Friday, December 2, 2022

सगुणभगवद्स्वरूप भाग ३ :-योगीराज समर्थ सद्गुरु श्री सिताराम महाराज टेंब्ये.

 


सगुणभगवद्स्वरूप भाग ३ :-योगीराज समर्थ सद्गुरु श्री सिताराम महाराज टेंब्ये.

                            

सीतारामो योगिवरो ब्रह्मचारी कवीश्वर : । 

गुरुपादार्पिततनु: समदृग्गुरुतांगत: ।।


                                  आमचे आराध्य दैवत पंचम दत्तावतार भगवान प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे धाकटे बंधू व शिष्योत्तम ब्रह्मचारी राजयोगी योगीराज श्री सिताराम महाराज टेंब्ये ही लोकविलक्षण विभूती स्वामी महाराजांच्या दैदिप्यमान शिष्य परंपेतील एक महापुरुष आहेत.भगवान श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या शिष्य प्रभावळीतील एक अलौकिक रत्न , महाराजांच्या शिष्य परंपरेतील नैष्ठीक ब्रह्मचारी शिष्यांपैकी एक असे योगीराज श्री सिताराम महाराज म्हणजे दत्तसंप्रदायातील एक विलक्षण अधिकारी असे महापुरुष आहेत. श्रीमहाराजांचे चरित्र हे थोरले स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या चरित्राशी अगदी संलग्न आणि अंतर्भूतच आहे.तरीही सिताराम महाराजांच्या जिवनातील काही घटना या अतिशय विलक्षण आणि दिव्य अशा आहेत. मग त्यात हिंगोलीच्या हेमराज मारवाड्याला आपले आयुष्य दान करणे असो की, सद्गुरुंच्या समाधी नंतर त्यांचे सगुण रुपात दर्शन असो किंवा राजूर चा भव्य दिव्य याग असो सर्व अगदी विलक्षण आणि दिव्य आहे.

                          श्री सिताराम महाराजांचा जन्म चैत्र शुद्ध पंचमी या दिवशी माणगाव येथे झाला.

श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे हे सर्वात धाकटे बंधू.घरातील सर्वात लहान अपत्य असल्यामुळे महाराज सर्वांचे खुप लाडके होते‌.त्यांना सर्व लाडाने भलोबा म्हणत असत.श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे व‌ सिताराम महाराज यांच्या वया मध्ये २० ते २२ वर्षाचे अंतर होते. यथावकाश वयाच्या आठव्या वर्षी वासुदेवशास्त्री म्हणजे थोरल्या महाराजांनी भलोबाचे उपनयन संस्कार केले.प.पू.श्रीथोरल्या स्वामींनीच त्यांना ( थोरले स्वामी म्हणजे दत्तावतार प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ) नित्यसंध्या,वैदिक सुक्ते,वैश्वदेव ,देवपुजा इत्यादी सर्व तसेच वेदाध्ययन शिकविले.थोरल्या स्वामींचे भलोबांवरती एवढे प्रेम होते की भलोबांना गायनाची ,तबला वादनाची प्रचंड आवड आहे हे जाणल्यावर त्यासाठी महाराजांनी त्यांना तीस रुपये महिन्याची संगीत गायनाची व वादनाची शिकवणी लावली त्याकाळातील तिस रुपये म्हणजे आजची किती मोठी रक्कम आहे याचा विचार केला की खरंच आश्चर्य वाटतं.पुढे भलोबा अर्थात सिताराम हे गायन व वादनात अतिशय तरबेज झाले.लहानपणापासूनच श्रीसितारामांना उत्तम वस्त्र परिधान करण्याची सवय होती.लहानपणी त्यांचा धोतर ,टोपी ,अंगरखा आणि उपरणे असा वेष असायचा.त्यांची ही आवड बघुन महाराज त्यांना वेलबुट्टी असलेला अंगरखा,कलाकुसर केलेली ,गोंडे व रंगीत चकत्या असलेली टोपी बनवून घेत. श्री महाराज भलोबांवर अतिशय जास्त प्रेम करतं असत आणि भलोबांचेही थोरल्या महाराजांवर खुप प्रेम व त्यांच्या प्रती फार आदरभाव व विश्वास होता.भलोबा हे श्री महाराजांशिवाय राहत नसत.पुढे श्रीथोरल्या स्वामी महाराजांनी माणगावात दत्त मंदिर स्थापन केल्यावर त्या मंदिराची व तेथील सर्व उत्सव ,सोहळे ,पालखी, महाप्रसाद यांची सर्व जबाबदारी भलोबांवर होती.सिताराम महाराज वयाने जरी लहान‌ असले तरी श्रीवासुदेव महाराज आपल्या भलोबाचाच सल्ला घेत असत. उत्सवाच्या निमित्ताने माणगावात आलेल्या साधुसंतांच्या सेवेची ,व्यवस्थेची सर्व जबाबदारी ही भलोबांवरच महाराजांनी सोपवली होती.यावरुन

