Sunday, June 5, 2022

आज भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे शिष्योत्तम,अंतरंग शिष्य श्रीआनंदनाथ महाराजांची ११९ वी पुण्यतिथी 🙏🌸🌺

 


आनंद म्हणे खूण सांगतो निधान । स्वामींपायी मन असो द्यावे ।। 🌸🌺🙏🌿
                            परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ माउलींचे स्वनामधन्य शिष्य,अंतरंग शिष्य , श्रीस्वामी माउलींचे प्रतिस्वरुप असलेले सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज वेंगुर्ले यांची आज ११९ वी पुण्यतिथी.जेष्ठ शुद्ध षष्ठी या पावन तिथीला सद्गुरु श्री आनंदनाथ महाराजांनी आपल्या देहाला योग मार्गाने श्रीस्वामीरायांच्या चरणी विलिन केले व ते वेंगुर्ले येथेच समाधीस्थ झाले.खरंतर महाराजांची समाधी हा जरी आपल्याला त्यांच्या दृश्य कार्याला दिलेला पूर्णविराम दिसत असला तरी, आनंदाथ महाराजांच्या कृपा करुणेची प्रचितीगंगा अखंड वेगाने आजही वाहतच आहे.भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रभावळीतील या अतिशय विलक्षण आणि थोर महापुरुष असलेल्या श्रीआनंदनाथ महाराजांचे अफाट चरित्र ,त्यांनी केलेले विलक्षण स्वामीकार्य ,त्यांच्यावर असलेली स्वामी माउलींची पूर्ण कृपा,त्यांच्या ठाई नित्य वास्तव्यास असलेले स्वामी भगवंत, महाराजांनी केलेली दिव्य आणि प्रासादिक अभंग स्तोत्रादी रचना हे सर्व अगदी अफाट आणि दिव्यत्वाची प्रचिती देणारे आहे.आज आपण श्री आनंदात महाराजांच्या चरित्राची धावती भेट घेऊ कारण शब्दमर्यादा असलेल्या एका लेखात त्यावर कुणीही प्रकाश टाकू शकणार नाही.
                                 श्रीआनंदनाथ महाराज यांचे मूळ नाव गुरुनाथ एकनाथ वालावलकर.सावंतवाडी प्रांतातील बांद्याजवळच्या मडुरे-डिगेवाडी येथे त्यांचा सन १८३० साली जन्म झाला.या वालावलकर घराण्यात पिढीजात दत्त उपासना चालत आली होती. पुढे या कुटुंबाला इतरत्र स्थलांतरीत व्हावे लागले होते.आनंदनाथ महाराजांच्या बालपणाविषयी आज जास्त माहिती उपलब्ध नाही.पण महाराजांचे बालपण भक्ती उपासनेच्या मांगल्य दायक वातावरणातच गेले असेल यात शंका वाटत नाही.मुळातच दत्तभक्तीचे बिज या कुटुंबात पूर्वीपासूनच रुजले होते कारण प्रत्यक्ष दत्तप्रभु स्वामी रायांच्या कृपा करुणेच्या विशाल वटवृक्षाखाली वाढणारे एक कृपा बिज या घरात जन्मास येणार होते.त्यामुळे "शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी" या उक्ती प्रमाणे हे कुटुंब जिवन व्यतित करणारे असणार यांत तिळमात्र शंका येत नाही.पुढे गुरुनाथ तथा आनंदात महाराजांनी तारुण्यात हरड्याचा व्यापार सुरु केला.त्याकारणाने आनंदाथ महाराजांचा मुंबईशी अधीकच संपर्क वाढला जणू ही त्यांच्या अफाट स्वामी कार्याची मुहूर्तमेढ होती.कारण याच वेळी त्यांचा मुंबईतील स्वामी भक्तात अग्रगण्य असलेले बळवंतराव भेंडे तथा तात महाराज यांच्याशी संपर्क आला.मुंबई येथील प्रिन्सेस स्ट्रीट येथे तात महाराजांची व्यापारी पेढी होती.गुरुनाथांचा बर्याच वेळा येथेच मुक्काम असायचा.तात महाराज हे जांभुळवाडीत राहत असत.श्रीगुरुनाथ हे तिथेही जात असत.मुळात शिवभक्त असलेले तात महाराज हे बाबुलनाथ येथे शिवदर्शनाला जायचे त्यावेळी त्यांच्याबरोबर गुरुनाथही जात असत.याकारणाने तात महाराज व गुरुनाथ यांच्यात अगदी जिव्हाळ्याचे व जवळचे संबंध प्रस्थापित झाले.त्यांच्यात विविध पारमार्थिक विषयांवर चर्चा होत असे पण या चर्चेचा मुळ गाभा म्हणजे भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज.स्वामींचा विषय या चर्चेत वेळोवेळी निघत असे.तात महाराजांवर स्वामी कृपा झाली तेव्हा त्यांचे वय अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते.स्वामींनी आपल्या जागी त्यांना प्रत्यक्ष शिवदर्शन घडविले होते.या सर्व घटनेचे गुरुनाथ हे प्रत्यक्ष साक्षीदार होते.गुरुनाथांना तात महाराजांमुळे स्वामींच्या दर्शनाची ओढ निर्माण झाली.त्यांची प्रथम स्वामी भेट ही अतिशय विलक्षण आहे.
