प्रणम्या मातृदेवता :- माळ ९ 🌸🌿🙏🏻
🌺भवतारिणी :- श्री सारदा मॉं🌺
आज अश्विन शुद्ध नवमी म्हणजे खंडे महानवमी , नवरात्रातील ९ वा दिवस.आपल्या या "प्रणम्या मातृदेवता" लेखमालेतील शब्दसुमनांची नववी माळ.ही माळ आपण भगवान रामकृष्ण परमहंस यांच्या लिला सहधर्मचारिणी प्रत्यक्ष आदिशक्ती दक्षिणेश्वरी कालिंच्या पूर्णावतार असलेल्या जगविख्यात विभुती, ज्यांचा प्रभाव भारतीयच नाही तर पाश्चात्य लोकांवर ही होता आणि आहे अशा श्री सारदा मॉं च्या श्रीचरणी अर्पण करणार आहोत..सारदा मॉं नी भगवान रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवल्यावर रामकृष्ण मिशन चे कार्य नुसतेच बघितले नाही तर त्याला दिशा दिली.स्वामी विवेकानंदांसह सर्व संन्यासी शिष्यांना व सर्व भक्त परिवाराला सारदा मॉं नी आधार दिला.त्या या सर्वांच्या आई झाल्या.प्रत्येक अवतारासह त्यांची शक्ती ही स्त्री रुप धारण करुन त्यांच्यासह लिला करण्यास येते.या राम कृष्ण परमहंस अवतारात ठाकुरांना साह्य करण्यासाठी प्रत्यक्ष आदिशक्ती भगवती सारदा मॉं च्या रुपात अवतार धारण करत्या झाल्या.भगवान रामकृष्ण नेहमी म्हणत , "ती साक्षात सारदा आहे- सरस्वती आहे.ज्ञान देण्यासाठी ती आली आहे.ती माझी शक्ती आहे." ईश्वराचा मातृभाव कशाप्रकारचा असतो हे जगाला दाखविण्यासाठी श्रीसारदादेवींनी मानव देह धारण केला होता.मॉंच्या चरित्रातील या एका वाक्यातून मॉंच्या अतिदिव्य अधिकाराची ,अवताराची कल्पना येते.आज या लेखाद्वारे आपण मॉं च्या चरित्राचे स्मरण करुयात .
श्रीसारदा मॉं चा जन्म मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी,गुरुवार दिनांक २२ डिसेंबर १८५३ ला एका गरीब ब्राम्हण कुटुंबात झाला.मॉं च्या वडिलांचे नाव रामचंद्र मुखर्जी आणि आईचे नाव श्यामसुंदरी होते.बालपणी मॉं चे दिव्य रुप बघण्यासाठी अनेक लोक घरी येत.त्या अतिशय हसर्या मुखाच्या होत्या.श्री रामचंद्र मुखर्जींना श्रीजगदंबेचा आधीच दृष्टांत झाला होता व त्यांच्या पोटी अतिशय दिव्य कन्या जन्म घेणार आहे याची कल्पना त्यांना दिली होती.हळूहळू बाळ लिला करीत मॉं मोठ्या होऊ लागल्या.मॉं च्या बाळलिलां बद्दल आज जास्त माहिती उपलब्ध नाही.खेड्यात जन्म झाल्यामुळे व घरी अठरा विश्वे दारिद्र्य असल्याने मॉं ना लौकिक शिक्षण प्राप्त करता आले नाही.बालपणापासूनच मॉं घरकामात हातभार लावीत,स्वैपाक करित.थोड्या मोठ्या झाल्यावर त्या आपल्या वडिलांनाही हातभार लावू लागल्या.एकदा शिहड या आपल्या मातृ गावी मॉं कीर्तन ऐकण्यासाठी आईसोबत गेल्या.ते कीर्तन भगवान रामकृष्ण परमहंस यांचे भाचे ह्रदयराम यांच्या घरी होते.त्यावेळी हृदयरामांनी ठाकुरांनाही आपल्या घरी पालखीत बसवून आणले होते.