Thursday, June 15, 2023

सद्गुरु निवृत्तीनाथांचा समाधी दान🙏🌸🌿


 सद्गुरु_श्रीनिवृत्तीनाथ_दादांचा_७२८_वा_समाधी_दिन 🙏🏻


द्वादशी समाधी दिधली निवृत्तिसी ।

झाले उदासी अवघे जण ॥ 


आज जेष्ठ वद्य १२ सकल वारकरी संप्रदायाचे लाडके निवृत्ती दादा , आपल्या परमप्रिय ज्ञानेश्वर माऊलींचे सद्गुरु ,ज्ञानेबांचे जेष्ठ बंधू ,प्रत्यक्ष भगवान आदिनाथ महादेवांचा अवतार सद्गुरु श्रीनिवृत्ती नाथांचा समाधी दिन.श्रीनिवृत्ती नाथांवर माऊलींनीच लिहावं ,माऊलींनीच त्यांचे वर्णन करावं.खरंतर माऊलींनी आपल्या सद्गुरुरायाचे केलेले वर्णन संपूर्ण जगातील साहित्य क्षेत्रात व ग्रंथात ऐकमेवाद्वितीय असेच आहे.माऊलींनी भावार्थदिपीकेत/ ज्ञानदेवीत केलेले आपल्या सद्गुरुंच्या गुणांचे ,त्यांच्या प्रती श्रद्धेचे वर्णन नुसते वाचले तरी अवाक व्हायला होतं.कारण हे शब्द एका महायोगी, महासिद्ध , प्रत्यक्ष महाविष्णु अवतार असलेल्या ज्ञानदेवांचे आहे.मी तर म्हणेन की माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील सद्गुरु वर्णानाच्या ओव्या जर काढल्या तर ज्ञानेश्वरी निरस होईल. प्रत्येक ओवीत सद्गुरु निवृत्तीनाथांच्या करुणेचाच आविष्कार आहे.आपल्या सद्गुरूंचे महात्म्य वर्णन करतांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात , “शांतीची पै शांति निवृत्तिदातारु । हरिनाम उच्चारु दिधला तेणें ॥” 

                                     माऊली हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत व त्यासाठी “ज्ञानेशो भगवान विष्णूः” असे म्हटले जाते.त्याच प्रमाणे श्रीगुरु निवृत्तीनाथ हे भगवान आदिनाथ शंकर आहेत व त्यांच्यासाठी “निवृतीर्भगवान हर:” असे म्हटले जाते. विशेष म्हणजे निवृत्तीनाथांचा जन्म हा सोमवारी ,प्रदोषकाळीच झाला होता. जणु भगवान शिवांनी आपला इष्ट दिवसच अवतार धारण करण्यास निवडला होता.शांतिब्रह्म एकनाथ बाबा आपल्या मधूर शब्दात म्हणतात, 


“धन्य धन्य निवृत्ती देवा । काय महिमा वर्णावा ।।१।। 

शिवे अवतार धरून । केले त्रैलोक्य पावन ।। २ ।। 

समाधी त्र्यंबकशिखरी । मागे शोभे ब्रम्हगिरी ।। ३ ।। निवृत्तीनाथांच्या चरणी । शरण एका जनार्दनी ।। ४ ।।” 