                             स्वामी दर्शनासाठी व्याकूळ झालेले गुरुनाथ प्रज्ञापूरी अक्कलकोट येथे ज्यावेळी प्रवेश करते झाले तेव्हा स्वामी हे वटवृक्षाखाली असल्याचे त्यांना कळले.तेव्हा लवकरात लवकर शुचिर्भूत होऊन स्वामी दर्शनाला जाण्याचा ते विचार करत हात पाय धुण्यासाठी पाय-विहीरीत उतरले.पण त्यावेळीही स्वामींचे रुप कसे असेल,ते कसे बोलत असतील,त्यांच्या पुढे गेल्यावर काय बोलायचे ,ते आपल्याशी काय बोलतील या सर्व विचारांचे काहूर त्यांच्या डोक्यात माजले होते.या विचारांचा गोंधळ सुरु असतांनाच अचानक त्यांच्या मस्तकावर एक झाडाची डहाळी येऊन पडली.पण ही काही सामान्य डहाळी नव्हती.या डहाळीचा स्पर्श काही वेगळाच होता.तिचा स्पर्श होता क्षणीच गुरुनाथांच्या अंगात सळसळ निर्माण झाली.त्यांच्या मुलाधारातील सुप्त निद्रिस्त असलेली कुंडलीनी शक्ती जागृत होऊन उर्ध्वगामी झाली.एका विलक्षण अनुभवातून जात असतांनाच अचानक एक हास्याची झुळूक वातावरणात पसरली.एका नादासारखा हा हास्यकल्लोळ गुरुनाथांच्या कानी पडला.तो कुठून येतोय हे बघण्यासाठी गुरुनाथ पाठीमागे वळले तर तिथे प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती भगवान‌ श्री अक्कलकोट स्वामी माउली उभे होते.स्वामीराय माउली त्यांच्याकडे कृपा दृष्टीने बघत पुढे आली व त्यांनी आपल्या कृपा हस्त गुरुनाथांच्या मस्तकावर ठेवला.त्यानंतर मात्र गुरुनाथांमध्ये अंतर्बाह्य विलक्षण दिव्य असा बदल घडून आला.अक्कलकोट मुक्कामी गुरुनाथ स्वामी भगवंतांचे सर्व लिला चरित्र प्रत्यक्ष बघू लागले.अनेक अचाट अफाट अशा लिला त्यांनी प्रत्यक्ष तिथे बघातल्या.या कृपा प्रसादानंतर गुरुनाथांच्या मनात प्रपंच , लौकिक सर्व सुखांचा त्याग करुन अखंड स्वामी सेवा करण्याचा विचार येऊ लागला.पण स्वामीरायांनी त्यांना जो उपदेश केला तो आपल्या सर्वांसाठी आजन्म महत्वाचा व मार्गदर्शक आहे.स्वामींनी त्यांना जे मार्गदर्शन केले ते असे की ,"मला मिळविण्यासाठी काहीही सोडू नकोस.कारण मला सोडून असे जगात काही नाही.माझ्या असण्यातच सर्वत्रांचे असणे आहे.माझ्यापासून जर कोणी भिन्न नाही तर वगळणार काय.वासनेतून निर्माण झालेला वासनामयी जीव,त्याच्या देहप्रारब्धी जे असेल ते होईल.प्रवाहात झोकून दे.बुडणार नाहीस याची हमी.