स्वामी समर्थ माउलींचे प्राकट्य आणि त्या संबंधी तत्कालिन दाखले :-
आज चैत्र शुद्ध द्वितीया अक्कलकोट निवासी परब्रह्माचा आज प्रगटदिन.स्वामी माउलींच्या प्राकट्याबद्दल आपल्याला बरीच मतांतरे आणि रुढ कथा,गोष्टी ऐकायला मिळतात. त्यात सर्वश्रुत आणि प्रसिद्ध गोष्ट म्हणजे स्वामी माउली कर्दळीवनातून एका वारुळात ध्यान समाधीत होते व एका लाकुडतोड्यामुळे त्यांची समाधी भंग पावली व पुन्हा ते सदेही कार्यरत झाले.पण या कथेला कितपत सत्य मानावे हा ही एक महत्वाचा भाग आहे.कारण गुरुचरित्रात ज्या कर्दळीवणाचा उल्लेख आला आहे ते आपल्याला आत्ता श्रुत असलेले कर्दळीवन नसुन ते दत्त लोकातील 'कदली' म्हणजे केळाचे बन आहे व भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे "ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी" असे गुरु चरित्रात सांगितल्याप्रमाणे श्रीशैल्य मल्लिकार्जुन ज्योतीर्लिंगातुन त्या दत्तलोकातील कदलीवनात निजानंदगमन करते झाले.यावर दत्त संप्रदायातील थोर सत्पुरुष सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांनी अतिशय सुंदर आणि विश्लेषण पूर्वक माहिती दिली आहे. मग प्रश्न असा उरतो की मग नक्की प्रमाण काय ? तर त्यासाठी आपल्याला भगवान श्री अक्कलकोट स्वामी माउलींचे तत्कालीन परमशिष्य ,त्यांचे सुत असलेल्या हरिभाऊ तावडे अर्थात सर्व स्वामीभक्तांचे लाडके असे स्वामीसुत महाराज आणि स्वामी माउलींचे परमशिष्य असलेल्या सद्गुरु श्रीआनंदनाथ महाराज वेंगुर्ले यांचे अभंग ,रचना आणि चरित्र अभ्यासायला हवे म्हणजे आपल्याला सत्याचा उलगडा नक्की होईल.बरं हे दोन्ही सत्पुरुष कुणी सामान्य लेखक नव्हते.श्री स्वामी माउलींनी ज्यांना आपल्या आत्मलिंग पादुका दिल्या व ध्वजा देऊन दर्या किनारी म्हणजे मुंबापुरीत आपला मठ स्थापन करण्याची आज्ञा केली ते स्वामी सुत आणि ज्यांना आपल्या मुखातुन तुळशीपत्राएवढे अलौकिक असे आत्मलिंग काढून दिले असे आनंदनाथ महाराज होत.या अवतारी व अलौकिक महापुरुषांनी करुन ठेवलेल्या नोंदी या नक्कीच विश्वासार्ह आणि सत्य प्रमाणभूत आहेत यात तिळमात्र शंका नाही.
( शब्द मर्यादेमुळे इथे स्वामीसुत महाराज आणि आनंदनाथ महाराज यांची विस्तृत माहिती देणे शक्य नाही पण जिज्ञासू वाचकांनी या दोघांचेही चरित्र आवर्जून वाचा.) आता आपण पुढे क्रमवार स्वामींच्या प्राकट्याबद्दलची हकीकत बघुयात.
