Friday, February 11, 2022

माघ शुद्ध दशमी जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रह प्राप्ती दिन

 #केला_अंगीकार_तुका_म्हणे 🙏🌸🌺

                       माघ शुद्ध दशमी तुकोबारायांच्या चरित्रातील अतिशय महत्वाचा आणि त्यांच्या अध्यात्मिक जिवनाला कलाटणी देणारा अत्यंतिक परम पावन दिन.याच तिथीला तुकोबारायांना सद्गुरुंनी अनुग्रह देऊन परमार्थात सनाथ केले, तुकोबाराय म्हणतात माझा अंगीकार सद्गुरुंनी केला.म्हणूनच या अनुग्रह प्राप्ती दिनाला संपूर्ण वारकरी संप्रदायात अतिशय महत्व आहे.आजच्याच तिथीला सद्गुरु श्रीबाबाजी महाराजांनी श्रीतुकोबांना गुरुकृपा पूर्वक सबिज नाम दिले.

सद्गुरुंनी "राम कृष्ण हरी" या महामंत्रात आपल्या गुरुकृपेचे बळ टाकून तेच तुकोबांना मस्तकावर हात ठेवून कृपा पूर्वक दिले.

श्रीतुकोबांची गुरुपरंपरा, श्री राघवचैतन्य - श्री केशवचैतन्य - श्री बाबाजी चैतन्य - श्री तुकारामचैतन्य अशी आहे. श्रीबाबाजींनी त्यांना 'रामकृष्णहरि' हा महामंत्र दिला होता. याच प्रसंगाचे वर्णन तुकोबारायांनी आपल्या अभंगातून शब्दबद्ध केले.


सत्य गुरुराये कृपा मज केली l

परि नाही घडली सेवा काही ll१ll


सांपडविले वाटे जाता गंगास्नाना l

मस्तकी तो जाणा ठेविला कर ll२ll


भोजना मागती तूप पावशेर l

पडिला विसर स्वप्नामाजी ll३ll


काय कळेल उपजला अंतराय l

म्हणोनि काय त्वरा झाली ll४ll


राघव चैतन्य केशव चैतन्य l

सांगितली खूण माळिकेची ll५ll


बाबाजी आपुले सांगितले नाम l

मंत्र दिला रामकृष्ण हरि ll६ll


माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार l

केला अंगीकार तुका म्हणे ll७ll


                         खरंतर अगदी क्वचितच ठिकाणी तुकोबारायांनी आपल्या सद्गुरुंच्या बद्दल वा श्रीगुरुंनी कृपा केली त्या स्वानुभवाचे वर्णन केलेले आहे.त्यातील हा अगदी महत्वाचा अभंग आहे. तसेच अजुन दोन अभंगांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो तो म्हणजे,

"माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुराजा ॥" आणि " लावूनियां हातें कुरवाळिला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥"  हे दोन्ही अभंग मुख्य आहेत. तुकोबारायांनी आपल्यावर झालेल्या गुरुकृपेचे वर्णन या अभंगातून तंतोतंत मांडले आहे. वरील अभंगांत तुकोबा सांगतात की , सद्गुरुरायांनी स्वप्नात येऊन कसलीही सेवा न घेता माझ्यावर अनपेक्षितपणे कृपा अनुग्रह केला. स्वप्नातच मस्तकावर हात ठेऊन माझ्यावर कृपा करुणा पूर्वक अनुग्रह केला. तुकोबाराय म्हणतात माझ्या मनाचा भाव ,माझी गुरुप्राप्तीसाठीची तळमळ जाणून सद्गुरुरायांनी अंतिम कृपा करुणेचा उपाय केला.मला आपल्या मुखातून कृपा सिद्ध असे नामबिज दिले. याच अभंगात श्रीतुकोबारायांनी आपली गुरुपरंपरा ही सांगितली आहे राघवचैतन्या पासुन सुरु झालेली ही परंपरा पुढे केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य आणि हीच परंपरा पुढे तुकोबाचैतन्याला येऊन मिळाली.उपरोक्त अभंगात तुकोबांनी तिथी वार यांचाही उल्लेख केला आहे. 

                    या सर्व अभंगातून एक फार महत्वाची बाब सर्वांसाठी चिंतनीय आहे ती म्हणजे "आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी" म्हणणारे तुकोबा हे अवतारीच होते यात तिळमात्र शंका नाही ,तुकोबा जन्मसिद्ध महात्मे होतेच त्यामुळे खरंतर त्यांना वेगळ्या कृपेची आवश्यकता नाही असा विचार पुष्कळ लोकांच्या मनात येतोच  तरीही तुकोबांवर गुरुकृपा झाली आणि त्याची कृतार्थता तुकोबा आपल्या अभंगातून मुक्तकंठाने करतात हे विशेष. अगदी भगवान रामराय असोत,कृष्णचंद्रप्रभु असोत , दत्तप्रभु असोत प्रत्येकाने गुरुपरंपरेचाच अवलंबन केला आणि याच परंपरेतील एक भाग हे तुकोबाराय आहेत . तुकोबारायांच्या चरित्राचा विचार केला तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल की तुकोबांच्या ठिकाणी प्रखर वैराग्य उत्पन्न झाल्यावर त्यांनी भामचंद्र ,भंडारा आणि घोराडेश्वर डोंगरावर अतिशय कठोर अशी तपश्चर्या केली आहे.अगदी तहान ,भुक हरपून त्यांनी अखंड भगवन नामाचे चिंतन केले आहे आणि त्यानंतर सद्गुरुंनी त्यांना स्वतः येऊन अनुग्रह देऊन त्यांचा अंगीकार केला. तुकोबाराय म्हणतात की , मला सद्गुरुंनी माझ्या आवडीचाच "राम कृष्ण हरी" हा मंत्र दिला व सांगितले आता चिंता करू नकोस, हेच सद्गुरुंनी केलेल्या अंगीकाराचे गमक. गुरुकृपेनंतर झालेल्या आत्मानुभुतीचे वर्णन तुकोबारायांनी आपल्या गाथेत ठिकठिकाणी केले आहेच .अतिशय चिंतनीय असे हे स्वानुभवाचे अभंग आहेत. या सर्वातुन एक महत्वाची गोष्ट ध्यानी येते ती म्हणजे अगदी भगवान आदि शंकराचार्यांपासुन ते माउली ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत, सद्गुरु नामदेवरायां पासून ते जगद्गुरु श्रीतुकोबारायांपर्यंत प्रत्येक महापुरुषांला सद्गुरुंच्या कृपेची आवश्यकता होतीच आणि त्या गुरुकृपेचे वर्णन त्यांनी अनेक ठिकाणी मुक्त कंठाने केले आहे. असो या परम पावन दिनी श्रीतुकोबारायांचे स्मरण करून आपल्या सर्वांवर गुरुकृपेचा असाच वर्षाव होवो‌ हीच प्रार्थना श्रीचरणी करुयात.

     ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

#राम_कृष्ण_हरी🙏🌸🌺

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

1 comment:

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...