सर्व प्रवाह शेवटी मलाच येऊन मिळतात." हा स्वामी उपदेश हृदयात साठवून गुरुनाथ आता मुंबईत परतले. आता त्यांनी आपले 'गुरुनाथ' हे नाव बदलून 'गुरुदास' असे ठेवले.आता आपला हा जन्म स्वामी रायांच्या सेवेसाठी आहे हे त्यांनी मनोमन ठरविले.आपल्या पत्नी सौ.गंगाबाईंना त्यांनी अक्कलकोटला घडलेला सर्व वृत्तांत जसाच्या तसा सांगितला व आता हे जिवन स्वामीरायांच्या चरणी व्यतीत करायचे.आपण आता स्वामी सेवेतच अखंड राहण्यासाठी तळमळत आहोत अशी आपली अंत:करणाची स्थिती त्यांच्यापुढे मांडली.तेव्हा त्या महासाध्वीने महाराजांना सहर्ष परवानगी दिली.ही काय सामान्य बाब नव्हे.एका थोर महापुरुषांच्या चरित्रात त्यांच्या सहधर्मचारिणी त्यांच्याच इतक्या तयारीच्या व अधिकारी असतात हे पुष्कळ संत चरित्रातून आपल्याला लक्षात येतं.यानंतर ते अक्कलकोट येथे दाखल झाले.आता उठता बसता ते स्वामींच्या लिला पाहून आनंदाचा लाभ घेऊ लागले. गुरुदासांचा अक्कलकोटी वावर आता सर्वत्र झाला होता.त्यामुळे ते तेथील सर्व सेवेकर्यांचे परिचित झाले होते.स्वामीकृपेने त्यांची आता विदेही अवस्था झाली होती.कित्येकदा त्यांना देहभान राहत नसे.त्यात त्यांचे वस्त्र केव्हा गळून पडत हे ही त्यांच्या लक्षात राहत नसे.बहुदा ते लंगोटी नेसूनच असत.स्वामीकृपेने विविध स्तोत्र ,रचनांचे स्फुरण त्यांना होऊ लागले.स्वामी महाराज त्यांना जवळ बोलवीत व म्हणत, "आनंद करा,आनंदनाथ व्हा." हे ऐकून भक्तगणांनी त्यांचे नाव गुरदास ऐवजी "आनंदबुवा" किंवा "आनंदनाथ" असे केले.एकदा श्रीस्वामीरायांनी त्यांना चिमुकल्या सोन्याच्या पादुका दिल्या.त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या हातात छोट्याशा स्फटिकाकार पादुका दिल्या.सर्वात महत्वाचे म्हणजे एकदा स्वस्वरुपाचा बोध करवून दिल्यानंतर स्वामी माउलींनी त्यांना अगदी निकट बोलविले.गळा खाकरल्यासारखे केले नि मुखातून आत्मलिंग काढून आनंदनाथांच्या हाती सोपविले. जणू भगवती सरस्वती माउली स्वामी मुखातून आनंदनाथांच्या हाती आली.त्यांना जो श्रीस्वामीरुपाचा बोध झाला तो शब्दरुपे साकार होऊन पुढे त्यांच्या "आनंदलहरी" नामे ओवी ग्रंथांच्या प्रस्तावनेत दाखल झाला. ही प्रस्तावना पुढे कधीतरी वेगळ्या लेखातून देईलच तुर्तास ती येथे देणे शक्य नाही.