१) स्वामी सुत महाराजांनी केलेली नोंद :-
स्वामी सुत महाराज हे पूर्वाश्रमीत एक सुखवस्तु व्यापारी गृहस्थ होते.त्यांना व्यापारात झालेले नुकसान व त्यासाठी त्यांनी केलेला स्वामींना नवस हे आपल्याला माहिती आहेच.नंतर त्यांचे अक्कलकोटला येणे झाले.स्वामींची कृपा,त्यांना चांदीच्या पादुका अर्पन करण्यास सांगणे व त्या पादुका १४ दिवस आपल्या पायात घालून त्या पादुका ,छाटी व कफनी देऊन स्वामी माउलींनी त्यांना सांगितले, "आपला संसार लुटवून टाक.ही वस्त्रे परिधान कर.दर्याकिनारी ध्वजा लगाव," आणि मग काय स्वामींच्या या शब्दांनी हरीभाऊचे झाले 'स्वामीसुत महाराज' ही स्वामी चरित्रातील लिला पुष्कळ मोठी आणि विस्तृत आहे. यानंतर स्वामीसुतांनी आपले घरदार,पैसा ,अडका,सर्व संसार यावर तुळशीपत्र ठेवून ते सर्व लुटवून टाकले.त्यांच्याकरवी श्रीस्वामी महाराजांची असंख्य पदे,अभंग ,रचना रचल्या जाऊ लागल्या.त्यांनी असंख्य भक्तांना भक्तीमार्गास लावले,दिक्षा दिल्या.स्वामींनी सर्वांसमक्ष सांगितलेच होते की "हा माझा सुत आहे." त्याप्रमाणे अंतर्बाह्य बदल हा स्वामीसुतां मध्ये घडुनही आला होता.
एकदा स्वामीसुत अक्कलकोट ला स्वामी दर्शनाला गेले असता त्यांना स्वामींनी जवळ बोलावून आपल्या पोटावर हात फिरवण्यास सांगितले.अनंतकोटी ब्रह्मांडे ज्याने रचली व ज्यांच्या उदरातील पोकळीत ती सहज लिलेने प्रस्थापित झाली आहेत त्यांच्या बाह्य पदराला स्पर्श होताच स्वामीसुतांना आपल्या पूर्व जन्माचे अनेक प्रसंग दृश्य स्वरुपात दिसायला लागले.त्या दर्शनाने ,त्या दिव्य प्रकाशाने ते चक्रावून गेले.त्यांना दिसले की ते पूर्वजन्मात मध्य हिंदुस्थानातील हस्तिनापूर पासून चोवीस मैलांवर असलेल्या छेली खेडे गावात विजयसिंह नामक एक रजपुत बालक होते.एका पवित्र वटवृक्षाखाली श्री विनायक मंदिरासमोर ही अवतार लिला घडली.
विजयसिंह बालक रोज एकटाच गोट्यांचा खेळ खेळत असे.एक डाव भगवंतांचा व एक डाव स्वतःचा अशी त्याच्या खेळण्याची पद्धत होती.जवळच्या लोकांना,मुलांना हा प्रकार हास्यास्पद वाटते असे.परंतु चैत्र शुद्ध द्वितीया ,बहुधान्य संवत्सरे,गुरुवार दिनी,शालीवाहन शक १०७१ सन ११४९ या पवित्र दिनी एक अघटित प्रकार घडला.आधी 'कडकड' असा मोठा आवाज झाला.हा आवाज धरणीच्या गर्भातून येत होता.आसपासची सारी माणसे भयाने इतस्तत: पळू लागली.विजयसिंह मात्र तिथेच उभा होता.काही क्षणात धरणी दुभंगली व त्यातून एक अष्टवर्षीय सुकुमार मूर्ती बाहेर आली.श्रीस्वामी महाराज हे त्या दिवशी नुसतेच प्रगटले नाहीत तर त्यांनी विजयसिंह बरोबर गोट्याही खेळल्या.श्रीस्वामीसुतांनी स्वामी माउलींवर "स्वामी विजय" नामक एक ग्रंथ लिहीला त्याचा द्वितीय खंड म्हणजे श्रीस्वामीअवतारकांड होय.त्यात त्यांनी स्वामींच्या प्राकट्यासंबंधी सखोल वर्णन केले आहे.ते ही आपण जरुर वाचा तसेच स्वामीसुत आपल्या अभंगातून ही या लिलेचे वर्णन करतात.स्वामी सुत लिहीतात
"स्वामी अवताराचि काय सांगु मात । मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा ।।१।। गोटी खेळामाजी अवतार हा जाला । रामशिंग भला दास त्यांचा ।।२।। गुरुवार द्वितीय चैत्र शुद्धबरी । हरी ( इथे स्वामी सुत स्वत:चा उल्लेख करीत आहेत ) होता बरोबरी खेळावया ।।३।। आश्विन नक्षत्र प्रीती योग होता । जगाचा दाता अवतरला ।।४।।"
पुढील एका अभंगात ते लिहीतात -
"दत्त माझा अवतरला ।। दीन भक्ताच्या काजाला ।।
छेलीखेड्या ग्रामामाजी ।। जाला अवतार सहजी ।। गोटी खेळण्याचा रंग ।। तेव्हा हरी झाला दंग ।।"
पुढील एका अभंगात म्हणतात -
"धर्णी दुभंगून केली दरी ।। स्वामीराज आले वरी ।।
अष्टवर्षी सुकुमार ।। रुप दिसे हे सुंदर ।।"
स्वामीसुतांनी स्वामींच्या प्राकट्यासंबंधी आपल्याला स्पष्ट पुरावाच इथे दिला आहे.या प्राकट्य लिलेला ,त्या दिनाला,तिथीला प्रत्यक्ष स्वामीरायांनीही कसा दुजोरा दिला व आपला प्रकटदिन साजरा करण्याची स्वामीसुतांना अनुमती दर्शविली हे पुढील प्रसंगांमध्ये कळेल.
