Tuesday, March 29, 2022

सद्गुरु श्रीयोगानंद सरस्वती स्वामी महाराज तथा गांडा महाराज यांची ९४ वी पुण्यतिथी 🙏🚩☘️🌸

 

आज फाल्गुन वद्य द्वादशी पंचम दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे पट्टशिष्य प.प.श्रीमद सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराज तथा गांडा महाराज यांची आज पुण्यतिथी. श्रीगांडा बुवा म्हणजे मुर्तिमंत गुरुसेवेचे सगुण रुपचं होते.श्रीगांडाबुवांनी केलेली गुरुसेवा म्हणजे प्रत्येक गुरुभक्तासाठी एक मार्गदर्शनाची संहिता च आहे..अशा थोर गुरुभक्त,योगीराज श्रीगांडा बुवा महाराजांचे चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏☘️🌸🌺🌼

प.पु.योगानंद सरस्वती तथा गांडा महाराज यांचे संक्षिप्त चरित्र👇🙏


॥शुद्ध बीजापोटी॥

अहो साधुपुरुषांलागुन।

कैसा जन्म केसे मरण।

परि व्हावे लोककल्याण।

या कारणे ऐसी लीला॥


            वरील सिद्धांताला अनुसरून तलंगपूर या गुजरात राज्यातील छोट्या गावामध्ये प.प.स.योगानंद स्वामी महाराजांनी, शके १७९० मध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेस दत्तजन्माचे वेळी मानवी रूपाने अवतार धारण केला. त्यांच्या आईचे नांव सौ.काशिबाई होते व वडीलांचे नांव श्री डाह्याभाई होते.


            गुजरातमधील तलंगपूरमध्ये शंकरजी लालाबाई देसाई यांचे कुटुंब राहात होते. त्यांचे गोत्र कौलश असून, इष्टदेवता श्री नीकंठेश्वर होते. श्रीशंकरभाई लालजी यांचे कुटुंब सुशील धर्मपारायण व आहे त्यात समाधान मानणारे होते. ते कर्मठ असून कट्टर शिवभक्त होते. दररोज भगवान नीलकंठेश्वराची पूजा करणे हा त्यांचा नित्यनियम होता.श्रीशिवाराधनेमुळे त्यांची वृत्ती अत्यंत सात्विक व समाधानी बनली होती. घरी शेती होती, शेतीवरील उत्पन्नात स्वत:च्या गरजा भागवून, धर्मकार्यासाठी दानधर्म देण्याइतपत सुबता होती व मनाचे मोठेपण होते. रजल्यागांजल्या विषयी अंत:करणात अपार करुणा होती. त्यांना खंदुभाई, सुंदरबाई व डाह्याभाई ही तीन मुले होती. त्यापैकी डाह्याभाई हे आपल्या चरित्रनायक सद्गुरूंचे पिताश्री होते. डाह्याभाईंचे आचरणही वडीलांच्या पावल्यावर पाय टाकल्याप्रमाणे होते. त्यांच्यामध्ये शंकरजींचे संस्कार पूर्णपणे उतरले होत. कट्टर शिवभक्त होते ते.त्यांनी आपल्या घराण्यात चालू असलेली शिव आराधना तेवढ्याच निष्ठेने पुढे चालू ठेवली होती. त्या काळच्या चालीरीतिप्रमाणे त्यांचा विवाह संस्कार योग्य वयात झाला. सौ.काशिबाई ह्या लग्न करुन घरात सुन आल्या.त्या एक कुशल गृहिणी होत्या. पण अध्यात्म साधनेतही त्यांनी डाह्याभाईंना तितक्याच उत्कटतेने साथ दिली. या उभयंताचा शिवरात्र व्रत करण्याचा नियम होता. धर्मानुसार नित्य आचरण करीत. अनन्यभावे शिवोपासनेत रत होऊन डाह्याभाई व सौ.काशिबाईचा संसार सुखाने चालला होता. कालांतराने त्यांच्य संसारवेलीवर जमुनाबेन व देवीबेन या मुलींच्या रूपाने दोन कळ्याही उमलल्या. त्यानंतर पुत्ररत्न लाभावे अशी उभयतांची इच्छा होती. भगवान, नीळकंठेश्वराला त्यासाठी साकडेही घातले होते. भगवान श्री निळकंठेवराचा आशिर्वाद प्रसाद या उभयतांना प्राप्त झाला व पुत्र रुपाने एक अवतारी तपस्वी यांच्या पोटी जन्मास आले. "श्रीदत्तजयंती होती प्रदोषकाळी विभू जगी आले । श्रीटेंबेस्वामी यांच्या कृपाकटाक्षें स्वयें प्रभू बनले ।।" असे पुढे प्रत्यक्ष सद्गुरुमय झालेल्या गांडाबुवांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा,शके १७९० ,इ.स. १८६८ रोजी श्रीदत्तजयंतीच्या संधिकालात झाला.श्रीदत्तजयंतीच्या दिवशी दत्तजन्माच्या वेळीच पुत्ररत्न प्राप्त झाल्याने देसाई परिवार आनंदाने न्हाऊन गेला.

          बाराव्या दिवशी ज्योतिष्याला बोलावण्यात आले. पंचांगानुसार त्याने बाळाचे जातक पाहिले. ग्रहानुसार फलश्रुती सांगितली की मुलगा कुळाचा उद्धार करील. संसारसागरात बुडालेल्या आर्तजनांचे दु:ख दूर करील. ज्योतिष्याची ही भविष्यवाणी ऐकून देसाई कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मुलाचे नांव कल्याण ठेवले. हा कल्याण म्हणजेच, लोककल्याण करण्यासाठी पृथ्वीतलावर मानवी रूपात अवतार धारण करून, आपल्या दिव्य वाणीने व अलौकिक कृतीने समाजात धर्म जागरण घडवून आणणारे, गुरुदेव श्री.प.प.स. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पट्टशिष्य श्री.प.प.स.योगानंद स्वामी महाराज (गांडा महाराज) होत.


॥बालपण व लौकिक शिक्षण॥

        यथावकाश वयाच्या आठव्या वर्षी छोट्या कल्याणची मुंज पार पडली.मौंजीबंधनानंतर ते संध्या वंदन व नित्यकर्म शिकले.त्यांचे बालपण इतर लहान मुलांच्या तुलनेत वेगळे होते. बालपणापासूनच त्यांना शिवपूजनाची गोडी होती. खेळण्याबागडण्याच्या वयात एकांतात रमण्याची त्यांची वृत्ती दिसत होती. त्यामुळे घरातील वडीलधाऱ्यांनी लाडाने त्यांचे नांव गांडा असे ठेवले. (गुजराती भाषेत गांडा या शब्दाचा अर्थ भोळा असा होतो.) देवपूजेत रमण्याची वृत्ती आधीच होती. मौंजी बंधनानंतर तर कल्याणजींचे वागणे आणखी बदलले. स्नानसंध्यादि कर्मे, रूद्र अभिषेक, शिवपूजा या सर्वांचे नित्य नियमाचे पालन करण्यात त्यांना अधिकाधिक गोडी वाटू लागली. त्याकाळी शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता. तलंगपूर येथे एक गावठी शाळा होती. त्या शाळेतच कल्याणजींचे शिक्षण झाले. व्यवहारासाठी आवश्यक असणारे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या , लौकिक शिक्षणाची इतिश्री झाली. त्यानंतर सद्ग्रंथांचे वाचन करण्याचा छंदच त्यांच्या मनाला लागला. यातून अनेक ग्रंथाचे वाचन घडले. पूर्वजन्मीच्या संस्कारांनी चित्त शुद्ध होतेच, त्यात अशा धार्मिक संस्काराची व कृतीची जोड मिळाली.


॥प्रपंच करावा नेटका?॥

            त्या काळच्या प्रथेप्रमाणे कल्याणजींचे लग्न सौ.केसरबाई यांच्याशी झाले. अर्थात् हा त्या वेळच्या रूढीप्रमाणे बालविवाह होता. पुढे वय वाढले तशी कौटुंबिक, जबाबदाऱ्यांची जाणीव कल्याणजींच्या मनात झाली. कुटुंबाच्या मिळकतीत हातभार लावावा म्हणून सचिन संस्थानातील एका शाळेत शिक्षकाची नौकरी त्यांनी पत्करली. प्रमाणिकपणाने अध्यापनाचे कार्य करावे आणि उरलेल्या वेळात शिव-आराधना व धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे असे दिवस जाऊ लागले. संसारही जगरहाटीप्रमाणे चाललेला होता. पुढे डाह्याभाईंनी त्यांना शिक्षकाची नौकरी सोडून शेतीच्या कामात लक्ष घालण्याची आज्ञा केली. त्यानुसार कल्याणजींनी शिक्षकाची सोडली व ते शेतीच्या कामात लक्ष घालू लागेल. शेतीची कामे करावीत आणि उरलेल्या वेळी भगवान नीळकंठेश्वराची आराधना करावी असा कल्याणजींचा दिनक्रम सुरू झाला. तसा त्यांच्या मनात प्रापंचिक गोष्टींना थारा नव्हता. मन शिव-आराधनेत तल्लीन होऊ पाहत होते. म्हणूनच श्री नीकंठेश्वराची षोडशोपचारे पूजा करण्याचा त्यांचा नियम कधीच चुकत नव्हता. प्रतिवर्षी श्रावणमासात सव्वालक्ष बिल्वपत्रे महादेवास अर्पण करण्याचा नियम कटाक्षाने पाळला जात होता.श्रीकल्याणजी हे संसारात राहून सारी गृहकृत्ये करीत होते तरीही पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे त्यांच्या मनात अनुसंधान सतत आत्मोपलब्धीकडेच असे.


            एकदा शिवरात्र व्रतामध्ये अडथळा येण्याचा प्रसंग उद्भवला. तलंगरपूरपासून वीस-पंचवीस मैल दूर असलेल्या पिंपळदरा या गावी कल्याणजींच्या भाच्याचे लग्न होते. त्यासाठी त्यांना जावे लागले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच शिवरात्र होती आणि शिवरात्रीस, मध्यरात्री शिवपूजन करण्याचा त्यांचा नियम होता. तलंगपूरला पोहोचता आले नाही. तर इतके दिवस निष्ठेने पाळलेले शिवरात्र व्रत भंग होणार होते. आजच्या सारखी प्रवासाची साधने त्या काळी नव्हती. त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच गावाकडे परत जाण्याचा निश्चय कल्याणजींनी केला. दुसरे दिवशी पायी निघून ते अमलसाड स्टेशनवर आले, पण गाडी निघुन गेली होती. अन्य कोणतेही प्रवासाचे साधन नव्हते. त्यांनी शरीरास पडणाऱ्या कष्टांचा विचार केला नाही. सरळ पायी चालत २० मैलांचे अंतर कापून कल्याणजी रात्री अकरा वाजता तलंगपूरास पोहोचले. मध्यरात्री भगवान नीळकंठेश्वराची प्रतिवर्षाप्रमाणे त्यांनी यथासांग षोडशोपचारे पूजा केली. केलेला नियमु कोणत्याही परिस्थितीत पाळणे हे त्यांचे ब्रीदच होते.


            वडीलांच्या इच्छेनुसार शेतीचा व्यवसाय त्यांनी स्विकारला असला तरी मन त्यात रमत नव्हते. आध्यात्मिक उन्नती कशी साधता येईल हाच ध्यास मनास लागला होता. संतसहवासाशिवाय आत्मिक उन्नतीचा मार्ग सापडणार नाही हे सत्य चिंतनानंतर त्यांना कळून आले. त्यासाठी तलंगपूर कसे सोडता येईल याचा विचार कल्याणजींनी मनात सुरू झाला. पुढे तसा एक योगही जुळून आला. रांदेर या सुरत शहरातपासून जवळ असलेल्या गावाच्या एका व्यापाऱ्याची आफ्रिेकेत पेढी होती. त्यासाठी त्याला एक नोकराची गरज होती. वार्षिक १०००/- रूपये वेतन देण्यास तो तयार झाला, पण ही नोकरी परदेशात होती. परदेशात जाऊन नोकरी करणे डाह्याभाईंना पटले नाही. त्यांनी कल्याणजींना सांगितले की, शेतीचे काम तुला रुचत नसेल तरतूनोकरी कर पण ती आपल्या देशातच असली पाहिजे. वास्तविक कल्याणजींना हेच पाहिजे होते. अशा पद्धतीने त्यांनी वडीलांकडून नोकरीसाठी घर सोडण्याची आज्ञा मिळवली व तलंगपूरपासून दूर मद्रास येथे नोकरी स्विकारली पण त्यांना देवीबहेनजींचे पती परामजी खरसाडकर यांना देवाज्ञा झाल्याची वार्ता कळाल्याने पुन्हा तलंगपूरला यावे लागले. कल्याणजी वडीलांना धीर देण्यासाठी तलंगपूरहून निघाले. मद्रासला जाण्यासाठी त्यांनी मुंबई स्टेशन गाठले पण तेथे त्यांना एका जुगाऱ्यांच्या टोळीने गाठले व जुगारात हरवून त्यांच्या कडचे सगळे पैसे घेतले. त्यामुळे कल्याणजींनी मद्रासला पायी जाण्याचा मार्ग स्विकारला. रस्त्यात चोरांनी त्यांच्या हातातले सोन्याचे कडेही काढून घेतले. जवळ पैसा नव्हता. कुणाची सोबत नव्हती, तरीही शांतचित्ताने भगवान शिवशंकरांचे ध्यान करीत कल्याणजी मार्ग आक्रमित होते. वाटेत अनेक अडथळे आले. संकटे उद्भवली पण त्यांना न जुमानता त्यांचा प्रवास चालू होता. असेच प्रवास करीत करीत ते नाशिकला पोहचले.


॥विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वय बा आहे॥

            नाशिकला संत सहवासात राहण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली. एका महात्म्याचा सहवास त्यांना लाभला. संत सहवासाने त्यांचे मन अत्यानंदाने भरून गेले. प्रवासाने आलेला शीण, थकवा कुठल्याकुठे पळून गेला. भूक, तहानही ते विसरून गेले. या काळात त्यांनी त्या संत महात्म्याची अनन्यभावे व नि:स्वार्थवृत्तीने सेवा केली. अशा एकनिष्ठ सेवेमुळे त्या संत महात्म्याला परम संतोष वाटला. त्यांनी कल्याणजींना रामेश्वराची पायी यात्रा कर म्हणजे आत्मिक सन्मार्गाचा लाभ होईल असे मार्गदर्शन केले. त्यानुसार संताचा आशीर्वाद घेऊन ते पायीच रामेश्वरला जाण्यासाठी निघाले. अन्नपाणी दिवस दिवस मिळत नव्हते. प्रसंगी उपाशी राहून प्रवास करावा लागत होता. अशा कठीण परिस्थितीतही त्यांचे मन शांत होते. इष्ट देवतेला स्मरून वाटचाल चालू होती. असेच करीत ते वळवनूर गावी पोहचले. तेथे कल्याणजी ज्या पेढीवर नोकर होते त्या पेढीची एक शाखा होती. त्या पेढीवरील एका मुनीमाने कल्याणजींना ओळखले. त्यांच्या शरीराची प्रवासाने झालेली अवस्था पाहून रामेश्वराची यात्रा करायची असेल तर थोडे दिवस नोकरी करीत थोडा पैसा जमल्यावर जाता येईल असा विचार मुनीमाने कल्याणजींना सुचविला. शरीराला विश्रांतीची गरज होती. त्यामुळे कल्याणजीनी तो स्विकारला व पुन्हा मद्रासमध्ये नोकरी सुरू झाली. सौ.केसरबाईंनाही तलंगपूरहून बोलावले व संसार पुन्हा सुखाने सुरू झाला. पण पुढे त्या पेढीच्या मालकाने कल्याणजीवर काही आळ घेतल्याने त्यांनी तात्काळ त्या नौकारीचा त्याग केला व ते तलंगपूरला परतले. त्या नंतर त्यांनी तलंगपूर येथे कपड्याचे दुकान टाकले पण त्यात फायदा झाला नाही. उधारी थकल्यामुळे दुकान बंद करावे लागले. पुढे कल्याणजींनी चुलत भावाबरोबर भागिदारी करून निकोरा या गावी गुळ व तंबाखूचा व्यापार सुरू केला. सौ.केसरबाईसह निकोरा येथे घरही थाटले. तेथे त्यांचा व्यापार जोरात चालू लागला. पैसा हाती येत होता पण लागलीच खर्चही होत होता. व्यापारी वृत्तीने पैशाचा धनसंचय करण्याची मुळातच त्यांची वृत्ती नसल्याने दीनदुबळ्यांना, गरजू लोकांना दान दिले जाई. तसेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या साधु संतांची ये-जा या भागात नेहमी असे त्यांच्यासाठी खर्च करण्यात ते मागे पुढे पाहात नसत. कल्याणजींनी चालविलेला खुला खर्च पाहून सौ.केसरबाईंना वाईट वाटायचे. अशाने कसा व्यापार होणार? एक दिवस कंगाल व्हावे लागेल असे त्यांना वाटू लागले. म्हणून त्यांनी श्री डाह्याभाईंना एक विस्तृत पत्र लिहिले. त्यामुळे डाह्याभाईंनी निकोरा येथे येऊन कल्याणजींची कानउघाडणी केली. त्यांचे मन उदासीन झाले. घर कसे सोडावे याची योजना मनात त्यांनी आखली. थकलेली उधारी वसूल करण्याच्या निमित्याने त्यांनी निकोरा सोडले. प्रथमच सगर्भा असलेल्या पत्नीची अभिलाषाही त्यांना मागे रोखू शकली नाही.


॥विचरे जो श्रीगुरुशोधा॥

प्रवास करीत करीत ते नर्मदा किनारी येऊन पोहचले. त्यांनी नर्मदामातेची अनन्यभावाने प्रार्थना केली. “माते मी तुला शरण आलेलो आहे. तारायचे असेल तर तार अथवा मार ! सन्मार्ग दाखव.” अंगावरील कपडयांचा मोह तरी का असावा असे म्हणून कपडे नर्मदा मातेच्या प्रवाहात सोडून दिले. जवळ फक्त दोन उपवस्त्रे व लंगोट याशिवाय काहीही ठेवले नाही. गुरु प्राप्तीसाठी नर्मदा परिक्रमा करण्याचा निश्चय मनात पक्का केला आणि नर्मदा परिक्रमेचे मूळस्थान अमरकंटक येथे जाण्यासाठी मार्गक्रमण करणे सुरू झाले. शूलपाणीश्वराच्या अरण्यात त्यांना भिल्लांनी लुबाडले. एका लंगोटाशिवाय काहीही शिल्लक ठेवले नाही.त्यांच्याजवळ असलेल्या छाट्या व लंगोट्या लूबाडून चोरांनी श्रीकल्यानजींना अक्षरशः नागवे केले होते.कपडे लूबाडून झाल्यावर ज्यावेळी ते चोर श्रीकल्यानजींचे जानवेसुद्धा काढू लागले,त्यावेळी श्रीकल्यानजी त्या चोरांना म्हणाले, "ही ब्राह्मण्याची खूण तेवढी राहू द्या." यावर ते चोर म्हणाले ," वा! हा दोरा आम्हाला कपडे शिवायला उपयोगी पडेल." अगदी जानवे सुध्दा त्यांनी तोडून घेतले. तेथून प.पू.श्री.महाराज ओंकारेश्वराच्या घनदाट झाडीत आले. तेथे किटीघाटाजवळ असलेल्या मनघाट भैरवाच्या स्थानाजवळ त्यांनी एक पर्णकुटी उभारली. तपश्चर्या सुरू केली. बेलांच्या पानावर निर्वाह करीत गुरुकृपा प्राप्त करून घेण्यासाठी निष्ठेने अनुष्ठान चालले होते. पण सातत्याने उपवास घडत असल्याने शरीर क्षीण झाले होते. नर्मदा मातेने भिल्लांद्वारा सद्गुरूंच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावली. दररोज दहा शेर दुध देणारी एक गाय, तिची देखभाल स्वत: करीत, तेथे आणून ठेवली. पुढे आता या अरण्यात राहू नये ते सोडून चालू लागा असा दृष्टांत त्यांना झाला.