श्रीस्वामी समर्थ महाराजांनी आनंदनाथ महाराजांना दिलेले आत्मलिंग 🌸🙏🌿


                                आत्मलिंग प्राप्तीनंतर श्री आनंदनाथांकडे पाहण्याचा सर्व भक्तगणांचा दृष्टीकोन अगदी बदलून गेला.पुढे आनंदनाथ महाराज अफाट अशी स्तोत्ररचना करू लागले होते.पुढे श्रीस्वामी महाराजांनी आनंदाथ महाराजांना एका फार मोठ्या कार्यासाठी आपल्यापासून दूर पाठविले.ते महान आणि विलक्षण कार्य म्हणजे फकिर वेशात शिरडीत राहणारा एक महान गुरुपुत्र जो एका पडक्या जागेत राहत असे.ज्यांच्या विलक्षण अधिकाराला शिरडीकर अजुन तरी ओळखू शकले नाही.ते त्याला एक "वेडा फकीर" असेच समजत.वरवर वेडसर वाटणारे हे महापुरुष खरोखरीच अंतरंगी पुरते शहाणे असतात.अशापैकी एक असलेले हे अलौकिक साईनाथांचे रुप.सर्व धर्मियांसाठी पूजनीय ठरणारे असे हे साईस्वरुप होते.पण हे रुप सर्वांसमोर सांगणारा कुणीतरी अधिकारी महापुरुष हवा होता.या महत्वाच्या कार्यासाठी आनंदनाथांची निवड स्वामीरायांनी केली होती.आनंदनाथ महाराज त्यानंतर या कार्यासाठी नाशिक येथे आले.नाशिक येथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर शिरडी जवळील सावरगाव येथे त्यांनी आपला मुक्काम हलविला.निस्सिम स्वामी भक्त सरदार माधवराव विंचूरकर यांची सावरगाव येथे सत्ता होती. सावरगावी आल्या बरोबर तेथील मुस्लिम मामलेदारावर आनंदनाथ महाराजांनी कृपा केली.तेथील एका घोडेस्वार झालेल्या इंग्रज अधिकार्यांला आपल्या अलौकिक सामर्थ्याचा प्रत्यय महाराजांनी आणून दिला.महाराजांचा अधिकार बघून तो अधिकारी तात्काळ श्रीचरणी शरणं आला व महाराजांना काय हवे ते जातिने देण्याची व्यवस्था त्याने केली.त्यामुळे गावातील प्रत्येक घराघरात फक्त आनंदनाथ महाराजांचीच चर्चा होती.याच घटनेनंतर सावरगाव येथे समर्थांच्या मठाची पाया भरणी झाली असे म्हटले तर वावगे होणार नाही.मुस्लिम मामलेदारांनी आनंदनाथ महाराजांना लागणारी जमीन तात्काळ दिली.गावातील मारोती मंदिराजवळील प्राप्त जागेत जवळच स्वामी समर्थ माउलींचे पादुका मंदिर,ध्यान मंदिर व एका बाजुस पांथस्थांसाठी ओवर्या बांधण्याच्या तयारीस आनंदनाथ महाराज लागले.त्याच्याही आधी गावातील पाण्याची अडचण दूर करण्यासाठी महाराजांनी आपल्या हातातील चिमटा जमिनीवर  मारला व स्वामी मठाच्या जागेजवळील उजव्या बाजूला एक तिर्थ प्रकट केले.त्यानंतर त्या ठिकाणी लोकांकरवी खोदून छोटेखानी तळी निर्माण केली.लवकरच आनंदनाथ महाराजांनी सावरगाव येथील लोकांच्या मनात स्वामींच्या भक्तीचे बी पेरले.स्वामी महात्म्य घराघरात पोचवले.काही दिवसांतच समर्थांच्या पादुकांची गावभर जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली व नवीन पादुका मंदिरात त्यांची उत्साहात स्थापना करण्यात आली.सावरगावात महाराज आले तेव्हा ते फक्त लंगोटी नेसत.त्यांच्याजवळ एक चिमटा, कमंडलू,झोळी,कुबडी ,पायी खडावा , समर्थांच्या पादुका,अत्तरे,पुजा साहित्य एवढेच काय ते साहित्य होते.
