Sunday, July 24, 2022

आज गणेशपुरी निवासी सद्गुरु भगवान श्री नित्यानंद बाबांची ६१वी पुण्यतिथी🌺🚩🌸🙏

 


आज_नित्यानंदबाबांची_६१वी_पुण्यतिथी🌺🌸🙏

                                भारतभूमीत आजवर असंख्य सिद्ध,महासिद्ध,संत, सत्पुरुष,योगी,महायोगी,साधु होऊन गेलेत.त्याच सिद्ध मांदियाळीत गेल्या शतकात होऊन गेलेल्या महासिद्धांपैकी एक, एव्हाना त्यांच्यातील अग्रगण्य असलेले महासिद्ध म्हणजे श्री भगवान नित्यानंद बाबा. श्रीबाबांच्या चरित्राचा सुगंध सर्वदूर साता समुद्रापार जगभर पसरला , त्यांचा किर्ती सुगंध जगभर दरवळला. बाबांच्या दिव्यतेमुळे जगभरातील असंख्य भक्त त्यांच्याकडे आकर्षित झाले. श्रीबाबांच्या बाबतीत त्यांच्या पूर्वायुष्यातील कुठल्याही गोष्टींचे ठोस पुरावे नाहीत ,त्यांच्या जन्माबद्दल ,परिवाराबद्दल , पूर्वायुष्यातील कुठल्याही साधनेबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. 

                            भक्तांमधे अशी श्रद्धा आहे की श्रीबाबा गणेशपुरी ला अवतरण्याआधी पन्नास साठ वर्षांपूर्वी दक्षिण कर्नाटकातील कान्हनगडजवळील "गुरुवन" नामक स्थानी तारुण्यावस्थेत प्रगट झाले होते. ते कधीकधी बोलतांनी या स्थानाचा उल्लेख करीत असत.या स्थानाला त्यांची तपोभूमी म्हणुन ओळखले जाते.तेथील डोंगरांमध्ये असंख्य गुहा आहेत व याच गुहेत श्रीबाबांनी दीर्घकाळ ध्यान धारणा केली होती.या स्थानाच्या जवळ कुठेही पाण्याची सोय नव्हती तेव्हा श्री बाबांनी याच गुहेत एक झरा उत्पन्न केला आणि तेव्हापासून हा झरा आजही अविरत अखंड सुरू आहे.या झर्याला आज "पापनाशिनी गंगा" असे म्हटले जाते.हे स्थान मंगळूर जवळच आहे.आजही मंगळूर चे लोक श्रीबाबांच्या पुण्यतिथी दिनी येथे मोठा उत्सव करतात.दक्षिण भारतातील केरळ आणि मंगळूरमध्ये भगवान नित्यानंद यांनी बर्याच लीला आणि चमत्कार केले.त्यांनी पायीच असंख्य ठिकाणी प्रवास केला.या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक लोकांना रोगमुक्त केले व अनेकांचे दु:ख ,यातना आणि दारिद्रय दूर केले.आजही हे सर्व लोक गणेशपुरीला बाबांच्या दर्शनाला येतात.श्रीबाबा हे एकांतप्रिय होते.ते एकटेच राहत.ते बहुदा पायीच प्रवास करत.कित्येक लोकांना अनुभव आहे की श्री बाबा हे मनोवेगाने प्रवास करीत असत.श्री बाबांच्या चरणी अष्टमहासिद्धी नांदत असतं व यांचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे. श्रीबाबांचे जिथे कुठे वास्तव्य असे तिथे असंख्य चमत्कार ,लिला घडत पण बाबा या सर्वातुन नित्य अलिप्त असत. बाबांच्या चरित्रातील हे दिव्य प्रसंग पुढे कधीतरी सविस्तर बघुच ,त्या प्रत्येक लिलांचे चिंतन जर मांडले तर एक लिलाकोषच तयार होईल.आजही गणेशपुरीला भक्तांना या दिव्य लिलांचा नित्य अनुभव येतच आहे.

