मिरज येथील थोर संत सद्गुरु श्री अण्णाबुवा महाराज यांची आज १५० वी पुण्यतिथी :-
हिंदूस्थान ही संतभूमी, देवभूमी आहे.आसेतु हिमालय या भूवर आजवर कोटी परहंस, संन्यासी,अवधूत ,सिद्ध,योगी,ज्ञानी संत होऊन गेलेत.हे संत कुठल्या संतत्वाच्या एका विशिष्ट परिभाषेत बसणारे कधीही नव्हते आणि नाहीत.प्रत्येकाचा मार्ग,वर्तन,अवस्था या अगदी भिन्न.कुणी नामयोगी तर कुणी हटयोगी,कुणी ज्ञानी तर कुणी परमहंस संन्यासी,कुणी राजयोगी तर कुणी सर्वसंग परित्याग केलेले महासिद्ध.या सर्व संत महापुरुषांना जर आपण एका विशिष्ट चाकोरीबद्ध नियमात बसवायचा प्रयत्न केला तर ती आपलीच गाढवचूक ठरेल.कारण हे प्रत्येक जण भलेही प्रवचन ,किर्तन करत नसतील,भलेही हे लोकांना उपदेश देत नसतील पण यांच्या जिवनात , प्रत्येक कृतीत , प्रत्येक शब्दात उपनिषद आणि शास्त्रांचे ज्ञान पदोपदी स्त्रवत असते.फक्त आपणच ते समजून घेण्यास असमर्थ ठरतो.असो आज अशाच एका दिव्य, जन्मसिद्ध महात्म्यांची १५० वी पुण्यतिथी.श्री सद्गुरु अण्णाबुवा महाराज हे गेल्या काही शतकात होऊन गेलेल्या अशाच विलक्षण अवलियांच्या मांदियाळीतील एक सिद्ध आहेत.श्रीअण्णाबुवां महाराजांच्या चरित्राचे आज आपण ओझरते दर्शन घेऊयात.
श्रीअण्णाबुवां महाराजांचा जन्म हा कोल्हापूर जवळील मौजे मंडपाळे या गावात विश्वंभरपंत कुलकर्णी या सदाचारी ऋग्वेदी देशस्थ ब्राह्माणा घरी झाला. सद्गुरु रामदास स्वामी महाराज यांनी स्थापन केलेल्या अकरा मारोती पैकी एक असलेल्या प्रतापमारुति हा याच मंडपाळे गावात आहे आणि विश्वंभरपंत हे या गावाचे वंशपरंपरागत कुलकर्णी होते.महाराजांच्या आईचे नाव अनसुया असे होते.बुवा महाराजांच्या जन्मतिथी व सालाबद्दल लिखीत स्वरुपात आज कुठलिही नोंद वा माहिती उपलब्ध नाही.यथावकाश बाळाचे बारसे पार पडले व पुढे जगविख्यात होणार्या या बालकाचे "दत्त दिगंबर " असे नाव ठेवण्यात आले. अण्णाबुवा बालपणापासूनच अतिशय खोडकर ,मितभाषी आणि आपल्यातच रंगणारे होते.वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना शाळेत घातले गेले.पण या लौकिक शिक्षणात बाळ दत्ताला काडीचाही रस नव्हता.ब्रह्मविद्येचे पान ज्यांनी केले आहे तो पाण्याच्या मिटक्या तरी का मारत बसेल?? अण्णाबुवा महाराज अवघ्या पाच वर्षांच्या वयात अखंड भगवत स्मरणात दंग असत. शाळेला जातो असे सांगून ते घराबाहेर पडत व थेट जंगलात जात.जंगलात जाऊन एका ठिकाणी बसुन अखंड एकाग्र मनाने भगवतस्मरण, नामस्मरणात दंग होत.शाळा सुटण्याची वेळ झाली की मग घरी परतत.एक दिवस शिक्षकांकडून आई अनसुयेला दत्ता शाळेत येत नाही हे कळले.