Tuesday, March 8, 2022

परमहंस सद्गुरु श्रीमुंगसाजी माउली धामणगाव देव यांची पुण्यतिथी 🌺🚩🙏

 

गुरुदेव श्रीमुंगसाजी माउली धामणगाव देव यांचा ६४ वा पुण्यतिथी सोहळा :- 

                         विदर्भाची परम पवित्र भूमी म्हणजे संतांची खाणचं, आजवर शेकडो संत , महापुरुष या भूमीत अवतरले व समाधिस्थ झाले.त्या सर्व संतातील अग्रगण्य असलेले एक महापुरुष म्हणजे सद्गुरु श्रीमुंगसाजी माउली होत.विलक्षण महापुरुष,विदेही अवस्था व अखंड भक्त कल्याणासाठीच देवांचा अवतार झाला होता.अगदी जन्म झाल्यापासून ते मुंबई येथे अवतार समाप्ती झाल्यावरही देवांच्या लिला अखंड ,अविरत सुरुच होत्या.मग ते धामणगावला झेंड्याच्या काठीला फुटलेली पालवी असो किंवा त्यांच्या तेथील बैठकीच्या बंगळीखालुन प्रगट झालेली समाधी असो सर्व अनाकलनीय आणि अवर्णनीय असे आहे.

                        मुंगसाजी देवांच्या घरी पिढीजात भगवती आई तुळजाभवानी चे ठाणे होते.त्यांच्या आजी - आजोबांना आई तुळजाभवानी माउलीने आधीच वर दिला होता की तुझ्या मुलाच्या पोटी जगदोद्धारक असा पुत्र होईल.यथावकाश जगदंबेचा हा आशिर्वाद फलित झाला. सद्गुरु मुंगसाजी देवांचा जन्म माता गमाई व पिता श्री विक्रमजी या दाम्पत्यापोटी गोकुळाष्टमी च्या पावन तिथीला कृष्ण जन्माच्या वेळीच ,राहिणी नक्षत्रावर ,श्रावण वद्य अष्टमी,शके १७८५ ,शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर १८६३ चे रात्री १२ वाजता झाला. माता पित्याने बाळाचे बारसे केले व आई तुळजाभवानीचा आशिर्वाद प्रसाद म्हणून बाळाचे नाव 'तुळजाजी' असे ठेवले.तुळजाजी आपल्या बालमित्रांना घेऊन खुप खेळत असे,खोड्या करत असे.हळूहळू काळ लोटु लागला पण यादरम्यान झालेली एक महत्वाची गोष्ट नमूद करावीसी वाटते.तुळजाजी लहान असतांना एक म्हातारा साधु धामणगाव येथे आला होता व तो रोज मुंगसाजी देवांच्या म्हणजे तुळजाजीच्या पुढे हात जोडून रडत असे.असे खुप दिवस उलटून गेले.तुळजाजी अर्थात देव मित्रांना म्हटले "गड्यांनो,गावात एक साधु आला आहे.माझ्याजवळ येतो,माझा हात धरतो व रडतो.का ते समजत नाही." तोच थोड्यावेळात तो साधु तिथे येतो व रडायला लागतो.त्याचा अनन्यभाव बघुन देवांनाही दया आली व त्यांनी लिला केली.संवंगड्यांना साधुसाठी भाकर आणायला गावात पाठविले.सर्व गेल्यावर साधु देवापुढे आला व हात जोडुन बोलु लागला, "देवा,मला दूर का लोटता? बद्रिनाथानेच तर तुमच्या दर्शनासाठी पाठविले आहे.बारा वर्षाच्या तपानंतर स्वप्नात येऊन तुमची ओळख देऊन पाठविले आहे.मला जवळ घ्या.मजवर कृपा करा!" असे म्हणतांना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.त्याचा अनन्यभाव बघून भक्तवत्सल मुंगसाजी देवांनी त्याला गाढ आलिंगन दिले व त्याला अनुग्रहीत केले.तो तिथेच झाडाखाली गाढ समाधीत गेला.इकडे तुळजाजी अर्थात मुंगसाजी माउलींनी सर्व मुलांना हा मोठा साधु आहे याची पुजा करा असे सांगितले.मुलांनी फुला पानांनी त्याची पुजा केली.काही कालाने त्याची समाधी उतरली‌.तेव्हा मुलांनी त्याना प्रश्न विचारुन भंडावून सोडले.त्याने मुलांना सांगितले,"मी उद्धव ,देवांचे दर्शनासाठी १२ वर्ष तप केले.बद्रिनाथाने मला या गावात देव अवतरला ,असे स्वप्नात सांगुन पाठविले.आता माझा उद्धार झाला ,माझे काम झाले.एवढे बोलून तो निघून गेला.या बालवयात तुळजाजींनी अनंत लिला केल्या शब्द मर्यादेस्तव त्या सर्व इथे मांडणे शक्य नाही.वयाच्या पंधराव्या वर्षी तुळजाजीचे वडिल विक्रमजी यांचे देहावसान झाले व घराची सर्व जबाबदारी तुळजाजींवर येऊन पडली.सन १८८० मध्ये वयाच्या सतरावे वर्षी तुळजाजींना नाईलाजाने लग्न करावे लागले.नऊ वर्षाची झ्यामराबाई सून म्हणून घरात आली.मात्र तुळजाजींनी स्त्री स्पर्श आजिवन होऊ दिला नाही.