तिथे पोचल्यावर रामकृष्ण आपल्या भावात तल्लिन होते.तिथे पुष्कळ गर्दी झाली होती.त्या गर्दीत सारदा मॉं ही आपल्या आईच्या मांडीवर बसलेल्या होत्या. सहा वर्षांच्या सारुला शेजारीणीने जवळ घेतले व थट्टेने विचारले , 'लग्न करतेस? मग ह्या सगळ्या मंडळींमध्ये तुला कोण पसंत आहे ?' तेव्हा सहा वर्षांच्या सारु ने रामकृष्णांकडे बोटाची खुण करत यांच्याशी आपल्याला लग्न करायचे आहे असे म्हटले. इकडे घरी रामकृष्ण परमहंसांच्या आई चंद्रमणी आपल्या मुलाचे आता कसे होईल,याला कोण मुलगी देईल या विचाराने दु:खी होऊ लागल्या.एक दिवस भगवान रामकृष्ण आपल्या भावातून बाहेर आले व आपल्या आईला स्पष्ट शब्दात म्हणाले, "इकडे तिकडे पाहणे अगदी व्यर्थ आहे.जयरामवाटी येथील रामचंद्र मुखर्जी ह्यांच्या घरी वधू खूण लावून ठेवली आहे.तेथे जाऊन पहा." लवकरच इ.स १८५९ रोजी वैशाख महिन्यात भगवान रामकृष्णांचा सारदा देवींशी विवाह पार पडला.विवाह प्रसंगी ठाकुरांचे वय २४ तर मॉं केवल ६ वर्षांच्या होत्या. लग्नानंतर ठाकुर मॉंना त्यांच्या माहेरीच ठेवून दक्षिणेश्वरीला गेले.तो ठाकुरांचा साधना काळ होता.त्यावेळी त्यांच्या हृदयात आग होत असे.झोप लागत नसे.जगन्मातेचे रुप त्यांना चराचरात दिसू लागले..या दिव्य काळात त्यांना आपल्या घरच्यांचा,पत्नीचा पूर्ण विसर पडला.इकडे सारदा मॉं आता १३ वर्षांच्या झाल्या.सात वर्ष कठोर साधना केल्यामुळे कृश झालेले ठाकुर त्यांच्या गुरु भैरवी ब्राह्मणी व हृदयराम बरोबर आपल्या गावी कामारपुकुर या गावी आले.लवकरच सारदा मॉं ही तेथे येऊन पोचल्या.श्रीठाकुरांचा दिव्य भावावेश,त्यागपूर्ण , तेजस्वी जिवन या सर्वांचा सारदा मॉं वर प्रभाव पडू लागला. ठाकुरांनाही या आपल्या पत्नीला हर एक प्रकारे उपदेश केला.त्यांना सेवा भाव शिकवीला.जणू आपल्या जगभर चालणार्या महान अलौकिक कार्यासाठी ते मॉं ना तयारच करु लागले.सात महिने ठाकुर कामारपुकुर या गावी होते.या काळात त्यांनी अनेक प्रकारे सारदा मॉं ना पारमार्थिक मार्गदर्शन व उपदेश केला.त्यानंतर ठाकुर दक्षिणेश्वरीला परतले व मॉं आपल्या गावी.
पुढे २५ मार्च १८७२ ला सारदा मॉं दक्षिणेश्वरीला राहण्यास आल्या.त्या ठाकुरांची निस्सीम सेवा करु लागल्या.एकदा ठाकुरांनी म्हटले, "तुम्ही काय मला संसारात ओढायला आल्या आहात का?" त्यावर मॉं निश्चयाने म्हणाल्या , "मी कशाला तुम्हाला संसारात ओढू? मी तर तुम्हाला तुमच्या इष्टप्राप्तीत मदत करावयास आली आहे." त्यावेळी मॉं चे वय १९ वर्षांचे होते.मॉं ना आपले अवतार कार्य कळले होते व या वाक्यातून त्यांच्या विचारातील स्पष्टपणा व निश्चय दिसून येतो. रामकृष्ण परमहंस जसे इश्वरी अवतार पुरुष होते तसेच मॉं देखील नित्य सिद्ध अतिमानवी स्त्री होत्या.