Saturday, May 7, 2022

ह.भ.प प्रांत:स्मरणीय सद्गुरु श्री मामासाहेब दांडेकर यांची १२६वी जयंती🌸🌺🙏

 


श्रीगुरु_मामासाहेब_दांडेकरांची_१२६वी_जयंती🙏🌸

                               आज वैशाख शुद्ध सप्तमी वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु प्रात: स्मरणीय परम पुज्य श्री मामा साहेब दांडेकर अर्थात आपले सोनु मामा यांची १२६ वी जयंती. वारकरी संप्रदायात झालेल्या संत मंडळींतील मेरुमनी म्हणजे प.पु.सोनु मामा. "आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी" या तुकोबारायांच्या वचना प्रमाणे मामा ही जणु याच भगवदकार्यासाठी जन्मास आले...कस्तुरीसारखा सुगंध आजिवन सर्वत्र पसरविला आणि तसेच श्रीपांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. पुण्यातील नामांकित एस.पी.कॉलेजचे प्राचार्य असलेले मामा नुसते शिक्षक नव्हते ,नुसते प्रोफेसर नव्हते तर त्यांनी लोकांना जिवन जगण्याचा राजमार्ग सांगितला ,माउलींनी सांगितलेल्या मार्गावर असंख्य जिवांना त्यांनी बोट धरुन चालायला शिकवीले आणि त्यांनी फक्त लोकांना शिकविलीच नाही तर ती शिकवण त्यांनी प्रथम आपल्या आचरणात आणली.त्या शिकवणिचा ,विद्येचा ,ज्ञानाचा त्यांनी स्वत: अनुभव घेतला,आनंद उपभोगला ,नंतरच तो लोकांना वाटला.

                          मामांचे मूळ गाव रत्नागिरीजवळील वायंगणी तसेच त्यांचे मुळ आडनाव हे पोंक्षे होते. पण पुढे त्यांचे घराणे रत्नागिरी जवळील "दांडे-आढुंब" या गावी राहावयास गेले म्हणुन पोंक्षाचे ते दांडेकर झाले.दांडेकर घराणे हे धार्मिक,आचारसंपन्न व दानशूर म्हणुन फार काळापासून प्रसिद्ध होते.मामांचे वडिल बंधु वै.विष्णु वामन दांडेकर ऊर्फ बाबासाहेब दांडेकर यांनी मोठी समाजसेवा केली होती.पालघरचं नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याची त्यांनी स्वार्थत्यागपूर्वक सेवा केली.आदर्श गृहस्थाश्रमी, देश व समाजाची बहुमोल सेवा करणारे पुरुष या घराण्यात होऊन गेले.परंतु मामांनी या सर्वांवर सोन्याचा कळस चढवला.अशा थोर घराण्यात वैशाख शुद्ध सप्तमी सोमवार दि. २०/४/१८९६ ला मामांचा जन्म झाला.मामांचे पाळण्यातील नाव जरी शंकर ठेवले होते,तरी घरचे सर्वजण त्यांना 'सोनू' म्हणत.सोनूचा सोन्या आणि पुढे सर्वांचे सोनोपंत झाले.आपल्या आयुष्याचे खरोखरचं त्यांनी सोने केले.मामा दिड वर्षाचे असतांना त्यांना मातृवियोग झाला.पुढे मामांच्या वडिलांनी त्यांना इंग्रजी शिक्षणासाठी पुण्यात त्यांच्या आजोळी म्हणजे सदाशिव पेठेतील चिंतामणराव सोहोनी यांचेकडे पाठवले.मामांचे नूतन मराठी विद्यालयात शिक्षण सुरू झाले. मामा १९१२ साली मॅट्रीक पास झाले.मामांचे उच्च शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले.या वेळी त्यांना प्रोफेसर म्हणुन लाभले ते म्हणजे प्रोफेसर आर.डी.रानडे म्हणजे वंदनीय प.पु.श्री गुरुदेव रानडे. असे विद्वान व अध्यात्मातही अधिकारी असलेले शिक्षक मामांना तत्वज्ञान शिकविण्यासाठी होते. यातुनच मामा हे गुरुदेवांचे लाडके विद्यार्थी बनले‌. आता मामांच्या जिवनातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे स्वानंदसुखनिवासी सदगुरु श्री जोग महाराजांची कृपा.मामांचे आजोळी म्हणजे सोहोनी यांचे घर महाराजांच्या घराजवळच होते.मामांचे मावसभाऊ माधवराव देशमुख हे त्याच वाड्यात राहतं.माधवराव हे वारकरी असल्यामुळे प.पु.जोग महाराज त्या वाड्यात रोज येत. पुढे जोग महाराज यांचे दांडेकर ,कर्वे या दोन्ही घराण्याशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध जुळले .त्यांनतर १९१० सालापासून महाराज मामंच्या घरीच जेवू लागले.तो क्रम महाराज निजधामास जाईपर्यंत चालू होता.त्यामुळे अनायासे मामांना प.पु.जोग महाराजांचा सहवास लाभत गेला.त्यांना महाराजांचे किर्तन-प्रवचन ऐकन्याचे भाग्य लाभले.त्यातुनच त्यांच्यावर महाराजांनी कृपा केली.महाराजांचे मामांवर निरतीशय प्रेम होते.त्याबद्दलचा एक प्रसंग असा मामांचा बी.ए चा निकाल होता आणि तो पाहण्यास एक अडाणी गृहस्थ गेला होता.त्याने फक्त थर्ड क्लासमधील नावे पाहिली.त्यामुळे त्यांनी महाराजांना येऊन सांगितले, 'मामांचे नाव निकालात दिसत नाही.मी दोन तीन वेळा पाहिले.' ते ऐकून जोग महाराज बेचैन झाले.त्यांनी परत हरिभाऊ जोगळेकरांना पाठवले.तेव्हा मामांचे नाव हायर सेकंडक्लासमध्ये होतेच पण शिवाय त्यांना तत्त्वज्ञानाची स्कॉलरशिप मिळाल्याचे छापले होते.हरिभाऊंनी हे महाराजांना दाखविल्यावर त्यांना विलक्षण आनंद झाला.ज्यानी पहिला निकाल आणला होता त्याचे कान पकडून ते ओरडले ,'ए गढड्या ,माझा सोन्या कधी नापास होईल काय? हुरडा फुंकणारे तुम्ही लोक,निकाल कशाशी खातात हे तरी माहीत आहे काय? म्हणे सोन्या नापास झाला!' त्या गृहस्थाचा कान चांगलाच लाल झाला होता आणि तो महाराजांना माफी मागु लागला. पुढे मामा १९१९ एम.ए ची परिक्षा उत्तिर्ण झाले.अशा उच्चशिक्षित मामांपुढे आपल्या सदगुरु श्री जोग महाराजांचे तेजस्वी उदाहरण डोळ्यापुढे चोविसतास असल्यामुळे बुवांप्रमाणे आपणही आजिवन ब्रह्मचारी राहून भागवत धर्माची सेवा करायची असे त्यांनी मनोमन ठरवले.महाराजांचीही कृपा आपल्या या लाडक्या शिष्यावर पूर्ण होतीच.मामांच्या विद्वत्तेची,त्यागाची व भगवद्भक्तीची साक्ष महाराजांना पटलीच होती आणि ते नेहमी म्हणत ,'माझे पश्चात माझा सोन्या माझे व वारकरी संप्रदायाच्या प्रचाराचे काम एकटाच करेल.पुढे झालेही तसेच.प.पु.जोग महाराजांनी ज्यावेळी आळंदीला देह ठेवला यावेळी मामाच तिथे हजर होते.मामांनाच त्यांनी "जातो" म्हणुन सांगुन देह ठेवला.