              श्री भगवान नित्यानंद बाबा हे १९३० साली मुंबई जवळील वज्रेश्वरी या ठिकाणी प्रगट झाले. वज्रेश्वरी हे अतिशय पुरातन व भव्य असं जगदंबेच ठिकाण आहे. चिमाजी आप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा ऐतिहासिक उल्लेख आहे.याच मंदिराजवळ गरम पाण्याचे कुंड आहे.या कुंडाना 'रामकुंड' असे म्हणतात.येथेच सुरवातीच्या काळात नित्यानंद बाबा वास्तव्यास होते.त्यांनी येथेच जवळ एक विश्रामगृह निर्माण केले व तेथील गरम पाण्याच्या कुंडांची डागडुजी ही केली. पुढे भक्तांच्या आग्रहाखातर बाबा वज्रेश्वरी पासून एक दिड मैल अंतरावर असलेल्या गणेशपुरी येथे राहण्यास गेले.येथील भिमेश्वर महादेव मंदिराजवळ गरम पाण्याचे कुंड आहे तेथेच श्री बाबांचा निवास होऊ लागला.पुढे आपल्या अवतार काळातील तिस-पस्तीस वर्ष त्यांनी याच ठिकाणी वास्तव्य केले.याच ठिकाणी जगभरातून असंख्य लोक येऊ लागले व याच पवित्र जागी त्यांनी आपला देह ठेवला. बाबांचे रुप अतिशय तेजस्वी होते, कुणीही त्यांच्या कडे बघितले की मोहुन जात असे. त्यांची त्वचा दिव्य तेजाने चमचमणार्या कृष्णवर्णी रत्नासमान होती.त्यांच्या मुखावर नित्य मंद स्मित विलसत असे आणि याच मंद स्मित हास्या मुळे भक्त त्यांना नित्यानंद प्रभु म्हणु लागले. बाबांची दिनचर्या अगदी सुटसुटीत होती.ते नित्य सूर्योदयापूर्वी ,भल्या पहाटे स्नान करीत.ते अत्यल्प आहार घेत.त्यांची राहणी अतिशय साधी होती.ते मितभाषी आणि नित्य अखंड मौन धारण करीत.फारच क्वचितच ते कुणाशी काही बोलत.त्यांच्या कडे बघितले तरी भक्तांना आत्मानंदाचा अनुभव येत असे.ते नित्य आत्मानंदात डुंबून राहिलेले असतं. क्वचित प्रसंगी जर कुणी त्यांना काही प्रश्न विचारला तर ते गुढ तत्वज्ञानही सहज समजेल अशा सोप्या शब्दात समजावून सांगत असत.त्यांना हिंदी,मराठी, इंग्रजी,कन्नड,तेलगू,तामिळ व मल्याळी अशा अनेक भाषा अवगत होत्या.कधीकधी ते संस्कृत श्लोक ही म्हणत असत. श्री भगवान नित्यानंद प्रभुंना सर्व भक्त "बाबा" म्हणत.त्यांच्या नुसत्या दृष्टिक्षेपात ,दर्शनाने ही असंख्य लोकांचे दु:ख दुर होत असतं.ते कधी कधी आपल्या गूढशब्दातून,हावभावातुन भक्तांच्या प्रश्नांचे उत्तरे देत. श्रीबाबांच्या निवासाला "कैलास निवास" असे नाव होते.जणु भगवान शंकरांचेच हे निवास स्थान.ते कैलास भुवनाच्या चार भिंतींच्या आत एका दगडी चौथऱ्यावर कांबळे पसरून त्यावर अगदी साधेपणाने बसलेले असत.तिथूनच ते आपल्या दूरच्या व जवळच्या भक्तांची काळजी घेत. ते क्वचितच आपले हे दिव्य स्थान सोडुन अन्यत्र कुठे गेले .कधीकधी ते आपल्या निखळ आनंदाच्या स्थितीत मुलांबरोबर आसपासच्या परिसरात फिरायला जात. त्यांचे लहान मुलांवर खुप प्रेम होते.ते त्यांना गोळ्या ,बिस्कीट ,कपडे व इतर भेटवस्तु देत असत.जवळपासची मुले सामान्यतः त्यांच्या अवतीभोवतीच असतं आणि दिवसभर कैलास भुवनात त्यांचा किलबिलाट चालू असे. भगवान नित्यानंदांची समदृष्टी होती.आपल्या कडे येणारा भक्त हा कुठल्या जातिचा आहे ,वर्णाचा आहे, तो किती शिकलेला आहे , अशिक्षित आहे ,त्याचा समाजात किती मान आहे या असल्या कुठल्याही गोष्टींना त्यांच्याजवळ स्थान नव्हते.ते प्रत्येकाशी समानच वागत.त्यांच्यासाठी सर्व जन समानच होते. त्यामुळे सर्वांना नित्यानंद बाबा माझेच आहेत असे वाटे. यामुळे बाबांजवळ हिंदू, मुस्लिम,शिख, ख्रिस्ती,पारशी,जैन अशा विविध धर्माचे लोक येत,त्यांच्या चरणी गर्दी करत. 

