Tuesday, March 22, 2022

दाणोलीचे योगी समर्थ सद्गुरु श्रीसाटम महाराज 🙏🌸🌺🚩


 दाणोलीचे_योगीराज🙏🌸🌺

                             भारतात आजवर झालेल्या सर्व संत मांदियाळीतील एक अतिशय विलक्षण आणि अलौकिक असे संत रत्न. भगवान श्री परशुरामांच्या परमपावन अशा कोकण भूमीतील संतमंडळीचे चुडामणी असलेल्या थोर महापुरुष सद्गुरु श्री साटम महाराज यांची ८५ वी पुण्यतिथी.श्रीसद्गुरु साटम महाराज यांचे अलौकिक जिवन चरित्र बघितले की बुद्धी स्तिमित होते.विलक्षण दिव्य आणि अचाट लिलांनी भारलेले असे हे चरित्र आहे.श्रीमहाराजांचा जिवनक्रम इतका दिव्य आणि अनाकलनीय आहे की कुणालाही आश्चर्य झाल्याशिवाय राहणार नाही.शब्द मर्यादा असल्याने याच दिव्य चरित्राचे संक्षिप्त स्वरुप बघणार आहोत पण श्री.र.ग.वायंगणकर लिखीत चरित्र ग्रंथ आपण जरुर वाचाचं कारण आजवर इतका विलक्षण आणि अचाट जिवन प्रवास मी तरी फारच कमी ठिकाणी वाचलाय. एक रस्ता चुकलेला तरुण ,गुंड ,दादा झालेला तरुण पुढे सद्गुरुंच्या परिस स्पर्शाने स्वत: सद्गुरु स्वरुप होतो हा जिवन प्रवास केवळ थक्क करणारा आहे.

                          सद्गुरु श्री साटम महाराजांचा जन्म थोर शिवभक्त असलेल्या माता लक्ष्मीबाई व पिता नारायण पंत या दाम्पत्यापोटी मालवण तालुक्यातील कोहीळ या गावी झाला.एका धार्मिक मराठा कुटुंबात महाराजांचा जन्म झाला.लहानग्या बाळाचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. यथावकाश कामा करिता नारायण पंत सर्व परिवारासोबत मुंबई ला आले.मुंबई ला कामाठीपुरा येथे तेराव्या गल्लीत ते रहात होते.वय वाढत असतांना बालवयात शंकर हा चुकीच्या संगतीत सापडला.आधीच ज्या ठिकाणी साटम परिवार रहात असे तो परिसर ,ती लोकवस्ती ही ठिक नव्हती व अशातच त्याला मिळालेली चुकीची संगत यामुळे शंकर अधिकच बिघडला.शंकर ने शिक्षण अर्धवट सोडले,दारुडे, जुगारी,सट्टेबाज यांच्या जाळ्यात तो अडकला. शंकरच्या या अवस्थेमुळे त्याच्या माता पित्याला अतोनात दु:ख झाले होते.त्यांनी शंकर सुधरावा म्हणून अनेक उपाय ,गंडे,दोरे केले पण कशाचा तुसभर ही फरक त्याच्यावर झाला नाही.शेवटचा एक उपाय म्हणून त्यांनी त्याचे लग्न करुन दिले.सावंतवाडीची जनाबाई ही शंकर ची धर्मपत्नी झाली पण त्यानंतरही शंकर सुधारला नाही.एकदा गुंडासोबत झालेल्या हाणामारीत शंकर ने मोठा हैदोस घातला व‌ त्यामुळे त्याची मोठी दहशत लोकांमध्ये पसरली.आता शंकर ला सर्व गुंड, तेथील वस्तीतील लोक हे बडे दादा म्हणू लागले.पुढे एका पारशी व्यक्तीची शंकरवर मर्जी बसली‌ त्याने त्याच्या  दारुच्या दुकानात शंकरला नोकरी दिली.शंकर दादा असुनही स्त्रीयांचा फार आदर‌ करायचा ,कुणीही दारुड्याची शंकरपुढे स्त्रीयांना छेडायची ,तंटे करायची हिम्मत होत नसे.म्हणूनही पारशी पेस्तनजीचे शंकरवर प्रेम जडले.तो शंकर ला मटन-पुरीचे रोज जेवन ही देऊ लागला.पण यामुळे शंकर ला जातीबाहेर काढले‌ गेले.अर्थातच शंकरला त्यामुळे काडीचाही फरक पडला नाही.पण घरच्यांनाही शंकर‌ला घराबाहेर काढावे लागले.नाईलाज म्हणून एका ताटात दूरुनच त्याला जेवण दिले‌ जायचे.या सर्व प्रकारामुळे शंकर‌च्या आई वडिलांना अपार दुःख झाले व‌ त्यांनी अंथरुण धरले.त्यातच त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.शंकर‌ला हा आघात सहन झाला नाही.या सर्व दु:खामुळे तो अंतर्मुख झाला.आता तो तासंतास एकटाच बसुन राहत असे.अखंड विचारात निमग्न असे.पण यातही त्याने नोकरी सोडली‌ नव्हती.पेस्तिनजीला शंकर च्या या वागण्यामुळे आता त्याची चिंता वाटू लागली.अशातच सासु सासर्यांच्या निधनानंतर शंकरची पत्नीही माहेरी निघून गेली.बघता बघता एकोणीसशे दहा साल उजाडले.मुंबईत प्लेगची साथ पसरली.यात शंकरची वहिनी व त्यानंतर मोठा भाऊ दादाचेही निधन झाले.जणु नियतीने शंकरचे सर्व पाश तोडले व त्याला नि:संग केले होते.पण आता कुठे शंकरच्या नव्या जिवन प्रवासाला सुरुवात झाली होती,आता कुठे लवकरच शंकरच्या जिवनात गुरुकृपेची पहाट होणार होती.

