Friday, May 13, 2022

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् सद्गुरु लोकनाथतिर्थ स्वामी महाराज 🌺🌸🙏🚩

 

                    श्रीलोकनाथाय_नमो_नमः ।।

शक्तिपाताचार्य_परमहंस_परिव्राजकाचार्य_श्रीमद_लोकनाथतिर्थ_स्वामी_महाराज_यांची_१३१वी_जयंती🙏🌸🌺


अखंडानंद रुपाय चिदानंदात्मरूपिणे ।

चिन्मयानंदरूपाय श्रीलोकनाथाय नमो नमः ।।

                              अलौकिक,दिव्य आणि विहंगम प्राचीन अशा शक्तिपात योग परंपरेच्या गंगेला हिंदूस्थानातील दक्षिणेकडे प्रवाहीत करणारे महायोगी शक्तिपाताचार्य परमहंस परिव्राजकाचार्य योगीराज समर्थ सद्गुरु श्री लोकनाथ तिर्थ स्वामी महाराज यांची आज १३१ वी जयंती.श्रीस्वामी महाराज हे एक विलक्षण महापुरुष,योगीराज श्री गुळवणी महाराज यांच्याकडे शक्तिपातयोग परंपरेची एक शाखा श्री स्वामी महाराजांकडून आलेली आहे.श्रीगुळवणी महाराज हे श्री स्वामी महाराजांना आपल्या गुरुस्थानीच मानत.प.पू.श्री स्वामी महाराजांचा जन्म हा ८ मे १८९१ रोजी वैशाख शुद्ध द्वादशी या तिथीला ढाका यथील चक्रवर्ती घराण्यात झाला.श्री स्वामी महाराजांचा परिवार हे ढाका येथील शक्तिपिठ असलेल्या ढाकेश्वरीचे परंपरागत पुजारी होते. श्री स्वामी महाराजांचे पाळण्यातील नाव हे योगेश्वरचंद्र असे ठेवण्यात आले.अतिशय तेजस्वी,देखने असणारे हे बालक भगवती श्रीढाकेश्वरीच्याच कृपेने शुक्लपक्षीच्या चंद्राप्रमाणे वाढू लागले ,तिच्याच मंदिरात खेळत बागडत असे,तासंतास भगवतीची पुजा पहात असे.ढाकेश्वरीच्या मंदिरात होणाऱ्या किर्तन, भजन,प्रवचनात हे बाळ रंगुन जात असे.शालेय शिक्षणात योगेश्वरचंद्र अतिशय तल्लख होते.शाळेत त्यांच्या तल्लख बुद्धीमत्तेमुळे ते बरेच प्रसिद्ध होते.पण वयाच्या अकरा-बारा वर्षी योगेश्वरांच्या जिवनात एक अतिशय दु:खद घटना घडली जिने त्यांच्या संपूर्ण जिवनालाच कलाटणी मिळाली.योगेश्वरांचे वडिल बाबुजी हे वयाच्या ३२-३३ व्या वर्षी देवाघरी गेले.संपूर्ण घरावरील छत्रच जणू हिरावून गेले.त्यावेळी योगेश्वरचंद्र पाचवी इयत्तेत शिकत होते.अचानक आलेल्या या आपत्तीमुळे त्यांना आपले‌ शालेय शिक्षण सोडून नोकरी पत्करावी लागली.ते एका तागाच्या गिरणीत कारकुनची नोकरी करु लागले.संकटांची श्रृंखला एकापाठोपाठ सुरुच होती पण त्याचा वेगळाच परिणाम योगेश्वरांच्या मनावर झाला.ते यामुळे जास्तितजास्त अंतर्मुख होऊ लागले.त्यांना आता भगवती विश्वजननी जगदंबेच्या दर्शनाची ओढ लागली होती.ते अगदी व्यथित होऊन, कळकळीने, अश्रुपूर्ण नेत्रांनी भगवतीला प्रार्थना करीत, "आई मला रस्ता दाखव! पुढे घेऊन जाणार्यांची भेट करुन दे ! मला या सर्वातून मुक्त कर.आई ! तुझ्याशिवाय मला कुणाचाही आधार नाही.कुणाचाही भरोसा नाही.!!" योगेश्वरांच्या मनाची ही अवस्था त्यांच्या मातोश्रींना ठाऊक होती.बालपणापासून त्यांची अंतर्मुख वृत्ती त्यांना माहित असल्यामुळे त्यांना कल्पना होती की कधीतरी हा आपल्याला सोडुन जाणार आहे. एक दिवस रात्री त्यांना देवीचा दृष्टांत झाला.त्यांना सद्गुरुंकडे जाण्याचा मार्ग दाखविला,गावाच्या ,घराच्या खुणा दाखविल्या आणि एका व्यक्तिचे दर्शन ही दिले.योगेश्वर त्यावेळी २१ वर्षांचे होते.दृष्टांत झाल्याबरोबर ते झोपेतून उठले जगदंबेच्या चरणी साष्टांग दंडवत घातला व त्यांनी तात्काळ सद्गुरु प्राप्तीसाठी गृहत्याग केला.

