श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयम् !
नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् !!
शिवावतार आद्यगुरु भगवान पूज्यपाद श्रीशंकराचार्यांची आज २५३१ वी जयंती. प्रकांड पंडित,एक उत्तम संघटक , प्रखर धर्माभिमानी असलेले आचार्य म्हणजे "संभवामी युगे युगे" हा भगवत वचनाला सार्थ करण्यासाठी अवतरलेले परब्रह्म तत्व. आपला सनातन हिंदू धर्म आज ज्या उंचीवर आहे,आज आपल्या धर्माची ध्वजा जर गगनाला भिडणारी गवसणी घालत आहे तर ती फक्त आणि फक्त दोन महापुरुषांच्या पुण्याई मुळे एक तर भगवान आदिशंकराचार्य आणि दुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे दोन्ही महापुरुष जर नसते तर आज आपली काय अवस्था असती,आज धर्माची काय अवस्था असती याचा विचार प्रत्येक हिंदू म्हणून जन्माला आलेल्या, हिंदू म्हणून जागणार्या व्यक्तिने केलाच पाहिजे.ऐव्हाना "या दोन्ही महापुरुषांचा जन्मच मुळात सनातन हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी झाला होता" असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.आज आचार्यांची जयंती,पण आचार्यांच्या या महत्कार्याची माहिती सर्वत्र ,सर्व हिंदू बांधवांना नाही हे माझं एक निरीक्षण आहे.सामान्यांना आचार्यांच्या धर्मजागृतीच्या, धर्मरक्षणाच्या या अचाट ,अफाट प्रवासाची थोडीही माहिती नसणे ही खरंच दुर्दैवी बाब आहे.तरी आज या लेखातून आचार्यांच्या अफाट आणि अचाट जिवनाचे ,कार्याचे धावते दर्शन आपण घेऊयात.
"अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रवित् ।
षोडशे कृतवान भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात् ।।"
आठव्या वर्षी चारही वेदांचे अध्ययन, बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य व बत्तिसाव्या वर्षी महाप्रस्थान असे अतिदिव्य आणि अलौकिक चरित्र असलेल्या आचार्यांचा जन्म देवभूमी केरळ (आताची केरळची दयनीय अवस्था बघुन आता याला देवभूमी म्हणावं का? हाच मोठा प्रश्न आहे.) मधील कालटी या गावी झाला.या गावाजवळूनच पूर्णा नदी वाहते.येथील कृष्णयजुर्वेदीय तैत्तिरीय शाखेच्या नंपूतिरी (नंबुद्री) ब्राम्हण कुळात आचार्यांचा जन्म झाला. पित्याचे नाव शिवगुरू (शिवभट्ट), तर माता आर्याम्बा असे होते.विवाहाच्या पुष्कळ वर्षांनंतरही अपत्य नसल्यामुळे या थोर शिवभक्त दाम्पत्यांनी भगवान शिवाची प्रखर आराधना केली व त्याफलस्वरुप भगवान शिवांनीच आचार्यांच्या रुपात धर्मस्थापनेसाठी या दाम्पत्याचे पोटी जन्म घेतला.अतिशय तेजस्वी ,अजानुबाहू ,कुशाग्र बुध्दी,स्मरणशक्ती असलेले बाळ शंकर वयाच्या दुसर्याच वर्षी अस्खलित संस्कृत मध्ये संभाषण करु लागला.लहान असतांना एक विलक्षण प्रसंग आचार्यांच्या चरित्रात घडला.कालटी ग्रामाची भगवती नामक ग्रामदेवता होती.तिला शिवगुरु प्रतिदिन दुधाचा नैवेद्य दाखवित असत.एक दिवशी काही कारणास्तव शिवगुरुंना बाहेरगावी जावे लागले.त्यामुळे आर्यांम्बा लहानग्या शंकर ला घेऊन मंदिरात आल्या. "बाळ शंकरने मी नैवेद्य दाखवून,प्रसाद घेऊन येतो" असे म्हटले आणि ते मंदिरात आत गेले.