                       या सर्व अनपेक्षितपणे घडलेल्या दु:खा मुळे शंकर अधिकच अंतर्मुख आणि चिंतनशील बनला.आपल्या या जिवनाचे खरे उद्दिष्ट काय ?‌ याचा अखंड विचार करु लागला.सध्या जे चर्चगेट आहे तेथील पारशांच्या पवित्र विहीरीजवळ एक दिवस शंकर पेस्तनजीबरोबर गेला.तिथे त्यावेळी अनेक बैरागी,अवलिया असायचे.आता शंकर गुत्यावर न जाता या बैराग्यांमध्ये जाऊ लागला ,त्यांच्यातच त्याचे मन रमू लागले.एक दिवस शंकर असाच बैराग्यामध्ये बसलेला असता त्याची नजर एका अवलियावर पडली.त्या अवलिया ने शंकरवर मोहिनीच घातली जणु.शंकर आता सारखा त्यांच्या पुढे मागेच राहत असे.शंकरची ही अंतर्मुख अवस्था बघुन ते अवलिया शंकरला म्हणाले, "बेटा तू वेडा नाहीस!मला तुझ्यावर कृपा करण्याची आज्ञा मिळाली आहे.मी जे चराचरात तेजाचे दर्शन घेतो आता तु ही ते दर्शन घे!" इतके बोलून त्यांनी शंकरच्या मस्तकावर आपला कृपा हस्त ठेवला‌ व त्याला कृतार्थ केले.या एका दिव्य स्पर्शाने शंकराला निर्विकल्प समाधी लागली.या समाधीत काही काळ शंकर होता व ज्यावेळी या समाधीचे उत्थान झाले त्यावेळी तिथे शंकर दादा नव्हता तर आता ते सद्गुरु समर्थ साटम महाराज बनले होते.! हे अवलिया सद्गुरु होते थोर नाथपंथी महापुरुष श्री सद्गुरु अब्दुल रहमान बाबा‌.यांच्यावर परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा कृपा अनुग्रह होता असे मानले जाते. सद्गुरुंनी एका दृष्टीक्षेपात ,स्पर्शात माउली म्हणतात तसे "या हृदयीचे त्या हृदयी"  घातले.आता साटम महाराज हे स्वतःच सद्गुरु स्वरुप झाले होते.सद्गुरु आज्ञेने साटम महाराज आता तपाकरीता मार्गस्थ झाले.त्यांनी कोकणातील सावंतवाडी-बेळगाव मार्गावरील भव्य गुढ असा अंबोली हा घाट तपासाठी निवडला.तिथल्या हिरण्यकेशी जवळील वाघाच्या गुंफेत ते निर्धास्तपणे कठोर तप करु लागले.तपश्चर्येचा काळ संपवून समर्थ साटम महाराज एका गाडीवाना बरोबर प्रथमच सावंतवाडी येथे आले.( या गाडीवानाचा प्रसंग बराच मोठा आहे तो शब्द विस्तारामुळे इथे टाळतो आहे. )