नर्मदा परिक्रमा करीत असतांना अनेक महात्म्यांच्या मुखातून पांडुरंगबाबा या महान सिद्ध पुरूषाविषयी गांडाबुवांनी ऐकल होते. त्यामुळे ते बागदी संगम येथे पाडुरंगबाबांना भेटण्यासाठी आले. तेथे पांडुरंगबाबांनी तुमचे गुरु होण्याचे कार्य माझ्याकडे नाही, तुमचे गुरु दक्षिणी ब्राह्मण असून ते अत्यंत तेजस्वी आणि अधिकारी महात्मे आहेत. त्यांचा उपदेश तुम्हाला मिळेल. अशी भविष्यवाणी वर्तविली. त्याच वेळी पांडुरंगबाबांच्या कुटीत काही दक्षिणी ब्राह्मण योगायोगाने बाबांच्या दर्शनार्थ आले होते. त्यांनी पांडुरंग बाबांचा आणि सद्गुरूंचा संवाद ऐकला आणि ते म्हणाले की, आपण ज्या महात्म्याविषयी बोलत आहात ती विभूती नर्मदा किनाऱ्यावर तीर्थयात्रा करीत गुजरात प्रांतात येणार आहे. त्यांच्या जवळ अंगुष्ठ प्रमाणाएवढी एक श्रीदत्त प्रतिमा आहे. ती त्या महात्म्याशी साक्षात् वार्तालाप करते असेही ऐकिवात आहे. या संभाषणाने गांडाबुवांना अत्यानंद झाला. पांडुरंगबाबांना साष्टांग प्रणिपात करून ते लागलीच गुजरातकडे जाण्यासाठी निघाले. दीडशे मैलांचा अथक प्रवास करून गांडाबुवा गुजरात प्रांतातील चिखलदा या गावी आले आणि तेथे त्यांना गुरुदेवांचे नाव श्री वासुदेवानांद सरस्वती असे असून ते नर्मदा किनाऱ्यावर परिभ्रमण करीत करीत नुकतेच गुजरात प्रांतात प्रवेशले आहेत अशी वार्ता कळाली. शेवटी शुकदेव, व्यास, अनसूया आदि तीर्थांची यात्रा करीत सद्गुरु सिनोर या गावी पोहोचले.


॥यति वासुदेवानंदा, भेटला तया सुखकंदा॥

            गुरुदेव श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज मार्कंडेश्वराच्या मंदिरात वास्तव्यास होते. तेथे गुरुदेवांना पाहताच त्यांच्या मनात दिव्यानंद दाटून आला. त्यावेळी गुरुदेवांचे गीतेवर प्रवचन चालू होते. अंतर्ज्ञानाने त्यांनी सगळे जाणले पण प्रत्यक्ष ओळख मात्र दाखविली नाही. एक आठवडा असाच गेला. एके दिवशी गुरुदेवांनी ‘तू येथे का बसून राहतोस? असे विचारले. तेव्हा अत्यंत नम्रभावाने हे समर्थ पाय माझा उद्धार करतील याच विश्वासाने मी या पायाजवळ शरण आलो आहे असे गुरुदेवांना विनवले व आपली सारी जीवनकथाही सांगितली. ते गुरुदेवांसोबत अठरा दिवस सिनोर येथे राहिले. या काळात त्यांनी अत्यंत एकनिष्ठेने गुरुदेवांची सेवा केली. गुरुदेवांच्या सान्निध्यात त्यांच्या मनातील विशाद नष्ट झाला व त्यांचे मन अखंड प्रसन्नतेने भरले. आत्मबोधाच्या साक्षात्कारासाठी ऋतंभराप्रज्ञा जागृत करणे आवश्यक असे. त्या करता योगाभ्यास करण्याची आज्ञा गुरुदेवांनी केली. मार्कंडेश्वराच्या मंदिरातच त्यांचा योगाभ्यास सुरू झाला.  


मार्कंडेश्वराच्या मंदिरात गुरुदेव श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आलेले आहेत. हे जाणून त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लागली. राजपिंपळा येथील न्यायाधीश श्री खंडुभाई देसाई जे डाह्याभाईंचे मित्र होते. तेही गुरुदेवांच्या दर्शनाला आले. त्यांनी तेथे सद्गुरूंना गुरुदेवांच्या सेवेत असल्याचे पाहिले व ओळख न देता डाह्याभाईंना पत्र पाठविले. त्यानुसार डाह्याभाईनी आपले जावई श्री कल्याणजी व पुतण्या यांना ताबडतोब सिनोर येथे पाठविले. त्यांनी गुरुदेवाना सगळे सांगितले. गुरुदेवांनी गांडा लवकरच तलंगुपरला येईल त्याची काळजी करू नये, असे आश्वासन दिले.


            सिनोरहून उभय गुरु-शिष्य निकोरा येथे आले तेथे गुरुदेवांनी गांडामहाराजंकडून योगाभ्यास करून घेतला व पुढे ते समुद्रस्नानासाठी गेले. त्यानंतर गुरुदेवांनी त्यांना घरी जाण्याची व आई-वडीलांची परवानगी घेऊन आपल्याकडे येण्याची आज्ञा केली. त्यानुसार गांडाबुवा तलंगपुरला परत आले. सगळया परिवाराला आनंद वाटला. पण सद्गुरूंचे मन कुटुंबात रमत नव्हते. गुरुदेवांच्या सहवासाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून एक दिवस त्यांनी वडीलांना कळकळून विनंती केली, मला येथे येऊन बरेच दिवस झाले आहेत. गुरुदेवांच्या सेवेत हजर होण्याची उत्कंठा मनास लागलेली आहे. मला त्यांच्याकडे जाण्याची अनुज्ञा द्या. माझ्या आत्मोत्कर्षाच्या मार्गात आपण अडथळा आणू नये ही माझी नम्र प्रार्थना आहे. तेव्हा डाह्याभाईंनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की आम्हा उभयतांचा अंत्यसंस्कार तुलाच करावा लागणारा आहे. लहान भाऊ व मुलगी या सर्वांचा भार तुझ्यावरच आहे. ते तू का समजून घेत नाहीस? सौ.केसरबाईंनीही आपले म्हणणे मांडले. गांडाबुवांनी आपल्या वडीलांना समजवले की आपण मुळीच काळजी करू नये. गुरुकृपेने सर्व कार्य ठीक होईल. कुटुंबाच्या पालनपोषणाची व माझ्या पत्नी व मुलीची काळजी रघुजी घेईल. शेवटी त्यांच्या मनाची तळमळ पाहून आई-वडीलांनी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करण्याची परवानगी दिली. आपण जर सकाळी सर्वांसमक्ष घराबाहेर पडू तर सर्वांना दु:खाचा भार पेलणे असह्य होईल. त्या पेक्षा सर्व झोपेत असतांना मध्यरात्री गृहत्याग करून आश्विनीकुमार तीर्थास जावे असा विचार सद्गुरूंनी केला आणि रात्री दोन वाजता त्यांनी तलंगूपर सोडले.


॥पूजामूलं गुरोर्पादौ… संपूर्ण समर्पण व सेवा॥

ते अश्विनीकुमार तीर्थावर आले. तेथे त्यांनी काही दिवस गुप्तेश्वर महादेवाच्या मंदिरात मुक्काम केला तेथून ते भडोच येथे आले. तेथ त्यांनी अभिमुक्तेश्वर मंदिराजवळील धर्मशाळेत साधनेस प्रारंभ केला. गुरुदेवांना एक पत्र लिहिले. त्या पत्राचे उत्तर गुरुदेवांनी पाठविले आणि भडोच येथे दोन महिने राहून चातुर्मास पूर्ण करून व्दारका येथे भेट घेण्याचे सूचित केले. त्यानुसार सद्गुरु व्दारका येथे पोहोचले व त्यांनी गुरुसेवेत स्वत:ला झोकून दिले. एके दिवशी गुरुदेवांनी त्यांना प्रभातपाटण येथे जाऊन बाळंभट पुजारी यांची मुलगी व्दारका हिची समजून घालण्यासाठी जाण्याची आज्ञा केली. तेथून गिरनारची यात्रा करून दिवाळीच्या सुमारास राजकोट येथे भेट घेण्याचे सांगितले. सद्गुरु गुरुआज्ञेस वेदवाक्य समजत असल्याने त्यांनी लगेच व्दारका सोडून प्रभातपाटण गाठले व व्दारकेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेथून ते गिरनारची यात्रा आटोपून राजकोट येथे गुरुदेवांना भेटले. राजकोट येथून ते सिध्दपूर, जकोर, सिनोर, चिखलदरा, उज्जैन इत्यादी स्थानांहून क्षिप्रा तटावरील महत्पूर या गावी आले. येथेच चातुर्मासासाठी उभय गुरुशिष्यांचा मुक्काम झाला.


            गुरुदेवांच्या सान्निध्यात सद्गुरूंना सद्ग्रंथाचे श्रवण आणि मनन घडत होते. शास्त्रप्रणालीनुसार प्रत्यक्ष गुरुमुखातून ज्ञान ग्रहण करण्याचे परमभाग्य त्यांना लाभले होते. गुरु आणि शिष्य तेवढेच अधिकारी होते. त्यांचा योगाभ्यासही व्यवस्थित चालू होता. पण ऋतंभरा प्रज्ञा जागृत व्हावी म्हणून गुरुदेवांनी त्यांना खेचरी मुद्रा करण्यास सांगितले. त्यासाठी जिभेच्या खालची एक सुक्ष्म शीर छेदावी लागते म्हणून गुरुदेवांनी त्यांना गुणाछावनी येथे असलेल्या डॉ.विश्वनाथ ताटके यांच्याकडे पाठविले. शिरोच्छेदन करतांना खूप रक्तस्त्राव झाला. शेवटी गुरुदेवांनी येऊन त्यावर उपचार केला. तेव्हाच रक्तस्त्राव थांबला. गांडाबुवांची प्रकृती खालावली. गुरुदेवांनी नंतर ब्रम्हावर्ताकडे प्रयाण केले व सद्गुरु गांडा महाराज भडोच येथे आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी आले.


            गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे खेचरी योगमुद्रेचा अभ्यास चालू होता. गुरुदेवांनी सांगितलेल्या सुचनेप्रमाणे आहार व विहार यांचे नियमन गांडाबुवा करीत होते. त्यामुळे प्रकृतीत चांगली सुधारणा झाली व सद्गुरूंनी धर्मजागृतीच्या कार्यास प्रारंभ केला. ते पळसाना, टिंबरवा साकी येथे जाऊन राहिले व तेथील लोकांमध्ये धर्मजागृती केली. तेथून ते भडोच येथे साधनेसाठी परत आले.


॥मातृदेवो भव॥

एके रात्री गुरुदेवांनी स्वप्नात येऊन सांगितले की तुझी माता आणि भावजय यांनी बिमारीमुळे अंथरून धरले आहे. दुसऱ्या दिवशीच सद्गुरु तलंगूपर येथे पोहोचले. त्यांनी आईची सेवा केली तिच्याकडून दानधर्म करविला. अंतिम क्षणी दत्तप्रभुंचे ध्यान व नामस्मरण करण्यास सांगितले. मातोश्रींनी दत्तनामाचा उच्चार करीत करीत माघ शुद्ध पौर्णिमेस (संवत् १९५९) पार्थीव शरीराचा त्याग करून चिरकाल सौभाग्य प्राप्त केले. त्यानंतर गांडाबुवांनी मातोंश्रीचे उत्तरकार्य व्यवस्थितपार पाडले व त्या वर्षीचा चातुर्मास अश्विनीकुमार येथे केला.


॥पुन्हा गुरुचरणी॥

संवत १९६२ मध्ये भडोच येथे सद्गुरूंची कन्या हिचा विवाह उंटडी या गावचे मगनलाल खुशालभाई देसाई यांच्याशी झाला. पण पुढे पाणी काढता काढता झोक जाऊन आडात पडल्याने त्या कन्येचे देहावसान झाले. या घटनेमुळे सौ.जमुनाबेन यांना खूप दु:ख वाटले पण बुवांनी दु:ख केले नाही. शके १८२८ चा चातुर्मास बडवाई येथे गुरुदेव करणार आहेत असे कळल्याने गांडाबुवा बडवाई येथे आले तेथून ते वाडीस गेले वाडी येथे बडोद्याचे नोंदणी कामगार आनंदराव खंडेराव शिंदे हे गुरुदेवांना भेटले व त्यांनी गांडा महाराजांसोबत नाशिकची यात्रा करण्याची श्रीदत्त महाराजांची आज्ञा न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आलेल्या प्रसंगांची उदाहरणे देऊन यावर मार्ग काढण्याची विनंती केली. त्यानुसार गुरुदेवांनी त्यांना श्रीदत्तपादुकांवर महाभिषेक करण्यास सांगितले व गांडा महाराजांना औषध देण्याची आज्ञा केली. त्यानुसार गांडा महाराजांनी शिंदे यांना औषध दिले व ते रोगमुक्त झाले. गुरुदेवांना वाडीहून शृंगेरी येथे जाण्याची श्री दत्तप्रभुंची आज्ञा झाली.  त्यानुसार सद्गुरु गांडा महाराजसोबत गुरुदेव शृंगेरी येथे गेले. तेथून ते अरण्यमार्गाने बनवाशी, शिरसी, गोकर्णमहाबळेश्वर, गुर्लहोसूर या गावाहून गलगळीस आहेत. तेथे दोन महिने मुक्काम केला. येथे श्रीगुरुदेवांनी गांडा महाराजांना सांगितले की पुत्र होत नाही म्हणून तुझ्या मातेने शिवरात्र व्रत केले होते. त्या व्रतानुसारच तुझा जन्म झालेला आहे. व सद्गुण प्राधान्य कृती प्राप्त झाली आहे. म्हणून तू शिवरात्र व्रताचे उद्यापन करून मातृऋणातून मुक्त हो. गुरुदेवांच्या या आज्ञेनुसार शिवरात्र व्रताचे उद्यापन सद्गुरूंनी यथासांग पार पाडले व ते मातृऋणातून मुक्त झाले.


            गलगळीक्षेत्राहून गुरुदेव वैशाख वद्य ६ शके १८३३ मध्ये कुरूगड्डी येथे आले. तेथेच त्यांचा त्या वर्षीचा चातुर्मास संपन्न झाला. गुरुदेवांच्या आगमनामुळे येथे भक्तजनांची गर्दी वाढू लागली. एवढ्या मोठया जनसमुदायाचि व्यवस्था ठेवण्याचे कार्य सद्गुरु गांडा महाराजांकडे होते. त्यांनी हे कार्य व्यविस्थितपणे पार पाडले. कुरूगड्डी येथे असतांना एक दिवस गुरुदेवांच्या मस्तकावर एक कावळा बसला. त्याच वेळी श्रीदत्तप्रभुंचा दृष्टांत झाला की दक्षिणेत वाणीसंगम म्हणून स्थान आहे. तेथे जाऊन स्नान केल्यास काकस्पर्श दोषाचा परिहार होईल.


            त्यानुसार गुरुदेव व गांडा महाराज वाणीसंगमावर आले तेथे गुरुदेवांनी काकस्पर्श दोष निवारणार्थ स्नान केले. तेथून ते परळी वैजनाथ, रेणापूर या गावावरून राजूर गावी आले. तेथे सिताराम महाराजांनी यज्ञाचे आयोजन केले होते. तेथे गुरुदेवांची व गांडा महाराजांची उपस्थिती लाभली. राजूरहून ते औंढा नागनाथ येथे गेले. तेथून रूद्र स्वाहाकारासाठी त्यांना गौडगावी जायचे होते. म्हणून ते पाथरीस आले. तेथे गौरीशंकर मंदिरात गुरुदेवांच्या हस्ते चैत्र शुद्ध ३, गुरुवार शके १८३४, या शुभदिवशी दत्तपादुकांची स्थापना झाली. नंतर ते गौडगांवी गेले. तेथे रेणुकामातेच्या मंदिरात स्वाहाकाराचा कार्यक्रम गुरुदेवांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या यज्ञप्रसंगी श्रीश्यामराव चौधरी यांची कन्या सौ.विठाबाई यांच्या मुलीस गुरुदेवांनी जिवंत केले. तेथून गोपेगाव येथे श्रीअप्पादेव व अण्णादेव यांना अरण शिकवण्यासाठी गुरुदेव गेले. तेव्हापासून तेथील लिंबाची पाने गोड झाली. गोपेगावाहून गुरुदेव व गांडा महाराज मंजरथ, राक्षसभूवन, पांचालेश्वर या गावाहून पैठण येथे आले. तेथे नाथवंशजांना श्रींच्या मूळ जागेचे दिग्दर्शन गुरुदेवांनी केले. नंतर हे उभय गुरु-शिष्य देवगिरी किल्यावरच्या जनार्दनस्वामींच्या समाधीचे दर्शत घेऊन वेरूळला गेले. तेथे घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन ते चाळीसगांवचा मार्ग आक्रमू लागले.


॥वेदांतचिंतन व तप॥

गुरुदेवांनी सद्गुरु गांडा महाराजांना सांगितले की, तू माझ्याबरोबर राहून, दत्तसेवा करून अनंतपुण्य जोडले आहेस. या पुण्यप्रभावामुळे तुला स्वर्गाची प्राप्ति तर निश्चित मिळेल पण मोक्ष प्राप्ती लाभणार नाही. तेव्हा सद्गुरु गांडा महाराजांनी गुरुदेवांना उत्तर दिले की, श्रीगुरुमाय! स्वर्गसुख तर आपल्या सहवासात मी नित्य अनुभवित आहे. मला अतींद्रिय सुख पाहिजे. त्यावर गुरुदेव म्हणाले, श्री जनउपाधिचा नाद सोडून तू जो वेदांत श्रवण केला आहेस, त्याचा पुन्हा पुन्हा विचार कर. आत्मानात्म विचारात नित्य दंग राहा. तू कोठेही असला तरी माझ्या सान्निध्यात असल्यासारखेच समज. नर्मदा किनारी जाऊन अभ्यास कर. तेथेही जनउपाधी लागली तर अरण्यात जाऊन राहा. गुरुदेवांचे हे शब्द ऐकून त्यांनी गुरुदेवांना साष्टांग दंडवत घातला व प्रारब्धयोगे जनउपाधी लागली तर काय करावे अशी विनवणी केली. त्यावर गुरुदेव म्हणाले की प्रारब्धाने जे जे होईल ते होऊ द्यावे. तरच आत्मसुख लाभू शकते. गुरुदेवांचे हे शब्द ऐकून सद्गुरुंना नवीन दृष्टी मिळाल्याचे समाधान लाभले. पण गुरुदेवांपासून दूर व्हावे लागणार म्हणून दु:खही झाले. गुरुदेवांनी कृपादृष्टीने पाहून त्यांना आशीर्वाद दिला.


            गुरुदेवांच्या आज्ञेनुसार सद्गुरु गांडा महाराज नर्मदा किनारी जाण्यासाठी निघाले. मार्गावरील या गावी त्यांनी त्या वर्षीचा चातुर्मास केला. त्यानंतर ते पळसाणा तालुक्यात असणाऱ्या साकी या गावी गेले. तेथे श्री कुंवरजी भुलाभाई यांच्या चारीधाम यात्रेच्या मावंद्याच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहिले. कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जावू नये अशी घोषणा सद्गुरु गांडाबुवांनी केली. स्वयंपाक केवळ हजार माणसांचा केला होता. प्रत्यक्षात तीन हजार माणसे उपस्थित होती. सद्गुरूंनी ही अडचण जाणून भोजनसामुग्रीवर एक मोठे वस्त्र टाकावयास लावून त्यावर पाणी अभिमंत्रित करून शिंपडले व तुपाचा दिवा लावून गुरुदेवांच्या नावाचा जयघोष केला. तीन हजार माणसे तृप्त होईपर्यंत जेवली.


            या कार्यक्रमानंतर सद्गुरु टिंबरवा, डुंगरी, व्यारा या गावाहून, कमकुवा येथे श्री रघुजी यांच्याकडे गेले. पण तेथे ते आजारी पडल्याने श्री कल्याणजी यांनी त्यांना भडोच येथे आणले.


॥पितृसेवा॥

            सद्गुरूंच्या वडीलांची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत होती. त्यांना संन्यास दीक्षा द्यावी की देऊ नये याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सद्गुरु गरूडेश्वर येथे गेले व गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी श्री.प.पू. डाह्याभाईंना संवत १९७० च्या कार्तिक शुक्ल द्वितीयेय आतुर संन्यास घ्यावयास लावला.


