Wednesday, August 31, 2022

प्रथम दत्तावतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभुंची जयंती🌺🌸🙏🚩

 


भगवान_श्रीपाद_श्रीवल्लभ_महाप्रभुंची_जयंती:-

श्रीपाद_राजं_शरणं_प्रपद्धे ।। 🌺🌸🚩🙏

   

                                  आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी आज पिठापूर-कुरवपूर निवासी भक्तवत्सल भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभुंची जयंती.आजच्या तिथीला सुर्योदयावेळी भगवान श्रीदत्तात्रेय प्रभुंनी पिठापूर येथे भक्तोद्धारक असा अलौकिक असलेला अवतार धारण केला.सकल दत्तसंप्रदायाचे मुळ पिठ,प्रथम पूर्ण दत्तात्रेय अवतार असलेले आमचे इष्ट दैवत भगवान श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभुंचे दिव्य चरित्र आपल्याला श्रृत आहेच.आज पार्थिव गणेश स्थापना व‌ पूजनाचा परम मंगल दिन.या शुभ दिवशी आपण श्रीप्रभुंच्या दिव्य लिलांचे स्मरण करुयात.श्रीप्रभुंची अवतार लिला आपण "गुरुचरित्र" या दिव्य ग्रंथाच्या पाचव्या ते दहाव्या अध्यायात वाचली आहेच. गुरुचरित्रात आलेले श्रीप्रभुंचे चरित्र हेच या लेखासाठी व लिला कथा चिंतनासाठी आधारभूत आहे.

                            आंध्र प्रदेश येथे पिठापूर या गावात आप्पळराज शर्मा नावाचे आपस्तंभ शाखेचे ब्राह्मण राहत असत.त्यांच्या पत्नीचे नाव सुमती असे होते.या अतिशय धर्मपरायण आणि आचारनिष्ठ साध्वी होत्या.दोघेही परमभगवद भक्त असलेले हे दाम्पत्य नित्य विष्णू उपासनेत रममाण झालेले असे.एके दिवशी महालय अमावस्येच्या पर्वकाळी आप्पळराजांच्या घरी श्राद्ध विधी होता.सुमती मातेने ब्राह्मण भोजनाची पूर्ण तयारी करुन ठेवली होती.पण अद्याप ब्राम्हण लोक आले नव्हते.अशातच भक्तवत्सल भगवान दत्तात्रेय प्रभु विप्र वेषात मध्यान्ही आप्पाळराजांच्या दारात भिक्षेसाठी उभे ठाकले.दारी आलेले हे परम तेजस्वी भिक्षूक बघून सुमती मातेला अतिशय आनंद झाला.त्यांनी ब्राह्मण भोजनासाठी केलेले अन्न श्राद्ध विधी पूर्वीच देवांना भिक्षेत दिले.तिचा हा अतिशय सात्विक भाव बघून भगवान श्रीदत्तात्रेय प्रभु अतिशय आनंदीत झाले आणि त्यांनी तिला आपले निजरुप म्हणजे तिनं शिर ,सहा हात असलेल्या दिव्य रुपात दर्शन दिले.श्रीदत्तात्रेय प्रभुंनी सुमती मातेला वर मागण्यास सांगितले.दत्तप्रभु म्हणाले , 

"माग माते जे इच्छिसी । जे जे वासना तुझे मानसी । पावसी त्वरीत म्हणतसे ।।" अर्थात माते तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ती माग,ती तात्काळ मी पूर्ण करतो.

