Thursday, December 1, 2022

सगुणभगवद्स्वरूप भाग १ :- श्रीमद प.प सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराज🙏🌸🌺🌿🚩

 


🙏सगुणभगवद्स्वरूप भाग १ :- श्रीमद प.प सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराज.

प्रगटोनी या धरेवरती । निजजनोध्दार करती ।
शान्त दान्त मुनिस्वामी । ते हे नृसिंहसरस्वती यती ।।

थोरल्या स्वामी महाराजांच्या शिष्य प्रभावळीतील एक दैदिप्यमान शिष्य रत्न म्हणजे सद्गुरु श्री दीक्षित स्वामी महाराज.श्रीक्षेत्र नृसिंहवाडी वाडीच्या परमपवित्र भूमीत होऊन गेलेल्या महापुरुषांच्या मांदियाळीतील ही एक महत्तम श्रेष्ठ विभूती.ज्याप्रमाणे समर्थांचे - कल्याण , निवृत्तीनाथांचे - ज्ञानदेव, जनार्दनांचे - एकनाथ तसेच थोरल्या स्वामी महाराजांचे - दीक्षित स्वामी महाराज असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.श्री दीक्षित स्वामी महाराजांची योग्यता इतकी थोर आणि त्यांचा अधिकार इतका विलक्षण होता की सद्गुरु माउली श्री टेंब्ये स्वामी महाराजांनी त्यांना दंड दिक्षा दिल्यानंतर त्यांचे संन्यास आश्रमाचे नाव हे प्रत्यक्ष देवांच्या नावावरुन "श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज" असे ठेवले होते.श्रीदत्त संप्रदायाला वर्धिष्णू करण्याचे,दिशा देण्याचे व नवसंजीवनी देण्याचे अलौकिक कार्य पंचम दत्तावतार श्री टेंबे स्वामी महाराज म्हणजे थोरल्या महाराजांनी केले यात शंका नाही.त्याचबरोबर हे दत्त कार्य श्री थोरल्या स्वामी महाराजांच्या या दिव्य शिष्य मंडळींनी जगभरात पोचवले.दीक्षित स्वामी महाराज म्हणजे महाराजांचे हृदयच जणू काही! श्री थोरले स्वामी महाराज भारतात कुठेही भ्रमण करित असले तरी आपली निर्माण केलेली प्रत्येक ग्रंथ संपदा ,लेखन हे श्री दीक्षित स्वामी महाराजांकडे पाठवून देत असत.यावरुन श्री थोरल्या  स्वामी महाराजांचे दीक्षित स्वामींवर असलेले विलक्षण प्रेम दिसून येते.दीक्षित स्वामी महाराज हे पंचमाश्रमात पोचले होते.अगदी अवधूती अवस्थेतील श्रीस्वामी महाराजांचे चरित्र अवलोकन केल्यावर त्यांच्या अधिकाराची पुसटशी कल्पना आपल्याला आल्याशिवाय राहत नाही.