            सद्गुरु गांडा महाराजांना अन्य कशाचाही मोह नसला. तरी गुरुदेवांच्या सहवासात राहण्याचा मोह होता. गुरुदेवांच्या भेटीसाठी त्यांचे मन नेहमी तळमळत असे गुरुदेवांच्या आज्ञेनुसार त्यांचा मुक्काम भडोच येथे होता. पण मन मात्र गरुडेश्वराला गुरुदेवांच्या विचारात दंग झालेले असे. म्हणून ओढ अनावर होउन ते गरुडेश्वरला गेले व गुरुसेवेत रममाण झाले. गुरुसेवेत दिवस कसे जात होते ते कळत नव्हते. एक दिवस गुरुदेव श्री प.प.स.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सद्गुरूंना म्हणाले गांडा तू भडोचला जा तुझ्या वडीलांची प्रकृती अशक्त झालेली आहे. त्यांना सेवेची गरज आहे आणि त्यांची सेवा म्हणजेच माझी सेवा आहे. मातृदेवो भव पितृदेवोभव ही वेदाज्ञा आहे. तिचे पालन केलेच पाहिजे. वडील आणि गुरु यांचा अधिकार सारखाच आहे. त्यासाठी तू भडोच येथे जाऊन आधी वडीलांची सेवा कर. गुरु आज्ञेनुसार सद्गुरु भडोच येथे आले. पण पुन्हा गुरुदेवांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे कळाल्याने ते पुन्हा गुरुडेश्वला गेले. गुरुदेवांनी पुन्हा त्यांना सांगितले की, तू वडिलांची सेवा सोडून पुन्हा आलास, तुझा मोह अजूनही दूर झालेला नाही. माझ्या सेवेसाठी येथे पुष्कळ शिष्य आहेत. तू माझी काळजी करू नकोस. वडीलांची काळजी कर.


॥तुझ्या ह्रदयात मी आहे॥

            गुरुदेवांच्या सांगण्याचे मर्म सद्गूरु गांडा महाराजांना  कळाले. त्यांची सोबत आता थोड्याच दिवसांची आहे, हे त्यांनी जाणले आणि गुरुमाऊलींना विनविले की आपल्या सहवासात ब्रह्मात्मता लाभली, पण गुरुतत्वाशिवाय आपली सेवा कशी पूर्ण होणार ? हे एकूण गुरुदेवांनी स्मित केले व शंकराचार्यांचा श्लोक म्हणून गुरु व परमतत्व एकच आहे असा स्वरूपबोध सद्गुरूंना केला. गांडा महाराजांनी गुरुदेवांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा गुरुदेवांनी त्यांच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला व आशीर्वाद दिला.

           पुढे वैशाख महिन्यात गुरुदेवांची प्रकृती अधिक बिघडली. सद्गुरु गांडा महाराजांना भडोचहून बोलावण्यात आले. गुरुदेवांजवळ जी चांदीची दत्तमूर्ति होती ती वाडी, गाणगापूर अथवा एखाद्या सद्भक्ताकडे द्यावी अशी गुरुदेवांची इच्छा होती. पण दत्तप्रभुंना गरूडेश्वर येथेच राहून लीला करावयाची असल्याने त्यांनी सद्गुरु गांडा महाराजांना दृष्टांत देऊन येथे मंदिर बांधण्याची आज्ञा केली. त्यानुसार गुरुदेवांना माहित न होऊ देता वर्गणी देण्याविषयाचे एक विनंती पत्र स्वत:च्या हस्ताक्षरात तयार केले व स्वतःची सेवा म्हणून एक हजार रूपयांचा आकडाही टाकला व ते पत्र सर्वांना दाखविण्यास सांगितले. अवघ्या एका तासात आठ हजारांचा आकडा त्या पत्रकात भरला गेला.


            गुरुदेवांच्या सेवेत रत असतांना गुरुदेवांनी पुन्हा सद्गुरु गांडा महाराजांना परत भडोच येथे जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार निघण्यापुर्वी गुरुदेवांचा निरोप घेताना त्यांचे अंतःकरण हेलावून गेले. पुढे शांत झाल्यावर त्यांनी गुरुदेवांसमोर प्रार्थना केली की, हे माऊली या दासाची एवढीच विनंती ऐकावी की, प्रारब्धप्रतिबंध निर्माण झाला तर त्यावेळी माझा सांभाळ करावा. पुन्हा भूवर जन्म घ्यावा लागू नये. विदेह कैवल्यपद लाभावे. श्री गुरु स्वरूपाशी एक करावे. सदगुरूंची ही प्रार्थना ऐकून गुरुदेव म्हणाले की, श्री दत्तात्रेय तुझी इच्छा पूर्ण करतील. माझ्या सहवासात राहून तू जशी दत्तसेवा व माझी सेवा केलीस तशीच एकनिष्ठेने वडीलांची सेवा कर. त्यांचे मन यत्किंचितही दुखवू नकोस. त्यांच्या ऋणातून मुक्त हो, नंतर आराधना कर. सर्व मायिक संबंधांचा त्याग कर. संन्यस्त हो आणि दूर निघून जा. तुझ्या ह्रदयात मी आहे, हे व्रत सांभाळून राहा. गुरु शिष्यांचा जोवर भेद आहे तोवर मुक्ती मिळत नाही. यासाठी शरीरभाव त्यागून आत्मभावाने एक हो. हा माझा उपदेश सदैव ध्यानात ठेव. एवढे बोलून गुरुदेवांनी सद्गुरूंना प्रसाद दिला. तो भक्षण करून सद्गुरूंनी गरूडेश्वर सोडले व ते भडोच येथे आले.


॥पितृऋणमुक्ति॥

            प.पू.श्री डाह्याभाईंची प्रकृती संवत् १९७५ च्या श्रावण शुक्ल नवमीच्या दिवशी अस्वस्थ झाली. सद्गुरु गांडा महाराजांनी त्यांना स्नान घालून पाटावर बसविले व परम तत्त्वावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली. त्यानुसार प.पू.श्री.डाह्याभाईंनी नारायण नारायण असा उच्चार करता करताच प्राण सोडला. सद्गुरु गांडा महाराजांनी धर्मशास्त्रानुसार पुढील विधी पार पाडले व ते मातृ-पितृऋणातून मुक्त झाले.


॥संन्यास व दण्डधारण॥

            गुरुदेवांची आज्ञा संन्यास मार्गाने जाण्याची असल्याने सद्गुरु गांडा महाराजांनी नौ चौकी घाटावर शके १८४१ च्या माघ महिन्याच्या वद्य पक्षात संन्यास घेतला. श्री भालचंद्र शास्त्री शुक्ल यांनी प्राचाश्चित्तादि विधी करावयास लावले. त्यावेळी तेथे केशवानंद नावाचे स्वामी आले. त्यांनी प्रेषोच्चार करवून घेतला. विधिवत् कटिसूत्र, कौपीन व काषाय वस्त्रेही दिली. पुढे नामाभिधान व दंड मिळविण्याविषयी तळमळ सद्गुरु गांडा महाराजांना लागली. अशा अवस्थेतच गुरुदेवांनी, तुझे दंडगुरु श्री कृष्णानंद सरस्वती आहेत, असा दृष्टांत दिला. गुरुआज्ञेनुसार सद्गुरु त्यांच्या शोधासाठी निघाले. डाकोर येथे गोमती नदीच्या तीरावर प.पू.श्री कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराजांची भेट झाली. त्यांनी सद्गुरूंना दंड दिला व योगानंद सरस्वती हे नामाभिधान ठेवले.


            दंड धारण केल्यानंतर सद्गुरु योगानंद स्वामी महाराजांनी पहिला चातुर्मास भडोच येथे केला (शके १८४१) त्यांचा शके १८४२ चा दुसरा चातुर्मास नाशिक येथे झाला. तिसरा चातुर्मास श्री क्षेत्र अनावल श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर (जे अनावील ब्राह्मणांचे कुलदैवत आहे) येथे संपन्न झाला. येथे सद्गुरूंनी योगसुत्रांवर एक पुस्तक लिहिले पण ते सध्या उपलब्ध नाही.


॥श्रीक्षेत्र गुंजकडे…॥

गुरुदेवांच्या आज्ञेनुसार सद्गुरू नर्मदातट सोडून ब्यादा, नंदूरबार या गावांहून औरंगाबादला आले. तेथे चौराहा येथे असणाऱ्या राम मंदिरात त्यांनी काही दिवस मुक्काम केला, तेथे त्यांना सेलू येथील श्री विष्णुपंत पंची आणि श्री पंडितराव चौधरी येऊन भेटले व श्री विष्णुपंत पंची यांनी त्यांना सेलू येथे येण्याची विनंती केली. त्यामुळे सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराज सेलू येथे या भक्तांसोबत आले. तेथे मुरलीधराच्या मंदिरात त्यांचा मुक्काम घडला. प.पू.श्री.प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराज सेलूला आले आहेत, ही वार्ता आसपासच्या गावांमध्ये पसरली व गांवोगावीचे भक्त महाराजांच्या दर्शनासाठी येऊ लागले. पंचपदी आणि नित्यकर्मेही मोठ्या उत्साहात पार पडू लागली. भक्तासोबत धार्मिक चर्चाही होऊ लागली. सद्गुरुचा सहवास आपल्याला मिळावा, त्यांची अमृतवाणी श्रवण करता यावी, दत्तप्रभुंच्या नामस्मरणात तल्लीन होऊन स्वतःस विसरण्याचे भाग्य लाभावे अशी इच्छा ठीकठिकाणांहून आलेल्या भक्तांच्या मनात उत्पन्न झाली. त्यातून सद्गुरूंनी आपल्या गावी यावे असा आग्रह भक्त मंडळी करू लागली.

श्रीक्षेत्र गुंज येथील दत्तात्रेय प्रभु


            जिंतूर जवळ असणाऱ्या नृसिंहाचे वरूड या गावी यज्ञ संपन्न होणार होता. त्यासाठी तेथील भक्तांनी श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराजांना येण्याची विनंती केली. त्यामुळे महाराज वरूडला यज्ञासाठी उपस्थित राहिले. यज्ञाचा महाप्रसाद आणि सद्गुरूंचे दर्शन अशी पर्वणी भक्तांना एकाच वेळी लाभल्याने वरूडला भक्तांची रीघ लागली. सावळी येथून श्रीमती अहल्याबाई जोशी गावातील इतर भक्तांमंडळी सोबत वरूडला आल्या. त्यांनी मनोभावे सद्गुरूंचे दर्शन घेतले. सद्गुरूंनी प्रसाद म्हणून त्यांना पंचपदीचे पुस्तक दिले. त्यांनी ते सांभाळून ठेवले. सद्गुरु योगानंद महाराजांची दृष्टी दिव्य होती. पंदपदीचा खरा भक्त याच माऊलीचा पुत्र असून सावळी येथे ‘चिंतामणी’ च्या रूपात वाढत आहे, हे त्यांनी जाणले होते.


            वरूड येथील कार्यक्रमानंतर सद्गुरु परत जिंतूरला आले. तेथून सातोना, आष्टी, गोळेगांव, धामणगांव या गावी सद्गुरूंचे काही काळ वास्तव्य घडले. तेथून ते मानवला आले. श्री शामराव चौधरी यांनी विनंती करून त्यांना पाथरी येथे नेले. त्यावेळी वैशाख मास सरत आला होता. दशहरापर्व सुरू होणार होते. म्हणून सद्गुरूंनी गंगेच्या स्थानी वास्तव्य करण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार पाथरीपासून जवळ असलेल्या गुंज या गावी भक्तांनी सद्गुरूंना नेले. शके १९४४ मध्ये वैशाखमासाच्या शुक्ल पक्षात सद्गुरु योगानंद महाराज पाथरीकर चौधरी मंडळीसह गुंज येथे आले. तेथे श्री सिध्देश्वर महादेव मंदिरात त्यांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली.


॥गुंज गुंजले नामनिनादे॥

            सद्गुरु श्री प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पाय या स्थानास लागताच त्याचा पांग फिटला. ती जागा स्वच्छ करण्यात आली. सद्गुरूंचे दर्शन घेण्याकरता दररोज अनेक गावांहून लोक येऊ लागले. सावलीसाठी मंडप टाकण्यात आला. अन्नदान होऊ लागले. भजन, किर्तन, पंचपदीच्या गजराने गोदामातेचा पवित्र तीर दुमदुमूनि जाऊ लागला. हे वातावरण भक्तिमय होऊन गेले. शके १९४४ चा दशहरा व चातुर्मास सद्गुरूंनी गुंज येथेच केला.


॥काय भक्तिचिया वाटा॥

चातुर्मासानंतर सद्गुरु पाथरी व रेणापूरला गेले व तेथून श्री बाबा कल्हे यांच्या विनंतीनुसार ते मानवतला आले. मानवत येथे श्रीदत्त मंदिर नव्हते. तेथे दत्त मंदिर व दत्त पादुका असाव्यात अशी भक्तांची इच्छा होती. त्यानुसार श्री बाबा कल्हे यांनी पुढाकार घेतला. व श्री प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या सानिध्यात शके १८४४ मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीस श्रीदत्तप्रभुंच्या मुर्तिची व पादुकांची प्रतिष्ठापना मानवत येथील राममंदिरात करण्यात आली. सुरुवातीची अकरा आवर्तने होईपर्यंत सद्गुरूंनी कमंडलुतील पाण्याने स्वतः दत्तप्रभुंच्या मूर्तिस अभिषेक केला. मानवतला सद्गुरुंचे वास्तव्य असतांना तेथे पाण्याची तीव्र टंचाई होती. श्रीरंगनाथ जोशी यांच्याकडे आड होता. पण त्यात पाणी नव्हते. सद्गुरूंना हे कळाले तेव्हा त्यांच्या कमंडलुतील पाणी त्या आडात टाकले आणि त्या आडास पुरेपुर पाणी आले.


            मानवतहून सद्गुरु जिंतूर येथील येथे आले. तेथे श्रीदत्त मंदिरात त्यांनी मुक्काम केला. हे दत्तमंदिर पावसाळ्यात गळत असल्यामुळे खराब झाले होते. त्यामुळे सद्गुरूंनी नाराजी व्यक्त केली व भक्तमंडळीच्या हाताने या मंदिराचा जीर्णोद्धार करून घेतला.


॥तुझा अभ्यास कसा चालू आहे॥

            सद्गुरूंचा मुक्काम जिंतूरला होता. त्यावेळी प.पू.श्री. चिंतामणी महाराज ७-८ वर्षांचे होते व जिंतूर येथे श्री शंकरशास्त्री पुराणिकांचे घरी शिकण्यासाठी राहात असत. तेही नित्यनियमाने पंचपदीला येत. तेव्हा सद्गुरु त्यांना तुझा अभ्यास कसा काय चालू आहे असे विचारीत ‘ठीक चालू आहे’ एवढेच बोलून प.पू.श्री.चिंतामणी महाराज पंचपदीत तल्लीन होऊन जात. उभयतांमधील या संवादाचे इतरांना काही वाटत नसे. आता त्यात किती गुढार्थ भरलेला होता याची प्रचिती येते.


            शके १८४५ चा दशहरा गोपेगांव येथे झाला तर चातुर्मास गुंज येथे झाला. याच काळात श्री गुरुमूर्तिचरित्र या ग्रंथाच्या लिखाणास प्रारंभ झाला. सिद्धेश्वराच्या देवालयात बसून सद्गुरु सांगत व गुंज येथील श्री कृष्णाबुवा रामदासी लिहून घेत. श्रीगुरुमूर्ति चारित्राचे पंधरा अध्याय या काळात लिहून पूर्ण झाले.


            शके १८४६ चा दशहरा सद्‌गुरूंनी दाजीमहाराजांच्या टाकळीस केला व तेथून ते श्री प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीसाठी मानवतला गेले. तेथे पाउस नव्हता व पाण्याची खूप टंचाई होती. मानवतकर अक्षरश: हैराण झाले होते. सद्गुरूंनी परमतत्त्वाची आराधना केली व तीन दिवस मानवतला पाऊस पडला. सद्गुरूंनी शके १८४६ चा चातुर्मास गुंज येथेच केला. शके १८४७ चा दशहरा मोरेगांव येथे तर चातुर्मास कानडखेड येथे संपन्न झाला. याच वास्तव्यात श्री गुरुमूर्ति चारित्राच्या लेखनास पुन्हा सुरूवात झाली. श्री हनुमंतराव वाकडीकर हे लिखानाचे कार्य करीत होते. शके १८४८ चा दशहरा जोडसावंगी येथे १८४९ व १८५० या संवत्सरातील दशहरापर्व सद्गुरूंनी मोरेगांव येथेच साजरे केले. तर या दोन्ही संवत्सरातील चातुर्मास वाकडी येथे झाले. वाकडी येथील या चातुर्मासांच्या काळात श्री गुरुमूर्तिचरित्राचे लेखन पूर्ण झाले. सद्गुरु श्री प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराज सांगत व वाकडी येथील श्री हनुमंतराव देशपांडे हे उतरून घेत तर श्री बापूराव मोरेगांवकर ग्रंथ लिखानासाठी दररोज ताजी शाई तयार करून वाकडीस पाठवित. अशा पद्धतीने १४,८८३ ओव्यांचा व १३५ अध्यायांचा हा भव्यदिव्य ग्रंथ सर्वांच्या कल्याणासाठी सद्गुरूंनी मराठीत तयार केला. ग्रंथ तर तयार झाला पण आता त्यांच्या शुद्धिकरणाची तळमळ सद्गुरूंना लागून राहिली. इकडे नारेश्वर येथे श्रीरंगअवधूत महाराजांना गुरुदेव श्री प.प.स.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा दृष्टांत झाला की, ब्रह्मचारी, गांडा तुझी वाट पहात आहे. त्यानुसारे श्रीरंगावधूत महाराज वाकडी येथे आले. त्यांनी शुध्दीकरणाचे कार्य पूर्ण केले व नर्मदेस परिक्रमा केल्यानंतर त्यांनी भडोच येथे सहा महिने मुक्काम केला व ग्रंथाची मुद्रीते स्वत: तपासून त्याचे पारायणही स्वत: केले. या कार्यास प.प.श्री.योगानंद महाराजांचे पुर्वाश्रमातील मेहुणे श्री कल्याणजी भाई यांनी खूप मदत केली.


॥आपणासारिखे करिती तात्काळ॥

            शके १८५० च्या वाकडी येथील चातुर्मासानंतर सद्‌गुरूंचे वास्तव्य गुंज येथे होते. माघ शु.१८ शके, १८५० चा दिवस होता. त्या दिवशी प.पू.श्री चिंतामणी महाराज सद्गुरूंच्या  दर्शनाला आले. त्यांनी श्री प.प.स.योगानंद महाराजांचे दर्शन घेतले आणि धीरपणे प्रश्न विचारले की, मी सातवीची परीक्षा पास होईल का? मला वकील व्हायचे आहे! त्यावेळी सद्गुरुंनी क्षणभर स्मित केले व भस्माची चिमुट त्यांना देऊन सांगितले की, ‘हे जपून ठेव’ सद्गुरूंनी दिलेले भस्म क्षणाचाही विचार न करता त्यांनी खाऊन टाकले. सद्गुरूंनी त्यांना आपल्या कमंडलूतले तीर्थही दिले. तेही त्यांनी चटकन पिऊन टाकले. ओला हात सर्वांगाला पुसला. सद्गुरूंनी आपली दिव्य दृष्टी प.प.श्री चिंतामणी महाराजांवर फिरवली व ते म्हणाले की ‘जा तू देवाच्या दरबाराचा वकील होशील’ अशा प्रकारे श्रीमत् प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपला अध्यात्मवारसा परमपूज्य समर्थ सद्गुरु चिंतामणी महाराजांना जणु सोपवून दिला.

समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराज



॥श्री दत्तसंस्थानाची मुहूर्तमेढ॥

            पुढे सद्गुरु योगानंद महाराजांची प्रकृती अस्वस्थ झाली. गुजरातमध्ये ही वार्ता पसरली. सद्गुरूंचे पुर्वाश्रमातील कनिष्ठ बंधू श्री रघुजीभाई, श्री प्रभाशंकर ब्रह्मचारी, प.पू.श्री रंगवधूत महाराज सद्गुरूंच्या सेवेसाठी गुंजेस आले. एक दिवस सद्गुरूंनी भक्तांना बोलावले व सर्वांना आपले मनोगत सांगितले की दत्त संप्रदायाचे कार्य, धर्मजागृती व अन्नदान या गोष्टी गुंज येथे अव्याहतपणे चालू राहाव्यात. या दृष्टिने येथे दत्त मंदिर बांधून संस्थानच्या दृष्टिने आखणी व्हावी. दत्त प्रभुंची कृपा व गुरुदेवांचे आशीर्वाद पाठीशी राहतीलच. कोणतीही शंका मनात आणू नये. एकदा कामाला लागलात म्हणजे कशाचीही कमतरता पडणार नाही. देवांचे नित्यपूजन, करूणात्रिपदी, पालखी, शंकराची अव्याहतपणे बिल्वपत्रांनी पूजा व अभिेषेक यात खंड पडू देऊ नये. पंच नेमून कमिटीद्वारा सर्व हिशेब व्यवस्थित ठेवावा. होणारी मालमत्ता संस्थानच्या नावावर करावी. एवढे सांगून सद्गुरूंनी संन्यासाश्रमात अंत्यविधी कसा करावा लागतो याची कल्पना भक्तांना दिली.


