Tuesday, December 20, 2022

ब्रम्हावतार सद्गुरु श्री सोपानदेवांचा ७२७ वा समाधी दिनी🌺🌸🙏🌹

 


#सोपानकाकांचा_७२७वा_समाधी_दिन 🌸🙏
देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा ।
जावे सासवडा उत्सवासी ।।
   
     आज मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी आमच्या सर्वांचे लाडके , संपूर्ण वारकरी संप्रदायाचे काका ,आपल्या ज्ञानदेवांचे धाकटे बंधूराज ,प्रत्यक्ष ब्रह्मावतार असलेल्या सद्गुरु श्रीसोपानदेवांचा समाधी दिन. खरंतर वारकरी संप्रदायासाठी हे वर्ष विशेष महत्वाचे ठरले आहे..करुणाब्रह्म कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती महाविष्णु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींसोबतच इतर बंधू त्रयांचेही हे सप्तशतकोत्तर रौप्य समाधी वर्ष आहे. श्रीसोपानकाकांच्या अधिकाराचे वर्णन करतांना प्रत्यक्ष त्यांचे सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज लिहीतात

"धन्य हा खेचर धन्य हा सोपान । भक्तीचें जीवन जनक हेतु ।। धन्य याचे कुळ पवित्र कुशळ । नित्य हा गोपाळ जवळी असे ।। याचेनी स्मरणें नाशती दारुणें । कैवल्य पावणे ब्रह्यामाजी ।। निवृत्ति म्हणे परब्रह्म हे साकार । तेथील अंकुर उमटले ।।"
                      प्रत्यक्ष आपल्या सद्गुरुरायांनी परब्रह्म म्हणुन ज्यांचा उल्लेख केला आहे अशा सोपानदेवांचा अधिकार आपण काय वर्णावा? निवृत्तीनाथांचा अधिकार,त्यांचे महात्म्यांचे वर्णन माउलींनी ज्ञानदेवीत,आपल्या अभंगातून जागोजागी केलेले आपण सर्वांनी वाचलेले आहेचं पण प्रत्यक्ष निवृत्तीनाथांनी आपल्या धाकट्या भावाच्या अधिकाराचे,शिष्याच्या अधिकाराचे हे वर्णन एकमेवाद्वितीयचं म्हणावे लागेल. शांतिब्रह्म नाथबाबा आपल्या गोड शब्दात म्हणतात
"ब्रह्मा अवतार नाम हे सोपान । केलेसे पावन चराचर ।।"