"शुद्ध बीजापोटी ! फळे रसाळ गोमटी !!" या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे श्री दीक्षित स्वामी महाराज यांचे कुळ हे परम दत्त भक्त होते.हे दिक्षीत कुटुंब मुळचे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दक्षिणेकडील "सदलगा" या गावातील होते.श्री महाराजांच्या कुळातील एक परमभक्त दर शनिवारी व पौर्णिमेला श्री क्षेत्र नृसिंहवाडी ची वारी करित असत.शारिरीक दृष्ट्या वारी झेपत नसल्यावर ही त्यांनी वारीत खंड पडू दिला नाही.त्यांच्या या अनन्य निष्ठेवर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंह सरस्वती दत्त प्रभुंनी त्यांना आपल्या निजरुपात दर्शन दिले व कृष्णामाईतील तिनं गोटे उचलून यांची दत्तस्वरुप ब्रह्मा, विष्णू व महेश रुपात घरीच पुजा करण्याची आज्ञा केली‌.( हा कथा भाग अतिशय विलक्षण आहे पण संक्षिप्त रुपात मांडला आहे.) पुढे याच कुळातील एक पुण्यपुरुष काही काळाने क्षेत्रवासार्थ श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे सहकुटुंब येऊन राहिले.त्यांचा वंश तेथेच वृद्धींगत झाला.त्याच वंशात जन्माला आलेले श्री.लक्ष्मण दीक्षित हे आपल्या चरित्र नायकाचे पिताश्री.श्री लक्ष्मणशास्त्री हे महाभागवत,परमभावीक व आचारविचारसंपन्न कर्मनिष्ठ ब्राह्मण होते.त्यांच्या पत्नि सौ.अहिल्यादेवीदेखील मोठ्या धार्मिक होत्या.या सत्शिल दत्तभक्त दाम्पत्याचे पोटी शके १७८८ इ.स १८६६ साली प्रभवनाम संवत्सरात चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती दिक्षीत स्वामी महाराज यांचा जन्म झाला.यथाकाळी बाळाचे बारसे झाले व बाळाचे नाव "नारायण" असे ठेवण्यात आले. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे बाळ नारायण लिला करत मोठा होऊ लागला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे मोठ्या थाटात मौंजीबंधन करण्यात आले.नारायणांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मावशी कडे इचलकरंजीला झाले.आपल्या ब्रह्मचारी आश्रमाची आन्हिक कर्मे करुन ते विद्या शिकू लागले.श्रीनारायण हे एकपाठी होते त्यामुळे सर्वत्र त्यांना अव्वल क्रमांक मिळत असे.त्यांचे पुढील पाचवी पर्यंतचे शिक्षण मिरजेत इंग्रजी शाळेत झाले.शिक्षण पूर्ण झाल्यावर वडिलांनी त्यांचे तात्काळ लग्न लावून दिले. त्यांच्या पत्नी चे नाव वाराणसी होते.इंग्रजी शिक्षणामुळे त्यांना पाश्चात्य कपडे घालण्याची विशेष आवड होती.असेच एकदा नवीन पोशाख घालून मित्रांसोबत जात असता त्यांची आपल्या वडिलांच्या एका परिचीत मित्राशी गाठ पडली.त्यांनी नारायणाच्या या पाश्चात्य पोशाखावर व शिक्षणावर नापसंती दर्शवली व त्यांच्या परमदत्त भक्त ,वैदिक व कर्मनिष्ठ दीक्षित कुळातील उज्वल परंपरेची आठवण करून दिली.या एका प्रसंगानंतर नारायणात विलक्षण बदल घडला.त्यांनी यावर विचार केला व आपले पाश्चात्य कपडे‌ आणि पुस्तके तात्काळ नाल्यात फेकून दिली.घड्याळ फोडून टाकले आणि एक साधे धोतर ते नेसू लागले.या प्रसंगानंतर ते अतिशय अंतर्मुख झाले व जास्तीत जास्त मौन धारण करु लागले.त्यांनी याच काळात एकनाथी भागवत वाचण्यास प्रारंभ केला.पुढे काही काळाने श्रीनारायण हे नृसिंहवाडी येथे घरी परतले.वडिलांनी त्यांना शास्त्राध्ययन करण्याचा सल्ला दिला व त्यांनी संस्कृत शास्त्र शिकण्यास सुरुवात केली.पुढे शास्त्राभ्यास आवरता घेऊन हरीभक्ती करण्यात त्यांचा रस जास्त वाढत गेला.याचदरम्यान ते गुरुचरित्र,श्रीवेदेश्वरी या ग्रंथाचे वाचन करु लागले.त्यामुळे त्यांना सद्गुरु प्राप्ती साठी तळमळ वाटू लागली.

पुढे लवकरच श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या रुपाने सद्गुरु कृपेची प्राप्ती श्री नारायण शास्त्रींना झाली.श्री थोरल्या स्वामी महाराजांनाही आपल्या या अधिकारी शिष्याची तात्काळ ओळख पटली व त्यांनी नारायण शास्त्रींंना अनुग्रह देऊन कृपा केली.पुढे श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात त्यांचा उपनिषदे,जीवनमुक्ती विवेक आदी ग्रंथांचा सखोल अभ्यास झाला.श्री थोरल्या महाराजांची त्यांनी खुप विलक्षण सेवा केली.( त्यांनी केलेली गुरुसेवा व सद्गुरु माउली प्रती पाळलेली त्यांची मर्यादा नुसती वाचली तरी आश्चर्य व्हायला होते.इतका विलक्षण श्रद्धाभाव व आदर त्यांना आपल्या सद्गुरुं बद्दल होता.त्यावर जरुर एक स्वतंत्र लेख लिहीण्याची माझी तरी इच्छा आहेच.) पुढे श्री थोरल्या स्वामी महाराजांनी संन्यास घेतला व नारायण शास्त्रींनी कठोर अशा गृहस्थाश्रमास सुरुवात केली.ते रोज पाच घरी शुष्क भिक्षा मागत‌.सुरवातीस त्यांची लोकांनी खुप टिंगल केली पण लवकरच त्यांच्या ठाई असलेल्या प्रखर वैराग्यापुढे सर्व लोक दिपून गेले व त्यांच्या ठिकाणी महाराजांबद्दल पूज्यभाव निर्माण झाला .कालांतराने त्यांनी आपल्या घरी भिक्षेस यावं यासाठी लोक प्रतिक्षा करु लागले.त्यांच्याकडे शास्त्रार्थ समजून घेण्यासाठी अनेक लोक येऊ लागले.लोकांमध्ये ते छोटे टेंबे स्वामी या नावाने आता प्रसिद्ध होऊ लागले होते.

