Friday, August 8, 2025

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

 

#कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-

             

ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-

                          नाथ संप्रदाय हा आपल्या भारतीय धर्म परंपरेतील एक परिवर्तनवादी व स्वतंत्र विचारांचा संप्रदाय आहे.संपूर्ण नाथपंथाने विशेष करुन भगवान श्रीमत्सेंद्रनाथ , भगवान गोरक्षनाथ यांनी रुढी, परंपरा, तथाकथित विषमता निर्माण करणारे नियम,रुढीवादी व अमानवी शास्त्र या सर्वांचा विरोध करुन स्वतःचे सर्वतंत्र स्वतंत्र असे मुक्त तंत्र ,मुक्त शास्त्र व मुक्त मार्ग निर्माण केले.शाबर मंत्र ,शाबर तंत्र ,सिद्धांत ग्रंथ ,योगपर ग्रंथ ,विविध पदरचना ही सर्व नाथसंप्रदायाची मिरासी आहे व ती भगवान गोरक्षनाथांनी सर्वां करिता प्रगट केली.भगवान गोरक्षनाथांनी व संपूर्ण नाथ पंथांने जे ज्ञान सामाजात आधी मुद्दाम कवाडबंद ठेवले गेले होते ते नाथसंप्रदायाच्या ज्ञानरुपी गंगा प्रवाहातून प्रवाहित केले. भगवान आदिनाथांनी हे ज्ञान पहिले दिले ते माता पार्वतीला. याच आहेत नाथ परंपरेतील पहिल्या नाथ , ज्यांना नाथ परंपरेत उदयनाथ म्हणून ओळखले जाते.हेच नाथ परंपरेचे वैभव पुढे ज्ञानदेवांच्या सर्व वाङ्मयातून प्रवाहित झालेले दिसते.सामाजिक अज्ञानाच्या स्थितीत बदल घडविण्यासाठी ज्ञानदेवांना नाथ परंपरा हाच उत्तम विचार प्रवाह का वाटला ? हाच उत्तम मार्ग का वाटला?  हा खरोखर सखोल अभ्यासाचा व चिंतनाचा विषय आहे.

  

अवतार जन्माला येण्यापूर्वी संपूर्ण कुळ हे परम पवित्र असणे गरजेचे असते व तो नियम ज्ञानदेवांच्या कुळातही चालून आला हे क्रमप्राप्तच ठरते.ज्ञानोबारायांच्या जन्मापूर्वी तिन पिढ्या आधीपासून नाथ परंपरेचे पूर्ण लक्ष व कृपा या कुळावर होती. हा काही निव्वळ योगायोग नव्हता तर ही नियतीची पूर्व योजना होती.भगवान गोरक्षनाथांना आपले विचार ,आपले स्वतंत्र शास्त्र तळागळात पोचवून त्यातून दिव्य असे आमूलाग्र बदल घडविण्याचे कार्य करुन घ्यायचे होते व ते त्यांनी करुन घेतले ही.जे आज वारकरी संप्रदायाच्या रुपात आपल्या सर्वांसमोर अनुभवरुपात प्रगट आहे. माउली ज्ञानोबारायांचे पंजोबा त्र्यंबकपंत यांच्यात भगवान गोरक्षनाथांनी हे नाथपंथाचे भक्ती बीज पेरले ,हेच बीज पुढे गोविंदपंतांच्या रुपात अंकुरित झाले, पुढे विठ्ठलपंतांच्या रुपात याचे वृक्षात रुपांतर झाले आणि अखेरीस निवृत्ती ,ज्ञानदेव ,सोपानदेव व मुक्तीईच्या रुपात या वृक्षाला अमृतमय असे फळ लागले.


