आज वैशाख शुद्ध अष्टमी भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे शिष्योत्तम धनकवडी निवासी दत्तावतारी महायोगी शिवावतार सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा ७५ वा समाधी दिन.भगवान श्री अक्कलकोट स्वामी माउलींच्या प्रभावळीत अतिशय दिव्य आणि अलौकिक असे महापुरुष असलेल्या सद्गुरु शंकर बाबांचे संपूर्ण अवतार कार्यचं,संपूर्ण जिवन चरित्रचं एका गुढ आणि गुह्य अशा वलयांनी भारलेले आहे.श्री महाराजांच्या प्रत्येक लिला इतक्या अनाकलनीय आणि अतर्क्य आहेत की नुसतं वाचल्या तरी आजही बुद्धी ,मती कुंठीत होते.
नाशिक जिल्ह्यातील,सटाना तालुक्यातील अंतापुर या गावात राहणाऱ्या परमशिवभक्त असलेल्या चिंतामणजी अंतापूरकर यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भगवान शंकर हे तेथील दावलं मलिक यांच्या टेकडीजवळील (जे भगवान मत्सेंद्रनाथांचे ठिकाण आहे ) जंगलात वाघाच्या कळपात एका बिल्व वृक्षाखाली कार्तिक शुद्ध अष्टमीला अवतरले होते.खरंतर याबाबतही बरेच संभ्रम निर्माण झाले आहेत पण बहुतेक लोक हाच प्रसंग खरा मानतात.श्री महाराजांच्या वडिलांच्या नावानेही थोडा फार गोंधळ आहे पण स्वतः सद्गुरु शंकर महाराजांनी दोनदा त्यांना "शंकर चिंतामणजी अंतापूरकर" नावे आलेल्या मनिऑर्डवर सही केलेली असल्यामुळे आपण ती खरी मानायला काहीच हरकत नाही.(या लेखासोबत ती सही देतो आहे).श्रीशंकर बाबांनी अंतापूर येथे अनंत लिला केल्या व पुढे मोठे झाल्यावर आपल्या आई वडिलांच्या संमतीने ते हिमालयात गेल्याचे म्हटले जाते.महाराजांचे अलिकडे लिहील्या गेलेले चरित्र "शंकर गिता" यात या बाल लिलांचे अतिशय सुंदर वर्णन केले गेले आहे.अवतारी आणि जन्मसिद्ध असलेल्या महाराजांच्या बाललिला व त्यांनी हिमालयात केलेली भ्रमंती याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. महाराजांना प्रत्यक्ष भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांनी कृपा अनुग्रह दिला होता व याला स्वत: महाराजांनी दुजोरा दिला होता. श्रीशंकर महाराज हे देहाने अष्टवक्र,अजानुबाहु होते ,सांवळा रंग,तेजस्वी व मोठे डोळे असे महाराजांचे ध्यान. असे म्हटले जाते की महाराजांनी या अष्टवक्र ध्यानामुळे नाटकात पडदे ओढण्याचे काम ही केले होते.एकदा एका नाटका प्रसंगी त्यांनी चिलया बाळाच्या वधाची नाट्यकृती सादर केली पण खरंच चिलया बाळाला म्हणजे त्या पात्राला त्यांनी लोकांनी सांगितले म्हणून मारले व लोकांच्या भितीने ते तेथून पळाले.पण त्यानंतर त्यांना स्वामी समर्थ माउलींनी आपल्या जवळ घेतले व त्यांच्यावर कृपा अनुग्रह केला. सोलापूर येथील सद्गुरु श्री मधू बुवा यांनी एकदा असे सांगितले होते की भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ माउलींनी महाराजांना शुभराय मठातच दिक्षा दिली होती.याला काही ठोस पुरावा आज तरी उपलब्ध नाही पण प.पू.मधू बुवांनी हे त्यांच्या जवळच्या लोकांना सांगितले होते. तसेच सद्गुरु शंकर बाबांचे अंतरंग शिष्य असलेले जणूकाका हे महाराजांचा जन्मोत्सव शिवरात्रीला साजरा करायचे. (यामागे नक्कीच काहीतरी अर्थ असणार पण आज तो गुढ रुपानेच आपल्यापुढे आहे.)
