Tuesday, June 28, 2022

दत्तावतार सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची १०८ वी पुण्यतिथी 🙏🌸🌺🚩

 


आराध्य_इष्टदैवत_प_पू_श्रीथोरल्या_स्वामीमहाराजांची_आज_१०८वी_पुण्यतिथी!! 🌺🌸🙏

             श्रीदत्तसंप्रदायातील मेरुमणी प्रत्यक्ष पंचम दत्तावतार असेलल्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची आज १०८ वी पुण्यतिथी. श्रीस्वामी महाराजांच्या रुपात प्रत्यक्ष दत्तप्रभुंनीच पुन्हा: शास्त्रमार्गाला , वैदिक धर्माला नवसंजीवनी दिली.श्रीवासुदेवानंद सरस्वती तथा टेंबे स्वामी महाराज यांचा जन्म श्रावण वद्य पंचमी आनंद नाम संवत्सर अग्निहोत्री कऱ्हाडे ब्राम्हण कुळात १३ ऑगस्ट १८५४ रोजी कोकणातील माणगाव श्रेत्री श्रीगणेशपंत टेंबे तथा रमाबाई या थोर दत्तभक्त सतशिल दाम्पत्या पोटी झाला‌. श्रीगणेशभट्टांना प्रत्यक्ष दत्तप्रभुंनीच गाणगापुरी आधी दृष्टांत दिला होता, आपल्या अवताराची कल्पना दिली होती.प.पू. थोरल्या स्वामी महाराजांचे प्रचंड कार्य, प्रखर शास्त्रनिष्ठा , अलौकिक अशी ग्रंथनिर्मिती , अत्यंत शास्त्रशुद्ध आणि कठोर असे शास्त्राचरण सर्व काही अतिदिव्य आणि शब्दातीतच. जणु स्वामी महाराजांच्या रुपाने भगवान आद्यशंकराचार्यांच पुन्हा अवतरले असे वाटते. श्रीथोरल्या स्वामी महाराजांना काही भक्तमंडळी भगवान श्रीवेदव्यासाचेही अवतार मानतात त्याला कारण ही तसेच आहे. भगवान व्यासांनी सर्व अवतारांवर पुराण रचले आहे पण स्मतृगामी असलेल्या परब्रह्म दत्तप्रभुंवर त्यांनी पुराण रचले नव्हते जणु ही अपूर्णता भरुन काढण्यासाठीच त्यांनी वासुदेवानंद सरस्वती हा अवतार धारण करुन "श्रीदत्त पुराण" या अलौकिक ग्रंथांची निर्मिती केली व ती उणीव ही भरुन काढली. श्रीस्वामी महाराजांची ग्रंथ संपदा बघितली तर कुणालाही आश्चर्य वाटेल इतके ते दिव्य व शब्दातीत आहे. भगवान आद्य शंकराचार्यांनंतर इतके अलौकिक साहित्य निर्माण करणारे श्री स्वामी महाराज एकमात्र असतील. एखादं स्तोत्र जरी वाचायला घेतलं तरी याची प्रचिती आल्या शिवाय राहणार नाही. श्रीस्वामी महाराजांनी अतिशय विलक्षण अशी ग्रंथ निर्मीती केली आहे त्यात श्रीदत्तपुराण, द्विसाहस्त्री गुरुचरित्र, श्रीदत्त महात्म्य, समश्लोकी गुरुचरित्र , श्रीदत्तचंपु , सप्तशतिगुरुचरित्रसार , श्रीदत्तलिलामृताब्धीसार, योगरहस्य ,शिक्षात्रयी असे अनेक ग्रंथ ,प्रकरण, पदं, अभंग ,शेकडो स्तोत्र या सर्वांचा समावेश होतो.श्रीस्वामी महाराजांचे वैशिष्ट्य असे की ते एकाच पदात वा रचनेत मोठ्या खुबीने अनेक मंत्र गुंफत असतं. म्हणजे त्याचा पाठ करतांनी इतर देवतांच्या मंत्र्यांचे, सुक्तांच्या मंत्राचेही पाठ नकळत घडतात. श्री स्वामींच्या ग्रंथाचे नसुते वाचन करुनही कित्येकांना दत्त कृपेची अनुभूती आली आहे. असे हे अलौकिक आणि प्रसादीक दिव्य वाङमय आहे. या वाङमयातील श्री स्वामी महाराजांनी दिलेली सर्वात महत्वाची देणगी म्हणजे "करुणात्रिपदी" आणि "घोरकष्टोउद्धरण स्तोत्र" ज्यांचे आज घराघरात पाठ केले जातात. या दोन्हीच्या पाठानेच कित्येक दत्तभक्तांचे असाध्य आजार, कष्ट, व्याधी, दु:ख आणि इह पारलौकिक अडथळे दूर झाले आहेत. कुणीही यांचा श्रद्धापूर्वक पाठ करून अनुभव घेऊ शकतो. 

