Wednesday, April 6, 2022

परमहंस सद्गुरु श्री पुंडलिक बाबा मुर्तिजापूर🙏🌺🌸❤️

 



परमहंस श्रीपुंडलिक बाबा मुर्तिजापूर यांची ९० वी जयंती  :-

                    परमपवित्र भारत भूमी ही जगाची अध्यात्मिक राजधानी आहे आणि महाराष्ट्र हे या राजधानीचे मुख्य केंद्र आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्याचे कारण ही तसेच आहे आजवर या महाराष्ट्राच्या परमपावन भूमीत गेल्या हजार वर्षात लाखो अवतारी संत ,महात्मे ,अवलीया ,मस्त, अवधूत यांनी अवतार धारण केला. माउली ,तुकोबा,नामदेवराय,नाथ महाराजांनी समाजाला अध्यात्मिक उर्जा पुरवली,समाजाला नवी दिशा दिली.याच महाराष्ट्रात विदर्भाची परम पावन भूमी आहे ज्यात आजवर शेकडो संतांनी अवतार घेऊन लोकोद्धार केला व या विदर्भ भूमीला वेळोवेळी पावन केले.याच विदर्भातील संत मांदियाळीतील एक रत्न म्हणजे परमपावन प्रात:स्मरणीय ,नित्य वंदनीय परमहंस सद्गुरु



श्री पुंडलिक बाबा. धामणगाव येथील भगवान श्री  मुंगसाजी माउलींनी ज्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून निवडले. "मीच याला जगात आणला आहे.हाच माझ्या गादीचा खरा वारस आहे" व "हा देवच आहे" असे उद्गार काढून परमहंस पुंडलिक बाबा यांचा अधिकार व अवतारीत्वाचा दाखलाच भगवान श्रीमुंगसाजी माउलींनी दिला होता.तत्कालिन महापुरुष तुकडोजी महाराज,गाडगे बाबा,मेहेर बाबा,नाना महाराज तराणेकर अशा अनेक संतांनी पुंडलिक बाबांबद्दल धन्योद्गार काढले होते.माझ्या मनात बाबांबद्दल विशेष प्रेम असण्याचे कारण ही तसेच दिव्यच आहे.परमहंस पुंडलिक बाबा हे माझ्या मातुल घरण्यात आजोळी एक/दोनदा येऊन गेले होते.माझ्या आईकडे आजोळी बाबा येऊन गेले होते त्यांनी सर्वांना कृपा आशिर्वाद आणि तिर्थही दिले होते.त्यामुळे ही मला कदाचित बाबांबद्दल जास्त प्रेम वाटत असेल.

