#झाले_ब्रह्मरूप_ज्ञानदेव भाग २-:
*करुणाब्रह्म* कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळा म्हणजे आळंदीची कार्तिक वारी . हा प्रत्येक वारकऱ्यासाठी,वैष्णवासाठी जिव्हाळ्याचा, प्रेमाचा आणि दिव्यानंदाचा उत्सव आहे.आषाढी वारी झाली की प्रत्येक वारकरी हा आळंदीच्या वारीची वाट बघत असतो, माउलींच्या आळंदीला येण्यासाठी आतुरलेला असतो.आळंदीच्या पुण्यपावन भूमीत येऊन एकदा आपल्या लाडक्या ज्ञानाबाईला बघून,त्यांच्या समाधीवर मस्तक ठेवून हा प्रत्येक वारकरी कृतकृत्य होतो.*करुणाब्रह्म* सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदीत आहे ही सामान्य बाब नक्कीच नाही.माउलींनी आळंदीत समाधी का घेतली ? आळंदी हे श्रेत्र का वैशिष्ट्यपूर्ण आहे? या क्षेत्राचे काय महात्म्य आहे? या क्षेत्राचा इतिहास काय? हे क्षेत्र किती जुने आहे ? या क्षेत्राला शिवपिठ का म्हणतात? याचा आणि माउलींचा कसा अनादी संबंध आहे? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा आपण आज करणार आहोत.
*आळंदी* हा शब्दच अगदी वैशिष्टपूर्ण आहे. "अलं ददाति इति आलंदि" अशी आळंदी शब्दाची फोड आहे.जी आनंद देते ,जी साधकाला ,भक्ताला तोवर देते जोवर तो पुरे म्हणत नाही.(अर्थातच ही बाब आपल्यासारख्या विषयी लोकांसाठी नाही तर ती साधक,मुमुक्षू जनांसाठी आहे हे विसरुन चालणार नाही.) अशी ही माउलींची दिव्य आळंदी आहे.करुणाब्रह्म ज्ञानोबाराय हे विष्णू अवतार आहेत नव्हे नव्हे तर ते प्रत्यक्ष महाविष्णूच आहेच यात दुमत,शंका असण्याचे कारणच नाही.पण माउलींचे हे आळंदी क्षेत्र वैकुंठासमान दिव्य ,एकमेवाद्वितीयच आहे .मी तर त्या ही पलिकडे जाऊन म्हणेन की महाविष्णू ज्ञानोबारायांचे हे भूवैकुंठ आहे. माउलींचे निजस्थान असलेली ही अलंकापुरी काही आत्ताची नाही , तर प्रत्यक्ष पंढरीनाथ सांगतात की ,”ऐसे हे अनादी ठाव असे” म्हणजे जे अनादी आहे, ज्याच्या प्रारंभाचा ठाव कुणीही घेऊ शकत नाही.कारण असे म्हटले जाते की माउली प्रत्येक कलीयुगात याच क्षेत्रात अवतार धारण करतात आणि तो कलीयुगातील अवतार येथेच अलंकापुरीतील आपल्या निजस्थानी समाधिस्थ करतात.म्हणूनच आळंदीला *अनादी* क्षेत्र म्हटले जाते.आळंदी क्षेत्र हे चार ही युगापासून स्थिर व माउलीचे निजस्थान आहे. चार ही युगात नित्य असलेल्या या क्षेत्राला ज्ञानेशकन्या गुलाबराव महाराजांनी “नित्यतिर्थ” म्हटले आहे ते याच कारणाने.आळंदीचा प्रलयात ही लोप होत नाही म्हणून नामदेवरायांनी एका अभंगात हे अलंकापुरीचे महात्म्य शब्दबद्ध केले ते असे की,
देव म्हणे नामयां ब्रह्मक्षेत्र आदी । येथेंची समाधि ज्ञानदेवा ॥१॥
चौयुगां आदिस्थळ पुरातन । गेले ते नेमून मुनिजन ॥२॥
चालिले सकळ जाले ते विकळ । अनादि हें स्थळ ज्ञानदेवा॥३॥
नामा म्हणे आम्हां सांगितले हरी । दीर्घध्वनि करी वोसंडोनी॥४॥