डोक्यावर जटाभार ,दाढी वाढलेली,अंगावर कांबळे ,कधी नग्न तर कधी लंगोट अशा वेशात ते गावभर फिरायचे.त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होते.पण वेड्यासारखा वर्तन करणारा एक मनुष्य म्हणून सावंतवाडीत कुणाचेही समर्थांकडे लक्ष गेले नाही.लहान मुलांसाठी तर ते टिंगल टवाळीचा विषय झाले.कुणालाही समर्थांचे आकर्षन वाटले नाही पण पुढे एक विशेष घटना घडली ज्यामुळे समर्थांकडे लोकांचे लक्ष वेधल्या गेले.समर्थ साटम महाराज हे तपामुळे देहातीत अवस्थेत वावरत असत.देहधर्माच्या कुठल्याही गोष्टींकडे त्यांचे लक्षच नसे.समर्थ अंबोली घाटात हिरण्यकेशी जवळ तप करतांना एका वाघाने त्यांच्या उजव्या खांद्याला पंजा मारला व तेथील मांस तोडले.पुढे ही जखम वाढत गेली व त्यात कृमी देखील झाल्या.एक दिवस वाडीच्या वाण्याच्या दुकानात समर्थ गेले व म्हणाले , "अरे मला थोडा गुळ दे ! माझी पोरे दोन दिवसांची उपाशी आहेत!" वेड्याची कटकट नको म्हणून त्या वाण्याने लागलीच त्यांना गुळ दिलाही.समर्थांनी तो हाताने चुरगाळला व त्या जखमेत भरला.त्या जखमेत गुळ भरल्यावर त्यातील कृमी ते खाण्यासाठी वळवळू लागल्या.त्यातील काही कृमी घसरत जमीनीवर पडल्या.समर्थांनी अलगद त्यांना उचलून पुन्हा त्या जखमेत सोडले व म्हणाले, "बेट्यांनो आपले घर सोडून कुठे चाललाय?" ही घटना बघुन तो वाणी अचंबित झाला.हा कुणी सामान्य वेडा नाही याची त्याला जाणिव झाली.पुढे समर्थ रोज त्या दुकानातून गुळ घेऊ लागले व त्या जखमेत भरु लागले.काही दिवसांनी ती जखम पूर्ण बरी ही झाली.यामुळे मात्र तो दुकानदार समर्थांचा भक्त बनला व सावंतवाडीच्या लोकांचेही लक्ष समर्थांकडे वेधले गेले.एवढ्यातच समर्थांनी सावंतवाडी सोडली व दानोलीस प्रयाण केले.त्या ठिकाणी कुणीही समर्थांना ओळखत नव्हते.

