Wednesday, February 9, 2022

मॉं नर्मदा जयंती🙏🌺🌸

 #रथसप्तमी_भगवती_मॉंनर्मदांबीकेची_प्राकट्य_तिथी:-

                    नराचा ( मानवाचा ) मद ( अहंकार ) हरणारी असा नर्मदा या नामाचा एक भावार्थ अलिकडे वाचण्यात आला.खरंतर व्याकरण दृष्ट्या हे योग्य आहे की नाही हे सांगता येणार नाही पण भावदृष्टीने यापेक्षा सुंदर अर्थ अजुनतरी वाचण्यात आला नाही.अखंड वैराग्यदायिनी ,आनंददायिनी , मोक्षदायिनी अशी ही मॉं नर्मदा जी सदैव आपल्या भक्तांच्या ,आश्रितांच्या हाकेला धावते,सदैव भक्तरक्षणार्थ तत्पर असते. 

कुर्म पुराणात नर्मदा मैयाच्या माहात्म्य वर्णनाचा एक अतिशय सुंदर श्लोक आला आहे तो असा,


"त्रिभि: सारस्वतं तोयं सप्ताहेन तु यामुनम्  |

सद्यः पुनाति गाॾ्गेयं दर्शनादेव नार्मदम्  || 

       या श्लोकानुसार मॉंसरस्वतीत तिनं दिवस स्नान केल्याने मनुष्य पवित्र होतो, मॉं यमुनेत सात दिवस स्नानाने ,मॉं गंगेत एका स्नानाने मनुष्य हा पवित्र होतो परंतु पुण्यसलिला भगवती मॉं नर्मदेच्या नुसत्या दर्शनाने मनुष्याची तात्काळ , तत्क्षणी पापातून मुक्ती होऊन तो पवित्र होतो. 

मत्स्य पुराणात एका ठिकाणी असे वर्णन आले आहे की ,कनखल क्षेत्रात गंगा मैया पवित्र आहे, कुरुक्षेत्रात सरस्वती , परंतु गाव असो वा वन नर्मदामैया ही सर्वत्र नित्य पवित्रच असते. अशा मॉं नर्मदेची स्तुती अगदी देव,यक्ष,गंधर्व, सिद्ध,महासिद्ध, ऋषी,मुनी,संत,महंत या सर्वांनी एकमुखाने केली आहे. मॉं नर्मदेच्या प्राकट्यासंबंधी एक सुंदर कथा स्कंद पुराणातील रेवा खंडात आली आहे.त्याप्रमाणे भगवान आशुतोष महादेव हे मेकल पर्वतावर तप करीत होते‌. त्या तपामुळे श्रीदेवांच्या दिव्यशरिरातुन घामाचे काही अंश निर्माण झाले व त्यातून मॉं नर्मदेचा जन्म झाला. त्यामुळे मॉं नर्मदेला शिवकन्या, शिवपुत्री असे म्हटले जाते.मॉं नर्मदेचे ज्यावेळी प्राकट्य झाले तेव्हा तीचे रुप हे सप्त वर्षा कन्येचे होते, तिने पिवळे पित वस्त्र परिधान केले होतो. या दिव्य कन्येने दहा हजार वर्ष श्री महादेवांचे तप केले.या तपामुळे प्रसन्न झालेल्या श्रीशिवाने त्यांना वर मागण्यास सांगितले ,त्यावेळी मॉं नर्मदेने देवांना काही वर मागितले ते असे की , "प्रलयात ही मी अखंड अविनाशी असावे,माझ्यातील प्रत्येक दगड हा शिवस्वरुप शिवलिंग रुपात पुजला जावा आणि माझ्या तिरावर शिव-पार्वती सहीत सर्व देवी-देवतांचा अखंड वास असावा" या वरदानाच्या फलस्वरुप आजही नर्मदा मैयातील प्रत्येक दगड हा शिवलिंग ज्याला बाणलिंग असे म्हणतात म्हणून पुजला जातो. एवढेच काय तर त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा ही करण्याची गरज नसते कारण ते प्रत्यक्ष भगवान शिवाचे सगुण रुपच आहे ."नर्मदा के कंकर -कहलाते है शंकर" अशी म्हण आजही नर्मदा तिरी सुप्रसिद्ध आहे. आजही नर्मदा तिरावर सर्व देवी देवतांचा,सिद्ध,महासिद्धांचा नित्य अखंड वास असतो.अशी मान्यता आहे की आजही गुप्त रुपात कोटी सिद्ध महापुरुष हे तप करत नर्मदा तिथी वास करीत आहेत.महाभारातातील शापीत पुरुष श्रीअश्वत्थामा हे ही नर्मदा तिरी वास्तव्य करतात.

लोक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की नर्मदेच्या प्रत्येक काही फुटांवर नर्मदा तिरी ऋषी मुनी वास करतात.