श्री सद्गुरु शंकर बाबांचे सोलापूर येथील शुभराय मठातील पहिले आगमन ही त्यांच्या सध्या माहितीत असलेल्या व प्रत्यक्ष दृश्य स्वरुपातील लिलेची,कार्याची सुरवात म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.प.पू.जणू काका देवघरात पूजा करित होते व महाराज "अल्लख निरंजन" म्हणून आत आले व जणू बुवांना घेऊन तडक कुरवपूर ला गेले.तिथे त्यांनी जणू काकांना प्रत्यक्ष अनुग्रह दिला.यानंतर सोलापूर हे महाराजांचे आवडते ठिकाणच बनले.महाराज पुढे किमान १८ वर्ष तरी सोलापूर ला येऊन जाऊन असायचे.यानंतर महाराजांचे प्रिय ठिकाण म्हणजे नगर. गणेश अभ्यंकर यांच्या पहिल्या महायुद्धाच्या वेळी झेललेल्या बंदुकीच्या गोळ्या असोत की नंतर दत्तात्रेय तथा अण्णा अभ्यंकरांच्या वरील महाराजाची कृपा असो सर्व काही विलक्षण.महाराजांचे अंतरंग परमशिष्य आवडते पार्शद म्हणजे डॉ नागेश धनेश्वर.डॉक्टरांवर महाराजांनी केलेली कृपा ,महाराजांनी त्यांना टाकून दिलेला दवाखाना आणि त्यांना परमार्थात अतिउच्च पातळीवर पोचवण्याची दिव्य गाथा सर्व काही अनाकलनीय आहे.एकदा महाराज डॉ धनेश्वरांना म्हटले होते की तुझा नी माझा "गुरु शिष्याचा जन्मोजन्मीचा संबंध आहे." याच नगर मधे महाराजांचे अतिशय प्रिय ठिकाण आहे ते म्हणजे "श्रीक्षेत्र वृद्धेश्वर".महाराज हे पूर्ण नाथपंथी होते यात कुणाचेही दुमत असायला नको.प्रत्यक्ष नाथांचे आद्यस्थान असलेल्या वृद्धेश्वरावर महाराजांचे अतिव प्रेम होते.याच ठिकाणी महाराजांनी आपल्या अतिशय लाडक्या शिष्यास जी.के.प्रधान अर्थात बाबा प्रधानांना नाथपंथाची दिक्षा दिली होती.महाराजांचा सर्वत्र संचार असायचा.महाराजांना संपूर्ण जगात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाई याची प्रचिती एका भक्ताला आली होती.त्याने महाराजांसोबत संपूर्ण जगाचा प्रवास केला होता व तो महाराजांबरोबर जिथे जिथे गेला तिथे तिथे सर्व लोक महाराजांना एका विशिष्ट नावाने संबोधत होते व त्यांना अगदी चिरपरिचित व्यक्ती सारखे बोलत होते.महाराज ही त्यांच्या भाषेत अस्खलितपणे त्या लोकांशी वार्तालाभ करीत होते.त्यांना कुठे जॉन साहेब,कुठे बडे बाबा ,कुठे सुपड्या बाबा,कुठे म्हातारं बाबा इत्यादी वेगवेगळ्या नावाने लोक ओळखत होते.भारतात महाराजांनी विविध रुपात विविध नावाने लिला केल्या त्यात कुंवर स्वामी महाराज,सुपड्या बाबा,गौरी शंकर,खिचडी बाबा अशा अनेक नावाने त्यांना आजही ओळखले जाते.एक विशेष प्रसंग महाराजांच्या चरित्रात वाचायला मिळतो तो असा की एकदा महाराजांचे वय ओळखण्यासाठी डॉ धनेश्वरांनी त्यांच्या काही चाचण्या केल्या तर त्यात महाराजांचे वय १७० हून अधीक आले.महाराजांना या संबंधी ज्यावेळी डॉ धनेश्वरांनी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की "आम्ही बाजीराव पेशव्यांसोबत शनिवार वाड्यात जेवलो व त्यांच्या हातून दक्षिणाही घेतली." म्हणजे महाराजांचे नक्की वय काय होते हे कुणालाही माहिती नव्हते.अगदी वृद्धाला ही त्याच्या तारुण्यात महाराज एकाच वयात भेटले होते व तोच व्यक्ती वृद्ध झाल्यावर महाराज त्याला त्याच समान रुपात भेटल्याची नोंद आहे.हे अगदी अनाकलनीय आहे. महाराजांचा वाशिम ला झालेला संचार त्या भेटीत त्यांनी केलेल्या विलक्षण लिला ,नगर येथील लिला, सोलापूर येथील प्रसंग,नाशिक येथील प्रसंग ,पुण्यातील विलक्षण प्रसंग , मुंबई येथील प्रसंग सर्व एका लेखात कुणीही मांडूच शकणार नाही. एक एक प्रसंग व त्यामागे महाराजांनी दिलेली शिकवण ही अतिशय दिव्य आहे व तो एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे.या एका शब्दमर्यादा असलेल्या लेखात त्यावर चिंतन करणे शक्य नाही. मला भावलेले काही महत्त्वाचे व अतिशय चिंतनीय असे मुद्दे मी पुढे मांडतो.