                          समर्थांच्या छोट्या मोठ्या चमत्काराने दाणोलीवासी समर्थांकडे आकर्षीत होऊ लागले खरे पण त्यांच्या अवलिया वृत्तीमुळे बहूतेक लोक त्यांना वेडाच समजत.दाणोलीतील एक वृद्ध मुसलमान श्री.नबीसाहेब यांची दृष्टी अधू झाली होती.एकदा रस्त्यातून जातांना त्यांना साटम महाराज दिसले.समर्थांच्या नुसत्या दर्शनाने त्यांची दृष्टी पूर्ववत झाली.त्यांनी भर रस्त्यातचं त्यांना साष्टांग दंडवत घातला.वसईच्या थोर दत्त भक्त असलेल्या अण्णाबुवा वसईकर यांना दत्तप्रभु़ंचा दृष्टांत झाला की ,"दाणोलीला जा ! तिथे तुला दत्त स्वरुप पाहायला मिळेल" काही काळ झाल्यावर दत्तजयंती ला  अण्णा दाणोलीत आले.समर्थांसाठी त्यांनी फुलाचा हार तयार केला.फुले हार,भस्म आणि भगवी छाटी घेऊन ते समर्थांच्या समोर उभे राहिले.त्यांना बघुन दिगंबर अवस्थेत असलेले समर्थ म्हणाले , "तू आलास तर ! चल पाहू झटपट तुझी पूजा आटोप ! मला दत्तवचनातून मुक्त होऊ दे !" असे म्हणताच अण्णाबुवांनी समर्थांच्या चरणी आपले मस्तक ठेवले व अश्रुंनी श्री चरणांना अभिषेक केला.अण्णाबुवांनी समर्थांचा जटाभार उतरविला.नागझरीवर नेऊन स्वत:च्या हाताने समर्थांना स्नान घातले.समर्थांच्या सर्वांगाला भस्म लावले व भगवी छाटी कफनी त्यांना घातली.कपाळी कुंकवाचा टिळा लावला.गळ्यात हार घालून मनोभावे समर्थांची पुजा केली व समर्थांच्या नामाचा जयघोष केला.दत्तजयंतीला झालेल्या या जयघोषाने समर्थांविषयी अज्ञ असलेल्या दाणोलीकरांना पहिली जाग आली. सावंतवाडीचे राजेसाहेब श्रीमंत बापूसाहेब महाराज भोसले यांच्यावर समर्थांची कृपा होती.समर्थांच्या कृपा करुणेचा अनुभव राजेसाहेबांना आल्यावर ते समर्थांचे एकनिष्ठ भक्त बनले.समर्थांच्या दर्शनास वारंवार ते दाणोलीत येत असत त्यामुळे दाणोलीतील लोकही समर्थांच्या दर्शनासाठी गर्दी करु लागले.याच काळात समर्थांनी अनेकाविध चमत्कार केलेत.त्या चमत्कारातुन आर्त, मुर्मुक्षू जिवांना मार्गदर्शन ,कृपा केली. एका मुस्लिम महिलेला भर रस्त्यात मारले आणि त्यातून तिच्या पतिला प्लेगच्या आजारातून मुक्त केले.तसेच सावंतवाडीच्या श्रीमहादेवशास्त्री सातवळेकर हे त्यांच्या बारा वर्ष मुक्या-बहिर्या मुलाला घेऊन समर्थांकडे आले.त्याला बघुन समर्थ म्हणाले , "शास्त्रीबुवा आता चावी लावून मी कुलूप उघडतो!" त्यानंतर समर्थांनी त्या मुलाला भजनात बसविले. भजन रंगात आले,समर्थ गादीवरुन उठले व नाचू लागले.एवढ्यात त्या मुक्या व बहिर्या मुलाने हाताने टाळी वाजवायला सुरुवात केली व त्याच्या मुखातून "हसतमुख हे साटम गुरुजी । चित्त धरावे त्यांचे पायी " हे पद बाहेर पडले.सर्वांसमक्ष हा अलौकिक चमत्कार घडला.त्या दिवसांपासून तो मुलगा बोलू लागला. एका लग्नाच्या प्रसंगी समर्थ व राजेसाहेब हे तंडोली या गावी गेले होते.त्या ठिकाणी समर्थ आपल्या आसनावर विराजमान झाले होते.एवढ्यात तिथे वामन्या देवळी नामक जन्मतः मुका मंडपात घुसला.रडण्याचा बेसुर आवाज करत तो समर्थांच्या पायावर येऊन पडला.समर्थांनी लागलीच त्याच्या जोरदार श्रीमुखात भडकावली.तो त्या माराने दूर जाऊन पडला आणि "साटम महाराज की जय !". असे म्हणू लागला. जन्मजात मुका मुलगा बोलू लागला यावर कुणाचा क्षणभर विश्वासच बसला‌ नाही.पण समर्थांच्या कृपेने हे दिव्य अघटित घडले होते.हे बघुन सर्वांनी एकमुखाने समर्थांचा जयघोष केला.तसेच कोल्हापूर येथील ख्यातनाम कलावंत कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यावर ही समर्थांचा कृपा आशिर्वाद होता.. इच्छा नसेल तर छायाचित्रकारांची फिल्म कोरी निघे. याचा अनुभव ख्यातनाम कलामहर्षी कै. बाबुराव पेंटर यांनी घेतला होता.