आळंदी ही चारही युगात विविध नावाने ओळखली गेली. कृतयुगात आळंदीला आनंदवन असे नाम होते तर त्रेतायुगात वारुणीक्षेत्र.द्वापारयुगात आळंदीला कपिल क्षेत्र हे नाव होते तर कलीयुगात अलकावती .ज्याला पुढे अलंकापुर व सांप्रत काळात आळंदी हे नामाभिधान आहे. मुमुक्षांना ,साधकांना आनंद देते ते हे आनंदवन.आदीयोगी भगवान शिवांनाही या क्षेत्राने आपल्या दिव्य आनंदाने भुरळ घातली व देव ही या क्षेत्रात वास्तव्य करुन राहिले असे हे अलौकीक क्षेत्र. स्कंदपुराणातील अलंकापुरी महात्म्यात या संदर्भातील कथा आहे. एकदा भगवान शिव व माता पार्वती आकाश विहार करित असता या आनंदवनात उतरले.भगवान शिव या क्षेत्रात उतरल्याबरोबर आनंदाने भावविभोर झाले.त्यांनी या क्षेत्राला साष्टांग दंडवत घातला,त्यांचे अष्टभाव दाटले,इथली माती ही देवांनी आपल्या सर्वांगाला लावली,ते आनंदाने भावविभोर होऊन टाळी पिटू लागले व नंतर ते निचेष्टीत होऊन या अलंकापुरीच्या भूमीवर पडून राहिले. अशा प्रकारे आदियोगी आदिनाथ भगवान शिव ,जे आनंदाचे निजस्थान आहेत त्या आशुतोष महादेवांनाही जे क्षेत्र आनंद देऊ शकते त्याचे महात्म्य काय असेल याचा आपण विचारही करु शकत नाही. त्यावेळी भगवती माता पार्वती हे सर्व आश्चर्यचकीत मुद्रेणे पहात होती.बराच काळ भगवान महादेव या आनंद समाधीत होते ,तेव्हा माता पार्वतीने त्यांना सावध केले.त्यानंतर त्यांनी देवांना असे का झाले?आपण इतके आनंदविभोर का झालात ? हे प्रश्न विचारले. तेव्हा देवांनी पार्वती मातेला सांगितले की “हे माझे अनादी असे मुळपीठ आहे.येथे कालांतराने महाविष्णु अवतार धारण करणार आहेत.ही परमपवित्र अशी अनादी भूमी ,अनादी क्षेत्र मला अत्यंत प्रिय आहे.” भगवान शिवांनाही परमप्रिय असे हे अलंकापुर क्षेत्र आहे. कुबेराने या ठिकाणी कठोर असे तप केले होते.याच क्षेत्री कुबराने अष्टसिद्धीचे प्रतिक व त्या सिद्धीने युक्त असलेल्या दिव्य अष्टलिंगाची स्थापना केली होती. तसेच या संपूर्ण क्षेत्राखाली कोटी लिंग गुप्त झालेले आहे.म्हणून “शिवपीठ हे जुनाट” असे नामदेवराय ही म्हणतात.
अलंकापुरीतील सिद्धबेट हे स्वयं सिद्ध क्षेत्र आहे.या सिद्धबेटात देव ,ऋषी ,मुनी,संतांनी तप केले आहे व ते आजही गुप्त रुपाने या क्षेत्री वास करुन आहेत.नामदेवरायांनी तर आपल्या अभंगात वर्णन केले आहे की सिद्ध बेट हे भगवान शिवांच्या कैलासापेक्षा व भगवान विष्णूंच्या वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ असे क्षेत्र आहे.ऐवढेच काय तर आळंदीजवळील पांच कोसा वरील सर्व भूमीसुद्धा सिद्ध क्षेत्र आहे.या अलंकापुर क्षेत्रात देवराज इंद्राने मोठा यज्ञ केला होता.या ठिकाणी दक्षिणाभिमुख वाहणारी इंद्रायणी ही कोटी तिर्थात,प्रयाग व काशीत केलेल्या तिर्थ स्नानाचे फळ प्रदान करणारी गंगाच आहे. असे हे अनादी शिवपीठ असलेले दिव्य क्षेत्र .या क्षेत्राचे महात्म्य सर्व संतांनी एकमुखाने केले आहे. माउलींनी याच क्षेत्री का समाधी घेतली हे आज आपण बघितले तर उद्या कार्तिक कृष्ण त्रयोदशी म्हणजे माउलींचा समाधी दिवस. हा समाधी प्रसंग कसा होता,त्यावेळी नक्की काय घडले,त्यावेळी आळंदीत कोण कोण उपस्थित होते या सर्व घटनांचा विचार उद्याच्या लेखात करुयात.माउलींचे समाधी प्रकरण दिव्य व खरोखर मन हेलावणारे आहे.पंढरीनांथांकडे विश्वात्मक मागणे मागून हे ज्ञानीयांचे राजे त्रयोदशीला विश्वरूप झाले.त्यांनी संजीवन समाोधीत समाधीस्थ होणे ही गेल्या हजार वर्षात झालेली अलौकिक ,शब्दातीत व विलक्षण दैवी घटना आहे. नामदेवरायांच्या अभंगावरून आपण उद्या समाधी क्षणाचा शब्दाद्वारे अनुभव घेऊ. मायबाप ज्ञानेश्वरा तुम्ही रेड्यामुखी वेद वदविता.हे शब्द ही आपलीच प्रेरणा आहे.हे आपले देणे आहे जे असेच आपल्या चरणांशी अर्पण करतो.
✍🏻🖋️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी

