Wednesday, February 16, 2022

श्रीगुरुप्रतिपदा श्रीगुरुंचा निजानंदगमन दिन🙏🚩


 श्रीगुरुप्रतिपदा:- 🌸☘️🙏🏻
                   आपल्या श्रीदत्त संप्रदायात व संपूर्ण गुरु परंपरेत वर्षातील तिन तिथींना अनन्यसाधारण महत्व आहे.त्या तिथी म्हणजे गुरुपौर्णिमा, गुरुद्वादशी आणि गुरुप्रतिपदा. दत्त संप्रदायात या तिन्ही तिथींना सारखेच महत्त्व आहे तरी गुरुद्वादशी आणि गुरुप्रतिपदा या तिथींचा संबंध दत्तसंप्रदायाशी फार जवळचा आहे. सर्व दत्तक्षेत्री ही तिथी अतिशय मोठ्या प्रमाणात उत्सव रुपात साजरी केली जाते.त्याला प्रामुख्याने कारण ही तसेच आहे. 
                        आमचे परमाराध्य इष्ट दैवत द्वितीय दत्त अवतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी आपले नृसिंहवाडी येथील १२ वर्षाचे वास्तव्य पूर्ण करुन तिथे 'गुरुद्वादशी' या तिथीला "मनोहर" दत्त पादुकांची स्थापना केली व श्रीक्षेत्र गाणगापूर येथे प्रयाण केले.त्यानंतर श्रीगुरु महाराजांचे २४ वर्ष गाणगापूर येथे वास्तव्य होते.याकाळात श्रीगुरु महाराज हे भिमा-अमरजा संगमी वास्तव्यास होते .श्रीगुरु महाराज तेथील अश्वत्था च्या खाली बसून अनुष्ठान करीत व दूपारी गावात भिक्षे करीता येत.या अखंड २४ वर्षांच्या कालावधीत श्रीगुरु महाराजांनी गाणगापूर येथे अनंत कोटी जिवांचा उद्धार केला,अनंत जिवांचे त्रिविध ताप हरले‌ ,अनंत लिला केल्या.याचे विस्तृत वर्णन 'श्रीगुरुचरित्र' या अलौकिक ग्रंथात आले आहे.अनेक जिवांचा उद्धार करुन "श्रीगुरुप्रतिपदा" या तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण मठात *निर्गुण पादुकांची* स्थापना केली व याच "गुरुप्रतिपदा" तिथीला आपले सगुण रुपातील अवतार कार्य पूर्ण करुन श्रीगुरु महाराजांनी आपल्या निजस्थानी निजानंदगमन केले.
गुरुचरित्रात याबद्दल श्रीगुरु सांगतात , 
"शिष्यांतें निरोपिती अवधारा । पुष्पांचें आसन त्वरित करा । जाणें असे पैलतीरा । ऐक्य होऊं मल्लिकार्जुनीं ॥"  श्रीगुरु महाराजांनी सुंदर व अलौकिक अशा पुष्पासनावर बसुन श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथुन दत्त लोकी गमन केले .
               या परमपवित्र दिना बद्दल श्रीगुरुचरित्रातील ५१ व्या अध्यात ही फार सुचक व सुंदर ओव्या आलेल्या आहेत.
कन्यागतीं बृहस्पति । बहुधान्य संवत्सरी ख्याति ।
सूर्य चाले उत्तर दिगंतीं । संक्रांति कुंभ परियेसा ॥३६॥
शिशिर ऋतु माघमासीं । असितपक्ष प्रतिपदेसी ।
शुक्रवारीं पुण्यदिवसीं । श्रीगुरु बैसले निजानंदीं ॥३७॥
श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज मठासी ।
पावतां खूण तुम्हांसी । प्रसादपुष्पें पाठवितों ॥३८॥
येतील पुष्पें जाती शेवंती । घ्यावा प्रसाद तुम्हीं भक्तीं ।
पूजा करावी अखंड रीतीं । लक्ष्मी वसों तुम्हां घरीं ॥३९॥
                               वरील ओव्यांमधून श्रीगुरुंच्या शैलगमनाबद्दल आपल्याला स्पष्ट माहिती मिळते. दृष्य रुपातुन श्रीगुरु महाराज निर्गुण ,गुप्त रुपात चिरकाल  निर्गुण पादुकांच्या रुपाने गाणगापूरी अखंड वास्तव्य करते झाले.पुढे श्रीगुरु महाराजच आश्वासन दितात की , 
" जे भक्त असती माझ्या प्रेमी । त्यांसी प्रत्यक्ष दिसो आम्ही ।।" जो भक्त अनन्य प्रेमाने , श्रद्धेने आणि कळकळीने श्रीगुरु महाराजांना शरणं जातो त्याला आजही श्रीगुरु महाराज गाणापूरात भेटतात.आजही आपल्या अस्तित्वाची जाणिव खर्या भक्तांना देतातच.त्यामुळे आजच्या तिथीला आपल्या दत्तसंप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे.श्रीक्षेत्र गाणगापूर, औदुंबर, नृसिंहवाडी ,कारंजा येथे हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.श्रीक्षेत्र कारंजा येथे आज सबंद रात्रभर गावातून मिरवणूक काढली जातो.गाणगापूर येथे ही तिथी विशेष रुपाने साजरी करण्याची पद्धत आहे.आजच्या तिथीला निर्गुण मठात संतांचे, सत्पुरुषांचे दत्तरुपात यतीपुजन करण्याची पद्धत आहे.विविध संतांच्या पुजनाचा भव्य सोहळा या तिथीला गाणगापूर येथे केला जातो. 
दत्तावतारी परमसद्गुरु श्री नाना माउलींचे गाणगापूर येथे  झालेले यतीपुजन


                      आम्हाला ही तिथी विशेष प्रिय आहे कारण आमचे परमगुरु अधमोद्धारक दिनदयाळ समर्थ सद्गुरु माउली श्रीनाना महाराज तराणेकर यांचे यतिपुजन आजच्याच दिवशी गाणगापूरात झाले होते आणि विशेष म्हणजे २०१८ रोजी आजच्याच दिवशी आमच्या सद्गुरु माउली धर्मभूषण श्रीदत्तसंप्रदायवर्धक परम पूजनीय समर्थ सद्गुरु माउली श्री विजय काका पोफळी महाराज यांचे "यती पुजन" निर्गुण मठात झाले होते. हाच आनंद आज द्विगुणित झाला कारण यावर्षी म्हणजे २०२२ च्या गुरुप्रतिपदेलाही प.पू.सद्गुरु माउली काकांचे पुन्हा एकदा यतीपुजन झाले आहे.प्रत्यक्ष दत्त प्रभु असलेल्या काकांचे हे यतीपुजन आम्हा सर्व भक्तांसाठी अतिव आनंद आणि अभिमानाची बाब आहे.प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभूंनी पूज्य काकांच्या दत्तसंप्रदायाच्या वर्धन कार्याला दिलेली ही पोच पावतीच आहे.प्रत्यक्षात जरी आम्ही सर्व काकांच्या या पुजनाचा सोहळा बघू शकत नसलो तरी आमचे मन तिथेच प.पू.काकांच्या चरणी निर्गुण मठातच आहे आणि ही भावना माझी नाही तर प्रत्येकाची आहेच यात शंका नाही.
धर्मभुषण श्रीदत्तसंप्रदायवर्धक सद्गुरु माउली श्री विजय काकांचे गाणगापूर येथे झालेले यतीपुजन


       ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✒️✍️

2 comments:

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...