सद्गुरु भालचंद्र महाराज कनकवली यांची १२० वी जयंती :-
महाराष्ट्र ही संत भूमी ,अवधूतांची भूमी आहे.या भूमीत आजवर अनेक संत ,महापुरुष ,सिद्ध , अवलिया, अवधूत, योगी होऊन गेलेत.अशाच या अवधूतांच्या मांदियाळीत गेल्या काही शतकापूर्वी होऊन गेलेले एक अलौकिक संत म्हणजे भालचंद्र महाराज कनकवली. कोकणाच्या पुण्यभूमीत आजवर अनेक महापुरुष होऊन गेले, या पुण्यपावन असलेल्या भगवान परशुरामांच्या भूमीत त्यांच्या तेजाने जणु अनेक संतांच्या रुपात देह धारण करुन लोककल्याण केले.टेंब्ये स्वामी महाराज,साटम महाराज,राऊळ महाराज असे अनेक महापुरुष हे याच कोकणातील होते. सद्गुरु साटम महाराज हे कोकणातील दानोलीचे अवतारी सिद्ध योगी ज्यांच्या अलौकिक लिला आजही कोकणात घराघरातून स्मरण केल्या जातात.त्यांच्या कृपा कटाक्षाने , अनुग्रह प्रसादाने अनेक सिद्ध योगी तयार झाले होते असा विलक्षण अधिकार महाराजांचा होता.सद्गुरु साटम महाराजांच्या याच अलौकिक शिष्य मांदियाळीतील एक महापुरुष म्हणजे सद्गुरु श्रीभालचंद्र महाराज कनकवली.आज आपण याच अवधूत महात्म्ये असलेल्या भालचंद्र महाराजांच्या दिव्य चरित्राचे स्मरण करणार आहोत.
श्रीभालचंद्र महाराजांचा जन्म कोकणातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असलेल्या पाया नावाच्या एका लहान खेड्यात देशस्थ ब्राम्हण कुटुंबात दिनांक ८ जानेवारी १९०४ रोजी पौष कृष्ण षष्टी ला झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव परशुराम ठाकुर असे होते.यांचे मुळपुरुष हे महान शिवभक्त होते.श्रीमहाराजांचे वडिल हे गावाचे कुलकर्णी होते व अत्यंत सत्शिल व धार्मिक गृहस्थ होते. महाराजांचे बालपण हे अलौकिक असेच होते.त्यांना बालपणापासून देवभक्ती करायला आवडत असे.त्यांचे बालपणीचे खेळ ही तसेच विलक्षण होते.घरातील वातावरण ही तसेच देवभक्तीचे होते.आपल्या बाल सवंगड्यांना गोळा करुन बाल भालचंद्र दगड गोळा करुन त्यांची परमेश्वर रुपात पुजा करित असे. असे आनंदात ,खेळण्यात दिवस जात असता अचानक एक अघटित घडले.वयाच्या पाचव्या वर्षीचं त्यांचे आई व वडिल हे लागोपाठ स्वर्गवासी झाले.अगदी बालवयातच महाराज मातृपितृ छत्राला पोरके झाले.आई वडिलांच्या जाण्याने बाल भालचंद्रावर दुःखाचा डोंगरच कोसळला.पुढे ते त्यांच्या काका काकी जवळ म्हापण या गावी राहायला आले.तेथेच ते प्राथमिक शाळेत ही जाऊ लागले. बाल भालचंद्र शिक्षणात अतिशय हुशार होता.त्यामुळे संपूर्ण गावात त्याची ख्याती झाली. पुढे इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईला आपल्या मावशीकडे राहायला गेले.मॅट्रीक चे शिक्षण सुरु होते पण परिक्षेत अपयशाचे कारण झाले व त्यांची वृत्ती अचानक अंतर्मुख झाली. ते बाह्य जगताचे भान विसरले.