देवीची पुजा करुन बाळ शंकर ने तिला नैवेद्य दाखवीला . काही काळ गेल्यावर देवी दूध पित नाही म्हणून शंकरला रडूच कोसळले.बाळ शंकर म्हटला, "देवी माते तातांनी दाखविलेला नैवेद्य जर तुला पोचतो तर माझा नैवेद्य तु का नाही स्विकार करत?" शंकरचा आक्रोश बघून देवी प्रगट झाली व तिने दूध प्राशन केले.सर्व दूध संपताच शंकर पुन्हा रडू लागला.तो देवीला म्हणाला ,"तू सर्वच दूध प्राशन केले आता मला प्रसाद कसा मिळणार?" त्यावेळी देवीने बाळ शंकरला उचलून आपल्या मांडीवर,पदराखाली घेतले.देवीने बाळ शंकराला आपल्या स्तन्य प्राशन करविले.ते अमृतमय दूध पिताच बाळ शंकराला देवीची स्तुती करतारे काव्य स्फुरले.हे काव्य आज आपण "देवी भुजंग" स्तोत्र या नावाने ओळखतो. बृहस्पतीसमान बुद्धी असलेल्या आपल्या या दिव्य पुत्राला शिवगुरुंनी वेदोपनिषदांचे शिक्षण देण्यास सुरुवात केली.वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत वेद , उपनिषदे,पुराणे व रामायण-महाभारतासारखे ग्रंथ शंकराने मुखोद्गत केले.वयाच्या पाचव्या वर्षी शंकराला पितृवियोग झाला.शिवगुरुंचे आकस्मिक निधन झाले. आर्यांम्बांवर तर वज्राघातच झाला पण या दु:खातुन सावरुन आर्यांबांनी शंकराची मुंज लावली व त्याला गुरुगृही शास्त्राध्ययनासाठी पाठविले.अवघ्या दोन वर्षांत बाळ शंकराने वेद , उपनिषदे, शास्त्र, पुराण ,न्यायशास्त्र, व्याकरण या सर्वांचे अध्ययन पूर्ण केले.सहा/सात वर्षाच्या अल्पवयात आचार्य या सर्व विषयांवर प्रवचन करु लागले.आचार्याची ही अल्पवयातील वकृत्व व ज्ञानसंपन्न प्रभा बघुन असंख्य लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले.गुरुगृही असतांना बालक शंकर एक दिवस एका निर्धन ब्राह्मणाघरी भिक्षेला गेले.घरात अन्नाचा एक कण ही नसल्याचे त्या घरातील स्त्रीने बाल शंकराला सांगितले.त्या घरातील अन्नानदशा बघून बालक शंकराचे हृदय कळवळले.त्यांनी त्या स्त्रीला सांगितले तुझ्या घरातील एखादे फळ मला भिक्षेला दे.त्या स्त्रीने घरातील एक आवळा आचार्यांच्या झोळीत टाकला.त्यानंतर शंकरांनी भगवती महालक्ष्मी चे ध्यान आरंभिले व देवी ला कनकधारा स्त्रोत्राने आळविले.भगवती लक्ष्मी शंकरांपुढे उभी राहिली.आचार्यांनी देवीला त्या निर्धना ब्रह्माणावर कृपा करण्याची प्रार्थना केली आणि देवीने आचार्यांना दिलेल्या एका आवळ्या बदल्यात त्या ब्राह्मणाचे घर सुवर्ण आवळ्यांनी भरले. सातवे वर्षी आपले अध्ययन संपवून आचार्य आपल्या घरी परतले व आपल्या मातु:श्रींची सेवा करु लागले.आचार्यांच्या आईंचा रोजचा नदी स्नानाचा संकल्प होता त्यामुळे त्या रोज स्नानाला नदीवर जात असतं.एकदा स्नानाला जात असतावेळी त्यांना सुर्याच्या प्रखर तापाने मूर्च्छा आली.आईला उशीर झाला म्हणून आचार्य त्यांना बघायला नदीवर गेले.आईची मूर्च्छीत अवस्था बघुन आचार्यांना वाईट वाटले व त्यांनी पूर्णा नदीला आपल्या घराजवळून वाहण्याची विनंती केली व आश्चर्य असे की नदी आपला मुळ प्रवाह सोडून आचार्यांच्या घराजवळून वाहू लागली.
