Wednesday, June 8, 2022

येहेळगाव निवासी समर्थ सद्गुरु योगीराज श्रीतुकाराम महाराज म्हणजे आपल्या सर्वांचे तुकामाय महाराजांची १३५ वी पुण्यतिथी 🙏🌸🌺🌿

 


धन्य ते तुकामाय गुरु समर्थ 🌸🌺🌿🙏 :-


                      एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या पुण्यभूमी हिंदूस्थानात होऊन गेलेल्या हजारो ब्रह्मनिष्ठ महापुरुषांच्या मांदियाळीतील एक अतिशय विलक्षण योगी,एक थोर ब्रह्मज्ञानी महात्मा,एक महान संत म्हणजे योगीराज श्रीतुकाराम महाराज.ज्यांना आपण सर्व लोकं "तुकामाय" म्हणूनच संबोधतो.श्री तुकामाय म्हटले की आपल्याला प्रथम आठवण होते ती म्हणजे नामावतार सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची.तुकामाय यांचे वर्णन श्रीमहाराजांच्या चरित्रात आलेले आपण वाचलेच आहे.श्रीतुकामाय हे इतके विलक्षण महापुरुष होते की त्यांचे स्वतंत्र चरित्र वाचले की बुद्धी स्तिमीत होते.एक थोर दिव्य नाथ परंपरेचे तुकामाय हे भाग होते.त्या दिव्य परमहंस नाथ परंपरेला साजेसे व त्या परंपरेचे चुडामणीच श्रीतुकामाय आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही.श्रीतुकामाय महाराजांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना जरी अनुग्रह देऊन रामनामाचा प्रचार करायला सांगितले  व सामान्य लोकांना नाम महात्म्य पटवून देऊन ,त्यांना समजेल ,उमजेल असा सहज, सोप्या असलेल्या भक्तिमार्गाला लावण्याचे कार्य सोपविले.पण स्वतः तुकामाय हे एक महान योगीराज होते.सर्व योगसिद्धीत ते स्वत: पारंगत होते याची जाणीव आपल्याला तुकामायचे चरित्र वाचल्यावर होतेच होते.पण तुकामाय महाराजांच्या चरित्रात त्यांनी भक्ती व योगाची विलक्षण, असाधारण सांगड घातल्याचे आपल्या सर्वांना लक्षात येईल. तुकामाय हे समाजातील प्रत्येक घटकाला हृदयाशी कवटाळून त्यांचे दु:ख दूर करतांना आपल्याला चरित्रात जागोजागी दिसून येतात.बहूजन समाजावर आईसारखे प्रेम करणारे तुकामाय "माय" या शब्दाला साजेस रुप,चरित्रच धारण करुन आले होते हे आपल्याला चरित्र वाचल्यावर लक्षात येईलच.आज ज्येष्ठ शुद्ध अष्टमी आजच्याच दिवशी तुकामाय महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता.आज तुकामाय महाराजांची १३५ वी पुण्यतिथी.या परमपावन दिनी आज आपण या विलक्षण लोकोत्तर आणि दिव्य महापुरुषांच्या चरित्राचे चिंतन करुयात.
