Monday, May 16, 2022

वैशाख पौर्णिमा शिव अवतार भगवान श्री गोरक्षनाथ यांची प्राकट्य तिथी🙏🌺🌸☘️🚩


भगवान_श्रीगोरक्षनाथप्रभुंचा_प्रगटदिन🌸🌺

                              
सिद्धानां च महासिद्ध ऋषीनांच ऋषीश्वर: ।
योगीनां चैव योगींद्र: श्रीगोरक्ष ! नमोस्तुऽते ।।

                    आज वैशाख शुद्ध पौर्णिमा.आज नाथपंथाचे आद्य प्रवर्तक,नाथ संप्रदायाचे इष्टदेव ,प्रचारक ,आराध्य, प्रत्यक्ष शिवावतार ,भगवान मच्छिंद्रनाथांचे हृदय, हटयोगाचे प्रधान आचार्य, महायोगी ,चिरंजीव ,परम गुरुभक्त असलेल्या भक्तवत्सल भगवान श्री गोरक्षनाथांचा प्रगटदिन...योगीराज भगवान श्रीगोरखनाथ प्रभुंच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌸🌺🌸🌼🌹🌿🍃☘️🍀🍂🍁💮

ज्या दिवशी भगवान शिव हे गोरक्षनाथ रुपात प्रगट झाले, त्याचे वर्णन श्रीगोरक्षनाथ कथामृत या ग्रंथात पुढील श्लोकात करण्यात आले आहे..तो श्लोक असा

*वैशाखी शिव पूर्णिमा तिथिवरे वारे शिवे मंगले |*
*लोकानुग्रह विग्रह: शिवगुरु गोरक्षनाथोSभवत ||*
*गोरक्षा चल गह्वरेअतिरुचीरे कैलाशशेला अधरे |*
*दिव्य द्वाद्श वार्षीकेण वपुषा वासा स्वयम ||*
*- गोरक्षअवतार कथामृत*

सत्ययुगाच्या प्रारंभी वैशाख पूर्णिमा मंगळवार या दिवशी
योगानुग्रह द्वारे, सकल लोकांचे ,मंगल करणारे,
सकल सिद्धांचे  गुरु साक्षात भगवान शिव कैलाश पर्वतावरील अधर देशात गोरक्षाचल पर्वताच्या एका गुफेत ,पद्मासन योगमुद्रा धारण केलेल्या,बारा वर्षाच्या बाल रूपात प्रकटले ,
आणि त्यांनी माता पार्वती चा भ्रम नष्ट करुन त्यांना योग मार्गाचे ज्ञान व दिक्षा दिली .यावरुन लक्षात येतं की भगवान गोरक्षनाथ हे चिरंजीव आहेत,अमरकाय योगपुरुष आहेत.चारही युगात भगवान गोरक्षनाथांचा अवातार झाला आहे व ते अखंड कार्यरत आहेत‌. नाथ संप्रदायात भगवान गोरक्षनाथांना भगवान आदिदेव शिवाचा पूर्ण अवतार मानले जाते त्यामुळे त्यांना "शिव गोरक्ष" असे ही संबोधले जाते. "महाकालयोगशास्त्र" या ग्रंथात भगवान शिवांनी मीच गोरक्षनाथ असल्याचे म्हटले आहे.विशेष बाब अशी की आपल्या महाराष्ट्रात नाथसंप्रदायाचा जो प्रचार आहे तो "श्रीमद्भागवत" या ग्रंथातील ११ व्या स्कंदात आलेल्या नव नारायणांच्या वर्णनानुसार झालेला आढळतो.हे नव नारायण आणि त्यांचे नवनाथ अवतार यांचे प्रसिद्ध आणि सर्वश्रुत वर्णन या ग्रंथात आलेले आहे पण यात भगवान गोरक्षनाथांचा उल्लेख नाही कारण हे नारायणाचा अवतार नसून प्रत्यक्ष शिवावतार आहेत. भगवान गोरक्षनाथ हे सत्ययुग,त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगात वेळोवेळी आपल्या दिव्य देहाने प्रकट होत आले आहेत.जोधपूरचे राजा श्रीमानसिंग हे आपल्या काळातील प्रसिद्ध नाथपंथी, त्यांनी आपल्या "श्रीनाथतीर्थावली" या ग्रंथात गोरक्षनाथांच्या चारही युगात अवतरीत होणारे संकेत श्लोक दिले आहेत.