                             परमहंस पुंडलिक बाबा यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा नदी तिरावर वसलेल्या गोरेगाव या गावी एका धनगर कुटुंबात झाला होता.चैत्र शुद्ध पंचमी शके १८३४ दि.१० एप्रिल १९३२ ला रविवारी रात्री दोन प्रहरी रोहिणी नक्षत्रावर पिता खंडूजी व माता मंजुळाबाई या सत्शिल दांपत्यापोटी बाबांनी अवतार धारण केला.बाबांच्या जन्मावेळी एक भल्या मोठ्या नागाने घरातील वळचणीवर बसून भिंतीवर दुग्धारा सोडल्या ,नंतर तो नाग गुप्त झाला.परमहंस पुंडलिक बाबा यांचे वडिल खंडूजी हे संत श्री गाडगे बाबा यांचे शिष्य व अनुयायी होते.पुंडलिक बाबांच्या जन्मावेळी ते गावातील "श्री भक्त पुंडलिक" या नावाच्या नाट्यप्रयोगात काम करत होते.त्यावेळी मंचावर त्यांना अचानक एका तेजस्वी महापुरुषाचे दर्शन घडले.ते महापुरुष खंडुजींना म्हणाले , "मी माझा दिसण्यास सुंदर असा ,आरसारुपी पुत्र तुला दिला आहे,त्याचा सांभाळ कर." एवढे बोलून ते महापुरुष गुप्त झाले.हे ऐकल्याबरोबर खंडूजी गडबडीने घरी आले.पाहतात तर घरी खरंच त्यांना पुत्रजन्म झाल्याची गोड बातमी कळली."भक्त पुंडलिक" या नाट्याच्या मधे एका योग्याने पुत्र जन्माची वार्ता सांगितली त्यामुळे लहान बाळाचे नामकरण "पुंडलिक" असे करण्यात आले.पुंडलिक बाबा लहानपणापासून काहीही बोलले नाही.आई -वडिलांना ते मुक आहे असेच वाटले.सहा वर्षा पर्यंत ते फक्त खाणा-खूणाच करित असत.वयाच्या ७ वर्षा नंतर पिंपळोद येथील योगीराज श्रीपरशराम बाबा अचानकपणे गोरेगावी आले. 'मन्या मन्या' म्हणत महाराजांनी बाळ पुंडलिकाला जवळ घेतले व त्यांच्याशी काही गुप्त संवाद केला.अगम्य आणि अनाकलनीय अशा या भेटीनंतर पुंडलिक बाबांच्या मुखातुन प्रथमच मंजुळ शब्द बाहेर पडले व ते म्हणजे "राधे गोविंद".हा चमत्कार बघुन सर्वांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही.वयाच्या नवव्या वर्षी कुरणखेडचे गोविंद साधु गोरेगावी आले.बाल पुंडलिकाची तेजस्वी मुर्ती बघुन आई-वडिलांच्या संमतीने ते त्यांना घेऊन कुरणखेडला गेले.तेथे गेल्यावर पुंडलिक बाबांनी यशवंत माळ्याच्या पाच वर्षाच्या मुलाला जिवंत केले,दिव्यातील तेल संपताच बाळ पुंडलिकाने दिव्यात पाणी ओतून ते दिवे रात्रभर तेवत ठेवण्यासारखे अतर्क्य आणि अघटीत चमत्कार तेथे केले.एके दिवशी घरी वडिलांनी जातांना दार ओढून घेतले.त्यात बाबांची चार बोटे चेंगरली.वडिल बाहेरून येऊन दार उघडून पहातात तो बाबांची बोटे चेंगरलेली पण बाबांच्या डोळ्यात अश्रूचा थेंबही नव्हता.मुख कमलावर ब्रह्मानंद विलसत होता. पुढे बाबा कुटासा येथे गेले असता.तेथील तळ्यात ते वेळी अवेळी पोहत असत,बुडी मारुन तासंतास तळ्यात बसून राहत.एकदा राधाकिसन नावाचे श्री गाडगेबाबांचे शिष्य यांचे कुटासा या गावी किर्तन होते.बुवा असेच तळ्याकडे गेले असता गौरकाय , सुंदर,तेजस्वी अशी बाबांची लहानशी मुर्ती तळ्याच्या काठावर त्यांच्यासमोर उभी राहिली व त्यांना "आमचे पाय धुवा धुवा,आम्ही कृष्ण आहोत बुवा" असे म्हणू लागले.राधाकिसन महाराजांनी बाबांचे चरण धुतले व त्यांना साष्टांग दंडवत घातला.त्याच कुटासा गावी एक व्यापारी राहत असे.त्याने आपल्या दुकानासमोर लाल मिर्ची वाळत घातल्या होत्या.बाबांनी त्या मिर्ची पायाने तुडवल्या.यामुळे तो व्यापारी रागाने लालबुंद झाला व त्याने बाबांना मिर्चीच्या पोत्यात रात्रभर कोंडून ठेवले.पण त्याचा काहीही परिणाम बाबांवर झाला नाही.उलट ते आनंदसमाधीत रमले होते.याच गावात बाबा नागवे फिरत त्यामूळे काही नतद्रष्ट लोकांनी त्यांच्या पाठी पोटाला बिबा  ठेचून लावला.त्याची जखम झाली व ती चिघळली.पण बाबा त्यावर उपचार औषध घेण्यास तयार नव्हते.पुढे औषधाशिवाय ती जखम बरी झाली.याच गावातील कलावती बाई टाकोणकर या भोळ्या पण अत्यंत शुद्ध भक्ती असलेल्या निरक्षर बाईवर बाबांनी कृपा केली व ती बाई ज्ञानेश्वरी वाचायला लागली व पंढरपूर येथे चातुर्मास करु लागली.