आचार्यांची किर्ती सर्वदूर पसरली.आचार्यांच्या भेटीस्तव दर्शनाला असंख्य जिव येऊ लागले. वयाच्या आठव्या वर्षी आचार्यांनी आपल्या मातोश्रींकडे संन्यास घेण्याची आज्ञा मागितली.आपल्या मुलाचे हे निर्वानीचे शब्द ऐकून आर्यांम्बानी विलाप केला.मुलाला त्या गृहस्थाश्रमाचे महत्व सांगु लागल्या पण आचार्यांचे अवतार कार्य ठरलेले होते.मातृआज्ञेशिवाय संन्यास घेता येत नाही त्यामुळे आता आईची आज्ञा कशी मिळवायची हा विचार ते करू लागले.त्यानंतर आचार्यांनी एक लिला केली ते नदीवर स्नानास गेले.काही काळाने नक्राने आपला पाय खोलात ओढला आहे व आता खोल नेतो आहे अशी लिला केली.आचार्य आईला आर्तस्वराने हाक मारु लागले.आर्यांम्बा येऊन पाहते तर शंकराला नक्र पायाने ओढत आहे असे बघितले व त्या ही मदतीसाठी धावु लागल्या.आपल्या आईला शंकर म्हटले , "तु जर मला संन्यास घेण्याची आज्ञा दिली तर हा माझा अपमृत्यू टळेल." आईने विचार केला की मुलगा संन्यास का घेईना पण जिवंत असणे गरजेचे आहे व संन्यास घेण्यास आज्ञा दिली.इकडे आचार्य ही नदीतून बाहेर आले.पुढे योग्य दिवस बघुन आईचे सांत्वन करुन आचार्य गृहत्याग करीता सज्ज झाले.त्यांनी आईला वचन दिले की "तुझ्या अंतिम काळी मी तुझ्या जवळच असेन." आणि आचार्य आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन जगाच्या उद्धारासाठी निघाले.पुढे आपल्या सद्गुरुंच्या भेटीस्तव आचार्य नर्मदा किनारी आले.नर्मदेच्या प्रशांत व रम्य तिरावर जातांना आचार्य श्रीगोविंद पूज्यपादांचा आश्रम शोधू लागले.आचार्यांना बघताच गोविंदपादांना त्यांची ओळख पटली व आचार्यांनी गुरुदेव गोविंदपादांना "आत्मपंचक" व "दशश्लोकी" द्वारे उत्तरे दिली.पुढे गोविदंपादाचार्यांनी आचार्यांना संन्यास आश्रमाची दिक्षा दिली.एके दिवशी सद्गुरु गोविंदपाद ध्यानाला बसले होते व त्यावेळी नर्मदेला महापूर आला व ती प्रचंड आवाज करुन वाहू लागली.आचार्यांनी विचार केला की यामुळे आपल्या सद्गुरु ची समाधी भंग पावेल.त्यांनी आपल्या कमंडलूतील जल नर्मदेवर प्रोक्षण केले व नर्मदेच्या पुराचे जल आपल्या कमंडलूत सामावून घेतले.आचार्य शंकर ज्यावेळी ज्ञानात परिपूर्ण झाले तेव्हा गुरुदेव गोविंदपादांनी त्यांना बोलावून काशी क्षेत्री जाण्याची व तेथे प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहीण्याची आज्ञा केली.हे ऐकताच शंकराचार्यांनी गुरुदेवांना प्रणिपात केला व वाराणसी कडे प्रस्थान केले.आपला प्रथम शिष्य विष्णुशर्मा याची भेट ही आचार्यांना मार्गातच झाली.आचार्यानी विष्णुशर्माला काशी क्षेत्री संन्यास दिला व त्यांचे नाव "चित्सुखाचार्य" असे ठेवले.