                                  मराठवाड्यातील हिंगोली  जिल्ह्यातील आडमार्गावर असलेले येहेळगाव नावाचे एक लहानसे खेडे आहे.या गावात काशीनाथपंत नावाचे यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण राहत असत.अतिशय वेदशास्त्रसंपन्न ,आचारनिष्ठ व भगवदभक्त असलेले काशिनाथ हे एक चारित्रवान व्यक्ती होते.ते एका तपस्वी ऋषिप्रमाणेच आपले जिवन व्यतित करत होते.अतिशय निस्पृह आणि विचारशिल व्यक्ती म्हणून संपूर्ण गावात त्यांना मोठा मान होता.ते कुणाकडूनही दान स्विकारत नसत.त्यांनी आजन्म कधीही खोटे बोलले नव्हते.आपल्या शेतात मिळणार्या उत्पन्नावर ते आपला उदरनिर्वाह समाधानाने करित होते.ते नुसते ज्ञानी किंवा कर्मठ व्यक्ती नसुन त्यांचा योगाचाही उत्तम असा अभ्यास होता.ते दोनतीन तास ध्यान लावून बसत असतं.इतके तयारीचे साधक काशिनाथपंत होते.त्यांच्या सहधर्मचारिणी पार्वतीबाईही त्यांना साजेशा गुणांनी मंडित असलेल्या महान पतिव्रता होत्या.याच कारणाने जणू भगवंतांनी हे कुटुंब ,हे पवित्र दाम्पत्य ,ही पवित्र कुस आपल्या जन्मासाठी निवडली होती.या दोघांचाही संसार अगदी अत्री-अनसुयेसारखा धर्मपरायण पद्धतीने सुरु होता.पण यांच्या जिवनात एक शैल्य होते ते म्हणजे की यांना लग्नाच्या दहा पंधरा वर्षा नंतरही मुलबाळ नव्हते.त्यामुळे पार्वतीबाईंनी पुत्रप्राप्तीसाठी तपचं आरंभिले.त्या त्रिकाल स्नान करत,उपास व अखंड जप करत असत.भगवान दत्तात्रेय प्रभु हे त्यांचे आराध्य दैवत.तीन वर्ष त्यांचा हा नेम अखंड सुरु होता.एकदिवस दुपारी जप करत बसल्या असतांना त्यांचा डोळा लागला..तेव्हा त्यांच्या कानात शब्द उमटले की, "बाई! तुझे कष्ट पुरे झाले.मी दत्त अंशरुपाने तुझ्या पोटी जन्म घेणार आहे." काही काळ लोटल्यावर पार्वतीबाईंना दिवस गेले व शके १७३४ फाल्गुन वद्य पंचमीस मार्च १८१४ ला तिच्या पोटी प्रत्यक्ष दत्तप्रभु तुकामाय या अवताराचे प्रयोजन घेऊन जन्माला आले. जन्मताच तुकामाय हे अजानुबाहु होते.ते गौरवर्ण होते.त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज तळपत असे.डोळ्यातील तेज बघून कुणालाही त्यांच्यातील दिव्यत्वाची जाणिव होत असे.लवकर या तेजस्वी बालकाचे बारसे केले गेले व त्याचे "तुकाराम" असे नाव ठेवले गेले.पण दुर्दैवाने वयाच्या चवथ्या वर्षीच तुकारामांच्या आई चे देहावसान झाले. मुळातच विरक्त असलेल्या काशीनाथपंतांना आता अजुनच विरक्ती आली व त्यांचे संसारातील लक्ष अगदीच नगण्य झाले.त्यामुळे आता तुकाराम दिवसभर खेळात रमत असे.कुठेतरी खाणे-पिणे झाले की ते रात्री फक्त झोपायला घरी येत. तुकाराम हे जन्मताच सिद्ध होते याचा प्रत्यय देणारा एक विलक्षण प्रसंग तुकारामांच्या बालपणी घडला.एकदा तुकाराम आपल्या सवंगड्यांसमवेत नदीवर खेळायला गेले.नदीला पाणी अगदी थोडेसे होते.नदीत गड्डा करुन त्यात लपने हा या मुलांचा खेळ सुरु होता.तेवढ्यातच नदीला अचानक पाणी आले.सर्व मुले घाबरुन पटकन पाण्याबाहेर आली पण तुकाराम हे तिथेच बसून होते.सर्वांना वाटले तुकाराम पाण्यात बुडाला.मुलांनी धावत जाऊन ही वार्ता काशीनाथपंतांना सांगितली.