हिंदूस्थानातील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती अंजनीबाई मालपेकर यांचा गेलेला आवाज महाराजांनी आपल्या कृपेने पुन्हा त्यांना दिला.या कृपेने त्यांची महाराजांवर अनन्य श्रद्धा जडली.त्यानंतर त्यांनी आपले गाणे कायमचे बंद केले व महाराजांच्या सेवेकरीता त्या वारंवार बेटावर येत असत.मुंबईतील आपल्या घरालाही त्यांनी "श्री नारायण आश्रम" असे नाव दिले.या बेटात महाराजांनी अनेकांना व्याधी मुक्त केले,अनेकांचे दु:ख दूर केले. आपल्या बलशाली शरीरयष्टी मुळे ज्यांना "इंडियन सॅन्डो" हा किताब मिळाला होता.असे राममूर्ती हे महाराजांच्या दर्शनाला आले .त्यांचा आपल्या शक्तीचा असलेला गर्व महाराजांनी एका क्षणात उतरवीला.तात्काळ राममूर्ती हे महाराजांना शरणं आले.तसेच पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील इंग्रज प्राध्यापक श्री वुडहाऊस शिकार करण्यासाठी बेटाजवळील एका डोंगरावर आले होते.त्या इंग्रजाला अतिशय तहान लागली होती व तहानेने व्याकूळ होऊन तो गर्भगळीत झाला होता.त्याच वेळी महाराज फेरफटका मारण्यासाठी त्या डोंगरावर आले.महाराजांनी तात्काळ एक लिला करुन त्यांची तृष्णा भागवली.तो महाराजांना लगेच शरणं आला.महाराजांसोबत तो बेटावर आला.तेथील दैवी वातावरण बघून तो इतका प्रभावित झाला की त्याने पुण्यात आल्यावर ताबडतोब मुंबईच्या इंग्रजी वर्तमानपत्रात बातमी छापली की , "केडगाव स्टेशनपासून आत सात-आठ मैलांवर "नारायण" नावाचा दत्तावतारी बालयोगी प्रगट झाला असून तो अनेक चमत्कार करतो." हिंदूस्थानातील अनेक प्रमुख वर्तमानपत्रात ही बातमी वाचून गावोगावचे लोक श्रीमहाराजांचे दर्शनासाठी बेटात येऊ लागली.अनेक लोक महाराजांकडून गुरुमंत्र घेण्यासाठी आता बेटावर येऊ लागले.बेटातील जागा आता भक्तांना अपुरी पडू लागली .तेव्हा महाराजांनी जवळच एक विस्तीर्ण जागा विकत घेतली.लवकरच तिथे दत्त मंदिर बांधण्याची योजना महाराजांनी आखली.इ.स.१९१२ मध्ये हे मंदीर बांधून पूर्ण झाले व महाराजांची योजना वास्तव्यात उतरली.मंदिराबरोबरच धर्मशाळा,कोठीघर, स्वयंपाकघर,अन्नपूर्णागृह व संस्थानाची कचेरीही बांधली गेली.अन्नपुर्णागृहात माता अन्नपुर्णेची सुंदर काळ्या पाषाणातील मूर्ती बसवली गेली.मंदिराजवळच एक विहीर , महाराजांना राहण्यासाठी दुमजली बंगला व इतर वास्तु बांधल्या गेल्या.अनेक लोक आता कायमचे महाराजांजवळ वास्तव्यास आले होते.लवकरच मुंबईतील श्री.गणपतराव म्हात्रे यांनी कुणा दुसर्यासाठी घडवलेली दत्त मुर्ती महाराजां पर्यंत अगदी चमत्कारीकरित्या आली.महाराजांना ही शिवप्रधान दत्तमूर्ती अतिशय आवडली.श्रीमहाराजांनी वैशाख शुद्ध पंचमी शके १८३५ रविवार दिनांक ११ मे १९१३ साली सकाळी साडे नऊ वाजता या दिव्य दत्तमूर्ती ची स्थापना केली.या दत्तमूर्ती च्या स्थापनेकरीता महापंडित श्री.