॥ब्रह्मलीन॥

            पुढे सद्गुरूंच्या अंगावरची सूज खूप वाढली. शरीराला पडून राहणेही कष्टदायक वाटू लागले. प.पू.श्री रंगावधूत महाराजांनी एका पोत्यात साळीचा भुसा भरून मऊ मऊ गादीसारखा बिछाना तयार केला ते रात्रंदिवस सद्गुरूंच्या सेवेत राहू लागले. पण त्यांचा भाऊ मुंबई येथे आजारी असल्याचा दृष्टांत झाल्याने प.पू. श्री.रंगावधूत महाराज मुंबईकडे रवाना झाले.


            अवतार त्यागाचा समय आलेला जाणून श्री प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांनी शके १८५० च्या फाल्गुन वद्य द्वादशीस पहाटे ४ वाजता पद्मासन घालून बैठक स्थित केली. प्राणायाम केला. ध्यान लावले. गुरुदेवांचे दर्शन घडल्यानंतर श्रीदत्तप्रभू दिसू लागले आणि त्यांची प्रणवउच्चार करून भौतिक देहास सोडून ते स्वस्वरूपात विलीन झाले.


            तलंगपुरच्या नीळकंठेश्वराच्या सान्निध्यात उमललेले हे जीवन, श्री प.प.स.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या सहवासात बहरले, धर्मजागृतीच्या कार्यासाठी सिद्ध झाले आणि मनामनात धर्मजागृतीचे व दत्तभक्तीचे स्फुल्लिंग चेतवून गुंज येथील श्री सिद्धेश्वराच्या सान्निध्यात गोदामातेच्या कुशीत स्वस्वरूपात विलीन झाले.


मुखी दत्तनामस्मरण।

चित्ती असावे हेचि ध्यान।

अंती पावावे निर्वाण।

सच्चिद्घन नमू भावे॥


प.प.श्री.रंगावधूत महाराजाच्या वरील शब्दाद्वारे श्री प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांनीही आपल्या हातुन दत्तप्रभुंची श्रीस्वामी महाराजांची सेवा करुन घ्यावी. श्रीमहाराजांच्या ९४ व्या पुण्यतिथी निमित्ताने प.प.श्रीमद योगानंद सरस्वती स्वामी महाराज तथा आपले सर्वांचे परमप्रिय गांडा महाराजांच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌸🌺


            ।। श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ।।

( छायाचित्र :- १..गांडाबुवांचे २.. गांडा महाराजांनी स्थापित केलेले भगवान श्री दत्तात्रेय प्रभु ३... गांडा महाराजांचे उत्तराधिकारी परमशिष्य सद्गुरु श्री चिंतामणी महाराज)

Monday, March 28, 2022

सद्गुरु श्री बिडकर महाराज पुण्यतिथी🌸🙏🌺🚩

 

🌺🌸|| सद्गुरु श्रीरामानंद बिडकर महाराज  ||🌸🌺


फाल्गुन कृ. दशमी - ११० वी पुण्यतिथी*


फाल्गुन वद्य दशमी परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परंपरेतील , प्रभावळीतील अतिशय थोर सत्पुरुष, प्रत्यक्ष श्रीस्वामीरायांचे शिष्य प्रात:स्मरणीय , नित्य वंदनीय सद्गुरु श्री रामानंद बिडकर महाराज यांची ११० वी पुण्यतिथी .


श्री बिडकर महाराजांचा जिवन प्रवास,चरित्र अतिशय आश्चर्यकारक, एकमेवाद्वितीय असेच आहे.व्यक्तिश: मला महाराजांचे चरित्र अतिशय जवळचे आहे कारण मी वाचलेले सर्वात पहिले असे हे संत चरित्र.एक गृहस्थ, व्यापारी ते एक आत्मसाक्षात्कारी संत असा अद्वितीय प्रवास वाचल्यावर मती , बुद्धी स्तब्ध झाल्याशिवाय रहात नाही.इतका अफाट ,अचाट प्रवास फारच कमी ठिकाणी वाचायला मिळतो. खरंतर ही सर्व संत मंडळी अवतारीच आहे यात शंका नाही तरीही यांचा जिवन प्रवास,यांनी केलेल्या लिला या लोकविलक्षण आहेत.कै.लक्ष्मण बापट लिखीत श्री सद्गुरु बिडकर महाराजांचे चरित्र इतके विलक्षण आहे की कितीही नैराश्याने ग्रासलेल्या मानसाने याचे वाचन ,मनन,चिंतन केले तर त्याचे विचारपरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.लेखकाने असे प्रस्तावनेत नमूद ही केले आहे.फक्त श्रद्धा पुर्वक आणि प्रत्येक प्रसंगाचे चिंतन घडणे गरजेचे आहे.हा काही चमत्कार नव्हे असे मला तरी असे वाटते की महाराजांनी प्रत्यक्ष जिवन चरित्रातून प्रत्येकाला दाखवून दिले‌ आहे की, "नर करनी करेगा तो नर का नारायण हो जाएगा." हाच विचार श्रीमहाराजांच्या चरित्रातुन प्रत्येकाच्या अंतर्मनावर बिंबविल्या जातो आणि त्यातून वाचकाला सकारात्मकता मिळते आणि विचारपरिवर्तन , मतपरिवर्तन घडते.अर्थातच हा माझा व्यक्तिगत विचार झाला.

            

पार्थ गोत्री देशस्थ ब्राह्मण कुळात माघ कृष्ण अष्टमी तिथीला महाराजांचा जन्म झाला.त्यांच्या घराण्याकडे पुर्वा पार जहागिर होती,अत्यंत सुखवस्तु सरदार घराण्यात त्यांचा जन्म झाला.एका कार्याप्रसंगी कुळातील संरक्षक नागाची अजाणतेपणी हत्या झाली व त्या नागाने ७ पिढ्यात या कुळाचा नाश होईल असा शाप दिला होता.श्रीमहाराज हे सातव्या पिढीतील शेवटचे व्यक्ती.त्यांचे पूर्वज अकबर बादशहाच्या दरबारात दिवाण होते.बळवंतराव यांना प्रथम पत्नीपासून अपत्यप्राप्ती न झाल्याने त्यांचे दुसरे लग्न बार्शी तालुक्यातील व्यंकटराव कुलकर्णी यांची कन्या गंगूबाई हिच्याशी करण्यात आले. गंगूबाईंना दोन मुले व चार मुली झाल्या. यांपैकी ‘शेंडेफळ’ म्हणजे रामानंद. महाराज लहानपणापासून धार्मिक वृत्तीचे होते.मारोतीराय हे त्यांचे आराध्य दैवत.


पुण्यातून पंढरीकडे जाणार्‍या वारकर्‍यांच्या पालखी सोहळ्यात ते आपल्या मित्रांना जमवून भाग घेत. असेच एकदा ते थेट पंढरपूरलाच गेले. त्यांना विठ्ठलाचे साक्षात्कारी दर्शन झाले. असेच एकदा महाराज सप्तश्रृंगी देवी च्या दर्शनास्तव वणी ला गेले तेव्हा भगवतीने त्यांना दर्शन, तांबुल प्रसाद देऊन कृपा करुणेचा अनुभव दिला.सरदार घराणे ,घरची गर्भश्रीमंती यामुळे महाराजांचे बालपण अतीशय चैनीत ,सुखात व्यतित झाले.वडिलांचे निधन व मोठे बंधू घर सोडून गेल्याने रामानंदावर सर्व संसाराची जबाबदारी पडली. नगर जिल्ह्यातील देवीचे केडगावच्या रंगूबाई हिच्याशी रामानंदांचे लग्न झाले.सुखचैनीचे आयुष्य,सततचा दानधर्म आणि नातेवाईकांना आर्थिक मदत या सर्वांमुळे घरातील संपतीला आहोटी लागली व ती संपत आली.यामुळे महाराजांवर आर्थिक संकट उभे ठाकले.ही अडचण दूर करण्यासाठी महाराजांनी सुगंधी वस्तुंचा व्यापार सुरु केला.या व्यापारातुन महाराजांचा ग्वाल्हेर, जयपूर, बडोदा, सातारा अशा राजघराण्यांशी व्यापारी संबंध आला व या व्यापारातून त्यांनी खूप पैसा,सुबत्ता मिळविली.पण महाराजांच्या विलासी ,सुख ,चैनीच्या वृत्तीमुळे त्यांनी तो सर्व पैसा उडवला.पुढे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी रत्नांचा व्यापार सुरु केला.रत्नांची उत्तम पारख असल्यामुळे महाराजांनी रत्नांचा व्यापार यशस्वी करुन दाखवला.यातुन पुष्कळ धनप्राप्ती झाली.पुन्हा पूर्वस्थिती प्राप्त झाली.एका साधूकडून त्यांनी किमयेची विद्याही मिळविली.एवढेच काय तर महाराजांनी एक स्त्री ही उपभोगायला ठेवली होती आणि "मी तुला आजिवन सांभाळेल" अशी शपथ दिली.महाराज शपथभंगेला घाबरत असत.पुढे कर्मधर्म संयोगाने त्या बाईला डोक्यात मार लागुन ती गतप्राण झाली.सर्व प्रकारचे सुख,चैन , ऐश्वर्यांचे उपभोग घेतल्यावर महाराजांच्या मनात वैराग्य ओढ घेऊ लागले.विषयभोग संपले की दु:ख!! अविनाशी सुख कसे मिळणार?? हाच प्रश्न सतत त्यांच्या डोक्यात घोळू लागला.प्राप्त काळ येईपर्यंत त्यांच्या मनात तळमळ सुरु होती.आपली इष्ट देवता मारुतीरायाची कठोर उपासना केल्यानंतर मारुतीच्या दृष्टान्तानुसार त्यांना अक्कलकोटला जाण्याचा संकेत मिळाला.महाराज भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या भेटीस्तव गेले.तेथे अप्पासाहेब शेरखाने यांच्या घरी ते उतरले.श्रीस्वामी महाराज राजवाड्यात होते.दर्शन घडल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही असा महाराजांनी पण केला.दोन दिवस महाराज उपोषीत होते.शेवटी स्वामी महाराज राजवाड्याच्या भिंतीवरुन उडी मारुन बाहेर आले.महाराजांनी स्वामींची पुजा केली व स्वामींचे पाय धरले.स्वामी म्हणाले , "अभी ह्यासे चले जाव,तुम्हारा काम हो गया है." असा हुकूम होताच महाराज पुण्यास परतले.पहिल्या भेटीतच महाराजांची वृत्ती बदलली. "श्रीसद्गुरुनाथ माउली" हे शब्द सारखे मुखातून बाहेर पडु लागले.एक वर्ष सद्गुरु भजनात व्यतित झाल्यावर महाराज दुसर्या वर्षी माघ.शु.पौर्णिमेस पुन्हा अक्कलकोटला ला गेले, "आंबेका पाड लगा है पुरा होयगा तो काम हो जाएगा" असे स्वामी म्हणाले.तिसरे वर्षी महाराज अक्कलकोटला गेले व स्वामी अनुग्रह ,उपदेश होई पर्यंत परत न फिरण्याचा निश्चय त्यांनी केला. 


*रात्री पादसंवाहन करीत असता दोन मोठे नाग महाराजांच्या गुढघ्यातून निघून फुत्कार करु लागले.पण ते न घाबरता सेवा करु लागले.तेव्हा स्वामी उठून रागाने "तू बडा राक्षस जिंद है" असे म्हणाले व त्यांना श्रींनी एक थप्पड दिली.तत्क्षणी महाराजांना समाधी लागली.पूर्ण एक दिवस महाराज त्याच अवस्थेत होते.शुद्धीवर आले त्यावेळी त्यांचा आनंद अवर्णनीय होता.*


प्रात:काळी आनंदी मुद्रेने ते स्वामींच्या दर्शनासाठी गेले असता स्वामी म्हणाले ,"अबी क्या तेरे बाबाका देना लेना है" "सेवा बनाव एक सहस्त्र भोजन घाल" अशी आज्ञा मिळाली.सहस्रभोजन आटोपल्यावर  "दक्षिणा दे किमया करुन पैसा मिळविणे बंद कर." ही आज्ञा देताच महाराजांनी दक्षिणा दिली. त्यानंतर स्वामीरायांनी "नर्मदा परिक्रमा करत आणि पुन्हा अक्कलकोटला दर्शनाला येऊ नको."  श्रीगुरु आज्ञेने महाराजांनी नर्मदा परिक्रमा केली.या परिक्रमेत महाराजांना अनंत दिव्य अनुभव आले.प्रत्यक्ष नर्मदा मैयाचे दर्शन महाराजांना घडले,श्री स्वामी महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांना दर्शन देऊन "हम गया नही जिंदा है" असे आश्वासन दिले.या सर्वांमुळे महाराजांमध्ये अंतर्बाह्य बदल झाला.

                       

नर्मदा परिक्रमेहून पुण्यात आल्यानंतर त्यांनी पत्नीला घेऊन काशी, प्रयाग, गया अशी त्रिस्थळी यात्रा केली. त्यानंतर पुण्यात येऊन पुनश्च औदुंबर, नृसिंहवाडी, कोल्हापूर, ज्योतिबा, पंढरपूर, आळंदी, देहू, चिंचवड अशी प्रदीर्घ तीर्थयात्रा केली.प्रत्येक ठिकाणी त्या-त्या देवदेवतांचा त्यांना साक्षात्कार प्राप्त झाला.सिद्धावस्थेला पोहोचल्यावर सुमारे २५ वर्षे पुण्यात रामानंद महाराजांचे वास्तव्य होते; पण ते कटाक्षाने प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यांच्या उपदेशात गुरुनिष्ठेवर विशेष भर असे. निष्ठेमुळेच गुरुकृपेचा लाभ होतो व त्या योगे ज्ञान मिळते, धैर्य निर्माण होते आणि स्वार्थ-परमार्थ दोन्ही क्षेत्रांत हात घालाल तेथे फत्तेच होते. फत्ते झाली की पुन्हा दुप्पट वेगाने गुरुनिष्ठा वाढते, असे ते सदैव सांगत.तसेच महाराजांचा पुरुषार्थावर विशेष भर होता, त्यांची शिकवणचं होती की प्रपंच असो वा परमार्थ "नर करती करेगा तो नर का नारायण बन जाएगा." महाराज आपल्याकडे आलेल्या भक्तांना ध्यानाचे ही महत्व विशेष प्रतिपादन करायचे.रोज निदान पाच-दहा मिनिटे तरी ध्यान करावं कारण जमिनीवर पडलेले शेन उचलल्यावर ते थोडीतरी माती घेऊनच वर येतं त्याचप्रमाणे थोडसं केलेल्या ध्यानाने अंतरंगात जरुरच बदल हा घडतच असतो यात शंका नाही असे महाराजांचे सांगणे होते. त्यांचा शिष्य परिवार मोठा होता. श्री रावसाहेब तथा बाबा सहस्रबुद्धे आणि दिगंबर महाराज हे त्यांचे अग्रणी शिष्य होते. त्याशिवाय वासुअण्णा भागवत, अण्णासाहेब गुप्ते, मुकुंदराव मोघे, श्रीधरपंत लिमये, लक्ष्मणराव बापट हेही रामानंदांच्या अधिकारी शिष्यवर्गातील प्रमुख शिष्य होते.


*पत्नी जानकीबाई (रंगूबाई) यांचे १९११ मध्ये निधन झाले आणि त्यानंतर त्यांची विरक्ती अधिकच वाढली. ‘आता आपले काही खरे नाही, आता आमचाही काही नेम नाही,’ अशी निर्वाणीची भाषा ते शिष्यांशी बोलताना वारंवार वापरू लागले.  पत्नीच्या निधनानंतर कशीबशी दोनच वर्षे गेल्यावर अखेर फाल्गुन वद्य दशमीला, शके १८३४ मध्ये दोन प्रहरी रामानंद महाराज निजानंदी लीन झाले.*

 

पुण्याच्या शनिवार पेठेतील त्यांचे निवासस्थान हाच त्यांचा मठ आहे.अशा या लोक विलक्षण महापुरुषाची आज पुण्यतिथी.प्रत्येकाने एकदा तरी त्यांच्या चरित्राचे वाचन,मनन,चिंतन करायलाच हवे.प्रत्येकाला त्या महासागरातून काहीतरी रत्न हाती  मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. आज पुण्यतिथी निमित्त महाराजांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌸 


 ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

#श्रीस्वामीसमर्थजयजयस्वामीसमर्थ 🙏🌸🌺

Wednesday, March 23, 2022

नाथषष्ठी संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा ४२३ वा समाधी दिन🌸🙏🌺🚩

 