या सर्व युगात भगवान गोरक्षनाथांनी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी तपश्चर्या केली आहे.गुजरात, सौराष्ट्र,पंजाब,कर्नाटक,बंगाल आणि हिमालयातील काही भागात असलेली नाथांची योगपिठे भगवान गोरक्षनाथांच्या अफाट कार्याची व अवतार लिलांची जाणिव देतात. महासिद्धयोगी भगवान गोरक्षनाथांनी सत्ययुगात पंजाब मध्ये , त्रेतायुगात गोरखपूर ,द्वापारात श्रीक्षेत्र द्वारिका, आणि कलियुगात गुजरात मधील काठियावाड येथे तपश्चर्या केली व तो भाग पवित्र केला.महाराजा मानसिंग यांनी आपल्या "श्रीनाथतिर्थावली" या ग्रंथात गोरक्षनाथ व त्यांचे भ्रमण यावर सविस्तर प्रकाश टाकला आहे.काही ठिकाणी भगवान रामचंद्रप्रभू हे भगवान गोरक्षनाथांच्या भेटीला गेले होते असा उल्लेख केला आहे.तसेच भगवान कृष्णचंद्र प्रभु आणि रूक्मिणी मातोश्रींच्या विवाह प्रसंगी भगवान गोरक्षनाथ स्वतः हजर होते.द्वापारयुगात धर्मराज युधिष्ठिर यांनी राजसूय यज्ञाचे आयोजन केले होते आणि त्याचे आमंत्रण द्यायला गोरखपूर येथे पांडवविर भिमसेन यांना पाठविले गेले होते.त्यावेळी सिद्धमहायोगी भगवान गोरक्षनाथ हे समाधी मध्ये तल्लिन असल्यामुळे सेवकांनी त्यांना विश्राम करण्याचा आग्रह केला.भिमसेन हे तिथे काही दिवस मुक्कामी होते .त्यांच्या वजनाने जमिनीचा काही भाग दाबल्या गेला व तिथे एक सरोवर निर्माण झाले अशी एक आख्यायिका नाथ संप्रदायात फार प्रचलित आहे.आज सुद्धा गोरखपूर येथे या द
लिलेची आठवण म्हणून एक स्मारक बघायला मिळते.
खरंतर भगवान श्रीगोरक्षनाथांचे संक्षिप्त चरित्र लेखन हे कुणालाही शक्य नाही पण त्यांच्याच चरणी प्रार्थना करुन हे धाडस करतो आहे आणि त्याला कारण ही तसेच आहे.भगवान श्रीगोरक्षनाथ हे विलक्षण ,अनन्यसाधारण गुरु भक्त होते.श्रीगोरख प्रभुंच्या प्रत्येक लिला हा सर्व जगातील गुरुभक्तांसाठी एक एक मोलाचा दगड आहे.आपल्या सद्गुरु प्रती असलेली त्यांची निष्ठा इतकी विलक्षण आहे की प्रत्येक लिला एक स्वतंत्र भाग वाटतो.त्यामुळे हे धाडस केले आहे.श्रीप्रभुंच्या चरित्रातील काही ठराविक मोती वेचून इथे अल्पबुद्धी ने मांडतो आहे.काही अनावधानाने चुकीचे लिहिल्या गेले‌ तर ती फक्त माझी अल्पबुद्धी आहे. इथे एक विशेष नमुद करतो की उत्तरेकडील नाथ संप्रदाय आणि महाराष्ट्रातील नाथ संप्रदाय यात बरेच तात्विक मतभेद आहेत.उत्तरेकडील नाथ संप्रदायाचे लोक हे मालुकवी लिखित "नवनाथ भक्तीसार" किंवा "श्रीमद् भागवत" ग्रंथात आलेले नवनाथांचे वर्णन प्रमाण मानत नाही तरीही आपण हे मतभेद बाजुला ठेऊन पूर्ण श्रीशिवावतार असलेले महासिद्ध महायोगी पूर्णब्रह्म श्री गोरक्षनाथ प्रभुंच्या लिलांचे स्मरण करुयात.कारण त्यातील मदभेद दूर सारुन जर विवेक बुद्धी ने त्यांचे निरीक्षण केले तर लक्षात येईल की ही तर जिवनात सद्गुरु निष्ठेची अमृत संजिवनी आहे.