एवढा लहानगा दत्ता शाळेत न जाता करतो तरी काय? याचा शोध घ्यायचे त्यांनी ठरविले.गुराख्यांकडून त्यांना कळले की दत्ता रानात फिरताना आम्हाला दिसला आहे.मातोश्री थेट रानात गेल्या आणि बघतात तर काय.एका विशाल आम्रवृक्षाखाली ही पाच वर्षांची बाल दत्तमूर्ती पद्मासनात बसुन गहन गूढ अशा ध्यानात निमग्न झाली होती.आपल्या बाळाला योग कुणी शिकविला? याला पद्मासनात बसून ध्यान कुणी शिकविले? याचा विचार करत त्या तिथेच बाळ दत्ता पुढे कौतुकाने बघत बसून राहिल्या.या विचारात असतांना बाळ दत्ताची ध्यान समाधी उतरली.त्यांनी डोळे उघडताच पुढे मातोश्री अनसुया दिसल्या.त्यांनी लागलीच आईच्या पायावर डोके ठेवले.आईने त्यांना हृदयाशी कवटाळले व आनंदाने बोलत दोघेही घरी परतले.विश्वंभरपंतांच्या कानी ही गोष्ट अनसुया बाईंनी घातली पण त्यांना हे काही रुचले नाही.एव्हाना दत्त दिगंबर आता आठ वर्षांचा झाला होता त्यामुळे त्यांचे मौंजीबंधन संस्कार उरकून घेण्याचे माता-पित्याने ठरविले.पण या ही वेळी दत्तांनी एक विलक्षण गोष्ट केली.ते मौंजीबंधनाला उभे राहण्यास नकार देऊ लागले.एका पंडितासारखे ते बोलायला लागले की, "मी साक्षात परब्रह्मच आहे.ब्रह्म निर्गुण निराकार ,सनातन आणि सर्वतंत्र-स्वतंत्र .तेच मी आहे.ब्रह्म मुळातच व्रतस्थ त्याचा व्रतबंध कसला आपण मांडता? इथे मुंजीचा कोण आणि ती लावणार तरी कोण? मुळात द्वैतच नाही तिथे विधिची मातब्बरी कसली.ब्रह्माला जातिबंधन नाही ते शुद्र नाही आणि ब्राह्मण ही नाही.संस्काराने शूद्राचा द्विज झाला तरी ती प्रक्रिया ब्रह्माला थोडीच लागू होते?? या बाल दत्ताच्या मुखातील हे खडे सवाल आणि निवाडे ऐकून सर्वांची मती गुंग झाली.काय बोलावे कुणालाही सुचेना.त्यातच मुंजीचा मुहूर्त ही टळून गेला.आलेले द्विज वर्ग खट्टू होऊन बाल दत्ताचा हा वात्रटपणा असह्य झाल्यामुळे परतायला लागले.पण तेवढ्यातच कुणी वृद्धाने काही कानमंत्र दत्ताच्या कानी सांगितला व ते मुंजीला उभे राहिले.विश्वंभरपंतांनी सर्वांची क्षमा मागत सर्वांना परत बोलावले आणि कशीबशी बाळ दत्तांची मुंज पार पडली. पुढे शाळेत शिकत नाही म्हणून विश्वंभर पंतांनी त्यांना वेदपाठशाळेत घातले.पण तिथेही इतर कुणी चुकले तर त्यांचीही दत्ता थट्टा करत असे.जनरितीप्रमाणे वागणे ,बोलने ,शिष्टाचार यांना ते काडीचीही किंमत देत नसत.पण याचा उलट परिणाम होऊन दत्ताला वेड लागले आहे किंवा काही भूतबाधा झाली आहे असे लोकांना वाटू लागले. आई -वडिलांनी त्याला श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे घेऊन जाण्याचे व तेथेच सेवा करावी असे ठरविले.