शरणं_शरणं_एकनाथा_पायी_माथा_ठेविला🙏🌸🌺
              आज नाथषष्ठी आम्हाला नित्य वंदनीय,प्रात: स्मरणीय असलेले शांतिब्रह्म आणि समस्त वारकरी संप्रदायाचे नाथ बाबा तथा सद्गुरु श्री एकनाथ महाराज यांचा ४२३ वा समाधी दिन.समस्त वारकरी संप्रदायातील मुख्य उत्सवापैकी एक असा हा नाथषष्ठीचा उत्सव.भूवैकुंठ पंढरीच्या आषाढी वारी नंतर माउलींची आळंदीतील कार्तिक वारी ,तुकोबांची बिजेची वारी व नाथांची पैठणची षष्ठीची वारी या उत्सवाला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. शांतिब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरित्रात या तिथीला विशेष महत्व आहे त्याचे कारण ही तेवढेच विलक्षण आहे.एकनाथ महाराजांचे सद्गुरु प.पू.श्रीजनार्दन स्वामी महाराज यांची ही जन्मतिथी तसेच त्यांना दत्तप्रभुंचा अनुग्रह ही याच दिवशी झाला.सद्गुरु श्री जनार्दन स्वामींनी देह ही याच दिवशी ठेवला होता.शिवाय जनार्दन स्वामींची आणि एकनाथ महाराजांची भेट आणि स्वामींचा एकोबांना अनुग्रह ही याच तिथीला झाला.या सर्व पावन घटना याच तिथीला झाल्यामुळे नाथांनी इ.स.१५९९ साली आपले अवतार कार्य पूर्ण करुन गंगा गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली. नाथांच्या चरित्रातील या सर्व पावन घटना या एकाच तिथीला घडल्यामुळे या तिथीला "पंचपर्वा षष्ठी" असे म्हटले जाते.असा हा योग फक्त आणि फक्त नाथांच्याच चरित्रात बघायला मिळतो.इतरत्र कधीही व कुठेही असे घडलेले नाही.
                          समर्थ सद्गुरु श्रीभानुदास महाराज यांच्या कुळात जन्माला आलेले एकोबा आपल्या पणजोबांच्या किर्तीला पुन्हा नव्याने सुवर्ण झळाळी देतात असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.एकनाथ हे नाव जरी कानावर पडले तरी श्रीनाथांचे दिव्य चरित्र आपल्या मन:चक्षुपुढे उभे राहते.नाथबाबांचा जन्म , गुरु प्राप्तीसाठी केलेला गृहत्याग , देवगिरी किल्ल्यावर आपले सद्गुरु श्री जनार्दन स्वामींची भेट, जनार्दन स्वामींनी घेतलेले परिक्षा, नाथांनी स्वामी महाराजांची केलेली एकमेवाद्वितीय अशी कठोर सेवा, नाथांनी शुलभंजन पर्वतावर केलेले तप,तिथेच स्वामी महाराजांसमवेत घडलेले दत्त दर्शन, जनार्दन स्वामी महाराज यांनी दिलेली कृष्ण उपासना, नाथांची तप:पूर्ती नंतर पुन्हा पैठणला परतने,पैठणला आले की गृहस्थाश्रमात प्रवेश व सरस्वती बाईंचे नाथांच्या जिवनात आगमन, नाथांचा दिव्य संसार , नाथांनी शुद्रांना पितृजेवनाच्या पंगतीत ब्राह्मानाआधी दिलेले जेवन, काशीहून आणलेली गंगा गाढवाला पाजणे , एका वेश्येच्या घरी जाऊन केलेले अन्नग्रहण , गंगेवर स्नानास गेलेल्यावर एका यवनाचे नाथांवर थुंकणे व नाथांनी १०० वेळा गंगा स्नान करणे, नाथांची विविध आणि अद्वितीय अशी रचना, भगवान श्री कृष्णचंद्र प्रभुंचे श्रीखंड्याच्या रुपात पैठणला नाथांच्या वाड्यात १२ वर्ष वास्तव्य करणे,बारा वर्ष परब्रह्म परमात्मा प्रभुकृष्णाचे नाथांच्या घरी राबने , विजयी पांडुरंगाचे नाथांकडे आगमन , नाथांचे एकनाथी भागवताच्या दशम स्कंदावर टिका लिहीने व त्यामुळे त्यांना काशीला धर्मसभेपुढे बोलावने ,धर्मसभेने काशीस नाथांची आणि एकनाथी भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढने ,त्यानंतर नाथांचे सर्वसामान्य जनतेला ज्ञान कळावे म्हणून भारुडाची रचना करणे, दत्तप्रभुंचे नाथांच्या वाड्यात बाहेर पहारा देणे व नाथषष्ठीला नाथमहाराजांचे गंगा गोदावरी मातेच्या पात्रात किर्तन सुरु असतांनाच जलाशयात जल समाधी घेणे असे एक नाहीत तर अनंत लिलांनी भारलेले नाथ महाराजांचे दिव्य लिला चरित्र आहे.या प्रत्येक लिलांचे ,चरित्रातील घटनेचे वर्णन करण्याचे ठरविले तर त्यावर एक एक विस्तृत असा लेख तयार होईल.नाथांचे चरित्र इतके विलक्षण विशाल आणि अनंत भगवद लिलांनी भरलेले आहे,इतक्या विविध पैलूंनी नटलेले आहेत की त्याचे सर्व बाजुंनी चिंतन मांडले तर प्रत्येक घटनेवर एक एक प्रबंद तयार होईल.संतचुडामनी संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या चरित्रात नवविधा भक्तीचे सर्व सारंच आपल्याला बघावयास मिळते.श्रीएकनाथ महाराजांच्या चरित्रातील मेरुमणी म्हणजे भगवान करुणाब्रह्म श्री ज्ञानेश्वर माउलींचा नाथांना झालेला दृष्टांत आणि त्यांच्याद्वारे माउलींनी नाथाकरवी केलेले ज्ञानेश्वरी  शुद्धीकरणाचे अतिशय महत्वाचे कार्य.ज्ञानेश्वरीच्या मुळ संहितेत कालौघात घुसलेले व घुसवलेले अपपाठ शोधून काढुन त्यांनीच प्रथम प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत तयार केली.नाथांनी आपल्या सर्वांवर केलेले हे उपकारच आहेत.या ऋणातून आपण केव्हाही उतराई होऊच शकत नाही.म्हणुनच "ज्ञानियांचा एका ,नामयाचा तुका" अशी म्हणं वारकरी संप्रदायात प्रसिद्ध आहे. तसेच एकनाथ महाराजांना माउलींना आपल्या स्वनामाचा "ज्ञानदेव" या नामाचा अनुग्रह दिला.माउलींनी आपल्या स्वनामाचा अनुग्रह फक्त तिनचं संतांना दिला आहे त्यातील एक म्हणजे नाथ महाराज.दत्तप्रभुंची राजधानी म्हणजे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील घाट हा नाथ महाराजांनीच बांधला आहे. भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, एकनाथी भागवत ,चिरंजीव पद इत्यादी सर्व ग्रंथ मिळून एकूण लाखभर ओव्या व चार हजार पेक्षा जास्त अभंग ,भारुडे,आरत्या असे प्रचंड वाङ्मय त्यांनी सहज लीलेने निर्माण केले आहे.नाथ महाराजांनी रचलेली "त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्त हा जाणा" ही दत्तप्रभुंची आरती आज सर्वश्रुत आहे ,आज ती आरती सर्वत्र भक्तीभावाने म्हटली जाते. नाथांच्या स्वरुपात प्रत्यक्ष शांतीच सगुणरुप घेऊन अवतरली होती असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.नाथांचे चरित्र अतिशय दिव्य प्रत्येकाला नित्य वंदनीय, नित्य स्मरणिय, नित्य मार्गदर्शक आणि नित्य अनुकरणीय असेच आहे.प्रत्येकाने जिवनात एकदा तरी एकनाथ महाराजांचे चरित्र एकदा तरी वाचायलाच हवे असं माझं स्पष्ट मत आहे.व्यक्तिश: आजवर झालेले सर्व संत मंडळी माझ्यासाठी परम वंदनीयच आहेतच पण कुठेतरी नाथबाबा,चोखोबा आणि संत कान्होपात्रा या तिन्ही संतांनी हृदयात वेगळे घरचं केले आहे.त्याला कारण ही मला तसेच वाटते.हे तिन्ही संत समाजाचे तिन टोकं आहेत.समाजव्यवस्थेतील तिन भाग आहेत.भगवंतांना फक्त आणि फक्त शुद्ध प्रेम आणि विशुद्ध भक्ती अभिप्रेत आहे.या तिन्ही संतांनी आपल्या सद्गुरुंवर ,भगवंतांवर फक्त शुद्ध भक्ती आणि प्रेम केले.त्याच भावाने त्यांनी भगवंतांना आपलेसे केले.मग नाथाघरी भगवान श्रीखंड्या रुपाने राबले, चोखोबांच्या घरी सुईन झाले,चोखोबांची गुरे ओढली, कान्होपात्रांना तर प्रत्यक्ष आपल्या चरणी विसावा दिला. भगवंतांच्या प्राप्ती साठी जात,धर्म,पंथ,लिंग या कसल्याही गोष्टींची बाधा होत नाही हेच जणू त्यांनी सर्व जगाला दाखवून दिले.एकनाथ महाराजांचे रविंद्र भटांनी लिहिलेले "एका जनार्दनी" ,लिला गोळे यांनी लिहीलेले "शांतिब्रह्म" ,पांगारकरांनी संपादित केलेले "श्रीएकनाथ महाराज चरित्र" यातले कुठलेही एक चरित्र जरुर वाचाचं. एकनाथ महाराज नुसते संत नाहीत तर ती साकार रुपात असलेली करुणा,शांती होती.त्यांचा समाजातील तळागाळातील लोकांसाठी असलेला कळवळा बघितला तर लक्षात येतं की हे खरे ब्रह्म ,हेच खरे संत. संतत्वाची दासबोधात समर्थांनी केलेली परिभाषा म्हणजे एकनाथ महाराज.आजच्या या परम पावन नाथषष्ठी च्या दिनी नाथांचे स्मरण करुयात.नाथांच्या चरणी ही शब्दसुमनांजली ,त्यांनीच करुन घेतलेली ही शब्द सेवा त्यांच्याच चरणी अर्पन करतो. 
        ✒️✍️ अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

Tuesday, March 22, 2022

दाणोलीचे योगी समर्थ सद्गुरु श्रीसाटम महाराज 🙏🌸🌺🚩


 दाणोलीचे_योगीराज🙏🌸🌺

                             भारतात आजवर झालेल्या सर्व संत मांदियाळीतील एक अतिशय विलक्षण आणि अलौकिक असे संत रत्न. भगवान श्री परशुरामांच्या परमपावन अशा कोकण भूमीतील संतमंडळीचे चुडामणी असलेल्या थोर महापुरुष सद्गुरु श्री साटम महाराज यांची ८५ वी पुण्यतिथी.श्रीसद्गुरु साटम महाराज यांचे अलौकिक जिवन चरित्र बघितले की बुद्धी स्तिमित होते.विलक्षण दिव्य आणि अचाट लिलांनी भारलेले असे हे चरित्र आहे.श्रीमहाराजांचा जिवनक्रम इतका दिव्य आणि अनाकलनीय आहे की कुणालाही आश्चर्य झाल्याशिवाय राहणार नाही.शब्द मर्यादा असल्याने याच दिव्य चरित्राचे संक्षिप्त स्वरुप बघणार आहोत पण श्री.र.ग.वायंगणकर लिखीत चरित्र ग्रंथ आपण जरुर वाचाचं कारण आजवर इतका विलक्षण आणि अचाट जिवन प्रवास मी तरी फारच कमी ठिकाणी वाचलाय. एक रस्ता चुकलेला तरुण ,गुंड ,दादा झालेला तरुण पुढे सद्गुरुंच्या परिस स्पर्शाने स्वत: सद्गुरु स्वरुप होतो हा जिवन प्रवास केवळ थक्क करणारा आहे.

                          सद्गुरु श्री साटम महाराजांचा जन्म थोर शिवभक्त असलेल्या माता लक्ष्मीबाई व पिता नारायण पंत या दाम्पत्यापोटी मालवण तालुक्यातील कोहीळ या गावी झाला.एका धार्मिक मराठा कुटुंबात महाराजांचा जन्म झाला.लहानग्या बाळाचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. यथावकाश कामा करिता नारायण पंत सर्व परिवारासोबत मुंबई ला आले.मुंबई ला कामाठीपुरा येथे तेराव्या गल्लीत ते रहात होते.वय वाढत असतांना बालवयात शंकर हा चुकीच्या संगतीत सापडला.आधीच ज्या ठिकाणी साटम परिवार रहात असे तो परिसर ,ती लोकवस्ती ही ठिक नव्हती व अशातच त्याला मिळालेली चुकीची संगत यामुळे शंकर अधिकच बिघडला.शंकर ने शिक्षण अर्धवट सोडले,दारुडे, जुगारी,सट्टेबाज यांच्या जाळ्यात तो अडकला. शंकरच्या या अवस्थेमुळे त्याच्या माता पित्याला अतोनात दु:ख झाले होते.त्यांनी शंकर सुधरावा म्हणून अनेक उपाय ,गंडे,दोरे केले पण कशाचा तुसभर ही फरक त्याच्यावर झाला नाही.शेवटचा एक उपाय म्हणून त्यांनी त्याचे लग्न करुन दिले.सावंतवाडीची जनाबाई ही शंकर ची धर्मपत्नी झाली पण त्यानंतरही शंकर सुधारला नाही.एकदा गुंडासोबत झालेल्या हाणामारीत शंकर ने मोठा हैदोस घातला व‌ त्यामुळे त्याची मोठी दहशत लोकांमध्ये पसरली.आता शंकर ला सर्व गुंड, तेथील वस्तीतील लोक हे बडे दादा म्हणू लागले.पुढे एका पारशी व्यक्तीची शंकरवर मर्जी बसली‌ त्याने त्याच्या  दारुच्या दुकानात शंकरला नोकरी दिली.शंकर दादा असुनही स्त्रीयांचा फार आदर‌ करायचा ,कुणीही दारुड्याची शंकरपुढे स्त्रीयांना छेडायची ,तंटे करायची हिम्मत होत नसे.म्हणूनही पारशी पेस्तनजीचे शंकरवर प्रेम जडले.तो शंकर ला मटन-पुरीचे रोज जेवन ही देऊ लागला.पण यामुळे शंकर ला जातीबाहेर काढले‌ गेले.अर्थातच शंकरला त्यामुळे काडीचाही फरक पडला नाही.पण घरच्यांनाही शंकर‌ला घराबाहेर काढावे लागले.नाईलाज म्हणून एका ताटात दूरुनच त्याला जेवण दिले‌ जायचे.या सर्व प्रकारामुळे शंकर‌च्या आई वडिलांना अपार दुःख झाले व‌ त्यांनी अंथरुण धरले.त्यातच त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.शंकर‌ला हा आघात सहन झाला नाही.या सर्व दु:खामुळे तो अंतर्मुख झाला.आता तो तासंतास एकटाच बसुन राहत असे.अखंड विचारात निमग्न असे.पण यातही त्याने नोकरी सोडली‌ नव्हती.पेस्तिनजीला शंकर च्या या वागण्यामुळे आता त्याची चिंता वाटू लागली.अशातच सासु सासर्यांच्या निधनानंतर शंकरची पत्नीही माहेरी निघून गेली.बघता बघता एकोणीसशे दहा साल उजाडले.मुंबईत प्लेगची साथ पसरली.यात शंकरची वहिनी व त्यानंतर मोठा भाऊ दादाचेही निधन झाले.जणु नियतीने शंकरचे सर्व पाश तोडले व त्याला नि:संग केले होते.पण आता कुठे शंकरच्या नव्या जिवन प्रवासाला सुरुवात झाली होती,आता कुठे लवकरच शंकरच्या जिवनात गुरुकृपेची पहाट होणार होती.

                       या सर्व अनपेक्षितपणे घडलेल्या दु:खा मुळे शंकर अधिकच अंतर्मुख आणि चिंतनशील बनला.आपल्या या जिवनाचे खरे उद्दिष्ट काय ?‌ याचा अखंड विचार करु लागला.सध्या जे चर्चगेट आहे तेथील पारशांच्या पवित्र विहीरीजवळ एक दिवस शंकर पेस्तनजीबरोबर गेला.तिथे त्यावेळी अनेक बैरागी,अवलिया असायचे.आता शंकर गुत्यावर न जाता या बैराग्यांमध्ये जाऊ लागला ,त्यांच्यातच त्याचे मन रमू लागले.एक दिवस शंकर असाच बैराग्यामध्ये बसलेला असता त्याची नजर एका अवलियावर पडली.त्या अवलिया ने शंकरवर मोहिनीच घातली जणु.शंकर आता सारखा त्यांच्या पुढे मागेच राहत असे.शंकरची ही अंतर्मुख अवस्था बघुन ते अवलिया शंकरला म्हणाले, "बेटा तू वेडा नाहीस!मला तुझ्यावर कृपा करण्याची आज्ञा मिळाली आहे.मी जे चराचरात तेजाचे दर्शन घेतो आता तु ही ते दर्शन घे!" इतके बोलून त्यांनी शंकरच्या मस्तकावर आपला कृपा हस्त ठेवला‌ व त्याला कृतार्थ केले.या एका दिव्य स्पर्शाने शंकराला निर्विकल्प समाधी लागली.या समाधीत काही काळ शंकर होता व ज्यावेळी या समाधीचे उत्थान झाले त्यावेळी तिथे शंकर दादा नव्हता तर आता ते सद्गुरु समर्थ साटम महाराज बनले होते.! हे अवलिया सद्गुरु होते थोर नाथपंथी महापुरुष श्री सद्गुरु अब्दुल रहमान बाबा‌.यांच्यावर परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा कृपा अनुग्रह होता असे मानले जाते. सद्गुरुंनी एका दृष्टीक्षेपात ,स्पर्शात माउली म्हणतात तसे "या हृदयीचे त्या हृदयी"  घातले.आता साटम महाराज हे स्वतःच सद्गुरु स्वरुप झाले होते.सद्गुरु आज्ञेने साटम महाराज आता तपाकरीता मार्गस्थ झाले.त्यांनी कोकणातील सावंतवाडी-बेळगाव मार्गावरील भव्य गुढ असा अंबोली हा घाट तपासाठी निवडला.तिथल्या हिरण्यकेशी जवळील वाघाच्या गुंफेत ते निर्धास्तपणे कठोर तप करु लागले.तपश्चर्येचा काळ संपवून समर्थ साटम महाराज एका गाडीवाना बरोबर प्रथमच सावंतवाडी येथे आले.( या गाडीवानाचा प्रसंग बराच मोठा आहे तो शब्द विस्तारामुळे इथे टाळतो आहे. )

डोक्यावर जटाभार ,दाढी वाढलेली,अंगावर कांबळे ,कधी नग्न तर कधी लंगोट अशा वेशात ते गावभर फिरायचे.त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होते.पण वेड्यासारखा वर्तन करणारा एक मनुष्य म्हणून सावंतवाडीत कुणाचेही समर्थांकडे लक्ष गेले नाही.लहान मुलांसाठी तर ते टिंगल टवाळीचा विषय झाले.कुणालाही समर्थांचे आकर्षन वाटले नाही पण पुढे एक विशेष घटना घडली ज्यामुळे समर्थांकडे लोकांचे लक्ष वेधल्या गेले.समर्थ साटम महाराज हे तपामुळे देहातीत अवस्थेत वावरत असत.देहधर्माच्या कुठल्याही गोष्टींकडे त्यांचे लक्षच नसे.समर्थ अंबोली घाटात हिरण्यकेशी जवळ तप करतांना एका वाघाने त्यांच्या उजव्या खांद्याला पंजा मारला व तेथील मांस तोडले.पुढे ही जखम वाढत गेली व त्यात कृमी देखील झाल्या.एक दिवस वाडीच्या वाण्याच्या दुकानात समर्थ गेले व म्हणाले , "अरे मला थोडा गुळ दे ! माझी पोरे दोन दिवसांची उपाशी आहेत!" वेड्याची कटकट नको म्हणून त्या वाण्याने लागलीच त्यांना गुळ दिलाही.समर्थांनी तो हाताने चुरगाळला व त्या जखमेत भरला.त्या जखमेत गुळ भरल्यावर त्यातील कृमी ते खाण्यासाठी वळवळू लागल्या.त्यातील काही कृमी घसरत जमीनीवर पडल्या.समर्थांनी अलगद त्यांना उचलून पुन्हा त्या जखमेत सोडले व म्हणाले, "बेट्यांनो आपले घर सोडून कुठे चाललाय?" ही घटना बघुन तो वाणी अचंबित झाला.हा कुणी सामान्य वेडा नाही याची त्याला जाणिव झाली.पुढे समर्थ रोज त्या दुकानातून गुळ घेऊ लागले व त्या जखमेत भरु लागले.काही दिवसांनी ती जखम पूर्ण बरी ही झाली.यामुळे मात्र तो दुकानदार समर्थांचा भक्त बनला व सावंतवाडीच्या लोकांचेही लक्ष समर्थांकडे वेधले गेले.एवढ्यातच समर्थांनी सावंतवाडी सोडली व दानोलीस प्रयाण केले.त्या ठिकाणी कुणीही समर्थांना ओळखत नव्हते.

                          समर्थांच्या छोट्या मोठ्या चमत्काराने दाणोलीवासी समर्थांकडे आकर्षीत होऊ लागले खरे पण त्यांच्या अवलिया वृत्तीमुळे बहूतेक लोक त्यांना वेडाच समजत.दाणोलीतील एक वृद्ध मुसलमान श्री.नबीसाहेब यांची दृष्टी अधू झाली होती.एकदा रस्त्यातून जातांना त्यांना साटम महाराज दिसले.समर्थांच्या नुसत्या दर्शनाने त्यांची दृष्टी पूर्ववत झाली.त्यांनी भर रस्त्यातचं त्यांना साष्टांग दंडवत घातला.वसईच्या थोर दत्त भक्त असलेल्या अण्णाबुवा वसईकर यांना दत्तप्रभु़ंचा दृष्टांत झाला की ,"दाणोलीला जा ! तिथे तुला दत्त स्वरुप पाहायला मिळेल" काही काळ झाल्यावर दत्तजयंती ला  अण्णा दाणोलीत आले.समर्थांसाठी त्यांनी फुलाचा हार तयार केला.फुले हार,भस्म आणि भगवी छाटी घेऊन ते समर्थांच्या समोर उभे राहिले.त्यांना बघुन दिगंबर अवस्थेत असलेले समर्थ म्हणाले , "तू आलास तर ! चल पाहू झटपट तुझी पूजा आटोप ! मला दत्तवचनातून मुक्त होऊ दे !" असे म्हणताच अण्णाबुवांनी समर्थांच्या चरणी आपले मस्तक ठेवले व अश्रुंनी श्री चरणांना अभिषेक केला.अण्णाबुवांनी समर्थांचा जटाभार उतरविला.नागझरीवर नेऊन स्वत:च्या हाताने समर्थांना स्नान घातले.समर्थांच्या सर्वांगाला भस्म लावले व भगवी छाटी कफनी त्यांना घातली.कपाळी कुंकवाचा टिळा लावला.गळ्यात हार घालून मनोभावे समर्थांची पुजा केली व समर्थांच्या नामाचा जयघोष केला.दत्तजयंतीला झालेल्या या जयघोषाने समर्थांविषयी अज्ञ असलेल्या दाणोलीकरांना पहिली जाग आली. सावंतवाडीचे राजेसाहेब श्रीमंत बापूसाहेब महाराज भोसले यांच्यावर समर्थांची कृपा होती.समर्थांच्या कृपा करुणेचा अनुभव राजेसाहेबांना आल्यावर ते समर्थांचे एकनिष्ठ भक्त बनले.समर्थांच्या दर्शनास वारंवार ते दाणोलीत येत असत त्यामुळे दाणोलीतील लोकही समर्थांच्या दर्शनासाठी गर्दी करु लागले.याच काळात समर्थांनी अनेकाविध चमत्कार केलेत.त्या चमत्कारातुन आर्त, मुर्मुक्षू जिवांना मार्गदर्शन ,कृपा केली. एका मुस्लिम महिलेला भर रस्त्यात मारले आणि त्यातून तिच्या पतिला प्लेगच्या आजारातून मुक्त केले.तसेच सावंतवाडीच्या श्रीमहादेवशास्त्री सातवळेकर हे त्यांच्या बारा वर्ष मुक्या-बहिर्या मुलाला घेऊन समर्थांकडे आले.त्याला बघुन समर्थ म्हणाले , "शास्त्रीबुवा आता चावी लावून मी कुलूप उघडतो!" त्यानंतर समर्थांनी त्या मुलाला भजनात बसविले. भजन रंगात आले,समर्थ गादीवरुन उठले व नाचू लागले.एवढ्यात त्या मुक्या व बहिर्या मुलाने हाताने टाळी वाजवायला सुरुवात केली व त्याच्या मुखातून "हसतमुख हे साटम गुरुजी । चित्त धरावे त्यांचे पायी " हे पद बाहेर पडले.सर्वांसमक्ष हा अलौकिक चमत्कार घडला.त्या दिवसांपासून तो मुलगा बोलू लागला. एका लग्नाच्या प्रसंगी समर्थ व राजेसाहेब हे तंडोली या गावी गेले होते.त्या ठिकाणी समर्थ आपल्या आसनावर विराजमान झाले होते.एवढ्यात तिथे वामन्या देवळी नामक जन्मतः मुका मंडपात घुसला.रडण्याचा बेसुर आवाज करत तो समर्थांच्या पायावर येऊन पडला.समर्थांनी लागलीच त्याच्या जोरदार श्रीमुखात भडकावली.तो त्या माराने दूर जाऊन पडला आणि "साटम महाराज की जय !". असे म्हणू लागला. जन्मजात मुका मुलगा बोलू लागला यावर कुणाचा क्षणभर विश्वासच बसला‌ नाही.पण समर्थांच्या कृपेने हे दिव्य अघटित घडले होते.हे बघुन सर्वांनी एकमुखाने समर्थांचा जयघोष केला.तसेच कोल्हापूर येथील ख्यातनाम कलावंत कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यावर ही समर्थांचा कृपा आशिर्वाद होता.. इच्छा नसेल तर छायाचित्रकारांची फिल्म कोरी निघे. याचा अनुभव ख्यातनाम कलामहर्षी कै. बाबुराव पेंटर यांनी घेतला होता.