एकदा मॉं ठाकुरांचे पाय चेपत होत्या .तेवढ्यात त्या ठाकुरांना म्हणाल्या , "बरे,एक गोष्ट सांगा.तुम्ही माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहता?" श्रीरामकृष्णांनी नि:संकोचपणे उत्तर दिले, "जी आई मंदिरात आहे,जिने मला जन्म दिला आहे,तीच माझे पाय दाबत बसली आहे.खरोखर तुम्ही साक्षात आनंदमयी आहात.तिच्याच रुपात मी तुम्हाला पाहतो." या उत्तरातून मॉं चे खरे स्वरुप व मॉं चा असामान्य अधिकार लक्षात येतोच.पुढे इ.स १८७२ रोजी जेष्ठ अमावस्येला फलहारिणीदेवीच्या पूजेच्या दिवशी श्रीरामकृष्णांनी षोडशी पूजा केली.पण ही पूजा वेगळी होती.कारण यावेळी मॉं दक्षिणेश्वरीस होत्या.ठाकुरांनी मॉं चे त्रिपुरसुंदरी रुपात समंत्रक पूजन केले.पूर्ण षोडशोपचार पूजन करतेवेळी मॉं प्रगाढ समाधीत होत्या.समाधिमग्न हे पूजक व समाधिमग्न देवी आत्मरुपात एक होऊन गेले होते.मुद्दाम चरित्रातील एक घटना देतोय.रामकृष्ण देवांचे अतिप्रिय शिष्य श्री स्वामी शिवानंदजी यांनी एकदा आपल्या शिष्याला पत्र लिहीले होते.ते त्या पत्रात मॉं सारदा बद्दल लिहीतात की, "त्या मानवी नाही.त्या साधकही नाही आणि सिद्धही नाही.त्या नित्यसिद्ध आहेत.त्या आदिशक्तीच्या अंशस्वरुप आहेत.काली ,तारा, भुवनेश्वरी ह्यांच्या सारख्याच माताजी ही आहेत. असा माझा दृढ विश्वास आहे."
श्रीरामकृष्णदेवांच्या साधनाकालीन जीवनक्रमाचा अधिकांश इतिहास आज आपल्याला उपलब्ध आहे.परंतु सारदा मॉं चा साधना काल हा जास्तीत जास्त काळ एकांतात व्यतित झाला असल्याने तो अज्ञातच आहे. षोडशी-पूजनाच्या रात्रीच जणू,सारदा मॉं चे आध्यात्मिक जीवनाचा प्रथम भाग प्रगट झाला.तेव्हापासून त्यांनी साधन-भजनादींचे अनुष्ठान नियमपूर्वक स्वीकारले.ईश्वराचे ध्यान करण्यात त्या रात्ररात्र व्यतीत करु लागल्या.एकदा आपली भाची नलिनी देवी हिच्या जवळ त्या म्हणाल्या होत्या, "मी जेव्हा तुझ्याएवढी होते तेव्हा मला केवढा कामाचा डोंगर उपसावा लागत असे.पण त्याही काळी ,सगळे काम सांभाळून मी एक लाख जप करीत असे." या वरुन त्यांच्या साधनेची पुसटशी कल्पनाच आपण करु शकतो.पुढे पुढे तर मॉंना ही वेळोवेळी भाव समाधी लागत असे.याचे अनेक उदाहरण मॉं च्या चरित्रात दिलेले आहेत.शब्दमर्यादेस्तव ते आपल्याला घेता येणार नाही.तरी एक प्रसंग मुद्दाम इथे देतो.ठाकुरांच्या स्त्री भक्त योगींद्रमोहिनी या अनेक वेळा दक्षिणेश्वरीस येत व ठाकुरांच्या,मॉं च्या सहवासात राहून तृप्त होत.एकदा असेच त्या मुक्कामी आल्या होत्या.मॉं त्यांना आपल्या जवळच झोपायला लावित. एका रात्री बाहेरुन अचानक बासरीचा आवाज यायला लागला.तो आवाज ऐकून मॉं तत्क्षणी भावसमाधी अवस्थेत गेल्या.कितीतरी वेळ मॉं त्या अवस्थेत स्थिर होत्या.