काशीनाथपंत इतर काही जणां सोबत नदीकाठी आले.ते तुकारामांना आवाज देऊ लागले.त्यांनी आवाज दिल्याबरोबर नदीतून तुकारामांनी ओ दिला व ते पाण्यातून बाहेर आले.ही अघटीत लिला बघून काशीनाथ पंतांना लक्षात आले की हे काही तरी दिव्यच आहे.त्यांनी तुकारामांना विचारले की, "बाळ तुला पाण्याची भिती नाही का वाटली? तुझा जिव पाण्यात घाबरला नाही का?" तेव्हा तुकाराम म्हणाले , "नाही दादा! मी तेथे आनंदात होतो.प्राणनिरोध केल्यामुळे पाण्याचे भय मला वाटलेच नाही व जिवही गुदमरला नाही." हा प्रसंग घडला तेव्हा तुकाराम महाराज हे पाच वर्षांचे होते.एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे ,प्राण निरोधन करणे ही योगातील अतिशय उच्च क्रिया आहे.पुष्कळ वर्ष सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली योगाचा अभ्यास केल्यावर एखाद्यालाच ही क्रिया साध्य होते.हा प्रस़ंग घडला तेव्हा महाराज अवघे पाच वर्षांचे होते.या वरुन लक्षात येत की महाराजांना हा योग ,ही क्रिया वेगळं शिकण्याची गरजच नव्हती ते जन्मसिद्ध असल्याने त्यांना आधीच सर्व विद्या ,ज्ञान अवगत होते.तुकाराम महाराजांचे वय हे शुद्ध पक्षातील चंद्राप्रमाणे वाढू लागले.पण तरीही त्यांची विलक्षण अवलिया वृत्ती काही ठिक झाली नाही.उलट त्यांचे अस्ताव्यस्त राहणे बघून ,त्यांचे अनाकलनीय व विचित्र वर्तन बघून गावातील लोक त्यांना "वेडा तुका" म्हणत असत.पण याला एक अजुन कारण आहे.श्रद्धाहीन,अपवित्र व लबाड माणूस जर त्यांच्या कडे आला तर अशा माणसाला ते शिव्या देऊन हाकलून लावित. तुकारामांच्या शेतात काम करणार्या एका धनगरावर महाराजांचे विलक्षण प्रेम व जिव्हाळा होता.तो धनगर ही महाराजांना साधू मानत असे.त्याच्या घरी जाऊन महाराज कधीकधी कांदा भाकर खात व चिलीम ओढित.
                      पुढे एकदा येहळगावापासून जवळ असलेल्या उमरखेड गावातील चिन्मयानंद नावाचे अतिशय थोर महापुरुष पंढरपूरची यात्रा करुन परतीच्या प्रवासाला निघाले होते.ते वाटेमध्ये येहेळगावात उतरले.जणू सद्गुरु आपल्या या अवतारी शिष्याला त्यांच्या कार्याची दिशा दाखवायला व त्यांचे कार्य सुरु करण्यासाठीच येहेळगावात दाखल झाले.सकाळी चारच्या सुमारास स्नानाला श्रीचिन्मयानंद हे नदीवर गेले.नदीकाठी एका ठिकाणी त्यांना एक व्यक्ती बसलेली दिसली. श्रीचिन्मयानंदांनी आपले स्नान ,संध्या आटोपली व ते त्या व्यक्तीकडे आले. ती व्यक्ती डोळे मिटून बसली होते.थोड्या वेळात त्या व्यक्तीने डोळे उघडले.दोघांची ही दृष्टादृष्ट झाली.दोघांच्याही नेत्रातून अश्रूधारा वाहू लागल्या.ही बसलेली व्यक्ती तुकाराम महाराजच होते.श्रीचिन्मयानंद महाराजांनी तुकारामांना हृदयाशी कवटाळले.त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना अनुग्रह देऊन आत्मज्ञान दिले .त्यांना आपल्या परंपरेची दिक्षा देऊन त्यांचे "तुकाराम चैतन्य" असे नाव ठेवले.दुसर्या दिवशी "आता आपले येथील काम झाले" असे म्हणून उमरखेडास निघून गेले. तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा पुढील प्रमाणे आहे.
