Thursday, August 18, 2022

दत्तावतारी बाळेकुंद्रीचे अवधूत समर्थ सद्गुरु श्री पंत महाराजांची आज १६७ वी जयंती 🌸🌺🚩

 


#श्रीपंत_महाराज_बाळेकुंद्री_यांची_१६७वी_जयंती🙏🌼🌸🌺☘️

                      अनादी काळापासून चालत आलेल्या दत्त संप्रदायात अनेकाविध संतांनी अवतार धारण करुन प्रचंड असे धर्म कार्य,लोकोद्धाराचे कार्य केले.दत्तप्रभुंनी अनेक उपासना मार्ग ,संप्रदायाची सुरुवात केली.यात आनंद संप्रदाय,अवधूत संप्रदाय,स्वरुप संप्रदाय अशा अनेक मार्गाचा समावेश होतो.याच दत्त संप्रदायाची एक शाखा म्हणजे अवधूत पंथ.संपूर्ण दत्त संप्रदायातील एक अवतारी विभुती ,ज्यांचे स्थान दत्त संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे.अशा दत्तावतारी श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची आज १६७ वी जयंती.दत्तसंप्रदायातील अवधूत पंथातील मेरुमणी म्हणजे पंतमहाराज होत.श्री पंतमहाराजांनी अवधूत पंथाला नवसंजीवनी दिली.

                   अठराव्या शतकात श्रीक्षेत्र गाणगापूर येथील राजादेऊळगावचे वतनदार कूलकर्णी श्रीपंतमहायाजांचे पूर्वज होत.ते ऋग्वेदी भारद्वाजगोत्री देशस्थ ब्राम्हण होते.त्यांचे कुलदैवत कोल्हापूरची अंबाबाई आणि आराध्य गाणगापूरचे दत्तप्रभु होते.या सर्व घराण्याच्या श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे चरणी अनन्यभाव होता आणि गुरुचरित्र या ग्रंथावर अपार श्रद्धा होती.या घराण्यातील एक पूर्वज श्री नरसिंहपंत हे नेहमी मोठ्या श्रद्धेने श्रीगुरुचरित्राचे सप्ताह करीत.एकदा एका पायावर उभे राहून त्यांनी गुरुचित्राचा सप्ताह केला.तेव्हा श्रीदत्तप्रभुंनी प्रसंन्न होऊन त्यांना स्वप्नात दर्शन दिले व "तुझ्या सातव्या पिढीत मी अवतार घेईन" असा वर दिला.पुढे निजामकाळात बाळेकुंद्रीच्या आसपासच्या सतरा गावांचे कुलकर्णिकीचे काम नरसिंहपंतांकडे आले व त्यामुळे ते बाळेकुंद्रीस येऊन राहिले. याच घराण्यातील, वर लिहिलेल्या दृष्टांताप्रमाणे सातव्या पिढीत जन्मास आलेला मुलगा 'दत्तात्रेय' हाच पुढे "श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर" या नावाने प्रसिद्धीस आला. 

                       श्रीपंतांचा जन्म ,त्यांचे मातुलगृही 'दड्डी' येथे मिती श्रावण वद्य ८ सोमवार शके १७७७ म्हणजे ३ सप्टेंबर सन १८५५ रोजी रोहीनी नक्षत्रावर झाला.त्यांचे बालपण मातुलगृहीच गेले.तेथील मंडळीही निष्ठावंत दत्तभक्त, धार्मिक वृत्तीची व आचारसंपन्न अशी असल्याने बाळपणीच त्यांना गुरुभक्तीचे बाळकडु लाभले होते.पुढे वयाच्या १४/१५ वर्षी ते इंग्रजी शिकण्यासाठी बेळगावात येऊन राहिले.त्या काळात कर्नाटकात दुष्काळ पडल्याने त्यांना अतिशय कष्टपूर्वक आपला शिक्षणक्रम पुरा करावा लागला.श्रीपंत इंग्रजी ५व्या वर्गात शिकत असतांनाच वयाच्या २० व्या वर्षी इ.स.१८७५ मध्ये श्रीबालमुकुंद तथा श्रीबालावधूत -बाळाप्पा या नावाच्या एका परमहंस ,पूर्णाद्वैती सिद्धपुरुषाच्या कृपेचा त्यांना लाभ झाला.श्रीपंतांचे चुलते चिंताप्पा तसेच पंतांची मावशी बहिणाक्का ,मावसबंधू गणपतराव व एक आप्त हणमू दड्डी या सर्वांवर ही बाळप्पांनी अनुग्रह कृपा केली होती.अशा तर्हेने पंतांच्या पितृ व मातुल गृही श्रीबाळप्पा महाराजांची कृपादृष्टी पसरली होती.