ते थोरल्या स्वामी महाराजांना किती प्रिय होते हे लक्षात येतं.गोर्यापान वर्णाच्या भलोबांना अर्थात सिताराम महाराजांना श्रीथोरले स्वामी महाराज आपल्या मांडीवर बसवून आपल्या हाताने त्यांच्या भ्रुमध्यात तुळशीच्या हिरव्या पानांच्या रसाची टिकली काढत असत.ती टिकली भलोबांना फार शोभून दिसत असे.त्यांचे ते मुखकमल बघुन स्वामी महाराज प्रेमाने व कौतुकाने म्हणायचे , "पाहा आमचा भल्या देवासारखा कसा सुंदर दिसतो!" श्रीस्वामी महाराजांना माणगावात सात वर्ष पूर्ण झाल्यावर भगवान दत्तात्रेय प्रभुंनी त्यांना गृहत्याग करण्याची आज्ञा केली व उत्तरेकडे जाण्याचे सांगितले.ही बातमी हा हा करता सर्व पंचक्रोशीत पसरली.भलोबांना या गोष्टीचे अपार दुःख झाले.भलोबा स्वामी महाराजांच्या बरोबर जाण्यासाठी हट्ट करु‌ लागले पण हा हट्ट पुरविण्यासारखा नव्हता.स्वामी महाराज त्यांना म्हणाले , "तु अजुन लहान आहेस,शिवाय तुला दररोज दूधभात लागतो,उत्तम पोषाख लागतात तो तुला कोण देणार ? मी पायी व अनवाणी पायाने खडतर असा प्रवास करणार आहे.तो प्रवास तुला झेपणार नाही .तु घरी राहूनच मातोश्रींची सेवा कर." श्री स्वामी महाराजांनी भलोबांची कशीबशी समजूत काढली व ते उत्तरेकडे निघून गेले‌. सद्गुरु आज्ञा म्हणून मातोश्रींची पुढे पाच वर्ष त्यांनी सेवा केली.घरी राहुनच ते नित्य देवपुजा,पंचयज्ञ,आरती, पंचपदी नित्य नियमाने करु लागले.श्रीथोरले स्वामी महाराज ज्या पद्धतीने देवांची सेवा ,उपासना करायचे तेच सर्व शास्त्र नियम सिताराम महाराज पाळायचा पूर्ण प्रयत्न करु लागले.पण त्यांचे मन मात्र गुरु भेटीस्तव आसुसलेले होते.पुढे पाच वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी घरी सतत सांगुन त्यांच्या दादांना म्हणजे श्री स्वामी महाराजांना भेटण्यासाठी जाण्याची परवानगी मिळविली.