                 पूज्य बाबांच्या द्वारे हे अद्दभूत चमत्कार घडत असले तरीही लौकिक व्यवहारी जगाच्या द्ष्टीने त्यांचे एकंदर विचित्र वागणे-बोलणे पाहून श्री खंडूजीनाना व सौ.मंजुळाबाई फारच चिंताग्रस्त असत. त्यावेळी धामणगाव(देव) येथील महान सत्पुरुष श्री मुंगसाजी महाराजांची सर्वत्र फारच ख्याती पसरली होती.एका द्ष्टांतानुसार खंडुजीनाना बाळ पुंडलिकास त्यांच्याकडे घेऊन गेले.तेथे जाताच बाळ पुंडलिक मुंगसाजी महाराजांच्या शेजारी त्यांच्या गादीवर जाऊन बसले.खंडुजीनाना भितीने मुंगसाजी महाराजांना हात जोडून,’बाळ पुंडलिक वेडा आहे,त्यावर कृपा करा’असे सांगू लागले.तेव्हा मुंगसाजी महाराज हसत हसत म्हणाले. "धनगराला रत्न गवसले’.काय पारख त्याला? अरे हे अमुल्य रत्न आहे. हे केवळ माझेच स्वरूप आहे.याचे जतन कर." नंतर मुंगसाजी महाराजांनी आपले परमभक्त यशवंतराव राजे घाटगे बडोदेकर सरकार यांच्या हातून बाल पुंडलिकास अभ्यंग स्नान घालून नवीन कफनी परीधान करून त्यांना गादीवर बसविले.त्यानंतर मुंगसाजी माउलींनी मुंबई येथे प्रयाण केले व काही काळाने ते तिथेच समाधीस्थ झाले.यावरुन एक कळतं की पुंडलिक बाबांवर आपले सर्व कार्य सोपवून ,आपल्या गादीवर बसवून, उत्तराधिकारी बनवून मुंगसाजी माउलींनी पुढे काही काळाने समाधी घेतली,आपल्या उत्तराधिकार्यावर कार्याची सर्व जबाबदारी सोपवली.त्यानंतर बाबा पाच सहा महिने धामणगाव ला राहिले व काही महिन्यांनी गोरेगावला परतले. पुढे १९४७ ला चैत्र शुद्ध पंचमीला श्रीबाबांचा न भुतो न भविष्यती असा जन्मोत्सव गोरेगाव येथे साजरा करण्यात आला व ती परंपरा आजही अखंड सुरु आहे.(या उत्सवाला माझ्या मातुल घरण्यातील सर्वजण आज्जी, आजोबा,मामा,मावशी,आई सर्वजन दरवर्षी न चुकता जात असत) 

 यानंतर बाबांचा किर्तीसुंगध चहुकडे पसरला.दुरवरुन लोक बाबांच्या दर्शनास येऊ लागले.गोरेगावला रोजच यात्रा भरायला सुरुवात झाली.१६/१७ वर्षांच्या वयाच्या बाबांचा दरबार आता गोरेगावात भरायला सुरुवात झाली.लोक आपल्या अडचणी,दु:ख दूर करण्यासाठी बाबांकडे येत असत.बाबांच्या कृपा कटाक्षाने लोकांचे दु:ख दूर होत असत,बाबांच्या कृपेचा अनुभव असंख्य लोकांना येऊ लागला. बाबा चिखली मुक्कामी असता वाशिमचे सरकारी नोकरीत असलेले गोडाऊन सुपरवाईजर श्रीअनंतराव पारदकर हे दर्शनास आले असता बाबांनी त्यांना फुले फेकून मारली त्याबरोबर पारदकर हे मुर्छीत पडले.बाबांच्या या कृपेनंतर पारदकरांना आत्मसाक्षात्कार झाला.पुढे पारदकरांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व संन्यास घेतला.चिखलीवरुन वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा नदीचे उगमस्थान असलेले काटा या गावाला बाबांचे आगमन झाले.तेथील श्रीमंत सद्भक्त शिवराम बापु उर्फ काटेकर दादा यांच्याकडे बाबा बरेच दिवस राहिले.काटा या गावावर बाबांचे विशेष प्रेम होते.काट्याला बाबांच्या कृपेचा अनेक लोकांनी अनुभव घेतला.काट्याला अनंत चमत्कार घडले त्यांचे वर्णन शब्दमर्यादेस्तव येथे करणे शक्य होणार नाही.पुढे गोरेगावचे वास्तव्य बाबांनी पूर्ण करुन १९७२ ला बाबा मूर्तिजापूर येथील पुंडलिक नगरीत वास्तव्यास आले. मुर्तीजापूरला आल्यानंतर बाबांचे धाकटे बंधू श्रीनारायणभाऊ यांनी पुढे बाबांच्या दरबाराचा सर्व कारभार आपल्या हाती घेतला.बाबांची सर्व व्यवस्था ,दौरे यांची सोय ते अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करु लागले.परमहंस पुंडलिक बाबांच्या दर्शनासाठी हजारो लोक मुर्तिजापूर येथे रोज येत असत.परगावी दर्शनाच्या तारख सुरु झाल्या.नागपूर येथील बाबांची मिरवणूक व रथयात्रा अभूतपूर्व अशी होती.बाबांचे जिथे जिथे वास्तव्य होतं असे तिथे तिथे यात्राच भरत असे.बाबांचा अधिकार अतिशय मोठा होता.पुंडलिक बाबांवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी एक पद ही रचले आहे. महाराजांचे बाबांवर विशेष प्रेम होते. परमहंस पुंडलिक बाबांच्या अधिकाराची जाणीव आपल्याला विविध संतांनी त्यांच्याबद्दल काढलेल्या धन्योद्गार वाचल्यानंतर होईलच.विविध संप्रदायाचे अवतारी ,अधिकारी संत बाबांचा गौरव करतांनी म्हणतात :-