खुप वेळ गेल्यावर त्या देहस्थितीत परतल्या.अगदी लहानसे कारण घडले तरी तेवढ्यानेच सारदा मॉं भाव समाधीत जात असत.दक्षिणेश्वरीला आल्यापासून ते ठाकुरांनी देह ठेवेपर्यंतचा १५ वर्षांचा काळ हा मॉंच्या कठोर साधनेचा , तपश्चर्येचा काळ होता.मॉं ना ठाकुरांनी कधीही एकेरी शब्दात संबोधन केले नाही.एकदाच चुकुन ठाकुर मॉं ना "तु" म्हटले तेव्हा त्यांना त्याचे अमाप दु:ख झाले.यावरुन मॉं बद्दल असलेला आदर किंवा मॉं च्या विलक्षण अवतारा बद्दल लक्षात येते.इतरांना जरी मॉं वरवर सर्वसामान्य दिसत असल्या तरी त्यांचे खरे रुप ठाकुरांनाच ज्ञात होते.मातीजींच्या जिवनाच्या माध्यमातून ठाकुरांनी जगासमोर स्त्रीत्वाचा एक नवा आदर्श प्रस्थापित केला.मातृत्वाच्या विकासाची नवी कल्पना प्रस्थापित केली. एकदा इ.स १९०७ मध्ये एका भक्ताने मॉं ना विचारले , "तुम्ही सगळ्या जगाची आई आहात का?" मॉं म्हणाल्या , "हो." अतिशय चकित होऊन त्या भक्ताने पुन्हा विचारले,. "अनेक प्राणी आहेत,जिवजंतू आहेत,त्या सगळ्यांची आई ही तुम्हीच आहात का?" मॉं सारदा सि:संकोचपणे म्हणाल्या, "होय,मी त्या सर्वांची सुद्धा आई आहे." यावरून मॉं च्या रुपात/अवतारात ठाकुरांनी जगासाठी मातृभावाचे अलौकिक प्राकट्याच केले होते.असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
हळूहळू आपल्या स्नेहाने आणि ममतेने सगळ्या भक्तांना मॉं नी आपल्याकडे आकर्षित केले.पुढे ठाकुरांना गळ्याची व्याधी उद्भवली.त्यांनी पाच वर्षा आधीच मॉं ना आपल्या प्रयाणाची कल्पना देऊन ठेवली होती.ती व्याधी वाढत जाऊन इ.स १५ ऑगस्ट १८८६ ला ठाकुरांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.ठाकुरांच्या पवित्र देहाचा अंतिम विधी झाल्यावर मॉं आपले सर्व सौभाग्य अलंकार काढीत होत्या.त्यांनी आपल्या हातातील बांगडीला हात लावताच ठाकुर तिथे चिन्मय देहाने अवतरले व त्यांना म्हणाले, "मी काय मेलो आहे? हातातील हे सौभाग्य चिन्ह का उगीच काढता?" त्यानंतर मॉं ना ठाकुरांच्या नित्य अस्तित्वाची साक्ष पटली व त्यांनी त्या बांगड्या पुढे तशाच ठेवल्या.रामकृष्णांनी देह ठेवल्यावरही या सगळ्या भक्तांची ,शिष्यांची जबाबदारी मॉं नी सांभाळली होती.पुढे माताजी ठाकुरांच्या विरहाने इतक्या व्याकुळ झाल्या की त्यांनी आपला देह ठेवण्याचा विचार केला होता.तेव्हा ठाकुर पुन्हा चिन्मय रुपात प्रगटले व त्यांना म्हणाले , "नाही,तुम्हाला राहावेच लागेल.अजून पुष्कळ कार्य व्हायचे आहे." पुढे माताजी आपल्या काही भक्तांसमवेत एक वर्ष वृंदावनात राहायला गेल्या होत्या.त्या ठिकाणी त्यांच्या प्रगाढ समाधीचे,भावावस्थेचे दर्शन अनेकांना घडले.त्याच सुमारास ठाकुरांनी मॉंना योगेन (योगानंद) या भक्ताला दीक्षा देण्याची आज्ञा केली.