समर्थांचा मुक्काम जरी दाणोलीस होता तरी अधून मधून मोटारीने तर कधी चालत ते सावंतवाडी, वेंगुर्ले, गोवा, मालवण, मुंबईकडे भक्तांच्या आग्रहास्तव जात. त्यांचा वर्ण तांबुस होता, पिळदार शरीरयष्टी, तेजस्वी डोळे, ४-५ फुट उंची जणु वामनमूर्तीच वाटायची त्यांचा आवाज मधुर होता. ते सर्व भाषांतून बोलायचे, कवाली तर फार सुंदर गात. प्रथम दर्शनी त्यांची कोणावरही छाप पडत असे. राजा, भिकारी, श्रीमंत, गरीब, स्त्री पुरूष असा भेदभाव त्यांना रूचत नसे. सर्वांशी समानतेने वागायचे. त्यांचा आहार निश्र्चित नव्हता.मासांहारी अन्न ते घेत तर कधी कधी काही न खाता चार चार दिवस झोपून रहात. विश्र्वामध्ये घडणारी कोणतिही घटना दाणोलीस बसून ते सांगत. कोणाही व्यक्तीचे दुष्कर्म त्यांचा दिव्य दृष्टीतून कधीच लपत नसे.  ते लोकाभिमुख झाल्यावर त्यांच्या अवस्थेत बदल होत गेला. मौनावस्था संपून ते बाल उन्मन व पिशाच अवस्थेत नेहमी असत. ते कधी उंच दिसत तर कधी ठेंगू दिसत. कधी वजनाने जड होत तर कधी फुलासारखे हलके होत. त्यांच्या अनेक आठवणी आणि चमत्कार कोकणातील घराघरातून ऐकायला मिळतात. या सर्व चमत्कारांचे,लिलांचे वर्णन एका संक्षिप्त पोस्ट मधून करणे केवळ अशक्यप्राय आहे.आपण सर्वांनी या रसाळ व अलौकिक लिलांचे वर्णन समर्थांच्या श्री.वायंगणकर यांनी लिहीलेल्या चरित्रात जरुर वाचा.

                    नृसिंहवाडीच्या दत्त प्रभुंची सेवा करणारे आप्पा सावंत यांना देवांचा दृष्टांत झाला की मी तुला प्रत्यक्ष भेट देईल.या दृष्टांतांनंतर ते मालवणला आले व तेथेच अखंड दत्त सेवा सुरू केली.काही काळाने समर्थ त्यांच्या पुढे दत्त म्हणून उभे राहिले.समर्थांनी त्यांच्या मस्तकावर एक फटका मारला.त्या फटक्याने त्यांचा वैचारिक गोंधळ थांबला.पुढे समर्थांच्या पूर्णकृपेमुळे मालवणला चहाचे हाॅटेल चालविणारे आप्पा हे दत्त कृपांकित श्रीमद् परमहंस सदानंद सरस्वती झाले.समर्थांनी देह ठेवल्यावर दत्तप्रभुंच्या आज्ञेने ते समर्थांच्या समाधीची सेवा करण्यासाठी दाणोलीला येऊन थांबले.त्यांनी समर्थांच्या समाधीची सेवा करत समर्थांच्या नावाचा ध्वज सर्वत्र फडकाविला.नागडेबाबा उर्फ भालचंद्र महाराज कणकवली, श्री. सदानंद सरस्वती (सावंत) महाराज, श्री पेडणेकर महाराज अशा शिष्यांमध्ये आपली दैवी शक्ती संक्रमित करून समर्थांनी आपले कार्य या आपल्या दिव्य शिष्यांकडून करुन घेतले व घेत आहेत. 

                     समर्थ सद्गुरु श्री साटम महाराजांनी देह ठेवतांना ही विलक्षण आणि अनाकलनीय लिला चमत्कार केले.पुण्याहून समर्थांना तपासायला डॉ.भडकमकर यांना राजासाहेबांनी बोलाविले.डॉक्टरांनी तपासले तर समर्थांची नाडी लागत नव्हती.हृदयाचे ठोकेही बंद झाले होते.डॉक्टरी नियमाप्रमाणे प्रत्यक्ष मृत्यू घडला होता.शरीराचे स्पंदन बंद होते.पण समर्थ डॉक्टरांबरोबर बोलत होते,हसत होते.डॉक्टरांनी समर्थांच्या समोर साष्टांग लोटांगण घातले आणि बाहेर येऊन सरकारांना म्हणाले, "अशा थोर महापुरुषांचे दर्शन मी करु शकलो ही माझ्या जन्मोजन्मीची पुण्याईच मी समजतो.असा महापुरुष मी तरी पाहिला नाही." पुन्हा काही काळाने महाराज निचेष्ट झाल्याचे दिसले.एकच धावपळ झाली.समर्थ सदनात शोकाची सीमा राहिली नाही.डॉक्टर मंडळींनी समर्थांना तपासले.हृदय ,नाडी पासुन निर्णय दिला. महाराज गेले.! महाराजांनी देह ठेवला! एवढ्यात समर्थांनी नेत्र उघडले आणि गरजले ..."कसला गोंधळ चाललाय इथे ! चले जाव यहाँसे !" सर्वजण गडबडले व बिछान्यापासून दूर झाले. महाराज पुन्हा काष्टवत झाले.डॉक्टरांनी पुन्हा तपासले व म्हणाले आता खरोखर महाराज गेले.समर्थ सदनात भजन सुरु झाले.महाराजांच्या वियोगाने भक्तांनी शोक सुरु केला. एवढ्यात पुन्हा समर्थांनी डोळे उघडले,आणि ते गरजले "इथे काय चाललं आहे.ही रडारड कसली चालली आहे? अरे चले जाव यहाँसे! ज्याला रडायचे असेल तो आपल्या घरी जाऊन पोटभर रडू शकतो." आणि एका भक्ताला जवळ बोलावून म्हटले, "पुता,जे लोक रडताहेत ना,त्यांना पांढर्या सुरती कोंबड्यांचं मटन करुन खायला घाल!"  त्यांनी आपल्या प्रिय दत्ताराम नार्वेकर तथा गोंद्या या भक्ताला बोलावून काही साधने संदर्भात मार्गदर्शन केले.सायंकाळी सहाला बाळकृष्ण या भक्ताला हाक मारली व "आम्हाला आंघोळ घाल !" ही आज्ञा दिली.बाळकृष्णाने त्यांना बिछान्यातील घरातच आंघोळ घातली.त्यानंतर समर्थांनी आपला बिछाना माजघरात घालायला सांगितला. २८ मार्च १९३७ फाल्गुन कृष्ण द्वितीया शके १८५८ तुकाराम बीज या दिवशी मध्यरात्र उलटल्यावर समर्थांनी भक्तांना जवळ बोलावून म्हटले "आता मात्र मी खरंच जातो.माझी बोट आली आहे.माझा बाप मला केव्हापासून बोलावतो आहे.तुम्ही जिथे माझी आठवण काढाल तिथे मी आहे.मी जातो म्हणून रडू नका.मी तुमच्या हृदयात जोवर आहे ,तोवर तुमची माझी ताटातूट होणार नाही.ध्यानात ठेवा,मी सदैव माझ्या भक्तांच्या सन्निध आहे.हा नश्वर देह म्हणजे ईश्वर नव्हे! मायेचा त्याग करा.!" सर्वांनी समर्थांना वंदन केले.समर्थांनी ओंकाराचा दीर्घ उच्चार केला व महासमाधी घेतली.श्रीमंत बापू साहेब महाराजांनी समाधी बांधून त्यावर एक मंदिर उभारले. मुंबईत श्री. वडेर यांनी माटुंगा येथील गणेश बागेत साटम महाराजांच्या पादुका स्थापन करून तिथेच मंदिर बांधले. तेथेही मोठ्या प्रमाणावर लोक जात येत असतात. श्री. वडेर हे समर्थांचे भक्त होते. या मंदिराने मुंबईकरांची मोठी सोय करून ठेवली आहे. दि. ८ मार्च १९८५ रोजी समर्थांच्या पुण्यतिथीला दाणोली येथे समर्थांचा ब्रॉंझचा पुतळा विधिपूर्वक जयजयकारात बसविण्यात आला. हा पुतळा मूर्तिकार श्री. शामराव सारंग यांनी बनविला आहे.

आजही ८५ वर्ष उलटून गेले तरी समर्थ भक्तांच्या हाकेला धावतात.ज्यांनी हृदयातून समर्थांचा धावा‌ केला त्यांना समर्थ तात्काळ प्रचिती देतात.याचा आजही जगभरातील असंख्य भक्त अनुभव घेत आहेत.समर्थांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि समर्थांच्या सुकोमल चरणी प्रार्थना करतो की त्यांनीही आम्हा सर्वांना सद्गुरु माउलींची अखंड अविरत सेवा करण्याची बुद्धी द्यावी आणि आम्हा सर्वांवर आपली अखंड कृपा करुणेची दृष्टी ठेवावी.

     ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


🙏🌺"अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सदगुरू श्रीसमर्थ साटम महाराज की जय"🌺🙏

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

Sunday, March 20, 2022

तुकारामबीज जगद्गुरु तुकोबांचा वैकुंठगमन दिन🚩🌸🙏🌺

 


तुकारामबीज_जगदगुरु_तुकोबारायांचा_सदेही_वैकुंठगमन_सोहळा🙏🌸🌺

               

       "बहिणी म्हणे लोक बोलती सकळ । तुकोबा केवळ पांडुरंग ॥"

                 किती सार्थ शब्दात तुकोबारायांच्या किर्तीचे वर्णन संत श्रीबहिणाबाईंनी केले आहे. "आम्ही वैकुंठवासी" म्हणणारे उद्धव ,प्रह्लादांचे अवतार असलेले तुकोबाराय एक सर्व सामान्य वैष्णव घरात जन्माला येतात काय ,सर्व सामान्य माणसांप्रमाणे संसार करातात काय आणि हे जिवन जगतांना स्वतः परब्रह्म श्रीपंढरीनाथांची भक्ती करुन पांडुरंग स्वरुप होतात काय, सर्व कसं एका अलौकिक चमत्कारापेक्षा वेगळं नाही आणि हे तुकोबारायांनी का केले तर त्याचे ही उत्तर त्यांनी आधीच देऊन ठेवले आहे.तुकोबाराय म्हणतात , "बोलिले जे ऋषि । साच भावे वर्ताया ।।" म्हणजे तुम्हा-आम्हा साठी त्यांनी ते आचरण करुन दाखविले आणि आपल्या सर्वांपूढे ,या जगापुढे एक उदाहरण प्रस्तुत केले की भगवंतांच्या निश्चळ ,निर्मळ भक्तीने आपल्याला ही वैकुंठाची कास पकडता येईल. जगद्गुरु तुकोबारायांचे चरित्र आपल्याला बहुतेक माहित आहेच असे मी समजतो आणि काही दिवसांपूर्वी म्हणजे तुकोबारायांच्या जन्मतिथी वसंत पंचमीला एक लेख लिहिल्या गेला त्यात थोड्याफार लिला चरित्राचे चिंतनही केले आहे म्हणून परत ते इथे मांडत नाही.त्या लेखाची लिंक या लेखाच्या शेवटी देतो. 

                            आजच्या लेखाचा मुळ मुद्दा म्हणजे पिवळ्या पावट्यांनी , तथाकथित समाजसुधारक गाढवांनी जी एक गेल्या काही काळापासून बोंब उठवली की तुकोबांचा खून झाला त्यावर मुद्दाम चिंतन करायचे आहे.मुळातच ही जी हिरवी आणि पिवळी पिल्लावळ आहे ती धर्म , श्रद्धा आणि साधना यापासून हजारो मैल दूर आहे. हे लोक गाढवासारखे हेतुपुरस्सर गाथेतील निवडक अभंग उचलून त्यावर लिहुन आपलीच लाल करत असतात.पण तुकोबारायांचे अद्वैत प्रतिपादन करणारे , निर्गुण भगवंतांच्या वर्णनाचे , पांडुरंग , वैष्णवांच्या भक्तीचे अभंग कधीही बघत नाहीत.मुळातच तुकोबा असोत की इतर सर्व संत यांच्या बद्दल तुम्ही लौकिक पातळीवर विचार केला तर सर्व कसं अशक्यप्राय आणि कल्पनातीतच वाटेल.कारण आपली बुद्धी ही तिथवर पोचत नाही.पण जर ऋषिमुनींनी तसेच धर्मशास्त्रात केलेल्या वर्णानाचे नुसते वाचन जरी केले तरी लक्षात येईल की हे अलौकिक आहे आणि आपल्या विचारांच्या पलिकडे आहे.माउलींनी आपल्या "अनुभवामृत" म्हणजेच "अमृतानुभव" या ग्रंथांत योग्यांना साधनापथावर साधनेतील आलेल्या अलौकिक अनुभवाचे वर्णन केले आहे पण काय आहे ना आपली लायकी जेव्हा त्यावर चिंतन करायची नसली की आम्ही ते सर्व खोटं ठरवणार .बरं गम्मत अशी की हीच हिरवी आणि पिवळी पिल्लावळ ७२ हूर ,जिहाद ,जन्नत यावर चकार शब्दही काढत नाही.कारण हिंदू हा सोशीक आहे ना, दुर्दैव हे की इथे बोलणारे हे गाढवं याचेच एक भाग आहेत.असो पण मुद्दा हा की माउलींनी चालवलेली भिंत असो की रेड्याच्या मुखी वेद वदवने असो ,तुकोबांचे वैकुंठगमन असो की मुक्ताईंचे गुप्त होणे असो यावर आपल्या तोकड्या बुद्धीचे तारे तोडणे म्हणजे इथून चंद्राला हात लावणे होईल. बरं महत्वाचं असं की पातंजल योग सुत्रात  समाधी ,ध्यान ,धारणा,योग, कुंडलीनी शक्ती,सप्त चक्र याबद्दल आणि इतर सर्व धर्म ग्रंथात मग त्यात माउलींची भावार्थदीपिका असो की तुकोबारायांची गाथा या सर्व क्रमाचा आणि साधनेचा उहापोह केला आहे पण या गाढवांना सांगेल कोण? वैकुंठ या शब्दाचा हिंदू धर्मात केलेला अर्थ ही फार भिन्न आहे पण आम्हाला टिव्ही बघून वैकुंठ म्हणजे काहीतरी भन्नाट ,आकाशात तरंगाणारे रेस्ट हाऊस वाटतं यात देवांची किंवा संतांची चुक नाही.आम्हा अडाण्यांना त्याचा विचारच जर करायचा नसेल तर त्याला कोण काय करणार ?? तुकोबांनी सांगुनच ठेवले होते "आम्ही वैकुंठवासी" मग याचा अर्थ काय लावणार??? तुकोबारायांंनी वैकुंठ काय पृथ्वीवरील  स्थुल वस्तु किंवा स्थानाला नक्कीच म्हटले नाही.भागवत,पुराणातील हे वैकुंठ आहे. याचा तुकोबांनी अभ्यास केला होता आणि या उपनिषद,शास्त्र,पुराण यांचे वर्णन ही त्यांच्या अभंगात जागोजागी दिसून येते.तुकोबांचे प्रयाण ही एक असामान्य आणि अलौकिक घटना आहे आणि ती आपल्या बुद्धी प्रामाण्यावादाच्या चाकोरीत बसणारी नाही. "संत होऊन संतांना ओळखता येतं" हे वचण म्हणजे बाळचेष्टा नाही तर ही वस्तुस्थिती आहे. शेगावच्या गजानन महाराजांनी अलिकडच्या काळात वाळलेल्या आंब्याला पालवी फोडली होती आणि ही घटना बघणारे लोक आतापर्यंत जिवंत होते.

                         दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा की तुकोबांच्या मार्गदर्शनासाठी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज देहूत यायचे.साधा आजचा नगरसेवक जरी असला तरी त्याच्या कार्यकर्त्यांना इतकी मस्ती असते तर मग स्वराज्याचे संस्थापक छत्रपती असलेल्या शिवरायांच्या गुरु किंवा मार्गदर्शक असलेल्या तुकोबारायांवर नजर वर करण्याची ही कुणाची ताकद असेल का?? देहू हे गाव हिमालयात नाही तर महाराजांनी वसवलेल्या पुण्याचा भाग आहे हे विसरून चालणार नाही.पुण्यातुन दिल्लीची खबर ठेवणारे शिवराय देहूत घडणार्या घटनांची नोंद ठेवणार नाहीत असा बालीश विचार ही करवत नाही. महत्वाचे हे की तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर काही दिवसांनी तुकोबारायांचे चिरंजीव श्रीमहादोबास स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी वर्षासानाची सनद दिल्याची नोंद आजही उपलब्ध आहे.तसेच शाहू छत्रपतींनी ही तुकोबारायांचे पुत्र नारायणबुवा यांना तिनं गावे इनाम दिली आहेत आणि या पत्रात तुकोबारायांच्या वैकुंठवगमनाचा स्पष्ट उल्लेख आहे.औरंगजेबाच्या नाकी नऊ आणणारे छत्रपती शंभु महाराज असचं मनात आलं म्हणून एखादी कृती करतील असे ज्यांना वाटते त्यांनी गटारात जिव दिला तरी हरकत नसावी. आपण इथे थोरले छत्रपति शिवराय व धाकटे छत्रपती शंभु महाराज यांच्या बद्दल बोलतोय आणि त्यांची गुप्तहेर संघटना ,त्यांचे मावळे त्याकाळात कसे कार्यरत होते हे जर बघायचे असेल तर वा.सी.बेंद्रे, मेहेंदळे सरांचे शिवचरित्र जरुर अभ्यासा म्हणजे आपल्या मेंदूला लागलेली जळमटं गळून पडतील.बरं प्रत्यक्ष दोन्ही छत्रपतींनी हे मान्य केल्यावर त्यावर अकलेचे तारे तोडणे म्हणजे शुद्ध मुर्खपणा आहे.ज्या लोकांनी वैकुंठगमनावर प्रश्न उभा केला ती पिवळी ,हिरवी पिल्लावळ खरंच कुणाच्या पाठिंब्याने हे करत आहेत याचा विचार होणे ही गरजेचे आहे. छुप्या संघटना ,हिरव्या लांड्या संघटना तर यांना पुरवठा करत नाही ना? याचा विचार प्रत्येक हिंदू ने करायलाच हवा. छत्रपतींच्या एखाद्या कृतीवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आम्हाला देव,धर्म आणि हिंदवी स्वराज्याचे द्रोही आहेत आणि असल्या किड्यांना वेळीच चिरडायला हवं हे माझं स्पष्ट मत आहे.