कृष्णशास्त्री उप्पिनबेट्टीगिरी हे स्वतः उपस्थित होते.त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा सर्व विधी पार पडला.आता या दत्त मंदिर परिसराला "नवे बेट" असे म्हटले जाऊ लागले.दत्तप्रभुंच्या आगमनानंतर महाराज आता नवीन बेटावर वास्तव करु लागले.यानंतर महाराजांची कीर्ती दिगंत वाढली.महाराजांचे कायमचे वास्तव्य नवीन बेटावर झाले तो काळ होता १९१३.या वेळी ख्रिश्चन मिशनरींचे लोकांना बाटवायचे काम जोरात सुरू होते.तेव्हा महाराजांनी हे जाणले व गरीब हिंदू लोकांना महाराज मोफत शिक्षण,अन्न देऊ लागले.सर्वांसाठी अन्नछत्र उभारले.गरिबांना वस्त्रदान ,अन्नदान सुरु केले.या लोकांना धर्माबद्दल आदर,प्रेम निर्माण व्हावा म्हणून नैमित्तिक कार्यक्रम सुरु झाले. महाराजांनी बेटावर अनेक व्रत , अनुष्ठान केले त्यातील १९२८ साली पार पडलेला अतिरुद्र अनुष्ठान विशेष ठरले.तसेच एकावेळी १०८,११०८ सत्यनारायण महापुजा करण्यात आल्या.दत्तप्रभुंना ११ डिसेंबर १९३३ साली अतिरुद्राभिषेक करण्यात आला,तसेच गुरुचरित्राचे ५२ पारायणे,कोटीलिंगार्चन सोहळा,दर तासाला १०८ सत्यनारायण पुजा करण्यात आल्या.अशा प्रकारे महाराजांनी अनेक अनुष्ठान बेटावर केले.त्या अनुष्ठानाची उर्जा आजही बेटावर अनुभवायला मिळते.
![]() |
| सद्गुरु श्री नारायण महाराजांनी स्थापन केलेले शिवप्रधान दत्तात्रेय प्रभु 🙏🌸🌿🌺 |
विविध संतांनी महाराजांबद्दल काढलेले धन्योद्गार :-
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आपल्या एका भक्तास म्हणाले होते की, "आम्ही नुसते योगी आहोत.पण नारायण हा राजयोगी आहे.त्याचा अधिकार मोठा आहे."
साईनाथ महाराज नारायण महाराजांबद्दल म्हटले होते की, "श्री नारायण महाराज हे आमचे वडील बंधू आहेत.आमचे दादा आहेत."
उपासनी महाराज ही नारायण महाराजांच्या भेटी साठी येत.तसेच त्यांच्या उत्तराधिकारी गोदावरी माता या ही बेटावर मुक्कामी येत असत.
मेहेर बाबांनी तर आपल्या पाच परफेक्ट मास्टरांच्या यादीत श्री नारायण बाबांचाही विशेष उल्लेख केला आहे.ते महाराजांना आपले सद्गुरु असे संबोधत.मेहेर बाबांनी म्हटले आहे , "shree Narayan Maharaj is the Master of Masters."
श्री नारायण महाराजांनी लहान असलेल्या श्रीधर स्वामी महाराजांना बघून त्यांच्या शिक्षकास सांगितले होते की , "गुरुजी हा मुलगा पुढे फार मोठा होणार आहे बरं का.त्याच्याकडे लक्ष ठेवा."
भगवान रमन महर्षींच्या दर्शनाला जेव्हा नारायण महाराजांच्या शिष्या गेल्या तेव्हा भगवान रमन महर्षी त्यांना म्हटले, "बाई तुमचे गुरु श्री नारायण महाराज इतके महान महापुरुष आहेत की असा महात्मा ,असा महापुरुष शंभर वर्षात एकदाच जन्मास येतो.तुमचे फार मोठे भाग्य आहे म्हणून तुम्हाला श्री नारायण महाराजांसारखे सद्गुरु लाभले."
बेळगावचे काणे महाराज श्री नारायण महाराजांना गुरुस्थानी मानत असत.पुण्यातील थोर संत रावसाहेब सहस्त्रबुद्धे महाराज ,कलावती आई,श्रीक्षीरसागर महाराज हे ही बेटावर महाराजांच्या दर्शनाला येऊन गेले होते.पॉल ब्रंटन हा सुप्रसिद्ध पाश्चिमात्य विद्वान उटकमंड येथे महाराजांचा मुक्काम होता तेव्हा रोज दर्शनाला व मार्गदर्शन घेण्यासाठी महाराजांकडे येत असे.
इ.स १९१३ ते इ.स १९४५ ही बत्तीस वर्षे श्रीमहाराजांनी नव्या बेटात वास्तव केले.या कालात अनेक अनुष्ठाने ,महाअनुष्ठाने केली. इ.स १९४२ मध्ये श्री महाराज द्वारका -सोमनाथची यात्रा करुन परत आले व त्यांची प्रकृती क्षिण होऊ लागली.तरी त्यांच्या नित्यनेमात कसलाही फरक पडला नाही.महाराज आपल्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक भक्तास सांगत "नामस्मरण करुन आनंदात रहा." १८ मे १९४५ ला महाराजांना ६० वर्ष पूर्ण होऊन गेली. त्यानिमित्ताने त्यांचा हिरक महोत्सव मोठ्या थाटात भक्तांनी साजरा केला.काही मंडळींच्या आग्रहावरुन महाराज हवापालट करण्यासाठी उटकमंड ला जाण्यास निघाले. १५ जून १९४५ या दिवशी त्यांनी बेट कायमचे सोडले व प्रस्थान ठेवले.पण यावेळी त्यांचे वागणे हे अतिशय वेगळे होते.नेहमी ते निघतांनी दत्त प्रभुंचे दर्शन घेऊन निघत असत पण या वेळी त्यांनी दत्तप्रभुंचे दर्शन घेतलेच नाही.निघतांना नेहमी "आम्ही येतो" म्हणत पण यावेळी "आम्ही जातो" म्हटले. श्रीमहाराज नेहमी म्हणत, "हे सर्व श्रीदत्त महाराजांनी निर्माण केले आहे.त्यांची इच्छा असेल तोपर्यंत ते ठेवतील ,नको असेल तेव्हा नष्ट करतील.आमचा या कशावरही हक्क नाही.श्रीदत्तमहाराज या सर्व वैभवाचे मालक आहेत." पुढे उटकमंड चे थंड हवामान न मानवल्याने महाराज बंगलोरला आले.तिथेही महाराजांच्या दर्शनासाठी खुप गर्दी होऊ लागली.बंगलोरला महाराजांनी अतिरुद्र स्वाहाकार करण्याची इच्छा व्यक्त केली.धारवाडच्या वेदमूर्ती भालचंद्रशास्त्री उप्पिनबेट्टीगिरी यांच्या देखरेखीखाली या स्वाहाकाराची सिद्धता करण्यात आली.श्रावण वद्य द्वादशी शके १८६७ सोमवार दिनांक ३ सप्टेंबर १९४५ ला अतिरुद्र स्वाहाकार पूर्ण झाला.अतिरुद्रानंतर श्रीमहाराजांनी श्रीमल्लिकार्जुनाची महापूजा केली.त्यांस सुवर्णाची शंभर कमळे व सुवर्णाची अकरा बिल्वपत्रे वाहिली.नंतर ध्वनिक्षेपकावरुन सर्वांकडून आपल्या खड्या आवाजात "ॐ नमः शिवाय" हा मंत्र म्हणवून घेतला.त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रथातून श्रीमहाराजांनी यज्ञमंडपाला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि पूर्णाहुतीच्या वेळी आम्हास कळवा असे सांगितले.पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे अतिशय अशक्तपणामुळे ते यज्ञमंडपात येऊ शकले नाही.