                        घरची परिस्तिथी हालाखीची होती. कर्ज वाढत होते, अशातच सन-१८८५ च्या श्रावण अमावस्याला (पोळ्याचा) सण मुंगसाजी महाराजांना मानाच्या तोरणाखाली बैल उभा करण्यास विरोध केला , ही गोष्ट मुंगसाजी महाराजांच्या मनाला खूप लागली. बैल तेथेच सोडुन तुळजाजी (महाराज) मारोतीच्या पारावर जाऊन बैठक मांडून मूर्तीवर नजर स्थिर करून तटस्थ बैसले. पुढील सात दिवस महाराज जमिनीला पाठ न टेकवता अन्न पाणी त्यागुन ध्यानस्थ बसले होते. सात दिवसांनी तुळजाजी (महाराज) काहीही न बोलता जंगलात निघून गेले. वनस्पतीचा पाला खाऊन व झर्याचे पाणी पिउन ते राहत होते. काट्याकुट्यात अडकल्यामुळे अंगावरचे वस्त्रे फाटून शरीरावरून कधीचीच दूर झाली होती. पूर्णार्थाने तुळजाजी निसर्गतत्वात समरूप झाले होते. नऊ महिन्यांनी काही गुराख्यांना तुळजाजी जंगलात दृष्टीस पडले व ते महाराजांना गावात घेऊन आले. आता महाराजांचे देहभान पूर्णपणे हरवलेले होते. आईच्या सूचनेवरून व अंत: प्रेरणेने सन-१८८८ साली वयाच्या २५ व्या वर्षी तुळजाजी गडीवर (मातीचा बुरुज) तपश्चर्येस बसले . कुणाचाही वावर नसलेली, झाडे झुडपे वाढलेली साप, मुंगुस , विंचू ,सरडे इ . चा मुक्त संचार असलेली अशी ती गडी होती. मांडी व पोटरी एकमेकांशी घट्ट चिटकून महाराज तपश्चर्येस बसले. अशा स्तिथी मध्ये महाराजांनी १२ वर्ष तपश्चर्या केली.मुंगसासारखा गढीत बसला म्हणून पुढे तुळजाजीचे नाव मुंगस्या-मुंगसाजी असे पडले.बारा वर्ष एकाच आसनात बसुन असल्यामुळे त्यांची मांडी व पोटरी,जोड केल्याप्रमाणे चिकटली होती.बारा वर्षांच्या त्यानंतर मुंगसाजी माउली आता ३७ वर्षांचे झाले होते. यानंतरच्या काळात मुंगसाजी देवांनी अनंत चमत्कार केले.त्यादरम्यान गावातील श्री गोविंद राव देशमुख,सुभानजी,गुणवंतजी,महाजी माळी,पांडू साखर्या,हमाजी ,व्यंकटराव वलगावकर,देवराव मास्तर,रामजी माळी हे सर्व देवांचे भक्त बनले. या भक्तांचा देवांच्या सेवेकर्यात अंतर्भाव झाला.प्रत्येकाने देवांच्या अनाकलनीय लिला अनुभवल्या. धामणगावात देवांचे दोन स्थान अत्यंत प्रिय होते एक म्हणजे चिंचेचे वृक्ष आणि दुसरे साधू माळ्याचे घर.व्यंकटराव यांच्या पुढाकाराने गावातील लोकांनी मिळून देवांसाठी बंगळीची स्थापना करण्याचा विचार केला.पुढे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बंगळीची स्थापना झाली.भक्तांनी विधीवत देवांना बंगळीवर बसविले.आजही हे सर्व स्थान धामणगाव येथे आहेत.त्यानंतर तपश्चर्या होऊन आता १२ वर्षांचा प्रदिर्घ काळ उलटून गेला.देव आता ४९ वर्षाचे झाले.धामणगावात नित्य शेकडो लोक ,आर्त ,मुर्मुक्षू लोक देवांच्या दर्शनास येत.देव या सर्वांचे दु:ख दूर करीत असत.प्रत्येकाच्या पात्रतेनुसार त्याला मार्गदर्शन करिता असत.