                                  लवकर त्यांची भेट श्रीमदात्मानंद ब्रह्मचारी यांच्याशी झाली. हे श्रीमदात्मानंद दुसरे तिसरे कुणी नसून प.प.शंकरपुरुषोत्तमतिर्थ स्वामी महाराज होते.त्यांचे‌ वर त्यावेळी २२ वर्षांचे होते.एवढ्या कमी वयात ही श्रीशंकर पुरुषोत्तम स्वामी महाराजांना आपल्या सद्गुरु श्री नारायणतिर्थ स्वामी महाराजांकडून दिक्षा देण्याचे परंपरेचे अधिकार मिळाले होते यावरुन त्यांच्या विलक्षण अधिकाराची कल्पनाच आपण करु शकतो.योगेश्वरचंद्रांनी श्रीशंकरपुरुषोत्तमतिर्थ स्वामी महाराजांची खुप सेवा केली.त्यांची अविश्रांत सेवा पाहून श्रीशंकर पुरुषोत्तम महाराजांच्या मनाला संतोष झाला.श्रीयोगेश्वरांनी श्री गुरुदेव शंकरपुरुषोत्तमतीर्थांना एकदा दिक्षेसंबंधी विचारणा केली तेव्हा त्यांनी स्पष्ट म्हटले की, "आजन्म नैष्टिक ब्रह्मचारी रहाण्याची तयारी असेल तर दीक्षेचा विचार करता येईल." योगेश्वरांनी लगेच होकार दिला. काही काळाने श्रीगुरुदेवांनी योगेश्वरांना नैष्ठिक ब्रह्मचर्याची दिक्षा दिली व त्यांचे नाव "ब्रह्मचारी योगेशचंद्र प्रकाश" असे ठेवले. श्रीशंकर पुरुषोत्तमतीर्थ या आपल्या नव्या ब्रह्मचारी शिष्याला घेऊन आपल्या सद्गुरु श्री नारायणतीर्थदेवांकडे आले.श्रीनारायणतिर्थदेवांना ब्रह्मचारी योगेशचंद्रांना बघुन खुप समाधान वाटले.काही काळतच श्री गुरुदेव शंकरपुरुषोत्तमतीर्थांनी योगेश्वरांना शक्तिपात दिक्षा देऊन कृतार्थ केले.आपले गुरु श्रीशंकर पुरुषोत्तम तिर्थ आणि परमगुरु श्रीनारायणतीर्थ देवांच्या प्रत्यक्ष सहवासाने , मार्गदर्शनाने आणि कृपेने श्री योगेशचंद्रांचे जिवनच उजळून निघाले. श्रीनारायणतिर्थदेवांची सेवा ,आश्रमातील कामे ,स्वैपाक अशी सर्व सेवा योगेश चंद्र करु लागले.पुढील दोन वर्षांच्या काळात योगेशचंद्रांनी आपल्या परमगुरु आणि गुरुंच्या मार्गदर्शनाखाली कठोर सेवा ,साधना केली.यानंतर योगेशचंद्र आपल्या आईला भेटायला ढाक्याला घरी आले.आईने आनंदाने योगेश्वरांना या‌ प्रकारचे दिव्य अध्यात्मिक जिवन जगण्याची,संन्यास घेण्याची परवानगी दिली‌. यावेळी त्यांचे‌ वय जेमतेम २२/२३ असेल.ढाक्यातील श्रीत्रिपुरलिंगसरस्वती यांच्या मठात श्रीशंकर पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज व योगेश्वर हे मुक्कामी होते.योगेश्वरांंची गुरुभक्ती ,विरक्ती आणि परमार्थाची तळमळ बघून त्रिपुरलिंगसरस्वती स्वामी त्यांच्यावर अतिशय खुश होते.पुढे श्री शंकरपुरुषोत्तमतीर्थांनी श्रीत्रिपुरलिंगांना योगेश्वरला संन्यास दिक्षा देण्याची प्रार्थना केली. पुढे काही काळाने एक सुमुहूर्त बघून त्रिपुरलिंगसरस्वती स्वामी महाराजांनी योगेश्वरांना संन्यास दिक्षा दिली व ते आता "स्वामी चिन्मयानंद सरस्वती झाले." इतक्या कमी वयात योगेश्वरचंद्र संन्यास आश्वमात प्रवेश करते झाले. एक विशेष म्हणजे याच वर्षी इ.स.१९१४ ला गरुडेश्वरी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज समाधिस्थ झाले आणि इकडे याच वर्षी श्रीयोगेश्वरांनी संन्यास दिक्षा घेतली.यानंतर स्वामी महाराज काही काळ बंगालमध्ये राहले पण कही घडामोडी घडल्या व स्वामी महाराज आपल्या सद्गुरु श्री शंकरपुरुषोत्तमतीर्थांकडे काशीला निघून आले. ( खुप विस्तार नको म्हणून बहूतेक प्रसंग गाळतो आहे ) पुढे १९२० पर्यंत स्वामी महाराज आपल्या गुरुदेवांचे जवळ काशीत राहिले.याच काळात ते अनेकवेळा हिमालयात यात्रेला, साधनेला जाऊन आले.पुढे स्वामी महाराज हिमालयातील टिहरी गढवाल भागात दिड-दोन वर्षापर्यंत एकांतात साधना मग्न राहिले.याकाळात ते कुठे राहिले ,त्यांनी कसला आहार घेतला ,त्यांचा दिनक्रम काय होता या बाबतीत कसलीही माहिती उपलब्ध नाही. एक दिवशी साधना सुरु असतांना भगवतीचा स्पष्ट आदेश स्वामींना झाला की , "दक्षिणेकडे चल." स्वामींनी याकडे दुर्लक्ष केलं तर दुसरे दिवशी ,तिसरे दिवशी तोच आदेश परत आला तेव्हा स्वामींना कळून चुकले की भगवतीची इच्छा आपण दक्षिणेकडे जाण्याची आहे आणि ते दक्षिणेकडे निघाले.पुढे एक चातुर्मास संदर्भ मध्ये झाला.चातुर्मास झाल्यावर आता दक्षिणेकडे जायचे कुठे या चिंतनात असतांनाच स्वामींना स्पष्ट आदेश झाला की, अजून दक्षिणेत जा.दक्षिण दिशा ही तुझी कर्मभूमी आहे.तुझ्याकडून माझा प्रचार दक्षिणेकडे होणार आहे.तुझे परमगुरु श्रीनारायणतिर्थांना मी आशिर्वाद दिला आहे.तुझ्या हातात हा स्फुल्लिंग बांधला आहे.याचा प्रचार सर्वत्र होणार आहे.तुला हेच कार्य करायचे आहे.चल! अजून दक्षिणेकडे चल! येथे थांबून नको!." हा स्पष्ट आदेश मिळाल्यावर स्वामी महाराज आनौदित झाले.ते आसनावरुन उठले दंड-कमंडलू घेतला व तडक गुहेबाहेर आले.दक्षिणेकडे निघण्यासाठी हथरस स्टेशनवर आले.जवळ पैसे नव्हते .तेवढ्यात एक धनिक यात्रीक आला व त्याने स्वामींना होशंगाबादचे तिकीट काढून दिले.

                 स्वामी आता भगवती माॅं नर्मदेच्या काठी आले होते.तेथे पोचल्यावर एका भुताटकी असलेल्या धर्मशाळेत काही नतद्रष्टांनी स्वामींना राहण्यास पाठविले पण स्व:सामर्थ्याने स्वामींनी तेथील भूत-पिशाच्यांना क्षणार्धात बंधन करुन मुक्ति दिली.स्वामी तिथे मंगळवार घाटावर राहू लागले.येथेच काही काळाने त्यांची आपल्या परमशिष्याशी म्हणजेच योगीराज श्री गुळवणी महाराजांशी भेट झाली.( श्रीगुळवणी महाराजांची व स्वामी महाराजांची भेट होण्याआधी पुष्कळ घडामोडी घडल्या होत्या.श्रीगुळवणी महाराज होशंगाबादेत कसे आले व त्यांची भेट कधी झाली हा मोठा प्रसंग आहे तो इथे देह नाही त्याबद्दल क्षमस्व) तिथेच नारायण प्रसाद यांना स्वामींनी पहिली दिक्षा दिली.त्यांना आलेल्या दिव्य अनुभवानंतर त्यांचे जवळचे‌ मित्र ही स्वामींकडे जिज्ञासेने येऊ लागले.पुढे श्री गुळवणी महाराज ,शंकरशास्त्री आजेगावकर ,वैद्य मास्तर रोज स्वामींजींकडे जाऊ लागले.श्रीगुळवणी महाराज स्वामीजींचे सुक्ष्म निरीक्षण करीत असत.हळूहळू स्वामीजींच्या शक्तीची ,वैराग्याची प्रचिती सर्वांना येऊ लागली.काहीकाळाने स्वामींचे स्वास्थ ठिक नव्हते.श्रीस्वामीजींना आराम मिळावा म्हणून श्री गुळवणी महाराज त्यांना घेऊन आपल्या घरी आले.उमा मातोश्रींचीही तिचं इच्छा होती.काही दिवसांनंतर स्वामीजींचे स्वास्थ्य ठिक झाले.ते रोज गुळवणी महाराजांचे साधन , पुजा,पोथी वाचन ,आसन,प्राणायाम बघू लागले व त्यांना त्याचे अतिशय समाधान लाभले.

एक दिवशी‌ श्री गुळवणी महाराजांना ब्रह्मीभूत टेंबे स्वामी महाराज यांचा दृष्टांत झाला व "मी आणि चिन्मयानंद एकच आहोत.ही विद्या दत्त संप्रदायाचीच आहे.तुझ्याकडून अजुन खुप कार्य व्हायचे आहे ."अशी स्पष्ट सुचनाच महाराजांना मिळाली.याच साली इ.स १९२० ला श्री गुळवणी महाराजांना स्वामींकडून शक्तीपात दिक्षा प्राप्त झाली व उत्तरेकडील ही गंगा आता खर्या अर्थाने दक्षिणेकडे आली. त्यानंतर श्रीस्वामी महाराज ,गुळवणी महाराज, मातोश्री उमादेवी व इतर लोकांनी छोटेखानी तिर्थयात्रा केली‌.सर्वजन परत महाराष्टात परतले व श्रीस्वामी महाराज त्यानंतर एक वर्ष होशंगाबाद येथे राहिले.श्रीगुळवणी महाराजांनी स्वामी महाराजांना बार्शीला येण्याची प्रार्थना केली व त्यांच्यावरील अपार प्रेमापोटी स्वामी महाराज बार्शीला आले ही. श्रीस्वामी महाराजांनी लवकरच श्री गुळवणी महाराजांना दिक्षा देण्याचे अधिकार दिले‌ व स्वामींकडे दिक्षेसाठी आलेल्या गोपीकाबाई यांना श्रीगुळवणी महाराजांना दिक्षा देण्याची आज्ञा दिली. त्या दरम्यान स्वामींचा आपल्या गुरुदेवांशी पत्रव्यवहार चालुच होता.पुढे स्वामी उज्जैन ला गेले. काही काळानंतर श्री स्वामी महाराजांना आपल्या सद्गुरु श्री शंकरपुरुषोत्तमतीर्थांकडून दंड दिक्षा मिळावी व त्यांचे नाव "लोकनाथतिर्थ "असे ठेवले गेले. याच कालावधीत इकडे महाराष्ट्रात श्री गुळवणी महाराजांच्या जिवनात बर्याच घडामोडी घडल्या.श्रीमहाराज हे पुण्यात स्थलांतरित झाले. दण्डधारण केल्यावर १९२८ साली स्वामी जी प्रथमच पुण्यास आले. श्री गुळवणी महाराजांनी त्यांना प्रथमच आपल्या गोवईकर चाळीत आणले. यानंतर स्वामींनी नाना भालेराव वैगेरे मंडळींना दिक्षा दिली.याकालात स्वामींचे उत्तर भारतात व महाराष्ट्रात सतत प्रवास होऊ लागला.यादरम्यान त्यांनी अनेक मुर्मुक्षू जिवांना दिक्षा देऊन कृतार्थ केले‌.या प्रवासात ,मुक्कामात श्री स्वामी महाराजांंनी केलेला पत्रव्यवहार अतिशय चिंतनीय असा आहे.स्वामी महाराजांची साधने प्रती असलेली श्रद्धा विलक्षण आहे.श्रीस्वामी महाराज श्री गुळवणी महाराजांसोबत ज्यावेळी पंढरपूर ला ,पैठण ला जाऊन आले तेव्हापासून त्यांच्या मनात महाराष्ट्रातील संतांचे साहित्य वाचण्याची ओढ निर्माण झाली.त्यामुळे मराठी चा अभ्यास नसतांनाही त्यांनी तुकाराम गाथा,दासबोध , ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत वाचले.त्यांना समर्थकांवर विशेष प्रेम होते‌ .तसेच तुकोबांच्या गाथ्यातील अभंगही ते म्हणून दाखवीत.त्याच्या पत्रातून अनेक ठिकाणी त्यांनी दासबोधातील वचने‌ वापरली आहेत.त्यांच्याकडे कुणी मार्गदर्शन घेण्यास आले तर ते म्हणत असत, "महाराष्ट्रात किती मोठे मोठे संत होऊन गेले.त्या सर्व संतांनी सर्व रहस्य अत्यंत रसाळ ,सरळ व सोप्या भाषेत स्पष्ट करुन सांगितले आहे.यांचे ग्रंथ वाचले तर लक्षात येईल की,या संतांनी 'ब्रह्मज्ञान' लोण्याच्या गोळ्या प्रमाणे वेगळे काढून दिले आहे.या संतांचे ग्रंथ वाचा म्हणजे काय करायचे ते सर्वकाही समजेल.त्यापेक्षा अधिक मी काय सांगणार? परंतु मनुष्याचा स्वभावच असा आहे की ,त्याला जवळच्या वस्तूची किंमत नसते.अतिपरिचयामुळे त्याला त्यांचे महत्वही समजत नाही.तसे तुम्हा महाराष्ट्रीयांचे झाले आहे." इतकं विलक्षण प्रेम त्यांचे महाराष्ट्रातील संत परंपरेवर होते. श्री स्वामी महाराज नेहमी एक गोष्ट बोलायचे , "मुझे दल बढाना नही है" म्हणजे मला दिक्षा वाटत लोकं शिष्य म्हणून वाढवायचे नाहीत तर इथे फक्त खरे मुर्मुक्षू लागतात त्यांनाच आजिवन स्वामींनी दिक्षा पूर्वक कृपा प्रसाद दिलाय.स्वामींची शास्त्रांवर नितांत श्रद्धा होती ते काटेकोरपणे शास्त्राचे पालन करीत.त्यांना शास्त्रविरोधी वर्तन केलेले अजिबात आवडत नसे.शक्तिपात दिक्षा देण्यासही ते अतिशय कडक होते.ते उठसूठ कुणालाही दिक्षा देत नसत.आधी ब्राह्मण असला तर सव्वा लाख गायत्री जप आणि इतरांना इष्ट‌ देवतांचा लक्ष जप आणि नंतर मग ते दिक्षेचा विचार करीत असत.ते नेहमी म्हणत , "दिक्षा ये लेणे देने की नही होणे पाने की बात है." आज शक्तीपाताच्या नावाखाली सुरु असलेला भोंगळ कारभार बघितला तर मतीच गुंग होते.लोकांचे दिक्षेचे पॅकेजस आहेत ,कुणी जगदंबेची इच्छा म्हणून ग्लोबल दिक्षा देत सुटलय तर रोज गल्ली बोळातून नवा दिक्षा अधिकारी गुरु समोर येत आहे.पण प्रत्यक्षात ज्यांनी ही परंपरा महाराष्ट्रात सर्वदूर पोचवली त्यांची या सर्वांबद्दल असलेली अनास्था व या सर्वावरील विचार जर अभ्यासले तर चक्रायला होतं.असो हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे तो आज तरी टाळूयात.