आचार्य काशीत प्रवचन करीत त्यावेळी एवढ्या कमी वयाच्या या तेजस्वी बटुला बघायला लोकांची गर्दी होऊ लागली.आचार्यांनी काशीत "शतश्लोकी" हा ग्रंथ रचला.तसेच काशीतच आचार्यांनी मणिकर्णीकाष्टक,द्वादश ज्योतिर्लिंग अष्टक,कालभैरावष्टक असे अनेक रसाळ स्तोत्र रचले.याच मुक्कामी आचार्यांना त्यांचा दुसरा शिष्य सनंदन शरणं आला.यांची कथा अतिशय दिव्य आहे.आचार्यांच्या प्रवचन आणि प्रभेचा इतका प्रभाव व दृढ विश्वास सनंदन च्या मनात होता की एकदा गंगेच्या पैलतिरावर आचार्य उभे होते त्यांनी सनंदनाला हाक मारली पण अलिकडील तिरावर सनंदन उभे होते.गंगेला प्रचंड वेग होता.पण गुरुंची आज्ञा ही भगवंतांची आज्ञा हे गुह्य त्यांना माहीत होतो त्यामुळे क्षणाचाही विचार न करता सनंदनाने आचार्यांना बघता बघता व नामजप करीत पाण्यात पाय टाकला.वेगाने सनंदन आचार्यांकडे यायला निघाले.पण आश्चर्य असे की जिथे जिथे सनंदन पाय ठेवू लागले तिथे तिथे कमलपुष्प उगवू लागले.अशा प्रकारे सनंदन आचार्यांकडे येऊन पोचले.आचार्यांनी पुढे यांना दिक्षा दिली व यांचे नाव पद्मपादाचार्य असे ठेवले.याच पद्मपादाचार्यांना भगवान नृसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होऊन कृपा आशिर्वादाचा लाभ झाला होता.याच मुक्कामात आचार्यांची भगवान श्रीमहादेवांनी सगुण चांडाळ रुपात येऊन परिक्षा घेतली ह़ोती. काशीत आचार्यांचे ब्रह्मसुत्रावरील भाष्य आणि मुख्य उपनिषद भाष्याचे लेखनकाम समाप्त झाले.त्यावेळी आचार्यांचे वय १५ वर्षाचे होते.काशीला भगवान वेदव्यासांनी एका वृद्धाच्या रुपात येऊन आचार्यांशी शास्त्र चर्चा केली होती व आपल्या दिग्विजय यात्रेला कृपा आशिर्वाद ही दिला होता.काशीक्षेत्राहून आचार्य बद्रिनाथ येथे आले.तेथील बुद्ध मताच्या लोकांनी नारदकुंडात फेकलेल्या मुळ भगवान बद्रिनारायणाच्या विग्रहाची पुन्हा प्रतिष्ठापना केली व पुजेचा प्रबंध करविला.पुढे आचार्य श्रीनगर येथे आले तेथील तंत्र मार्गातील अघोरी रुढींना बंद करुन मुळ तांत्रीक मार्गातील लोकांना त्यांची चुक दाखवली व त्या मार्गात झालेल्या अशुद्ध रुढींना संपविले.या महत्वाच्या कार्यानंतर आचार्य काशीला परत आले.तिथे राहून त्यांनी विष्णुसहस्रनामावर भाष्य लिहून पूर्ण केले. आचार्यांच्या मातोश्री आर्यांम्बांची प्रकृती ठिक नव्हती त्यांचा अंतकाळ जवळ आल्याचे जाणून आचार्य वायुमार्गांने कालटीत दाखल झाले.कालटीत अग्निशर्मा हा आर्यांबाची सेवा करत असे.आचार्यांना बघुन त्याला आनंद झाला.आईला अखेरीस आचार्यांनी कृष्णदर्शन घडविले आणि आईची प्राणज्योत मालवली.