सालबर्डिचा महायज्ञ ।


सन १९३५ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सालबर्डी येथे भव्य महारुद्र यज्ञाचे आयोजन केले होते. ठिकठीकांचे संत महंत या यज्ञात उपस्थित होते.जवळपास पन्नास परमहंसपदी पोचलेले संत त्या ठिकाणी यज्ञात उपस्थित होते.आलेल्या संतांतून कोणाला अग्रपूजेचा मान द्यावा याचा निर्णय होत नव्हता.शेवटी तो मान प्रत्यक्ष मुंगसाजी माउलींना देण्यात आला.या नंतर यज्ञात घडलेला एक दिव्य प्रसंग आवर्जुन इथे मांडतो.यज्ञाचे होमकुंड मंत्राग्नीने पेटवावे अशी मुळ कल्पना होती. त्यासाठी काशीहून विद्वान ब्राह्मण पूजा विधीसाठी उपस्थित होते. त्यांनी मंत्रोचार करून होमकुंड पेटविण्याचा प्रयत्न केला मात्र यश मिळाले नाही तेव्हा मुंगसाजी देवाने यज्ञ कुंडाभोवती फिरून “झोपली काय, जागी हो” असे शब्द उच्चारून हाताने इशारा केला त्याचबरोबर होमकुंडातील अग्नी पेटला आणि काही क्षणातच पूर्ण वातावरण आनंदमय झाले व महाराजांचा जयजयकार झाला. या प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मुंगसाजी देवाचे वर्णन वीजनिर्मिती केंद्र व इतर संतांचे वर्णन विजेवर लागणारे दिवे असे केले होते.