महाराजांच्या अंतरंगातील शिष्य मंडळींमध्ये दोन M.B.BS. डॉक्टर होते एक म्हणजे आपल्या सर्वांचे परिचित असलेले डॉ धनेश्वर आणि दुसरे म्हणजे विदर्भातील वाशिम येथील डॉ खरे.या दोघांच्याही जिवनाचा जर विचार केला यांच्या जिवनातील घटनाक्रमावर चिंतन केलं तर आपण जे महाराजांचे भक्त म्हणवतो ते किती तोकडे आणि बाह्य दिखाव्याने लिप्त आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. डॉ धनेश्वरांचे सबंध चरित्र आपल्या सर्वांना सुपरिचित आहे.त्यांची महाराजांवर असलेली निष्काम,अहेतुकभक्ती , अनन्यसाधारण प्रेम सर्व काही विलक्षण आहे.एकदा महाराजांनी डॉ धनेश्वर यांना काहीतरी मागायला सांगितले होते.यावर डॉक्टरांनी काय मागावे?तर डॉ धनेश्वरांनी मागितले, ,"तुम्ही मला आपलं म्हणा." इतकी अतुट निष्ठा ,अनन्यता इतरत्र नाहीच.महाराजांनी डॉक्टरांना नगरला दवाखाना टाकून दिला होता.पण एक अट घातली होती की कुणाकडून ही स्वतः तपासणी करण्याचे पैसे मागावयाचे नाही आणि महाराजांवरील डॉक्टरांची भक्ती बघा त्यांनी आजिवन कुणाकडूनही एक रुपाया ही स्वतः मागितला नाही. महाराजांनी डॉ धनेश्वरांना कुठल्याही बॅंकेत खाते न उघडण्याची व एक पैसा ही मागे न साठवण्याची आज्ञा केली होती.प.पू.डॉक्टरांनी ही आज्ञा आजिवन तंतोतंत पाळली.अहो ही तर भक्तीची ,निष्ठेची पराकाष्ठा.हेच डॉ.खरेंच्या ही जिवनात झाले होते.डॉक्टर खरेंना बाबांनी जिवनात कधीही स्वतः चे घर बांधायचे नाही ही आज्ञा दिली होती.गुरु वचनावर काय निष्ठा असावी एखाद्याची! वाशिमचे डॉ खरे हे पहिले गोल्ड मेडलीस्ट M B.B.S डॉक्टर पण ते आजीवन महाराजांच्या शब्दाबाहेर गेले नाहीत .ते अखेर पर्यंत भाड्याच्या घरात राहिले. एवढी गुरुनिष्ठा ,एवढा त्याग आणि एवढी अनन्यता महाराजांना अभिप्रेत आहे.महाराजांच्या अंतरंगातील सर्व शिष्य मंडळींच्या जिवनावर जर चिंतन केले तर आज महाराजांच्या नावावर सुरु असलेले सिगारेट ,वार्या, संचार, गाद्यांचे खेळ किती किळसवाणे आहेत याची कल्पना येईल.आपले नशिब थोर की ते आपल्या सोबत सध्या देहात वावरत नाही.नाहीतर त्यांनी प्रत्येकाला चाबकाने बडवून काढले असते.आजिवन कधीही कुणालाही महाराजांनी फुकट काही दिलं नाही.ढेकणे मामांच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं पण महाराजांनी कधीही त्यांना लॉटरी लावून दिली नाही आणि मोठी गोष्ट म्हणजे ढेकणे मामा-मामांनी कधीही त्याची अपेक्षा महाराजांकडून केली नाही.कारण त्यांचे महाराजांवर शुद्ध प्रेम होते.महाराजांच्या चरणी त्यांची अनन्य निष्ठा होती.इथे कबुली बाबा, रावसाहेब मेहेंदळे,ताईसाहेब मेहेंदळे ,जणू काका,मधू बुवा,कोराड मास्तर ,जक्कलजी,भस्मे काका,फुलारी काका असे असंख्य मंडळी आहेत ज्यांची निष्ठा,प्रेम आणि महाराजांसाठी केलेला त्याग हा एक मैलाचा दगड आहे.प्रत्येकाबद्दल इथे आज तरी लिहीने शक्य नाही.पण वरील दोन प्रसंगातुन आपल्याला निदान आपला मार्ग कोणता आणि आपण कुठल्या मार्गावर जातोय याचे भान येईल.
