स्वानंदचक्रवर्ती_समर्थ_सद्गुरु_श्रीगोविंदकाका_उपळेकर_महाराज_यांची_आज_४८वी_पुण्यतिथी:-
राजाधिराज योगीराज परब्रम्ह भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परंपरेतील प्रभावळीतील अतिशय थोर ,लोकविलक्षण,सतत आत्मानंदात निमग्न असणारे सत्पुरुष ,थोर संत म्हणजे श्री गोविंद काका उपळेकर महाराज.परब्रह्म श्री स्वामी माउलींच्या प्रभावळीत अत्यंत शोभून दिसणारे संतरत्न असे श्री काका. प.पू.गोवींद काकांचे चरित्र अतिशय विलक्षण ,दिव्य आणि अलौकिक असे आहे. प.पू.काकांचा एका डॉक्टरांपासून ते संतत्वाचा अचाट जिवन प्रवास बघितला तर कुणीही थक्क,स्तिमीत होईल.
उपळेकरांचे घराणे हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या गावचे.प.पू्.श्रीगोविंद काकांचे वडिल श्री रामचंद्रपंत उपळेकर नंतर बारामती जवळील माळेगांव येथे आले.ते वकिलीचा व्यवसाय करीत.प.पू.श्रीगोविंदकाकांचा जन्म श्रीरामचंद्रपंत व सौ.जानकीबाई या सत्शिल दांपत्यापोटी माळेगावच्या वाड्यातच झाला. १५ जानेवारी १८८८ रोजी माघ शुद्ध द्वितीयेला पहाटे ४ वाजता,धनिष्ठा नक्षत्रावर प.पू.काकांचा जन्म झाला.त्या दिवशी संक्रांतीची कर म्हणजे किंक्रांत होती.प.पू.काका हे या दाम्पत्याचे पाचवे अपत्य होते.प.पू.काकांच्या जन्मानंतर लगेचच त्यांचे बिर्हाड हे फलटणला आले.काकांचे सुरुवातीचे शिक्षण हे फलटण येथेच झाले.पू.काका हे उपजतच एकपाठी आणि अत्यंत हुशार होते.श्रीमद् भगवद्गीता ते शेवटून सुरुवातीपर्यंत उलट्या क्रमाने म्हणू शकत असत.काकांचे सुरवातीचे शिक्षण हे फलटण येथील राजे मुधोजी हायस्कूल मध्ये झाले.त्यानंतर ते पुणे येथील नू.म.वी मध्ये दाखल झाले.पुढे ते बी.जि मेडिकल कॉलेजमधून १९१३ साली ते L.C.P & S ही डिग्री घेऊन डॉक्टर झाले.वयाच्या पंचविसाव्या वर्षी काकांचा विवाह दादोजी कोंडदेव यांच्या वंशातील कु.दुर्गा हिच्याशी १९१३ साली झाला.कु.दुर्गा ही लग्नानंतर सौ.रुक्मिणी झाल्या. कु.दुर्गा या दादोजी कोंडदेवांच्या वंशातील शेवटच्या एकमात्र व्यक्ती असल्यामुळे गडगंज संपत्तीच्या त्या एकमात्र वारस होत्या.त्यांना कोर्टामध्ये सांगावे लागले होते की ,हा विवाह त्यांना मान्य असून कोणत्याही जबरदस्तीशिवाय त्या हे लग्न करीत आहेत.पुढे काकांसोबत संसारात सौ.रुक्मिणी मातोश्रींना लंकेची पार्वती होऊन रहावं लागले तरी त्यांनी काहीही कुरबुर न करता आनंदाने या महात्म्या सोबत संसार केला.लगेचच १९१४ साली सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात प.पू.काकांना सर्जन म्हणून रॉजल आर्मीत रुजु झाले.प.पू.काका हे सैन्यात भरती झाल्यावर त्यांचे पहिले पोस्टींग हे दक्षिण आफ्रिकेतील नैरोबी येथे झाले.त्यानंतर फ्रांस, इंग्लंड, रावळपिंडी येथे त्यांनी सेवा बजावली.शेवटच्या रावळपिंडी येथील पोस्टींग वेळी काकांमध्ये तिव्र मुमुक्षा निर्माण झाली.ते विचार करीत की,आपण एवढ्या देहांची चिरफाड केली तरी पण आत्मा जो म्हणतात तो का आपल्याला दिसत नाही ? अशाप्रकारे ते शाश्वत सुखासाठी अतिशय तळमळू लागले, ईश्वराकडे ते करुणा भाकु लागले.त्याच सुमारास त्यांना अधूनमधून एका दिगंबर साधू चे दर्शन होवू लागले.त्या अनामिक साधु बद्दल त्यांना अतिशय प्रेम,विलक्षण ओढ वाटु लागली.याच अवस्थेत काका काही काळ रजेवर फलटण ला घरी विश्रांती साठी परतले.त्यांच्या एका परिचीत व्यक्ती बरोबर काही कारणास्तव काका पुसेसावळीला त्यांच्या सद्गुरुंना भेटायला गेले.तिथे गेल्यावर मारुती मंदिरात उभ्या असलेल्या दिगंबर संतांना बघुन काकांना धक्काच बसला.कारण याच दिगंबर सत्पुरुषाला त्यांनी वारंवार दृष्टांतात आधी बघितले होते.ते दिगंबर सत्पुरुष म्हणजे पुसेसावळीचे अवधूत श्रीकृष्णदेव परीट होते.