आदीनाथ--मच्छिंद्रनाथ--गोरक्षनाथ--मुक्ता वटेश्वर--चक्रपाणी--विमला चांगदेव--जनार्दन नरहरी--विश्वेश--केशवराज--बोपया हरिदास --कान्हया--सदानंद--कृष्णश्यामसुंदर--प्रल्हाद--नागया--एकनाथ--विठ्ठल किंकर--चिन्मयानंद--श्रीतुकाराम चैतन्य  अशी ही दिव्य गुरु परंपरा ज्यात योग व भक्तीचा दुर्मिळ आणि विलक्षण समन्वय दिसून येतो. अनुग्रह झाल्यापासून श्री तुकाराम महाराजांना भेटायला ,त्यांचे मार्गदर्शन घ्यायला व दर्शनाला अनेक लोक येऊ लागले.लोक आता त्यांना "तुकामाय" म्हणू लागले. अनेक लोक त्यांना आपले दु:ख सांगत व त्यातून बाहेर येण्यासाठी मार्ग विचारत.पुढे पुढे या लोकांचा तुकामाईंना खुप त्रास होऊ लागला.आधी तुकामाई यांना शिव्या देत,मार देत पण लोक काही त्यांचे चरण सोडत नसत. तुकामाई हे परमहंस वृत्तीत राहत.त्यांचे वागणे अतिशय दिव्य असे.ते अतिशय निष्पृह होते.त्यांच्या जवळ नेहमी एक रिकामी चिलीम असे. पण ज्यावेळी त्यांना चिलिम ओढायची असे त्यावेळी ते ती रिकामी चिलीम पुढे धरत व नुसते , "जय गरु" म्हणून मोठ्याने झुरका देत.झुरका दिल्या बरोबर त्या रिकाम्या चिलमीतून ज्वाला निघत असत.तुकामाईंजवळ टिट्या व गण्या नावाचे दोन कुत्रे होते.त्या कुत्र्यांचे व महाराजांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम होते.तुकामाईंनी खायला घातल्याशिवाय ते कुत्रे काही ही खात नसत.तुकामाईंना ढोंगी , दिखाऊ लोकांचा अतिशय तिटकारा वाटत असे.ते अजिबात परमार्थाचा ढोंगी पणा करणार्या लोकांना जवळ करत नसत.त्यांचा अनुग्रह मिळणे ही अतिशय कठीण आणि अशक्यप्राय गोष्ट होती.त्यांची कठोर परिक्षेतून पार पडून अनुग्रह घेण्यास पात्र अगदी काहीच लोक झाले म्हणून तुकामाईंचे चार पाच लोकच जवळचे शिष्य झाले.तुकामाईंचे येहेळगावातील चारच शिष्य होते पण त्यांच्या वर तुकामाईंनी जी कृपा केली ती अतिशय विलक्षण होती.एक बाबा नांगरे नावाचा कुणबी शिष्य होता.तो तुकामाई बरोबर अहोरात्र असे.त्याला तुकामाई सतत शिव्या देत पण त्याने काही तुकामाईंचे  चरण सोडले नाही.सध्याच्या मठाची जागाही यानेच दिली होती.नुसतं तुकामाईंची सेवा करुन हे बाबा नागरे पुढे त्रिकालज्ञानी‌ झाले. भुजंग नावाचा एक भक्त असाच तुकामाईंचे चरणी एकनिष्ठ होता.तसेच दत्ताराम नावाचा शिष्य तुकामाईंना रात्रंदिवस सांभाळत असे.त्याला तुकामाईंनी योगात निष्णात केले‌. मारोती नावाचा एक  भक्त होता त्याचा तुकामाईंना हजार बेलपत्र वाहण्याचा नियम होता.त्याची तुकामाईं खुप परिक्षा घ्यायचे.तुकामाई लपून बसायचे आणि मारुती हताश झाला की कुठून तरी समोर यायचे व मारुतीला म्हणायचे "आण तुझा बेल" मारुती बेल वाहत असला की त्याच्या पाठीवरुन मायेने हात फिरवायचे.एकदा तुकामाईंनी त्याला विचारले, "मारुत्या! तुझी काय इच्छा शिल्लक आहे.?"  मारुती बोलला , "तुकामाय,तुमच्या मांडीवर मरण यावे एवढेच शिल्लक उरले आहे." तुकामाई बोलले, "जा तसे होईल." एक महिन्यानंतर मारुतीला ताप आला.औषधीचा काही गुण येईना.