#श्रीबालमुकुंद_महाराजांनी_पंतांवर_केलेल्या_कृपेची_हकीकत:-

           पूर्वी पंथांचे मन बाळप्पा महाराजां (बालमुकुंद) बद्दल कुलुषित होते. त्यांचे कारण असे की बाळप्पांच्या अधिकारासंबंधी श्रीपंतांचे घरातील व इतर पुष्कळांना कल्पनाच नसल्याने ते त्यांना वेडा समजून त्यांची निंदा करीत.एकदा तर काही कामा निमित्त बाळप्पा बाळेकुंद्रीस पंतांचे घरी गेले असता ओट्यावर कोणी न दिसल्याने माजघरात गेले.इतक्यात श्रीपंतांचे आजोबा बाळकृष्णपंत हे मागील बाजूतून तेथे आले तो त्यांना विचित्र पोषाखातील बाळप्पा दिसले तेथे दिसताच राग येऊन त्यांनी बाळप्पांना शिव्या देऊन हाकलून दिले.श्रीपंतांच्या कानावर ही बाळप्पासंबंधी प्रतिकुल गोष्टी आल्यामुळे ते त्यांना "जोगडा"  

"कर्मभ्रष्ठ" वैगेरे नावे ठेवून निंदा करीत.त्यामुळे त्यांगे नातेवाईक गणु याने बाळप्पाचे कितीही गोडवे गाईले तरी त्याचा परिणाम उलट होई. एकदा तर गणूने श्रीबाळप्पांची पदांची चोपडी तरी पहा म्हणून पुढे केली असता, पंतांनी ती रागाने फाडून टाकली.इतकेच नव्हे तर बेळगावहून गणू मारीहाळास गेला असता त्याला एक खरमरीत पत्र लिहून त्यात "तू बाळप्पाच्या नादी लागला आहेस .पण ते बरे नव्हे,हे बाबालोक भोळ्याभाबड्या लोकांना नादी लावून फसवतात."वैगेरे मचकुर लिहून बाळप्पांची संगत सोडण्याचा उपदेश केला. नेमके गणू हे पत्र वाचत असतांना तेथे बाळप्पाची स्वारी आली व कोणाचे पत्र म्हणून विचारु लागली.पत्र पंतांच्याकडून आहे असे समजल्यावर त्याला ते वाचून दाखविण्याचा आग्रह करु लागले.अर्थातच गणूने ते भीतभीतच वाचून दाखवले.तेव्हा बाळप्पांना मोठा राग येऊन ,"हा पत्र लिहीणारा मरतो बघ" असे ते म्हणाले. त्यासरशी गणू घाबरून रडु लागला व बाळप्पाचे पाय धरुन शाप मागे घेतल्याबद्दल विनवू लागला.तेव्हा बाळप्पा हसतच त्याला म्हणाले ,"अरे तुझा दत्तू माझाच रे,तो मरतो म्हणजे माझ्याकडेच येतो बघ.माझ्या बोलण्याचे वर्म तुझ्या ध्यानी आले नाही." हे ऐकताच मोठ्या आनंदाने व हर्षाने गणूने ताबडतोब श्रीपंतांना कर्डेगुद्दीस येण्यास पत्र लिहीले. इकडे त्याच सुमारास श्रीपंतांची तब्येत बिघडली,एकाएकी पोट दुखू लागला व भयंकर ताप येऊ लागला. त्या स्थितीचे गणूचे पत्र आल्याचे समजून व त्यातील कळवळून लिहीलेला मजकूर वाचून त्यांना मोठा अचंबा वाटला व त्यांनी आपण आजारी असल्याचे कळविले.गणूने ताबडतोब ही गोष्ट बाळप्पांच्या कानावर घालताच,त्यांनी विभूती व प्रसाद देऊन "ही विभूती त्याचे सर्वांगास लावून प्रसाद दे.सतत नामस्मरण व भजन करण्यास सांग." असे सांगून त्याला पंतांकडे पाठवले.गणू पंतांकडे गेला व त्यांना बाळप्पांना निरोप व प्रासाद विभूती दिली.पंतानी प्रसाद ग्रहन केला,विभूती सर्वांगास लावली व मोठ्या श्रद्धेने नामस्मरण व भजन करण्यास सुरुवात केली.लवकरच त्यांना आराम पडला व त्यामुळे बाळप्पासंबंधीचे त्यांचे प्रतिकूल मत पालटून त्यांच्यावर श्रद्धा बसली. जरा बरे वाटल्यावर श्रीपंत बाळप्पांचे दर्शनासाठी कर्डेगुद्दी येथे गेले. आपण ज्यांची एवढी निंदा केली त्यांना आता एकदम भेटून क्षमा मागण्याचे धैर्य श्रीपंतांना होईना. अशा मन:स्थीतीत ते असता बाळप्पा त्यांना भेटण्यास आले.तेव्हा श्रीपंत घाबरून व लाजून घरच्या बाजूला असलेल्या गोठ्यातील गवतात लपून बसले. बाळप्पा त्या ठिकाणी गेले व "माझ्या अनादीपुत्रा,आता किती दिवस तू लपून बसणार ? मी तुझी कित्येक दिवस वाट पाहात आहे, ऊठ " असे म्हणून त्यांनी श्रीपंतांना उठवले व मोठ्या प्रेमाणे पोटाशी कवटाळून सद्गदीत कंठाने ते पुढे म्हणाले ,"बाळ,तू माझा अनादिपुत्र,माझा कुलोद्धारक आहेस तेव्हा माझ्याकडे येण्याला संकोच का? भीती का?"

