🌺🌸|| सद्गुरु श्रीरामानंद बिडकर महाराज ||🌸🌺
फाल्गुन कृ. दशमी - ११० वी पुण्यतिथी*
फाल्गुन वद्य दशमी परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या परंपरेतील , प्रभावळीतील अतिशय थोर सत्पुरुष, प्रत्यक्ष श्रीस्वामीरायांचे शिष्य प्रात:स्मरणीय , नित्य वंदनीय सद्गुरु श्री रामानंद बिडकर महाराज यांची ११० वी पुण्यतिथी .
श्री बिडकर महाराजांचा जिवन प्रवास,चरित्र अतिशय आश्चर्यकारक, एकमेवाद्वितीय असेच आहे.व्यक्तिश: मला महाराजांचे चरित्र अतिशय जवळचे आहे कारण मी वाचलेले सर्वात पहिले असे हे संत चरित्र.एक गृहस्थ, व्यापारी ते एक आत्मसाक्षात्कारी संत असा अद्वितीय प्रवास वाचल्यावर मती , बुद्धी स्तब्ध झाल्याशिवाय रहात नाही.इतका अफाट ,अचाट प्रवास फारच कमी ठिकाणी वाचायला मिळतो. खरंतर ही सर्व संत मंडळी अवतारीच आहे यात शंका नाही तरीही यांचा जिवन प्रवास,यांनी केलेल्या लिला या लोकविलक्षण आहेत.कै.लक्ष्मण बापट लिखीत श्री सद्गुरु बिडकर महाराजांचे चरित्र इतके विलक्षण आहे की कितीही नैराश्याने ग्रासलेल्या मानसाने याचे वाचन ,मनन,चिंतन केले तर त्याचे विचारपरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.लेखकाने असे प्रस्तावनेत नमूद ही केले आहे.फक्त श्रद्धा पुर्वक आणि प्रत्येक प्रसंगाचे चिंतन घडणे गरजेचे आहे.हा काही चमत्कार नव्हे असे मला तरी असे वाटते की महाराजांनी प्रत्यक्ष जिवन चरित्रातून प्रत्येकाला दाखवून दिले आहे की, "नर करनी करेगा तो नर का नारायण हो जाएगा." हाच विचार श्रीमहाराजांच्या चरित्रातुन प्रत्येकाच्या अंतर्मनावर बिंबविल्या जातो आणि त्यातून वाचकाला सकारात्मकता मिळते आणि विचारपरिवर्तन , मतपरिवर्तन घडते.अर्थातच हा माझा व्यक्तिगत विचार झाला.
पार्थ गोत्री देशस्थ ब्राह्मण कुळात माघ कृष्ण अष्टमी तिथीला महाराजांचा जन्म झाला.त्यांच्या घराण्याकडे पुर्वा पार जहागिर होती,अत्यंत सुखवस्तु सरदार घराण्यात त्यांचा जन्म झाला.एका कार्याप्रसंगी कुळातील संरक्षक नागाची अजाणतेपणी हत्या झाली व त्या नागाने ७ पिढ्यात या कुळाचा नाश होईल असा शाप दिला होता.श्रीमहाराज हे सातव्या पिढीतील शेवटचे व्यक्ती.त्यांचे पूर्वज अकबर बादशहाच्या दरबारात दिवाण होते.बळवंतराव यांना प्रथम पत्नीपासून अपत्यप्राप्ती न झाल्याने त्यांचे दुसरे लग्न बार्शी तालुक्यातील व्यंकटराव कुलकर्णी यांची कन्या गंगूबाई हिच्याशी करण्यात आले. गंगूबाईंना दोन मुले व चार मुली झाल्या. यांपैकी ‘शेंडेफळ’ म्हणजे रामानंद. महाराज लहानपणापासून धार्मिक वृत्तीचे होते.मारोतीराय हे त्यांचे आराध्य दैवत.