श्रीकृष्णदेव महाराज हे परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परंपरेतील एक अप्रसिद्ध महापुरुष होते.श्रीकृष्णदेव महाराजांची गुरुपरंपरा पुढीलप्रमाणे आहे-
परब्रह्म भगवान श्रीस्वामी समर्थ महाराज - श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज (कुंभार स्वामी कोल्हापूर) - श्रीधोंडीबुवा महाराज ,पलूस - श्रीकृष्ण देव महाराज,पुसेसावळी. श्रीकृष्ण देव महाराज हे नित्य विदेही स्थितीत राहणारे विलक्षण अवलिया होते. सुट-बुटातील गोविंद काकांना बघून महाराज म्हणाले, "हे असले ध्यान इथे नको." या एका वाक्यातुन काकांना जे समजायचे होते ते त्यांना समजले व एका भारावलेल्या अवस्थेत ते फलटण ला परतले. दुसर्याच दिवशी नोकरी,वैभव,घरदार , ऐश्वर्य सर्व क्षणात सोडुन साध्या धोतर-उपरण्यातील वेषात पुसेसावळीला येऊन श्रीकृष्णदेवांच्या सेवेत ते रुजु झाले.त्यांची सेवा हे अतिशय मोठे दिव्य होते.श्रीकृष्णदेव महाराज उघड्या अंगाने भर दुपारी निखार्याप्रमाणे तापलेल्या वाळूत पडुन राहत.तासनतास ते ओढ्याच्या पाण्यात बसुन राहत,फड्या निवडुंगातून ते तासनतास लोटांगणे घालित असतं. लहानपणापासून सुखात वाढलेल्या डॉ उपळेकरांसाठी हा बदल नक्कीच सोपा गेला नसणार.पण प.पू.गोविंदकाकाही तयारीचे शिष्य होते त्यांनी ही गुरुचरणी देह झिजवून परमार्थातील अतिउच्च अवस्था गाठली.
[ पुढील प्रसंग हा प.पू.काकांचे पणतु श्रीरोहनजी उपळेकर यांनी लिहीलेल्या लेखातुन जसाच्या तसाच घेतला आहे.दादांनी अतिशय सुंदर आणि तंतोतंत शब्दात या प्रसंगाचे वर्णन केले आहे. ]
( पुसेसावळी गावातील लोकांना परदेशात राहून आलेल्या या डॉक्टरचे फार आश्चर्य वाटे. ते म्हणत की, वेड्या कृष्णा परटाच्या संगतीने या फलटणच्या डॉक्टरलाही बहुदा वेड लागले असावे. पण त्यांना काय कळणार की ते वेड किती अद्भुत होते !
पुसेसावळी येथील काही मोजक्या कुटुंबांमधील लोक मात्र सद्गुरु श्रीकृष्णदेव व पू. काकांचा अधिकार जाणून होते व त्या दोघांचीही ते जमेल तशी काळजी देखील घेत असत. श्रीकृष्णदेव महाराजांनी पू. काकांची प्रचंड परीक्षा पाहिली. लोकांनी देवांना विचारावे, " या बामनाला का तरास देताय? " तर श्रीकृष्णदेवांनी उत्तर द्यावे, " हा माझं समदं डबुलं मागतुया ! " खरोखरीच, सद्गुरु श्रीकृष्णदेवांपाशी असलेले शांभव अद्वयानंदवैभवच तर हवे होते ना काकांना ! पू. काकांनी तीन वर्षे मनापासून सेवा केली सद्गुरूंची. शेवटी ती दयाघन गुरुमाउली प्रसन्न झाली व एकेदिवशी पू. काकांच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवून श्रीकृष्णदेवांनी आपल्या पर्यंत परंपरेने आलेले स्वामीकृपाधन पू. काकांना बहाल केले. पू. काकाही त्या कृपावर्षावात पूर्णपणे न्हाऊन निघाले, अंतर्बाह्य सुखरूप होऊन ठाकले. सद्गुरु श्रीकृष्णदेवांनी " आपणासारिखे करिती तात्काळ । " या संतवचनाची रोकडी प्रचितीच पू. काकांना एका क्षणात अनुभवाला आणून दिली. ये हृदयीचे ते हृदयी प्रतिष्ठापित केले.