         हा सर्व प्रकार पाहून श्रीपंत अगदी चकित झाले व त्यांच्या अशा अनपेक्षित भेटीने,अत्यंत प्रेमळ व सलगीच्या वागण्याने, त्यांच्या ठिकाणीचे सर्व संशय ,पूर्वग्रह ,तर्ककुतर्क नाहीसे होऊन ते त्यांना अंत: करणपूर्वक शरण गेले. पुढे लवकरच म्हणजे शके १७९७ (इ.स.१८७५) च्या श्रीगुरुद्वादशीच्या शुभदिनी बाळप्पांनी कर्डेगुद्दीच्या डोंगरावरील आपल्या आश्रमात श्रीपंतांना गुह्य तत्वबोध करुन, अनादिसिद्ध श्रुतिसंमत अशा अवधूत - संप्रदायाची दीक्षा दिली व त्यांना विधियुक्त अनुग्रह दिला. पुढे त्यांनी श्रीपंतांकडुन खडतर योग्याभ्यास करवून घेतला. एकदा पंतांनी पुढे असे म्हटले आहे की "इतर पाहिजे ती वस्तु केव्हा ना केव्हा तरी हाती लागेलच ,परंतु सद्गुरु मिळणे फार कठीण.अपार पूर्वसुकृत असल्याशिवाय गुरुंची गाठ पडणे नाही.तराजूच्या एका पारड्यात ब्रह्मांडांची ब्रह्मांडे घातली तरी दर्शनलाभाचे पारडेच अचल राहील व किंचीतही जागा सोडणार नाही.सद्गुरु दर्शनदिवस हा अनंत जन्मांतील एक सुदिन,पर्वकाळ व दिव्य योग-घटिका आहे.सद्गुरु दर्शनच बुद्धी-सूर्याचे उत्तरायण ,स्वर्ग-द्वाराचे-मुक्तिद्वाराचे उद्घाटन व भाग्योदय महायोग,सर्व तीर्थाटणे ,सर्व व्रते ,सर्व साधने,सर्व उपासना, सर्व जपतप-अध्ययन,सत्कर्मे ,सर्व परोपकार ही एकाच वेळी एकाच क्षणी सद्गुरुयोगरूपे फळतात."

#श्रीपंतांची_गुरुपरंपरा:-

                         श्रीपंतांनीच आपल्या आत्मज्योती लेखात पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. "दुजाभाव दवडून अतिगुप्तपणाने श्रीदत्तात्रेयस्वामींनी रामचंद्र अवधूत यांस ज्या गुह्यगोष्टी सांगितल्या त्याच रामावधूतांने एकांती बसून,दुजेदृष्टीस न पडेल अशा गुह्य मार्गाने श्रीबालावधूतांस उपदेशिल्या,श्रीसद्गुरु बालमुकुंदांनी जंबुनगरी निर्जन गुहेंत दीनदत्तास निजबोध सांगितला." याच मार्गाने कांहीं एकांना यथार्थस्थिती प्राप्त झाली‌.एवं परंपरेने उपदेशस्थिती गुप्तमार्गाने चालत आली."

इ.स.१८७७ मध्ये बाळप्पांनी श्रीपंतांची सत्पात्राता पाहून त्यांना गृहस्थाश्रमीच राहून आपला संप्रदाय चालवावा अशी आज्ञा केली व "हा फार अधिकारी आहे व तोच माझा मार्ग पुढे चालवीत,तरी त्याचे आज्ञेत सर्वांनी राहावे" असा उपदेश इतर शिष्यांना करून निर्याणाच्या संकल्पाने श्रीशैल्य मल्लिकार्जूनस गमन केले.त्यानंतर ते परत आलेच नाहीत अथवा त्यांचा शोधही लागला नाही. 