                           एक दिवस ते बाहेर जातो म्हणून माणगाव सोडून वासुदेव भेटीसाठी निघाले.श्रीसिताराम महाराज गुरुभेटीस्तव अतिव तळमळीने सर्वसंगपरित्याग करुन वन्य, हिंस्र पशूंचे वास्तव्य असलेल्या जंगलातून व घाटातून अनवानी पायाने जाऊ लागले.तेथून ते दरमजल करत श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे येऊन पोचले.तिथे त्यांची प.पू.श्रीनारायण दिक्षीत महाराजांची भेट झाली.दिक्षीत महाराजांनी त्यांना आपल्या घरी नेले ,त्यांची गुरुबंधू म्हणून उत्तम प्रकारे मेजवानी केली.श्रीदिक्षीत स्वामी महाराजांनी प.पू.श्रीस्वामी महाराजांनी गंगाखेड येथे संन्यास आश्रम स्विकारला व ते आता दंड ग्रहण करण्यासाठी उज्जैन या क्षेत्री गेले आहेत असे श्रीसिताराम महाराजांना सांगितले .ही माहिती मिळताच श्रीसिताराम महाराज हे दिक्षीत स्वामी महाराजांची अनुमती घेऊन पुढील प्रवासास निघाले.उज्जैन येथे पोचल्यावर त्यांना श्री स्वामी महाराज कोठे आहेत याची काहीही माहिती मिळेना.तेथून ते ग्वाल्हेर येथे आले.राजाश्रयामुळे तेथे संस्कृत वेदपाठशाळा होत्या.तेथील ब्राह्मण समाज पण सनातन वैदिक पद्धतीने शास्त्राचार पाळुन जिवन जगताना बघुन त्यांना अतिशय आनंद झाला.अशा पवित्र जागी काही काळ राहुन शास्राभ्यास करण्याचे त्यांनी ठरवले.तेथुल गुरुजनांना भेटुन त्यांनी आपला मनोदय सांगितला.लागलीच तिथे‌ त्यांची सर्व व्यवस्था झाली व श्रीसिताराम महाराजांचा नित्यक्रम ,शास्त्राभ्यास सुरु झाला.रोज जपजाप्य,स्नानसंध्या, गुरुचरित्राचे पारायण असा नित्यक्रम करुन महाराज गुरुजींपाशी शास्त्राध्ययन करीत असत.जे अध्ययन पूर्ण होण्यास बारा वर्षे लागतात ते सिताराम महाराजांनी तिनं वर्षात पूर्ण केले.यावरुन श्री सिताराम महाराजांचा अधिकार लक्षात येतो.त्यांचा अधिकार बघुन काही वर्षे आपल्याकडे राहुन पुढील ग्रंथांचे अध्ययन करण्याचे गुरुजनांनी सुचवले पण "आता आपणाला यापेक्षा अधिक काव्य,नाटक,साहित्यादी शिकण्याची जरुरी नाही.ही सर्व शास्त्रे व साहित्य शिकुन आपणाला जगात पंडित म्हणून मिरवायचे नाही.जरी चारी वेद,सर्व शास्त्र मुखोद्गत झाले,किंवा पांडित्याने जगात किर्ती पसरली अथवा अथांग असे कवित्व आले तरी देखील आपले मन श्रीगुरुचरणकमली संलग्न झाले नाही तर त्या षडवेदांगाचा,त्या पांडित्याचा काय उपयोग?संसारसागरातून तारुन नेणार्या ब्रह्मनिष्ठ पुरुषोत्तममूर्तीची कृपा संपादन करणे,यातच नर जन्माचे खरे साफव्य आहे," हा आपला विचार गुरुजनांना सांगुन श्रीसिताराम महाराज पुढील प्रवासास निघाले.ग्वाल्हेर सोडल्यावर कोठेतरी एकांत स्थानी राहून योगाभ्यास करण्याची महाराजांची तिव्र इच्छा होती.श्रीथोरल्या महाराजांकडुन त्यांना त्रोटक प्राणायाम व योगाची माहिती होती.काही काळ अरण्यात राहुन त्यांनी योगाभ्यास केलाही पण त्यांना लक्षात आले की हठयोगाचा बिकट अभ्यास हा सद्गुरु सान्निध्यातच योग्य रितीने आक्रमिला जाऊ शकतो हा पंथ स्वतंत्र चालता येत नाही.त्यामुळे जंगलातील आपला मुक्काम त्यांनी हलविला व सद्गुरु श्री वासुदेवांचा ठावठिकाणा विचारत उत्तरेकडे श्रीक्षेत्र हरिद्वार या ठिकाणी येऊन पोचले.तिथे त्यांना समाधी अवस्था प्राप्त असणारे महायोगी श्री.जालवणकर महाराज भेटले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिताराम महाराजांनी आपला योगाभ्यास सहज व जलद पूर्ण केला.अगदी थोड्या अवधीत ते समाधी अवस्थेला पोचले.आपला योगाभ्यास पूर्ण करुन ते श्रीक्षेत्र ब्रह्मावर्त या ठिकाणी आले.तिथे गेल्यानंतर श्री सद्गुरु माउली वासुदेवांची चौकशी केली.भगवत सद्गुरु कृपेने तेथील राममंदिरात महाराजांचे प्रवचन सुरु असल्याचे त्यांना कळले.थोरले स्वामी महाराज राम मंदिरातच राहत असत.दुसर्या दिवशी सिताराम महाराज श्रीथोरल्या महाराजांना भेटायला मंदिरात गेले.त्यावेळी प्रवचन सुरु होते त्यामुळे एका कोपर्यात जाऊन बसले.प्रवचन सुरु असतांनी श्रीथोरल्या स्वामींनी सर्व श्रोत्यांवर दृष्टीक्षेप टाकला होताच त्यामुळे त्यांना लगेच लक्षात आले होतेच की आपला लाडका भलोबा ब्रह्मावर्ताला आला आहे पण महाराज त्यांना न भेटताच आपल्या मठीत निघून गेले.दुसर्या दिवशी व तिसऱ्या दिवशी ही असेच झाले.त्याचे कारण ही तसेच होते कारण महाराज आता संन्यासी श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी होते आणि संन्यासाला नाते संबंध काही नसतात.शास्त्र ज्यांचा श्वास आहे त्या स्वामी महाजांचे हे वागणे आश्रमाला अनुसरूनच होते आणि हे श्रीसिताराम महाराजांना लक्षात आले असेलच यात नवल नाही.शेवटी श्री सिताराम महाराजांची मनोदशा व कळकळ ओळखून प्रत्यक्ष दत्तप्रभुंनी श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना आदेश दिला की आपले पूर्वाश्रमीचे बंधु आले आहेत त्यांना आपल्या मातेचे कुशल विचारावे.आता देवांच्या आज्ञेमुळे महाराजांनी सितारामांकडे बोट दाखवून "त्यांना बोलविले आहे म्हणून सांगा," अशी एका निकटवर्तीयाला आज्ञा केली.सिताराम महाराज श्रीस्वामी महाराजांचे समोर हात जोडून उभे राहिले.मातेचे वृत्त विचारल्यावर त्यांनी आईचे देहावसान झाल्याचे श्रीस्वामी महाराजांना सांगितले.आपल्या मातु:श्रींच्या मृत्यू ची बातमी ऐकताच स्वामी महाराज आपला दंड घेऊन श्रीगंगेवर स्नानासाठी गेले व शुद्ध होऊन आले.त्यानंतर श्री सिताराम महाराजांना त्यांनी आपल्या जवळच ठेऊन घेतले.श्रीथोरल्या स्वामी महाराजांनी त्यांना गायत्री पुरश्र्चरण करण्याची आज्ञा केली.त्यावर श्रीसिताराम महाराजांनी स्वामी महाराजांपुढे लडिवाळपणे एक अट टाकली, "माझे पुरश्र्चरण होई पर्यंत आपण येथेच राहावे.आपण अन्यत्र कुठेही जाऊ नये.तसे स्पष्ट अभिवचन मला मिळाले पाहिजे नाहीतर मला पुरश्र्चरण करण्यात रस नाही.असे अभिवचन मिळाल्यास मी पुरश्चरणास आरंभ करतो." आपल्या लाडक्या शिष्याचा हा हट्टही स्वामींनी मान्य केला व स्वामी महाराजांनी सर्व अटी मान्यही केल्या.श्रीसिताराम महाराजांनी स्वामी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपले पुरश्र्चरण सुरु केले.

