Monday, May 9, 2022

पलूसचे योगीराज समर्थ सद्गुरु श्री धोंडीराज महाराज🌸🌺🙏🚩

 


पलूसचे_योगीराज_समर्थ_सद्गुरु_धोंडीराज_महाराज 🙏🌺

                        आज वैशाख शुद्ध नवमी भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य शिष्य प्रभावळीतील एक अलौकिक आणि दिव्य संत असलेल्या पलूस निवासी सद्गुरु श्री धोंडीराज महाराज यांची ११४ वी पुण्यतिथी.समर्थांचा जन्म मिरज तालुक्यातील कांचनपूर या खेडेगावात सन १८२० साली एका धनकर कुटुंबात झाला.त्यांच्या आई वडिलांचे नाव जिजाई व बाबाजी असे होते.धोंडीराज महाराजांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता पण महाराज हे जन्मसिद्ध होते याची कल्पना आपल्याला पुढील काही घटनांवरुन येईलच. महाराजांचे पलूस या गावाशी नाते ही विलक्षण आहे कारण महाराजांची आत्या साखूबाई मोरे या पलूसच्या पण महाराजांनी आधीच ही आपली कर्मभूमी असल्याचे ठरवून ठेवले होते किंवा ते जन्मतः पूर्वनियोजित होते असेच दिसते.कारण महाराजांच्या आत्या सखूबाई काही दिवसांसाठी कांचनपूरला आपल्या माहेरी मुक्कामी आल्या होत्या.पण माघारी सासरी परततांना लहानग्या धोंडीराजाने आत्या सोबत पलूसला जाण्याचा खूप हट्ट केला.हट्टामुळे नाईलाजाने त्यांना पळूसला पाठविले गेले पण आश्चर्य असे की त्यानंतर धोंडीराज महाराज परत कधीही घरी गेले नाही.ते कायमचे पलूसलाच वास्तव्य करुन होते.ते आपल्या आत्याकडीत गुरेढोरे राखीत.पुष्कळसा वेळ त्यांचा जंगलातच जात असे.आत्याच्या गुरांसोबत गावातील इतरांचेही गुरे-ढोरे राखण्याचे काम महाराज करीत.आत्याकडे आले तेव्हा धोंडीराज महाराजांचे वय अतिशय लहान होते म्हणून सर्वजन त्यांच्या कडून खुप काम करुन घेत असत आणि महाराज ही आनंदाने सर्वांची कामे करीत.फावल्या वेळात दोर विणणे,घोंगड्या तयार करण्याचे कामे ही महाराज करीत.लहान वय असतांनाच ही महाराज कधीही आपल्या समवयस्क मुलांबरोबर खेळात रमले नाही.ती अतिशय मितभाषी व अंतर्मुख राहत असत.एकांतात चिंतनात वेळ घालवण्याची त्यांना आवड होती.जसेजसे वय वाढू लागले तसेतसे धोंडीराज महाराजांची अंतर्मुखता अधिकाधिक वाढू लागली व त्याची परिणीती अशी झाली की महाराजांनी आपल्या आत्याच्या घराचा ही त्याग केला.आता ते जंगलात एकटेच राहू लागले.पलूस गावानजीक असलेल्या दावल मलीक दर्गा ,कुंडल रोडवरील मायाप्पा मंदीर, सागरेश्वराचा डोंगर व गावातील धर्मशाळा हेच महाराजांच्या वास्तव्याची ठिकाण झालेत.या काळात महाराजांचा कुणाशी ही कसलाही संपर्क नव्हता.ते कुणाशीही काहीच बोलत नसत

सतत अखंड मौन, कमालीची अंतर्मुख वृत्ती व कुणी बोलायचा प्रयत्न जरी केला तरी त्याला कसलाही प्रतिसाद महाराज देत नसत. समर्थांच्या वर्तनातील ही टोकाची अंतर्मुख आणि एकाकी वृत्ती पाहून त्यांच्या घरचे सर्व मंडळी अतिशय चिंतेत पडले.कुणालाही महाराजांच्या अशा वागण्याचा अर्थ न कळल्यामुळे खूप गोंधळ उडाला.महाराजांचे वय जसे जसे वाढत होते तसे तसे महाराजांच्या वृत्तीत विलक्षण अंतर्मुखता वाढत गेली.पलूसकरांसाठी तर हा सुरवातीला चेष्टेचा विषय झाला.