२) श्रीनानाजी रेखी व स्वामीसुत :-
नगरचे विख्यात ज्योतिषी श्रीनानाजी रेखी हे त्याकाळातील विख्यात ज्योतिषी तर होतेच त्याचबरोबर ते एक धार्मिक वृत्तीचे सत्पुरुष ही होते.त्यांना पिंगला जोतिष विद्या अवगत होती म्हणजे त्यांना पक्ष्याची भाषा येत असे व त्याच्या आधाराने त्यांच्या भाकीतात सत्यत्व विलसत असे.शके १७९१ ऑक्टोबर आरंभी सन १८६९ ला नानाजी काही महत्वपूर्ण कामाकरीता मुंबई ला गेले होते.काम आटोपल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे देवभक्तांची चौकशी सुरु केली तेव्हा त्यांना स्वामीसुतांची माहिती कळली.ते स्वामीसुतांच्या भेटीसाठी कामाठीपुर्यातील मठात गेले.तेथे जाताच स्वामीसुत म्हणाले, "नगरचे नाना जोशी आपणच आहात ना?" हे शब्द ऐकून नानांना फार आश्चर्य वाटले कारण स्वामीसुतांना त्यांनी व त्यांनी स्वामी सुतांना आधी कधीही बघितले नव्हते.त्यांना स्वामीसुतांच्या अधिकाराची जाणीव झाली.नानांनी सद्गदित अंत:करणाने स्वामीसुतांच्या चरणी मस्तक ठेवले.स्वामीसुतांनी नानांना हृदयाशी धरले व आशिर्वाद दिला , "आजपासून तुम्ही समर्थांचे जोशी आहात,तुमचे पागोटे जाऊन झोळी प्रसाद मिळून नगरास तुमच्या येथे श्रीस्वामी समर्थांचा मठ होणार आहे." स्वामी सुतांकडून समर्थांची माहिती मिळाल्यावर त्यांची आज्ञा घेऊन नाना हे सहपरिवार स्वामी दर्शनाला जाऊन आले. स्वामीसुतांच्या आज्ञेने नानाजींनी स्वामी माउलींची कुंडली बनवावयास घेतली.तिथी,वार,नक्षत्र श्रीस्वामीसुतांनीच सांगितले. नानांनी लागलीच स्वामींची कुंडली तयार केली.मग नाना व स्वामीसुत हे अक्कलकोटास गेले.त्यांनी कुंडली स्वामीचरणांपुढे ठेवली.स्वामींनी 'कुंडली माळावर फेकून द्यावी' अशी सेवेकर्यांना आज्ञा केली.त्यावेळी भजन चालु होते.भजन संपल्यावर समर्थांनी कुंडली परत आणण्यास सांगितली.कुंडलीची पुजा झाल्यावर पत्रिकेची कागदाची सुबक घडी झाली होती आणि त्या घडीत हळद कुंकू आणि अक्षता निघाल्या.ती पत्रिका स्वामी महाराजांच्या पसंतीत उतरली व महाराज म्हणाले , 'क्या देखता है ,नौबत बजाव" हे शब्द महाराजांच्या मुखातून निघताच नाना दर्ग्यातील नौबती जवळ जाऊन ती वाजवू लागले.प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामी माउलींनी त्या कुंडलीला आशिर्वाद दिला ,दूजोरा दिला यातच सर्व काही आले. स्वामी प्राकट्याच्या लिलेला प्रत्यक्ष स्वामींनीच शिक्कामोर्तब केले होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.पुढे स्वामीसुत महाराजांनी व नानाजी रेखी यांनी चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामींचा प्रगटदिन साजरा करण्यास सुरुवात केली.
३) सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज :-
. श्रीस्वामीरायांच्या शिष्य प्रभावळीतील अत्यंत थोर महापुरुष म्हणजे आनंदात महाराज.स्वामीरायांची त्यांच्यावर अखंड कृपा होती.त्यांना स्वामींनी आपले आत्मलिंग दिले ,आनंदनाथ महाराजांनीच शिरडीच्या साईदेवांना प्रकाशात आणले व शिरडीकरांना सांगितले होते की हे रत्न,हिरा आहेत आणि काही वर्षांनंतर यांच्या साठी सर्व जगभरातून लोक इथे येतील.तेव्हा साईमाउली ३७ वर्षाचे असतील. स्वामी माउलींनी आत्मलिंग दिल्यावर आनंदनाथांमध्ये अंतर्बाह्य बदल झाला.त्यांच्या जिव्हेवर सरस्वतीचाच जणु वास झाला व त्यांना स्तोत्र,पदे यांचे स्फुरण होऊ लागले.आनंदनाथ महाराजांकडून अफाट आणि अलौकिक अशी दिव्य प्रासादिक स्तोत्रांची रचना झाली.श्रीआनंदनाथांनी स्वामीसुताप्रमाणे ग्वाही दिली की "श्रीस्वामीमहाराज हे चैत्र शुद्ध द्वितीयेलाच प्रगटले". ते म्हणतात -
वटवृक्षामाजी जन्म हाची झाला ।। तारक तो भला जगामाजी ।।१।। गुरुवार दिनी द्वितीया हे जाण ।। शुद्ध चैत्र पूर्ण मांस खरा ।।२।। जग तारावया अवतार धरिला ।। उद्धार केला पतितांचा ।।३।। बाळरुपी लीला परब्रह्मी कळा ।।शुभ्र न सांवळा रंग ज्याचा ।।४।। रंग नसे काही संगरहित पाही ।। निराकारी तोही एक खरा ।।५।। आनंद म्हणे माझा स्वामी हा समर्थ ।। अवतार यथार्थ कलियुगी ।।६।।
आनंदनाथ महाराजांनी सांगितले आहे की स्वामी महाराज हे चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी सुतांनी जे साल सांगितले आहे सन ११४९ यापूर्वी कलियुग चैत्र शुद्ध द्वितीया, शालिवाहन शके ३४०,सन ४१८ ला हिमालयात प्रकटले व काही कार्यानंतर ते पुन्हा गुप्त झाले. श्री स्वामी सुतांच्या वचणांवर आनंदनाथ महाराजांनी आपल्या अभंगातून शिक्कामोर्तबच केला आहे व चैत्र शुद्ध द्वितीया हीच तीच मुळी प्राप्त तिथी आहे याचा जणु पुरावाच दिला आहे.
शेवटचे व महत्वाचे असे की स्वामी महाराज वारुळातुन प्रगटले या कथेला मिळतीजुळती एक कथा श्रीगोपाळबुवा केळकरांच्या बखरीत आपल्याला बघायला मिळते.त्यातही त्यांनी स्वामी माउली हे उत्तर हिंदुस्थानातच प्रगटल्याचा उल्लेख केला आहे.श्रीस्वामी माउली उत्तर हिंदुस्थानात भागिरथी च्या उत्तरेस एका अरण्यात तप करित असता एका लाकुडतोड्याची कुर्हाड वारुळावर पडली ती वारुळातील स्वामींच्या मांडीवर लागली व स्वामी तपातून उठले.त्या कुर्हाडीचा घाव स्वामींच्या मांडीवर पुढेही दिसत असे. अशी ही कथा पण यातही कर्दळीवनाचा पुसटसा उल्लेख नाही.काही ग्रंथात आला ही आहे पण स्वामी सुत महाराज ज्यांचा अधिकार एवढा मोठा होता की स्वामींनी त्यांना माझा सूत असे म्हटले होते ,तसेच आनंदनाथ महाराज यांनीही त्याच तिथीला दुजोरा दिला आहे.