                       श्रीस्वामी महाराजांच्या चरित्राचे अवलोकन केले तर त्यातील स्वामींचे कठोर शास्राचरण, दत्तलिला बघुन कुणीही आश्चर्याने तोंडात बोट घालावी इतके ते दिव्य आहे.आजिवन श्रीस्वामींच्या सोबत फक्त दोन छाट्या,दोन लंगोट्या,एक दंड आणि कमंडलु आणि लिहायला लेखनी व काही ग्रंथ  एवढेच सामान सोबत असायचे.स्वामींनी कधीही धनाला वा पैशांना स्पर्श केला नाही. श्री स्वामी महाराजांशी प्रत्यक्ष दत्तप्रभु संवाद साधायचे, प्रत्यक्ष विग्रह रुपाने स्वत:हून त्यांच्या सोबत राहायचे हे आपल्या सर्वांना श्रुत आहेच. श्रीस्वामी महाराजांची शास्त्र निष्ठा इतकी प्रखर होती की दाक्षिणात्य ब्राम्हणाचे घर न मिळाल्याने वीस-वीस दिवस श्रीस्वामींना उपवास घडल्याचे दाखले चरित्रात मिळतात. श्रीस्वामींना संग्रहनीमुळे ब्रह्मावर्ताला असतांना  रोज २ किमी चे अंतर पार करुन दिवसातुन १२/१३ वेळा कधी कधी २० वेळाही शुद्धी आणि स्नानासाठी जावं  लागतं असे .तेव्हा भरं उन्हात श्रीस्वामी महाराज त्या तप्त रेतीतुन चालत स्नानास जात असतं हे सर्व वाचुनच अवाक् व्हायला होतं‌. एवढेच काय तर देह ठेवण्याच्या आधी पर्यंत स्वामींनी आपल्या नित्य कर्माचा त्याग केला नव्हता. जोवर पळीतुन हातात घेतलेले जल निखळले नाही तोवर कर्म सोडले नाही इतकी प्रखर कशी कर्मनिष्ठा .प्रत्यक्ष अष्ठमहासिद्धी दारी हात जोडून तिष्ठत असतांनीही थोरल्या स्वामींनी पूर्ण अवतार काळात कधीही त्यांचा उपयोग केल्याचे दिसून येत नाही .श्रीस्वामींनी आजिवन कधीही पायात पादत्राणे व शिरावर छत्र धारण केले नाही, कधीही ते कुठल्याही वाहनात बसले नाहीत. श्रीथोरल्या स्वामी महाराजांनी २४ चातुर्मास केले होते त्यांची फक्त सुची जरी डोळ्यापुढे ठेवून अवलोकन केले तर लक्षात येईल की हिमालयापासुन थेट दक्षिणेपर्यंत स्वामींनी सर्व भारत हा फक्त पायी चालत पार केला. मानवी बुद्धीला हे सर्व अशक्यप्राय वाटावं एवढे ते अलौकिक आहे.दृश्य स्वरुपात स्वामींनी तिनं वेळा संपूर्ण भारत पादाक्रांत केला होता.  मानवी देह धारण करुन दत्तप्रभुंनी ही सर्व लिला स्वत: केली . श्रीस्वामी महाराजांनी दत्तसंप्रदायातील सर्व तिर्थक्षेत्रांना नवचेतना दिली.प्रत्येक दत्तक्षेत्रांना उपासना पद्धती,पूजा पद्धती घालून दिल्या.श्रीक्षेत्र पिठापुर ,श्रीक्षेत्र कारंजा अशी अनेक दत्तक्षेत्रे शोधली , कुरवपूर सारख्या अप्रकाशित क्षेत्री चातुर्मास करुन तिथे सर्व व्यवस्था लावून पुन्हा ते क्षेत्र प्रकाशात आणले तसेच  त्या ठिकाणी झालेली दत्तलिला ,स्थान महात्म्य सर्वां समोर आणले. श्रीदत्तसंप्रदायाला "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" हा महामंत्र ही श्रीस्वामी महाराजांनीच दिला . श्रीस्वामी महाराजांच्या चरित्रातील एक एक प्रसंग घेतला आणि त्यावर चिंतन केले तर जिवनही कमी पडेल. श्रीस्वामींची समर्थ शिष्य परंपरा पाहीली तर दत्तसंप्रदायातील थोरले ही बिरुदावली कशी सार्थ आहे याची जाणीव प्रत्येकाला होईल. श्रीस्वामी महाराजांच्या शिष्यांमध्ये श्री योगानंद सरस्वती तथा गांडा बुवा, श्री नृसिंह सरस्वती स्वामी तथा दिक्षीत स्वामी महाराज, श्री योगीराज गुळवणी महाराज, श्री दत्तमहाराज अष्टेकर तथा दिवान महाराज, श्रीसिताराम महाराज टेंबे, श्रीरंगावधूत महाराज , श्रीनाना महाराज तराणेकर ,श्री गोविंद महाराज पंडित, श्रीकेशवानंद सरस्वती तांबे ,श्रीधुंडीराज महाराज कवीश्वर  अशा अनेक महत्तम विभुतींचा समावेश होतो. 