आठव्या दिवशी रात्री तुकामाई त्याच्या घरी गेले.त्याचे डोके मांडीवर घेतले आणि त्याच्या तोंडात तिर्थ घालून त्याला "राम राम राम " म्हण असे बोलले."राम राम" ऐवजी मारुती "तुकाराम तुकाराम" म्हणत आपला देह तुकाराम चरणी ठेवता झाला.मारुतीचे पुढचे सर्व संस्कार तुकामाईंनी स्वतः केले! असाच एक प्रसंग तुकामाईंच्या चरित्रात अजुन एका ठिकाणी आला आहे.एकदा तुकामाई पुसदहून येहेळगावी जाण्यास निघाले.त्यांच्या बरोबर त्यांचे गुरुबंधू गोचरस्वामी होते.वाटेत एका गावात एक म्हातारी बाई तुकामाईंकडे दर्शनाला आली .तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले आणि प्रार्थना केली की, "तुकामाय! मी तुला शरण आले आहे.आता या देहाचा फार कंटाळा आला आहे.हा देह कधीतरी जाणारच आहे.पण त्यावेळी हे चरण मला कोठे मिळणार? आजवर मी पुष्कळ प्रपंच केला.माझ्यावर कृपा कर ,आणि आता हा देह तुझ्या पायाजवळ पडू दे." असे बोलून ती म्हातारी रडू लागली.काही केल्या ती पाय सोडेना.तुकामाईंनी बरोबरच्या गोचर स्वामींकडे पाहिले.स्वामींनी हात जोडून तुकामाईंना विनंती केली की,"दादा भाव शुद्ध आहे.आपण म्हातारीवर कृपा करावी." त्यानंतर तुकामाईंनी त्या बाईचे डोके आपल्या मांडीवर घेतले व "राम राम" म्हणत त्या बाईने आपला प्राण तुकामाईंजवळच  सोडला. श्रीतुकामाईंच्या विलक्षण अलौकिक अधिकाराची जाणीव आपल्याला या प्रसंगातून होतेच पण या जिवाला तुकामाईंनी काय गती दिली असेल याचा आपल्याला विचार ही करता येणार नाही.
                                      तुकामाई आपल्या भक्तांची सतत परिक्षा घेत असत.एकदा असेच तुकामाई व भक्तमंडळी बोलत बसले होते.तेव्हा बोलता बोलता अरण्यातील हिंस्र प्राणी पशुंचा विषय निघाला.तुकामाई म्हटले, "जंगलातील जनावरे फार उग्र असतात.जो खरा निर्भय तोच त्यांना तोंड देऊ शकतो." यावर एकजण म्हणाला, "महाराज आपण जवळ असल्यावर आम्ही मुळीच घाबरणार नाही."या त्यांच्या वाक्यात इतरांनी ही हो ला हो मिळविले.हे बोलणे संपते न संपते तोच तुकामाई जेथे बसले होते तेथे ते नाहिसे झाले व त्याजागी एक भला मोठा वाघ बसलेला दिसला.वाघ बघताच मग काय गम्मत सर्व मंडळींची त्रेधा उडाली.सर्व लोक आपला जीव मुठीत धरुन पळत दूर गेली.फक्त या लोकांच्या गर्दीत देशमुख,त्यांची बायको आणि दत्ताराम ही तिघेच निश्चिंत बसून होती.पाच मिनीटांनी वाघ जाऊन त्याजागी पुन्हा तुकामाई प्रगट झाले.तेव्हा ते बोलले "प्रत्येक जण म्हणतो तुमच्या चरणी आमची अनन्य निष्ठा आहे.पण खरी निष्ठा ही इतकी सोपी नसते.हे समजून प्रत्येकाने ती वाढविण्यासाठी अभ्यास करायला पाहिजेत." तुकामाई हे विलक्षण अवधूत स्थितीत नित्य वावरत असत.त्यामुळे वरवर पाहता ते कधीही कर्मकांड ,शुचिता वा इतर उपचार करतांनी कुणालाही दिसले नाही.तसेच ते कधीही कुणाही कडे जायचे,खायचे व राहायचे.मुळातच ब्रह्मज्ञानी ,आत्मज्ञानी अवधूताला यांची बाधा तरी कशी होणार. पण त्यांचे वर वर चे रुप बघून कर्मकांडी लोकं त्यांना टाळत असत.