महाराजांनी लौकिक रित्या आपल्या देहाचा त्याग आजच्याच दिवशी ,आजच्याच तिथीला वैशाख शुद्ध अष्टमी दिनी ढेकणे मामांच्या घरी केला. त्याची सविस्तर पोस्ट आज पुष्कळ ठिकाणी पोचली आहे.बहूतेकांनी ती वाचली असेल असे मी समजतो.लौकिक रित्या महाराजांनी देह ठेवला तेव्हा महर्षी न्यायरत्न विनोद यांना जेष्ठ साधकांनी बोलावले आणि त्यावेळी त्यांच्याद्वारे महाराजांनी सर्वांना एक महत्वाचा संदेश दिला तो असा की, 'आत्मकलेपैकी एक कला, जगकल्याणासाठी समाधी स्थानात सदैव राहील.' सद्गुरु शंकर महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांच्या दर्शनासाठी सद्गुरु श्रीबिडकर महाराजांचे पट्टशिष्य सद्गुरु श्री बाबा महाराज सहस्रबुद्धे हे आले होते. त्यावेळी महाराजांनी त्यांच्या हातून तुलसी दल आणि गंगाजल घेतले व 'आता आम्ही येतो' असे म्हटले. त्यांना निरोप देऊन महाराज पुन्हा समाधिस्थ झाले.महाराजांनी आपल्या काही भक्तांना समाधीस्थळी देहासोबत ठेवण्याकरिता भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे निर्माल्य, पुण्यातील ओंकारेश्वर येथील निर्माल्य,सासवडचे सोपान काकांच्या समाधीचे निर्माल्य आणि सयाजीराव माळी महाराज यांचे निर्माल्य आणायला सांगितले होते.देह ठेवल्यावरही महाराजांच्या लिला सुरुच होत्या.महाराजांनी पुणे सातारा रोडवरील एका विशिष्ट ठिकाणी आपल्या देहाला समाधी देण्याची आज्ञा भक्तांना केली होती.ज्यावेळी महाराजांना समाधी देण्यासाठी चर खोदण्यात आला व देह ठेवला गेला त्यावेळी महाराजांसाठी योग्य माप घेऊनही ती जागा आखुड पडत असे.हा प्रकार खुप वेळ झाला ,भक्तांना काय करावे सुचेना.त्यावेळी काही जेष्ठ भक्तांनी सद्गुरु सयाजीराव माळी महाराजांचे चिरंजीव सद्गुरु श्री मारोती महाराज माळी यांना बोलावून आणले.मारोती महाराजांनी शंकर महाराजांना प्रार्थना केली त्यामुळे महाराजांनी आपला देह पवनपुत्र मारोतीरायांसमान फुगवला,मारोतीरायांसारखे ते दिसु लागले आणि "आपण नित्य चिरंजीव आहोत,समाधी नंतरही आपण भक्तांसाठी येथेच आहोत " ही प्रचिती दिली.