                      टेंब्येस्वामींनी संपूर्ण भारत देश पायी फिरून सनातन वैदिक धर्माला आलेली ग्लानी दूर करून धर्माची पुनर्स्थापना केली. त्यांचे कार्य इतके अद्भुत आहे की, त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. श्रृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य श्रीमत् सच्चिदानंद शिवाभिनव भारती महास्वामींनी उपस्थितांना प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांची ओळख "गुप्तरूपातील भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य" अशीच करून दिली होती व हीच वस्तुस्थिती आहे. ते साक्षात् भगवान श्रीशंकराचार्यच होते. प. प. टेंब्ये स्वामी महाराजांनी वयाच्या साठाव्या वर्षी, गुजराथ राज्यातील नर्मदा काठावरील पवित्र गरुडेश्वर स्थानी, आषाढ शुद्ध प्रतिपदा, दि. २३ जून १९१४ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास नश्वर देहाचा त्याग केला. त्यांचे पावन समाधी मंदिर तेथे उभारण्यात आलेले आहे. श्री. गणेशपंत सातवळेकर यांनी प. प. श्री. टेंब्येस्वामींना एकदा विचारले होते की, आपल्यालाही पुनर्जन्म आहे का? त्यावर प. प. श्री. स्वामी उत्तरले, "हो आहे तर. हा तर केवळ अरुणोदय आहे." त्यानुसार प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांनी प. पू. सौ. पार्वतीदेवी देशपांडे यांना दिलेल्या आशीर्वादानुसार, समाधी घेतल्यावर लगेच दुस-या दिवशी पुन्हा त्यांच्या पोटी जन्म घेतला. तेच पुन्हा "श्रीपाद" रूपाने अवतरले. मुलाचे हे नावही स्वामींनीच आधी सांगून ठेवलेले होते. हेच श्रीपाद दत्तात्रेय देशपांडे म्हणजे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज होत. त्यांचेही अवतारकार्य  प. प. श्री. टेंब्येस्वामींसारखेच विलक्षण आहे. परवा प.पू.श्रीमामा माउलींची जयंती त्यानिमित्ताने आपण त्यांच्या ही अलौकिक अशा दिव्य चरित्राचे ओझरते दर्शन घेण्याचा प्रयत्न करु.


#अवधूत_चिंतन_श्रीगुरुदेव_दत्त🌺🙏🌺🙏

                

         ✒️✍️अक्षय जाधव आळंदी✍️✒️


जितेंद्रिय गणाग्रणीरभिरत: परे ब्रह्मणि ।

कलौ श्रुतिपथावनेऽत्रितनयोऽवतीर्ण: स्वयम् ॥

करात्तसुकमण्डलु: कुमतखण्डने दण्डभृत् ।

पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यति:॥


वासुदेव सरस्वतै भक्तानां कामधेनवे|

दत्तात्रेयावताराय टेंबे स्वामी नमोस्तुते||


श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा |

वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा ||

🚩🚩🌹🌹❤❤🙏🙏☘☘

1 comment:

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...