Sunday, August 7, 2022

भक्तश्रेष्ठ सद्गुरु श्री नामदेवराय यांचे सद्गुरु श्री विसोबा खेचर महाराजांची पुण्यतिथी 🙏🌸🌺🚩

 

सद्गुरु श्री विसोबा खेचर यांची समाधी श्रीक्षेत्र बार्शी

सद्गुरु श्री विसोबा खेचर यांची आज पुण्यतिथी 🚩🕉️

                        "सद्गुरु वाचुनिया सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी" या संत उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायात भक्तश्रेष्ठ सद्गुरु श्री नामदेवरायांना आलेली सद्गुरु कृपेची प्रचीती ही आपल्या सर्वांना माहीतच आहेच.श्रीसद्गुरु नामदेवरायांची भक्ती,त्यांचा अधिकार आणि इतके दिव्य चरित्र म्हणजे भक्तीचा कळसच आहे.नामदेवरायांच्या किर्तनात परब्रह्म परमात्मा भगवान श्रीपंढरीनाथ स्वतः नाचायचे अशी आख्यायिका सांगितली जाते.देव त्यांच्याबरोबर जेवायचे,बोलायचे , हसायचे, भांडायचे असा लोकविलक्षण भक्तीचा महिमा नामदेवरायांचा होता.आपल्याला "कच्चे मडके" ही नामदेवरायांच्या चरित्रातील कथा सर्वांना ठाऊकच आहे हे गृहीत धरुन मी त्या कथेची पुनरावृत्ती करत नाही.पण श्रीगोरोबा काकांनी व आदिशक्ती माय मुक्ताबाईंनी त्यांना कच्चे मडके ठरवल्यावर जेव्हा नामदेवराय देवांकडे जातात तेव्हा देव त्यांना "सद्गुरुंना शरणं जावंच लागेल,त्याशिवाय आत्मज्ञान नाहीचं" हा निर्वाणीचा आदेश देतात.शेवटी हो नाही करत देवांची आज्ञा शिरसावंद्य मानून व देवांनी सांगीतल्या प्रमाणे नामदेवराय औंढा नागनाथ येथ असलेल्या सद्गुरु विसोबा खेचरांकडे जातात.बरं गम्मत अशी की नामदेवराय जसे देवांचे लाडके तसे ज्ञानेश्वर माउलींचेही परम प्रिय.पण माउली वा निवृत्तीनाथ हे त्यांना अनुग्रह देत नाहीत तर आपल्याच शिष्यांकडून म्हणजे विसोबांकडून परंपरेचे ज्ञान देववितात.म्हणजे आमच्या सद्गुरु शंकर बाबांच्या "जिसका बंदर वही नचाऐ" या वचनाप्रमाणे विसोबा हेच त्यांचे सद्गुरु होते व तेच परंपरेचा बिज अनुग्रह नामदेवरायांना देतात व कृतार्थ करतात.विसोबा खेचर हे आळंदीचे .ते माउली आदी चारही भावंडांचा संन्यासाचे पोरं म्हणून आत्यांतिक द्वेष करित असत.ज्यावेळी माउलींना मांडे खायचे होते तेव्हा चिमुकली मुक्ताई खापर आणायला कुंभाराकडे जाते.त्यावेळी ते खापर फोडणारे विसोबाच व गावातील कुंभारांना दमदाटी करुन खापर न देण्याची आज्ञा करणारे ही विसोबाच.हेच विसोबा ज्यावेळी माउलींचा पाठीवर मांडे भाजण्याचा चमत्कार पाहतात त्यानंतर या चारही अवतारांना शरणं येतात.पुढे भगवान श्री ज्ञानेश्वर माउली त्यांना नाथपंथाची दिक्षा अनुग्रह देऊन त्यांचे नाव "खेचरनाथ" असे ठेवतात.हेच खेचरनाथ पुढे नामदेवरायांना अनुग्रह देऊन,सप्तकोटेश्वर या शिवमंदिरात ( मला हे शिवमंदिर कुठे आहे हे ठाऊक नाही) आत्मसाक्षात्कार घडवून सर्वत्र ईश्वरानुभूती करवतात.नामदेवरायांच्या डोक्यावर हात ठेवून अनुग्रह देतात व त्यांना आत्मानुभूती देऊन कृतार्थ करतात.ज्यावेळी नामदेवराय औंढा नागनाथ येथे जातात त्यामुळे विसोबा शिवलिंगावर पाय ठेवून लेटलेले असतात ही कथा आपल्याला माहीत आहेच.इतके लोकविलक्षण सत्पुरुष असलेले विसोबा.त्यांची समाधी ही बार्शी जिल्ह्यातील उत्तरेश्वर मंदिराच्या बाजूला आहे.पण आज समाधी ची झालेली अवस्था पाहता आपण किती करंटे आहोत याची पदोपदी जाणिव झाल्याशिवाय राहत नाही.हल्ली थोडीफार साफसफाई तरी होत आहे.पूर्वी ची परिस्थिती माझ्यासाठी शब्दात लिहिणे ही अवघड आहे.एका थोर संतांच्या समाधीची अशी अवहेलना खरंच दु:खद कशी बाब आहे.संतांचे पाईक म्हणविणारे आपण या सर्वासाठी समान जबाबदार आहोत.माझी बार्शीतील वारकरी आणि इतर सर्व थोरा मोठ्यांना विनंती आहे की जर त्या ठिकाणी लोकवर्गणीतून एक छोटेखानी मंदीर बांधता आलं तर ती आपल्या सर्वांकडून विसोबा रायांच्या चरणी खरी आदरांजली ठरेल.ही अवहेलना खरंच अतिशय दु:खद आणि खेदजनक आहे.आजच्याच पावन एकादशीच्या तिथीला सद्गुरु विसोबारायांनी समाधी घेतली व पांडुरंग चरणी लिन झाले.ही शब्दसुमनांजली मी विसोबारायांच्या चरणी अर्पण करुन त्यांच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो. 🙏🌸🌺
सद्गुरु श्री विसोबांचे स्वतंत्र असे चरित्र वा माहिती उपलब्ध आहे की नाही हे मला ठाऊक नाही असेल तर मला जरुर कळवा.
        ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️


कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...