श्री.काटकर साहेबांचा जन्म कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या पावन दिवशी २९ नोव्हेंबर १९२८ साली एका सत्शील दांम्पत्य श्री हरी व सौ. पार्वतीबाई यांच्या पोटी झाला. त्यांचे आई-वडील हे कोल्हापूर येथील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज (कुंभार स्वामी) यांचे निस्सिम भक्त होते.घरातील आत्यंतिक गरीबी असतांनाही भगवंतांच्या चरणी त्यांची अनन्य निष्ठा श्रद्धा होती.अनेक वर्षे कोल्हापूरातील गंगावेश येथील व्यासमठी येथील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या पादुका मंदिरात सकाळी ५ ते ६ रोज न चुकता वीणा घेण्याचे त्यांचे व्रत होते.ही त्यांची सेवा अविरतपणे अखंड सूरु होती.भगवंतांकडे त्यांचे काहीही मागणे नसे.इतक्या अतिव समाधानात हे दाम्पत्य आपले जिवन जगत असे.साहेब लहानपणी आपल्या आई-वडिलांबरोबर समाधी मठात दर्शनाला जात.त्यांच्या आई-वडिलांच्या भक्तीचा आणि समाधानी वृत्तीचा एक प्रसंग सांगताना साहेब नेहमी गहिवरुन जात.तो प्रसंग असा की ,साहेब नेहमी प्रमाणे लहान असतांना व्यासमठीत दर्शनाला निघाले.तेव्हा त्यांची आई या छोट्या ज्ञानोबाला म्हणाल्या, "अरे ज्ञानबा रोज संध्याकाळी मठीत जातोस ना,दत्त महाराजांना सांग की ,आम्हाला दोन वेळ पोटभर खायला मिळू दे." आपल्या संसारातील इतक्या हलाखीच्या परिस्थितीत ही साहेबांच्या मातोश्रींचे हे मागणे खरंच किती अंतर्मुख करणारे आहे.या मागण्यातच त्यांच्या समाधानी अंत:करण्याची स्थिती दिसून येते.देवांकडे मागतांना काय मागावे याचे भान असणे हेच आत्मभान नव्हे काय? असो! बालपणी घरची परिस्थिती बेताची त्यामुळे इतर गोष्टी ,छंद तर दूर पण शिक्षण घेण्यासाठी ही साहेबांना तारेवरची कसरत करावी लागली.आदर्श हायस्कूल येथे शिकत असतांना एक वेळी शाळेची फीज भरायला पैसे नसल्यामुळे त्यांना शाळा अर्धवट सोडून जायचा वेळ आला पण ईश्वरी कृपा तारक असते त्याप्रमाणे एक शिक्षण स्वतः पुढे आले व त्यांनी साहेबांची शाळेची फी भरली होती.पण या कष्टाच्या दिवसांत ही साहेबांचे "श्रीकृष्ण विजय" या ग्रंथाचे अखंड पारायण, वाचन सुरुच होते.शिक्षण घेता घेता साहेबांनी हॉटेल मध्ये कपबशा धुन्याचेही काम केले.परिस्थीतीला न जुमानता त्यातून मार्ग काढत पुढे जाणारे साहेबांचे चरित्र बघितले तर थक्क व्हायला होते.साहेब रडत बसले नाही तर कष्ट करत राहिले.जणू स्वामींकार्याची ही मुहूर्तमेढच स्वामी कृपेने रोवल्या चालली होती.श्रीस्वामीराय आपल्या या प्रिय भक्ताला तावून सुलाखून बावनकशी सोने बनवत होते.