तेव्हा सुमती माता म्हणाली , "देवा आपण मला माता म्हणाले तेव्हा आता तेच वचन आपण सार्थ करावे.मला बरेच पुत्र झाले पण ते अल्पायुषी ठरले.त्यातील दोघे जे‌ राहिले ते अंध व पंगू आहेत.तेव्हा देवा आपल्यासारखा ज्ञानवंत,जगद्वंद्य,सुंदर,तेजस्वी,जगदोद्धारक असा पुत्र मला व्हावा" असा वर तिने मागितला.देवांनीही तसाच वर सुमती मातेला दिला.ते म्हणाले , "माते तुम्हाला जगदोद्धारक , जगद्वंद्य असा अलौकिक पुत्र होईल.तो तुमच्या संपूर्ण वंशाचा तर उद्धार करेलच पण कलीयुगात विश्ववंद्य होईल.त्याची किर्ती त्रिभुवनात गाजेल.तो तुमचे सर्व दु:ख दूर करेल आणि तुम्हाला सुख देईन. पण तो तुमच्या जवळ जास्त काळ राहणार नाही." असा वर देऊन भगवान दत्तात्रेय प्रभु गुप्त झाले.देवांचे हे वचन ऐकून सुमती माता अतिशय आनंदित झाल्या व त्यांनी हा सर्व वृत्तांत आप्पाळराजांना सांगितला‌.ते ही अतिशय आनंदित झाले आणि भगवंतांचे स्मरण करु लागले.यथावकाश सुमती माता गर्भवती झाल्या व प्रत्यक्ष दत्तप्रभु आपल्या भक्ताला दिलेल्या वरदानासाठी गर्भवासी झाले.खरंतर हा काही आपल्या मानवा सारखा गर्भवास नक्कीच नव्हता.तरी आता सुमती मातेच्या पुत्ररुपात प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक श्रीभगवंतच आता सगुण देह धारण करुन लिला करणार होते. पुढे नऊ मास पूर्ण झाल्यावर भाद्रपद शुद्ध चतुर्थी या शुभ दिवशी भगवान श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभुंनी अवतार धारण केला.जणूकाही आपणच ओंकार स्वरुप मुळपिठ श्रीगजानन आहोत याची जाणीव भक्तांना व्हावी म्हणून श्रीप्रभुंनी हा दिवस निवडला असावा.वडिलांनी जातकर्म करुन भरपूर दानधर्म केला व पुत्रमुखाचे अवलोकन केले.विद्वान असलेल्या ब्राह्मणांनी या बालकाची जन्मपत्रिका मांडली आणि त्यावरुन त्यांचे भविष्य माता-पित्याला सांगितले.ते म्हटले , "तुमचा पुत्र हा महान तपस्वी होईल ,तो जगदोद्धारक दिक्षा कर्ता जगद्गुरु होईल." आप्पळराज आणि सुमती मातेला भगवान दत्तात्रेय प्रभुंचे वरदान ठाऊक होतेच .हे जाणुन त्यांनी या दिव्य बालकाचे नाव "श्रीपाद" असे ठेवले.या दिव्य बालकाचे अतिशय आनंदाने हे दोघेही संगोपन करु लागले.यथावकाश बाल लिला करता करता बाल श्रीपादप्रभु सात वर्षांचे झाले.श्री आप्पाळराजांनी शुभ मुहूर्त पाहून श्रीपादांचे मौंजीबंधन केले‌.मुंज होताच श्रीप्रभु चारही वेद म्हणू लागले.ते न्यायशास्त्र, मिमांसा ,तर्कादी शास्त्रांवर भाष्य ,चर्चा करु लागले.त्यांची ही असामान्य कृती बघून शेकडो लोक श्रीप्रभुंच्या मुखातून निघणार्या ज्ञान गंगेचा लाभ घेण्यासाठी पिठापूरात येऊ लागले‌. { बालपणापासून ते सोळा वर्षांच्या कालावधीत श्रीप्रभुंनी केलेल्या लिलांचे वर्णन "श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत" या ग्रंथात आले आहे. या लेखातील चिंतन हे श्रीगुरुचरित्रात आलेल्या श्रीपाद प्रभूंच्या लिलांना आधारभूत धरुनच असल्याने संक्षिप्त आहे.सविस्तर लिला वाचनासाठी आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ वाचावा } सोळा वर्षांच्या श्रीपादांचा विवाह करण्याचा विचार त्यांचे माता पिता करु लागले.त्यावेळी श्रीपाद प्रभु म्हणाले , "माझा विवाह हा वैराग्य स्त्री शी झाला आहे.ती स्त्री सोडून इतर सर्व स्त्रिया माझ्यासाठी मातेसमान पूज्य आहेत.मी तापसी ब्रह्मचारी आहे.योगस्त्रीयेवाचुन इतर कोणत्याही स्त्री बरोबर मी विवाह करणारच नाही.तीच माझी पत्नी आहे.माझे नावच श्रीवल्लभ आहे.मी आता तप करण्याकरिता हिमालयात जाणार आहे." हे ऐकताच माता-पित्यांना अत्यंत वाईट वाटले.पण त्यांना दत्तात्रेय प्रभूंचे वरदान ठाऊक होते.दत्तप्रभु म्हणालेच होते , "तुम्हाला जगदोद्धारक सर्वपूज्य जगद्गुरु पुत्र होईल.तो जसे म्हणेल तसे वागा यातच तुमचे कल्याण आहे." त्यामुळे त्यांनी श्रीप्रभुंना तपाचरण करण्यासाठी प्रस्थान करण्याची परवानगी दिली. आपल्या आई वडिलांचे दु:ख बघुन श्रीपाद प्रभु त्यांना म्हणाले, "तुम्ही काही चिंता करु नका.तुम्हाला हवे तसे मिळेल." असे म्हणाल्यावर श्रीप्रभुंनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या भावाकडे नुसते अमृतदृष्टीने बघितले.तसे पाहिल्याक्षणीच जसे परिसाला लोखंड लागल्यावर सोने होते तसे तत्क्षणी त्यांच्या आंधळ्या भावाला दृष्टी आणि पांगळ्याला पाय आले.श्रीप्रभुंच्या या कृपा करुणेचा आविष्कार बघून दोघेही प्रभु चरणी नतमस्तक झाले.श्रीपाद प्रभुंनी दोघांनाही आशिर्वाद दिला.त्यांना आई वडिलांची सेवा करण्यास सांगितले.तसेच दिर्घायुष्य,सुख आणि मोक्षाची प्राप्ती होण्याचा शुभाशिर्वाद त्यांना दिला. आई वडिलांना आनंदात ईश्वर स्मरणात राहण्याचे सांगून "आता आम्ही उत्तरेकडे जाण्यास निघालो आहे.अनेक साधुजनांना मी दिक्षा देणार आहे." असे सांगून ते हिमालयाकडे निघाले.घरातून बाहेर‌ पडताच श्रीप्रभु गुप्त झाले‌ व गुप्तपणे काशीक्षेत्री आले.तेथून बद्रिकाश्रमी आले.तेथे नारायणाचे दर्शन घेऊन आपल्या अवतार कार्याला आता सुरवात झाली आहे असे सांगुन गोकर्ण क्षेत्री आले.