आता आपण ज्ञानदेवांच्या पंजोबाचे म्हणजे त्र्यंबकपंतांचे चरित्र बघूयात.हेच पुढे माउलींच्या कुळाचे मुळपुरुष म्हणून प्रसिद्ध झाले.हे मोठे कर्तबगार व उत्तर काळात मोठे भगवद्भक्त झाले.त्र्यंबकपंतांचे मौंजीबंधन झाल्यावर ते देवगडास(आजचे देवगिरी) येथे वेदाध्ययनासाठी गेले.शास्त्रांचे ,वेदांचे अध्ययन पूर्ण झाल्यावर ते तिथेच राजे जाधवांच्या दरबारात सेवेकरिता रुजु झाले.यथाकाळी त्यांचा विवाह उमाबाईंशी झाला.पुढे त्यांना दोन पुत्र झाले ज्यात थोरले होते गोविंदपंत व धाकटे होते हरिहरपंत.त्र्यंबकपंतांचे दोन्ही पुत्र मोठे कर्तबगार होते.यातील थोरले जे गोविंदपंत होते त्यांनी आपेगाव येथील कुलकर्णी पद सांभाळले व धाकटे हरिहरपंत हे वडिलांसोबत राजदरबारी सेवेत रुजू झाले. त्र्यंबकपंतांचे चातुर्य , बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, कामातील कौशल्य ,काटेकोरपणा व राजनिष्ठा या सर्व गुणांमुळे तत्कालिन सार्वभौम राजा जैत्रपाल उर्फ जैतुंगीने त्यांना बीड देशाचा राज्यकारभार सोपवला.राजाने त्यावेळी जो करारनामा त्र्यंबकपंतांना लिहून दिला तो बघितला तर लक्षात येईल की त्र्यंबकपंतांना एका राजाला साजेसे असे ऐश्वर्य,अधिकार,सैन्य व कार्य राजा जैत्रपालाने सोपवले होते. त्र्यंबकपंतांनी हा बीड भागातील कारभार अतिशय उत्तमरित्या चालविला.पुढे देवगिरीला जैत्रपालाचा मृत्यू झाला.त्याचा मुलगा सिंघल उर्फ सिंव्हल राजा हा राजगादीवर आला.याने त्र्यंबकपंतांचा धाकटा पुत्र हरिहरपंत याला आपला दुय्यम सेनापती नेमले.पण पुढे असे काही घटनाक्रम घडले की त्र्यंबकपंतांना प्रखर असे वैराग्य उत्पन्न होऊन ते अंतर्मुख झाले व परमार्थाकडे वळले.ती घटना अशी की, काही कालावधी नंतर देवगिरीच्या चाळीस कोस अंतरावर असलेल्या बालाघाट प्रदेशातील करंज देशमुखांनी राजद्रोह केला.तो राज्यावर ससैन्य चालून आला.तिन हजार सैन्य घेऊन त्याने राज्यात हलकल्लोळ माजवला,राज्यात धुमाकूळ घातला.त्याचा बिमोड करण्यासाठी सिंघण राजाने हरिहरपंतांना आपल्या वडिलांसह म्हणजे त्र्यंबकपंतांसह लढायला पाठवले.सोबत मोठे सैन्य घेऊन गेलेल्या त्र्यंबकपंत व हरिहरपंतांनी हे बंड मोडीत काढले. पण या लढाईत हरिहरपंत हे धारातिर्थी पडले.आपल्या कर्तबगार मुलाचा असा अवेळी मृत्यू पाहून त्र्यंबकपंतांना अतोनात दुःख झाले.त्यांना वैराग्य होऊन त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व ते आपेगावी आले.पण आता संसारात ही मन रमेना प्रपंचात समाधान मिळत नव्हते.आपले जिवन व्यर्थ जात आहे असे त्यांना वाटू लागले व ते त्यानंतर हरिभक्तीत रत झाले.हिच ज्ञानदेवांच्या अवताराची पायाभरणीची सुरुवात.भगवान गोरक्षनाथांचे या कुळावर लक्ष होतेच कारण भविष्यात नाथपरंपरेचे वैभव त्यांना ज्ञानदेवांच्या रुपात प्रगट करायचे होते यात शंका नाही.भगवान गोरक्षनाथ भ्रमण करित आपेगावी आले. प्रखर वैराग्याने पवित्र झालेल्या त्र्यंबकपंतांवर त्यांनी कृपा अनुग्रह केला.सद्गुरु भेटीनंतर त्र्यंबकपंतांना खरे समाधान लाभले.दिवसेंदिवस त्यांची साधना वाढत गेली व ते आत्मानंदात रमू लागले.पुढे त्यांनी अखंड सद्गुरु व भगवत स्मरणात आपले जिवन व्यतीत केले.पुढे ईश्वरचिंतनातच त्र्यंबकपंतांनी देह ठेवला.विशेष बाब अशी की ज्यावेळी त्यांनी देह ठेवला त्यावेळी भगवान गोरक्षनाथ तेथे स्वतः हजर होते.त्यांनी स्वतः आपल्या या शिष्याला त्र्यंबकपंताला समाधी दिली. हिच खरी नाथपरंपरेच्या कृपेची सुरुवात.पुढील भागात आपण ज्ञानदेवांच्या पितामहांच्या म्हणजे गोविंदपंतांच्या चरित्राची माहिती घेऊयात….