त्यावेळी श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे शिष्य नामदेव महाराज यांचा सहवास व मार्गदर्शन साहेबांना लाभले होते.अगदी कोवळ्या वयातच श्रीसद्गरु नामदेव महाराजांसारखे दिव्य सत्पुरुष त्यांना मार्गदर्शन करु लागले.त्याचा साहेबांच्या अंतरंगात खोलवर परिणाम झाला.त्यांची वृत्ती अतिशय सात्विक होऊ लागली.नामदेव महाराजांचे त्यांच्या वर बारिक लक्ष होते.मठात होणार्या अध्यात्मिक चर्चा साहेबांच्या कानी पडत होत्याच.जणू शेत सुपीक करण्याचे कामच नामदेव महाराजांनी केले .गुप्त रुपाने हे सर्व स्वामीरायच करुन घेत होते यात शंका नाही. यथावकाश साहेबांचे दिवस अध्यात्मिक चिंतनात ,मठात नामदेव महाराजांच्या समवेत व शिक्षण घेत जाऊ लागले.साहेब १९४८ साली १९ वर्षांचे झाले.त्यावेळी त्यांचे अनाथ बोर्डींग स्कुल मध्ये शिक्षण सुरु होते.शिक्षण सुरु असतांनाही अंतरंगात पारमार्थिक चिंतन हे अखंड प्रवाहित होत होतेच.एकदा असेच बसले असतांना साहेबांच्या मनात विचार घोळू लागला की, "श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज जर एवढे विलक्षण अधिकारी,महान आहेत तर त्यांचे सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज किती थोर ,महान असतील." अशातच साहेबांच्या आईला पोटाचा दुर्धर आजार झाला.आईची परिस्थिती अत्यंत गंभीर होती.आईची ही अवस्था बघून ते अत्यंत व्याकुळ झाले.आईला आपल्या या चिमुकल्या लेकराला सोडून जाण्याचे दु:ख अत्यंत होते हे जाणल्यावर साहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.बोर्डिंगमध्ये आल्यापासून ते पंचगंगा नदीकाठी जाऊन काही काळ एकांतात बसु लागले.असेच एकदा दु:खद अंत:करणाने ते सायंकाळी नदीकाठी जावयास निघाले.मनात विविध प्रश्न आणि दु:खाचे काहूर माजले असतांना रस्त्यावर समोरुन विजार व शर्ट घालून एक व्यक्ती झपझप पावले टाकत साहेबांजवळ आली.त्यांना आईच्या प्रेमाने आलिंगन दिले आणि डोळ्यात पाणी येतं असल्याने गदगदून अत्यंत कारुण्यपूर्ण वाणीने साहेबांना म्हणाले, "अरे किती सोसलेस? किती कष्ट घेतलेस?" साहेब म्हणाले , "बाबा हा तर प्रारब्धाचा खेळ आहे." एकदम बाबांचा चेहेरा उग्र झाला,डोळे वर आकाशाकडे गेले आणि ते साहेबांना म्हणाले ,. "अरे अक्कलकोट स्वामी दुधारी तलवार आहे ,पाणी ही कापेल.जन्मभर सोडू नकोस.ही त्यांची सहजलिला, त्यांच्या पदरी तू आहेस". ते बाबा दुसरे तिसरे कुणी नसुन आपल्या सर्वांचे पैजारवाडीचे दत्तप्रभु ,भक्तांसाठी सामान्य माणूस बनुन राहिलेले नृसिंहवाडी चे दत्त परमप्रिय सद्गुरु श्री चिले महाराज होते. यानंतर काही दिवसांतच साहेबांच्या आईने साहेबांच्या मांडिवरच देह ठेवला.
अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत लौकिकार्थाने श्रीसाहेब बी.एस्सी पर्यंत शिकले .त्यानंतर त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी बरीच खटपट केली.पुढे "बॉम्बे टेक्सटाईल्स" या कंपनीत साहेबांना फॅक्टरी इन्स्पेक्टर म्हणून अतिशय चांगली नोकरी मिळाली.नोकरी करतांना साहेबांचे वाचन सुरु होतेच.याच दरम्यान साहेबांना शांति ब्रह्म एकनाथ महाराजांचे "श्री एकनाथी भागवत" हाती आले.ते वाचल्यावर भक्ती,विरक्ती या बाबतच्या नाथांच्या वर्णनांनी साहेब अतिशय अंतर्मुख झाले.अशातच साहेबांच्या वडिलांचेही निधन झाले.आता साहेब पूर्णता एकाकी पडले होते.पण साहेबांच्या या काळात त्यांच्या फॅक्टरी मॅनेजरने त्यांना श्रीअक्कलकोट स्वामी महाराजांचा एक फोटो दिला.आता स्वामीरायच साहेबांचे माता,पिता सर्वस्व बनले होते.साहेबांनी नोकरी करतांना कधीही परपैशाला स्पर्श देखील केला नाही.कधीही कुणाला दुखविले नाही.लबाडी करुन कधीही जास्त पैसे उकळले नाहीत.ते कधीही मोहाला बळी पडले नाहीत.परपैसा ,परनिंदा हे परमार्थाला घातक असते हे पथ्य साहेबांनी कटाक्षाने पाळले.नोकरी करतांनाही सायंकाळी घरी परतल्यावर साहेब जप,ध्यान,भजन,सायंकाळी आरती,दिवसभरात काय काय घडले हे सर्व स्वामींना सांगत असत.मुंबईच्या चेंबूर येथील स्वामीमठात साहेब नेहमी जाऊ लागले.एकदा असेच मठात जप करत असतांना माणिकबाबा नावाचे एक थोर ब्रह्मचारी स्वामीभक्त मठात आले.चेंबुरच्या मठात गेल्यावर ते स्वामी नामाचा जप करीत बसण्याचा त्यांचा नियम होता.एक दिवस नामस्मरण करतांना साहेबांचा चित्तलय झाला व साहेबांना समाधी लागली.त्यामुळे त्यांच्या हातातील माळ खाली जमिनीला लागली.अशातच माणिकबाबा आले व त्यांनी हे बघितले.हे बघितल्यावर ते साहेबांना मोठ्याने म्हटले, "अरे हे काय करतो आहेस.माळ जमिनीला लागली आहे." साहेब निरुत्तर झाले.पण यांचा परिणाम असा झाला की माणिकबाबांना सारख्या वांत्या सुरु झाल्या.त्यामुळे ते इतके हैराण झाले की काय करावे हे त्यांना सुचत नव्हते.मठात आले तरी तेच घडले.शेवटी ते साहेबांजवळ आले व साहेबांना म्हणाले, "अरे माझी चुक झाली आता माझ्या छातीवरुन हात फिरव म्हणजे माझ्या वांत्या कमी होतील." साहेबांनी तसे करताच त्यांच्या वांत्या थांबल्या.त्यानंतर काही दिवसांनी स्वामीरायांचे लिलाक्षेत्र अक्कलकोट पहावे या हेतूने चार दिवस रजा काढून साहेब अक्कलकोट ला गेले.स्वामींचे दर्शन सेवा करुन ते पंढरपूरला गेले.पंढरपूरला गेल्यावर पंढरीनांथांनी आपल्या डोळ्याची उघडझाप करुन साहेबांना प्रचिती दिली.त्यानंतर ते आळंदीला माउलींच्या दर्शनाला आले व घरी परतले.या प्रवासात बर्याच लिला घडल्या.घरी आल्यावर आपल्या मनातील पारमार्थीक चिंतन कुणाजवळ तरी व्यक्त करावं असे साहेबांना सतत वाटू लागले.अशातच त्यांची भेट अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परंपरेतील सत्पुरुष,थोर स्वामी भक्त नाना महाराज परांजपे यांची भेट झाली.त्यामुळे त्यांच्या स्वामी चिंतनाला एक वेगळीच धार चढली.पुढे एकदा अक्कलकोट चे गजानन महाराज मुंबई ला आले होते.त्यांनी साहेबांना आपली पाद्यपुजा करावयास सांगितली व स्वामीकृपेची प्रचिती दिली.एकदा वज्रेश्वरीच्या नित्यानंद बाबांच्या दर्शनाला साहेब गेले होते.
बाबांचे दर्शन घेताच बाबा जोरदार आवाजात म्हणाले , "मेरे पास क्या है? चेंबूर मे जावो!" असं म्हटलं व लाकडी खर्चीवर जोरदार हात मारला.१९८३ ला स्वामींनी साहेब पुण्यात शंकर बाबांच्या मठात आले असता त्यांना दर्शन देऊन आत्मप्रचिती दिली.