यावरुन एकचं निष्कर्ष निघतो की निर्गुण, निराकार पूर्णब्रह्म भगवंत आजच्या तिथीला सुर्योदयवेळी हस्तिनापूर जवळील छेली खेडे ग्रामी आठ वर्षांच्या बालस्वरुपात इ.स.११४९ मध्ये प्रगट झाले...आज स्वामी भगवंतांचा ८७४ वा प्रगटदिन... आजच्या या परम पावन तिथीला श्री स्वामी समर्थ माउलींच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला अखंड श्रीचरणांची सेवा,स्मरण करण्याचे सामर्थ द्यावे ,आमच्या या जिवनात स्वामी नामाचा सुगंध दरवळत रहावा व स्वामी राया़्ंच्या कृपा करुणेने या जिवनाचं ही सोनं व्हावं.
स्वामींच्या शिष्य मंडळींचाच जर विचार केला तर स्वामी माउलींचे व्यापक ,पूर्णब्रह्म तत्व, भगवंतस्वरुपाचे ओझरते दर्शन होऊ शकेल... राजाधीराज श्रीस्वामी महाराजांच्या शिष्य प्रभावळीमध्ये श्री सद्गुरु स्वामीसुत महाराज, कोल्हापूर चे श्रीकृष्ण सरस्वती कुंभार स्वामी महाराज,श्रीदेव मामलेदार, पुण्याचे श्रीसद्गुरु शंकर महाराज, श्रीसद्गुरु बाळप्पा महाराज,श्रीसद्गुरु बिडकर महाराज, श्रीसद्गुरु मातोश्री पार्वती देवी,श्रीसद्गुरु आनंदनाथ महाराज,श्रीसद्गुरु तात महाराज,श्रीसद्गुरु कृष्ण सरस्वती दत्त महाराज करविर, श्रीसद्गुरु ब्रम्हानंद स्वामीकुमार यती,श्रीसद्गुरु दत्तगिरी गोसावी खानोलकर,सद्गुरु बाळकृष्ण महाराज सुरतकर,श्रीकैवल्याश्रम बोठेस्वामी,श्रीसद्गुरु पिठले स्वामी महाराज,आळंदी चे नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज,श्री वामनराव जी वैद्य, श्री सद्गुरु गोपाळबुवा केळकर,काळबुवा महाराज,रांगोळी महाराज, अशा असंख्य अवतारी संतांचा समावेश होतो.स्वामींच्या लिलाकाळात त्यावेळी देहात असलेले असंख्य अवतारी सत्पुरुष त्यांच्या मार्गदर्शनासाठी अक्कलकोटी येऊन गेले होते त्यात प्रामुख्याने गोंदवल्याचे श्रीब्रम्हचैतन्य महाराज रामदासी, शेगावचे श्रीगजानन महाराज हे प्रमुख...स्वामींची ही जगापुढे असलेली दृष्य माहीती फक्त त्यांच्या काही काळ अक्कलकोटी केलेल्या लिलाविलासामुळेच आपल्यापुढे आली आहे.छेली खेडे ग्रामातुन निघालेली ही परब्रम्ह मुर्ती, भवतारक मुर्ती कुठे कुठे गेली ,त्यांनी काय काय लिलाविलास केला,त्यांनी त्या काळात हिंदुस्थानात फिरुन असंख्य जिवांचा केलेला उद्धार, घडवलेले अनंत शिष्य मंडळी हा सर्व ठेवा आजही गुप्तच आहे... अशा अक्कलकोटस्थ परब्रह्माच्या चरणी आजच्या या पावन दिनी शिरसाष्टांग दंडवत करुयात आणि अखंड स्वामीनाम मुखात रहावे यासाठी त्या पूर्णब्रह्म भगंतांच्या दिव्य चरण कमलांकडे हेच अखंड मागणे मागुयात....
✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