नर्मदा मैयाच्या भेटीस्तव दरवर्षी गंगा आदी सर्व महातिर्थ नर्मदा मैयात वास करण्यासाठी येतात.नर्मदा मैयाचा उगम मेकल पर्वतावर अमरकंटक या क्षेत्री होतो व ती मध्य प्रदेश , गुजरात असा प्रवास करुन सागराला मिळते या दरम्यान कोटी तिर्थांची दृष्य अदृश्य स्वरुपात स्थापना देव , ऋषीमुनी,सिद्धांनी केली आहे याचे वर्णन पुराणात विविध ठिकाणी आले आहे. नर्मदा मैयाचे एक नाव "रेवा" असे ही आहे कारण तिचा प्रचंड प्रवाह हा मोठमोठे पहाड,पर्वताला चिरत,फोडत अखंड प्रवाहित राहतो .ती ज्यावेळी दगडाला घासुन वाहते तेव्हा विशिष्ट प्रकारचा रव म्हणजे नाद निर्माण होतो त्यामुळे तिला रेवा असे म्हटले जाते.मैयाला शिवकन्या,मेकलकन्या असेही नाम आहे.


#नर्मदा_परिक्रमा:- 

             भगवती नर्मदा मैयाशी संलग्न आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा एक सर्वात महत्वाचा विषय म्हणजे नर्मदा परिक्रमा.या सबंध भारतवर्षात नर्मदा ही एकमात्र नदी आहे जिची परिक्रमा केली जाते.ही परिक्रमा सर्व प्रथम श्रीमार्कंडेय ऋषिंनी १०,००० वर्षा आधी केली होती.त्यावेळी त्यांनी नर्मदा मैयाला येऊन मिळणार्या प्रत्येक जल प्रवाहाला न ओलांडता ही परिक्रमा केली होती.त्यानंतर आजवर असंख्य महापुरुषांनी नर्मदा परिक्रमा केली ज्यात सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर इंदूर,नारेश्वर चे सद्गुरु श्री रंगावधूत स्वामी महाराज, सद्गुरु श्री पंडित काका धनागरे महाराज वाशिम, सद्गुरु श्री रामानंद बिडकर महाराज पुणे या महापुरुषामुळे महाराष्ट्रात हे साधन सर्व साधकांपर्यंत पोचले.खरी शास्त्र शुद्ध परिक्रमा ही ३ वर्ष, ३ महिने आणि १३ दिवसांची असते.यात साधक हा व्रतस्थ असतो.परिक्रमा हे एक व्रत आहे जे यम-नियम पुर्वक करायचे असते.मला स्वतःला प्रत्यक्ष सद्गुरु माउली श्री पंडित काका धनागरे महाराजांना बघता आलं हे माझं परमभाग्य.प.पू.काकां नंतर एकही अशा प्रकारची प्रखर आणि यम-नियम पूर्वक परिक्रमा करणारा मला दिसला नाही.प.पू.पंडित काकांनी केलेली परिक्रमा यावर एक स्वतंत्र लेखमालाच तयार होईल एवढे ते प्रचंड आहे.काकांनी पुढे १२ वर्ष फक्त आणि फक्त नर्मदेवरच प्रवचने केली.एक तप त्यांनी मैयाची शब्द सुमनांची पुजा बांधत जणू परिक्रमाच केली होती. आजकाल कुणीही उठतं आणि परिक्रमेला निघतं असं झालंय. नर्मदे ला जायचं ,काही ठिकाणी वाहन ,कुठे पैदल असं करत ठरलेल्या ३/४ महिन्यात परिक्रमा सदृश चालणे आटपायचं आणि लागलीच घरी येऊन त्यावर अनुभवांचं‌ पुस्तक लिहायचं असे झाले आहे.कुणाला एक-महिन्यात अश्वत्थामा भेटतो,कुणाला मैया गरमा गरम जेऊ घालते,कुणाला मारोतीराय भेटतात तर कुणाला दत्त प्रभु.काही वर्षाआधी एका तथाकथीत परिक्रमावासींनी आपल्या पुस्तकात लिहीले होते की ,"मैयानी माझी सिगारेटची तलब पूर्ण करण्यासाठी मला सिगारेटच्या पाकिटाचा पुरवठा केला".यावर काय लिहावं ,या असल्या भंकसगिरीसाठी शब्दही तोकडे पडतात.ती साधकाला आनंदपूर्वक वैराग्य देईल की लौकिक जिवनातील भोग वस्तु पुरवेल? अखंड वैराग्यदायिनी माता तुम्हाला सिगारेट पुरवणार का??? असो त्यांचं पुढे काय झालं यावर न बोललेलं बरं. म्हणजे कांहीही लिहायचं आणि चमत्काराच्या नावाने खपवायचं असं झालंय. एक महत्वाचा मुद्दा मी अधोरेखित करतोय तो असा की , "गाडीने नर्मदेच्या तिरावर फिरणे याला नर्मदा परिक्रमा असे म्हणत नाही.ती नर्मदा परिक्रमा नव्हे.ते नर्मदा भ्रमण आहे." छान चटकमटक खात,लोळंत,कसलेही यम नियम नसलेले हे भ्रमण. नर्मदा परिक्रमा हे एक साधन आहे ज्याने साधक हा अंतर्मुख होतो.आजकाल पुण्यात नर्मदा परिक्रमेचं वार फारच जोरदार वाहतय.जो तो उठसुठ नर्मदा परिक्रमा करतोय आणि पुस्तकं लिहीतोय.पण संतांना ,बापजींना ,पंडीतकाका,नाना महाराज ,बिडकर महाराज यांना त्यातुन वैराग्य ,आत्मशांती आणि विवेकाची प्राप्ती झाली होती.आज किती लोकांचा हा अनुभव आहे. फक्त अनुभवांच्या नावावर तथाकथित चमत्काराने बटबटलेली भाराभर पुस्तके लिहिले जात आहेत,परिभ्रमणाला परिक्रमेचं रुप दिले जातं आहे.आमच्या आळंदीतील एक महाभाग घरी आई वडील काम धंद्यासाठी ओरडतात म्हणून नर्मदा परिक्रमेला निघून गेला.एक जण घरी राहीलं तर शिक्षण करावं लागेल,घर चालवायला लागेल म्हणून आळंदीत आला आणि विरंगुळा आणि बदल म्हणून नर्मदा परिक्रमेला वरवर जात राहतो.मग खरंच ही नर्मदा परिक्रमा झाली का?  हा आज खरा चिंतनाचा गंभीर विषय आहे..अलिकडे गिरणार ची वारी आणि नर्मदा परिक्रमा हे दोन विषय म्हणजे वैकुंठवाला जाण्याचे महाद्वारच झाले आहे.पण या असल्या उथळ परिक्रमा खरंच परमार्थात काही उपयोगी आहेत का??