                            पुढे काही काळाने शिरडीचे ग्रामस्थ माधवराव देशपांडे ,दगडू भाऊ गायके,नंदराम मारवाडी व भागचंद मारवाडी हे चौघे महाराजांच्या दर्शनास सावरगाव येथे आले. त्यांनी महाराजांचे दर्शन घेतलो तोच महाराज निरवानिरव करु लागले.ते त्या शिरडीवासीयांना म्हणाले, "आम्ही आत्ताच तुमच्या बरोबर शिरडीला येणार आहोत." शिरडीकर मंडळी आनंदली.लगेच सर्व निघण्यासाठी बैलगाडीत येऊन बसले तोच ते पाहून महाराज धावतच येऊन गाडीत बसले.'मी लवकरच जाऊन येतो' असे ते सावरगाववासीयांंना म्हणाले.एक तासात सर्व लोक शिरडीत येऊन पोचले.पोचताच आनंदनाथ महाराज विचारतात, "अरे,गुरु मंदिर कुठे आहे? साई कोठे आहे? गोंधळलेल्या भक्तांनी त्यांना साईंच्या नित्य पडक्या बैठकीजवळ आणले.आणि काय आश्चर्य ! सर्वांपासून नित्य अलिप्त ,एकाकी व एकांतात राहणार्या विदेही साईंचा अलिप्तपणा कुठल्याकुठे विरुन गेला.आनंदनाथ महाराज गाडीतुन उतरण्याची गडबड करु लागले.साई आपल्या जागेवरुन उठून उभे राहिले.दोघेही समोरासमोर येताच त्यांची गळाभेट झाली.साईंनी आनंदनाथांचा हात धरुन त्यांना आपल्या नित्याच्या बैठकीवर बसविले.दोघांचाही मुक संवाद चालला होता.दोघेही एकमेकांच्या नजरेत नजर टाकून बघत होतो.तोच आनंदात महाराज जवळच रेंगाळणाऱ्या शिरडीतील ग्रामस्थांकडे तिव्र दृष्टीक्षेप टाकत म्हणाले, "हिरा हो प्रत्यक्ष,हा साई प्रत्यक्ष हिरा आहे.आज जरी तुम्हाला तो उकिरड्यावर दिसत आहे तरी तो अतुल्य असा हिरा आहे.तुम्हा लोकांना भविष्यात माझ्या या शब्दांची आठवण येईल." आनंदनाथ महाराज शिरडीत आले तेव्हा साईनाथ हे सदतीस वर्षाचे होते.तब्बल दोन महिने आनंदनाथ महाराजांचा मुक्काम साईनाथांच्या बरोबर शिरडीतील पडक्या जागेत ज्याला साईनाथांनी द्वारकामाई म्हटले या ठिकाणी होता.आनंदनाथांच्या वक्तव्याने शिरडीकर खडबडून जागे झाले.आता आनंदनाथांनी साईंच्या अधिकारावर जणू शिक्कामोर्तब केले होतो.लोकांना ही जाणिव करुन देऊन आनंदात महाराज दोन महिन्यांनी  सावरगावला परतले.पुढे सावरगावातील आपल्या काही शिष्यांना महाराजांनी स्वामी सेवा ,मठ यांची व्यवस्था कशी ठेवायची ,काय नियम पाळायचे याचे सखोल मार्गदर्शन केले व त्यानंतर आम्ही अधूनमधून सावरगावी येत जाऊ असे आश्वासन देऊन सावरगाव सोडले.महाराजांचे सावरगाव येथील कार्य पूर्णत्वास गेले होतेच आता ते स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले.काही काळाने ते अक्कलकोट येथे पोचले.वासुरु आपल्या गाईला येऊन भेटले.ही भेट अवर्णनीय अशीच होती.स्वामीमाउलींच्या चरणी मस्तक ठेऊन आनंदनाथांंनी आपली हृदयातील दर्शनेच्छा पूर्ण करुन घेतली.