तुकडोजी महाराज संदर्भात एक अजुन महत्वाचा प्रसंग घडला तो असा की, तुकडोजी महाराजांनी थोर देशभक्त सुभाषचंद्र बोस यांना उद्देशून एक देशभक्तीपर पद रचले जे खुप गाजले.त्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना जेल मध्ये टाकले.त्यांच्यावर खटला दाखल झाला व फाशीची शिक्षा होईल अशा हालचाली सुरु झाल्या.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लागलीच श्री.बोके व इतर दोघांना धामणगाव येथून मुंगसाजी माउलींचा प्रसाद आणण्यास पाठविले.दादासाहेब बोके देवांच्या दर्शनास आले.साधू माळी देवांना म्हणाला, "देवा,तुकडोजी महाराजांना सरकारने जेलमध्ये टाकले.त्यांना फाशी होणार असे म्हणतात, त्यामुळे प्रसादासाठी आलोय," असे सांगितले.तेव्हा देव म्हणाले "त्याले छानून पाणी पिजो म्हणलं तर बसला भरकटत.आता कुयकुय करते," असे बोलले.तेव्हा साधू माळी म्हटला ,"देवा त्यायले फाशी होते म्हणतात," त्यावर देवांनी आपली मांडी थोपटली व आश्वासक उत्तरले, "मुंगस्या कायले हाय रे,मुंगस्या असतांना भक्ताले फाशी होईल कशी? जा सांग बिनडाग सोडते," असे म्हणून एक फळ त्यांच्या दिशेने फेकले.ते फळ व देवांचा प्रसाद तुकडोजी महाराजांना सांगितला.पुढे यथावकाश त्यांची सुटका झाली. पुढे लोकांच्या लालची वृत्तीला कंटाळून म्हणा किंवा धामणगावातील लोकांच्या ऐकखाऊवृत्तीमुळे म्हणा देवांनी एकदा उद्गार काढले की, "सूर्य मावळला तर तो दुसऱ्या दिवशी उगवतो.मुंगस्या येथून गेला तर पुन्हा येणारच नाही," तसेच , "धामणगावात आघाडे,धोतरे वाढतील " असे उद्गार काढले. त्यानंतर देव धामणगाव सोडून मुंबईला गेले तो ते परत सदेही आलेच नाही.देहही देवांनी मुंबई येथेच ठेवला. 

मुंगसाजी देवांचे उत्तराधिकारी परमहंस पुंडलिक बाबा व त्यांच्यासमवेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


                देवांनी मुंबई येथीही अनंत लिला केल्या.असंख्य भक्तांचा उद्धार केला.तसेच मुर्तीजापूर येथील परहंस पुंडलिक बाबा यांच्यावर देवांची विशेष कृपा होती.देवांचे ते आवडते शिष्य होते.लहानपणी ते आई वडिलांसोबत देवांच्या दर्शनास गेले व तडक जाऊन देवांच्या गादीवर बसले.भक्तांनी याबाबत हटकल्यावर देवांनी सर्वांना सरळ सांगितले की , "मीच याला जगात आणला आहे,हाच माझ्या गादीचा खरा वारस आहे." असे प्रत्यक्ष मुंगसाजी माउलींनी निक्षून सांगितल्यावर सर्वांना पुंडलिक बाबांच्या अधिकाराची जाणीव झाली. मुंगसाजी देवांनी, "हा देवच आहे" असे उद्गार काढून पुंडलिक महाराजांचे अवतारित्व प्रगट केले होते. संत गाडगेबाबांनी , "अरे हा देवच आहे.याच्या केवळ दर्शनाने जीवाचे कल्याण होते" तर "पुंडलिक बाबा हे संतांमधले युवराज आहेत," असे उद्गार संत लहानुजी महाराज यांनी काढले.कौंडिण्यपूरचे अच्युत महाराज यांनी , "श्री पुंडलिक बाबा हे संतश्रेष्ठ साक्षात्कारी विभूती होय" असे वर्णन केले होते.तुकडोजी महाराजांनी त्यांच्यावर एक भजन ही रचले होते.पुंडलिक देवांचा उदय १९४७ मधील.सन १९४८ पासून त्यांचा जन्मोत्सव सुरु झाला आणि मुंगसाजी माउलींनी मुंबई ला प्रमाण केले व धामणगाव सोडले तो दिवस ९ फेब्रुवारी १९४७.त्यामुळे मुंगसाजी देवांनी मुंबईस प्रयाण करण्यापूर्वी आपला उत्तराधिकारी निवडला होता त्याच्या कार्याची सुरुवात केली होती असे दिसते.

नगर चे विश्वविख्यात संत अवतार मेहेर बाबा ही मुंगसाजी देवांच्या दर्शनाला धामणगावला येऊन गेले होते.अवतार मेहरबाबा यांनी साधुसंतांच्या भेटीसाठी भारतभ्रमण केले. १९४४ मध्ये मेहरबाबांनी धामणगाव येथे भेट दिली. या अनुभवाचे वर्णन विल्यम डॉकिन यांनी ” दी वेफरर्स ” या ग्रंथात केलेले आहे.