काही काळ नृसिंहवाडी येथे बाळ दत्ताला घेऊन आई-वडिल राहीले. तिथे संगम स्नान,श्रींचे पादतिर्थ घेणे,त्यांचा अंगारा सर्वांगी लावणे आणि मंदिराभोवती नेमलेल्या प्रदक्षिणा घालणे ही तिन्ही सेवा ते बाळदत्ताकडून करुन घेऊ लागले.काही काळांनी प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंहसरस्वती दत्त प्रभुंनी उभयतांना दर्शन दिले व सांगितले की "या अभिनव बाल दत्तात्रेयांच्या रुपात मीच तुमच्या पोटी अवतरलो आहे.मागे मंडपात राहून आपण माझे संगोपन केले त्यावर मी प्रसन्न झालो आहे.आता या अवताराचे माझे बालपण सरले आहे.यापुढे आता तुम्हाला माझी संगती घडण्याजोगी दशा राहिली नाही.तुम्हा उभयतांना माझा विरह जड जड वाटेल.पण तरी आता तुम्हा उभयतांना मला सोडून जावेच लागेल.या अवतारी तुमची नी माझी संगती इथवरच होती.आता आपण माघारी घरी परतावे.हा अवतारी दत्त तुम्हांसोबत घरी राहुन कधीच लाभणार नाही.हा आता घरी कुठला ,कोणत्याच ठिकाणी स्थिर राहणार नाही.जगदुद्धारार्थ हा निरंतर विश्वंभर संचार करत राहील.हा पुढे भक्तांना भवसागर पार करवेल.याचे हे कार्य करु देण्यासाठी सध्या याला नृसिंहवाडीतच एकट्याला ठेवून त्याचा कायमचा निरोप घ्या.यापुढे मीच स्वतः याची काळजी वाहीन व त्याचा योगक्षेमही चालवीन!" माता-पित्यांनी श्रीदेवांची आज्ञा शिरसावंद्य मानून मोठ्या जड अंतःकरणाने वाडीचा निरोप घेतला.आपल्या या प्रिय पुत्राला नृसिंहवाडी येथे सोडून जातांना त्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना ही करवत नाही.पण प्रत्यक्ष देवांनी दर्शन देऊन आश्वासन दिले असल्याने एकिकडे त्यांचे मन निश्चिंत ही असेल यात शंका नाही.
एवढ्या दिवस वाडीत राहल्याने तेथील सर्व लोकांना दत्ता परिचितच होते.पण आता ते एकटे होते.अतिशय विलक्षण मनोभूमिकेत ते निःसंग होऊन नृसिंहवाडीच्या पुण्यभूमीत वास्तव्य करु लागले.वाटेल तिथे मागून खावे,वाटेल त्यांच्या घरी जाऊन निजावे ,अंगावरील वस्त्र जिर्ण झाल्यामुळे दिगंबर अवस्थेतच फिरत राहावे हाच त्यांचा दिनक्रम झाला होता.पण या अवधूतांना सांभाळण्याचे सोडून काही नतद्रष्ट लोकं त्यांना त्रास देत असत.एकदा असाच एक विलक्षण प्रसंग घडला.या वाडीस्थ लोकांच्या बैठकीच्या अड्यापुढून दत्ता जाऊ लागला.तोच याची खोडी करण्याचा विचार या मंडळींना आला.जवळूनच एक बाई भाजीपाला विकण्यासाठी जाऊ लागली.त्यांनी तिच्याकडून हिरव्यागार ढिगभर मिर्च्या विकत घेतल्या.आज दत्ताला या मिरच्या खाऊ घालण्याचे त्यांनी ठरविले.त्यातील एकाने दत्ताला न विचारताच एका मागून एक मिरची तोंडात टाकायला सुरुवात केली.आत्मानंदात तल्लीन असलेल्या दत्त दिगंबराला देहावस्थेचेही भान राहिले नव्हते.ते आपल्याच मस्तीत मस्त होते.त्यांना या मिरचीतही ब्रह्माचीच अनुभूती होत होती.अशा अवस्थेत दत्तांनी अनेक मिरच्या फस्त केल्या पण त्यांच्या तोंडून एक चकार शब्दही आला नाही.उलट ते आपल्या आनंदात स्थिर होते.शेवटी एकही मिरची उरली नाही तेव्हा ही मंडळी थांबली.शेवटी बैठक मोडून सर्व जन खट्टू होऊन हे आपण करायला नको होते हा विचार करत घरी परतली.या एका घटनेने सर्व नृसिंहवाडी हलवून सोडली.दत्ताच्या या योग सामर्थ्याने सर्व जन आश्चर्यचकित झाले.ही परिक्षा घेणारे क्षेत्रस्थ महाभाग घरी पोचले खरे ,पण मनात याच घटनेचे कोलाहल माजले होते.