खरंतर सोपानकाकांचे व इतर भावंडांचे वेगळे असे चरित्र मांडणे शक्य नाही कारण या चारही अवतारांच्या लिला  एकमेकांशी संलग्नच आहेत.त्यामुळे इथे ते मांडण्याची विशेष गरज नाही कारण आपल्याला तो सर्व लिला भाग माहितीच आहे..श्रीविठ्ठलपंत-रुक्मीनी मातोश्रींचे जिवन ,विवाह,संन्यास , गृहस्थाश्रम,त्रंबक यात्रा, निवृत्तीनाथांना भगवान गहिनीनाथांचा अनुग्रह,माता-पित्याचा देहत्याग,शुद्धीपत्र,माउली आदी दोन्ही भावंडांना अनुग्रह, निवृत्तीनाथांच्या आदेशाने माउलींनी पैठणादी ठिकाणी केलेले चमत्कार , नेवासा क्षेत्री ज्ञानदेवीचे अर्थात भावार्थदीपिकेचे प्रगटीकरण या सर्व चरित्रलिला प्रसंगी सोपानदेव ही त्याचा भाग होतेच त्यामुळे वेगळं असं कुणाचही चरित्र नाही.ते एकंदरीत चौघांचे ही चरित्र आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.पण यातही सोपानदेवांवर निवृत्तीनाथांनी अनुग्रह केल्यावर त्यांचे योगमय झालेले जिवन व आत्मज्ञानी ,महायोगी झालेल्या सोपानदेवांचा अधिकार एका विशेष प्रसंगी आपल्याला ठळक दिसुन येतो तो असा की " ज्यावेळी विसोबा चाटी हा चारी भावंडांना अतोनात त्रास देतो आणि मांडे भाजावयास खापर देत नाही त्यावेळी माउली आपल्या योगसामर्थ्याने पाठीवर मांडे भाजतात.त्यानंतर विसोबा हे माउलींना शरणं येतात.हे सर्वश्रुत,सर्वांच्या परिचयाचे आहेचं.पण त्यावेळी माउली किंवा निवृत्तीनाथ त्यांना उपदेश करित नाहीत तर हे काम निवृत्तीनाथ सोपानकाकांवर सोपवतात...
सोपानदेवांनी विसोबांवर अनुग्रह केला तो प्रसंग अतिशय सुंदर शब्दात आहे
"खेचरा हृदयी प्रकाश पडला । गुरुरुपे सोपान सखयाला । साष्टांग नमूनी चरणाला । स्फुंद स्फुंदोनी रडतसे ।। सोपान सखया कृपा करी । अपराधी मी दुराचारी । हस्त ठेविला मस्तकावरी । उपदेशी मम दुर्जना ।। खेचरा होता वैराग्य प्रखर । सोपानदेव शीरी ठेविती कर । महावाक्य मंत्र वारंवार । विसोबा कर्णी ओपीला ।।"
                पुढे खेचराचा सद्गुरु विसोबा खेचर झाले , त्यांनीच पुढे भक्तराज नामदेव रायांना अनुग्रह केला हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. सोपान काकांनी विसोबांवर ज्यावेळी अनुग्रह केले त्यावेळी त्यांचे वय अवघे १७/१८ वर्षाचे असावे. करुणाब्रह्म ज्ञानोबारायांनी देह ठेवल्यावर काही कालाच्या अंतरावरच तिघेही भावंडे समाधीस्थ झालीत.सबंध इतिहासात ही एकमेव , अद्वितीय आणि आश्चर्यजनक गोष्ट आहे.यात माउली नंतर सर्वात प्रथम समाधीस्थ झाले ते सोपानदेव. सोपानकाकांनी माउली समाधिस्थ झाल्यावर अवघ्या एक महिन्यानी जिवंत समाधी घेतली त्यावेळी सोपानकाकांचे वय अवघे २२ वर्ष होते.श्रीसोपानदेवांनी समाधीत चिरकाल वास्तव्यासाठी निवडलेली जागाही अतिशय दिव्य आहे..कर्हा नदीतीरी असलेले सासवड हे गाव व ज्याठिकाणी समाधी घेतली ते ठिकाण म्हणजे चतुर्मुख भगवान श्री ब्रह्मदेवांचे तपस्थान.जणु ब्रह्मदेवांनी  आपल्या आवडत्या स्थानी चिरकाल वास्तव्यास तिचं जागा पुन्हा निवडली. सोपान काकांचे समाधी वर्णन करतांना नामदेवराय लिहीतात

"देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा । जावे सासुवडा उत्सवासी ।।१।। सोपानासी आम्हीं दिधले वचन । चला अवघेजण समुदाय ।।२।। अलंकापुरीची यात्रा केली सांग । मग पांडुरंग सिद्ध झाले ।।३।। दुरोनी पताका दिसती मनोहर । उठावले भार वैष्णवांचे ।।४।। निवृत्ती मुक्ताई घेतला सोपान । जातो नारायण कर्हेतीरीं ।।५।।नामा म्हणे देव गंधर्व सुरगण ।चालिले सोपान समाधीसी ।।६।।
                सोपानकाकांच्या समाधी प्रसंगी प्रत्यक्ष पंढरीनाथ राही, रखुमाई सह तिथे हजर होते.तसेच नामदेवराय,विसोबा, चांगवटेश्वर,सावता महाराज,परिसा भागवत असे सर्व संतजन हजर होते. त्या प्रसंगाचे वर्णन अतिशय सुंदर अभंगातून नामदेवरायांनी केले आहे.त्यातील काही महत्वाच्या घडामोडी अशा की ,एकादशी चे पारणे करण्यासाठी प्रत्यक्ष राही-रखुमाई स्वैपाकाला सिद्ध झाल्या.भगवान पंढरीनाथांनी वैष्णवांना जेवावयास पात्र मांडले. विसोबा खेचर,पुंडलिक ,नामदेवरायांना सोबत घेऊन भगवान पंढरीनाथ पात्र वाढू लागले. पुढे देवांनी नामदेवरायांनकरवी सोपानदेवांना जेवावयास बोलाविले.भक्त पुंडलिकाने त्यांचे पुजन केले व रुक्माईंनी जेवणाचे ताट वाढले .एकादशीचे पारणे फेडल्यावर सर्वांनी द्वादशीला रात्री  किर्तन नामगजरात करुन रात्र व्यतित केली.त्रयोदशीला पहाटे सर्वांनी भोगावती चे स्नान केले आणि सोपानदेव समाधी घेण्यासाठी सज्ज झाले.विसोबांनी गंध ,अक्षता घेऊन सोपानदेवांचे पुजन केले.नारा,विठा,माहादा ,गोंदा यांनी समाधी विवरातील जागा झाडून साफ केली. पुढे सोपानकाका समाधी स्थळी आले .निवृत्तीनाथांनी व पांडुरंगांनी सोपानकाकांचे दोनही कर धरले व त्यांना समाधी स्थळी आसनस्थ केले.हे सर्व दृष्य बघुन मुक्ताई,साधु,संत मंडळी कासावीस झाले ,सर्वांच्या हृदयात घालमेल सुरु झाली.सोपानकाकांच्या विरहाच्या कल्पनेनी सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सर्वांनी सोपानदेवांच्या चरणी प्रणाम केला व सोपानदेवांच्या समाधीचे विवर बंद करण्यात आले..ती तिथी होती मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी या पावन तिथीला ब्रह्मावतार सोपानकाका समाधी स्थळी आसनस्थ झाले व सर्वांच्या कल्याणासाठी चिरकाल त्यांच्या आवडत्या स्थळी अखंड वास्तव्य करते झाले.
सोपानकाकांची साहित्य संपदा-
       सोपानदेवांची सर्वांत महत्वाची रचना म्हणजे "सोपानदेवी" ही श्रीमद् भगवद्गीतेवरील समश्लोकी आहे. गीतेंच्या सातशे श्लोकांवर सोपानदेवांनी ७३९ ओव्या रचल्या आहेत.सोपानदेवीची भाषा अगदी सहज सोपी व प्रवाही आहे. प्रत्येकाला गीतेच्या संस्कृत श्लोकाचा अर्थ सहज समजेल अशा ओव्या सोपानकाकांनी लिहील्या आहेत आणि हे सोपानदेवी वाचतांना लगेच लक्षात येईल. तसेच सोपानकाकांनी रचलेला हरिपाठ सुद्धा संप्रदायात अतिशय महत्वाचा मानला जातो. सोपानकाकां चे हरिपाठाचे अभंग धरुन एकुण रचना म्हणजे ११७ अभंग,१ पद,१ नमन आणि २ आरत्या असे थोडेचं पण अतिशय महत्वाचे लेखन आज उपलब्ध आहे. आज सोपानकाकांचा ७२५ वा सप्तशतकोत्तर रौप्य समाधी उत्सव. आपल्या सर्वांवर सोपानकाकांनी चिरंतन अखंड कृपा करावी हीच एक मागणी त्यांच्या सुकोमल चरणी करतो. श्रीसोपानकाकांनी माउलींची अखंड सेवा करुन घ्यावी हे मागणे मागुन इथेच लेखनिला विराम देतो.
       ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✒️✍️


कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...