सामान्य लोकांना ते वेडे वाटू लागले पण यांना जणु आपल्या जन्माचे रहस्य ,मुख्य कार्यच गवसले होते.काही काळ ते म्हापण गावी आपल्या काका काकी कडे येऊन राहिले पण मुक्त जीवाला बंधनात किती दिवस करमेल? आधी काही काळ ते अखंड नामस्मरणात काळ व्यतीत करु लागले.पण काही कालातच ते घर सोडून दुरवर निघून गेले. बराच काळ कोकणात ते फिरले ,अनेक ठिकाणी राहीले व फिरत फिरत कोल्हापूरातील गारगोटी येथील आपल्या चुलत्याकडे आले.भालचंद्रांची अस्ताव्यस्थ अवस्था पाहून सर्वलोक अचंबित झाले.चुलतीने त्यांना आंघोळ घातली ,नवे कपडे घातले व त्यानंतर ते काही महिने तिथेच व्यवस्थितपणे राहिले.पण पुन्हा ते तिथेही न राहता दूर निघून गेले.बराच काळ भालचंद्र बाबा त्या अवस्थेत अनेक ठिकाणी फिरत राहिले.देहातीत अवस्थेत त्यांना बाह्य जगताचे भान राहिले नाही.कुणी दिले तर खात नाहीतर सतत चालत राहत.वाट्टेल तिथे झोपायचे पुन्हा चालत राहायचे असा त्यांचा अखंड क्रम सुरु झाला.या ही अवस्थेत त्यांचे अखंड नामस्मरण सुरु होते.पण त्यांच्या बाह्य वेषावरुन लोकांना ते वेडे वाटत होते.जवळपास सहा महिने ते गारगोटी च्या परिसरात देहभान हरपून फिरत असता त्यांची गाठ गारगोटी चे थोर सत्पुरुष सद्गुरु श्री मुळे महाराज यांच्याशी पडली.श्रीमुळे महाराजांनी त्यांना ताबडतोब “इथे न थांबता लगेच दानोलीच्या सद्गुरु योगीराज श्रीसाटम महाराजांकडे जा व त्यांची सेवा कर”असा आदेश दिला.मुळे महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून बाल भालचंद्र गारगोटी ते दानोली पायीच निघाले.अंबोलीचा अवघड घाट पायीच पार करुन ते श्रीसाटम महाराजांच्या दर्शनास दानोलीत येऊन पोचले. सद्गुरु श्रीसाटम महाराजांना आपल्या प्रिय शिष्याला ओळखायला वेळ लागला नाही. श्रीसाटम महाराजांनी बाल भालचंद्रावर तात्काळ कृपा अनुग्रह केला व त्यानंतर भालचंद्र महाराज श्रीमहाराजांची सेवा करत दानोलीत काही काळ राहिले.
दानोलीत सद्गुरु सेवा करित असता एक दिवस साटम महाराजांनी भालचंद्र बाबांना आता दूर जाण्याची आज्ञा केली.मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही त्याप्रमाणे सद्गुरुनी आपल्या प्रिय शिष्याला केलेली ही आज्ञा होती.सद्गुरु आज्ञा होताच भालचंद्र महाराज लगेच भ्रमंती करायला निघाले व फिरत फिरत कनकवली या गावी येऊन पोचले. कनकवलीत जेव्हा भालचंद्र महाराज आले तेव्हा ते दिगंबर अवस्थेत होते.त्यांची दाढी ,जटा ,नखे वाढलेली होती.मौन मुद्रा व दिगंबर अवस्था बघून प्रथमतः हा कुणी वेडा मनुष्य आहे अशीच कनकवलीच्या लोकांची धारणा झाली.लोक वेडा म्हणून त्यांना हिणवू लागले,लहान मुले ही त्यांना त्रास देऊ लागली.