🙏 सगुणभगवद्स्वरूप भाग २ :- श्रीमद प.प सद्गुरु श्री योगानंद सरस्वती तथा गांडा स्वामी महाराज.
तो वै भूमा तत्सुखं त्वेतिगीतं गेयातीतं ध्यानगम्यं मुनीन्द्रम् । भक्तैकार्यं ह्यात्त मानुष्यमूर्तिं योगानन्दं तं यतीन्द्रं नतोऽस्मि ।।
थोरल्या स्वामी महाराजांच्या शिष्य प्रभावळीतील द्वितीय दैदिप्यमान संन्यासी शिष्य असलेले श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री योगानंद सरस्वती तथा गांडा स्वामी महाराज म्हणजे गुरुसेवा,गुरु निष्ठेचे मुर्तिमंत सगुण स्वरुपी होते.श्री स्वामी महाराजांची प्रत्यक्ष सेवा आणि मोठा काळ सहवास लाभलेल्या भाग्यवान शिष्या पैकी एक असलेले गांडा बुवा हे महायोगी होते.श्रीगांडाबुवांनी केलेली गुरुसेवा म्हणजे प्रत्येक गुरुभक्तासाठी एक मार्गदर्शनाची संहिता च आहे.गुजराती असलेल्या गांडाबुवांनी लिहीलेला "गुरुमूर्ती चरित्र" हा मराठी प्राकृत ग्रंथ बघितला तरी त्यांच्या विद्वत्तेची,अधिकाराची जाणिव झाल्याशिवाय राहत नाही.
गुजरात राज्यातील सुरत जवळील तलंगपूर या छोट्या गावामध्ये प.प.सद्गुरु श्रीयोगानंद स्वामी महाराजांनी, शके १७९० मध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी म्हणजे दत्तजयंती च्या परमपावन दिनी मानवी रूपाने अवतार धारण केला. त्यांच्या आईचे नांव सौ.काशिबाई होते व वडिलांचे नांव श्री डाह्याभाई होते.हे दाम्पत्य अतिशय धर्मपरायण आणि मोठे शिवभक्त होते.डाह्याभाई चे वडिल श्रीशंकरभाई लालजी हे भगवान निलकंठेश्वर महादेवांचे अनन्य भक्त होते. हेच भगवान निलकंठेश्वर महादेव या कुळाचे आराध्य ही होते.त्यांच्या कुळातील शिवभक्ती जणू फलस्वरुपच गांडा बुवांच्या रुपात जन्माला आली..श्रीदत्तजयंतीच्या दिवशी दत्तजन्माच्या वेळीच पुत्ररत्न प्राप्त झाल्याने देसाई परिवार आनंदाने न्हाऊन गेला.बाराव्या दिवशी ज्योतिषाला बोलावण्यात आले.त्याने पंचांगानुसार बाळाचे जातक पाहिले.कुंडलितील ग्रहस्थिती नुसार फलश्रुती सांगितली ती अशी की,हा मुलगा कुळाचा उद्धार करील, भवसागरात,संसारसागरात बुडालेल्या आर्तजनांचे दु:ख दूर करील.हे ऐकून डाह्याभाईंच्या आनंदाला पारावार उरला नाही.नंतर या भाग्यशाली बाळाचे "कल्याण" असे नाव ठेवण्यात आले.कल्याण बालेंदुवत् वाढू लागला.योगभ्रष्ट महात्मा असल्याने त्यांचे बालपण ही तेवढेच विलक्षण असेच होते.त्यांना बालपणीच शिवपूजनाची गोडी वाटू लागली.ते एकांतात ध्यानमग्न स्थितीत रमून जात असत.वयाच्या आठव्या वर्षी बाळ कल्याण चे मौंजीबंधन करण्यात आले.त्यानंतर ते नित्यकर्म शिकले. स्नान , संध्या , शिवपूजन, श्रीरुद्राभिषेक ते अतिशय तन्मयतेने तल्लीन होऊन करु लागले.सवंगड्यांसह खेळण्याबागडण्याच्या वयात एकांतात रमण्याची त्यांची वृत्ती दिसत होती. त्यामुळे घरातील वडीलधाऱ्यांनी लाडाने त्यांचे नांव गांडा असे ठेवले. (गुजराती भाषेत गांडा या शब्दाचा अर्थ भोळा असा होतो.) त्याकाळी शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता. तलंगपूर येथे एक गावठी शाळा होती. त्या शाळेतच कल्याणजींचे शिक्षण झाले. व्यवहारासाठी आवश्यक असणारे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या , लौकिक शिक्षणाची इतिश्री झाली. त्यानंतर सद्ग्रंथांचे वाचन करण्याचा छंदच त्यांच्या मनाला लागला. यातून अनेक ग्रंथाचे वाचन घडले. पूर्वजन्मीच्या संस्कारांनी चित्त शुद्ध होतेच, त्यात अशा धार्मिक संस्काराची व कृतीची जोड मिळाली.
त्या काळातील रुढीप्रमाणे कल्याणजींचे लग्न सौ.केसरबाई यांच्याशी झाला. पुढे वय वाढले तशी कौटुंबिक, जबाबदाऱ्यांची जाणीव कल्याणजींच्या मनात झाली. कुटुंबाच्या मिळकतीत हातभार लावावा म्हणून सचिन संस्थानातील एका शाळेत शिक्षकाची नौकरी त्यांनी पत्करली. प्रमाणिकपणाने अध्यापनाचे कार्य करावे आणि उरलेल्या वेळात शिव-आराधना व धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे असे दिवस जाऊ लागले. संसारही जगरहाटीप्रमाणे चाललेला होता. पुढे डाह्याभाईंनी त्यांना शिक्षकाची नौकरी सोडून शेतीच्या कामात लक्ष घालण्याची आज्ञा केली. त्यानुसार कल्याणजींनी शिक्षकाची सोडली व ते शेतीच्या कामात लक्ष घालू लागेल. शेतीची कामे करावीत आणि उरलेल्या वेळी भगवान नीळकंठेश्वराची आराधना करावी असा कल्याणजींचा दिनक्रम सुरू झाला. तसा त्यांच्या मनात प्रापंचिक गोष्टींना थारा नव्हता. मन शिव-आराधनेत तल्लीन होऊ पाहत होते. म्हणूनच श्री नीकंठेश्वराची षोडशोपचारे पूजा करण्याचा त्यांचा नियम कधीच चुकत नव्हता. प्रतिवर्षी श्रावणमासात सव्वालक्ष बिल्वपत्रे महादेवास अर्पण करण्याचा नियम कटाक्षाने पाळला जात होता.श्रीकल्याणजी हे संसारात राहून सारी गृहकृत्ये करीत होते तरीही पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे त्यांच्या मनात अनुसंधान सतत आत्मोपलब्धीकडेच असे.
कल्याणजी आपला शिवपूजनाचा नियम कटाक्षाने पाळित असत. एकदा कल्याणजींना त्यांच्या भाच्याच्या लग्नास जावे लागले.ते लग्न तलंगरपूरपासून वीस-पंचवीस मैल दूर असलेल्या पिंपळदरा या गावी होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच शिवरात्र होती आणि शिवरात्रीस, मध्यरात्री शिवपूजन करण्याचा त्यांचा नियम होता. तलंगपूरला पोहोचता आले नाही. तर इतके दिवस निष्ठेने पाळलेले शिवरात्र व्रत भंग होणार होते. आजच्या सारखी प्रवासाची साधने त्या काळी नव्हती. त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच गावाकडे परत जाण्याचा निश्चय कल्याणजींनी केला. दुसरे दिवशी पायी निघून ते अमलसाड स्टेशनवर आले, पण गाडी निघुन गेली होती. अन्य कोणतेही प्रवासाचे साधन नव्हते. त्यांनी शरीरास पडणाऱ्या कष्टांचा विचार केला नाही. सरळ पायी चालत २० मैलांचे अंतर कापून कल्याणजी रात्री अकरा वाजता तलंगपूरास पोहोचले. मध्यरात्री भगवान नीळकंठेश्वराची प्रतिवर्षाप्रमाणे त्यांनी यथासांग षोडशोपचारे पूजा केली. केलेला नियमु कोणत्याही परिस्थितीत पाळणे हे त्यांचे ब्रीदच होते. अशा कर्मनिष्ठ,शास्त्रनिष्ठ व व्रतस्थ साधकाला श्री थोरल्या स्वामी महाराजांसारखे सद्गुरु लाभणारच यात नवल तरी काय!! केवढी ती विलक्षण धर्मनिष्ठा, कर्मनिष्ठा!!!
वडिलांनी शेती करण्यास सांगितले म्हणून कल्याणजी शेती करु लागले खरे पण त्यांचे मन मात्र त्यात रमत नव्हते. आध्यात्मिक जिवनात प्रगती कशी साधता येईल याचाच ध्यास त्यांच्या मनास सतत लागला होता. संत सहवास, सद्गुरु सहवासा शिवाय ते शक्य नाही हे त्यांना ठाऊक होते. त्यासाठी तलंगपूर कसे सोडता येईल याचा विचार कल्याणजींनी मनात सुरू झाला. पुढे नोकरी करिता कल्याणजी मद्रासला ही गेले.त्यांना जसे हवे होते तसेच घडून आल्यामुळे कल्याणजी आनंदात होते.पुढे मद्रास ला अनेक घडामोडी घडल्या.त्यानंतर नाशिकला संत सहवासात राहण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली. एका महात्म्याचा सहवास त्यांना लाभला. संत सहवासाने त्यांचे मन अत्यानंदाने भरून गेले. प्रवासाने आलेला शीण, थकवा कुठल्याकुठे पळून गेला. भूक, तहानही ते विसरून गेले. या काळात त्यांनी त्या संत महात्म्याची अनन्यभावे व नि:स्वार्थवृत्तीने सेवा केली. त्या संतांनी कल्याणजींना रामेश्वराची पायी यात्रा कर म्हणजे आत्मिक सन्मार्गाचा लाभ होईल असे मार्गदर्शन केले. त्यानुसार संताचा आशीर्वाद घेऊन ते पायीच रामेश्वरला जाण्यासाठी निघाले. ती यात्रा करुन ते मद्रासला परतले.काही काळ नोकरी केली पण पुन्हा त्यानंतर तलंगपूरास परतले.तिथे कपड्यांचे दुकान टाकले.ते दुकान ही उधारी थकल्यामुळे दुकान बंद करावे लागले. पुढे कल्याणजींनी चुलत भावाबरोबर भागिदारी करून निकोरा या गावी गुळ व तंबाखूचा व्यापार सुरू केला. सौ.केसरबाईसह निकोरा येथे घरही थाटले. तेथे त्यांचा व्यापार जोरात चालू लागला. पैसा हाती येत होता पण लागलीच खर्चही होत होता. व्यापारी वृत्तीने पैशाचा धनसंचय करण्याची मुळातच त्यांची वृत्ती नसल्याने दीनदुबळ्यांना, गरजू लोकांना दान दिले जाई. पुढे कल्याणजींच्या मनातील वैराग्याने उचल खाल्ली आणि त्यांना आपल्या संसाराचा ,घराचा त्याग केला.मुळ प्रवृत्ती ही संन्यस्थच होती त्यामुळे ते संसारात खूप काळ रमणारच नव्हते याची कल्पना आपल्याला येईलच.