समर्थांचा मुक्काम जरी दाणोलीस होता तरी अधून मधून मोटारीने तर कधी चालत ते सावंतवाडी, वेंगुर्ले, गोवा, मालवण, मुंबईकडे भक्तांच्या आग्रहास्तव जात. त्यांचा वर्ण तांबुस होता, पिळदार शरीरयष्टी, तेजस्वी डोळे, ४-५ फुट उंची जणु वामनमूर्तीच वाटायची त्यांचा आवाज मधुर होता. ते सर्व भाषांतून बोलायचे, कवाली तर फार सुंदर गात. प्रथम दर्शनी त्यांची कोणावरही छाप पडत असे. राजा, भिकारी, श्रीमंत, गरीब, स्त्री पुरूष असा भेदभाव त्यांना रूचत नसे. सर्वांशी समानतेने वागायचे. त्यांचा आहार निश्र्चित नव्हता.मासांहारी अन्न ते घेत तर कधी कधी काही न खाता चार चार दिवस झोपून रहात. विश्र्वामध्ये घडणारी कोणतिही घटना दाणोलीस बसून ते सांगत. कोणाही व्यक्तीचे दुष्कर्म त्यांचा दिव्य दृष्टीतून कधीच लपत नसे.  ते लोकाभिमुख झाल्यावर त्यांच्या अवस्थेत बदल होत गेला. मौनावस्था संपून ते बाल उन्मन व पिशाच अवस्थेत नेहमी असत. ते कधी उंच दिसत तर कधी ठेंगू दिसत. कधी वजनाने जड होत तर कधी फुलासारखे हलके होत. त्यांच्या अनेक आठवणी आणि चमत्कार कोकणातील घराघरातून ऐकायला मिळतात. या सर्व चमत्कारांचे,लिलांचे वर्णन एका संक्षिप्त पोस्ट मधून करणे केवळ अशक्यप्राय आहे.आपण सर्वांनी या रसाळ व अलौकिक लिलांचे वर्णन समर्थांच्या श्री.वायंगणकर यांनी लिहीलेल्या चरित्रात जरुर वाचा.

                    नृसिंहवाडीच्या दत्त प्रभुंची सेवा करणारे आप्पा सावंत यांना देवांचा दृष्टांत झाला की मी तुला प्रत्यक्ष भेट देईल.या दृष्टांतांनंतर ते मालवणला आले व तेथेच अखंड दत्त सेवा सुरू केली.काही काळाने समर्थ त्यांच्या पुढे दत्त म्हणून उभे राहिले.समर्थांनी त्यांच्या मस्तकावर एक फटका मारला.त्या फटक्याने त्यांचा वैचारिक गोंधळ थांबला.पुढे समर्थांच्या पूर्णकृपेमुळे मालवणला चहाचे हाॅटेल चालविणारे आप्पा हे दत्त कृपांकित श्रीमद् परमहंस सदानंद सरस्वती झाले.समर्थांनी देह ठेवल्यावर दत्तप्रभुंच्या आज्ञेने ते समर्थांच्या समाधीची सेवा करण्यासाठी दाणोलीला येऊन थांबले.त्यांनी समर्थांच्या समाधीची सेवा करत समर्थांच्या नावाचा ध्वज सर्वत्र फडकाविला.नागडेबाबा उर्फ भालचंद्र महाराज कणकवली, श्री. सदानंद सरस्वती (सावंत) महाराज, श्री पेडणेकर महाराज अशा शिष्यांमध्ये आपली दैवी शक्ती संक्रमित करून समर्थांनी आपले कार्य या आपल्या दिव्य शिष्यांकडून करुन घेतले व घेत आहेत. 