ही मॉं नी दिलेली पहिली दीक्षा.पुढे तिर्थयात्रा करत मॉं पुन्हा दक्षिणेश्वरीला परतल्या.पण त्यांना ठाकुरांचा आदेश झाला की , "तुम्ही कामारपुकुरला राहा.तिथे भाजीपाला करा आणि भात भाजी खाऊन हरिस्मरण करीत दिवस काढा." त्या वेळी मॉंनी अतिशय दारिद्र्याचे दिवस काढले पण त्यांच्या अंतरंगातील आत्मानंदाची बैठक यत्किंचितही मोडली नव्हती. पुढे एकदा सहज गोष्टी निघाल्यावर मॉं म्हणाल्या होत्या, "मी असेपर्यंत मला कोणीही ओळखू शकणार नाही.गेल्यावर मात्र सगळ्यांना कळेल." यातच सर्व आलं असे मला वाटते.कामारपुकुर या खेडेगावात लोकांनी मॉं ना खुप त्रास दिला.त्यांना ते नेहमी बोलत असत.त्यांचा तिरस्कार करत असत आणि या बरोबरच मॉं कठिण अशा परिस्थितीत, दारिद्र्यात राहत असत.पण पुढे ठाकुरांच्या संन्यासी शिष्यांनी मॉं ना कलकत्यास आणाण्याचे ठरविले व लवकरच आपल्या या पुत्रांचे म्हणणे ऐकून मॉं सन १८८८ ला कलकत्यास आल्या.आता मॉं च्या हृदयात ,जीवकल्याणस्वरुप दयामूर्ती श्रीरामकृष्णांचा उदय झाला होता.याचा अनुभव पुढे ठिक ठिकाणी येतो.पुढे १८९० साली स्वामी विवेकानंद मॉं चे आशिर्वाद घेऊन भारत भ्रमणाच्या त्यांच्या दिव्य यात्रेला निघाले.मॉं नी त्यांना भरभरुन आशिर्वाद दिले.भारत भ्रमण करुन आल्यावर विवेकानंद सन १८९६ ला सर्वधर्म परिषदेस शिकागो येथे जाणार होते तेव्हा ते मॉं ना येऊन भेटले.मॉंनी त्यांना चिंता न करता ठाकुर बरोबर असल्याची ग्वाही दिली व आश्वस्थ करुन आशिर्वाद दिले आहे.पुढे विश्वविजय करुन आल्यावर विवेकानंदांनी मठ स्थापनेसाठी अपार कष्ट घेतले व इ.स १८९८ ला नोव्हेंबर महिन्याया १२ तारखेला मॉंच्या उपस्थितीत त्यांनी मठात प्रवेश केला.तिथे मॉंनी आपल्या नित्यपुजेतील ठाकुरांच्या फोटोंची स्थापना केली व जगविख्यात "रामकृष्ण मिशन" ची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.या मठात पुढे भगवान रामकृष्णांचे अवशेष देहभस्म विवेकानंदांनी आपल्या खांद्यावर चालत आणले व अनंत काळासाठी त्याची या दिव्य मठात स्थापना करण्यात आली. पुढे आपल्यातील मातृभाव कायम राखुन मॉं अनेक भक्तांच्या गुरु झाल्या.अनेकांना दीक्षा देऊन मॉंनी त्यांचा उद्धार केला.या ही वेळी ठाकुर स्वतः प्रगट होऊन मॉं ना मार्गदर्शन करीतच असत.आपल्या संन्यासी बालकांची मॉं सर्वोपरी काळजी वाहत असतं.अनेकांना मॉं चे भेटी आधीच स्वप्न दर्शन झाले होते.असे अनेक भक्त मॉं चा शोध घेत त्यांच्या पर्यंत येऊन पोहचत.अशी अनेक उदाहरणे चरित्रात ठिक ठिकाणी आली आहेत.भगवान रामकृष्णांनी देह ठेवल्यावर मॉं नी आपले करुणेनी सर्वांना आश्रय दिला,संघाचे रक्षण केले.आपल्या आध्यात्मिक शक्तीच्या प्रभावाने त्यांनी संघातील प्रेम बंधनाला अधिकच दृढ केले.