घर सोडल्यावर ते प्रवास करीत करीत ते नर्मदा किनारी येऊन पोहचले. सद्गुरु शोधार्थ त्यांनी नर्मदा परिक्रमा सुरु केली.या दरम्यान गांडाबुवांनी कठोर तप आचरले.त्यांना श्रीभगवंतांनी अगदी निःसंग करुन सोडले.इतके की परिक्रमेत त्यांच्या अंगावरील वस्त्र ही भिल्लांनी काढून त्यांना नागवा केले.ऐवढेच काय तर गळ्यातील जान्हवे ही दोरा शिवण्यास उपयोगी पडेल म्हणून काढून घेतले.अशा कठोर परिक्षेत गांडाबुवा डगमगले नाही.त्यांनी सद्गुरुंच्या शोधार्थ भ्रमण सुरु ठेवले.या दरम्यान नर्मदा मैयाने अनेक प्रकारे गांडाबुवांवर कृपा केली.(शब्दमर्यादेस्तव तो भाग इथे देता येणार नाही.)नर्मदा किनारी असलेले महान सत्पुरुष पांडुरंग बाबा यांच्या कृपेने गांडाबुवांना आपल्या सद्गुरु स्थानाचा ठाव ठिकाणा गवसला. सद्गुरु माउली श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज मार्कंडेश्वराच्या मंदिरात वास्तव्यास होते. तेथे गुरुदेवांना पाहताच त्यांच्या मनात दिव्यानंद दाटून आला. त्यावेळी गुरुदेवांचे गीतेवर प्रवचन चालू होते. अंतर्ज्ञानाने त्यांनी सगळे जाणले पण प्रत्यक्ष ओळख मात्र दाखविली नाही. एक आठवडा असाच गेला. एके दिवशी गुरुदेवांनी ‘तू येथे का बसून राहतोस? असे विचारले. तेव्हा अत्यंत नम्रभावाने हे समर्थ पाय माझा उद्धार करतील याच विश्वासाने मी या पायाजवळ शरण आलो आहे असे गुरुदेवांना विनवले व आपली सारी जीवनकथाही सांगितली. ते गुरुदेवांसोबत अठरा दिवस सिनोर येथे राहिले. या काळात त्यांनी अत्यंत एकनिष्ठेने गुरुदेवांची सेवा केली. गुरुदेवांच्या सान्निध्यात त्यांच्या मनातील विशाद नष्ट झाला व त्यांचे मन अखंड प्रसन्नतेने भरले. आत्मबोधाच्या साक्षात्कारासाठी ऋतंभराप्रज्ञा जागृत करणे आवश्यक असे. त्या करता योगाभ्यास करण्याची आज्ञा गुरुदेवांनी केली. मार्कंडेश्वराच्या मंदिरातच त्यांचा योगाभ्यास सुरू झाला.पुढे स्वामींच्या आज्ञेने आई वडिलांची स्वामी महाराजां बरोबर राहण्याची परवानगी त्यांनी घेतली.पत्नि व मुलाची ही व्यवस्था लावली आणि स्वामी महाराजांकडे परतले.पुढे श्री स्वामी महाराजांची द्वारका येथे गांडा बुवांनी अनन्य सेवा केली.श्री थोरल्या स्वामी महाराजांच्या "महदपूर" येथील चातुर्मासात ही गांडा बुवा सेवेला सोबत होतेच.