 श्री पुंडलिक बाबा हे अमुल्य रत्न आहे,यांचे जतन कर,हे माझे केवळ स्वरुपच आहे.

     ---श्री मुंगसाजी महाराज,धामणगांव(देव)


अरे हा देवच आहे.त्याच्या केवळ दर्शनाने जिवाचे कल्याण होते.

     ---संत गाडगे महाराज


श्री पुंडलिक महाराज अवतारी पुरूष असून माझे आराध्यदैवत आहेत.

     ---श्री संत विक्तबाबा टाकरघाट(नागपुर)


श्री पुंडलिक बाबा संतामधले युवराज आहेत.

    ---श्री संत लहानुजी महाराज,टाकरखेड


श्री पुंडलिक बाबा रामाचे अवतार आहेत,केवळ रामच आहेत.

     ---श्री संत गुलाबबाबा काटेल,कोलद


हा पुंडलिक मोठा खेळ खेळ्या आहे.हा लिलामय मोठ्या लिला करणारा आहे.

         ---श्री बद्रीनाथ महाराज,मुर्तिजापुर


श्री पुंडलिक बाबा ही दर्शनीय मुर्ती आहे.

       --श्री मारोती बाबा,सालबर्डी


श्री पुंडलिक बाबा साधारण संत नाहीत जन्मोजन्माचे तपश्चैयेने अशी स्थिती प्राप्त

होत असते.असे संत अढळपदी असतात मानवाचे कल्याणासाठी ते स्वेच्छेने

मॄत्युलोकात अवतार घेतात.त्याचे कार्य अक्षम्य व अत असते.

        --श्री संत सितारामदास महाराज


श्री पुंडलिक बाबा माझा आत्मा आहे.

     ---श्री संत परशराम बाबा,पिंपळोद


श्री पुंडलिक बाबा संतश्रेष्ठ साक्षातकारी विभूती होय.

        ---श्री संत अच्युत महाराज,कौडण्यपूर


देव पहावयाचा असेल तर श्री पुंडलिक बाबा कडे जा ते साक्षात देवच आहे.

               ---श्री संत देवमन महाराज,लोधीखेड


परमहंस स्थितीत रममान असलेले श्री पुंडलिक बाबा यांचा अधिकार फार मोठा आहे.

 -श्री नाना महाराज तराणेकर(इंदोर)


            आपले अवतार कार्य पूर्ण करुन बाबांनी पूर्व संकेत ,पूर्वसुचना दिल्यानुसार भाद्रपद वद्य दशमी दिनांक ९ ऑक्टोबर १९८५ या दिवशी लाखो लोकांच्या उपस्थितीत आपला देह विसर्जन केला. बाबांनी ज्या दिवशी समाधी घेतली त्या दिवशी पुंडलिक नगर आश्रमात तब्बल पाच लाख लोक उपस्थित होते.सर्वांनी आपल्या या सगुण रुपी भगवंतांचे अंतिम दर्शन घेतले व तेथेच बाबांना विधीवत समाधी देण्यात आली.आज मुर्तिजापूर येथील पुंडलिक नगरीत बाबांचे भव्य समाधी मंदिर आकारास येत आहे.अतिशय भव्य अशी मुर्ती समाधीवर स्थापन करण्यात आली आहे.बाबांचा पलंग ,पादुका,वस्तु आजही आपल्याला बघावयास मिळतात.अशा या दिव्य परमहंस सद्गुरुंच्या श्रीचरणी ही त्यांनीच लिहून घेतलेली शब्द सेवा अर्पण करतो.बाबांनीही आपल्या सर्वांवर सदैव त्यांचा कृपा करुणेचा आशिर्वाद अखंड ठेवावा हीच प्रार्थना श्रीचरणी करुयात.

   ✍️ ✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...