                     समर्थ सद्गुरु श्री साटम महाराजांनी देह ठेवतांना ही विलक्षण आणि अनाकलनीय लिला चमत्कार केले.पुण्याहून समर्थांना तपासायला डॉ.भडकमकर यांना राजासाहेबांनी बोलाविले.डॉक्टरांनी तपासले तर समर्थांची नाडी लागत नव्हती.हृदयाचे ठोकेही बंद झाले होते.डॉक्टरी नियमाप्रमाणे प्रत्यक्ष मृत्यू घडला होता.शरीराचे स्पंदन बंद होते.पण समर्थ डॉक्टरांबरोबर बोलत होते,हसत होते.डॉक्टरांनी समर्थांच्या समोर साष्टांग लोटांगण घातले आणि बाहेर येऊन सरकारांना म्हणाले, "अशा थोर महापुरुषांचे दर्शन मी करु शकलो ही माझ्या जन्मोजन्मीची पुण्याईच मी समजतो.असा महापुरुष मी तरी पाहिला नाही." पुन्हा काही काळाने महाराज निचेष्ट झाल्याचे दिसले.एकच धावपळ झाली.समर्थ सदनात शोकाची सीमा राहिली नाही.डॉक्टर मंडळींनी समर्थांना तपासले.हृदय ,नाडी पासुन निर्णय दिला. महाराज गेले.! महाराजांनी देह ठेवला! एवढ्यात समर्थांनी नेत्र उघडले आणि गरजले ..."कसला गोंधळ चाललाय इथे ! चले जाव यहाँसे !" सर्वजण गडबडले व बिछान्यापासून दूर झाले. महाराज पुन्हा काष्टवत झाले.डॉक्टरांनी पुन्हा तपासले व म्हणाले आता खरोखर महाराज गेले.समर्थ सदनात भजन सुरु झाले.महाराजांच्या वियोगाने भक्तांनी शोक सुरु केला. एवढ्यात पुन्हा समर्थांनी डोळे उघडले,आणि ते गरजले "इथे काय चाललं आहे.ही रडारड कसली चालली आहे? अरे चले जाव यहाँसे! ज्याला रडायचे असेल तो आपल्या घरी जाऊन पोटभर रडू शकतो." आणि एका भक्ताला जवळ बोलावून म्हटले, "पुता,जे लोक रडताहेत ना,त्यांना पांढर्या सुरती कोंबड्यांचं मटन करुन खायला घाल!"  त्यांनी आपल्या प्रिय दत्ताराम नार्वेकर तथा गोंद्या या भक्ताला बोलावून काही साधने संदर्भात मार्गदर्शन केले.सायंकाळी सहाला बाळकृष्ण या भक्ताला हाक मारली व "आम्हाला आंघोळ घाल !" ही आज्ञा दिली.बाळकृष्णाने त्यांना बिछान्यातील घरातच आंघोळ घातली.त्यानंतर समर्थांनी आपला बिछाना माजघरात घालायला सांगितला. २८ मार्च १९३७ फाल्गुन कृष्ण द्वितीया शके १८५८ तुकाराम बीज या दिवशी मध्यरात्र उलटल्यावर समर्थांनी भक्तांना जवळ बोलावून म्हटले "आता मात्र मी खरंच जातो.माझी बोट आली आहे.माझा बाप मला केव्हापासून बोलावतो आहे.तुम्ही जिथे माझी आठवण काढाल तिथे मी आहे.मी जातो म्हणून रडू नका.मी तुमच्या हृदयात जोवर आहे ,तोवर तुमची माझी ताटातूट होणार नाही.ध्यानात ठेवा,मी सदैव माझ्या भक्तांच्या सन्निध आहे.हा नश्वर देह म्हणजे ईश्वर नव्हे! मायेचा त्याग करा.!" सर्वांनी समर्थांना वंदन केले.समर्थांनी ओंकाराचा दीर्घ उच्चार केला व महासमाधी घेतली.श्रीमंत बापू साहेब महाराजांनी समाधी बांधून त्यावर एक मंदिर उभारले. मुंबईत श्री. वडेर यांनी माटुंगा येथील गणेश बागेत साटम महाराजांच्या पादुका स्थापन करून तिथेच मंदिर बांधले. तेथेही मोठ्या प्रमाणावर लोक जात येत असतात. श्री. वडेर हे समर्थांचे भक्त होते. या मंदिराने मुंबईकरांची मोठी सोय करून ठेवली आहे. दि. ८ मार्च १९८५ रोजी समर्थांच्या पुण्यतिथीला दाणोली येथे समर्थांचा ब्रॉंझचा पुतळा विधिपूर्वक जयजयकारात बसविण्यात आला. हा पुतळा मूर्तिकार श्री. शामराव सारंग यांनी बनविला आहे.

आजही ८५ वर्ष उलटून गेले तरी समर्थ भक्तांच्या हाकेला धावतात.ज्यांनी हृदयातून समर्थांचा धावा‌ केला त्यांना समर्थ तात्काळ प्रचिती देतात.याचा आजही जगभरातील असंख्य भक्त अनुभव घेत आहेत.समर्थांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो आणि समर्थांच्या सुकोमल चरणी प्रार्थना करतो की त्यांनीही आम्हा सर्वांना सद्गुरु माउलींची अखंड अविरत सेवा करण्याची बुद्धी द्यावी आणि आम्हा सर्वांवर आपली अखंड कृपा करुणेची दृष्टी ठेवावी.

     ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


🙏🌺"अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सदगुरू श्रीसमर्थ साटम महाराज की जय"🌺🙏

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

3 comments:

  1. श्री.साटम महाराज जेव्हा सावंतवाडीत आले त्यावेळेस ते आमच्या वाड्यात वास्तव्यास होते...

    ReplyDelete
    Replies
    1. साटम महाराजांचे अनेक चमत्कार आम्हाला आमच्या मातोश्री आईनी सांगितले आहेत .माझे आजोळ सावंतवाडी तालुक्यातील आकेरी हुमरस येथे आहे .

      Delete
  2. https://youtube.com/@hanumantwalke8748

    ReplyDelete

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...