                         एक दिवस सिताराम महाराज सायंकाळच्या वेळेस शिरोळचे शंकरराव कुलकर्णी यांचेबरोबर सायंसंध्या करण्यासाठी नदीवर स्नानासाठी गेले होते. शिरोळचे शंकरराव कुलकर्णी वेदांतशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी वासुदेवशास्त्र्यांकडे ब्रम्हावर्तास गेलेले होते. सिताराम महाराज व कुलकर्णी दोघेही स्वामींकडे वेदांताचा पाठ घेत असत. त्या दिवशी अचानक वादळ सुरु झाले. संध्या करायला बसले असता त्या वादळात हे दोघेही सापडले. त्या वादळाला त्या देशात “आंधी“ असे म्हणतात. आंधीत सापडलेला मनुष्य त्याच्या नाकातोंडात, कानाडोळ्यात वाळू शिरुन गुदमरुन मरतो व वा-याबरोबर उडून जाऊन गंगाप्रवाहात किवा कोठेही वारा नेईल तिकडे कोठेही जाऊन पडतो. असा अंधीचा महाभयंकर परिणाम मनुष्याला भोगावा लागतो. अशा या मरणप्रसंगात सापडलेले सीताराम महाराज व कुलकर्णी मृत्यूमुखीच पडले असते पण त्यांचे पाठीराखे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचेवर नितांत श्रध्दा असल्याने व गुरुकृपेने ते या संकटातून तरुन गेले.या पुरश्र्चरणाच्या काळात थोरले स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे सिताराम महाराजांबरोबर अडीच ते तिन वर्ष ब्रह्मावर्त या क्षेत्री होते.या काळात श्री स्वामी महाराजांनी खुप मोठी ग्रंथ रचना केली.पुरश्चरण पूर्ण झाल्यावर श्रीस्वामी महाराज हे नृसिंहवाडीस आले व श्रीसिताराम महाराजांज हे देशसंचार करु लागले.पुढे प्रवास करता करता पुन्हा श्रीसिताराम महाराज श्रीथोरल्या स्वामी महाराजांना पवनी या क्षेत्री येऊन भेटले.श्रीस्वामी महाराजांच्या संपूर्ण चातुर्मासात अतिशय भव्य दिव्य असा चातुर्मास याच क्षेत्री झाला होता.याच ठिकाणी योगीराज गुळवणी महाराज यांना श्रीस्वामी महाराजांनी अनुग्रह दिला होता.पवनीला रोज हजारो पंगती उठत असतं.हजारो लोक प्रसाद घेऊन तृप्त झाले होते.या सर्वांची व्यवस्था ही श्रीसिताराम महाराजांकडे होती.येथुन पुढे श्रीस्वामी महाराज नृसिंहवाडी येथे आले.मागाहून श्री सिताराम महाराज ही वाडी क्षेत्री येऊन पोचले.तेथील चार महिन्यांच्या वास्तव्यात अनंत लिला चरित्र घडले शब्द मर्यादेस्तव ते इथे घेत नाही.