                          पुढे स्वामींनी आनंदनाथांना तळकोकणात जाण्याची आज्ञा केली.स्वामी आज्ञा शिरसावंद्य मानून आनंदनाथांनी अक्कलकोट सोडले.दरमजल करीत ते सावंतवाडी येथे आले.आत्मेश्वर लिंगमंदीरासमोर आनंदनाथ महाराजांनी आपला मुक्काम ठेवला.तेथेच समोर महाराजांनी समर्थांच्या पादुकांची स्थापना केली.यावेळी अन्नशांती प्रसंगी पावसाचा विलक्षण प्रसंग घडला होता.याच सावंतवाडीत आनंदनाथ महाराजांना त्यांचा प्रिय शिष्य मिळाला ज्यांनी आनंदनाथ महाराजांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द आपल्या लेखनीद्वारे लिहून ठेवले.ते शिष्य म्हणजे दत्ताजी पंडित.दत्ताजींचीच पुण्याई की आपण आज आनंदनाथ महाराजांनी निर्माण केलेले जे उपलब्ध आहेत ते अभंग ,रचना वाचू शकतो आहोत.पुढे आपल्या या शिष्यांसमवेत महाराज वेंगुर्ले येथे जाण्यास निघाले रस्त्यातील होडावडा तेथील मुठये पै यांच्याकडे आपल्याकडील स्वामी महाराजांच्या पादुकांची (एक अंगुष्ठमात्र व दुसरी संगमरवरी) यांची स्थापना केली. महाराज आता आपल्या आवडत्या निजस्थानी म्हणजे वेंगुर्ले येथे येऊन पोचले.वेंगुर्ल्यात महाराजांनी अनंत लिला केल्या आहेत.त्यांनी आपल्या नावे वेंगुर्ले कॅंप भागात मठासाठी वेगळी जागा खरेदी केरण्याची व तेथे स्वामी मठाची स्थापना करण्याची योजना आखली.पण स्वामी भेटीस्तव आता महाराज व्याकुळ झाले होते.त्यामुळे ते आधी अक्कलकोट येथे गेले.अक्कलकोटी काही काळ वास्तव्य झाले पण त्यावेळी स्वामीरायांचा समाधी लिला करण्याचा विचार सुरु होता व त्यांची त्यानुसार सावरासावर ही सुरु होती.आनंदनाथ महाराजांनी हे हेरले व या कारणाने आनंदनाथ महाराजांनी आपला मुक्काम वाढवला.शेवटी प्रत्येकाला नको असलेला प्रसंग आलाच.स्वामी माउलींनी चैत्र वद्य चतुर्दशी या दिवशी आपली समाधी लिला केली व आपली अक्कलकोटातील सगुण लिला समाप्त केली.अगदी खिन्न अंत:करणाने आनंदनाथ महाराज मुंबई ला निघाले.तेथे येऊन ते आपले गुरुबंधू ,प्रिय मित्र तात महाराजांना भेटले.तात महाराजांनी आपले शिष्य बाळकृष्ण महाराज सुरतकर यांच्या करवी पुढील स्वामी कार्य करविण्याचे ठरविले होते व त्यासाठी त्यांना पुढेही मार्गदर्शन करण्याची विनंती आनंदनाथ महाराजांना केली.आनंदनाथ महाराजांनी वेळोवेळी बाळकृष्ण महाराजांना मार्गदर्शन केले होते.बाळकृष्ण महाराज आनंदनाथ महाराजांना काका म्हणत असत.तात महाराजांना भेटून महाराज सावरगाव येथे आले.तेथील भक्तांना भेट देऊन त्यांनी शिरडीला प्रस्थान केले.त्यावेळी साईनाथांची भेट घेऊन ते वेंगुर्ले येथे परतले.एक दशक वेंगुर्ले बंदरावर स्वामी कार्य केल्यावर वेंगुर्ले कॅंप येथे जागा घेऊन महाराजांनी मठाची व राहण्याची जागा विकत घेतली.सन १८९२ ला तेथे मठ व राहण्यास जागा बांधली.चैत्र वद्याच्या अखेरीस त्यांनी तेथे एक अघटित लिला केली.त्यांनी दूर्धर रोग ,व्याधी यांच्या शमनार्थ मठाच्या समोरच्या बाजूस डाव्या अंगाला श्रीस्वामी समर्थ नामघोष करीत हातातील चिमटा जमिनीवर मारला व तीर्थाची निर्मिती केली.