          पण याच कालात महाराजांच्या जिवनातील सर्वात महत्वाची घटना घडली व ती म्हणजे सद्गुरु माउलींची भेट व त्यांचा कृपा अनुग्रह.तत्कालीन मान्यतेनुसार याच सुमारास महाराजांची भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ माउलींशी भेट झाली होती.कारण याच काळात स्वामी समर्थ महाराज हे मंगळवेढे गावात वास्तव्यास होते.याच कालावधीत धोंडीराज महाराजांची‌ व स्वामी समर्थ माउलींची भेट झाली व स्वामींनी त्यांना अनुग्रह दिला असा कयास बांधला जातो.पुढे सद्गुरु धोंडीराज महाराजांनीही आपले सद्गुरु भगवान अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आहेत असे निकटच्या भक्तांना सांगितले होते.अनुग्रहानंतर महाराज जास्तीत जास्त नामस्मरणात दंग राहू लागले.मुळातच अंतर्मुख असलेले महाराज आता या जगाशी अलिप्तच झाले.त्यांचा संचार जरी सर्वत्र असला तरी ते सदा सर्वकाळ रामनामातच गुंतलेले असत.एक क्षण ही ते इतरत्र वाया घालवत नसत.महाराज या काळात मंदिरात मुक्काम करीत व सकाळी जंगलात फिरत असतं.लहर आली तर काखेला झोळी अडकवून गावात कुणाचाही घरापुढे जात व "धोंड्याला भाकरी वाढा" असे म्हणत.ही झोळीतील भिक्षा घेऊन महाराज जंगलात येत.त्यातील सर्व अन्न एकत्र करुन ते जंगलातील पशु-पक्षांसोबत वाटून खात असत. मुळातच विरक्त असलेले महाराज आता अधिकच विरक्त झाले.एक खांद्यावर घोंगडी व झोळी,एक तांब्या व एक काठी हाच काय तो महाराजांचा संग्रह.एवढ्याच वस्तु ते‌ जवळ ठेवीत.त्यांची उन्मनी व अवलिया वृत्ती बघून लोक त्यांना 'वेडा धोंडी' म्हणत असत.त्यांची काही नतद्रष्ट लोकं टिंगल‌ टवाळी ही करत व‌ कुणी दगड-धोंडे ही मारत.पण परब्रह्माशी एकरुप झालेल्या महाराजांना या कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नव्हता.महाराजांनी अखंड अहोरात्र साधन केले आणि त्यायोगे म्हणा किंवा मुळातच त्यांच्या ठाई नित्य वस्तीस असलेल्या सिद्धी या चमत्कार रुपाने आता प्रगट होऊ लागल्या.त्यामुळे महाराजांच्या ठाई काहीतरी विलक्षण दैवी सामर्थ्य वास करुन आहे याची जाणीव आता त्यांच्या संपर्कात येणार्या लोकांना होऊ लागली.आता हेच लोक वड्या धोंड्याला 'धोंडीबुवा' किंवा 'धोंडीराज महाराज' असे संबोधू लागले.धोंडीराज महाराज स्वतःहून कुठलाही चमत्कार वा कसली अलौकिक शक्ती चा वापर करत नसत.मुळात महाराज याबद्दल अतिशय दूर होते.