श्रीसारदा मॉं बहुदा कुणालाही काहीच उपदेश देत नसत.कोणी जर हट्टच केला तर श्रीरामकृष्ण देवांकडे बोट दाखवून त्या म्हणत , "मी आणखी काय उपदेश देणार? ठाकुरांचा उपदेश चित्तात बाळगून वागाल तर सगळे काही ठीक होईल." श्रीसारदा मातेच्या योगमय जिवनाची पार्श्वभूमी ही फक्त रामकृष्णदेव होते.मॉं नी शेकडो लोकांना दीक्षा दिल्या, पण त्या सगळ्यांच्या समोर त्यांनी श्रीरामकृष्णांचेच तेजस्वी स्वरुप उभे केले."ठाकुरच गुरु आहेत.ठाकुरच इष्ट आहेत,ठाकुरांचेच नाव घ्या,ठाकुरांचाच आश्रय घ्या." कधीकधी ,भक्तांच्या संतोषासाठी ,त्यांनी आपल्या नावाचा जप आणि ध्यान जरी सांगितले असेल तरी ते देखील ठाकुरांत आणि आपल्यात अभेद मानूनच करायला सांगितले. मॉं प्रत्यक्ष पूर्ण भगवती अवतार होत्या असे ठाकुरांनी आणि अनेक महात्म्यांनी सांगितले होतेच.तरी मॉं नी आपल्या जिवन कार्यात कधीही ते जाणवू दिले नाही.त्या आपल्या आपल्या सामान्य भक्तांमध्ये अतिसामान्य बनून राहत.हजारो लोक मॉंच्या चरणी शरणं येत असत.त्यांना "तुम्ही रुद्रानी आहात , भगवती आहात,जगज्जननी आहात" असे म्हणत चरणी लोटांगण घालीत पण आश्चर्य असे की मॉं ना याचा काडीचाही अहंकार नव्हता.सारदा मॉं जेव्हा खुप आजारी होत्या तेव्हा एक प्रौढ स्त्री त्यांच्या दर्शनास आली होती."तुम्ही जगदंबा आहात,सर्वकाही आहात " अशा शब्दांत ती त्यांची स्तुती करु लागली.ते ऐकताच मॉं कडाडल्या , "चल मोठी आली 'जगदंबा' वाली! त्यांनी (ठाकुरांनी ) दयावंत होऊन आपल्या चरणांशी मला आश्रय दिला एवढ्यानेच मी धन्य झाले आहे. यावरुन लक्षात येते की मॉं ने ठाकुरांच्या परमतेजस्वी आभेखाली आपले संपूर्ण अस्तित्व लपवून टाकले होते.
एकदा एक मुलगा मॉंकडे आला.त्याने दर्शन घेतले आणि प्रणाम केला.आपल्या मनातील काही गोष्टी मॉं जवळ सांगाव्या म्हणून तो आला होता.पण तिथे काय बोलावं हे न सुचल्याने तो बाहेर एका कोपर्यात बसून होता.सारदा मॉं नी त्याची ही विवंचना ओळखली.त्या म्हणाल्या, "बेटा ,आत ये बघू ,इथे बसून सांग तुला काय सांगायचे ते." तो मुलगा म्हणाला, "नाही आई ,मी इथेच बरा आहे.आई ,मी हलक्या जातीचा आहे." भावपूर्ण स्वरात मॉं म्हणाल्या, "अरे ,तू हलक्या जातीचा आहेस असे तुला कुणी सांगितले? तू तर माझा मुलगा आहेस.ये, आत येऊन बैस." श्रीरामकृष्णदेव म्हणत असत, "भक्तांना कुठली जात? अर्थात सगळ्या भक्तांची एकच जात असते.आणि जातिभेदाचे काय? तो केवळ एकाच उपायाने नाहीसा होऊ शकतो.तो उपाय म्हणजे भक्ती...अस्पृश्य देखील शुद्ध होतात.चांडाल देखील भक्ती अंगी बाणली म्हणजे चांडाल राहत नाही.चैतन्यदेवांनी आचांडाल सगळ्यांना आलिंगन दिले होते." काय सुंदर हा उपदेश आहे.मॉंनी सर्वांवर किती करुणा प्रेम दिले याचा अंदाजही आपण आज बांधू शकणार नाही.किती ती मातृवत्सलता! सर्व काही अगदी अलौकिक आहे.पुढे जगद्धात्रीपूजेचा पहिला दिवस आला. त्याआधी एक अलौकिक घटना घडली.सारदा मॉं ना एक भाऊ होता.ज्याचे नाव होते प्रसन्न कुमार.याला एक विमला नावाची मुलगी होती.तिच्या पायात कसले तरी विष भिनले व तो चांगलाच सुजला.तिला अगदी फणफणून ताप आला.हळूहळू ती बेशुद्ध झाली.विमलेची शेवटची घडी येऊन ठेपली.अशावेळी बांकुडा येथील आश्रमातील डॉक्टरांनी विमलेला औषध दिले, आणि मॉं ना तो म्हणाला, "केवळ तुमच्या म्हणण्यासाठी मी औषध दिले.