श्रीपंत १८८० मध्ये मॅटिक्युलेशनची परीक्षा झाले व लगेच त्यांनी लंडन मिशन हायस्कुल मध्ये नोकरी धरली. इ.स.१८८२ मध्ये वैशाख व.१ रोजी श्रीपंतांचा विवाह यमुनाक्का यांच्याशी झाला. यमुनाक्कांचा विवाह झाल्यावर बाळेकुंद्रीकरांच्या घरात प्रवेश झाल्यापासून त्या घराण्याच्या उत्कर्षाला सुरुवात झाली.तेथे सुख, शांती,समाधान व एकोपा यांचे वास्तव्य सुरु झाले.त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अल्पकालीन अपत्ये झाली. श्रीपंतांचे सांसारिक जीवन म्हणजे प्रवृत्ती-निवृत्तीचा सुरेख संगम होता.

श्रीपंतांचे वाचन सखोल व विविध असे.त्यांनी इस्लामी,पारशी,ख्रिश्चन,बौद्ध तसेच लिंगायत लोकांचेही पूज्य ग्रंथ वाचले होते‌.त्यांना इंग्रजी,मराठी,कानडी, संस्कृत व हिंदी भाषा चांगल्या अवगत होत्या.उपनिषदे,अवधूत गीता,श्रीमद् भगवत गीता, आद्यशंकराचार्यांचे भाष्ये, उपदेशसहस्त्री, श्रीगुरुचरित्र, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी व वामनपंडितांची यथार्थदिपीका इ.ग्रंथ त्यांंचे आवडते व नित्य अभ्यासातले होते. श्रीपंत आपली शिक्षकाची नोकरी सांभाळून इतर वेळ आध्यात्मिक ग्रंथांचे परिशीलन करण्यात व वेदान्तचर्चा करण्यात शर्यतीत करीत.त्यांना भजनाची गोडी फार असे व ते दररोज एकतारीवर श्रीदत्ताची व आपले गुरु बालमुकुंद महाराज यांची भजने म्हणत.त्यांच्या घराण्यात पूर्वापार चालत आलेले श्रीगुरुद्वादशी, दत्तजयंती व गुरुप्रतिपदा हे उत्सव ते मोठ्या थाटाने व उत्साहाने करीत. 

                        श्रीपंतांनी सन १८८० सालापासून शिष्यप्रबोधन कार्यास सुरुवात करून अखेरपर्यंत ते चालू ठेवले आणि हजारो शिष्यांना ब्रह्मविद्येचे शिक्षण दिले‌.तसेच शेकडो तरुणांना त्यांच्या अभ्युदयाचा मार्ग दाखवून व तो त्यांच्याकडून गिरवून घेऊन त्यांना स्वावलंबी केले. श्रीपंतांनी आपल्या शिष्यांना उद्देशून बरेच तर्कप्रधान ,विचार प्रवर्तक असे बोधपर स्फुट लेख लिहीले आहेत.त्याचप्रमाणे आपल्या गुरुचे प्रेम ,बोधशक्ती यांवरही गुणवर्णन निबंध लिहीले आहे.त्यांपैकी "भक्तलाप" ,"बालबोधामृत सारं","प्रेमतरंग", "आत्मज्योती", "परमानुभवप्रकाश", "अनुभववल्ली", "ब्रह्मोपदेश", "प्रेमभेट" हे विस्तीर्ण प्रबंध लिहीले आहे. श्रीपंतांचा त्यांच्या भक्तमंडळींशी मोठा पत्रव्यवहार असे‌. त्यांमधुनही अध्यात्मपर बोधावर विशेष भर असे. त्यापैकी काही निवडक पत्रे प्रकाशित झालेली आहे‌‌. "श्रीदत्तप्रेमलहरी" ह्यामध्ये पंतांचे सर्व गद्य वाङमय संपादित झालेले आहे. अशा दत्तावतारी पंत महाराजांनी शेकडो लोकांना अनुग्रह देऊन भक्तीमार्गाला लावले.अवधूत पंथाची दृष्टी दिली.सर्व शिषृयमंडळीना दत्त भजनात रंगविले. पुढे अश्विन वद्य ३ शके १८२७ सोमवारी श्रीपंत महाराजांनी आपल्या नश्वर देह ठेवला व दत्त स्वरुपी लिन झाले. आज बाळेकुंद्री येथे पंत महाराजांचे भव्य असे समाधी मंदिर ,पादुका मंदीर बघायला मिळते. श्रीपंत महाराजांच्या कृपेने आज अवधूत पंथांची ध्वजा सर्वदूर परदेशातही फडकली आहे. आज श्रींचे भजनमंडपात सेवेकर्यांचे कडुन अखंड अहोरात्र बारा महिने "ॐ नमः शिवाय" या महामंत्राचे नामस्मरण चालू आहे.

अशा दत्त अवतारी श्रीपंत महाराजांचे चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌺🌸

     ✒️✍️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

No comments:

Post a Comment

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...