                              एकदा सातार्यातील चिंतुबुवा नामक गृहस्थाला मुळव्याधीचा प्रचंड त्रास सुरु झाला.हा त्रास त्याला इतका असह्य झाला की आता आपण आत्महत्या करावी असा सतत विचार त्याच्या मनात येऊ लागला.पण कुणा आप्ताने त्याला एखाद्या सत्पुरुष,संताला शरणं जाण्याचा सल्ला दिला.शेवटचा उपाय म्हणून तो सांगण्यानुसार लोकांना विचारत पलूस ला धोंडीराज महाराजांच्या जवळ दर्शनाला येऊन पोचला.पलूसला गेल्यावर तो महाराजांच्या दर्शनाला वाकला तेवढ्यात महाराज म्हणाले, "अरे,तु इथे का आला? मी असल्या भानगडीत पडत नाही.त्याने नसती लचांडे मागे लागतात.आपल्यालाच ते निस्तरावे लागते.तू गोंदवल्यास जा.गणूबुवांनी (आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) तेथे‌ रामाच्या नावाचा बाजार उघडला आहे.बाजारातील माल खरा आहे.तिथे‌ तुझे काम नक्की होईल." असे बोलून महाराजांनी त्याला गोंदवल्यास धाडलं.चिंतुबुवा गोंदवल्यास श्री गोंदवलेकर महाराजांना शरणं गेला व काही काळाने व्याधीमुक्त ही झाला. यावरुन महाराजांची चमत्कार व प्रसिद्धी बद्दल किती टोकाची अनास्था होती हे दिसून येते.उगीच आपल्या भोवती भक्तांची गर्दी जमवून बाजार भरवणे त्यांना अप्रिय होते. कुणी उगाच पाया पडू लाडले‌ तर हातातील काठीचा जोरदार तडाखा ते त्या‌ व्यक्तीच्या पाठीत देत. तासगावातील एक ब्राह्मण महाराजांच्या दर्शनास आला.त्याने‌ महाराजांना प्रश्न‌ केला की, "धर्माचा र्ह्यास होत आहे.अशा वेळी भगवंतांचा अवतार होईल का?" त्यावेळी महाराजांनी हसत हसत आपले दोन्ही हात पसरले.जणू आम्हीच अवतार आहोत असे‌ त्यांनी‌ त्या कृतीतून दाखवून दिले.एकदा एका भक्ताने त्यांना विचारले , "महाराज, आपण काशीला जाऊया का?" त्यावर धोंडीराज महाराज म्हणाले, "आम्ही बसू तिथं काशी हाय,आम्ही बसू तिथं पंढरी हाय" असे मार्मिक उत्तर दिले.महाराज आनंदात असले की आपल्याबद्दल कधी कधी जवळच्या भक्तांना माहिती सांगत.ते म्हणत , "आपण अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे अनुग्रहीत आहोत." स्वामींबद्दल धन्योद्गार काढतांनी ते म्हणत, "अक्कलकोट दर्या है." महाराजांच्या हातून कळत नकळत अनेक चमत्कार घडत असतं पण महाराजांनी त्याला कधीही अवास्तव महत्व दिले नाही व कधीही त्याला उत्तेजन ही दिले नाही. ते आपल्या दर्शनाला आलेल्या सर्व भक्तांना रामनाम घ्यायला सांगत.ते नामाचं महात्म्य सांगताना म्हणत की , "कुठं बी बसावं, राम राम म्हणावं." महाराजांचा अन्नदानासाठी विशेष आग्रह असे. 'दीनदुबळे गोरगरीबांना अन्नदान करावे' असा ते आपल्या भक्तांना सल्ला देत.गोसावी,नंदीबैल घेऊन फिरणारे भटक्या जाती जमातींबद्दल त्यांना विशेष कणव होती.ते या लोकांना बोलावून आदराने जेऊ घालत असत. आजिवन महाराजांनी अखंड नामस्मरणाची कास धरली.अतिशय खडतर असे महाराजांचे जिवन होते.त्यांनी कधीही उन-वारा_पाऊसाची,भुकेची पर्वा केली नाही.रामनामात दिवसरात्र रंगून जाणे हीच त्यांची अखंड साधना. या नामसाधनेतून अनेकाविध चमत्कार त्यांच्या हातून घडले.पलूसच नाही तर पंचक्रोशीतील असंख्य लोकांना याचा प्रत्यय आला.दूरदूरुन लोक महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. महाराजांची राहणी अतिशय सामान्य व साधी होती.ते नित्य एक लंगोटी परिधान करीत.अंगात सदरा व बाराबंदी,तसेच खांद्यावर घोंगडी.डोक्यावर मळकट-लालसर मुंडासे.जे अतिशय सैल बांधलेले असल्यामुळे इकडे तिकडे घसरत असे.पायत चर्मपादुका,हाती काठी,खांद्याला झोळी त्यात एक ताट व तांब्या.त्यांना कसलिही आसक्ती नसली तरी त्यांना खाण्यामध्ये शिळी भाकरी व पिठले अतिशय प्रिय होते.धोंडीराज महाराजांचे तत्कालीन अनेक संतांनी अतिशय प्रेम आदराचे व सख्याचे संबंध होते.वरील गोंदवलेकर महाराजांच्या प्रसंगातून आपण ते बघितलेच आहे.महाराज देहात असतांनाच जवळपासच्या पंचक्रोशीत अनेक अवतारी संत देहात वावरत होते.श्रीधोंडीबुवांच्या संत पंचायतनेच्या संकल्पनेत ते स्वतः, श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट महाराज, फलटणचे हरी बुवा महाराज, श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज कोल्हापूर व अण्णा बुवा मिरज या सत्पुरुषांचा समावेश ते करीत असत. श्रीधोंडीबुवा महाराजांच्या भेटीसाठी सटाणा येथील थोर महापुरुष देवमामलेदार महाराज,चित्रकुट येथील माधवनाथ महाराज ,मायणीचे यशवंतबुवा,राजबूवा घोटी हे संत महापुरुष पलूसला येऊन गेले होते.संत श्री गाडगे बाबांनी व आळसंद येथील लिंगेश्वर महाराजांनी श्रीधोंडीराज महाराजांबद्दल धन्योद्गार काढले आहेत. सद्गुरु श्री धोंडीराज महाराजांच्या शिष्य परिवारात पुसेसावळीचे कृष्णदेव,चाफळच्या सखाराम बुवा फणसे अशा सत्पुरुषांचा समावेश होतो.फलटणचे थोर संत सद्गुरु श्री गोविंद काका उपळेकर यांचे महाराज हे परमगुरु आहेत.