पण कालटीतील कुणीही ब्राह्मण आचार्यांच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यास तयार नव्हता कारण आचार्य आपल्या आईला दिलेले अग्निसंस्कार स्वतः करण्याचे वचन पाळणार होते.शेवटी आचार्यांनी अग्निशर्माला लाकडे आणण्यास सांगितले.लाकडाची चिता घराच्या मागील अंगणात रचुन योगाग्निने लाकडात अग्नि निर्माण केला व आपल्या आईचे अंत्यसंस्कार केले.त्यांनी अग्निशर्माला भगवान बद्रिनारायणाचे कायमचे पुजारी पद दिले. "शांकरस्मृती" या ग्रंथावर कालटी व जवळपास असणार्या सर्व धर्ममार्तंडांनी आक्षेप घेतला व त्याचा विरोध केला .तर आचार्यांनी स्वतः या सर्वांना राजदरबारी हरविले व आपले मत सिद्ध केले. पुढे काशीक्षेत्री आल्यावर आचार्यांनी विविध पंथात असलेल्या उपासना व देवतांना एक पद्धत दिली .या सर्वांमध्ये असलेला उचनिच भाव खंडित केला व काशी क्षेत्री पहिली पंचायतन पूजा सुरु केली.त्यानंतर जैनमत आणि बौद्ध मताचे खंडन करणारे कुमारिलभट्ट यांची अंतिमकाळी आचार्यांची भेट झाली ( कुमारीलभट्ट यांचा संपूर्ण प्रसंग अतिशय दिव्य आहे तो आपण चरित्र ग्रंथात जरुर वाचा इथे तो पूर्ण देणे शक्य नाही ) व तेथून आचार्य महिष्मतीनगरीकडे आले.कारण येथेत त्यांना कुमारिलभट्ट यांच्या शिष्य, उत्तराधिकारी असलेले महाज्ञानी द्वैतमतवादी मंडणमिश्र यांना भेटायचे होते.आचार्यांनी द्वैतमतवादी मंडणमिश्र व त्यांची पत्नी सरस्वती ज्या प्रत्यक्ष भगवती माता सरस्वती च्या पूर्ण अवतार होत्या त्यांच्याशी वाद केला. मंडणमिश्र व आचार्य यांचा वाद एकविस दिवस अखंड सुरू होता अखेर आचार्यांनी मंडणमिश्रांना हरवीले होते.पुढे सरस्वतींनी आचार्याना कामशास्त्रातील प्रश्न विचारल्यावर आचार्यांनी त्यांना सहा महिने वेळ मागितला.तिथून आचार्य पूर्वेकडे निघाले तर वाटेत एक राजा मृत झालेला त्यांच्या लक्षात आले.आचार्यांनी आपला स्थुल देह एका गुंफेत शिष्यांच्या हवाली करुन त्या राजात परकायाप्रवेश केला व त्यांच्या देहामार्फत संपूर्ण कामशास्त्र अभ्यासले.त्यावर आचार्यांनी एक ग्रंथ रचला व तो सरस्वतीच्या हाती दिला.तो वाचल्यावर सरस्वती आचार्यांना शरणं आली व त्या उभयतांनी आपला पराभव मान्य केला. आचार्यांनी मंडणमिश्रांना संन्यास दिक्षा दिली व त्यांचे नाव "सुरेश्वराचार्य " असे ठेवले.त्यानंतर सरस्वती ने स्वस्थानी जाण्याची इच्छा व्यक्त केली.आचार्य भगवती सरस्वती मातेला ओळखून होते.त्यांनी तिची स्तुती केली व त्यांचा आशिर्वाद मागितला.सरस्वती मातेने ही आचार्यांना श्रृंगेरी पिठ स्थापुन त्यात 'श्री' यंत्र स्थापना करायची आज्ञा केली.मी त्याद्वारे नित्य श्रृंगीरी मठात वास्तव्य करेन हा आशिर्वाद दिला व आपल्या दिव्य देहाचा त्याग केला.