रात्री हे सारे निजले न निजले तोच प्रत्येकाला अदृश्य वेताच्या काडीचे फटके पडू लागले. या सर्वांना चांगलाच मार देऊन भगवान श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांनी सर्वांना बजावून सांगितले की , "हा बाल दत्त दिगंबर कोणी उपेक्षणीय भिकारी टाकारी नाही.याला असे समजून जर याची निंदा कराल ,याला छळाल तर लक्षात ठेवा.तो माझीच विभूती आहे.त्याला वेळीच निट ओळखा.त्याच्या कार्यात खीळ घालू जाल तर आता सारखीच हाडे खिळखिळी होतील!" असा दम देऊन दत्तप्रभु गुप्त झाले. पुढे यातील कुणीही दत्ता दिगंबराच्या वाटी गेले नाही.पण या प्रसंगामुळे दत्त दिगंबरांची किर्ती दूरवर पसरली.वाईचे एक मोठे सावकार जे अतिशय धार्मिक वृत्तीचे होते यांच्या कानावर ही वार्ता पोचली.त्याला पुत्र संतान हवे होते व यासाठी तो दिवसरात्र देवांच्या मंदिराचे उंबरे झिजवत असे.त्यामुळे लवकरात लवकर या योगी पुरुषाचे पाय धरावेत ,त्यांना शरण जावे असे मनोमन त्यांनी ठरविले.हा सावकार लवकरच वाडीत दत्त दिगंबर महाराजांच्या म्हणजे बुवा महाराजांच्या दर्शनाला आला.त्याने महाराजांची काही दिवस अनन्य भावाने सेवा केली व त्या सेवेचे फलस्वरुप लवकरच त्याला मुलगाही झाला.यासाठी त्याने नृसिंहवाडी येथे मोठ्याप्रमाणात अन्नदान ही केले. दत्त दिगंबर महाराज ही याने अतिशय संतुष्ट झाले.एक कुष्ठाने त्रस्थ झालेला ब्राह्मण अक्कलकोट येथे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करित राहिला होता.त्याला एकदा स्वामींनी जवळ बोलावले व त्याला सांगितले की , "अक्कलकोटहून दूर पश्चिमेला कृष्णेकाठी मिरज नामक क्षेत्र आहे.तिथे सध्या त्रिमूर्तीचे नवे प्रति दत्त अवतार दत्त दिगंबर अण्णाबुवा म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांना तुम्ही शरणं जा व रोगमुक्त व्हा." खरंतर स्वामींना याचे कुष्ठ दूर करता आले असते पण अण्णाबुवांचे थोर महात्म्य लोकांना कळावे यासाठी स्वामींनी ही लिला केली असे वाटते.या लिलेच्या वेळी अण्णाबुवा महाराज मिरजेत आले होते.हा कुष्ठी ब्राह्मण अण्णाबुवांना येऊन शरणं गेला.बुवा महाराजांनीही त्याचे कुष्ठ काही दिवसात घालविले व त्याला आशिर्वाद देऊन परत अक्कलकोटला पाठविले.पुढे अण्णाबुवांनी आपले परमप्रिय शिष्य श्री.केशव मोरेश्वर कुलकर्णी म्हैसाळकर यांना स्वतः जाऊन आपला कृपा अनुग्रह दिला.याच केशवरावांनी महाराजांचे ओवीबद्ध चरित्र लिहीले आहे.महाराजांच्या अनेक आठवणी,लिला ,उपदेश यांची नोंद करुन ठेवल्याचे परम पुण्यकारक काम केले व आपल्या सर्वांना या परम पावन चरित्र गंगेचे जल प्राशनाचे भाग्य उपलब्ध करुन दिले. केशवरावांवर महाराजांचे अतिशय प्रेम होते ते आनंदात असले की त्यांना, "विठ्या ,विठ्या परदेशा" म्हणून जोरजोराने हाका मारत.केशवरावांना अनुग्रह झाल्यापासून महाराज बहूतेक वेळा त्यांच्या घरीच असत.केशवराव व इतर शिष्य त्यांचे पाय रगडत,कुणी अंग संवाहन करित,कुणी पायाला तूप लावत तर कुणी भजन म्हणत असत. पुढे एका प्रसंगी याच केशवरावांच्या मातोश्री ऐलाबाई यांना बुवा महाराजांना खायला द्यायचे वाटीभर चणे महाराजांनीच पूर्ण एका भजनातील भक्तांच्या जथ्याला स्वतः वाटले व सर्वांना वाटून झाल्यावर ऐलाबाईंना वाटी परत देतांना त्यात थोडे दाणे शिल्लक ठेवले होते.