पुढे काही कालांतराने नृसिंहवाडीस प्लेगची सात पसरली.त्यात त्यांच्या पत्नी व मुलाचा मृत्यू झाला.जणू दत्तप्रभुंनी त्यांचे सर्व संसार पाश तोडून टाकले व त्यांना मुक्त केले.पत्नीची अंत्येष्टी करून आल्यावर त्यांनी कुरुंदवाडलाच  संन्यास घेतला‌ व नारायणस्वामी हे नाम धारण केले.श्री थोरल्या स्वामी महाराजांकडे जाऊन त्यांच्या सोबत काळ घालवावा अशी त्यांची इच्छा होती पण श्री स्वामी महाराजांनी त्यांना नृसिंहवाडी सोडून कुठेही जाऊ नये अशी आज्ञा केली.पुढे श्री थोरल्या  स्वामी महाराजांनी भगवान श्री दत्तात्रेय प्रभुंच्या आज्ञेने नारायण स्वामींना दंड दिक्षा दिली व त्यांना  "नृसिंह सरस्वती" असे नाम दिले.थोरल्या स्वामींनी त्यांना चतुर्थाश्रमाचा धर्म सांगितला. उपनिषदे , पंचीकरण , वार्तिके शिकविली.ध्यानसमाधी ,योग यांचा अभ्यास सांगितला.उत्सवमूर्तींची पूजा हीच सेवा त्यांना सांगितले.इतका उपदेश करुन थोरले स्वामी महाराज संचारार्थ निघून गेले.पुढे ज्यावेळी श्री स्वामी महाराज नृसिंहवाडी येथे आले तेव्हा दीक्षित स्वामी महाराजांनी त्यांना पादुका प्रसाद मागितला.श्री थोरल्या स्वामी महाराजांनीही आपल्या पायात काष्ठ पादुका घातल्या काही पावले ते चालले व त्या प्रसाद रुपात दिक्षीत स्वामींना दिल्या.या एकमात्र टेंब्ये स्वामीं महाराजांनी घातलेल्या पादुका आहेत व आजही त्या औरवडच्या दत्त मंदिरात बघायला मिळतात.पुढे परत काही काळासाठी थोरले स्वामी महाराजांनी नृसिंहवाडी येथे येऊन श्री दीक्षित स्वामींना उपदेश केला आहे.दीक्षित स्वामी महाराजांनी वाडीत मुलांना सोबत घेऊन श्री थोरल्या स्वामी महाराजांची जन्म तिथी साजरी करण्यास सुरुवात केली.हे ज्यावेळी उत्तर भारतात असलेल्या स्वामींना कळली तेव्हा ते म्हटले , "स्वामी वेडे झाले आहेत व त्यांनी पुजार्‍याला देखील वेड लावले आहेत.उत्सव तर देवांचे करावेत." पण आपल्या या प्रिय शिष्याला सद्गुरु भक्तीचे लागलेले वेड श्री स्वामी महाराजांनी आधीच ओळखले होते.पुढे श्री नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराज हे इतके समाधीत लिन होत गेले की ज्ञानाच्या सहाव्या अवस्थेला पार करत ते सप्तमभूमीकारुढ झाले होते.(या ज्ञानाच्या भूमिका कुणा अधिकारी सत्पुरुषाकडून समजून घेतल्याशिवाय कळणार नाही त्यामुळे त्याबद्दल काहीही लिहीण्याचे मी धाडसच करणार नाही त्याबद्दल क्षमस्व. या पातळीवर प्रत्यक्ष देह रुपात वावरणारे क्वचितच संत चरित्र वाचण्यात आले त्यातील हे एक विलक्षण चरित्र आहे.)
पुढे श्री थोरल्या स्वामी महाराजांच्या समाधी घेण्याचा काळ जवळ येऊ लागला.त्यावेळी श्री थोरले स्वामी महाराज, शेवटच्या दिवसांत श्रीक्षेत्र गरुडेश्वरी मुक्कामाला होते. गरुडेश्वरी जाण्याच्या अगोदर, श्रीक्षेत्र वाडीला असताना त्यांनी श्रीदीक्षितस्वामींना आपल्या पादुका दिल्या होत्या. पुढे, गरुडेश्वरला श्रीटेंबेस्वामी महाराजांची तब्बेत जेव्हा बिघडली, तेव्हा श्रीदीक्षितस्वामी निरनिराळे काढे, मात्रा, त्या पादुकांवर घालीत असत. एक भक्त अमरेश्वराहून गरुडेश्वरी गेले, तेव्हा त्यांनी श्रीटेंब्येस्वामी महाराजांच्या कानी ही गोष्ट घातली. श्रीस्वामी महाराजांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांनी त्या भक्ताजवळ निरोप दिला; 