                   ✍🏻त्यांचाच अक्षय जाधव पाटील आळंदी


संदर्भ ग्रंथ :- १) आदी,तिर्थावळी - नामदेवराय कृत

                  २) ज्ञानदेवलिलामृत

                  ३) भक्तविजय - महिपती कृत

                  ४) ज्ञानेश्वरविजय - निरंजन माधव

                  ५)ज्ञानदेवविजय - श्रीमामामहाराज देशपांडे कृत

                  ६)श्रीज्ञानेश्वर महाराज - ल.रा पांगारकर

                  ७)श्रीज्ञानदेव चरित्र - भिंगारकरबुवा

                  ८) ब्रह्मचित्कलामुक्ताई - वक्ते बाबा

Friday, August 1, 2025

कथा ज्ञानदेवांची 🙏🏻🌸☘️

 


#कथा_ज्ञानदेवांची_भाग१ :- 

अज्ञानाच्या गाढ निद्रेत निद्रिस्त झालेल्या समाजाला खडबडून जागे करणारा सुर्योदय ज्ञानोबांच्या रुपात महाराष्ट्राने बघितला.श्रीगीतेत भगवंतांनी म्हटलेच आहे की, “ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते,त्या त्या वेळी मी अवतार धारण करतो.” महाविष्णू ज्ञानदेवांचा अवतार ही भगवंतांच्या गीतेतील वचनाला सत्य करण्यासाठीच झाला होता हे त्रिकालबाधीत सत्य आहे. त्यांच्या अवतारासाठी समाजातील अशीच ग्लानी आणणारी परिस्थिती कारणीभूत ठरली.कर्मकांड,रुढी,परंपरा यांचा आधार घेऊन समाजातील अज्ञानी लोकांचे झालेले शोषण व या सर्वांमुळे समाजात विषासारखी पसरलेली विषमतेची दरी यामुळे समाज पोखरून निघालेला होता.धर्म फक्त शाब्दपांडित्याच्या दिखाव्याचा भाग झाला होता.शब्दापांडित्याने बरबटलेल्या लोकांमुळे मुळ धर्माच्या ज्ञानावर जणू अज्ञानाचे जळमट बसले होते.जणू काही हे धर्माला लागलेले ग्रहणच होते व या अज्ञानाच्या ,संशयाच्या ग्रहणाला दूर करण्यासाठी श्रीभगवंतच स्वतः ज्ञानदेवांच्या रुपात अवतरले. गेल्या हजार वर्षात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेलेलं हे अभिजात सुर्योदयाचे वरदान परमेश्वराकडून आपल्याला लाभले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.असे ज्ञानदेव ,अशा ज्ञानदेवांचे चरित्र,अशा ज्ञानदेवांनी केलेले कार्य हे गेल्या हजार वर्षांतील एकमेवाद्वितीय असे आहे.ज्ञानोबांचा जन्म /अवतार हा फक्त ज्ञानेश्वरी पुरता मर्यादित नव्हता तर त्यामागची भूमिका,त्यामागचे त्यांच्या अवताराचे प्रयोजन,त्यामागे त्यांनी केलेल्या कार्याचा विस्तार,त्यांनी मांडलेला विचार व त्यांनी स्थापन केलेल्या संप्रदायाचा हेतू या सर्वांचे जर चिंतन आपण केले तर एक गोष्ट लक्षात येते की ज्ञोनोबांनी समाजाला,या व्यवस्थेला नवी दिशा दिली ,नवा सुर्योदय दिला.तर अशा ज्ञानदेवांचे चरित्र आजपासून आपण बघणार आहोत.