प.पू.श्री अण्णाबुवा महाराज हे स्वच्छंद विहार करणारे ,सतत भक्त कार्यासाठी ,भक्त कल्याणासाठी झटनारे भ्रमण करणारे अवधूत महात्मा होते.श्रीअण्णा बुवांचा संचार दूरवर सतत अखंड सुरु असायचा.त्यांनी या दरम्यान अनेक भक्तांचे कष्ट , सांसारिक दु:ख दूर करुन त्यांना नामस्मरण ,हरी भक्ती कडे वळवले.इचलकरंजीचे रामचंद्र पंत मुजुमदार यांचा नुसत्या एका दृष्टीक्षेपात जुना पोटशुळाचा रोग क्षणार्धात संपविला. म्हैसाळच्या भास्करपंत उत्तुरकरांच्या कुटुंबाचे गेलेले डोळे नुसत्या अण्णाबुवा महाराजांचे चरण तिर्थ डोळ्यांना लावल्यावर व पोटात घेतल्यावर ठिक झाले.सांगलीकर श्रीमंत धुंडिराज चिन्तामण उर्फ तात्यासाहेब पटवर्धन यांचा अचानक माजलेला व अनावर झालेल्या हत्ती गावात धावत सुटला.तोच तेथे अण्णाबुवा प्रगटले,आपल्या नुसत्या हस्त स्पर्शाने अण्णाबुवांनी त्याला शांत केले.एवढेच काय तर तो अण्णा बुवांना आपल्या भावासारखा भेटला व शांत होऊन मेहुतासोबत निघून गेला.अण्णाबुवा महाराज भूक लागली की वाटेल त्यांच्या घरी जात व पोटभर जेवत असत.प्रत्तेकाला वाटे की त्यांनी आपल्या घरी यावे आणि अन्न ग्रहण करावे.पण हे सर्वोतोपरी स्वारींच्या इच्छेवर अवलंबून असे.एकदा बुवा महाराज फिरत फिरत दुपारी एका प्रतिष्ठित गृहस्थाकडे आले व त्यांना जेवन मागितले.दुपार टळून गेली होती त्यामुळे घरातील सर्वांचे जेवून झाले होते.आता अण्णां महाराजांना काय द्यायचे या विचारात तो गृहस्थ अगदी हवालदिल झाला.पण अण्णाबुवा हे परमकृपाळु आणि आज या भक्तावर कृपा करण्यासाठीच ते त्यांच्या घरी आले होते.त्या गृहस्थाने स्वैपाक होईपर्यंत थांबण्याची अण्णांना प्रार्थना केली आणि नवल असे की कधीही न थांबणारे अण्णा त्यांच्या घरी थांबले.जेवन सिद्ध झाल्यावर स्वारी पानावर बसली व आनंदात जेऊ लागली.थोड्यावेळात पाटावर बसलेल्या अण्णाबुवांच्या जागी त्या गृहस्थांना प्रत्यक्ष दत्तप्रभुंचेच दर्शन होऊ लागले.तो गृहस्थ हे दर्शन घेऊन इतका आनंदीत झाला की त्याने वारंवार अण्णाबुवांना साष्टांग दंडवत घातले.भोजन होताच श्रींनी लिंबोणीच्या झाडाखाली हात धुता धुता वर पाहिले आता सांगितले की "या लिंबोणीला दोन आंबे लागतील ! पुढल्या दारी असलेल्या बाभळीलाही फळ लागेल." इतर लोकांना याचे हसू आले पण त्या यजमानाची दृढ श्रद्धा अण्णांवर होती व हा नक्कीच काहीतरी आशिर्वाद आहे व भविष्यात याचे मर्म आपल्याला कळेल म्हणून तो गप्पा झाला.काही काळ लोटल्यावर त्याची पतिव्रता पत्नि जी पुष्कळ वर्षे झाली अपत्यहिण होती व त्यामुळे सारे लोक तिला वांझ म्हणून हिनवीत असत.तिला दोन जुळे पुत्र झाले व त्याची दुसरी पत्नी तिलाही एक मुलगा झाला.अण्णाबुवांच्या शब्दांची प्रचिती या घरातील सर्वांना आल्यावर ते सारे त्यांचे अनन्य भक्त झाले.अण्णाबुवा महाराज इतके कृपाळू कनवाळू होते की आपल्या भक्तांसाठी ते रात्रंदिवस राबत.त्यांनी आपली प्रतिष्ठा डावलून कलावंत तंतुवाद्यकारांची व गंगाबाई तेलिणीचीही हरकामे केली.