                           पुढे श्रीसिताराम महाराजांनी राजुर या श्रेत्री मला मोठा स्वाहाकार यज्ञ करण्याचे योजले.या स्वाहाकारात प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्या सर्व शिष्य मंडळींच्या समवेत स्वतः हजर होते.हे प्रथमतःच घडले होते.हा यज्ञ इतका मोठा होता की फक्त जेवण वाढणारे जवळजवळ एक हजार लोक होते.इतक्या प्रचंड प्रमाणात अन्नशांती झाली होती.दहा-दहा हजार लोकांची एक पंगत बसत असे.सूर्यास्तापर्यंत किती पंगती उठत होत्या यांची मोजदाद नव्हती.टाकळीचे दाजीमहाराज व अन्य १५ यती हे स्वामी महाराजांच्या समवेत पंगतीला हजर असत.सिताराम महाराजांच्या चरणी अष्टमहासिद्धी या हात जोडून सेवेला उभ्या असायच्या.राजुरला ज्या निंबाच्या झाडाखाली महाराज बसायचे त्या वृक्षाची पाने आजही गोडच लागतात.श्री सिताराम महाराजांच्या तप सामर्थ्याने कडू निंबवृक्षानेही आपला कडवट गुण सोडला होता.आजही याची प्रचिती त्या ठिकाणी येते.श्रीसिताराम महाराजांना कसलाही लोभ नव्हता.ते अतिशय उदार होते.आपल्या जवळील द्रव्य व वस्त्रे केव्हा एकदा उधळून टाकीन असे त्यांना झाले होते.श्रीसीताराम महाराजांनी पुष्कळ लोकांना ओंजळ ओंजळ भरुन रुपये वाटले होते.त्याचप्रमाणे त्यांनी ताट भरुन रुपये जगद्गुरुंच्या पुढे ठेवले होते.श्रीसिताराम महाराजांनी गोरगरिबांना पुष्कळ द्रव्य दिले व कित्येक कर्जबाजारी लोकांना कायमचे कर्जमुक्त केले. 

                        पुढे श्रीथोरले स्वामी महाराज श्री सिताराम महाराजांना राजुरलाच राहण्याची आज्ञा करुन गरुडेश्वरी निघून गेले.राजुरला दोन वर्ष श्रीसीताराम महाराजांचा मुक्काम होता.या काळात अनंत आर्त ,मुर्मुक्षू जिवांना सिताराम महाराजांनी दु:ख मुक्त केले.पुढे दोन वर्षांनंतर "आषाढ शुद्ध प्रतिपदा या दिवशी श्रीस्वामी महाराज श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे समाधीस्थ झाले," अशा मजकुराचे पत्र सीताराम महाराजांच्या हातात पडले.हे वाचुन त्यांच्यावर जणू वज्राघातच झाला.अतिशय अनावर अतिव दु:खी अंत:करणाने ते गंगेवर स्नानास गेले व येऊन खिन्न अंतःकरणाने बसुन राहिले. नेत्रातून दु:खाश्रुंचा पूर वाहू लागला. आपले मायबाप आपल्याला कायमचे अंतरले. मला त्यांची भेट होणार नाही, या विचाराने अस्वस्थ झाले. तुला मी पुन्हा भेट देऊन तुझी ईच्छा पूर्ण करीन असे अभिवचन थोरले स्वामी महाराजांनी त्यांना दिले होते. त्याचे काय? महाराजांनी माझी ईच्छा पूर्ण केली नाही. त्याना या अभिवचनाचा विसर कसा पडला? त्यानी माझ्यावर अनंत उपकार करुन माझे जीवन आनंदमय केले होते. त्यांचा मी कसा उतराई होऊ या विचारांनी त्यांचे मन विषण्ण झाले. त्यांना आणखी दहा वर्षे आयुष्य मर्यादा पत्रिकेत स्पष्ट असताना इतक्या लवकर गुरुनी देहविसर्जन का केला? आपण निरामय आनंद स्वरुपात बसून मला मात्र असे दु:ख समुद्रात लोटून दिले. त्याचे काय कारण असावे? माझा अधिकार नाही म्हणून त्यांनी माझी उपेक्षा केली का? अशा अनेक प्रकारचे चिंतन करीत सिताराम महाराज तापी नदीच्या तिरावर काळ कंठत फिरत राहिले. फिरता फिरता, बारालिंग क्षेत्रामध्ये मुकुंदराज योग्यांचे समाधी मंदिर जंगलात आहे. तेथे एकटेच बसून राहू लागले. सदैव गुरुमहाराजांचे नाम घेऊन त्यांना आठवून शोक करीत बसावे, खाणे पिणे सोडून दिले होते. ब्रह्मज्ञानी पुरुषाला सध्या अज्ञानी जनाप्रमाणे साकार स्वरुपाचे इतके प्रेम असणे हे भगवंताचे लक्षणच मानले आहे. आपले गुरु आपल्याला लवकर दर्शन देत नाहीत म्हणून मनाला फार तळमळ लागून राहिली होती व अत्यंत कासावीस होत होते व आता धीर सुटू लागला होता. वासुदेव वासुदेव... असा कंठशोष करुन लेकराप्रमाणे रडायला सुरुवात केली व थोड्याच वेळात मूर्च्छित झाले. मूर्च्छा ही अर्धी मरणावस्थाच होय. एवढ्याच गुरु महाराज गरुडेश्र्वरहून धावत येऊन सीताराम ! ऊठ मी आलो आहे. माझ्याकडे डोळे उघडून बघ म्हणून हाक मारली. हाक मारावी अन झोपेतून जागे व्हावे तसे ते एकदम सावध झाले व डोळे उघडून पहातात तर आपली आराध्य मूर्ती आपल्यासमोर उभी ! आपण स्वप्न तर पाहत नाही ना ! असे वाटले. तोच भल्या, सिताराम ! तू शुध्दीवर आहेस ना? मग असा संशयात का पडलांस? तुला मी पुन्हा भेट देईन व तुझी कोणती ईच्छा असेल ती पूर्ण करीन असे अभिवचन दिले होते ना? ते पूर्ण करण्यासाठींच मी आलो आहे. तुझी काय ईच्छा आहे? तुला काय विचारायचे आहे? सांग, विचार ! असे म्हणून त्यांनी सितारामाना ह्रदयाशी घट्ट आवळून धरले. दोघाही देवभक्तांना परमानंद झाला. 