'जोगमहाराजांप्रमाणेच गुरुदेव रानडेंनाही मामांच्या पुढील आयुष्यक्रमाविषयी खात्री झाली होती.

पुढे मामांनी शिक्षण प्रसारक मंडळ,न्यू.पूना कॉलेज,नूतन मराठी शाळा येथे सुपरिटेंडेंट म्हणुन,रुईया कॉलेज आणि शेवटी १९४५ ला सर परशुराम म्हणजे पुण्यातील एस.पी कॉलेजला नोकरी केली. मामा एस.पी.कॉलेजचे प्रिन्सिपॉल झाले.

                    मामा कॉलेजमध्ये असतांना संध्याकाळी रोज पुण्यात प्रवचन करीत असत.शिवाय नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर,लक्ष्मी रोडवरील विठ्ठल मंदिर,रास्ता पेठेतील श्रीविवेकानंद सोसायटी इत्यादी ठिकाणी त्यांचे नैमित्तिक कीर्तनप्रवचनाचे कार्यक्रम होत असत. मामा इंटरमध्येच असतांना जोग महाराजांनी राहूरकरांच्या वाड्यात (तेथे मामांचे बिर्हाड होते) मामांचे पहिले किर्तन केले.बन्याबा मास्तर आदि टाळकरी मंडळी होती.जोग महाराज त्या मामांच्या पहिल्या किर्तनाला स्वत: हजर होते ,त्यांनी ते किर्तन श्रवण केले होते.म्हणजे शिक्षण सुरु असतांनाच मामांचे धर्म कार्यही सुरु झाले होते. पुढे प्रिन्सिपॉल असतांना शनिवार आला की ते मुंबई, सोलापूर,नगर अशा शे-दोनशे मैलांच्या आतील गावी जात आणि तेथे दोन दिवस मुक्काम करुन सोमवारी परत कॉलेजात येत आणि कॉलेजामधील आपले तास घेत.आषाढीकार्तीकीच्या वेळी रजा काढत.पंढरपूरची आषाढी यात्रेला कॉलेज सुरू होण्याच्या सुमारासच येते.त्यामुळे पंधरा दिवस त्यांना रजेची आवश्यकता पडत असे.ह.भ.प.बंकटस्वामी महाराज आदि मंडळी ,डिकसळ, इंदापूर, अकलूज या मार्गाने पंढरपूरला पायी जात ; त्याच दिंडीत मामाही असत. या पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांचे चुकलेले तास मामा इतर दिवशी भरुन काढत. पुढे १९५१ साली कॉलेजातुन निवृत्त झाल्यापासून जो दौरा सुरु झाला तो १९६३ पर्यंत वाढतचं गेला.प्रवास,प्रवचन,कीर्तन,व्याख्यान यांचे जणू काय वारेच त्यांच्या अंगी शिरले होते.शताब्दी उत्सव,देवांचे जन्मतिथी-उत्सव,संतांच्या पुण्यतिथी,संस्थांचे रजत-सुवर्ण,हीरक महोत्सव,यज्ञ-समारंभ,देवळाचा पाया भरणे,मंदिराचा कळस उभारणे,मूर्तीची स्थापना करणे,ग्रंथाचे प्रकाशन-समारंभ ,ज्ञानेश्वरीच्या पारायणाची समाप्ती,गावोगावचे नामसप्ताह,मुंजीनिमीत्त प्रवचन,भक्तमंडळींचे सत्कारसमारंभ,असे एक ना शंभर कार्यक्रम त्यांच्या पाठीस लागले होते.एकदा ते म्हणाले ,' आता फक्त हळदीकुंकवासाठी प्रवचन ठरविण्याचे राहिले आहे!' असे रात्रंदिवस, अविश्रांत परिश्रम पूर्वक त्यांनी आपल्या देहाची हेळसांड करीत हे भागवत धर्माचे अखंड कार्यरत आजिवन केले. एकदा त्यांनी रात्री सोलापूरला किर्तन केले,दुसर्या दिवशी नाशिकला तर तिसर्या दिवशी नागपुरात किर्तनाला उभे राहले,पाचव्या दिवशी नेवाश्याला,सहावे दिवशी पैठणला किर्तन केले.अशी अखंड धावपळ चालू होती.या सर्व कार्यक्रमांनी त्यांना फार थकवा येई.परंतु त्यांच्या प्रसन्न व हसतमुख चेहेर्यामुळे लोकांना तो नजरेस येत नसे.या सर्व कार्यक्रमानमुळे त्यांचा ताण प्रचंड वाढला आणि मामांचे ब्लडप्रेशर वाढत गेले.प्रकृतीला फार त्रास झाला.मामांनी आपल्या या प्रचंड कार्यातुन लाखो व्यसनी ,दारुड्या लोकांना पंढरपूरच्या वाटेवर लावले.मामांनी कित्येक मंदिराचे जिर्णोद्धार केले.नेवाशाचे ज्ञानेश्वर मंदिर म्हणजे मामांच्या अपार परिश्रमाचे स्मारकच आहे.प.पु.लक्ष्मणबुवा ईगतपुरीकर यांच्या इगतपुरी तील मठाचा जिर्णोद्धार मामांनीच केला.मामा ज्या गावात जात त्या गावातील जिर्ण देवालये दिसली की ते त्या देवळाचा जिर्णोद्धार करण्यासाठी तेथील मंडळींना सूचना देत.सासवड येथे श्रीसोपानदेवाचे मंदिराचा कळस उभारण्याचे कार्य मामांच्या हस्ते झाले.१९४३ साली दुसर्या महायुद्धावेळी सरकारने आळंदीहून पंढरपूरला जाणार्या आषाढ महिन्यातील पालखी यात्रेला बंदी केली होती.त्यावेळी सरदार जगन्नाथमहाराज पंडित व प्रोफेसर धनंजयराव गाडगीळ यांच्यामार्फत वारकर्यांचे म्हणणे सरकारपर्यंत पोचवले आणि तीन दिवसांपुरती पालखी नेण्याची सरकारकडून परवानगी मिळवली.या दिवसांत ज्ञानोबारायांच्या पादुका पंढरपूरास नेऊन परत आळंदीस आणल्या होत्या.