पू. काकांनी केलेली गुरुसेवा फार अलौकिक आहे. भगवान श्रीमाउलींनी श्रीज्ञानेश्वरीत मांडलेली गुरुसेवा पू. काकांनी प्रत्यक्ष आचरून दाखवलेली आहे. खूप खडतर आणि अपार निष्ठेचीही कसोटी पाहणारी त्यांची गुरुसेवा खरोखरीच विशेष म्हणायला हवी.
पू. काकांवर कृपा करण्याचे आपले भगवत्प्रदत्त कार्य संपन्न झाल्याने आता श्रीकृष्णदेवांची पैलतीराची ओढ बळावली होती. म्हणून श्रीभगवंतांच्याच प्रेरणेने श्रीकृष्णदेवांनी भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, दि. ८ ऑक्टोबर १९२३ रोजी मध्यान्ही पुसेसावळीच्या ओढ्यात जलसमाधी घेतली. तत्पूर्वीच श्रीकृष्णदेवांनी आपल्या लाडक्या गोईंदाला मुद्दामच फलटणला घरी पाठवून दिले होते. )
पुढे भाद्रपद कृष्ण त्रयोदशी ,दि.८ ऑगस्ट १९२३ रोजी मध्यान्ही पुसेसावळीच्या ओढ्यात जलसमाधी घेतली. तत्पूर्वीच महाराजांनी काकांना फलटण ला परत पाठवुन दिले.श्रीकृष्णदेवांच्या महासमाधीचे वृत्त समजताच ते लोटांगण घालीतच फलटण ते पुसेसावळीला गेले.हा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे .प.पू.काकांची सद्गुरु चरणी असलेली अनन्य निष्ठा,अनन्य प्रेम या प्रसंगातुन दिसते.इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुसेसावळी ते फलटण चे अंतर हे जवळपास ८० किमी आहे.एकढे मोठे अंतर तेही लोटांगण घालीत पार करणे हा एक विलक्षणच प्रसंग आहे.पुसेसावळीला पोचल्यावर प.पू.काकांनी सद्गुरु श्रीकृष्ण देव महाराजांच्या समाधीवर जे डोके ठेवले ते तिन दिवसांनीच वर काढले.श्रीकृष्णदेवांच्या सगुण विरहाने काका अतिशय व्याकुळ झाले.तिथेच राहुन त्यांनी श्रीगुरुसेवेचा प्रारंभ केला. पुसेसावळीला राहुन त्यांनी लगेच "श्रीकृष्णदेव" हे दिव्य चरित्र लिहुन काढले.त्यालाच त्यांनी "हरिहर भेट" असेही नाव दिले होते.या चरित्र लेखनानंतर श्रीकृष्ण देव महाराजांनी पुर्वी सांगितल्याप्रमाणे काका भारतभ्रमणाला निघाले. इ.स १९२३ ते ३३ या दहा वर्षांच्या कालावधीत पू.काका हे अज्ञातवासात होते.मधूनच ते फलटणला घरी येत असत व कधीतरी मधूनच निघून जात.या दहा वर्षांच्या काळात काका मौनातच होते.या दहा वर्षांतील बहुतेक प्रसंग हे अज्ञातच आहे.जे काही माहिती आहे ते सर्व पू.काकांनीच आपल्या भक्तांना सांगितले आहे व त्यांचीच फक्त नोंद झाली आहे.या अज्ञातवासात काकांचे काही काळ हिमालयात ही वास्तव्य होते.एके दिवशी त्यांनी आतुर संन्यास घेऊन हिमालयातील कड्यावरून उडी मारुन देहत्याग करण्याचा निश्चय केला होता.तसे करायला ते गेलेही पण त्यावेळी त्यांच्या समोर भगवान नर-नारायण प्रगट झाले.त्यांनी काकांना दर्शन देऊन त्यांच्या भावी कार्या संबंधी मार्गदर्शन केले. इ.स १९३३ साली प.पू.काका पुन्हा फलटण ला आले. पुढे काकांनी संसारातही लक्ष घातले. या कालावधीत पू.