योगी पुरुष जिवंत असताना कारण पडल्यास दुसरा देह धारण करतो. देह विसर्जन केल्यावर तसा तो करीत नाही. पण श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वतीनी गरुडेश्र्वरी देह विसर्जन करुन माझ्यासाठी आज दुसरा देह किंबहुना दुसरा अवतारच धारण केला आहे. कलियुगात असा दुसरा अवतार घेणारा एक श्री दत्तभगवानच आहे. श्री वासुदेवानंदानी त्यांची समजूत घालून सांत्वन करुन ५ घटिका आत्मबोध उपदेश केला व त्यांचे मन शांत केले व महाराज अदृश्य झाले. श्री सिताराम महाराजाना बालपणापासून केवळ सदगुरुची भक्ती केली व मी सदगुरुंचा सेवक असून त्याची मी सेवा करीत आहे. अशा बुध्दीने सदगुरु संतोषनार्थच सर्व कार्य केले. 

                        व-हाड प्रातांत हिंगोली येथे हेमराज मुंदडा नामक मारवाडी सावकार होता. तो श्री वासुदेवानंद सरस्वतींचा एकनिष्ठ भक्त होता. त्यांनी टेंब्ये स्वामींच्या आशीर्वादाने व अनुज्ञेने तेथे एक सुंदर श्री दत्त मंदिर बांधले आहे. हिंगोलीच्या गुरुभक्तांच्या आग्रहावरुन श्री सिताराम महाराज श्रीदत्तजयंतीच्या उत्सवास तिथे आले होते. तेथील उत्सव उरकून पुढे जाण्याच्या त्यांचा मानस होता. त्याप्रमाणे ते निघाले. पण हेमराजा आकस्मिक रोगाने एकाएकी भयंकर दुखणाईत पडला व आसन्नमरण झाला. श्रीमंतीच्या जोरावर पुष्कळ वैद्य डॉक्टरांकडून उपचार घेऊनसुध्दा बरा होण्याची लक्षणे दिसतात. 

सीताराम महाराजांनी अनेकांना असाध्य दुखण्यांतून बरे केल्याचे हेमराजने एकले होते. त्यामुळे त्याने सीताराम महाराजांनाच शरण जाण्याचे ठरविले. सेवकानी त्याला उचलून सीताराम महाराजांच्या समोर आणून अंथरुणावर झोपविले. हेमराज असाध्य दुखणाईमुळे प्रेततुल्य मरणोन्मुख झालेला होता. त्याने महाराजांना केविलवाण्या नजरेने पाहिले व दीनमुख पसरुन हात जोडून म्हणाला, दयावंत महाराज आपण मज दिनावर दया केलीत तरच मी गुरुमहाराजांची सेवा करीन त्यापेक्षा परलोकांत जाईन. मला या आजारातून बरा करण्यास आपणांवाचून दुसरा कोणीही समर्थ नाही. असे म्हणून महाराजांची अनन्यभावे प्रार्थना केली. मनुष्यांपेक्षा किंवा देवांपेक्षाही ज्यांचा अधिकार थोर आहे असे सुबुध्द साधुसंत महात्म्ये कोणाही प्राणिमात्राचा द्रोह, मत्सर बिलकुल करीत नाहीत. कारण हरी वाईट कृती ही जड कलेवराकडूनच होत असते. ती आत्म्याची कृती नसते. म्हणून संत हे निर्वेर बुध्दीचे असतात असे व्यास म्हणतात हेमराजांची कष्टी, दु:खी, दीन अवस्था पाहून व दीनवाणी एकून सिताराम महाराज द्रवले, हळहळले व त्यांचेकडे पाहून करुणापूर्ण दृष्टीने अतिशय गोडवाणीने त्याचे समाधान करुन त्याला धीर दिला. तुम्ही मलाजी विनंती करत आहात ती आम्हा दोघांच्याही पाठीराख्या श्री वासुदेवानंद सदगुरुनांच करा व त्यांचे तीर्थ व अंगारा प्रेमपूर्वक सेवन करीत जा. ते तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून ओढून काढती हेमराजांनी सांगितले ते आणि तुम्ही वेगळे नाहीतच, एकच आहात. असे म्हणून पुन: पुन: आपणांस पूर्ण बरे करण्याबद्दल विनवणी केली. मी पूर्ण बरा झाल्याशिवाय आपण इथून जाऊ नये असे सांगितले. 