देवांचे_निर्वाण :-

            आत्ता राम नाम घ्यावे ।


फाल्गुन शुद्ध सप्तमी २६ फेब्रूवारी १९५८ बुधवार रोजी मुंगसाजी महाराजांनी सहज प्राणायाम साधत चर्चगेट मुंबई येथे देह ठेवला. महाराजांनी मद्रासी अम्माचे मांडीवर डोके ठेऊन अर्धा कप चहा घेतला व उर्वरित चहा इतरांना वाटून दिला व आता राम कृष्ण नाम घ्यावे असे उपस्थित भक्ताना सांगितले. सर्व भक्तगन कीर्तनात मग्न असताना महाराजांनी महानिर्वाण केले. महाराजांनी आपण देह ठेवणार आहोत याची कल्पना काही भक्तांना स्वप्नातून दिली होती. इकडे पुंडलिक देवाने "धुपट उडून राहिलं रे,धुपट उडून राहिलं रे," असे बोलून देवाच्या माहनिर्वाणाचे संकेत दिले होते.

महानिर्वाण दिनाच्या मध्यरात्री धामणगाव येथे भक्तांचे जागरण चालू होते त्याचवेळी एक भव्यदिव्य प्रकाशझोत गावाबाहेरून सावकाश येत आहे असे अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवले. वाळकेश्वर मुंबई येथील बाणगंगा स्मशानभूमीत महाराजांच्या पार्थिवावर दाहसंस्कार करण्यात आला. या ठिकाणी मुंगसाजी देवाचे समाधी मंदिर आहे.

मुंगसाजी देवांच्या निर्वाणानंतर त्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे तेथील सागाच्या झेंड्यास जो वाळलेला फाट्याच्या स्वरुपात होता व अनेक वर्षांपूर्वी चबुतर्यावर गाडण्यात आला होता,त्याला पालवी फुटली.निर्वाणानंतर काही काळाने मुंगसाजी देवांच्या बंगळीखालची जागा मानवीआकृती सारखी वर येऊ लागली व तेथील नित्य वावर असणार्या लोकांचे म्हणणे आहे की,सदर मानवी आकृतीची जागा ही सतत वर येतं आहे, त्यामुळे बंगळीच्या कड्या कमी कराव्या लागल्या.आजही ही आपण प्रत्यक्ष बंगळीजवळ गेलो की त्या ठिकाणची जागा मानवी आकृतीच्या स्वरुपात वर आल्याचे स्पष्ट बघु शकतो.कित्येकांना त्या ठिकाणी देवांचे दर्शन झाले आहे‌. आजही देवांची कृपा भक्तांना अनुभवायला मिळते आहे.आजही त्यांच्या कृपा करुणेची प्रचिती येते आहे‌.अशा या दिव्य अवतारी महापुरुषांच्या जीवन चरित्राचे चिंतन करुयात.आपल्या ही जिवनात गुरु कृपेचा अरुणोदय येऊन आपले जिवन गुरुकृपेच्या तेजस्वी किरणांनी न्हाऊन निघो हे एकच मागणं मुंगसाजी देवांच्या चरणी मागतो आणि त्यांनीच करुन घेतलेले हे चरित्र चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करतो.

  ✒️✍️ अक्षय जाधव आळंदी/वाशिम ✍️✒️


( देवाच्या अनंत लीला आहेत, फक्त माहिती म्हणून काही मोजक्याच लीला येथे नमूद केल्या आहेत. देवाच्या संपूर्ण जीवनक्रम जाणुन घेण्यासाठी ।। चरित्रामृत ।। लेखक विजयसिंग राणे यांचे मराठी आवृत्ती वाचावी. तसेच ” जीवनामृत ” या ओवीबद्ध ग्रंथांचे वाचन करावे. )

1 comment:

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...