    

                             पुढे भगवान श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभु तिनं वर्ष गुप्त रुपाने गोकर्ण क्षेत्री वास करुन होते.त्यानंतर काही महिने श्रीप्रभु श्रीशैल्य क्षेत्री आले.श्रीशैल्य क्षेत्री अनेक सिद्ध महात्म्यांवर कृपा अनुग्रह करुन ते आपल्या निजस्थानास म्हणजे "श्रीक्षेत्र कुरवपूर" येथे आले.कुरवपूर हे महाक्षेत्र आहे.येथे ज्यावेळी श्रीप्रभु आले त्यावेळी तेथे त्यांच्या दर्शनासाठी मानवच काय तर देव,गंधर्व ,ऋषी, मुनी, सिद्ध, महासिद्ध येत असत.पुढे सोळा वर्ष श्रीप्रभुंचा कुरवपूर येथे वास होता. येथेच आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले आणि श्रीप्रभुंच्या अत्यंत करुणेनी ओतप्रोत भरलेली दिव्य "अंबामातेची" कथा घटली आहे. श्री प्रभु कुरवपूरात असतांनाच त्याच क्षेत्रात एक सत्पात्री ब्राह्मण राहत असे.तो व त्याची पत्नी अंबिका जी अत्यंत धर्मपरायण व सात्विक होती.हे दोघेही आनंदाने आपले जिवन व्यतित करित होते.ब्राह्मण भिक्षूकी करुन आपला व आपल्या पत्नीचा उदरनिर्वाह करीत असे.पुढे यांना एक पुत्र झाला जो जन्मतः मतिमंद होता.त्यावर त्यांनी अनेक उपाय केले पण त्याचा काही परिणाम झाला नाही.तो मुलगा आठ वर्षांचा झाला तेव्हा त्याचे मौंजीबंधन करण्यात आले.तरीही त्यात काहीही बदल झाला नाही.पुढे तो ब्राह्मण अकस्मात मृत्यू पावला.त्यामुळे त्या निराधार स्त्रीवर दु:खाचे डोंगर कोसळले.घरात दैन्य व पदरी असा जडमुढ मतिमंद मुलगा याचे आत्यांंतिक दु:ख तिला होत असे.एके दिवशी यातुन मुक्त होण्यासाठी ती त्या मुलाला बरोबर घेऊन कृष्णामाईत आत्महत्या करण्याकरिता निघाली.जाता जाता एका ठिकाणी नदीकाठी ती आली.जवळच भगवान श्रीपाद प्रभु तिथे स्नान करत होते.मरणाआधी साधू चे आशिर्वाद घ्यावे या विचाराने ती श्रीप्रभुंकडे आली.तिने श्रीचरणी पाण्यातच नमस्कार केला व श्रीपाद प्रभुंना म्हणाली , "मी या गंगेत मुलासोबत प्राणत्याग करण्याकरीता जात आहे.आत्महत्या करणे महापाप आहे त्यामुळे आम्हाला त्यानंतर सद्गती मिळावी असा आम्हाला आशिर्वाद द्यावा." "तुम्ही आत्महत्या का करीत आहात?" असा प्रश्न श्रीपाद प्रभुंनी तिला विचारला.तेव्हा तिने श्रीप्रभुंना सर्व हकिकत निवेदन केली.शेवटी ती प्रभुंना म्हणली, "यतिराज,आता पुढल्या जन्मी तरी आपल्यासारखा त्रैलोक्यपूज्य पुत्र मला व्हावा." तेव्हा श्रीपाद प्रभुंंनी तिला शिवाराधना करण्याचा उपदेश‌ केला.तिला प्रभुंनी शनिप्रदोषव्रत महात्म्य सांगितले.त्यासाठी त्यांनी त्या स्त्रीला दोन कथा सांगितल्या व "तू सुद्धा प्रदोष व्रत कर.तुला माझ्यासारखा पुत्र होईल.तू कसलीही चिंता करु नकोस.मनात शंकाही बाळगू नकोस." असे बोलून श्रीपाद प्रभुंनी त्या स्त्रीला अनेक आशिर्वाद दिले.तिच्या मतिमंद मुलाला जवळ बोलावून त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला.त्याचक्षणी त्या मतीमंद मुलाच्या ठिकाणी सर्व ज्ञान प्रगट झाले.तो मुलगा अत्यंत तेजस्वी दिसु लागला.हे बघून त्या स्त्रीला अत्यंत आनंद झाला.ती श्रीपाद प्रभुंना म्हणाली , "मला आपल्या रुपात प्रत्यक्ष परमेश्वरच भेटला आहे.पुढील जन्मी मला आपल्यासारखाच पुत्र होणार आहे याबद्दल आता मला तिळमात्र शंका उरली नाही." तिने श्रीपादांनाच श्रीशंकर मानून नित्य प्रदोष पुजा करण्याचे व्रत घेतले.तिच्या पुत्राचा पुढे विवाह झाला.श्रीपादांचे स्मरण करता करता ती स्त्री पुढे श्रीपादांच्या चरणी लिन झाली.हीच स्त्री पुढे विदर्भातील कारंजा क्षेत्री अंबीका याच नावाने जन्माला आली.ती या जन्मातही प्रदोष व्रत करित असे.या अंबामातेच्या पोटीच पुन्हा श्रीपाद प्रभु नरहरी नावे अवतार धारण करते झाले व पुढे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या नावे विश्ववंद्य जगविख्यात झाले.श्रीपाद प्रभुंचे श्रीगुरु महाराजांच्या रुपातील अवतार कार्य आपण सर्वांनी गुरुचरित्रात वाचले असेलच.तसेच श्रीपाद प्रभुंनी याच क्षेत्री रजकाला वरदान दिले होते.तो रजक पुढे बिदर चा सुलतान मुस्लिम राजा म्हणून जन्मास आला.या जन्मात तो देवांच्या वरदानाप्रमाणे त्यांच्या पुढील अवताराला म्हणजे श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना गाणगापूरात येऊन भेटला होता.आपले असे दिव्य अवतार कार्य पूर्ण करुन श्रीप्रभु कुरवपूर येथे श्रीगुरुद्वादशीच्या दिवशी कृष्णामाईत अंतर्धान झाले.कुरवपूर हे श्रीपाद प्रभूंचे निजस्थान आहे.आजही श्री प्रभू त्या क्षेत्री वास करुन आहेत.दत्तसंप्रदायाचे हे निर्गुण पिठ आहे.श्रीप्रभुंनी आपले अवतार कार्य पूर्ण करुन गुप्त झाल्यावर त्यांनी वल्लभेश ब्राह्माणाचे रक्षण करुन त्याला अभय दिले.स्वत: हातात त्रिशूळ व खड्ग घेऊन ते प्रगटले व त्यांनी चोरांचे निर्दालन केले .त्या वल्लभेश ब्राह्माणाचे रक्षण करुन पुन्हा प्रभु गुप्त झाले.ही कथा गुरुचरित्रातील दहाव्या अध्यायात आली आहेच.असे परमकरुणाघन, कृपामुर्ती, भक्तवत्सल, भक्ताभिमानी, भक्तकामकल्पदृम भगवान‌ श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभुंच्या चरणी माझे शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम.आपल्या सर्वांना श्रीप्रभुंनी त्यांच्या सुकोमल चरणांचा आश्रय द्यावा व आपल्या सर्वांवर कृपा करुणा करावी हेच मागणे मागतो आणि ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पण करतो.

  ✒️✍️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✍️✒️


कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन: ।

द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ: ॥

"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺



   

No comments:

Post a Comment

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...