पुढे अनेक लोक मुक्कामी येत व या आनंदतिर्थात स्नान करुन रोग मुक्त होत असत.याच वेंगुर्ल्यात महाराजांनी अनंत लिला केल्या ,अनेकांना दु:ख मुक्त केले,अनेकांच्या व्याधी दूर केल्या,अनेकांच्या पोट पाण्याची सोय करुन दिली.महाराजांच्या सामर्थ्याची प्रचिती शेकडो जनांना येत होतीच.एका भक्ताच्या विनंतीवरून महाराज त्रंबकेश्वर मार्गे सटाणा येथे गेले.त्रंबकराज येथे पावसाने पाठ फिरवली होती.त्यावेळी महाराजांनी तेथील ब्रह्मवृदांना तीन कुंभांनी देवांना अभिषेक करण्याचे सांगुन धो धो पाऊस पाडल्याची अतर्क्य लिला चरित्रात वाचायला मिळते.सटाणा येथे काही दिवस मुक्काम करुन ते सावरगावी आले.तेथे गुरुपौर्णिमा उत्सव करुन ते साईनाथांच्या भेटीस शिरडीस निघाले.महाराज आपल्याकडे निघाले हे जाणून तिथे आपल्या पुढे बसलेल्या लोकांना साईनाथ म्हणाले, "केवढी मोठी माणसे येत आहेत बघा." महाराज तिथे गेल्यावर साईनाथांनी त्यांना आपल्या आसनावर बसविले.पुढे काही काळ साईनाथांजवळ थांबून ते आपल्या गुरुमाउलींच्या अखेरच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे आले.स्वामींनी समाधी लिला करुन आता २५ वर्ष लोटली होती.आता आनंदनाथ महाराज सत्तर वर्षाचे झाले होते.महाराज अक्कलकोटला पोचले व व्याकूळ अंत:करणाने स्वामी माउलींना आळवू लागले.तोच स्वामी महाराज पोटावर हात फिरवत मोठ्या मोठ्याने हसत त्यांच्यासमोर अवतीर्ण झाले व महाराजांना म्हणाले, "आनंदा,तुझ्या नशिबात पोरगा आहे बरं." या अनपेक्षित आशिर्वादाने आनंदनाथ महाराज चक्रावले पण स्वामी इच्छा म्हणून दंडवत प्रणाम करुन अक्कलकोटहून परतले.स्वामींचा शब्द खोटा कसा ठरेल? पुढे सत्तर वर्षांच्या महाराजांना व पन्नास वर्षांच्या गंगाबाईंना एक पुत्र झाला ज्याचे नाव महाराजांनी  गणपती असे ठेवले.पण या प्रसंगाने मुळातच विरक्त असलेले महाराज प्रपंचाकडे वळले नाही.त्यांना आता स्वामी चरणांना भेटण्याचा नित्य ध्यास लागला होता.
                                स्वामी समाधीलिला झाल्यावर दोन दशकांहून मोठा काळ महाराजांनी स्वामीनामाचा ध्वज उंच क्षितीजावर नेला होता.पण आता ते अंतर्मुख झाले होते.आता त्यांना स्वामी चरणी विसावा घ्यायचा होता.सन १९०३ ला स्वामी समाधी लिलेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली होती.स्वामी समाधी दिनाचा आनंदनाथ महाराज कुठलाही उत्सव करीत नसत.तरी त्या दिवशी ते अधिकच अंतर्मुख झाले होते.त्यांनी मठाच्या उजव्या हाताला खोदकाम करवून घेतले व भूमिगत छान खोली बनवून घेतली.हे पाहून सर्व भक्त हवालदिल झाले.लोकांना काय प्रकार चाललाय हे कळतच नव्हते तेव्हा आनंदनाथ महाराज त्यांना उद्देशून म्हणाले, "सर्वांना चिदानंद मिळवून देईल असे हे श्रीस्वामींना प्रिय असलेले गाव.यास आम्ही चिदापूर समजतो.ज्याचे भाग्य असेल तो येथे येईल.स्वामीगुरुंचे पद्यमय साहित्य निर्मीतीची आज्ञा ही आम्हास स्वामी गुरुंनीच दिली आहे.या सर्व रचना घोळवित तीन दिवस व तीन रात्र असा ध्यास धरल्यास श्रीस्वामी महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन देण्याची ग्वाही दिलेली आहे.