                         जगद्गुरु तुकोबारायांचे आत्मानुभवाने आणि ब्रह्मतदाकार वृत्तीचे अभंग या सर्व तथाकथील पिवळ्या बुद्धीच्या इतिहासकारांनी वाचले तरी यांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही.त्या अभंगांवर बोलतांना यांची वाचा खुंटते.तुकोबारांयांच्या वैकुंठगमनाचे साक्षीदारांची यादी जरी बघितली तरी आश्चर्य होईल.१) संत कान्होबा २) रामेश्वर भट्ट वाघोलीकर ३) संत शिंपी नामा ,सदुंब्रेकर ४) गंगाधर मवाळ कडूसकर ५) संताजी जगनाडे तेली ६)नावजी माळी देहूकर ७) गवरशेट वाणी ८)शिवाजी कासार लोहगावकर ९) कोंड भट्ट पुराणीक १०) मालजी गाडे येलवडीकर १२) मल्हारपंत चिखलीकर १३) रंगनाथ स्वामी निगडीकर १४) महंत कचेकर ब्रह्मे हे सर्व तात्कालिक जे या अद्भुत घटनेचे साक्षी होते.

१५) नंतरचे संत नारायण बुवा देहूकर १६) बाळाजी जनागडे १७) गोपाळ बुवा देहूकर १८) वासुदेव महाराज देहूकर १९) कवी मोरोपंत २०) प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजा मानानं या सर्व संतांनी तुकोबाराय आमच्या डोळ्यासमक्ष सदेही वैकुंठास गेले असे निश्चित सांगितले आहे. मग या सर्वांचे अनुभव खोटे आणि ही पिवळी ,हिरवी पिलावळ खरी असे मानणारे महामूर्ख आणि नक्की कोण ,यांचा उद्देश काय यावर चिंतन होणे गरजेचे आहे. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांच्या १३५ ग्रंथाचे खंडन तर दूर त्याची फक्त यादी जरी पाहिली तरी ही हिरवी पिल्लावळ धाय मोकलून रडेल यात शंका नाही.

या सर्व भामट्या ,अर्धवट हळकुंडाने पिवळ्या झालेल्या हिरव्या - पिवळ्या पुरोगाम्यांनी आधी तुकोबांच्या प्रत्येक अभंगाचा अभ्यास करायला हवा पण असे म्हणने ही हास्यास्पद ठरेल.कारण आम्ही कुठल्याही ग्रंथांचा अभ्यास करणार‌ नाही ही यांची भिष्मप्रतिज्ञाच असावी असे दिसते आणि संतांच्या आत्मज्ञानाचे,स्वानुभवाचे वर्णन यांच्या पचनी पडतील असे दूरान्वेही वाटत नाही. असो आजच्या या परम पावन दिनी तुकोबारायांच्या श्रीचरणांशी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि तुकोबारायांनी आम्हालाही श्रीहरी स्मरणाची बुद्धी द्यावी हीच अनन्य प्रार्थना करतो.

  ✒️✍️अक्षय जाधव आळंदी/वाशिम ✍️✒️

Thursday, March 10, 2022

सद्गुरु श्री सिताराम महाराज टेंबे यांची १०४ वी पुण्यतिथी 🙏🌸🌺


आज_झिरी_निवासी_सद्गुरु_श्रीसिताराम_महाराज_टेंबे_यांची_१०४वी_पुण्यातिथी:-

                              आमचे आराध्य दैवत पंचम दत्तावतार भगवान प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे धाकटे बंधू व शिष्योत्तम ब्रह्मचारी राजयोगी योगीराज श्री सिताराम महाराज टेंबे यांची १०४ वी पुण्यतिथी.भगवान श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या शिष्य प्रभावळीतील एक अलौकिक रत्न , महाराजांच्या शिष्य परंपरेतील नैष्ठीक ब्रह्मचारी शिष्यांपैकी एक असे योगीराज श्री सिताराम महाराज म्हणजे दत्तसंप्रदायातील एक विलक्षण अधिकारी असे महापुरुष आहेत.श्रीमहाराजांचे चरित्र हे थोरले स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या चरित्राशी अगदी संलग्न आणि अंतर्भूतच आहे.तरीही सिताराम महाराजांच्या जिवनातील काही घटना या अतिशय विलक्षण आणि दिव्य अशा आहेत. मग त्यात हिंगोलीच्या हेमराज मारवाड्याला आपले आयुष्य दान करणे असो की, सद्गुरुंच्या समाधी नंतर त्यांचे सगुण रुपात दर्शन असो किंवा राजूर चा भव्य दिव्य याग असो सर्व अगदी विलक्षण आणि दिव्य आहे.

                          श्री सिताराम महाराजांचा जन्म चैत्र शुद्ध पंचमी या दिवशी माणगाव येथे झाला.श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे हे सर्वात धाकटे बंधू.घरातील सर्वात लहान अपत्य असल्यामुळे महाराज सर्वांचे खुप लाडके होते‌.त्यांना सर्व लाडाने भलोबा म्हणत असत.श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे व‌ सिताराम महाराज यांच्या वया मध्ये २० ते २२ वर्षाचे अंतर होते. यथावकाश वयाच्या आठव्या वर्षी वासुदेवशास्त्री म्हणजे थोरल्या महाराजांनी भलोबाचे उपनयन संस्कार केले.प.पू.श्रीथोरल्या स्वामींनीच त्यांना ( थोरले स्वामी म्हणजे दत्तावतार प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ) नित्यसंध्या,वैदिक सुक्ते,वैश्वदेव ,देवपुजा इत्यादी सर्व तसेच वेदाध्ययन शिकविले.थोरल्या स्वामींचे भलोबांवरती एवढे प्रेम होते की भलोबांना गायनाची ,तबला वादनाची प्रचंड आवड आहे हे जाणल्यावर त्यासाठी महाराजांनी त्यांना तीस रुपये महिन्याची संगीत गायनाची व वादनाची  शिकवणी लावली त्याकाळातील तिस रुपये म्हणजे आजची किती मोठी रक्कम आहे याचा विचार केला की खरंच आश्चर्य वाटतं.पुढे भलोबा अर्थात सिताराम हे गायन व वादनात अतिशय तरबेज झाले.लहानपणापासूनच श्रीसितारामांना उत्तम वस्त्र परिधान करण्याची सवय होती.लहानपणी त्यांचा धोतर ,टोपी ,अंगरखा आणि उपरणे असा वेष असायचा.त्यांची ही आवड बघुन महाराज त्यांना वेलबुट्टी असलेला अंगरखा,कलाकुसर केलेली ,गोंडे व रंगीत चकत्या असलेली टोपी बनवून घेत. श्री महाराज भलोबांवर अतिशय जास्त प्रेम करतं असत आणि भलोबांचेही थोरल्या महाराजांवर खुप प्रेम व त्यांच्या प्रती फार आदरभाव व विश्वास होता.भलोबा हे श्री महाराजांशिवाय राहत नसत.पुढे श्रीथोरल्या स्वामी महाराजांनी माणगावात दत्त मंदिर स्थापन केल्यावर त्या मंदिराची व तेथील सर्व उत्सव ,सोहळे ,पालखी,  महाप्रसाद यांची सर्व जबाबदारी भलोबांवर होती.सिताराम महाराज वयाने जरी लहान‌ असले तरी श्रीवासुदेव महाराज आपल्या भलोबाचाच सल्ला घेत असत. उत्सवाच्या निमित्ताने माणगावात आलेल्या साधुसंतांच्या सेवेची ,व्यवस्थेची सर्व जबाबदारी ही भलोबांवरच महाराजांनी सोपवली होती.यावरुन

ते थोरल्या स्वामी महाराजांना किती प्रिय होते हे लक्षात येतं.गोर्यापान वर्णाच्या भलोबांना अर्थात सिताराम महाराजांना श्रीथोरले स्वामी महाराज आपल्या मांडीवर बसवून आपल्या हाताने त्यांच्या भ्रुमध्यात तुळशीच्या हिरव्या पानांच्या रसाची टिकली काढत असत.ती टिकली भलोबांना फार शोभून दिसत असे.त्यांचे ते मुखकमल बघुन स्वामी महाराज प्रेमाने व कौतुकाने म्हणायचे , "पाहा आमचा भल्या देवासारखा कसा सुंदर दिसतो!" श्रीस्वामी महाराजांना माणगावात सात वर्ष पूर्ण झाल्यावर भगवान दत्तात्रेय प्रभुंनी त्यांना गृहत्याग करण्याची आज्ञा केली व उत्तरेकडे जाण्याचे सांगितले.ही बातमी हा हा करता सर्व पंचक्रोशीत पसरली.भलोबांना या गोष्टीचे अपार दुःख झाले.भलोबा स्वामी महाराजांच्या बरोबर जाण्यासाठी हट्ट करु‌ लागले पण हा हट्ट पुरविण्यासारखा नव्हता.स्वामी महाराज त्यांना म्हणाले , "तु अजुन लहान आहेस,शिवाय तुला दररोज दूधभात लागतो,उत्तम पोषाख लागतात तो तुला कोण देणार ? मी पायी व अनवाणी पायाने खडतर असा प्रवास करणार आहे.तो प्रवास तुला झेपणार नाही .तु घरी राहूनच मातोश्रींची सेवा कर." श्री स्वामी महाराजांनी भलोबांची कशीबशी समजूत काढली व ते उत्तरेकडे निघून गेले‌. सद्गुरु आज्ञा म्हणून मातोश्रींची पुढे पाच वर्ष त्यांनी सेवा केली.घरी राहुनच ते नित्य देवपुजा,पंचयज्ञ,आरती, पंचपदी नित्य नियमाने करु लागले.श्रीथोरले स्वामी महाराज ज्या पद्धतीने देवांची सेवा ,उपासना करायचे तेच सर्व शास्त्र नियम सिताराम महाराज पाळायचा पूर्ण प्रयत्न करु लागले.पण त्यांचे मन मात्र गुरु भेटीस्तव आसुसलेले होते.पुढे पाच वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी घरी सतत सांगुन त्यांच्या दादांना म्हणजे श्री स्वामी महाराजांना भेटण्यासाठी जाण्याची परवानगी मिळविली.

https://akshayrjadhav.blogspot.com/2022/03/blog-post_10.html

                           एक दिवस ते बाहेर जातो म्हणून  माणगाव सोडून वासुदेव भेटीसाठी निघाले.श्रीसिताराम महाराज गुरुभेटीस्तव अतिव तळमळीने सर्वसंगपरित्याग करुन वन्य, हिंस्र पशूंचे वास्तव्य असलेल्या जंगलातून व घाटातून अनवानी पायाने जाऊ लागले.तेथून ते दरमजल करत श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे येऊन पोचले.तिथे त्यांची प.पू.श्रीनारायण दिक्षीत महाराजांची भेट झाली.दिक्षीत महाराजांनी त्यांना आपल्या घरी नेले ,त्यांची गुरुबंधू म्हणून उत्तम प्रकारे मेजवानी केली.श्रीदिक्षीत स्वामी महाराजांनी प.पू.श्रीस्वामी महाराजांनी गंगाखेड येथे संन्यास आश्रम स्विकारला व ते आता दंड ग्रहण करण्यासाठी उज्जैन या क्षेत्री गेले आहेत असे श्रीसिताराम महाराजांना सांगितले .ही माहिती मिळताच श्रीसिताराम महाराज हे दिक्षीत स्वामी महाराजांची अनुमती घेऊन पुढील प्रवासास निघाले.उज्जैन येथे पोचल्यावर त्यांना श्री स्वामी महाराज कोठे आहेत याची काहीही माहिती मिळेना.तेथून ते ग्वाल्हेर येथे आले.राजाश्रयामुळे तेथे संस्कृत वेदपाठशाळा होत्या.तेथील ब्राह्मण समाज पण सनातन वैदिक पद्धतीने शास्त्राचार पाळुन जिवन जगताना बघुन त्यांना अतिशय आनंद झाला.अशा पवित्र जागी काही काळ राहुन शास्राभ्यास करण्याचे त्यांनी ठरवले.तेथुल गुरुजनांना भेटुन त्यांनी आपला मनोदय सांगितला.लागलीच तिथे‌ त्यांची सर्व व्यवस्था झाली व श्रीसिताराम महाराजांचा नित्यक्रम ,शास्त्राभ्यास सुरु झाला.रोज जपजाप्य,स्नानसंध्या, गुरुचरित्राचे पारायण असा नित्यक्रम करुन महाराज गुरुजींपाशी शास्त्राध्ययन करीत असत.जे अध्ययन पूर्ण होण्यास बारा वर्षे लागतात ते सिताराम महाराजांनी तिनं वर्षात पूर्ण केले.यावरुन श्री सिताराम महाराजांचा अधिकार लक्षात येतो.त्यांचा अधिकार बघुन काही वर्षे आपल्याकडे राहुन पुढील ग्रंथांचे अध्ययन करण्याचे गुरुजनांनी सुचवले पण "आता आपणाला यापेक्षा अधिक काव्य,नाटक,साहित्यादी शिकण्याची जरुरी नाही.ही सर्व शास्त्रे व साहित्य शिकुन आपणाला जगात पंडित म्हणून मिरवायचे नाही.जरी चारी वेद,सर्व शास्त्र मुखोद्गत झाले,किंवा पांडित्याने जगात किर्ती पसरली अथवा अथांग असे कवित्व आले तरी देखील आपले मन श्रीगुरुचरणकमली संलग्न झाले नाही तर त्या षडवेदांगाचा,त्या पांडित्याचा काय उपयोग?संसारसागरातून तारुन नेणार्या ब्रह्मनिष्ठ पुरुषोत्तममूर्तीची कृपा संपादन करणे,यातच नर जन्माचे खरे साफव्य आहे," हा आपला विचार गुरुजनांना सांगुन श्रीसिताराम महाराज पुढील प्रवासास निघाले.ग्वाल्हेर सोडल्यावर कोठेतरी एकांत स्थानी राहून योगाभ्यास करण्याची महाराजांची तिव्र इच्छा होती.श्रीथोरल्या महाराजांकडुन त्यांना त्रोटक प्राणायाम व योगाची माहिती होती.काही काळ अरण्यात राहुन त्यांनी योगाभ्यास केलाही पण त्यांना लक्षात आले की हठयोगाचा बिकट अभ्यास हा सद्गुरु सान्निध्यातच योग्य रितीने आक्रमिला जाऊ शकतो हा पंथ स्वतंत्र चालता येत नाही.त्यामुळे जंगलातील आपला मुक्काम त्यांनी हलविला व सद्गुरु श्री वासुदेवांचा ठावठिकाणा विचारत उत्तरेकडे श्रीक्षेत्र हरिद्वार या ठिकाणी येऊन पोचले.तिथे त्यांना समाधी अवस्था प्राप्त असणारे महायोगी श्री.जालवणकर महाराज भेटले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिताराम महाराजांनी आपला योगाभ्यास सहज व जलद पूर्ण केला.अगदी थोड्या अवधीत ते समाधी अवस्थेला पोचले.आपला योगाभ्यास पूर्ण करुन ते श्रीक्षेत्र ब्रह्मावर्त या ठिकाणी आले.तिथे गेल्यानंतर श्री सद्गुरु माउली वासुदेवांची चौकशी केली.भगवत सद्गुरु कृपेने तेथील राममंदिरात महाराजांचे प्रवचन सुरु असल्याचे त्यांना कळले.थोरले स्वामी महाराज राम मंदिरातच राहत असत.दुसर्या दिवशी सिताराम महाराज श्रीथोरल्या महाराजांना भेटायला मंदिरात गेले.त्यावेळी प्रवचन सुरु होते त्यामुळे एका कोपर्यात जाऊन बसले.प्रवचन सुरु असतांनी श्रीथोरल्या स्वामींनी सर्व श्रोत्यांवर दृष्टीक्षेप टाकला होताच त्यामुळे त्यांना लगेच लक्षात आले होतेच की आपला लाडका भलोबा ब्रह्मावर्ताला आला आहे पण महाराज त्यांना न भेटताच आपल्या मठीत निघून गेले.दुसर्या दिवशी व तिसऱ्या दिवशी ही असेच झाले.त्याचे कारण ही तसेच होते कारण महाराज आता संन्यासी श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी होते आणि संन्यासाला नाते संबंध काही नसतात.शास्त्र ज्यांचा श्वास आहे त्या स्वामी महाजांचे हे वागणे आश्रमाला अनुसरूनच होते आणि हे श्रीसिताराम महाराजांना लक्षात आले असेलच यात नवल नाही.शेवटी श्री सिताराम महाराजांची मनोदशा व कळकळ ओळखून प्रत्यक्ष दत्तप्रभुंनी श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना आदेश दिला की आपले पूर्वाश्रमीचे बंधु आले आहेत त्यांना आपल्या मातेचे कुशल विचारावे.आता देवांच्या आज्ञेमुळे महाराजांनी सितारामांकडे बोट दाखवून "त्यांना बोलविले आहे म्हणून सांगा," अशी एका निकटवर्तीयाला आज्ञा केली.सिताराम महाराज श्रीस्वामी महाराजांचे समोर हात जोडून उभे राहिले.मातेचे वृत्त विचारल्यावर त्यांनी आईचे देहावसान झाल्याचे श्रीस्वामी महाराजांना सांगितले.आपल्या मातु:श्रींच्या मृत्यू ची बातमी ऐकताच स्वामी महाराज आपला दंड घेऊन श्रीगंगेवर स्नानासाठी गेले व शुद्ध होऊन आले.त्यानंतर श्री सिताराम महाराजांना त्यांनी आपल्या जवळच ठेऊन घेतले.श्रीथोरल्या स्वामी महाराजांनी त्यांना गायत्री पुरश्र्चरण करण्याची आज्ञा केली.त्यावर श्रीसिताराम महाराजांनी स्वामी महाराजांपुढे लडिवाळपणे एक अट टाकली, "माझे पुरश्र्चरण होई पर्यंत आपण येथेच राहावे.आपण अन्यत्र कुठेही जाऊ नये.तसे स्पष्ट अभिवचन मला मिळाले पाहिजे नाहीतर मला पुरश्र्चरण करण्यात रस नाही.असे अभिवचन मिळाल्यास मी पुरश्चरणास आरंभ करतो." आपल्या लाडक्या शिष्याचा हा हट्टही स्वामींनी मान्य केला व स्वामी महाराजांनी सर्व अटी मान्यही केल्या.श्रीसिताराम महाराजांनी स्वामी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपले पुरश्र्चरण सुरु केले.

                         एक दिवस सिताराम महाराज सायंकाळच्या वेळेस शिरोळचे शंकरराव कुलकर्णी यांचेबरोबर सायंसंध्या करण्यासाठी नदीवर स्नानासाठी गेले होते. शिरोळचे शंकरराव कुलकर्णी वेदांतशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी वासुदेवशास्त्र्यांकडे  ब्रम्हावर्तास गेलेले होते. सिताराम महाराज व कुलकर्णी दोघेही स्वामींकडे वेदांताचा पाठ घेत असत. त्या दिवशी अचानक वादळ सुरु झाले. संध्या करायला बसले असता त्या वादळात हे दोघेही सापडले. त्या वादळाला त्या देशात “आंधी“ असे म्हणतात. आंधीत सापडलेला मनुष्य त्याच्या नाकातोंडात, कानाडोळ्यात वाळू शिरुन गुदमरुन मरतो व वा-याबरोबर उडून जाऊन गंगाप्रवाहात किवा कोठेही वारा नेईल तिकडे कोठेही जाऊन पडतो. असा अंधीचा महाभयंकर परिणाम मनुष्याला भोगावा लागतो. अशा या मरणप्रसंगात सापडलेले सीताराम महाराज व कुलकर्णी मृत्यूमुखीच पडले असते पण त्यांचे पाठीराखे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचेवर नितांत श्रध्दा असल्याने व गुरुकृपेने ते या संकटातून तरुन गेले.या पुरश्र्चरणाच्या काळात थोरले स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे सिताराम महाराजांबरोबर अडीच ते तिन वर्ष ब्रह्मावर्त या क्षेत्री होते.या काळात श्री स्वामी महाराजांनी खुप मोठी ग्रंथ रचना केली.पुरश्चरण पूर्ण झाल्यावर श्रीस्वामी महाराज हे नृसिंहवाडीस आले व श्रीसिताराम महाराजांज हे देशसंचार करु लागले.पुढे प्रवास करता करता पुन्हा श्रीसिताराम महाराज श्रीथोरल्या स्वामी महाराजांना पवनी या क्षेत्री येऊन भेटले.श्रीस्वामी महाराजांच्या संपूर्ण चातुर्मासात अतिशय भव्य दिव्य असा चातुर्मास याच क्षेत्री झाला होता.याच ठिकाणी योगीराज गुळवणी महाराज यांना श्रीस्वामी महाराजांनी अनुग्रह दिला होता.पवनीला रोज हजारो पंगती उठत असतं.हजारो लोक प्रसाद घेऊन तृप्त झाले होते.या सर्वांची व्यवस्था ही श्रीसिताराम महाराजांकडे होती.येथुन पुढे श्रीस्वामी महाराज नृसिंहवाडी येथे आले.मागाहून श्री सिताराम महाराज ही वाडी क्षेत्री येऊन पोचले.तेथील चार महिन्यांच्या वास्तव्यात अनंत लिला चरित्र घडले शब्द मर्यादेस्तव ते इथे घेत नाही.