               वैदिक धर्माचे पालन व पाखंडी,नास्तिक मतांचे खंडन हे मामांचे मुख्यतः कार्य होते.स्वत: त्यांनी त्याप्रमाणे वागून लोकांना मार्गदर्शन केले.मामा रोज सकाळी व संध्याकाळी संध्या करीत आणि संध्येनंतर पंधरा एक मिनीटे ते डोळे मिटून जपास बसत.पहिली झोप झाल्यानंतर ते गादीवर डोळे मिटून काही वेळ ध्यान करीत असताना दिसत.पण मामांनी कधीही आपले स्वानुभव,साक्षात्कार ,साधकावस्था या बद्दल एक अवाक्षरही कुणाकडेही काढला नाही.त्याबद्दल कुणाला काहीही माहीती नाही.मामांची सार्थ ज्ञानेश्वरी व त्याला लिहीलेली दिडशे पानांची प्रस्तावना म्हणजे एक लघुग्रंथच आहे.तसेच मामांनी लिहीलेल्या 'वारकरी पंथाचा इतिहास' हा ग्रंथही महत्त्वाचा आहे.मामांचा 'ज्ञानदेव व प्लेटो' हा ग्रंथ तर पुढील पिढीसाठी त्यांनी दिलेला ठेवाच आहे. मामांनी श्रीतुकोबाराय ,नाथमहाराजांनी सांगितलेली किर्तन मर्यादा तंतोतंत पाळलेली दिसुन येते.किर्तनाचा अभंग घेताना ते साधकावस्था, पंढरी,देव आणि संत याशिवाय त्यात इतर विषय नसे.नाथमहाराजांनी घालुन दिलेली मर्यादा त्यांनी पुरेपुर पाळली.देशभक्त,पुढारी किती जरी मोठे असले,तरी त्यांच्या चरित्रावरची आख्याने लावून त्यांनी कधीही किर्तन केले नाही.

       मामांचा सर्वात मोठा उपदेश म्हणजे 'तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलेले आहात.एवढ्यासाठी ज्ञानेश्वरी ,तुकाराम गाथा हे दोन ग्रंथ वाचल्याखेरीस तुम्ही मरु नका. साक्षात्कारी पुरुषांचे संतांचे ग्रंथ वाचा.जो साधनेचे प्रयोग करीत आहे,त्यांचे विचार परिपक्व झालेले नसतात.आपल्या मनाप्रमाने प्रयोग करणारा लेखक,त्याला जे वाटते ते लिहीत असतो.मग मागाहून तो हिमालयाएवढी चूक झाली असे म्हणतो.अशा लोकांच्या मागे काहीजण जातात.मग ते ही तशेच चुकतात.म्हणून आपण ज्ञानदेव ,तुकाराम यांचे मागे जावे.सातशे वर्ष होऊन गेली तरी आपली वाट चुकली असे अद्याप एकानेही म्हटले नाही. मामां वापरकर्यांना दासबोध ही वाचयला अवश्य सांगत.मामा म्हणत 'समर्थांनी काही न करता फक्त मनाचे श्लोक केले असते तरी समर्थांचे नाव अमर झाले असते. मामा नेहमी म्हणत किर्तन-प्रवचन करणार्यांनी कीर्तनाचा धंदा करु नये.आपण जितके आचरतो तितकेच लोकांना सांगावे,ज्ञानाची पोकळ व्याख्याने देऊन नये. अशा प.पु.मामांनी आपला सर्व देह चंदनासारखा फक्त आणि फक्त या भागवत धर्मासाठी,वारकरी पंथासाठी झिजवला. समाजाला मार्ग दाखविण्याचे अखंड कार्यरत केले, जे बोलले तसेच आपले चरित्रातुन लागुन दाखवले व अक्षय्य असा ठसा समाजावर उठविला .अशा मामांनी दिनांक ९ जुलै १९६८ साली पुण्यातील डॉ.फाटक यांच्या दवाखान्यात आपल्या देहाची खोळ सांडली व आपली आत्मज्योत पांडुरंगाचरणी विलीन केली.दुसर्या दिवशी मामांचा देह आळंदीस आणण्यात आला.सकाळी सात वाजता निघालेली अंत्ययात्रेला ही सायंकाळी पाच वाजता आळंदीला पोचली,पुण्यातुन दहा हजार लोक पैदल भजन करत आळंदीला महायात्रेसोबत पोचले होते.प.पु.मामांच्या देहावर त्यांच्या सद्गुरु श्री जोग महाराजांच्या जवळच अग्निसंस्कार करण्यात आला व आपल्या गुरुंजवळच मामांचा देहही या पंचतत्वात विलीन झाला. अशे मामा म्हणजे वारकरी संप्रदायाचे भुषणच,एकमेवाद्वितीय रत्न.आजच्या या पावन दिनी प.पु.सोनुमामांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करुयात ,मामांया चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करुन त्यांनी दाखवलेल्या ज्ञानेश्वरीच्या राजमार्गावर आपणही चालण्याचा प्रयत्न करुयात.🌺🙏🌸

     

No comments:

Post a Comment

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...