सद्गुरु शंकर बाबांनी देह ठेवल्यावर अगाध अशा लिला केल्या आहेत.त्यातील काही मुद्दाम आज इथे देतो ज्यायोगी एक गोष्ट लक्षात येईल की समाधी ही फक्त लिला आहे ,शुद्ध अंतःकरण आणि निश्चल प्रेम महाराजांना अति प्रिय आहे.त्यासाठी ते प्रत्यक्षात आजही भक्तांना भेटतात. सन. १९५९ शनिवार जुलै दिनांक ४ ला शिवरात्रीला मिरजेचे पंडित यांच्या घरी रात्री अकरा वाजता महाराज प्रत्यक्ष प्रगटून गादीवरती निजले होते. दोन्ही लोडावर दोन हात ठेवून पाय तिरपे लांबविले होते. तसाच महाराजांचा फोटो काढला होता. आजही तो पहावयास मिळतो. समाधीनंतर बारा वर्षांनी हा प्रसंग घडला होता. तसाच एक अलौकिक प्रसंग महाराजांनी समाधी घेतल्याच्या २१ वर्षांनी घडला होता. श्रीशंकर महाराजांनी भक्त वाघोडकर यांना १९४५ साली "मी २१ वर्षांनी तुझ्या घरी येईल " असे सांगितले होते. पण १९४७ ला समाधी घेतल्यावर वाघोडकरांना आता हे शक्य नाही असे वाटले.पण १९६६ साली महाराज स्वतः सगुण देहाने त्यांच्या घरी गेले. वाघोडकरांच्या घरी १९६६ ला महाराज गेले ,त्यांच्या घरी राहिले .नंतर महाराजांचे शिष्य ज्यांना महाराजांनी रावेर ला राहून गौरीशंकर महाराजांची सेवा करण्याची आज्ञा केली होती त्यांच्या सोबत रावेरला गेले.तिथे दोन दिवस राहिले.पुरण पोळीचा पावनचार घेतला व अण्णा महाराजांचे चिरंजीव अनंतराव यांच्यासोबत मुलुंड मुंबई येथे गेले.तेथे साखरपुड्यात ते तिन दिवस होते.तिथेच महाराजांचा खुर्चीवर बसवून एक फोटो घेतला होता. तो फोटो आजही आपल्याला बघायला मिळतो.अण्णा महाराजांनी शंकर बाबा निघाल्यावर विचारले "आता कुठे जाणार?" तर महाराज म्हणाले , "काशीला जातो!" एवढे बोलून ते निघून गेले ( वाघोडकरांचा प्रसंग बराच विस्तृत आहे तो इथे मुद्दाम टाळला आहे.) हे सर्व घडले ते समाधी नंतर.असे अनेकाविध लिला महाराजांच्या आजही सुरु आहेत.आजही कुठेतरी त्यांचे सगुण रुपाने कार्य सुरुच आहे,आजही महाराज सर्वत्र भ्रमण करतच आहेत यात शंका नाही.आज आपल्याला महाराज दिसतात ते अडचणी सोडवणारा बाबा म्हणून ,पाच गुरुवार एक नारळ आणि लाल गुलाब नेले की काम करणारे संत म्हणून पण खरंच महाराज तशा प्रकारचे संत आहेत का??? हा आज खरा चिंतनीय विषय आहे.महाराजांनी कृपा केलेल्या भक्तांचे चरित्र जरी आपण बघीतले तरी त्यांना अपेक्षित असलेल्या परमार्थाची वाट गवसल्याशिवाय राहणार नाही.श्री बाबांच्या चरित्रात अनेक विलक्षण चमत्कार आपण वाचले असतीलच.पण महाराजांनी आपल्या कृपा अनुग्रहाची किल्ली प्रत्येकाच्याच हातात दिली नाही.अगदी ठराविक आणि मोजकेच शिष्य महाराजांच्या खर्या स्वरुपाला ,त्यांच्या मार्गावर चालण्याच्या तयारीचे होते.आपल्याला ही त्या मार्गावर कधीतरी चालण्याची सद्बुद्धी द्यावी,कधीतरी आपल्याही मनात शुद्ध प्रेमाची ,अनन्य शरणागतीचा भाव त्यांनीच उत्पन्न करावा हेच मागणे त्यांच्या सुकोमल चरणी मागतो आणि आज हे जे काही धारिष्ट्य केलंय त्याबद्दल क्षमा मागतो.मित्रांच्या लोभामुळे, आग्रहामुळे लिहावं लागलं तरी माउलींच्या ज्ञानदेवीतील पुढील ओव्या यांचाच मला आधार होता.त्याच ओव्यांचे स्मरण करुन या लेखाला विराम देतो.
"नातरी बालक बोबडा बोलीं । का वांकुडा विचुका पाउलीं । ते चोज करूनि माउली । रिझे जेवीं ।।"
"बाळक बापाचिये ताटीं रिगे । रिगोनि बापातेंच जेवऊं लागे । कीं तो संतोषलेनि वेगें । मुखचि वोडवी ।।१५।। तैसा मी जरी तुम्हांप्रती । चावटी करितसें बाळमती । तरी तुम्ही तोषिजे ऐसी जाती । प्रेमाचिया ।।१६।।"
"म्हणऊनि मज लेंकुरवाचेनि बोलें । तुमचें कृपाळूपण निदैलें । तें चेइलें हे जी जाणवलें । यालागीं बोलिलों मी ।।"
✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