स्वामी महाराजांच्या सान्निध्यात गांडा बुवांना सद्ग्रंथाचे श्रवण आणि मनन घडत होते. शास्त्रप्रणालीनुसार प्रत्यक्ष गुरुमुखातून ज्ञान ग्रहण करण्याचे परमभाग्य त्यांना लाभले होते. गुरु आणि शिष्य तेवढेच अधिकारी होते. त्यांचा योगाभ्यासही व्यवस्थित चालू होता. पण ऋतंभरा प्रज्ञा जागृत व्हावी म्हणून गुरुदेवांनी त्यांना खेचरी मुद्रा करण्यास सांगितले. त्यासाठी जिभेच्या खालची एक सुक्ष्म शीर छेदावी लागते म्हणून गुरुदेवांनी त्यांना गुणाछावनी येथे असलेल्या डॉ.विश्वनाथ ताटके यांच्याकडे पाठविले. शिरोच्छेदन करतांना खूप रक्तस्त्राव झाला. शेवटी गुरुदेवांनी येऊन त्यावर उपचार केला. तेव्हाच रक्तस्त्राव थांबला. गांडाबुवांची प्रकृती खालावली. गुरुदेवांनी नंतर ब्रम्हावर्ताकडे प्रयाण केले व सद्गुरु गांडा महाराज भडोच येथे आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी आले.गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे खेचरी योगमुद्रेचा अभ्यास चालू होता. गुरुदेवांनी सांगितलेल्या सुचनेप्रमाणे आहार व विहार यांचे नियमन गांडाबुवा करीत होते. त्यामुळे प्रकृतीत चांगली सुधारणा झाली व सद्गुरूंनी धर्मजागृतीच्या कार्यास प्रारंभ केला. ते पळसाना, टिंबरवा साकी येथे जाऊन राहिले व तेथील लोकांमध्ये धर्मजागृती केली. तेथून ते भडोच येथे साधनेसाठी परत आले.
एके रात्री गुरुदेवांनी स्वप्नात येऊन सांगितले की तुझी माता आणि भावजय यांनी बिमारीमुळे अंथरून धरले आहे. दुसऱ्या दिवशीच सद्गुरु तलंगूपर येथे पोहोचले. त्यांनी आईची सेवा केली तिच्याकडून दानधर्म करविला. अंतिम क्षणी दत्तप्रभुंचे ध्यान व नामस्मरण करण्यास सांगितले. मातोश्रींनी दत्तनामाचा उच्चार करीत करीत माघ शुद्ध पौर्णिमेस (संवत् १९५९) पार्थीव शरीराचा त्याग करून चिरकाल सौभाग्य प्राप्त केले. त्यानंतर गांडाबुवांनी मातोंश्रीचे उत्तरकार्य व्यवस्थितपार पाडले व त्या वर्षीचा चातुर्मास अश्विनीकुमार येथे केला. पुढे गांडा बुवा वाडीहून श्री स्वामी महाराजां सोबत शृंगेरीला ही गेले.तसेच कुरूगड्डी म्हणजे कुरवपूर येथील चातुर्मासात ही स्वामी सेवेत हजर झाले.हा चातुर्मास पूर्ण झाल्यावर श्री थोरले स्वामी महाराज व गांडाबुवा राजुर येथील यज्ञात उपस्थित राहण्यासाठी निघाले.श्री स्वामी महाराजांच्या उपस्थितीत पार पडलेला हा यज्ञात एकमेवाद्वितीय असा होता.या फक्त यज्ञ प्रसंगावर एक छोटेखानी लेख लिहीता येईल इतका तो विलक्षण आहे.