  

“शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी” असे जगद्गुरु तुकोबारायांचे वचन आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला ज्ञानोबारायांच्या चरित्रातून दिसून येतो.ज्या कुळामध्ये अनेक पिढ्यांपासून भगवंतांच्या कृपेचे बी पेरल्या गेलेले असते,भगवद भक्तीच्या बीजाचे बीजारोपण झालेले असते त्याच कुळामध्ये भगवंत अवतार घेतात,त्याच कुळामध्ये भगवंतांचे अंश अवतरतात.हाच नियम ,निसर्गाची हिच सगळी क्रिया आपल्याला माउलींच्या कुळामध्ये बघायला मिळते.ज्ञानेश्वर माउलींच्या कुळामध्ये अनेक शूरवीर,थोर पुरुष होऊन गेले.या कुळातील सर्व थोर पुरुषांनी आपल्या शुद्ध कर्माने कुळाचे पावित्र वाढवले जणू काही ज्याप्रमाणे बी पेरण्यासाठी आधी शेतीची मशागत केली जाते त्याचप्रमाणे या सर्व पुरुषांनी माउलींच्या जन्माकरिता कुळाची शुद्धी केली ,एका पवित्र कुळाचे निर्माण केले. श्री ज्ञानदेवांचे मुळपुरुष माउलींपासून सहावे पुरुष म्हणजे माउलींच्या पंजोबांचे पंजोब श्रीहरिहरपंत. मुळचे हे कुटुंब पैठणपासून सात मैल अंतरावर असलेल्या आपेगावचे.हे शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण.यांचे गोत्र पंचप्रवरान्वीत वत्स होते.हरिहरपंतांकडे शके १०६० म्हणजे इ.स ११३२ च्या ही पूर्वीपासून पिढीजात कुलकर्णीपण होते.म्हणजे माउलींच्या जन्माच्या दोनशे वर्षापूर्वीपासूच हे कुळ आर्थिकदृष्ट्या सुखवस्तु होते.यांचे मुळ आडनाव हे “जावळे” पण पिढीजात कुलकर्णीपणामुळे हे कुळ कुलकर्णी या नावानेच विख्यात झाले.हरिहरपंतांच्या स्वच्छ वृत्ती व प्रामाणिकपणा यामुळे तत्कालीन राजे भिल्लम जैत्रपाल यांची त्यांच्यावर मर्जी बसली होती व त्यांना राजाश्रय ही मिळाला होता.या हरिहरपंतांना पुढे तिन अपत्ये झाली.पहिले थोरले रामचंद्रपंत ,मधले केशवपंत व धाकट्या कन्या मोहनाबाई. यापैकी मोहनाबाईंचा विवाह देवगिरीच्या नरहरपंत माचवे यांच्या मुलाशी झाला.मधल्या केशपंतांचा बालपणीच मृत्यू झाला.त्यामुळे हरिहरपंतांनंतर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी ही रामचंद्रपंतावर येऊन पडली.रामचंद्रपंत पुढे सर्व कुलकर्णीपण बघू लागले.हे अतिशय सत्शील होते.यथाकाळी यांचा विवाह झाला व पुढे यांना गोपाळपंत नावाचा एक मुलगा झाला. गोपाळपंतांनी आपल्या वडिलांच्या मृत्युनंतर संपूर्ण कुटुंब व कुलकर्णींपणाचा भार सांभाळला. याच गोपाळपंतांचे चिरंजीव म्हणजे ज्ञानेश्वर माउलींचे आजोबा त्र्यंबकपंत.पुढे आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने व पवित्र चारित्र्याने त्र्यंबकपंत हेच ज्ञानोबांच्या कुळाचे मूळपुरुष म्हणून विख्यात झाले.त्यांचा राज्यकारभार तर दैदिप्यमान होताच पण हे थोर भगवदभक्त ही होते.यांच्या चरित्रा पासूनच माउलींच्या चरित्राची खरी सुरुवात होते किंवा ज्ञानेश्वर माउलींच्या चरित्राची मुहूर्तमेढ रोवली गेली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.याचे कारण ही आपल्याला त्यांचे चरित्र जाणून घेतल्यावर होणार आहे.ही सर्व माहिती आपण पुढील द्वितीय लेखात बघूयात..

          ✍🏻त्यांचाच अक्षय जाधव पाटील आळंदी


संदर्भ ग्रंथ :- १) आदी,तिर्थावळी - नामदेवराय कृत

                  २) ज्ञानदेवलिलामृत

                  ३) भक्तविजय - महिपती कृत

                  ४) ज्ञानेश्वरविजय - निरंजन माधव

                  ५)ज्ञानदेवविजय - श्रीमामामहाराज देशपांडे कृत

                  ६)श्रीज्ञानेश्वर महाराज - ल.रा पांगारकर

                  ७)श्रीज्ञानदेव चरित्र - भिंगारकरबुवा

                  ८) ब्रह्मचित्कलामुक्ताई - वक्ते बाबा

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...