पण महाराज मात्र आपल्या निर्वीकल्प वृत्तीच स्थिर झाले होते.या बाह्य उपाधींचा त्यांना काहीही फरक पडत नव्हता .आत्मानंदात स्थिर झालेल्या महात्मांना याचे भान ही कसे राहिल.एकदा एका झाडाखाली महाराज लोकांच्या छळाल विटून ध्यान लावून बसले.तिथेच जवळ काळ्या मुंग्याच्या वारुळातील मुंग्या महाराजांच्या कडे आल्या व ध्यानमग्न देहावर जणू त्यांनी आक्रमण केले.मुंग्या कडाडून चावा घेत होत्या पण ध्यानाच्या गुढ विश्वात स्थिर झालेल्या महाराजांना याचे साधे भान ही नव्हते.गम्मत म्हणजे हे बघून ही लोकांना महाराजांचा अधिकार लक्षात आला नाही.पुढे महाराज कणकवलीतील काशीविश्वेश्वर मंदिराजवळ असलेल्या मारुती मंदिरात वास्तव्य करु लागले.ते अखंड एकाच जागी अन्न पाणी सोडून ध्यान मग्न अवस्थेत बसून होते.त्यांची ही अवस्था लोकांना त्रासदायक वाटू लागली .काही मंडळींनी महाराजांना मारहान ही केली. पण त्यांच्यावर काहीही प्रतिक्रिया न देता महाराज आपल्या आनंदात निमग्न होते.पुढे कणकवलीत प्लेग ची साथ पसरली सर्व गाव दूर गेले पण महाराज मात्र गावातच होते.तरीही महाराजांना काहीही झाले नाही. बारा तेरा वर्षाचा खडतर काळ कणकवलीत गेला तरीही महाराजांचा अधिकार ,त्यांची महती कुणालाही कळली नाही.मारोती मंदिरात राहत असता लोकांनी महाराजांना तिथून ही काढून दिले.महाराज त्यानंतर कामत महाराज या समाधी मंदिरात येऊन राहिले.तिथेही लोकांनी त्यांना राहू दिले नाही.तेव्हा रामचंद्र कामत यांनी महाराजांना एक पडवी बांधून दिली तिथेच महाराज बरेच वर्ष ध्यान करित पडून राहत. वर्षामागून वर्ष जात होते.महाराजांची ब्रह्म बैसका कधीही मोडली नाही.ते अखंड ध्यानावस्थेत होते.कुणी त्यांना वंदन करी ,कुणी टिंगल पण महाराजांना या सर्व बाह्य गोष्टींनी काहीही फरक पडत नव्हता. लोकांची हेटाळणी,टवाळी ,छळ काही केल्या कमी झाला नाही.पण महाराज मात्र आपल्या ध्यानात अखंड निमग्न होते.आपल्या शिष्याची अशी हेटाळणी सद्गुरूंना कशी बरे सहन होईल? सद्गुरु साटम महाराज हे कोकणातील त्यावेळी सर्वात विलक्षण व प्रसिद्ध सत्पुरुष .महाराज आपल्या शिष्याकरिता अचानक ऐके दिवशी कणकवली येथे आले.महाराजांनी आपल्या या प्रिय शिष्याला ह्रदयाशी कवटाळले,त्यांना कुरवाळले.साटम महाराज आपल्या प्रिय शिष्याशी संवाद साधते झाले. हा प्रसंग ,ही भेट झाल्यावर लोकांच्या लक्षात आले की ऐवढे मोठे महापुरुष जर भालचंद्रांच्या भेटीला आले म्हणजे हे नक्कीच कुणी सामान्य व्यक्ती नाहीत.त्यानंतर मात्र कणकवलीवासी भालचंद्र महाराजांना पुज्य भावाने बघायला लागले.लोक त्यांना नमस्कार करायला लागले. लोक त्यांना आता नागडे बाबा म्हणून ओळखू लागले.