                                   या काळादरम्यान स्वामी काशीस गेले ,पुन्हा एकदा टिहरीला गेले.वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास ,दिक्षा असे अनेक प्रसंग चरित्रात येतात.श्री स्वामींनी आपल्या सद्गुरुंनी दिलेलं उत्तराधीकारीपद ही विनम्रतेने नाकारले.त्यानंतर स्वामीजी पश्चिम भारताच्या यात्रेला जाऊन आले. या दरम्यान अनेक लिला स्वामी चरित्रात घडल्या आहेत पण शब्द मर्यादेमुळे तो भाग सर्वच इथे मांडता येणार नाही.स्वामीं महाराजांचे पत्र , त्यांनी शिष्यांना केलेला उपदेश , त्यांचे निस्पृह जिवन आणि अखंड अंतर्मुख वृत्ती आपल्या सर्वांना नित्य मार्गदर्शक आहे.आपल्या सद्गुरुंनी ज्यावेळी स्वामी महाराजांना उत्तराधिकारी पद देण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी विनम्रपूर्वक ,ठामपणे स्वामी महाराज म्हणाले होते की, "गुरुदेव! आपल्या आशिर्वादाने आजपर्यंत खूप काही मिळविले आहे.त्याच आधारावर सांगतो की ,मी आपल्या आधी हे शरीर सोडून जाणार आहे.तेव्हा आपल्या देशात,आपल्यापुढे मी सिंहासनावर बसने योग्य नाही.क्षमा असावी." तसेच आधी एकदा स्वामींनी सांगून ठेवले होते मी कुठेही प्रवास केला तरी मी काशीतच देह ठेवणार. श्री स्वामींच्या चरित्रात एक अमुल्य शिष्य रत्न आहे ते म्हणजे जांबुवंत .यांनी केलेली गुरुसेवा ही एक मैलाच दगडच आहे. तो सर्वांनी जरुर वाचावा. इ.स १९५५ उजाडले.श्री स्वामी महाराजांची प्रकृती क्षिण होतं होती.ते दोन महिने झाले अंथरुणाला खिळून होते.रविवारी ६ फेब्रुवारी ला स्वामींनी जांबुवंत आणि पंडित लक्ष्मण शास्त्रींना एकांतात बोलवले व आपण आता देह ठेवणार आहोत तर त्यानंतर कुठले विधी करायचे ,कसे करायचे याची संपूर्ण माहिती दिली. आपल्या देहाला एका दगडी पेटीत ठेवून गंगेत विसर्जन करा,कपालक्रिया करा,खाली मातेची कृपा म्हणून हा आश्रम सफल झाला म्हणून ५४ कुमारीकांना जेऊ घाला,त्यांना वस्त्र जेवन,दक्षिणा द्या,माझ्या सद्गुरु आश्रमात सर्वांना जेवन द्या,१४ ब्राह्मण ,१४ संन्यासी जनांना जेवन द्या शेवटी माझी सर्व उत्तरक्रिया महाराष्ट्रीय ब्राह्मणाकडून करा कारण मी गेल्या जन्मी महाराष्ट्रीयन ब्राह्मण होतो. पुढे ८ तारखेला मंगळवारी श्री स्वामी महाराजांची प्रकृती बिघडली.बुधवारी अतिशय अशक्तता जाणवली.स्वामींनी क्षिण आवाजात गंगाजल‌ मागविले.मुखमार्जन करण्यास सांगितले,स्नान घातले,बिछाना साफ करण्यास सांगितले.भस्मलेपन केले.संध्येसाठी आचमन केले‌.कसेतरी बसून अर्ध्यदान केले.नंतर स्वामी पडुन राहिले.रात्री ११ वाजता स्वामींनी उठवून बसविण्यास सांगितले.स्वामींनी सिद्धासनाप्रमाणे मांड्या वळविल्या.हात गुडघ्यावर ठेवले .मागे तक्क्या ठेवला.स्वामींनी पुन्हा गंगाजल मागितले.भस्म लावण्यास सांगितले.रुद्राक्षमाळा गळ्यात नव्हती ती घालण्यास सांगितले.भक्ताला‌ दार लोटण्याची क्षिण आवाजात आज्ञा केली‌.सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले.रात्री ठिक बारा वाजता आतून "ॐ" प्रणवाचा उच्चार ऐकू आला.सर्वांना बरे‌ वाटले ‌दुसर्यांदा आवाज आला तर तो क्षिण होता आणि तिसर्यांदा केलेला उच्चार बाहेर ऐकू आला नाही.येथेच स्वामी चिन्मय स्वरुपात विलीन झाले.पण कुणाला कळलेच नाही.अर्धा तास काही आवाज आला नाही.नंतर भक्तांना कळले की स्वामी चिन्मयानंदात विलीन झाले‌.अशा या आधुनिक ऋषी चा जिवन प्रवास संपूर्ण जगाला प्रकाशवाट दाखवून पुन्हा स्वगृही परतला.श्रीस्वामी महाराजांचे चरित्र संक्षिप्त मांडणे खरंच अतिशय कठिण काम आहे कारण प्रत्येक घटना ही आपल्याला मार्गदर्शक आहे ,प्रत्येक घटनेवर एक स्वतंत्र चिंतन करता येईल.प.प.श्रीमद लोकनाथतिर्थ स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की आपण दाखविलेल्या साधनेच्या मार्गावर अविरत , निरंतर चालण्याची बुद्धी आपल्या सर्वांना द्यावी व श्रीचरणांची सेवा करण्याची सद्बुद्धी द्यावी.इतके लिहून ही शब्द सुमनांजली स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करून श्रीचरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो. 🙏🌸🌺

    ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️



कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...