खरंतर निवृत्तीनाथ व या सर्व भावंडांचे चरित्र वेगळे मांडणे शक्यच नाही कारण या चारही भावंडांचे चरित्र एकमेकांशी संलग्नच आहेत.माऊलींच्या चरित्रात या सर्व चरित्रांचा भाग येतोच आणि तो आपल्याला माहिती आहेच त्यामुळे त्या प्रसंगाची पुनरावृत्ती करत नाही. पण ज्या वेळी श्री विठ्ठलपंत आपल्या परिवारासह ब्रह्मगिरीच्या यात्रेसाठी जातात त्यावेळी घडलेली हकीकत आज विस्तृत बघूयात कारण त्या प्रसंगानंतरच बाळ निवृत्ती हे योगसिद्ध ,नाथपंथी सद्गुरु श्री निवृत्तीनाथ झाले होते. निवृत्तीनाथांच्या वडिलांना म्हणजे विठ्ठलपंतांना आपण सहपरिवार त्रंबकेश्वरी जाऊन काही अनुष्ठान करावे असे वाटले व ते आपल्या सर्व परिवारास घेऊन त्रंबकेश्वरी आले. तेथे ते जवळपास सहा महिने राहिले होते.एकदा त्रंबकेश्वरी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करीत असता एक मोठा  वाघ या सर्व कुटुंबापुढे आला . वाघ बघताच जो तो वाट काढत पळु लागला. त्याच वेळी जिव वाचविण्यासाठी निृत्तीनाथ ही पळाले पण त्यातच ते एका गुहेजवळ येऊन पोचले. ती गुहा होती भगवान गहिनीनाथांची. निवृत्तीनाथांना अनुग्रह देण्यासाठी व या चारही भावंडांचे अवतार कार्य सुरु करण्यासाठी नाथांनी केलेली वाघाची ही एक लिलाच होती. गुहेत गेल्यावर गहिनीनाथांनी निवृत्तींना आपल्या नाथ परंपरेचे वैभव असलेले शांभवी ब्रह्मविद्या शिकविली. “जीवब्रह्मैक्यज्ञान” सांगितले.नाथ परंपरेचे सर्व योग व विद्या जवळपास तिन महिने अखंड निवृत्तीनाथांना शिकविली. आपल्या कृपा अनुग्रहाचे शक्ती बिज त्यांना देऊन त्यांना सनाथ केले व समाधीच्या आत्मानंदात स्थिर केले. इकडे विठ्ठलपंत व माता रुक्मिनी ला आपल्या बाळ निवृत्तीचा वाघाद्वारे घात झाला असा समज होऊन ते विलाप करु लागले. पण याच काळात निवृत्तीनाथांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली व ते जिवनमुक्त अवस्थेला पोचले. पुढे भगवान गहिनीनाथांनी शिष्य निवृत्तीला त्याच्या जिवन कार्याची दिशा सांगितली ,त्यांना कृष्ण भक्तीचा प्रचार करण्याची आज्ञा केली ,कृष्ण नामाचा उपदेश केला व परत पाठविले.तिन महिन्यांनी निवृत्तीनाथ आपल्या मुक्कामी त्रंबकेश्वरी परतले.त्यांना बघून सर्वांना अत्यानंद झाला.निवृत्तीनाथांनी आपल्या आई वडिलांना ,भावंडांना घडलेली सर्व हकिकत सांगितली.त्यानंतर हे सर्व मंडळी आळंदीस परतले. पुढे आळंदी ब्रह्मसभेचा निर्णय ,माऊलींच्या आई-वडिलांचा देहत्याग हा सर्व घटनाक्रम आपल्याला माहित आहेच.


एक विशेष असे की माऊलींनी निवृत्तीनाथांची आज्ञा घेऊन रेड्यामुखी वेद वदविले आणि त्यानंतर त्यांना पैठनची विद्वतसभा, ब्रह्मसभा शरण आली. त्यांनी या चारही भावंडांना शुद्धीपत्र दिले व त्यांचा मौंजीबंधनाचा मार्ग मोकळा झाला.पण निवृत्तीनाथांनी मुंज करण्याचे नाकारले.आम्हाला मुंज करण्याची गरज नाही.या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा अभंग नामदेवरायांच्या गाथ्यात येतो तो असा,


नाही जातीकुळ वर्ण अधिकार । क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नव्हे ॥१॥

नव्हे देवगण यक्ष ना किन्नर । ऋषि निशाचर तेही नव्हे ॥२॥

ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट । निजबोधें इष्ट स्वरुप माझे ॥३॥ 

नव्हे आप तेज वायु व्योम नही । महत्तत्वी तेही विराट नव्हे ॥४॥ 

नव्हे मी सगुण नव्हे मी निर्गुण । अनुभूतीं भजन होऊनी नव्हे ॥५॥ 

निवृत्ती म्हणतसे ऐक ज्ञानेश्वरा । माझी परंपरा ऐसी आहे ॥६॥

                                   या अभंगावरून निवृत्तीनाथांच्या अंतकरणाच्या स्थितीची आपल्याला पुसटशी कल्पना येऊ शकते.पुढे ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांच्या आज्ञेने आपले गीतेवरील दिव्य भाष्य पूर्ण केले. त्यानंतर सर्वात आधी ज्ञानेश्वर माऊलींनी ,त्यानंतर सोपानकाकांनी ,नंतर ब्रह्मचित्कला मुक्ताईंनी समाधी घेतली. या तिनही भावंडांच्या समाधी वेळी त्यांचे वडिलभाऊ व सद्गुरु श्री निवृत्तीनाथ स्वतः हजर होते.त्यावेळी निवृत्तीनाथांची झालेली अवस्था वाचली तरी ह्रदय पिटाळून निघते. इतका ह्रदयद्रावक तो प्रसंग आहे.