रोग्याचे मरण समजले तरी वैद्याने रोग्यास ते न सांगता उपचार करीत रहावे. तसे त्यांना श्री वासुदेवनंदाच्या पादुकांने तीर्थ दिले व आपल्या झोळीतील भस्म दिले व बरा होशील असा आशीर्वाद देऊन घरी जाण्यास सांगितल. हेमराज म्हणाले मला रोज येथे येणे शक्य होणार नाही तेव्हा माझ्या घराला आपले पावन चरण कमल लावून मला निजदर्शन देऊन आनंद द्यावा ही विनंती आहे. त्याप्रमाणे सिताराम महाराज रोज त्यांचे घरी जाऊन औषध बदलून देऊ लागले. आयुष्य संपत आल्यावर एक दिवस आधी हेमराजाला सांगितले व भगवत नामस्मरण करीत रहा असे सांगितले. त्यानेही मला १०-१५ वर्षे गुरुसेवा करण्याची ईच्छा प्रदर्शित केली व काकुळतीने विनवणी केली. महाराज आपल्या मुक्कामी गेले व वासुदेवानंदाची मनोमन प्रार्थना केली, ते प्रगट होऊन सीतारामा! नसलेला भेदभाव मानून अज्ञानाप्रमाणे तू वागतोस याचे मला नवल वाटते. तू निर्बल नाहीस पण व्यर्थ अज्ञानात शिरु नको व यमाचे निवारण कर, म्हणून माझ्यामागे पोराप्रमाणे लागू नको. आम्ही सर्व भानगडी सोडल्या आहेत. तुला जसे वाटेल तसे तू करु शकशील. पुन्हा आम्हाला अशी गळ घालू नको. तुला सर्व अधिकार दिले आहेत. तू जे मनांत आणशील ते होईल असे म्हणून ते गुप्त झाले.


इकडे सिताराम महाराजांना याची मृत्यु घडी जवळ आल्याने याला आता कसे जगवावे याच्या विचारात मग्न होते त्यामुळे त्यांना येण्यास उशीर झाला. नंतर मनाशी एक निश्चय करुन ते शेटजींकडे जाण्यास निघाले. शेवटचा दिवस उजाडला. शेटजी खुपच बेचैन होऊ लागले. मधून मधून मुर्च्छा येऊ लागली. सीताराम महाराज न आल्याने बेचैन झाले व त्यांना पुन्हा पुन्हा बोलावणे पाठवले. थोड्या वेळाने ते आले. व शेटजींची मुर्च्छावस्था पाहून अंगारा लावला व मोठ्याने कानात महाराज आल्याचे सांगितले. तेव्हा शुद्धित आले व शेटजी परिस्थिती कशी आहे असे विचारले. तेव्हा ते म्हणाले महाराज, मला नेण्याकरिता कोणी तरी दिव्य पुरुष आले असून मला पाशांनी बांधले आहे. त्यांचे वर्णन करण्यास महाराजांनी सांगितले. शेटजी म्हणाले- ते शिवचिन्ह धारण केलेले आहे. महाराज म्हणाले, ते शिवदूत आहेत. तुमचा दक्षिणेकडील यम मार्ग बंद झाला आहे. तुम्ही भाग्यवान आहांत. नंतर शिवदुतांशी महाराजांनी संभाषण करुन एक घडी याला मुक्त करा किंवा थांबा असे सांगितले पण शिवदूत म्हणाले एकदा वेळ टळली की आम्हांला स्पर्श करतां येणार नाही व आताच सोडले तर शिवजी आम्हाला शिक्षा करतील यास्तव आम्ही याला घेऊनच जाणार. 


महाराज म्हणाले यांच्या पत्रिकेवरुन अजून १६ वर्षे आयुष्य आहे. शिवदूत म्हणाले आम्हालाही पत्रिका ज्ञान आहे. आजच त्यांच्या आयुष्य समाप्तीचा दिवस आहे. शिवदुतांना महाराज म्हणाले आमच्या विचाराने तो खोटा आहे. शिवदूत म्हणाले खोटा कसा ते दाखवा, म्हणजे आम्ही याला पाश मुक्त करतो. असा बराच संवाद झाला हेमराजला महाराजांनी विचारले तुला गुरुसेवेसाठी जगण्याची इच्छा आहे ना? तो होय म्हणाल्यावर ती तुझी इच्छा आज आम्ही पूर्ण करणार असे निर्धाराने म्हणाले. मी माझी उर्वरीत सोळा वर्षे तुला अर्पण करतो. 