काकांनी एकून ३१ ग्रंथ लिहिले. हे सर्व ग्रंथ काकांनी आपल्या उन्मनी ,अवधूत आनंदात लिहीले असल्याने ते सहजासहजी न समजण्यासारखे व गुढ असे आहे.श्रीज्ञानेश्वरी वरील 'श्रीज्ञानेश्वरी सुबोधीनी' हे अडीच हजार पेक्षा जास्त पृष्ठांचे विवेचन काकांनी केले.हे विवेचन एकूण १८ खंडांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्याशिवाय 'सिद्धांत ज्ञानेश्वरी' चे चार खंड, 'सामोपचार परिहार' ,'आमोद' व 'ज्योतिज्योती' हे स्फुट निबंधवजा लेखांचे संकलन असलेले लघुग्रंथ , 'हरिपाठ सांगाती', 'नित्यपाठ' , 'विभूती' ,'श्रीज्ञानेश्वरी मार्गदर्शिका', 'श्रीज्ञानेश्वर प्रशस्ति' आणि 'श्रीभगवद गिता सुबोधिनी' असे प्रचंड व गुढ ,सारभूत वाङमय काकांच्या हातुन माउलींनी निर्माण करुन घेतले.
प.पू.काकांचे आजवर एकूण ७ चरित्र प्रकाशित झाले होते.आज ते उपलब्ध नाहीत. पण काकांचे पणतु रोहनजी उपळेकर यांनी काकांचे अतिशय सुंदर असे "स्वानंदचक्रवर्ती" हे चरित्र लिहीले आहे.अतिशय वाचनीय, चिंतनीय असे हे चरित्र आहे. दत्त संप्रदायाचे अध्वर्यू सद्गुरु श्रीशिरीष दादा कवडे यांनी या ग्रंथांच्या प्रस्तावनेत काकांचे महात्म्य अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले आहे. प.पू.श्री सद्गुरु दादा लिहीतात , "विसाव्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या अग्रगण्य भगवद् विभूतींमध्ये पू.उपळेकर काकांची गणना होते. पू.काका संतत्वाचा उत्तुंग आदर्श होते. लौकिकातल्या कुठल्याही प्रसंगांत त्यांच्या अंत:करणाची ब्रह्मबैसका सुटलेली दिसत नसे. ते स्वानंदसाम्राज्याचे चक्रवर्ती सम्राटच होते. प्राप्त पुरुषाची ती समग्र दैवी सुलक्षणे त्यांच्या ठायी सुखाने, आपलेपणाने तिन्ही त्रिकाळ नांदत होती. सहज, अखंड समाधीचे शांभवी वैभव त्यांच्या सर्व लीलाव्यवहारांमधून सदैव ओसंडत असे !" प.पू.सद्गुरु श्री काका व प.पू.सद्गुरु श्री शंकर महाराज धनकवडी यांची अनेकदा भेट झाली आहे.श्रीरावसाहेब मेहेंदळे यांच्या घरी काही किर्तन ,प्रवचना प्रसंगी सद्गुरु शंकर महाराज हजर असत व सद्गुरु काका ही तिथे येऊन जात. प.पू.काकांच्या चरित्रात असंख्य अलौकिक प्रसंग आहेत. तरी पोस्ट मधील शब्दांच्या मर्यादेमुळे ते सर्व इथे मांडणे शक्य नाही.काकांचे संपूर्ण जिवन एकमेवाद्वितीयच आहे. प.पू काकांनी आपल्या इच्छेने ठरवून देह ठेवला.८ ऑक्टोबर ही सद्गुरु श्री कृष्णदेव महाराजांची देहत्यागाची तारीख होती. तीच तारीख प.पू.काकांनी देह ठेवण्यासाठी निवडली. ८ ऑक्टोबर १९२३ रोजी सद्गुरु श्री कृष्णदेव महाराजांची देह ठेवला होता. ८ ऑक्टोबर याच दिवशी प.पू.काकांनीही देह ठेवला. अशा या अतिशय दिव्य महापुरुष, संतश्रेष्ठ सद्गुरु श्री गोविंद काका उपळेकर महाराज यांच्या चरणी माझे शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌸🌺
✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