पुढे श्री स्वामी महाराजांनी गांडा बुवांना नर्मदा किनारी एकांत गाठून वेदांत ज्ञानाचे चिंतन करण्याची आज्ञा केली.पुढे स्वामी महाराजांचा देह ठेवण्याचा काळ जवळ आला तेव्हाही गांडा बुवा महाराजांसमवेतच होते.पुढे श्री थोरल्या महाराजांनी दाखवलेल्या संन्यास मार्गाचा अवलंबन करण्याचे ठरविले.स्वामींच्या दृष्टांतानुसात त्यांनी संन्यास व दंड दिक्षा घेतली आणि योगानंद सरस्वती हे नाम धारण केले.दंड धारण केल्यानंतर सद्गुरु योगानंद स्वामी महाराजांनी पहिला चातुर्मास भडोच येथे केला (शके १८४१) त्यांचा शके १८४२ चा दुसरा चातुर्मास नाशिक येथे झाला. तिसरा चातुर्मास श्री क्षेत्र अनावल श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर (जे अनावील ब्राह्मणांचे कुलदैवत आहे) येथे संपन्न झाला. येथे सद्गुरूंनी योगसुत्रांवर एक पुस्तक लिहिले पण ते सध्या उपलब्ध नाही.पुढे १९४४ मध्ये वैशाखमासाच्या शुक्ल पक्षात सद्गुरु योगानंद महाराज पाथरीकर चौधरी मंडळीसह गुंज येथे आले. तेथे श्री सिध्देश्वर महादेव मंदिरात त्यांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. सद्गुरु श्री प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पाय या स्थानास लागताच त्याचा पांग फिटला. ती जागा स्वच्छ करण्यात आली. सद्गुरूंचे दर्शन घेण्याकरता दररोज अनेक गावांहून लोक येऊ लागले. सावलीसाठी मंडप टाकण्यात आला. अन्नदान होऊ लागले. भजन, किर्तन, पंचपदीच्या गजराने गोदामातेचा पवित्र तीर दुमदुमूनि जाऊ लागला. हे वातावरण भक्तिमय होऊन गेले. शके १९४४ चा दशहरा व चातुर्मास सद्गुरूंनी गुंज येथेच केला.चातुर्मासानंतर सद्गुरु पाथरी व रेणापूरला गेले व तेथून श्री बाबा कल्हे यांच्या विनंतीनुसार ते मानवतला आले. मानवत येथे श्रीदत्त मंदिर नव्हते. तेथे दत्त मंदिर व दत्त पादुका असाव्यात अशी भक्तांची इच्छा होती. त्यानुसार श्री बाबा कल्हे यांनी पुढाकार घेतला. व श्री प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या सानिध्यात शके १८४४ मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीस श्रीदत्तप्रभुंच्या मुर्तिची व पादुकांची प्रतिष्ठापना मानवत येथील राममंदिरात करण्यात आली. सुरुवातीची अकरा आवर्तने होईपर्यंत सद्गुरूंनी कमंडलुतील पाण्याने स्वतः दत्तप्रभुंच्या मूर्तिस अभिषेक केला. मानवतला सद्गुरुंचे वास्तव्य असतांना तेथे पाण्याची तीव्र टंचाई होती. श्रीरंगनाथ जोशी यांच्याकडे आड होता. पण त्यात पाणी नव्हते. सद्गुरूंना हे कळाले तेव्हा त्यांच्या कमंडलुतील पाणी त्या आडात टाकले आणि त्या आडास पुरेपुर पाणी आले.मानवतहून सद्गुरु जिंतूर येथील येथे आले. तेथे श्रीदत्त मंदिरात त्यांनी मुक्काम केला. हे दत्तमंदिर पावसाळ्यात गळत असल्यामुळे खराब झाले होते. त्यामुळे सद्गुरूंनी नाराजी व्यक्त केली व भक्तमंडळीच्या हाताने या मंदिराचा जीर्णोद्धार करून घेतला.
शके १८४५ चा दशहरा गोपेगांव येथे झाला तर चातुर्मास गुंज येथे झाला. याच काळात श्री गुरुमूर्तिचरित्र या ग्रंथाच्या लिखाणास प्रारंभ झाला. सिद्धेश्वराच्या देवालयात बसून सद्गुरु सांगत व गुंज येथील श्री कृष्णाबुवा रामदासी लिहून घेत. श्रीगुरुमूर्ति चारित्राचे पंधरा अध्याय या काळात लिहून पूर्ण झाले.पुढे यथावकाश वाकडी येथे हा पूर्ण झाला.१४,८८३ ओव्यांचा व १३५ अध्यायांचा हा भव्यदिव्य ग्रंथ सर्वांच्या कल्याणासाठी सद्गुरूंनी मराठीत तयार केला. ग्रंथ तर तयार झाला पण आता त्यांच्या शुद्धिकरणाची तळमळ सद्गुरूंना लागून राहिली. इकडे नारेश्वर येथे श्रीरंगअवधूत महाराजांना गुरुदेव श्री प.प.स.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा दृष्टांत झाला की, ब्रह्मचारी, गांडा तुझी वाट पहात आहे. त्यानुसारे श्रीरंगावधूत महाराज वाकडी येथे आले. त्यांनी शुध्दीकरणाचे कार्य पूर्ण केले व नर्मदेस परिक्रमा केल्यानंतर त्यांनी भडोच येथे सहा महिने मुक्काम केला व ग्रंथाची मुद्रीते स्वत: तपासून त्याचे पारायणही स्वत: केले. या कार्यास प.प.श्री.योगानंद महाराजांचे पुर्वाश्रमातील मेहुणे श्री कल्याणजी भाई यांनी खूप मदत केली.