                            एकदा उमरखेड ला चिन्मयानंद स्वामींचा चैत्रातील कृष्ण पक्षातील उत्सव सुरु होता.उत्सवामध्ये वेदशास्त्रपठण, भजन , किर्तन,नामस्मरण अखंड चालू असे.एका वर्षी तुकामाई उमरखेडला उत्सवासाठी आले.दुपारी बारा वाजता ब्राह्मण मंडळी पानांवर जेवण्यास बसली.सर्व व्यवस्था गोचर स्वामी स्वतः जातीने बघत होते.तुकामाई तिथे आल्याचे पाहून त्यांना अतिव आनंद झाला.स्वामींनी तुकामाईंना साष्टांग दंडवत घातला व त्यांना जेवायला येण्याची विनंती केली.त्यांनी तुकामाईंना हाताला धरुन पानावर प्रेमपूर्वक बसविले.पण याचा उलट परिणाम पानावर बसलेल्या ब्राह्मणांना झाला.सर्व ब्राह्मण मंडळी तुकामाईला आपल्या पंगतीत बसविले म्हणून नाराज झाली.त्यांनी तुकामाईच्या पानावर बसण्याचा निषेध केला व ते सर्व लोक पानावरुन उठू लागले.ही गडबड तुकामाईंच्या लक्षात आली व ते चटकन् आपल्या पानावरुन उठले व क्षणार्धात अंतर्धान पावले.ते निघून गेल्यावर ही ब्राह्मण मंडळी पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसली.सर्व लोकांनी आनंदाने त्रिसुपर्ण सुत्र म्हणण्यास प्रारंभ केला.काही मिनीटे जातात तर काय नवल, वाढलेल्या अन्नाला पाणी सुटू लागले व त्या अन्नात किडे पडले.जिकडे तिकडे गडबड उडाली.काय करावे हे कुणालाही कळत नव्हते.ही बातमी गोचर स्वामींना कळली तेव्हा ते म्हणाले, "बरोबर आहे,येवढ्या थोर ब्रह्मज्ञानी महापुरुषांचा अपमान झाल्यावर अजुन वेगळे काय होणार!कोणीतरी जा आणि तुकामाईंना शोधून घेऊन या,म्हणजे हे संकट टळेल." इकडे तुकामाई मंडपातून गुप्त झाले ते तडक एका जैनाच्या घरी आले.हा जैन श्री सद्गुरु चिन्मयानंदांचा अनुग्रहीत होता.तो एक चांगला साधक शिष्य होता.मठामधली मंडळी तुकामाईंना शोधत जैनाकडे आली तर तुकामाई आणि तो जैन व्यक्ती कांदा भाकर खात बसले होते.आलेल्या सर्व  मंडळींनी तुकामाईंना काकुळतीने मठात येण्याची प्रार्थना केली.तुकामाईंनी त्यांची प्रार्थना स्विकारली व ते सर्वांसोबत मठात आले.मठात आल्यावर ते थेट त्यांच्या सद्गुरु माउलींच्या समाधीजवळ आले तेथे त्यांनी साष्टांग दंडवत घातला.त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या.गोचरस्वामी जवळच उभे होते.त्यांच्याकडे पाहून तुकामाई म्हणाले, "अरे, हे उत्सवाचें ढोंग कशाला माजवले आहेस !" समाधीचे तिर्थ सर्व अन्नावर शिंपडायला सांगून ते जसे आले तसे न जेवताच निघून गेले.अन्नावर तिर्थ शिंपडल्यावर ते अन्न पूर्ववत झाले आणि सर्वांची जेवणे झाली.