पुण्यातून पंढरीकडे जाणार्या वारकर्यांच्या पालखी सोहळ्यात ते आपल्या मित्रांना जमवून भाग घेत. असेच एकदा ते थेट पंढरपूरलाच गेले. त्यांना विठ्ठलाचे साक्षात्कारी दर्शन झाले. असेच एकदा महाराज सप्तश्रृंगी देवी च्या दर्शनास्तव वणी ला गेले तेव्हा भगवतीने त्यांना दर्शन, तांबुल प्रसाद देऊन कृपा करुणेचा अनुभव दिला.सरदार घराणे ,घरची गर्भश्रीमंती यामुळे महाराजांचे बालपण अतीशय चैनीत ,सुखात व्यतित झाले.वडिलांचे निधन व मोठे बंधू घर सोडून गेल्याने रामानंदावर सर्व संसाराची जबाबदारी पडली. नगर जिल्ह्यातील देवीचे केडगावच्या रंगूबाई हिच्याशी रामानंदांचे लग्न झाले.सुखचैनीचे आयुष्य,सततचा दानधर्म आणि नातेवाईकांना आर्थिक मदत या सर्वांमुळे घरातील संपतीला आहोटी लागली व ती संपत आली.यामुळे महाराजांवर आर्थिक संकट उभे ठाकले.ही अडचण दूर करण्यासाठी महाराजांनी सुगंधी वस्तुंचा व्यापार सुरु केला.या व्यापारातुन महाराजांचा ग्वाल्हेर, जयपूर, बडोदा, सातारा अशा राजघराण्यांशी व्यापारी संबंध आला व या व्यापारातून त्यांनी खूप पैसा,सुबत्ता मिळविली.पण महाराजांच्या विलासी ,सुख ,चैनीच्या वृत्तीमुळे त्यांनी तो सर्व पैसा उडवला.पुढे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी रत्नांचा व्यापार सुरु केला.रत्नांची उत्तम पारख असल्यामुळे महाराजांनी रत्नांचा व्यापार यशस्वी करुन दाखवला.यातुन पुष्कळ धनप्राप्ती झाली.पुन्हा पूर्वस्थिती प्राप्त झाली.एका साधूकडून त्यांनी किमयेची विद्याही मिळविली.एवढेच काय तर महाराजांनी एक स्त्री ही उपभोगायला ठेवली होती आणि "मी तुला आजिवन सांभाळेल" अशी शपथ दिली.महाराज शपथभंगेला घाबरत असत.पुढे कर्मधर्म संयोगाने त्या बाईला डोक्यात मार लागुन ती गतप्राण झाली.सर्व प्रकारचे सुख,चैन , ऐश्वर्यांचे उपभोग घेतल्यावर महाराजांच्या मनात वैराग्य ओढ घेऊ लागले.विषयभोग संपले की दु:ख!! अविनाशी सुख कसे मिळणार?? हाच प्रश्न सतत त्यांच्या डोक्यात घोळू लागला.प्राप्त काळ येईपर्यंत त्यांच्या मनात तळमळ सुरु होती.आपली इष्ट देवता मारुतीरायाची कठोर उपासना केल्यानंतर मारुतीच्या दृष्टान्तानुसार त्यांना अक्कलकोटला जाण्याचा संकेत मिळाला.महाराज भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या भेटीस्तव गेले.तेथे अप्पासाहेब शेरखाने यांच्या घरी ते उतरले.श्रीस्वामी महाराज राजवाड्यात होते.दर्शन घडल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही असा महाराजांनी पण केला.दोन दिवस महाराज उपोषीत होते.शेवटी स्वामी महाराज राजवाड्याच्या भिंतीवरुन उडी मारुन बाहेर आले.महाराजांनी स्वामींची पुजा केली व स्वामींचे पाय धरले.स्वामी म्हणाले , "अभी ह्यासे चले जाव,तुम्हारा काम हो गया है." असा हुकूम होताच महाराज पुण्यास परतले.पहिल्या भेटीतच महाराजांची वृत्ती बदलली. "श्रीसद्गुरुनाथ माउली" हे शब्द सारखे मुखातून बाहेर पडु लागले.एक वर्ष सद्गुरु भजनात व्यतित झाल्यावर महाराज दुसर्या वर्षी माघ.शु.पौर्णिमेस पुन्हा अक्कलकोटला ला गेले, "आंबेका पाड लगा है पुरा होयगा तो काम हो जाएगा" असे स्वामी म्हणाले.तिसरे वर्षी महाराज अक्कलकोटला गेले व स्वामी अनुग्रह ,उपदेश होई पर्यंत परत न फिरण्याचा निश्चय त्यांनी केला.