नागडे बाबांची किर्ती दिवसेंदिवस पसरू लागली.लोकांना त्यांच्या दिव्य अधिकाराची प्रचिती यायला लागली.भालचंद्र बाबांच्या दर्शनाला लोकांची रिघ लागली.लोक त्यांची आरती करु लागले.सावंतवाडी संस्थानाचे राजे बापुसाहेब भोसले व राणी पार्वतीबाई हे ही खास महाराजांच्या दर्शनाला येत असत.महाराजांच्या दर्शनास्तव लोक दूरदूरुन येत व गर्दी करत.भालचंद्र बाबा जवळपास तिन तपे मौन धारण करुन होते.त्यांच्या नुसत्या दर्शनाने लोकांचे दुःख ,दैन्य दूर होत असत.महाराजांनी कधी कुणाला उपदेश केला नाही तर ते अखंड नामस्मरण करित असत.महाराजांना देहाचे भान नव्हते त्यामुळे खाने-पिने, स्नान अशा गोष्टीकडे त्यांचे लक्ष नव्हते. एकदा गारगोटीचे मुळे महाराज कणकवलीत आले .त्यावेळी ते भालचंद्र बाबांकडे आले ,त्यांना पाहताच मुळे महाराजांना खुप आश्चर्य वाटले .त्यांनी कणकवलीतील आंवडाबाई या स्त्रीला महाराजांची सेवा करण्याची आज्ञा केली.त्यानंतर काशीबाई,मालीनीबाई या थोर गुरुभक्त स्त्रियांनी महाराजांची सेवा शुद्ध अंतःकरणातून केली.उत्तर भारतातील धर्मराज नावाच्या व्यक्तिने ही महाराजांची खुप खुप सेवा केली.तो महाराजांची सर्व प्रकारे सेवा सुश्रुशा करित असे. अनेक भक्त बाबांची सेवा अखंड करित असत. बाहेर गावची मंडळी महाराजांना आपल्या बरोबर गाडीत घेऊन जात.मुंबई ,पुणे अशा विविध ठिकाणाहून महाराजांना आपल्या घरी ,गावात घेऊन जाण्यासाठी लोक आसुसलेले असत.अशातच महाराजांची अंतरंग वृत्ती कधाही ढळली नाही. महाराजांनी अनेक लोकांचे दुःख ,दैन्य ,कष्ट दूर केले.अनेकांवर नुसत्या दृष्टीक्षेपानेच कृपा अनुग्रह केला. या दरम्यान महाराजांचा खुप प्रवास होत असे. अनेक लोक त्यांना आपल्याकडे घेऊन जात असत.असेच मुंबईच्या भक्ताकडे महाराज गेले असता अघटित घडले.महाराजांना दर्शन कार्यक्रमासाठी लालबाग येथे मारोती मंदिरात भक्तांनी आणले होते.तो दिवस होता १६ डिसेंबर १९७७ .लोकांची दर्शनाला प्रचंड गर्दी झाली होती.भक्तांचे भजन सुरु होते. महाराज नामस्मरण करित बसले होते.रात्रीचे सुमारे आठ वाजले होते.अचानक बाबांनी आपल्या प्राण ब्रह्नरंध्रात नेऊन सर्वांसमक्ष देह ठेवला ..महाराजांनी देह ठेवला ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.सर्व भक्त मंडळीच्या दुःखाला पारावार उरला नाही.महाराजांचा देह गाडीतून कणकवलीला आणण्यात आला.मार्गशिर्ष शुद्ध सप्तमी या दिवशी महाराजांच्या देहाची पुजा करुन कणकवली येथील आश्रमात महाराजांच्या देहाला मध्यभागी समाधी देण्यात आली. आज ही महाराजांची कृपा अनेक लोकांना अनुभवायला मिळते. नुसत्या दर्शनाने आजही लोकं दुःख मुक्त झाल्याचे अनेक उदाहरण आहेत. आज महाराजांच्या समाधी मंदिराला भव्य दिव्य असे रुप प्राप्त झाले आहे.अनेक लोक महाराजांच्या समाधी दर्शनाला दुर दूरून कणकवलीत येतात.अशा सद्गुरु भालचंद्र महाराजांचा कृपा आशिर्वाद आपल्या सर्वांच्या सदैव पाठिशी राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो व ही शब्द सुमनांजली श्रीचरणी अर्पण करतो…
🖋️✍🏻 त्यांचाच अक्षय जाधव आळंदी