पुढे निवृत्तीनाथ सप्तश्रृंग गडांवर आले.तिथे त्यांनी नाथपंथाची कुलस्वामिनी भगवती सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले.तिथे ते तिन दिवस मुक्कामी होते.पुढे ते विसोबा खेचर,परिसा भागवत यांच्यासह  पंचवटीस आले व दशमीच्या दिवशी त्रंबकेश्वरी पोचले.तेथे पोचल्यावर जेष्ठ वद्य एकादशीला निवृत्तीनाथांचा उत्सव सोहळा स्वतः भगवंतांनी केला.द्वादशीला सर्व वैष्णवांनी पारणे सोडले.पांडूरंगांनी सर्व संतांची पूजा केली.स्वतः देवांनी निवृत्तीनाथांच्या समाधीची तयारी केली.मग निवृत्तीनाथ त्रंबकेश्वराची पूजा करुन तेथून पश्चिम दिशेला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी गेले.तेथे एक पुष्करणी आहे.त्याच्या पश्चिमेस पूर्वीचे प्राचीन,अनादी स्थळ असून तेथे गुप्त असे भूयार होते,म्हणजेच समाधी घर होते.सर्व संतांनी त्याची शिळा काढून द्वार उघडले .हे निवृत्तीनाथांचे अनादी स्थान होते.आत अनादी कालापासून दिवा व धुनी चालूच होती.नामदेवरायांच्या मुलांनी ती समाधीची जागा साफ केली.देवांनी सर्वांना पत्रावळी टाकून वाढले.आपल्या हाताने निवृत्तीनाथांना भरवले.नंतर क्षिरापतीचे किर्तन झाले.त्यानंतर निवृत्तीनाथ सर्वांना कडाडून भेटले व आपल्या समाधीकडे जाण्यास निघाले.सर्वांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत होत्या.पांडुरंग व पुंडलिक निवृत्तीनाथांना भुयारात नेण्यास सज्ज झाले. निवृत्तीनाथांनी पांडुरंगाचे पदतिर्थ घेतले.पांडुरंगाने निवृत्तीनाथांचा उजवा हात धरला व पुंडलिकाने डावा हात धरला व निवृत्तीनाथ समाधी विवरात उतरले.निवृत्तीनाथ आसनावर स्थिर झाले.त्यांनी एकवार पांडुरंगाला पाहिले व आपले नेत्र मिटले.थोड्याच क्षणात निवृत्तीनाथांनी आपली आत्मज्योत ब्रम्हरंध्रात स्थिर केली व चिर समाधी धारण केला.सर्व जन दुःखाने रडू लागले.विठोबाचे ह्रदय भरुन आले .पुढे देवांनी स्वतः समाधीचे द्वार शिळा लावून बंद केले.देव सर्वांसह दशमी ते अमावस्या असे पाच दिवस त्रंबकेश्वरी राहिले व अमावस्येला काला करुन प्रतिपदेला पंढरपुरी परत आले.

अशा प्रकारे आपल्या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरवून सद्गुरु निवृत्तीनाथ आपल्या निजस्थानात स्थिर झाले.ही शब्द सुमनांजली श्रीसद्गुरु माऊली निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण करतो.ज्ञानोबा आपल्या सर्वांची आई/माऊली त्यानुसार त्यांचे सद्गुरु आपले गुरु आजोबा झाले आणि आजोबाला आपल्या नातवावर काकणभर अधिकच प्रेम असतं.मी निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आमचे सर्व अपराध पोटी घालून आम्हालाही त्यांच्या कृपा ,करुणेला पात्र करावं आणि सदैव ज्ञानोबांच्या सेवेत राहणाचे भाग्य प्रदान करावे.

       ✍🏻🖋️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी🖋️✍🏻

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...