*रात्री पादसंवाहन करीत असता दोन मोठे नाग महाराजांच्या गुढघ्यातून निघून फुत्कार करु लागले.पण ते न घाबरता सेवा करु लागले.तेव्हा स्वामी उठून रागाने "तू बडा राक्षस जिंद है" असे म्हणाले व त्यांना श्रींनी एक थप्पड दिली.तत्क्षणी महाराजांना समाधी लागली.पूर्ण एक दिवस महाराज त्याच अवस्थेत होते.शुद्धीवर आले त्यावेळी त्यांचा आनंद अवर्णनीय होता.*
प्रात:काळी आनंदी मुद्रेने ते स्वामींच्या दर्शनासाठी गेले असता स्वामी म्हणाले ,"अबी क्या तेरे बाबाका देना लेना है" "सेवा बनाव एक सहस्त्र भोजन घाल" अशी आज्ञा मिळाली.सहस्रभोजन आटोपल्यावर "दक्षिणा दे किमया करुन पैसा मिळविणे बंद कर." ही आज्ञा देताच महाराजांनी दक्षिणा दिली. त्यानंतर स्वामीरायांनी "नर्मदा परिक्रमा करत आणि पुन्हा अक्कलकोटला दर्शनाला येऊ नको." श्रीगुरु आज्ञेने महाराजांनी नर्मदा परिक्रमा केली.या परिक्रमेत महाराजांना अनंत दिव्य अनुभव आले.प्रत्यक्ष नर्मदा मैयाचे दर्शन महाराजांना घडले,श्री स्वामी महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांना दर्शन देऊन "हम गया नही जिंदा है" असे आश्वासन दिले.या सर्वांमुळे महाराजांमध्ये अंतर्बाह्य बदल झाला.
नर्मदा परिक्रमेहून पुण्यात आल्यानंतर त्यांनी पत्नीला घेऊन काशी, प्रयाग, गया अशी त्रिस्थळी यात्रा केली. त्यानंतर पुण्यात येऊन पुनश्च औदुंबर, नृसिंहवाडी, कोल्हापूर, ज्योतिबा, पंढरपूर, आळंदी, देहू, चिंचवड अशी प्रदीर्घ तीर्थयात्रा केली.प्रत्येक ठिकाणी त्या-त्या देवदेवतांचा त्यांना साक्षात्कार प्राप्त झाला.सिद्धावस्थेला पोहोचल्यावर सुमारे २५ वर्षे पुण्यात रामानंद महाराजांचे वास्तव्य होते; पण ते कटाक्षाने प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यांच्या उपदेशात गुरुनिष्ठेवर विशेष भर असे. निष्ठेमुळेच गुरुकृपेचा लाभ होतो व त्या योगे ज्ञान मिळते, धैर्य निर्माण होते आणि स्वार्थ-परमार्थ दोन्ही क्षेत्रांत हात घालाल तेथे फत्तेच होते. फत्ते झाली की पुन्हा दुप्पट वेगाने गुरुनिष्ठा वाढते, असे ते सदैव सांगत.तसेच महाराजांचा पुरुषार्थावर विशेष भर होता, त्यांची शिकवणचं होती की प्रपंच असो वा परमार्थ "नर करती करेगा तो नर का नारायण बन जाएगा." महाराज आपल्याकडे आलेल्या भक्तांना ध्यानाचे ही महत्व विशेष प्रतिपादन करायचे.रोज निदान पाच-दहा मिनिटे तरी ध्यान करावं कारण जमिनीवर पडलेले शेन उचलल्यावर ते थोडीतरी माती घेऊनच वर येतं त्याचप्रमाणे थोडसं केलेल्या ध्यानाने अंतरंगात जरुरच बदल हा घडतच असतो यात शंका नाही असे महाराजांचे सांगणे होते. त्यांचा शिष्य परिवार मोठा होता. श्री रावसाहेब तथा बाबा सहस्रबुद्धे आणि दिगंबर महाराज हे त्यांचे अग्रणी शिष्य होते. त्याशिवाय वासुअण्णा भागवत, अण्णासाहेब गुप्ते, मुकुंदराव मोघे, श्रीधरपंत लिमये, लक्ष्मणराव बापट हेही रामानंदांच्या अधिकारी शिष्यवर्गातील प्रमुख शिष्य होते.
*पत्नी जानकीबाई (रंगूबाई) यांचे १९११ मध्ये निधन झाले आणि त्यानंतर त्यांची विरक्ती अधिकच वाढली. ‘आता आपले काही खरे नाही, आता आमचाही काही नेम नाही,’ अशी निर्वाणीची भाषा ते शिष्यांशी बोलताना वारंवार वापरू लागले. पत्नीच्या निधनानंतर कशीबशी दोनच वर्षे गेल्यावर अखेर फाल्गुन वद्य दशमीला, शके १८३४ मध्ये दोन प्रहरी रामानंद महाराज निजानंदी लीन झाले.*
पुण्याच्या शनिवार पेठेतील त्यांचे निवासस्थान हाच त्यांचा मठ आहे.अशा या लोक विलक्षण महापुरुषाची आज पुण्यतिथी.प्रत्येकाने एकदा तरी त्यांच्या चरित्राचे वाचन,मनन,चिंतन करायलाच हवे.प्रत्येकाला त्या महासागरातून काहीतरी रत्न हाती मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. आज पुण्यतिथी निमित्त महाराजांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌸
✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️
#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺
#श्रीस्वामीसमर्थजयजयस्वामीसमर्थ 🙏🌸🌺


No comments:
Post a Comment