मंडणमिश्रांचा पराभव झाल्यावर त्यांना घेऊन सर्व शिष्यासमवेत आचार्य चालुक्यांच्या पंचवटीत आले.तेथुन ते घृष्णेश्वर,नागनाथ ,वैद्यनाथांचे दर्शन घेऊन पंढरपूरात आले.पांडुरंगाचे दर्शन घेऊन आचार्यांनी "पांडुरंगाष्टकाची" रचना केली. तेथून आचार्य श्रीशैल्याला आले.भगवान श्री मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन ते पुढे आले तर तिथे उग्रभैरव या तांत्रीकाचा प्रसंग व पद्मपादांच्या नरसिंह अवताराचा अलौकिक प्रसंग घडला.त्यानंतर आचार्य गोकर्ण महाबळेश्वर येथे आले.तेथील निवासात त्यांनी प्रवचनाद्वारे जनजागृती केली.आचार्यांची ही विजययात्रा आता शृंगेरी येथे आली.येथेच आचार्यांनी आपल्या चारी धर्म मठातील पहिल्या मठाची स्थापना केली.सुरेश्वरांना त्यांनी या पहिल्या मठाचे मठाधिपती केले.तेथे आचार्यानी श्रीयंत्र स्थापन केले.तसेच शारदा मंदिर उभारले.याच शृंगेरी मठात आचार्यांना आनंदगीरी नामक युवक येऊन भेटला.आपला शिष्य करुन घ्या ही विनवणी तो आचार्या़ंना करु लागला.आपली सेवा करु द्यावी ही विनवणी त्यांनी आचार्यांच्या चरणी केली.आचार्यांनीही त्यांच्या शुद्ध अंतःकरणामुळे त्यांना आज्ञा दिली. आनंदगीरी हा आचार्यांची हर एक प्रकारे सेवा करत असे.आचार्यांची कपडे धुणे ,त्यांना लागणार्या सर्व वस्तुंची व्यवस्था ठेवणे अशा अनेक सेवा तो अविरत करीत असे.इतर शास्त्राध्ययनात त्याला रस नव्हता."गुरुसेवा हीच मोक्षाला कारणीभूत आहे" हा एकच बोध त्याने मनावर बिंबवला होता.फक्त आचार्यांच्या शिकवणीवेळी तो उपस्थित राहत असे. एक दिवस गिरीला नदीवरुन येण्यास विलंब झाला.सर्वजन आपल्याजागी येऊन बसले.आचार्यही गिरीची वाट बघु लागले.तेव्हा पद्मपादाचार्य आचार्यांना म्हणाले , "आचार्य गिरी हा मुढ आहे त्या या शास्त्रातील काय कळते.नुसत्या गुरुसेवेने काय मिळणार." आचार्यांनी पद्मपाद आणि इतर शिष्यांच्या अहंकाराला जाणले. तेवढ्यात गिरी तिथे आला.त्याने आचार्यांना प्रणाम केला.आचार्यांनी गिरीच्या डोक्यावर हात ठेवला व त्याला म्हणाले, "गिरी आजचा पाठ तू घे." आता गिरीची फजिती होणार म्हणून सर्व उत्सुकतेने पाहत होतो.तोच गिरीच्या मुखातून बारा अक्षरी तोटक छंदातील रचना बाहेर पडू लागली.गुरु-शिष्याचा शास्त्र संवाद त्याच्या मुखातून बाहेर पडू लागला. सर्वांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही.गुरुसेवेमुळे गिरीला ज्ञानप्राप्ती झाली होती.सर्वांनी आचार्यांची क्षमा मागितली.आचार्यांनी गिरीचे "तोटकाचार्य" असे नामकरण केले.पुढे आचार्य उज्जैनीत आले.तेथे भगवान महाकालेश्वराचे दर्शन घेऊन आचार्यांनी सर्वांना अद्वैतमताचे प्रतिपादन केले.त्या प्रदेशात शुद्ध सनातन धर्म रुजविला.पुढे ते द्वारकेला आले.तेथीव जैन मताचे खंडन करुन त्यांनी द्वारका पिठाची स्थापना केली.हस्तमलकाचार्याची नियुक्ती त्यांनी त्या पिठावर केली.पुढे आचार्य तक्षशिला नगरीत आले.तेथे पुष्कळ बौद्ध मताचा प्रसार झाला होता.तेथे व गांधारातील बौद्धमतानुयायींना आचार्यांनी पराभूत केले व ते मखेश्वराच्या दर्शनाला अति पश्चिमेला आले.