"त्यांना सांगा, तुम्ही इतके दिवस केलेल्या या अपूर्व सेवेमुळेच आमचे आयुष्य एक महिनाभर अधिक वाढलेले आहे. आता मात्र देवांची आज्ञा झाली आहे, तेव्हा देह सोडणे प्राप्त आहे. म्हणून आता ही सेवा पुरे करावी!" हा निरोप ऐकून, प.प.श्री दीक्षितस्वामी महाराजांनी पादुकांवर काढे घालणे बंद केले. गरुडेश्वरी औषधोपचार चालू नसताना देखील श्री टेंबेस्वामी महाराजांची तब्बेत ठीक राहू शकली होती, याचे रहस्य हे असे होते.पुढे लवकरच श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी आपल्या सगुण देहाचा त्याग गरुडेश्वरी केला.
थोरल्या महाराजांच्या समाधीनंतर आपल्या गुरूचे एक मंदिर व्हावे ही त्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्यांनी औरवाडला श्रीवासुदेवानंद सरस्वती पीठ स्थापन केले.
तेथे थोरल्या महाराजांच्या पादुका स्थापन करून पूजाअर्चा सुरू झाली. दीक्षित स्वामी महाराजांनी हजारो भक्तांच्या समस्या सोडवल्या. त्यांना आध्यात्मिक व भौतिकही मार्गदर्शन केले. त्यांनी गरुडेश्र्वर नासिक, विदर्भ, अलाहाबाद, काशी येथे दौरा केला. पण ते आपल्या सद्गुरुचे नावलौकिक,दत्त संप्रदायाचे कार्य   वाढविण्यात उत्सुक होते. त्यामुळे थोड्याच दिवसात अयोध्येत जाऊन राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला व तेथेच ते अश्र्विन वद्य ७ शके १९२७मध्ये दत्तचरनी विलीन झाले.खरंतर श्री नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराज यांचे चरित्र अतिशय विलक्षण आणि संक्षिप्त रुपात मांडण्यास अशक्यप्राय असे आहे.त्यांच्या जिवन चरित्रातील प्रत्येक घटना अतिशय विलक्षण अशी आहे त्यावर करावे तेवढे चिंतन थोडेच आहे.त्यांनी केलेली गुरु भक्ती व गुरुप्रती पाळलेली मर्यादा ही एकमेवाद्वितीय आहे.या एका संक्षिप्त लेखात ,शब्द मर्यादेमुळे तो भाग लिहीता जरी आला नाही तरी मी श्री दत्त प्रभुंच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी त्यावर ही लेख लिहून घ्यावा. अशा या विलक्षण शिष्य व थोर महापुरुषांचे स्मरण आपल्याला दत्त जयंती सप्ताहाच्या प्रथम दिवशी घडले ही पण त्यांचीच अकारण कृपा करुणा आहे.ही शब्द सुमनांजली मी श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करतो व आपल्या सर्वांवर अखंड कृपा करुणा करण्याची प्रार्थना श्रीचरणी करतो.

✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️🙏

श्रीदत्त: शरणं मम्🙏🌸🌺🌿

महाराज ज्ञानेश्वर माउली समर्थ 🌿 🙏🌸🌺


कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...