हे लक्षात ठेवून तसा निजध्यास धरावा नि अनुभव घ्यावा." हवालदिल झाल्याला आपल्या भक्तांना उद्देशून महाराज म्हणाले, "श्रीस्वामीगुरुंचे आत्मलिंग येथे आहे.त्याला शरण जा.तुम्हास जे हवे ते मिळेल.आम्ही फक्त हा सांगावा सांगणारे आहोत.आमच्यापाशी देण्यासारखे आहे काय! श्रीस्वामी नाम जपाचा आग्रहच आम्ही धरु शकतो.आपण ज्या भक्तीने इथे वावरत आहात,ते पाहून हा स्वामीदास आनंदीत आहे.मला हे चिदापूर अत्यंत भावले आहे.येथील तिर्थाने रोगव्याधी निवारण्याची आम्ही खात्री देतो." श्रीआनंदनाथ महाराजांची ही निरवानिरव बघून अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले.आपल्या कुटुंबियांना त्यांनी पुढील मार्गदर्शन केले होतेच.पुढे त्यांना घ्यायला विशेष शिवदूत आले होते.तेव्हा त्यांना महाराजांनी ठणकावून सांगितले की, "आम्हास स्वामी सांगतील तेव्हाच आम्ही निघणार.आजपासून सहा महिने व चार दिवसांनंतर जेष्ठ शुद्ध षष्ठीला आम्ही समाधीत शिरणार" त्या प्रसंगाचे वर्णन महाराजांनी स्वतः करुन ठेवले आहे.
"नाही देखिला त्रिशूल । फोडील तुझे कोथाळ।।१।।अजुनी होई तू शहाणा । फुका भ्रमसी अज्ञाना।।२।। तुझा कैचा रे महादेव । तपी नेणती वैभव ।।३।। जाला आयुष्य निवाडा । मुका बैस की माकुडा ।।४।। सहा मास चार दिन । तेव्हा देईन ओळखण ।।५।। आनंद म्हणे आठव धरी । सोडी भ्रमाची भरारी ।।६।।
         या प्रसंगाचे वर्णन महाराजांनी आपल्या कुटुंबियांना ऐकविले होते.जेष्ठ शुद्ध षष्ठी या तिथीला फारसा गाजावाजा न करता महाराज मोजक्या भक्तमंडळी सह मठालगतच्या समाधी मंदिराकडे आले.सर्वांनी त्यांचे मनोभावे पूजन केले.महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला व स्वामी माउलींच्या गुणवर्णनाची स्तोत्रे म्हणत ते समाधीत बैसले.किंचीत शांत होऊन समाधी लावली व स्तब्ध झाले.मोठ्या जड अंतःकरणाने सर्व स्वामी भक्तांनी बाहेर येऊन समाधीची शिळा बंद केली.अशा प्रकारे स्वामीरायांचे हे रत्न परत आपल्या स्वामीरायांच्या चरणी विसावले.अशा या अतिशय थोर संतांची आज पुण्यतिथी.महाराजांनी स्वामी नामाचा पताका आजिवन वर वर नेला.स्वामीरायांच्या चरणी आपली भली मोठी प्रासादिक शब्द सेवा महाराजांनी निर्माण केली.त्यांनी स्वामी महाराजांवर पाच हजार अभंग,अद्वैत बोधामृतसार व अभेद कल्पतरु  हे दोन ग्रंथ ,तसेच गुरुस्तव , श्रीस्वामी चरित्र स्तोत्र ,भक्ती ,ज्ञान,वैराग्य,विचार,स्वरुप,चिदानंद इत्यादी विषयांवर अमाप रचना केली.आजही या प्रसादिक रचनांचे वाचन करुन अनेक लोक दु:ख मुक्त होत आहेत.आपण ही या रचना जरुर वाचाव्यात...अशा या थोर महापुरुषांच्या चरणी माझे शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम.श्रीमहाराजांनी आम्हा सर्वांना श्रीस्वामीरायांना शरणं जाण्याची बुद्धी द्यावी हिच श्रीचरणांशी प्रार्थना.

   ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

श्रीस्वामीसमर्थजयजयस्वामीसमर्थ🙏🌺🌸🌿

श्रीदत्त: शरणं मम🙏🌺🌸🌿


1 comment:

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...