श्रीमद् प.प.सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे शिष्यपंचायतन


                           पुढे श्रीसिताराम महाराजांनी राजुर या श्रेत्री मला मोठा स्वाहाकार यज्ञ करण्याचे योजले.या स्वाहाकारात प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्या सर्व शिष्य मंडळींच्या समवेत स्वतः हजर होते.हे प्रथमतःच घडले होते.हा यज्ञ इतका मोठा होता की फक्त जेवण वाढणारे जवळजवळ एक हजार लोक होते.इतक्या प्रचंड प्रमाणात अन्नशांती झाली होती.दहा-दहा हजार लोकांची एक पंगत बसत असे.सूर्यास्तापर्यंत किती पंगती उठत होत्या यांची मोजदाद नव्हती.टाकळीचे दाजीमहाराज व अन्य १५ यती हे स्वामी महाराजांच्या समवेत पंगतीला हजर असत.सिताराम महाराजांच्या चरणी अष्टमहासिद्धी या हात जोडून सेवेला उभ्या असायच्या.राजुरला ज्या निंबाच्या झाडाखाली महाराज बसायचे त्या वृक्षाची पाने आजही गोडच लागतात.श्री सिताराम महाराजांच्या तप सामर्थ्याने कडू निंबवृक्षानेही आपला कडवट गुण सोडला होता.आजही याची प्रचिती त्या ठिकाणी येते.श्रीसिताराम महाराजांना कसलाही लोभ नव्हता.ते अतिशय उदार होते.आपल्या जवळील द्रव्य व वस्त्रे केव्हा एकदा उधळून टाकीन असे त्यांना झाले होते.श्रीसीताराम महाराजांनी पुष्कळ लोकांना ओंजळ ओंजळ भरुन रुपये वाटले होते.त्याचप्रमाणे त्यांनी ताट भरुन रुपये जगद्गुरुंच्या पुढे ठेवले होते.श्रीसिताराम महाराजांनी गोरगरिबांना पुष्कळ द्रव्य दिले व कित्येक कर्जबाजारी लोकांना कायमचे कर्जमुक्त केले. 

                        पुढे श्रीथोरले स्वामी महाराज श्री सिताराम महाराजांना राजुरलाच राहण्याची आज्ञा करुन गरुडेश्वरी निघून गेले.राजुरला दोन वर्ष श्रीसीताराम महाराजांचा मुक्काम होता.या काळात अनंत आर्त ,मुर्मुक्षू जिवांना सिताराम महाराजांनी दु:ख मुक्त केले.पुढे दोन वर्षांनंतर "आषाढ शुद्ध प्रतिपदा या दिवशी श्रीस्वामी महाराज श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे समाधीस्थ झाले," अशा मजकुराचे पत्र सीताराम महाराजांच्या हातात पडले.हे वाचुन त्यांच्यावर जणू वज्राघातच झाला.अतिशय अनावर अतिव दु:खी अंत:करणाने ते गंगेवर स्नानास गेले व येऊन खिन्न अंतःकरणाने बसुन राहिले. नेत्रातून दु:खाश्रुंचा पूर वाहू लागला. आपले मायबाप आपल्याला कायमचे अंतरले. मला त्यांची भेट होणार नाही, या विचाराने अस्वस्थ झाले. तुला मी पुन्हा भेट देऊन तुझी ईच्छा पूर्ण करीन असे अभिवचन थोरले स्वामी महाराजांनी त्यांना दिले होते. त्याचे काय? महाराजांनी माझी ईच्छा पूर्ण केली नाही. त्याना या अभिवचनाचा विसर कसा पडला? त्यानी माझ्यावर अनंत उपकार करुन माझे जीवन आनंदमय केले होते. त्यांचा मी कसा उतराई होऊ या विचारांनी त्यांचे मन विषण्ण झाले. त्यांना आणखी दहा वर्षे आयुष्य मर्यादा पत्रिकेत स्पष्ट असताना इतक्या लवकर गुरुनी देहविसर्जन का केला? आपण निरामय आनंद स्वरुपात बसून मला मात्र असे दु:ख समुद्रात लोटून दिले. त्याचे काय कारण असावे? माझा अधिकार नाही म्हणून त्यांनी माझी उपेक्षा केली का? अशा अनेक प्रकारचे चिंतन करीत सिताराम महाराज तापी नदीच्या तिरावर काळ कंठत फिरत राहिले. फिरता फिरता, बारालिंग क्षेत्रामध्ये मुकुंदराज योग्यांचे समाधी मंदिर जंगलात आहे. तेथे एकटेच बसून राहू लागले. सदैव गुरुमहाराजांचे नाम घेऊन त्यांना आठवून शोक करीत बसावे, खाणे पिणे सोडून दिले होते. ब्रह्मज्ञानी पुरुषाला सध्या अज्ञानी जनाप्रमाणे साकार स्वरुपाचे इतके प्रेम असणे हे भगवंताचे लक्षणच मानले आहे. आपले गुरु आपल्याला लवकर दर्शन देत नाहीत म्हणून मनाला फार तळमळ लागून राहिली होती व अत्यंत कासावीस होत होते व आता धीर सुटू लागला होता. वासुदेव वासुदेव... असा कंठशोष करुन लेकराप्रमाणे रडायला सुरुवात केली व थोड्याच वेळात मूर्च्छित झाले.  मूर्च्छा ही अर्धी मरणावस्थाच होय. एवढ्याच गुरु महाराज गरुडेश्र्वरहून धावत येऊन सीताराम ! ऊठ मी आलो आहे. माझ्याकडे डोळे उघडून बघ म्हणून हाक मारली. हाक मारावी अन झोपेतून जागे व्हावे तसे ते एकदम सावध झाले व डोळे उघडून पहातात तर आपली आराध्य मूर्ती आपल्यासमोर उभी ! आपण स्वप्न तर पाहत नाही ना ! असे वाटले. तोच भल्या, सिताराम ! तू शुध्दीवर आहेस ना? मग असा संशयात का पडलांस? तुला मी पुन्हा भेट देईन व तुझी कोणती ईच्छा असेल ती पूर्ण करीन असे अभिवचन दिले होते ना? ते पूर्ण करण्यासाठींच मी आलो आहे. तुझी काय ईच्छा आहे? तुला काय विचारायचे आहे? सांग, विचार ! असे म्हणून त्यांनी सितारामाना ह्रदयाशी घट्ट आवळून धरले. दोघाही देवभक्तांना परमानंद झाला. 

योगी पुरुष जिवंत असताना कारण पडल्यास दुसरा देह धारण करतो. देह विसर्जन केल्यावर तसा तो करीत नाही. पण श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वतीनी गरुडेश्र्वरी देह विसर्जन करुन माझ्यासाठी आज दुसरा देह किंबहुना दुसरा अवतारच धारण केला आहे. कलियुगात असा दुसरा अवतार घेणारा एक श्री दत्तभगवानच आहे. श्री वासुदेवानंदानी त्यांची समजूत घालून सांत्वन करुन ५ घटिका आत्मबोध उपदेश केला व त्यांचे मन शांत केले व महाराज अदृश्य झाले. श्री सिताराम महाराजाना बालपणापासून केवळ सदगुरुची भक्ती केली व मी सदगुरुंचा सेवक असून त्याची मी सेवा करीत आहे. अशा बुध्दीने सदगुरु संतोषनार्थच सर्व कार्य केले. 

                        व-हाड प्रातांत हिंगोली येथे हेमराज मुंदडा नामक मारवाडी सावकार होता. तो श्री वासुदेवानंद सरस्वतींचा एकनिष्ठ भक्त होता. त्यांनी टेंब्ये स्वामींच्या आशीर्वादाने व अनुज्ञेने तेथे एक सुंदर श्री दत्त मंदिर बांधले आहे. हिंगोलीच्या गुरुभक्तांच्या आग्रहावरुन श्री सिताराम महाराज श्रीदत्तजयंतीच्या उत्सवास तिथे आले होते. तेथील उत्सव उरकून पुढे जाण्याच्या त्यांचा मानस होता. त्याप्रमाणे ते निघाले. पण  हेमराजा आकस्मिक रोगाने एकाएकी भयंकर दुखणाईत पडला व आसन्नमरण झाला. श्रीमंतीच्या जोरावर पुष्कळ वैद्य डॉक्टरांकडून उपचार घेऊनसुध्दा बरा होण्याची लक्षणे दिसतात. सिताराम महाराजांनी अनेकांना असाध्य दुखण्यांतून बरे केल्याचे हेमराजने एकले होते. त्यामुळे त्याने सीताराम महाराजांनाच शरण जाण्याचे ठरविले.  सेवकानी त्याला उचलून सीताराम महाराजांच्या समोर आणून अंथरुणावर झोपविले. हेमराज असाध्य दुखणाईमुळे प्रेततुल्य मरणोन्मुख झालेला होता. त्याने महाराजांना केविलवाण्या नजरेने पाहिले व दीनमुख पसरुन हात जोडून म्हणाला, दयावंत महाराज आपण मज दिनावर दया केलीत तरच मी गुरुमहाराजांची सेवा करीन त्यापेक्षा परलोकांत जाईन. मला या आजारातून बरा करण्यास आपणांवाचून दुसरा कोणीही समर्थ नाही. असे म्हणून महाराजांची अनन्यभावे प्रार्थना केली. मनुष्यांपेक्षा किंवा देवांपेक्षाही ज्यांचा अधिकार थोर आहे असे सुबुध्द साधुसंत महात्म्ये कोणाही प्राणिमात्राचा द्रोह, मत्सर बिलकुल करीत नाहीत. कारण हरी वाईट कृती ही जड कलेवराकडूनच होत असते. ती आत्म्याची कृती नसते. म्हणून संत हे निर्वेर बुध्दीचे असतात असे व्यास म्हणतात  हेमराजांची कष्टी, दु:खी, दीन अवस्था पाहून व दीनवाणी एकून सिताराम महाराज द्रवले, हळहळले व त्यांचेकडे पाहून  करुणापूर्ण दृष्टीने अतिशय गोडवाणीने त्याचे समाधान करुन त्याला धीर दिला. तुम्ही मलाजी विनंती करत आहात ती आम्हा दोघांच्याही पाठीराख्या श्री वासुदेवानंद  सदगुरुनांच करा व त्यांचे तीर्थ व अंगारा प्रेमपूर्वक सेवन करीत जा. ते तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून ओढून काढती हेमराजांनी सांगितले ते आणि तुम्ही वेगळे नाहीतच, एकच आहात. असे म्हणून पुन: पुन: आपणांस पूर्ण बरे करण्याबद्दल विनवणी केली. मी पूर्ण बरा झाल्याशिवाय आपण इथून जाऊ नये असे सांगितले. 

रोग्याचे मरण समजले तरी वैद्याने रोग्यास ते न सांगता उपचार करीत रहावे. तसे त्यांना श्री वासुदेवनंदाच्या पादुकांने तीर्थ दिले व आपल्या झोळीतील भस्म दिले व बरा होशील असा आशीर्वाद देऊन घरी जाण्यास सांगितल. हेमराज म्हणाले मला रोज येथे येणे शक्य होणार नाही तेव्हा माझ्या घराला आपले पावन चरण कमल लावून मला निजदर्शन देऊन आनंद द्यावा ही विनंती आहे. त्याप्रमाणे सिताराम महाराज रोज त्यांचे घरी जाऊन औषध बदलून देऊ लागले. आयुष्य संपत आल्यावर एक दिवस आधी हेमराजाला सांगितले व भगवत नामस्मरण करीत रहा असे सांगितले. त्यानेही मला १०-१५ वर्षे गुरुसेवा करण्याची ईच्छा प्रदर्शित केली व काकुळतीने विनवणी केली. महाराज आपल्या मुक्कामी गेले व वासुदेवानंदाची मनोमन प्रार्थना केली, ते प्रगट होऊन सीतारामा! नसलेला भेदभाव मानून अज्ञानाप्रमाणे तू वागतोस याचे मला नवल वाटते. तू निर्बल नाहीस पण व्यर्थ अज्ञानात शिरु नको व यमाचे निवारण कर, म्हणून माझ्यामागे पोराप्रमाणे लागू नको. आम्ही सर्व भानगडी सोडल्या आहेत. तुला जसे वाटेल तसे तू करु शकशील. पुन्हा आम्हाला अशी गळ घालू नको. तुला सर्व अधिकार दिले आहेत. तू जे मनांत आणशील ते होईल असे म्हणून ते गुप्त झाले.इकडे सिताराम महाराजांना याची मृत्यु घडी जवळ आल्याने याला आता कसे जगवावे याच्या विचारात मग्न होते त्यामुळे त्यांना येण्यास उशीर झाला. नंतर मनाशी एक निश्चय करुन ते शेटजींकडे जाण्यास निघाले. शेवटचा दिवस उजाडला. शेटजी खुपच बेचैन होऊ लागले. मधून मधून मुर्च्छा येऊ लागली. सीताराम महाराज न आल्याने बेचैन झाले व त्यांना पुन्हा पुन्हा बोलावणे पाठवले. थोड्या वेळाने ते आले. व शेटजींची मुर्च्छावस्था पाहून अंगारा लावला व मोठ्याने कानात महाराज आल्याचे सांगितले. तेव्हा शुद्धित आले व शेटजी परिस्थिती कशी आहे असे विचारले. तेव्हा ते म्हणाले महाराज, मला नेण्याकरिता कोणी तरी दिव्य पुरुष आले असून मला पाशांनी बांधले आहे. त्यांचे वर्णन करण्यास महाराजांनी सांगितले. शेटजी म्हणाले- ते शिवचिन्ह धारण केलेले आहे. महाराज म्हणाले, ते शिवदूत आहेत. तुमचा दक्षिणेकडील यम मार्ग बंद झाला आहे. तुम्ही भाग्यवान आहांत. नंतर शिवदुतांशी महाराजांनी संभाषण करुन एक घडी याला मुक्त करा किंवा थांबा असे सांगितले पण शिवदूत म्हणाले एकदा वेळ टळली की आम्हांला स्पर्श करतां येणार नाही व आताच सोडले तर शिवजी आम्हाला शिक्षा करतील यास्तव आम्ही याला घेऊनच जाणार. 


महाराज म्हणाले यांच्या पत्रिकेवरुन अजून १६ वर्षे आयुष्य आहे. शिवदूत म्हणाले आम्हालाही पत्रिका ज्ञान आहे. आजच त्यांच्या आयुष्य समाप्तीचा दिवस आहे. शिवदुतांना महाराज म्हणाले आमच्या विचाराने तो खोटा आहे. शिवदूत म्हणाले खोटा कसा ते दाखवा, म्हणजे आम्ही याला पाश मुक्त करतो. असा बराच संवाद झाला  हेमराजला महाराजांनी विचारले तुला गुरुसेवेसाठी जगण्याची इच्छा आहे ना? तो होय म्हणाल्यावर ती तुझी इच्छा आज आम्ही पूर्ण करणार असे निर्धाराने म्हणाले. मी माझी उर्वरीत सोळा वर्षे तुला अर्पण करतो. त्याला उठवून बसवले व उजवा हात पुढे कर म्हणून आमच्या पंचपात्रातील पाणी मी माझे राहीले ते १६ वर्षांचे आयुष्य हेमराजला अर्पण करत आहे असा मोठ्याने संकल्प करुन हेमराजाच्या हातावर पाणी सोडले व शिवदुतांना म्हणाले कि याचा आयुष्य लेख पहा. त्यांनी पाहिल्यावर आणखी १६ वर्षे आयुष्य वाढल्याचे दिसून आले. सिताराम महाराजांनी शिवदुतांचा लेख खोटा करुन  दाखविला व आता तरी त्याला पाशमुक्त करा असे सांगितले एवढी मोठी महती होती त्यांची. शिवदुतांनी लगेच त्याला पाशमुक्त करुन महाराजांना नमस्कार करुन १६ वर्षांनी परत न्यायला येतो असे सांगितले. महाराज म्हणाले, तोपर्यंत वासुदेवभक्त वासुदेव (विष्णू) स्वरुप झाला नाहीतर या आणि याला शिवरुप बनवा. श्री सिताराम महाराजांनी हेमराजाला निमित्त करुन आपला अवतार समाप्त केला. हेमराजाला महाराजांचे उपकार कसे फेडावे तेच समजेनासे झाले, तो म्हणाला- 

खरा तेजस्वी तूं अससी । जगीं अज्ञान हरणा ।। खरा ओजस्वी तूं भजक । जन मृत्यु प्रहरणा ।। 

खरा दाता तुंचि वितरशी । निजायुष्य सगळे ।। तुला सीतारामा स्मरती । तदहंता पुरी गळे ।। 

सिताराम महाराजांना सांगितल्या प्रमाणे त तिथे असतानांच त्यांच्या समक्ष श्री वासुदेवानंद सरस्वती व श्री दत्तमंदिरासाठी पुजा-अर्चा, नैवेद्य वगैरे खर्चाकरिता सर्वे नं.८ ची जमीन तसेच एक पुष्पवाटिका व एक रु. पन्नास हजार चे कापड दुकान श्री गुरुचरणी अर्पण केले. त्यामुळे श्री सीताराम महाराजांनाही आनंद वाटला. हेमराजाला “तुम्ही दुखण्यातून बरे झाल्यावरच मी इथून जाईन तोपर्यंत इथे राहीन” असे अभिवचन दिले होते. त्याची पूर्तता स्वतःचे उर्वरित आयुष्य त्याला देऊन केली, व पुढे निघुन गेले. सर्वांना वाईट वाटले. हेमराजाला सुद्धा आतां तुम्ही जा असे म्हणता येत नव्हते.


महाराज हुसंगाबादला जातो म्हणून निघाले मार्गात थकवा फार आला, ज्वर येवू लागला तरी हळुहळु चालत चालत हुशंगाबाद वरुन बढणेरीस आले बढने-याला एका भक्ताने दिलेले ताक घेतले त्याला आशिर्वाद दिला व वडाच्या झाडाखाली बसून राहिले. उरलेले आयुष्य दान केल्याने आता त्यांना त्राण राहीले नव्हते. श्रीवासुदेवांचे चिंतन व नामस्मरण करीत उत्तराभिमुख बसून समाधि लावली, व योगमार्गाने सच्चिदानंद ब्रह्मपदी विराजमान झाले तो दिवस होता फाल्गुन शु. ८ शके १८४०. या दिवशी त्यांनी आपले अवतार कार्य संपवून ब्रह्मानंदी लीन झाले. अशा या राजयोगी, महायोगी, थोर गुरुभक्ती असलेल्या सद्गुरु सिताराम महाराजांच्या चरणी माझे शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करतो.त्यांनी ही आपल्या सर्वांना सद्गुरु चरणांशी अनन्यभावाने सेवा करण्याची बुद्धी द्यावी ही त्यांचा सुकोमल चरणी प्रार्थना.


( श्री थोरल्या स्वामी महाराजांनी गरुडेश्वरी देह ठेवल्यावर पुन्हा देह धारण करुन श्री सिताराम महाराज यांना भेट दिल्याचा प्रसंग व हिंगोली येथे हेमराज मारवाड्याला आपले उर्वरीत आयुष्य दान करण्याचा प्रसंग मी चरित्र ग्रंथातुन जसाच्या तसा घेतला आहे.त्यापेक्षा वेगळ्या शब्दात लिहून त्या अतिशय अलौकिक आणि दिव्य प्रसंगाचे गांभीर्य व दिव्यत्व कमी करण्याचे धाडसचं झाले नाही आणि त्यांचे वेगळे वर्णन मला तरी करणे अशक्यप्राय झाले होते तरी सर्वांची त्याबद्दल क्षमा मागतो.)

✍️✒️अक्षय जाधव आळंदी/वाशिम ✒️✍️


।। अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।।

श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...