श्रीबाबांचा तरुण वयातील दुर्मिळ फोटो 


                श्री बाबा हे परमावधूत होते. ते कधीही झोपत नसतं.त्यांच्या कुठल्याही अंतरंगातील शिष्याने त्यांना कधीही झोपलेले बघितले नाही. श्री बाबा हे महासिद्ध ,महायोगी होते. त्यांनी असंख्य लोकांना ,भक्तांना ज्ञानमार्ग,योगमार्ग व भक्तिमार्गाला लावले.अशा या दिव्य महासिद्धांनी इ.स १९६१ ला आषाढ शुद्ध द्वादशीला मंगळवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी १० वाजुन ४० मिनीटांनी योगमार्गाने आपला प्राण ब्रह्मरंध्रात खेचून ओंकार पूर्वक अनंतात विलीन केला .अशा प्रकारे आपल्या स्थुल देहाचा त्याग करुन श्री बाबांनी महासमाधीत घेतली. श्रीबाबांचा देह पुढे ४८ तास सर्व जगभरातील भक्तांसाठी दर्शनाला कैलास भवनात ठेवण्यात आला.पुढे बाबांना गणेशपुरीला मुळ निवासस्थानी ज्याला "वैकुंठ" असे संबोधले जातअसे तिथेच वैदिक मंत्रपूर्वक समाधी देण्यात आली.या जागी आज एक मोठे भव्य मंदिर उभे आहे.त्यात श्री बाबांची सुंदर मूर्ती स्थापन आहे.हे स्थान आता जगभरातील भक्तांचे तिर्थक्षेत्र बनले आहे. आजही बाबा भक्तांच्या हाकेला धावतात ,आजही त्यांचे कार्य तसेच अविरत सुरू आहे.आजही याचा अनुभव असंख्य लोक घेत आहेत.खरंतर बाबांच्या दिव्य चरित्राचे चिंतन हे एका पोस्टमधून करणे कदापी शक्यच होणार नाही.शब्दाची मर्यादा आहे त्यामुळे कुठेतरी थांबणे अगत्याचे आहेच.पण बाबांच्या चरित्राचे चिंतन विस्तृतपणे आपण नक्कीच पुढे बघू.बाबांसारखे महसिद्ध आणि त्यांची लिला चरित्रे ही नित्य नुतन व तेजस्वी असतात.त्यातुन आपल्याला तेजस्वी जिवन जगण्याची प्रेरणा मिळते. पुढील भागात बाबांच्या काही लिला व त्यांनी दिलेला संदेश आपण वेगळा पाहु. अशा महासिद्ध श्री नित्यानंद प्रभुंच्या ,श्री बाबांच्या चरणी माझा शिरसाष्टांग दंडवत प्रणाम. श्रीबाबांच्या चरित्राचे चिंतन आपल्या सर्वांना घडो व त्यांनी आपल्या सर्वांवर कृपा करुणा करावी हीच त्यांच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग पूर्वक प्रार्थना.

       ✍️✒️ त्यांचाच चि.अक्षय जाधव आळंदी✒️✍️


#ओम_नमो_भगवते_नित्यानंदाय 🙏🌸🌺

#श्रीदत्त_शरणं_मम्🙏🌸🌺

#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ 🙏🌸🌺

1 comment:

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...