त्याला उठवून बसवले व उजवा हात पुढे कर म्हणून आमच्या पंचपात्रातील पाणी मी माझे राहीले ते १६ वर्षांचे आयुष्य हेमराजला अर्पण करत आहे असा मोठ्याने संकल्प करुन हेमराजाच्या हातावर पाणी सोडले व शिवदुतांना म्हणाले कि याचा आयुष्य लेख पहा. त्यांनी पाहिल्यावर आणखी १६ वर्षे आयुष्य वाढल्याचे दिसून आले. सिताराम महाराजांनी शिवदुतांचा लेख खोटा करुन दाखविला व आता तरी त्याला पाशमुक्त करा असे सांगितले एवढी मोठी महती होती त्यांची. शिवदुतांनी लगेच त्याला पाशमुक्त करुन महाराजांना नमस्कार करुन १६ वर्षांनी परत न्यायला येतो असे सांगितले. महाराज म्हणाले, तोपर्यंत वासुदेवभक्त वासुदेव (विष्णू) स्वरुप झाला नाहीतर या आणि याला शिवरुप बनवा. 


श्री सिताराम महाराजांनी हेमराजाला निमित्त करुन आपला अवतार समाप्त केला. हेमराजाला महाराजांचे उपकार कसे फेडावे तेच समजेनासे झाले, तो म्हणाला- 


खरा तेजस्वी तूं अससी । जगीं अज्ञान हरणा ।। खरा ओजस्वी तूं भजक । जन मृत्यु प्रहरणा ।। 

खरा दाता तुंचि वितरशी । निजायुष्य सगळे ।। तुला सीतारामा स्मरती । तदहंता पुरी गळे ।। 


सिताराम महाराजांना सांगितल्या प्रमाणे त तिथे असतानांच त्यांच्या समक्ष श्री वासुदेवानंद सरस्वती व श्री दत्तमंदिरासाठी पुजा-अर्चा, नैवेद्य वगैरे खर्चाकरिता सर्वे नं.८ ची जमीन तसेच एक पुष्पवाटिका व एक रु. पन्नास हजार चे कापड दुकान श्री गुरुचरणी अर्पण केले. त्यामुळे श्री सीताराम महाराजांनाही आनंद वाटला. हेमराजाला “तुम्ही दुखण्यातून बरे झाल्यावरच मी इथून जाईन तोपर्यंत इथे राहीन” असे अभिवचन दिले होते. त्याची पूर्तता स्वतःचे उर्वरित आयुष्य त्याला देऊन केली, व पुढे निघुन गेले. सर्वांना वाईट वाटले. हेमराजाला सुद्धा आतां तुम्ही जा असे म्हणता येत नव्हते.


महाराज हुसंगाबादला जातो म्हणून निघाले मार्गात थकवा फार आला, ज्वर येवू लागला तरी हळुहळु चालत चालत हुशंगाबाद वरुन बढणेरीस आले बढने-याला एका भक्ताने दिलेले ताक घेतले त्याला आशिर्वाद दिला व वडाच्या झाडाखाली बसून राहिले. उरलेले आयुष्य दान केल्याने आता त्यांना त्राण राहीले नव्हते. श्रीवासुदेवांचे चिंतन व नामस्मरण करीत उत्तराभिमुख बसून समाधि लावली, व योगमार्गाने सच्चिदानंद ब्रह्मपदी विराजमान झाले तो दिवस होता फाल्गुन शु. ८ शके १८४०. या दिवशी त्यांनी आपले अवतार कार्य संपवून ब्रह्मानंदी लीन झाले. अशा या राजयोगी, महायोगी, थोर गुरुभक्ती असलेल्या सद्गुरु सिताराम महाराजांच्या चरणी माझे शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करतो.त्यांनी ही आपल्या सर्वांना सद्गुरु चरणांशी अनन्यभावाने सेवा करण्याची बुद्धी द्यावी ही त्यांचा सुकोमल चरणी प्रार्थना.


( श्री थोरल्या स्वामी महाराजांनी गरुडेश्वरी देह ठेवल्यावर पुन्हा देह धारण करुन श्री सिताराम महाराज यांना भेट दिल्याचा प्रसंग व हिंगोली येथे हेमराज मारवाड्याला आपले उर्वरीत आयुष्य दान करण्याचा प्रसंग मी चरित्र ग्रंथातुन जसाच्या तसा घेतला आहे.त्यापेक्षा वेगळ्या शब्दात लिहून त्या अतिशय अलौकिक आणि दिव्य प्रसंगाचे गांभीर्य व दिव्यत्व कमी करण्याचे धाडसचं झाले नाही आणि त्यांचे वेगळे वर्णन मला तरी करणे अशक्यप्राय झाले होते तरी सर्वांची त्याबद्दल क्षमा मागतो.)

✍️✒️अक्षय जाधव आळंदी/वाशिम ✒️✍️



।। अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।।

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...