साहेबांनी ८० वर्षाच्या आयुष्यात ३२ वर्षे नोकरी केली.त्या काळात व जिवनातील उत्तर आयुष्यात ही साहेबांना जवळ जवळ २९ संतांचा सहवास लाभला. प.पू.श्री नामदेव महाराज, प.पू.श्रीचिले महाराज, प.पू.श्री राऊळ महाराज पिंगुळी, अकोल्याचे प.पू.बाबा घोंगडे महाराज, प.पू.नागपूरकर स्वामी, चिपरीचे प.पू.अवधूत महाराज, हत्तरगीचे प.पू.हरिकाका, कणकवलीचे प.पू.फलाहारी महाराज, कोल्हापूरचे प.पू.भैरु महाराज, प.पू.तोरस्कर महाराज, प.पू.शंकर महाराज (लुगडी ओळ कोल्हापूरचे) या सर्व सत्पुरुषांचा त्यात समावेश होते. या प्रत्येक संतांनी साहेबांना विविध अनुभव ,प्रचिती , मार्गदर्शन केले.त्या लिला फार विस्तृत आहे पण शब्दमर्यादेस्तव त्या इथे देणे शक्य होणार नाही.पुढे कधीतरी साहेबांच्या कृपेने त्यावरही स्वतंत्र चिंतन करुयात.
अकोल्याचे घोंगडे बाबांनी साहेबांच्या बाबतीत असे भाकीत केले होते की, "तुझ्या हातून स्वामी मंदिरे होतील आणि स्वामी तुला सगुण रुपात दर्शन देतील." बाबांचे हे भाकीत तंतोतंत खरे ठरले. स्वामींच्या कृपेने साहेबांनी सोळा मंदिरे उभारली व छत्तीस पादुका स्थापन केल्या. परमार्थासाठी लागणारी तळमळ ,विवेक,स्वामींच्यावरचे अपरंपार प्रेम व निष्ठा हे सर्व असताना सुद्धा जोपर्यंत आपल्यावर गुरुकृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला पारमार्थिक पूर्णत्व प्राप्त होणार नाही या ध्यासाने साहेब अत्यंत तळमळीने त्या क्षणांची वाट पाहत होते. तो दिव्य क्षण आता समिप येऊन ठेपला होता. एकदा साहेब धनकवडीला श्री शंकर महाराजांच्या मठात गेले होते.साहेबांबरोबर नेहमी आठ ते दहा लोकं असायचे.मठात गेल्यावर महाराजांना नमस्कार केला तेव्हा त्यांच्या मनात असे भाव आले की महाराज जणू सांगत होते की "तुझा गुरु आमच्या पठडीतील आहे.साहेब बाहेर आले व तिथल्या ट्रस्टीला भेटले. त्यांच्याकडून शंकर महाराजांच्या शिष्यांची माहीती घेतली आणि त्यांना भेटायला सुरुवात केली. एकदा सर्व लोक सोलापुरला आले असतांना प.पू.भस्मे काकांना भेटले. भस्मे काकांनी त्यांना सर्व भक्ताकडे नेले होते. भूक लागल्यामुळे पंचमी हॉटेल मध्ये सर्व जेवायला गेले.साहेबांनी आपल्याला धनकवडीच्या मठात आलेला अनुभव भस्मे काकांना सांगितला. जेवल्यानंतर भस्मे काका सर्वांना घेऊन शुभराय मठात आले आणि मधू बुवांना म्हणाले "बुवा हे घ्या तुमचे गाठोडे यांना तुम्हीच सांभाळा." बुवांना भेटून सर्वजण कोल्हापूरकडे रवाना झाले.
अनुग्रहाची हकिकत :-
परत एकदा काटकर साहेब काही लोकांना घेऊन अक्कलकोटला गेले असता त्यांनी गुरुलीलामृत ग्रंथाचे तिथे पारायण केले.त्या पहाटे स्वामी महाराजांनी साहेबांना काही संकेत दिले.त्याप्रमाणे दुसर्या दिवशी स्वामींचा निरोप घेऊन सकाळी आठच्या दरम्यान सोलापूरला शुभराय मठात आले. त्यावेळी प.पू.मधूबुवा झोपले होते.प.पू.शुभाताई त्यांच्याशी गप्पा मारत होत्या. तेवढ्यात बुवा झोपेतुन जागी झाले.तोंड धुऊन शुभरायांच्या समाधीजवळ आले आणि सर्वांना हाक मारली.देवघरातले पळीभांडे आणायला सांगितले.सर्वांना संकल्प करायला लावले व गुरुमंत्र दिला.काटकर साहेब व सर्व मंडळींना अपार आनंद झाला.त्यांच्या जिवनातील सार्थकतेचा क्षण ते अनुभवत होते.