पुढे सद्गुरु योगानंद महाराजांची प्रकृती अस्वस्थ झाली. गुजरातमध्ये ही वार्ता पसरली. सद्गुरूंचे पुर्वाश्रमातील कनिष्ठ बंधू श्री रघुजीभाई, श्री प्रभाशंकर ब्रह्मचारी, प.पू.श्री रंगवधूत महाराज सद्गुरूंच्या सेवेसाठी गुंजेस आले. एक दिवस सद्गुरूंनी भक्तांना बोलावले व सर्वांना आपले मनोगत सांगितले की दत्त संप्रदायाचे कार्य, धर्मजागृती व अन्नदान या गोष्टी गुंज येथे अव्याहतपणे चालू राहाव्यात. या दृष्टिने येथे दत्त मंदिर बांधून संस्थानच्या दृष्टिने आखणी व्हावी. दत्त प्रभुंची कृपा व गुरुदेवांचे आशीर्वाद पाठीशी राहतीलच. कोणतीही शंका मनात आणू नये. एकदा कामाला लागलात म्हणजे कशाचीही कमतरता पडणार नाही. देवांचे नित्यपूजन, करूणात्रिपदी, पालखी, शंकराची अव्याहतपणे बिल्वपत्रांनी पूजा व अभिेषेक यात खंड पडू देऊ नये. पंच नेमून कमिटीद्वारा सर्व हिशेब व्यवस्थित ठेवावा. होणारी मालमत्ता संस्थानच्या नावावर करावी. एवढे सांगून सद्गुरूंनी संन्यासाश्रमात अंत्यविधी कसा करावा लागतो याची कल्पना भक्तांना दिली.
पुढे सद्गुरूंच्या अंगावरची सूज खूप वाढली. शरीराला पडून राहणेही कष्टदायक वाटू लागले. प.पू.श्री रंगावधूत महाराजांनी एका पोत्यात साळीचा भुसा भरून मऊ मऊ गादीसारखा बिछाना तयार केला ते रात्रंदिवस सद्गुरूंच्या सेवेत राहू लागले. पण त्यांचा भाऊ मुंबई येथे आजारी असल्याचा दृष्टांत झाल्याने प.पू. श्री.रंगावधूत महाराज मुंबईकडे रवाना झाले. अवतार त्यागाचा समय आलेला जाणून श्री प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांनी शके १८५० च्या फाल्गुन वद्य द्वादशीस पहाटे ४ वाजता पद्मासन घालून बैठक स्थित केली. प्राणायाम केला. ध्यान लावले. गुरुदेवांचे दर्शन घडल्यानंतर श्रीदत्तप्रभू दिसू लागले आणि त्यांची प्रणवउच्चार करून भौतिक देहास सोडून ते स्वस्वरूपात विलीन झाले.ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पण करून या सेवेला विराम देतो व श्रीदत्त चरणांची सेवा अखंडपणे करवून घ्यावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना.
✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️
।। श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ।।
श्रीदत्त: शरणं मम्🙏🌿🌸🚩