 श्री कबिर दास एका ठिकाणी म्हणतात, 

"माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर,

कर का मनका डार दे, मन का मनका फेर।"

इथे कबिर दासांचा हा दोहा प्रत्येकांसाठी किती चिंतनीय आहे ना!! 

एक काय अशा एक हजार जरी परिक्रमा केल्या तर त्याचा काही तरी उपयोग होईल का? असो आज मैयाची जयंती आम्हाला मैया दत्तप्रभुंप्रमाणे जरा जास्तच जवळच्या वाटतात कारण आमच्या गुरुघरचे ते आराध्य इष्ट दैवतच.सद्गुरु माउली पंडित काकां मध्ये आम्ही नर्मदेचा खरा साधक बघितलाय.ती विरक्ती,ते तेज,ती शांती,ती कर्मनिष्ठा,ते तप आणि ती आत्मानुभूती आली तर काही खरं, नाहीतर वरती कबीर दासांनी म्हटल्या प्रमाणे एक पूर्ण युग जरी परिक्रमा रुपी माळ फिरली तरी काही उपयोग होणार नाही ,कारण मैया ही भगवती आहे आणि ती सर्व जाणतेच. आजच्या परमपावन दिनी मॉं नर्मदेचे स्मरण करुन तिनेही आपल्या सर्वांना खर्या वैराग्याची प्राप्ती करुन द्यावी, फाजील अनुभवांच्या पुस्तकांपासून दूर ठेऊन सद्गुरुंच्या चरणी अनन्य निष्ठापूर्वक साधन करवावे, सद्गुरुंनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची बुद्धी द्यावी आणि जर निशिबात असेलच तर वरील महापुरुषांनी जशी परिक्रमा केली तशी कधीतरी पूर्ण करुन घ्यावी हीच मैयाच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग पूर्वक प्रार्थना करतो. 🙏🌸

प.पू.श्री थोरल्या स्वामी महाराजांच्याच शब्दात भगवती जगदंबा नर्मदा मैयाच्या स्तुती ने लेखनीला विराम देतो.


भवान्तकेऽभयं देहि तापं मे हर नर्मदे ।। 

भवात्मके नयं देहि पापं मे हर नर्मदे ।।  

जय जय शिवकन्ये नर्मदे शर्मदे त्वम् । 

जय जय जनमान्ये धर्मदेऽधर्मदे त्वम् ।। 

जय जय सुवदान्ये धर्मदे कर्मदे त्वम् । 

जय जय भूवि धन्ये भर्मदे वर्मदे त्वम् ।।

     ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


नर्मदे हरसंभूते हरलिंगार्चनादृते । हरलिंगात्र्चिततटे जयांघ नर्मदे हर ।।

#नर्मदे_हर_हर_हर 🌸🌺🙏🚩

#श्रीदत्त_शरणं_मम🌸🌺🙏🚩

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...