                                         

अगदी चारही युगात भगवान गोरक्षनाथ प्रगट रुपाने सदेही हजर होते व त्यांनी या चारही युगात अनेक सिद्ध, महापुरुष आणि योग्यांना भेट दिली आहे.या संदर्भात अनेक कथा आहेत.पण भगवान श्री गोरक्षनाथांच्या जन्माची एक कथा फार प्रचलित आहे.ज्यात भगवान मत्सेंद्रनाथांनी एका स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी झोळीतील भस्म दिले‌ व ते माघारी परतले.पुन्हा बारा वर्षांनी ते परत त्या घरी भिक्षेला गेले व त्या बालका संबंधी चौकशी केली तेव्हा ते भस्म त्या स्त्री ने उकिरड्यावर फेकल्याचे त्यांना कळले.ज्यावेळी उकिरडा साफ करुन त्या जागेवर खोदण्यात आले तेव्हा तिथे महासिद्ध भगवान गोरक्षनाथ हे प्रकट झालेले होते. काही ठिकाणी ही लिला बंगाल प्रांतात घडली होती असा उल्लेख आहे तर महाराष्ट्रात ही लिला गोदावरी काठी घडली होती असे मानले जाते.श्रीप्रभुंच्या प्राकट्यासंबंधी दोन कथा आणखी प्रसिद्ध आहे.त्यातील एक अशी की,भगवान श्री विष्णू हे कमलातून एका विशाल जलात प्रगट झाले.त्यांनी आजुबाजुला बघितले तर पाणीच पाणी  भरलेले होते.त्यांनी हे बघून पाताळाकडे बुडी मारली.पाताळात भगवान श्री गोरक्षनाथ ध्यान समाधीत होते.भगवान विष्णूंनी त्यांना सृष्टी रचना करण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा गोरखप्रभुंनी आपल्या धूनीतील भस्म काढून भगवान व विष्णु ला दिले व सृष्टी रचण्यास सांगितले.ही लोककथा उत्तरेकडे फार प्रचलित होती.असे भगवान गोरखनाथ त्रिदेवांनाही पुज्य मानले जातात.तसेच एक कथा "गोरखविजय" या बंगाली भाषेतील काव्यात फारच वेगळी आली आहे.त्यामध्ये त्यांच्या अयोनीज स्वरुप प्रगटीकरणावर व अस्तित्वावर प्रकाश पडलो.त्यात असे म्हटले आहे की,श्रीशिवांच्या नाभितून महासिद्धयोगींद्र मत्सेंद्रनाथ, हाडापासून श्रीहाडिपा ( सिद्धयोगींद्र जालंदरनाथ), काळापासून कानपा अर्थात सिद्धकान्हिपा आणि जटांपासून सिद्धयोगींद्र श्रीगोरक्षनाथांची उत्पत्ती झाली आहे.अशा प्रकारे अयोनिज असलेल्या महासिद्धयोगी भगवान गोरक्षनाथांच्या प्राकट्याबद्दल कथा प्रसिद्ध आहेत.यातील भस्माची कथा जास्त संयुक्तिक आणि सर्वश्रुत प्रसिद्ध आहे.गोदावरीच्या काठी चंद्रगिरी येथे ही घटना घडली अशी मान्यता आहे.