त्यांनी निरोप पाठविला की, "पूर्णाहुती नंतर ताबडतोब सर्व ब्राह्मणांना भोजनास बसवा व दक्षिणा द्या.ब्राह्मण भोजनास बसले म्हणजे आम्हाला ताबडतोब कळवा." 'ब्राह्मण भोजनास बसले व त्यांना दक्षिणा दिली' असा निरोप येता क्षणी श्रीमहाराज पद्मासन घालून शांत चित्ताने पलंगावर बसले व त्यांनी आपला प्राण ब्रह्मरंध्रात खेचून दत्तचरणी विलीन केला.आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.ही बातमी वार्या सारखी यज्ञमंडपात पोचली.सर्व भक्त धावतच श्रीमहाराजांच्या मुक्कामी पोचले.सर्वत्र हाहाकार उडाला.पुढे लाखो लोकांच्या उपस्थितीत महाराजांवर बंगलोर येथेच अग्नि संस्कार करण्यात आला.महाराजांच्या अस्थी कलशात घालून रेल्वेने पुण्यात व बेटावर आणल्या गेल्या. पुढे भजन मंडपात त्या दर्शनासाठी ठेवल्या गेल्या .काही दिवसांनी महाराज आपल्या एका पारशी भक्त श्रीमती मक्काबाई करसेटजी यांच्या स्वप्नात गेले व त्यांना म्हणाले "मक्काबाई आम्हाला किती दिवस असे कलशात ठेवणार आहात?या दत्तजयंतीचे पूर्वी आमची समाधी बांधून त्यात हा अस्थिकलश ठेवा." पुढे मार्गशीर्ष शुद्ध दशमी शके १८६७ शुक्रवार दिनांक १४ डिसेंबर १९४५ ला या पवित्र अस्थिवर विधीपूर्वक अभिषेक करण्यात आला.त्याची षोडशोपचार पुजा करण्यात आली व अस्थिकलश त्या समाधीत ठेवण्यात आला.
महाराजांनी केलेले समाजकार्य ,धर्मकार्य अतिशय भव्य आणि दिव्य आहे.तसेच महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीचे दु:ख दूर करुन त्यांना आनंदच दिला.बेटावर आलेला प्रत्येक माणूस हा आनंद घेऊन,तृप्ततेचा ढेकर देऊन परतत असे.खरं सांगायचे तर महाराजांनी केलेले कार्य, महाराजांनी केलेल्या अलौकिक लिला मला या एका लेखात मांडणे आता खरंच अशक्य झालं आहे.सर्वच प्रसंग वाचले तरी बुद्धी गांगरुन जाते.या चरित्रातील प्रत्येक प्रसंग दिव्य आहे.कमी अधिक करत करत लिहीलेला हा लेख, नाही नाही म्हणता इतका विस्तृत झाला की त्याने केव्हाच शब्द मर्यादा ओलांडली याची मला पूर्ण जाणीव आहे.त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण हे सर्व प्रसंग आणि घटना लिहील्याशिवाय महाराजांचे संक्षिप्त चरित्र पूर्ण होऊच शकत नाही.महाराजांचे चमत्कार ,लिला हा वेगळा विस्तृत चिंतनाचा विषयच होईल.तुर्तास आता या लेखाला विराम देतो.महाराजांबद्दल ,बेटाबद्दल माझ्या मनात नेहमीच एक विशेष आस्था आहे.बेटावरील चैतन्य,तेथील दत्तप्रभु,महाराजांच्या पाऊलखुणा इतक्या आनंद देतात की आता बेट आणि महाराज हा माझ्या जिवनाचा एक भागच झाले आहे.ही शब्दसुमनांजली श्री महाराजांच्या सुकोमल चरणी अर्पण करतो आणि प्रार्थना करतो की या देहाकडूनही आजिवन अखंड दत्त चरणांची सेवा करुन घ्यावी. 🙏🌸🌺🚩
श्रीनारायण_जय_नारायण_जय_नारायण_नारायण 🌸🙏🌺
✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️



Tgood
ReplyDelete