ते तेथून अयोध्येला आले अयोध्येतील राम मंदिराच्या दुरावस्थेमुळे आचार्यांना अतिव दु:ख झाले तेथील व गयेतील बौद्ध अनुयायांना आचार्यांनी शास्त्रार्थात हरवीले.तेथील सर्व बौद्ध भिक्खू आचार्यांना शरणं आले व तेथे आचार्यांनी अद्वैतमताची स्थापना केली.आचार्य तेथून पूर्वेकडे जगन्नाथपुरी येथे आले.बौद्धमताच्या जोरामुळे जगन्नाथ पुरी येथे मुळ विग्रहाएवजी शालिग्रामाची पुजा होत आहे हे बघितल्यावर आचार्यांना अतिव दु:ख झाले.आचार्यांनी मुळ भूगर्भस्थ मूर्ती शोधून तिची पुन:स्थापना केली.पूरीला अनेकांनी आचार्यांचे शिष्यत्व स्विकारले.तेथे अद्वैतमताची स्थापना करुन आचार्यानी गोवर्धन पिठाची स्थापना केली.तेथील पहिले पिठाधीश म्हणून त्यांनी पद्मपदाचार्यांची नियुक्ती केली. तेथून आचार्यांनी ही विजय यात्रा वंग देशात आली तेथील तंत्र बौद्ध मार्गाचे खंडन त्यांनी करुन लोकांना अद्वैत ज्ञानाचे प्रतिपादन केले. पुढे गौड प्रदेशात वैदिक धर्माची पुन:स्थापना करुन आचार्य आपल्या चतुर्थमठाची स्थापना करण्याकरिता हिमालयाकडे वळले.या मठाला जोतिष्पीठ अथवा ज्योतिर्मठ असे नाव आचार्यांनी दिले.तेथे तोटकाचार्यांना प्रथम पिठाधीश होण्याचा बहुमान मिळाला.या चारही पिठाला त्यांचे कार्य समजावून योग्य ती नियमावली आचार्यांनी आखुन दिली.आता आचार्यांचे मुख्य कार्य पूर्ण झाले होते.आता आचार्य निघाले ते त्यांच्या सर्वज्ञपिठाकडे.काश्मीर राज्यात सरस्वतीचे सर्वज्ञ पिठ आहे.तेथे तांत्रिकांना पराभूत करुन आचार्य
बद्रिनाथाच्या दर्शनाला निघाले.तेथुन ते केदारनाथ कडे आले.आचार्यांसमवेत पद्मपाद, सुरेश्वर, हस्तमलक,चित्सुख ,तोटकाचार्य असे शिष्यमंडळी होते.आचार्यांनी आता आम्ही देहत्याग करणार अशी सर्वांना कल्पना दिली होती.सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते,सर्व शिष्य जड अंतःकरणाने एक एक पाऊल केदारनाथला कडे टाकत होते.आता ते केदारेश्वराच्या शिवलिंगाजवळ आले व सर्वांना आशिर्वाद देऊन घालून दिलेल्या नियमांवर चालण्याची आज्ञा दिली.सदैव धर्मकार्य ,अद्वैतमार्गाचा प्रचार करण्याची आज्ञा दिली व सर्वांसमक्ष आचार्य केदारनाथांच्या शिवलिंगात अदृश्य झाले.
असे हे लोकविलक्षण महापुरुष संपूर्ण भारत दोनदा अचाट अशी दिग्विजय पदयात्रा करुन , संपूर्ण हिंदुस्थान पादाक्रांत करुन धर्मस्थापनेचे अलौकिक कार्य करते झाले व वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी आपल्या निजधामास कैलासी गेले.आचार्यांच्या या दिव्य चरित्रातुन ठराविक मोती निवडणे हे एक अतिशय अशक्यप्राय असे काम.आचार्यांनी बुद्धी दिली तसे निवडून इथे मांडले.काही चुकले तर ती केवळ माझीच अल्पबुद्धी तरी आचार्यांचे दिव्य कार्य हिंदू समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोचणे हीच एक सदिच्छा या लेखामागे आहे बाकी काही नाही.आचार्यांच्या जयंतीच्या परम पावन तिथीला आचार्यांच्या नित्य मंगल ,सुकोमल चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करून लेखनीला विराम देतो.
वंदे भाष्यकाराय शंकराय परमात्मने ।
सच्चिदानंदरुपाय अद्वैतभास्करायच ।
भव शंकरदेशिक मे शरणम् ।।
🙏🙏🙏🌸🌸🌸🚩🚩🚩☘️☘️☘️🌺🌺🌺
#जयजयशंकरहरहरशंकर 🙏🌸🌺🚩