                             आपल्या झोळीतील भस्मातून उत्पन्न झालेल्या या बारा वर्षीय आयोनिज महासिद्धाला भगवान श्रीमत्सेंद्रनाथांनी अनुग्रह दिला व नाथ पंथाचे शांभव वैभव असलेली दिक्षा दिली.खरंतर जन्मसिद्ध असलेल्या गोरक्षनाथांना या दिक्षेची ही गरज नव्हती पण जगाच्या कल्याणासाठी त्यांनी दाखविलेल्या मार्गावर ते स्वतः आधी चालले .महायोगी आधी आचरण करतात आणि मग जगाला स्वानुभव सांगतात."गुरुंशिवाय तरणोपाय नाही"  या त्रिकालबाधीत सत्याला भगवान गोरक्षनाथांनी आपल्या सर्व ग्रंथ ,रचनांमध्ये जागोजागी प्रगट केले आहे.त्यांनी आपल्या "सिद्धसिद्धांतपद्धती" या ग्रंथात एका ठिकाणी स्पष्ट म्हटले आहे की, "परमपदाची प्राप्ती ही श्रीसद्गुरुंच्या प्रसन्नतेमुळेच होऊ शकते."
दिक्षाविधी झाल्यानंतर भगवान मत्सेंद्रनाथ गोरक्षनाथांना बरोबर घेऊन जगन्नाथ पुरीच्या यात्रेला गेले.या प्रवासात ते एका कनकगिरी नावाच्या गावाजवळ येऊन पोचले. त्यावेळी भगवान मत्सेंद्रनाथांना शिष्य गोरक्षाची परिक्षा घेण्याचा विचार आला.( हा प्रसंग आपल्यातील बहुतेक जणांना श्रृती असेलच त्यामुळे मी तो परत विस्त्तृत सांगत नाही)  मत्सेंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणतात, "बाळ मला खूप भुक लागली आहे तेव्हा तु जवळच्या गावात जाऊन भिक्षा घेऊन ये." हे ऐकून भगवान गोरक्ष जवळच्या कनकगिरी येथील गावात गेले.एका घरी धामधूम बघून गोरक्षनाथ त्या घरी गेले.तेथे श्राद्ध विधी सुरु होता.भगवान गोरक्षांच्या बाल सुकुमार रुपाला बघून आतील स्त्री बाहेर आली तिथे नाथांच्या झोळीत श्राद्धाच्या अन्नाची सर्व भिक्षा वाढली.ती घेऊन ते परत सद्गुरु मत्सेंद्रनाथांकडे आले.नाथांनी त्यातील उडदाचे वडे खुप आवडल्याचे गोरक्षनाथांना सांगितले.आपल्या शिष्याची परिक्षा घेण्याचा नाथांचा विचारच सुरु होता.त्यामुळे जेवणानंतर ते गोरक्षनाथांना म्हणाले की, "हे वत्सा! मला आणखीन उडदाचे वडे खायचे आहेत त्यामुळे तू परत ही भिक्षा मागून घेऊन ये." गोरक्षनाथ परत त्या घरी जातात.ती स्त्री गोरक्षनाथांना बघून विचारात पडते तोच "अल्लख निरंजन" म्हणून गोरक्षनाथ वड्यांची भिक्षा मागतात.त्या बाईला गोरक्षनाथ हे जिव्हाल्लोलूप वाटतात.त्यामुळे ती गोरक्षनाथांना टाकून बोलते. तरीही नाथ तिला विनंती करतात की माझ्या सद्गुरुंसाठी ही भिक्षा हवी आहे.तेव्हा ती बाई रागाने म्हणते की, "मी वडा तर देते पण मला आपला डोळा काढून द्या." सहज ती ते रागाने बोलली आणि घरात गेली.इकडे गोरक्षनाथांनी आपला एका डोळ्याची बाहूली काढून दुसर्या हातावर ठेवली.त्यांच्या डोळ्यातून भळाभळा रक्त वाहू लागले.ती स्त्री हे सर्व बघून आश्चर्यचकित झाली.घाईघाईने वडे नाथांच्या झोळीत टाकून ती घरात गेली.इकडे गोरक्षनाथांनी आपली ती जखम पट्टीने घट्ट बांधली व गुरुरायां कडे परत आले.आपल्या सद्गुरुंना आणलेली भिक्षा दिली व नम्रपणे ग्रहण करण्याची प्रार्थना केली.डोळ्यावरीव  पट्टी बघून मत्सेंद्रनाथांनी गोरक्षनाथांना कारण विचारले .सद्गुरुंशी खोटे बोलू नये म्हणुन गोरक्षनाथांनी घडलेला सर्व वृत्तांत जसाच्या तसा सद्गुरुंना सांगितला.हा वृत्तांत ऐकुन भगवान मत्सेंद्रनाथ अतिशय आनंदीत झाले.त्यांनी तात्काळ नाथांच्या डोळ्यांवर भस्म लावले व योगसिद्धीने शिष्य गोरक्षनाथांचा डोळा पूर्ववत केला.त्यानंतर त्यांनी गोरक्षनाथांना आशिर्वाद दिला व म्हटले, "हे वत्सा! मी तुझ्या भक्तिने प्रसन्न झालो आहे.तू सर्व योगविद्यांमध्ये पारंगत आणि परम यशस्वी होशील." अशा प्रकारे या परिक्षेत गोरक्षनाथ प्रभु उत्तिर्ण झाले व त्यांनी आपले सच्छिष्यत्व सिद्ध केले. यानंतर भगवान गोरक्षनाथांच्या चरित्रात आलेली अतिशय दिव्य कथा म्हणजे अयोनिज असलेल्या भगवान गहिनीनाथांचे प्राकट्य.लहान मुलांसोबत खेळताना गोरक्षनाथ आपल्या सद्गुरुंनी दिलेला संजिवनी मंत्र पाठ करुन लागले.खेळता खेळता त्यांनी एक मातीचा पुतळा तयार करु लागले.संजिवनी मंत्र म्हटल्यामुळे तो पुतळा सजिव झाला.त्या बाळाला एका ब्राह्मण दांपत्याकडे देऊन ते आपल्या सद्गुरु समवेत पुढील यात्रेस गेले.पुढे मोठ झाल्यावर या बाळाला भगवान गोरक्षनाथांनी आपल्या परंपरेचे वैभव दिले ,अनुग्रह दिला व तप करण्याकरिता सह्याद्री पर्वतावर पाठवीले. हेच भगवान गहिनीनाथ आपल्या परमाराध्य ज्ञानेश्वर माउलींचे आजेगुरु.यांनीच पुढे हे परंपरेचे शांभव वैभव निवृत्तीनाथांना दिले व नंतर निवृत्ती नाथांनी माउलींना.अशी ही दिव्य गुरु परंपरा. त्यानंतर गोरक्षनाथ आणि कानिफनाथांच्या मधील संवाद व आंब्यांच्या फळांचा झालेला चमत्कार आला आहे जो अतिशय दिव्य आहे.(शब्दविस्तारामुळे तो इथे देत नाही )
यापुढील प्रसंग संपूर्ण भारतात ,नाथ संप्रदायात ऐव्हाणा घराघरात सुपरिचित आहे.तो म्हणजे स्त्री राज्यात संसार करत लिला करणार्या गुरु मत्सेंद्रनाथांना सोडविण्यासाठी  मृदुंगातूनही "चलो मछिंदर गोरख आया" हा नाद निर्माण करणारे परमशिष्य गोरक्षांचा प्रसंग.ही कथा फार मोठी आहे यात भगवान गोरक्षनाथ आणि महारुद्र हनुमंताचा युद्ध प्रसंग आला आहे.या युद्धात भगवान गोरक्षनाथांनी भगवान श्रीहनुमंतांनाही हरविले होते.भगवान मायारुप श्री मत्सेंद्रनाथ स्त्रीराज्यात का गेले? एक योगी महासिद्ध असुनही ते या मायेत कसे अडकले अशा प्रकारच्या अनंत शंका आपल्या सर्वांच्या मनात वारंवार उठल्या असतीलच. याला मोठी पार्श्वभूमी आहे. तरी त्यावर आता विस्तृत लिहीत नाही पण एवढेच सांगेन की ही त्यांचीच लिला होती.मैनावती ला तसा आशिर्वाद ही होता आणि भगवान शिवांनी मासोळीच्या पोटात लपून ज्ञान ऐकले म्हणून तसा शाप ही होता. यांची कारण मिमांसा मोठी आहे ती परत केव्हा तरी नक्कीच बघु.या स्त्रीराज्यातून सुटल्यावर भगवान मत्सेंद्रनाथ व गोरक्षनाथ हे यात्रा करत तैलंगराज्यात आले.तिथे संपूर्ण पर्वतच भगवान गोरक्षनाथांनी सोन्याचा केला होता.नंतर त्या पर्वताला त्यांनीच गेरु पर्वतात परावर्तित केले.यानंतर जालिंदरनाथांचा उद्धार आणि भर्तृहरीनाथांवर  अनुग्रह करुन नाथांनी कृपा केली.यापुढे गोरक्षचरित्रातील अतिशय दिव्य आणि अद्भुत अशी कलकत्ता कालीची लिला आली आहे. ज्यात भगवान गोरक्षनाथ आणि भगवती काली चे युद्ध झाले होते व त्यात काली मातेला गोरक्षनाथांनी युद्धात पराभूत केले व कालीघाटावर होणारी पशुबली बंद‌ केली होती.असे म्हणतात की, काली घाटावरील काली मातेची स्थापना ही भगवान गोरक्षनाथांनी केली होती.
                                    यानंतर धर्मनाथांचा प्रसंग , त्यांच्यावर कृपा करुणा.त्यानंतर चौरंगीनाथांवर कृपा अनुग्रह .हे दोन्ही प्रसंग मोठे आहेत पण शब्द मर्यादा बघता इथे ते देणे योग्य होणार नाही.पुढे चर्पटीनांथांची भगवान गोरक्षांच्या कौपिनातून उत्पत्ती झाल्याची लिला व चर्पटीनांथांवर कृपा अनुग्रहाचा दिव्य प्रसंग येतो.राजस्थान येथील मेवाड राज्याचे संस्थापक श्रीबाप्पा  रावळ यांच्यावर भगवान गोरक्षनाथांनी कृपा केली.त्यांना गोरक्षनाथांनी अभीमंत्रीत केलेली दुधारी तलवार दिली व त्यांना सर्वत्र विजयी होण्याचा आशिर्वाद दिला होता.याच आशिर्वादाने श्री बाप्पा हे चित्तोडचे राजा झाले.त्या तलवारीची पुजाअर्चा चित्तोडला नाथपंथी संतांकडून अनेक वर्षे होत आली आहे‌.कालांतराने नागदाच्या डोंगरावर भगवान श्री शंकराची स्थापना केली.आज हे स्थान एकलिंगजी या नावाने प्रसिद्ध आहे जे संपूर्ण राजपूत राजांचे आराध्य आहे.नेपाळवर व तेथील राजघराण्यावर भगवान मत्सेंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची कृपा दृष्टी सदैव अखंड आहे. गोरक्षनाथप्रभुंच्या कृपेमुळे तेथील राजाने आपल्या राजवंशाचे नाव "गोरखा" असे ठेवले.यावेळी तेथील राजघराण्यावर केलेली कृपा ,दुष्काळाचे सावट दूर करण्याचा चमत्कार असे अनेक प्रसंग आहेत.तसेच राजस्थान मधील गोगावीर यांच्यावर कृपा,श्रीरतननाथ यांच्यावर कृपा,श्रीगोपीचंद अर्थात दृमिलनारायण यांना दिलेल्या अभयदानाचा प्रसंग.तसेच मेहेर येथील शारदा भवानीचे परमभक्त आल्ल्हा उदल यांना भगवान गोरक्षनाथांनी दिक्षा देऊन कृतार्थ केले.आजही ते चिरंजीव आहेत.