अन्यथा आता काही आशा नाही.नाडी बंद पडली आहे.औषधही पोटात गेले नाही.तसेच्या तसे बाहेर पडले." ते ऐकून मॉं आपल्या नव्या घरातून उठून प्रसन्नकुमारांच्या घरी गेल्या.त्यांच्या पत्नीचे नाव होते, "सुवासिनी" .तिने मॉंचे चरण धरले व ती धाय मोकलून रडू लागली.तिने त्यांच्या चरणांची धूळ पाण्यात घालून ते पाणी विमलेच्या तोंडांत घातले.मॉंनी विमलेच्या सर्वांगावरुन हात फिरवीला.मग मॉं जगद्धात्रीच्या मुर्ती समोर हात जोडून,अश्रु पूर्ण नयनांनी प्रार्थना करु लागल्या, "आई उद्या तुझी पूजा आहे.त्यावेळी माझ्या मोठ्या भावजयीला तू काय हंबरडा फोडून रडायला लावणार आहेस का?" चमत्कार असा झाला की त्याच रात्री विमला शुद्धीवर आली.पण जगद्धात्री पूजेनंतर मात्र मॉंची प्रकृती बिघडू लागली.वारंवार ताप यायला लागला.पौष महिन्यात तर प्रकृती अधिकच बिघडली व त्यांनी अंथरूणच धरले.पुढे मग संन्यासी शिष्यांनी, भक्तांनी मॉंची सेवा केली व त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
अशा प्रकारे अनेक भक्तांना मॉंं सारदेनी मार्गदर्शन केले,आपला अनुग्रह दिला.त्यांना त्रिविध तापांतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला."रामकृष्ण मिशन" या संघाला सांभाळले.आपल्या मातृवत्सलता , परमकरुणेनी त्या हजारो शरणांगतांच्या आई झाल्या.
आदिशक्तीने रामरायांसारखा मानवी देह धारण करुन या मानवी देहाच्या सर्व मर्यादा पाळल्या,दु:ख सोसले,कष्ट उपसले, दारिद्र्यात राहिल्या आणि जो कुणी आपल्याला शरण येईल त्यांना कृपा पूर्वक ठाकुरांच्या चरणांचा आश्रय दिला.कुठेही मॉंनी आपले अलौकिकत्व प्रगट केलेले दिसत नाही. इसवी सन १८९४ मधे ,स्वामीजींनी अमेरिकेतून आपल्या एका गुरुबंधूला लिहिलेल्या पत्रात पुढील वाक्ये आलेली आहेत, "माताजींचे खरे स्वरुप तुम्हाला अजून कळले नाही.तुमच्यापैकी कोणालाच कळले नाही.हळूहळू तुम्ही ते समजू शकाल.माझे डोळे आता उघडले आहेत.दिवसेंदिवस माझ्या सगळे लक्षात येऊ लागले आहे.पण खरे सांगतो,तुमच्यापैकी कोणीही माताजींना अजून निट ओळखू शकले नाही.माझ्यावर पित्याच्या कृपेपेक्षा मातेची कृपा अपार आहे.माताजींच्या संबंधी मी जरा एककल्ली आहे.माताजींच्या आज्ञा होताच हे भूत ,हे विरभद्र काय वाटेल ते करू शकतो.अमेरीकेला येण्यापूर्वी मी मुद्दाम पत्र लिहून माताजींचा आशिर्वाद मागविला होता.त्यांनी आशिर्वाद दिला आणि बस,मी लगेच उड्डाण घेऊन समुद्रापलिकडे गेलो.एवढ्यात काय ते समजून घ्या." या स्वामीजींच्या शब्दातून सारदा मॉं चा अधिकार ,अलौकिकत्व,अवतारित्वा ची साक्षच मिळते.
अशा या दिव्य विभूती ने मंगळवार दिनांक २० जुलै १९२० रोजी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला व त्या आपल्या स्वधामी परतल्या.स्वामी अपूर्वानंदांनी लिहीलेले श्री सारदा मॉं चे चरित्र एकदा तरी आपण सर्वांनी जरुरच वाचायला हवे.इतके विलक्षण आणि सर्वांग सुंदर असे हे चरित्र आहे. ही शब्दसुमनांजली मी श्री सारदा मॉं च्या सुकोमल चरणी अर्पण करतो आणि प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या व ठाकुरांच्या श्रीचरणांची कृपा करुणा अखंड आपल्या सर्वांवर तेवत ठेवावी.
✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