असंख्य भक्त साहेबांमुळे स्वामीभक्तीत मुरली आहेत.साहेबांनी सर्वांचे कोटकल्याण केले.छोट्या-छोट्या सांसारिक अडचणींपासून मोठी संकटे निवारण केली. स्वामींची स्वामीनामाची सर्वांना गोडी लावली आहे.सकाळी ६ वाजल्यापासून झोपेपर्यंत घरचा दरवाजा सर्वांसाठी उघडाच असायचा. कोल्हापूर ला प्रज्ञापुरी म्हणुन स्वामी महाराजांचे एक शक्तीपिठच स्थापन केले. स्वामींच्या प्रगटदिनाचा महोत्सव सुरु केला.सुरवातीला अत्यंत साध्यापणाने चालणारा हा उत्सव नंतर हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पाडु लागला. या उत्सवाला प्रत्यक्ष साहेबांचे सद्गुरु प.पू.मधू बुवा म्हणजे आपले दादा ८/९ वेळा येऊन गेले होते. अशाच एका उत्सवाला प.पू.मधु बुवा कोल्हापूरला गेले होते. उत्सवानंतर प.पू.मधु बुवा अनेकांच्या घरी साहेबांबरोबर गेले.प्रत्येक ठिकाणी मधु बुवांच्या पाद्यपूजा झालेल्या आणि हेही कळले हा प्रगटदिन हा दोन महिने रोज कोणीना-कोणी १००/५००/५००० माणसांना आपल्या ऐपतीप्रमाणे महाप्रसाद करुन संपन्न करतात.शेवटचा उत्सव हा विजय पवारांच्या मळ्यात मंदिरासारखा मोठा होतो.
या उत्सवात मधु बुवा आणि साहेबांचे एकांतात बोलणे झाले.(प.पू.शुभाताई त्यावेळी तिथे हजर होत्या,त्यांनी ही हकीकत सांगितली आहे) त्यावेळी बुवांनी काटकर साहेबांना श्रीशंकर महाराजांनी बुवांना दिलेल्या बिजमंत्राचा अनुग्रह केला आणि सांगितले "तुझे-माझे गोत्र एक झाले.तू ब्राह्मण झालास.कोल्हापूर , सोलापूर एक झाले.साहेबांच्या पत्नी आणि मुलीसही त्यावेळी बुवांनी अनुग्रह दिला. प.पू.बुवा स्वामी मंदिराच्या प्रतिष्ठापनेलाही गेले.अनेक उत्सवात सहभागी झाले.साहेबांकडे अनेकदा जाऊन राहिले. अशा श्रीकाटकर साहेबांनी भारतातील व भारताबाहेरील स्वामीं भक्तांना जोडले .स्वत:चा संसार करतांना स्वामींचा मोठा संसार सहजतेने साहेबांनी केला.स्वामी भक्ती कशी करावी हे आपल्या कृतीतून समजावले.अशा साहेबांनी आपल्या संपूर्ण जिवनात फक्त स्वामीरायांच्या नामाचाच प्रचार प्रसार केला .आपले संपूर्ण जिवन चंदनासारखे स्वामी कार्यासाठी झिजवले व वयाच्या ८६ व्या वर्षी श्रावण वद्य षष्टी या दिवशी आपला देह स्वामी चरणी विलीन केला.आज कोल्हापूरातील स्वामींच्या प्रज्ञापुरी मंदिरात साहेबांचे ही समाधी स्थान निर्माण झाले आहे.जे आजही साहेबांच्या अस्तित्वाची साक्ष देऊन जातं. साहेबांना ठेवलेली घोंगडी, त्यांच्यावर घातलेली फुले, त्यांच्या अस्थि या सोलापुरातील शुभराय मठातील शुभरायांच्या समाधीत विसावले आहेत. जणु साहेब आपल्या गुरुस्थानीही सद्गुरु सेवेसाठी विसावले आहेत.
अशा या थोर विभूती च्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम.श्रीसाहेबांच्या कृपेने आपल्या सर्वांनाही स्वामीनामाची गोडी लागो हीच अनंत कोटी प्रार्थना साहेबांच्या चरणी करतो. 🙏🌺🌸🙏
✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✍️✒️