             भगवान श्री गोरक्षनाथ आणि आदिगुरु, योगमार्गाचे आद्य भगवान श्री दत्तात्रेय प्रभु यांची भेट व झालेला संवाद प्रसिद्ध आहे.अशीच एक लिला एका ठिकाणी वाचण्यात आली होती ती तशीच इथे देतो आहे.
{ स्त्री-राज्यातून मच्छिंद्रनाथांची सुटका केल्यावर मच्छिंद्र-गोरक्ष ही गुरू-शिष्यांची जोडगोळी नाना ठिकाणची भ्रमंती करत होती. एके दिवशी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना भिक्षा आणण्यास सांगितले. त्यावेळी त्यांचा मुकाम एका पर्वतावर होता. आजूबाजूस चिटपाखरूही नव्हते. जवळपास गावही दिसत नव्हते. भिक्षा मागायला जाणार कुठे या चिंतेत असताना गोरक्षनाथांना मैनावाती राणीचे बोल आठवले. स्त्री-राज्यातून निरोप घेताना तीने "कधीही भिक्षा मागायला या" असे सांगितले होते.  गोरक्षांनी योगसामर्थ्याने आपले भिक्षापात्र आकाशमार्गाने स्त्री-राज्यात धाडले. ते भिक्षापात्र थेट राणीपुढे जाऊन पडले. राणीने नाथाचे पात्र लगेच ओळखले आणि ती आश्चर्यचकीत झाली. तीलाही आपले शब्द आठवले आणि ही गोरक्षांचीच किमया आहे याची खात्री पटली. एवढ्याशा पात्रातली भिक्षा तीघांना (मच्छिंद्र, गोरक्ष आणि मीननाथ) कशी पुरणार अशी काळजी वाटून तीने आपल्या दासींना त्या पात्रात भरपूर भिक्षा वाढण्यास सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेवढी भिक्षा घालावी तेवढे ते पात्र मोठे मोठे होत होते. अगदी मारूतीच्या शेपटासारखे. शेवटी राणी अहंकार सोडून मनातल्यामनात मच्छिंद्रनाथांना शरण गेली. तत्क्षणी पात्र पूर्ण भरले आणि परत अवकाशमार्गाने गोरक्षनाथांकडे निघाले.वाटेत एका पर्वतावर अत्रिपुत्र दत्तात्रेय बसले होते. त्यांनी आकाशमार्गाने उडत जाणारे हे भिक्षापात्र पाहिले. त्यांना विस्मय वाटला. हे कोणाचे पात्र आहे ते विचारावे या हेतूने त्यांनी हातातला दंड वर केला. पात्र घेवून जाणारी सिद्धी त्या दंडाला आपटून खाली पडली. दतात्रेयांनी तीला ठावठिकाणा विचारला आणि पुढे जाण्याची अनुमती दिली. सिद्धी भिक्षापात्रासह गोरक्षांनाथांकडे पोहोचली आणि म्लान वदनाने उभी राहिली. गोरक्षनाथांनी तीला उशीर होण्याचे कारणं विचारले. सिद्धीने झालेला सर्व प्रकार कथन केला.