                             एकदा तुकामाई एका धनगराच्या घरी कांदा व शिळी भाकर खाऊन आले.त्यातील थोडी भाकर त्यांनी आपल्याबरोबर आणली आणि दर्शनास आलेल्या भक्तांमध्ये वाटली.काही लोकांनी तो प्रसाद तिथेच खाल्ला,काहींनी तो आपल्या जवळ ठेवून दिला.पण एक गृहस्थाला त्याची किळस आली.तो उठून बाहेर आला आणि "विष्णवे नमः ,विष्णवे नमः" असे म्हणत त्याने तो भाकरीचा प्रसाद कुत्र्यांपुढे टाकला.घरी जाऊन आपले शुद्धीकरण करण्यासाठी त्याने स्नानही केले.पण थोड्यावेळातच त्याचे पोट दुखायला लागले.ती पोटदुखी त्याला सहन होत नव्हती.त्याच्या घरच्यांनी त्याला तुकामाईकडे आणले.तुकामाईने त्याच्याकडे बघितले,आणि जवळ बसलेल्या मुलाकडे बोट करुन विनोदाने म्हटले, "या मुलाची लघवी पाजा म्हणजे पोट दुखी थांबेल." हे ऐकून तो गृहस्थ अगदीच ओशाळला आणि "मी आपल्याला शरण आलो आहे" असे म्हणून दया करुणा करण्याची प्रार्थना करु लागला.तुकामाईंना त्याची दया आली व त्यांनी त्या माणसाच्या पोटावरुन हात फिरवीला व क्षणार्धात त्याची पोटदुखी थांबवली.टवाळखोर,अश्रद्ध आणि दांभिक लोकांचा तुकामाई चांगला खरमरीत समाचार घेत.त्या लोकांसोबत तुकामाई पिशाच्चवृत्तीने वागत.परंतु खर्या जिज्ञासु माणसांबद्दल त्यांना अतिव प्रेम असे.ते त्याला त्याचा अधिकार बघून योग्य ते मार्गदर्शन करित.कमकुवत साधकाकडून कष्ट करून घेत व त्याची चांगली तयारी करुन घेत.त्याचा पाया चांगला मजबूत झाला की ते मगच त्याच्यावर कृपा करीत.पुष्कळ साधक त्यांच्या परिक्षेला कंटाळून निघून जात.पण जे टिकत त्यांच्यावर तुकामाई विलक्षण अशी कृपा करित. त्यांना अध्यात्माच्या उच्च पदावर पोचवत असत.सश्रद्ध आणि सरळ लोकांशी तुकामाई फार प्रेमाने बोलत ,पण वाह्यात लोकांशी ते फार तुसडेपणाने वागून त्यांना शिव्या घालून हाकलून लावत.
                                 
                        सर्वांना तुकामाईंचे एकच फार सरळ उपदेशाचे सांगणे होते.ते म्हणत भगवंतांचे नामस्मरण करा आणि त्याला शरण जा,त्याच्यावर विश्वास ठेवा.माणसाने आपले अंतरंग निर्मळ करण्यावर भर दिला पाहिजे.नाम व संतसेवा करावी म्हणजे सर्व साधते हाच एकमात्र त्यांचा सर्वांना उपदेश असे. "प्रपंचात रहा,त्यांतील सुख भोगा पण पांडुरंगाला विसरू नका" हेच एक सांगणे त्यांचे प्रत्येकाला असे. खरंतर तुकामाईंची परंपरा ही नाथपंथी होती‌.या पंथात योगसाधनेवर अधिक भर दिलेला आहे.पण गहिनीनाथांपासून ते ज्ञानेश्वर माउलींपर्यंत या नाथांनी भक्तीला जास्त महत्व व प्राधान्य दिल्याचे दिसते.हीच भक्तीची परंपरा तुकामाईंनी ही राखल्याचे आपल्याला चरित्रातून दिसून येते.नाथपरंपरेला शोभून दिसेल इतके महान योगी तुकामाई होते.त्यांच्या चरित्रातील लिला वाचल्या तर कुणालाही ते कळेल.पण उमरखेडला आपल्या सद्गुरुंच्या समाधी समोर उभे राहिल्यावर किंवा पंढरीला पांडुरंगासमोर उभे राहिले की त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत असतं. बाबा बेलसरे तुकामाईंचे वर्णन तिनच शब्दात करतात.बाबा लिहीतात की तुकामाई म्हणजे , "मूर्तीमंत विरक्ती,शांति आणि आनंद". किती सार्थ वर्णन बाबांनी केले आहे. अशा या लोकविलक्षण महापुरुषांनी आपल्या अवताराची समाप्ती शके १८०९ ला जेष्ठमासी शुक्रवारी सन १८८७ रोजी जून महिन्यात रात्रीच्या वेळेस येहेळगावातच केली.तेथे आजही त्यांचे भव्य समाधी मंदिर बघायला मिळते.आजही तुकामाई आपल्याला शरण आलेल्या भक्तांना तारतात ,त्यांच्या आर्त हाकेला ओ देतात. आजच्या या परमपावन पुण्यतिथी दिनी मी तुकामाईंच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी ही आपली कृपा करुणा आपल्या सर्वांवर करावी व आपल्या सर्वांकडून अखंड सद्गुरु सेवा करुन घ्यावी.

   ✒️✍️  त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


1 comment:

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...