Tuesday, July 26, 2022

महावैष्णव संतश्रेष्ठ सद्गुरु श्री सावता महाराजांची ७२७ वी पुण्यतिथी 🙏🌸🌺🚩

 


एका जनार्दनी सांवता तो धन्य । तयाचे महिमान न कळे काही ।। 

           आज आषाढ कृष्ण चतुर्दशी संतश्रेष्ठ श्रीसावता महाराजांची ७२७ वी पुण्यतिथी. वारकरी संप्रदायात असंख्य संतांची मांदियाळी होऊन गेली.प्रत्येकाचे चरित्र ,त्यातील लिला, त्यातील भक्तीरस हा अगदी भिन्न भिन्न. प्रत्येकाने आपल्या अवतार काळात काहीतरी वेगळाच ठसा समाजावर उमटवून परब्रह्म भगवंताला आपलंसं केलं.या सर्व संतमांदियाळीतील एक म्हणजे संतश्रेष्ठ श्री सावता महाराज. सावता महाराज म्हणजे कर्म मार्गाची प्रत्यक्ष मुर्तीचं.कर्म मार्गाच्या आचरणातुनही भगवंताला आपलंसं करता येतं जणु हाच उपदेश त्यांनी सर्व मानवजातीला दिला.


धन्य ते अरण रत्नाचीच खाण । जन्मला निधान सावता तो ।।

सावता सागर प्रेमाचा आगर । घेतला अवतार माळ्याघरी ।।

धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता । साठविला दाता त्रैलोक्याचा ।।

नामा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला । वंश उद्धरिला माळीयाचा ।।

               अशा या संतश्रेष्ठ श्री सावता महाराजांचा जन्म पंढरपूर जवळील अरण या गावी झाला होता. माळी ही जात असल्याने सतत आपल्या मळ्यातच त्यांनी काम करतांना पांडुरंगाची भक्ती केली .त्यातच ते रममान झाले.पंढरपूर पासून अगदी जवळचं राहुनही ते कधीही पंढरपूरला गेले नाही. असे कर्मयोगी सावतोबा एकमेवाद्वितीयच. सावता महाराज हे ज्ञानेश्वर माउली आणि नामदेवरायांच्या समकालीन. सावता महाराजांची अभंग रचना अगदी थोडीच उपलब्ध आहे.काशीबा गुरव नावाच्या गृहस्थांनी त्यांचे अभंग लिहून ठेवले व संपूर्ण विश्वासाठी ठेवाच दिला आहे. सावता महाराजांच्या अल्प अभंगातुनही त्यांची उत्कट भक्ती ,त्यांची निष्ठा यांचे दर्शन होते. "कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी" म्हणणारे सावता महाराज आपल्या मळ्यातच पंढरीचा अनुभव घेत होते. अंतर्बाह्य फक्त आणि फक्त विठ्ठलभक्तीत रंगुन गेलेल्या सावतोबांनी श्रीपंढरीनाथांच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण केले होते. या अनन्यभक्तीने आपल्या मळ्यातच त्यांना भगवंतांची अद्वैतानुभूती आली आणि ते स्वत:च विठ्ठलस्वरुप झाले. त्यामुळे "ओतप्रोत भरला पांडुरंग" अशी त्यांची अवस्था झाली आणि म्हणुन ते पंढरीच्या सगुण पांडुरंगाला भेटायला कधीही पंढरीला गेले नाही.

याच भक्तीचा परिपाक म्हणून की काय प्रत्यक्ष पंढरीनाथच त्यांच्या भेटीला अरणगावात आले.जणु त्यांच्या कर्मभक्तीची ही पोचपावतीच होती. निष्ठेने भगवतस्मरण करता करता जर कर्म केले तर भगवंताला ही आपलंसं करता येतं हेच सावतोबांच्या चरित्रातुन दिसून येतं. आजही ज्याप्रमाणे आषाढ शुद्ध पक्षात सर्व संत श्रीपांडुरंगाला भेटायला येतात त्याचप्रमाणे प्रत्यक्ष पांडुरंग हे आषाढ कृष्ण पक्षात श्रीसावता महाराजांना भेटायला अरण गावी जातात.आषाढ वद्य चतुर्दशी हा सावता महाराजांचा समाधी दिन तर अमावस्या हा काल्याचा दिवस . काल्याच्या दिवशी पंढरपूर वरून निघालेली देवाची पालखी अरणगाव येथे येते . पालखी आल्यावर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता होते. सावता महाराजांना अवघे ४५ वर्षाचे आयुष्य लाभले.ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेण्याच्या एक वर्षा आधी आषाढ वद्य चतुर्दशी या दिवशी त्यांनी आपले प्राण पांडुरंगाचे चरणी विलीन केले.

सावता महाराजांची समाधी श्रीक्षत्र अरण

                   श्री सावता महाराजांनी कर्म आणि भक्ती यांची अतिशय सुंदर सांगड घालुन जगापुढे मोठा आदर्शच निर्माण केला. पंढरीला कधीही न जाता फक्त विशुद्ध अंतःकरणाने भगवंतांची शुध्द भक्ती व कर्म करता करता त्यांचे ठेवलेले अखंड अनुसंधान हाच भगवंतांच्या प्राप्तीचा राजमार्ग आहे हेच त्यांनी दाखवून दिले.धर्माचरणातील दिखावा ,बाह्य अवडंबर आणि कर्मठता याबाबत त्यांनी कसलीही भिड ठेवली नाही. याबाबत त्यांनी चांगलाच कठोर समाचार घेतला. शुद्धांतकरण , नितीमत्ता, सदाचार ,समभाव, कर्मप्राधान्य या सर्व गुणांचीच त्यांनी स्वत:च्या चरित्रातुन शिकवण दिलेली दिसुन येते. श्री भगवंतांना प्राप्त करुन घ्यायचे असले तर तप ,तिर्थयात्रा, कर्मकांड, व्रतवैकल्ये इत्यादी काहीही करायची काडीमात्र गरज नाही गरज आहे ती फक्त जेथे असाल ,जसे असाल ,जे काही करत असाल तर त्या परिस्थितीत अनन्यशरणागत होऊन शुद्धांतकरणपूर्वक त्यांची भक्ती ,चिंतन आणि स्मरण करने. बसं हाच संतश्रेष्ठ सावतोबांच्या चरित्रातील मेरुमणी. आज त्यांच्या पुण्यतिथी दिनी आपल्याला ही या जन्मात कधीतरी शद्ध अंत:करणपूर्वक भगवंतांची भक्ती करता यावी हाच आशिर्वाद आपण त्यांच्या करकमलातुन मागुयात‌. श्री संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम!!!🙏🌺🌸

   ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✍️✒️

No comments:

Post a Comment

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...