चालू सामत्याच्या दोर्या बुवांनी ओढल्या,घरातील तसेच दुकानातील लाकडे फोडली.उन्हाळ्यात पाणी दुर्मिळ होई तेव्हा ते हांडेच्या हांडे आपल्या माथ्यावर वाहून आणत.या भक्तांची लेकरे,बाळे खेळवित.गंगातेलिणीचे तेलाचे घाण्यावर घाणे काढले.असे कृपाळू असलेले प्रत्यक्ष दत्तप्रभु अण्णामहाराज भक्तांकरीता कल्पवृक्ष होते.नाममहिमा सांगत अण्णाबुवा महाराज दूरवर फिरत असतं.त्यामुळे त्यांचे पायही दुखत असत.पुढे लोककल्याण करता करता श्रींचा देह अगदी झिजून गेला.त्यांनी काही वर्षा आधीच आपली समाधी तिथी सांगून ठेवली होती.ती म्हणजे आषाढ शुद्ध चतुर्थी शके १७८४ .तसे श्रींना काही विशेष दुखने उद्भवले नव्हते.बोलता बोलता त्या तिथीला सकाळी दहा वाजता त्यांनी आपला देह ठेवला व आपल्या स्वधामी दत्तलोकी गमन केले.त्याच दुपारी हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्रीकृष्णाघाटावर एका विशिष्ट जागी दहनविधी केला गेला.पुढे श्रींची कृष्णा घाटावरील समाधीवर पादुका स्थापन करण्यात आल्या.बाळासाहेब नरगुंदे सराफ व अन्य भक्तांना झालेल्या प्रेरणेमुळे तिथे चांगले भव्य असे दुमजली मंदिर बांधण्यात आले.पुढे नृसिंहवाडी चे थोर संत सद्गुरु म्हादबा महाराज हे अनेक वेळा श्रीअण्णाबुवांच्या समाधी मंदिरात येत असत.हे ठिकाण श्री म्हादबा महाराजांचे प्रिय स्थान होते.कोल्हापूर चे दत्त सद्गुरु श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज हे ही श्री अण्णाबुवांच्या समाधी दर्शनाला येऊन गेल्याची नोंद आहे.त्यावेळी अण्णाबुवा महाराजांनी श्रीकृष्ण सरस्वती महाराजांशी समाधी तून संवाद साधला होता.
अशा या दिव्य महापुरुषाची आज १५० वी पुण्यतिथी.ही खरंतर त्यांचीच कृपा की आजच्या परमपावन दिनी त्यांच्या जिवन चरित्राचे चिंतन आपल्याला घडले.माझी ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पन करतो आणि आपल्या सर्वांवर श्री सद्गुरु अण्णाबुवा महाराजांनी अखंड कृपा करावी हीच कोटी कोटी प्रार्थना श्रीचरणी करतो.
✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️
श्रीदत्त शरणं मम् 🙏🌸🌺


श्री दत्त दिगंबर महासाधू आण्णाबुवा महाराज यांची 150 वी पुण्यतिथि दि. 3.7.22 रोजी मिरजेच्या मंदिरात साजरी झाली. सांगली च्या आर. टी. शहा परिवारातर्फे या मंदिराचे व्यवस्थापन पाहिले जाते. सात दिवस ऊत्सव साजरा होतो.
ReplyDeleteसंपर्क 9372448441
आमच्या खापर पणजोबांनी मिरजेचा हा मठ बांधला आहे. तेव्हा पासून प्रत्येक वर्षी 7 दिवस उत्सव साजरा होतो. सद्ध्या या माठाचे नुतनीकरण करण्यात येत आहे. आपण भेट द्यावी.
ReplyDeleteविनित, आर. टी. शहा परिवार. सांगली
मो. 9372448441
महासिद्ध श्री दत्त दिगंबर अण्णा महाराज यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा इतक्या सुंदर रित्या मोजक्या शब्दांत आढावा घेतल्या बद्दल; श्री अक्षय महाराज माऊली आळंदीकर,यांचे अनेकविध अभिनंदन...!!
ReplyDelete