                    सद्गुरु श्री धोंडीराज महाराजांनी आपल्या सर्व भक्तांना सतत रामनाम घेण्याची, अन्नदान करण्याचीच आज्ञा करत.हीच शिकवण त्यांनी आपल्या चरित्रातून सर्वांना दिली.ते सांगत सर्वांनी आपल्या मर्यादेत राहावे,नोकरी-धंदा यथायोग्य करावा,कष्ट करण्यास लाजू नये,लबाडी करु नये,दिन-दुबळे, प्राणी पक्षी या सर्वांप्रती प्रेम ठेवावे.दारी येणार्या याचकाला उपाशी पोटी पाठवू नये.महाराज कधीही कुणालाही आपल्या पाय पडू देत नसत‌ तसे केले तर हातातील काठीचा दणका त्या व्यक्तिस मिळत असे.अशा लोकविलक्षण, दत्तावतारी महापुरुषांनी आजच्याच तिथीला वैशाख शुद्ध नवमी ला सन १९०८ रोजी पलूस येथे आपल्या देहाचा त्याग केला .आजही महाराजांच्या कृपा करुणेची प्रचिती भक्तांना येते,आजही पलूस येथे समाधीचे दर्शन घेतल्यावर आर्त मुर्मुक्षू भक्तांना मार्गदर्शन मिळते, अनुभूती येते.अशा या लोकविलक्षण अवधूत वृत्तीत राहणारे ,सदा सर्वदा प्रसिद्धीपासून दूर राहणारे संतश्रेष्ठ सद्गुरु श्री धोंडीराज महाराजांच्या चरणी या पावन पुण्यतिथी दिनी माझा शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम.श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनीही आपल्याला भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणात ,सेवेत दंग राहण्याची बुद्धी द्यावी,विवेक द्यावा. ही यांनीच शब्दरुपात लिहून घेतलेली शब्दसुमनांजली त्यांच्याच सुकोमल चरणी अर्पण करतो‌ व इथेच थांबतो.

  ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

No comments:

Post a Comment

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...