आपल्या सिद्धीला कोणी गोसाव्याने दंड मारून पाडले हे एकून गोरक्षनाथांचा क्रोध अनावर झाला. आपल्या योगसामर्थ्याचा अपमान करणाऱ्याला शासन करायला ते त्या पर्वतावर पोहोचले. गोरक्षनाथांचा क्रोध म्हणजे ज्वालामुखीच. पर्वतावर दत्तात्रय ध्यानस्थ बसले होते. गोरक्षनाथांनी क्रोधायमान होऊन दातात्रेयांवर झेप घेतली. पण अघटीत घडले. गोरक्ष दत्तात्रेयांच्या शरीरातून त्यांना काहीही इजा न करता आरपार निघून गेले. पाण्यातून काठी फिरवली तरी ते जसे अभेद रहाते अगदी तसे. गोरक्ष विस्मयचकीत झाले. दत्तात्रेयांनाही गोरक्षांची परीक्षा पहावी असे वाटले. ते गोरक्षनाथांना म्हणाले, "गोरक्षा! तुझ्या सिद्धींविषयी मी बरेच ऐकून आहे. तु सिद्धांचा सिद्ध आहेस असे ऐकले आहे. तुला ब्रह्मांडसमाधीचा अनुभव आहे म्हणे. जरा पंचतत्वात लीन होवून दाखव बरे. बघूया तुला शोधता येतय का ते."

गोरक्षनाथ अवश्य म्हणत तेथून गुप्त झाले आणि समुद्रात एक छोटा मासा बनले. दत्तात्रेयांनी ध्यान लावले आणि क्षणात गोरक्षांचा ठाव शोधला. पटकन पाण्यात हात घालून त्यांनी माशाच्या रूपातील गोरक्षनाथांना बाहेर काढले. मग ते गोरक्षनाथांना म्हणाले, "आता मी अदृश्य होतो. तू जर मला शोधू शकलास तर तू खरा सिद्ध. मग माझे सर्वस्व तुला दिले असे समज."

गोरक्षाने होकार देताच दत्तात्रेय अदृश्य पावले. गोरक्षाने चौदा भुवने, तीर्थक्षेत्रे, गुहा, वने, समुद्र सर्व शोधले पण दत्तात्रेय काही त्यांना सापडले नाहीत. आपण हरलो असे लक्षात येऊन गोरक्षांनी मच्छिंद्रनाथांचा धावा केला. मच्छिंद्रनाथ तात्काळ पर्वतावर प्रकट झाले. गोरक्षांनी झालेली हकीकत सांगितली. ती एकल्यावर मच्छिंद्र म्हणाले, "गोरक्षा! हा नक्कीच अत्रेय आहे. त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही असला अचाट प्रकार करता येणार नाही. त्याला शोधण्याचा मार्ग एकच की तू लीन भावाने पंचतत्वात विलीन झालेल्या दत्तात्रेयांना मनोध्यानाने शोध." गुरू आज्ञेनुसार गोरक्षांनी तसे करताच दत्तात्रेयांचे दिव्य स्वरूप त्यांना दृगोचर झाले. "अलक्ष" शब्द गर्जून गोरक्ष त्यांना "आदेश" करते झाले .}
अशा या दिव्य अवताराने अमनस्कयोग, ज्ञानदीपप्रबोध, गोरक्षपद्धती, गोरक्षसंहिता, योगमार्तंड, गोरक्षकल्प, अवधूतगीता, गोरक्षगीता, गोरखबानी; अमरौघशासनम, महार्थमंजरी, सिद्धसिद्धान्तपद्धती या ग्रंथातून नाथ संप्रदायाचे ज्ञान वैभव प्रगट केले आहे. भगवान श्री गोरक्षनाथांचे आजही अवतार कार्य सगुण रुपात अखंड सुरु आहे.अगदी अलिकडच्या काळात आपल्या सर्वांना सुपरिचित असलेल्या दिव्य नाथपंथी स्त्री संत सद्गुरु जोगण विठामाई यांना प्रत्यक्ष भगवान गोरक्षनाथांचा अनुग्रह लाभला होता.विठामाईंचा काळ अगदी अलिकडचा काही दशकांपूर्वीचा आहे.नित्यवंदनीय,नित्य पूजनीय आणि नित्य स्मरणीय अशा या दिव्य भगवंतांच्या अवताराला आजच्या त्यांच्या प्राकट्यतिथी निमीत्त मी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि माझ्या या बोबड्या बोलांच्या शब्दसुमनांजलीला श्रींच्या सुकोमल चरणी अर्पण करतो.

          ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...