Tuesday, August 23, 2022

थोर दत्तावतारी महापुरुष सद्गुरु श्री नारायण महाराज केडगावकर यांची आज ७७वी पुण्यतिथी 🌸🙏🌺🚩



सद्गुरु_श्रीनारायण_महाराज_केडगावकरांची_आज_७७वी_पुण्यतिथी :-

                               श्रीदत्त संप्रदायातील थोर संत,दिव्य विभूती म्हणजे सद्गुरु श्री नारायण महाराज केडगावकर.आज सद्गुरु श्री नारायण महाराजांची ७७ वी पुण्यतिथी.माझे अत्यंत आवडते व जवळच्या तिर्थ क्षेत्रापैकी एक क्षेत्र म्हणजे केडगावचे दत्त क्षेत्र.पुण्याजवळच सोलापूर हायवे लगत चौफुला हे गाव आहे.तेथुन ७/८ किमी अंतरावर हे क्षेत्र आहे.श्रीमहाराजांनीच हे क्षेत्र वसविले.महाराजांची ही तपोभूमी.याच क्षेत्री प्रत्यक्ष दत्तप्रभुंनी महाराजांना आपल्या दिव्य निर्गुण पादुका दिल्या होत्या.या ठिकाणी महाराजांनी अतिशय दुर्मिळ अशी शिवप्रधान दत्तप्रभुंची स्थापना केली आहे.ही जागी महाराजांच्या दिव्य अनुष्ठानाने इतकी भारलेली आहे की आजही त्या सकारात्मक स्पंदनाची अनुभूती अनेक भक्तांना येते.

सद्गुरु नारायण महाराजांचे चरित्र अतिशय दिव्य आणि विलक्षण आहे.या आधी आपण श्री महाराजांचे संक्षिप्त चरित्राचे चिंतन केलेच आहे.त्या लेखाची ब्लॉग लिंक खाली देत आहे.आपण पुन्हा तो लेख लिंकवर क्लिक करुन वाचु शकता.ज्यांनी महाराजांचे चरित्र वाचले नसले किंवा ज्यांना महाराजांची माहिती नाही त्यांनी जरुर ब्लॉग लिंकवर क्लिक करुन महाराजांचे संक्षिप्त चरित्र वाचाच.अतिशय दिव्य, अलौकिक आणि चमत्कारिक असे महाराजांचे चरित्र आहे.

श्रीनारायण महाराजांच्या संक्षिप्त चरित्राची ब्लॉग लिंक👇

https://akshayrjadhav.blogspot.com/2022/06/blog-post_7.html

                                     आज महाराजांची पुण्यतिथी आज आपण महाराजांच्या चरित्रातील काही विलक्षण घटनांचे स्मरण करुयात.

श्रीमहाराज जुन्या बेटावर आल्यानंतर तिथे दत्तप्रभुंच्या दृष्टांतानंतर त्यांना जमिनीत निर्गुण पादुका प्राप्त झाल्या हा प्रसंग सविस्तरपणे आधीच्या लेखात आला आहे.एकदा महाराज सहज बसले असता त्यांना देवांचा दृष्टांत झाला की , "पुण्याला जाऊन श्रीमाळीबाबांचे दर्शन घे." हे माळी बाबा म्हणजे पुण्यातील अतिशय अधिकारी व महासिद्ध असलेले महात्मे.अतिशय प्रसिद्धीपराङमुख असलेले माळी बाबा म्हणजे साक्षात भगवंतांची विभुतीच होते.याच सद्गुरु सयाजीराव माळी महाराजांना भेटायला भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पुण्यात आले होते.तसेच धनकवडी चे सद्गुरु श्री शंकर महाराजांनी आपल्या समाधी पश्चात देहासोबत श्रीमाळी महाराजांच्या समाधीचे निर्माल्य ही ठेवायचे सांगितले होते.यावरुन श्री माळीबाबांचा अधिकार आपल्याला लक्षात येतो.श्रीमाळीबाबांचे चरित्र लवकरच आपण चिंतनासाठी घेऊयात.तर दुसर्या दिवशी श्री नारायण महाराज पुण्यास आले.एका करंडीत दोन हार, फुले,नारळ असे पुजा साहित्य घेऊन टांग्यात बसुन ते माळी बाबांकडे जाण्यास निघाले.पण माळीबाबांचा पत्ता काही केल्या त्यांना सापडेना.ते खुप वेळ तसेच फिरत राहिले.रात्री अकरा वाजता श्रीमाळीबाबांचे शिष्य व पुत्र मारुती महाराज यांच्याशी त्यांची गाठ पडली.दोघेही मग टांग्यातून महाराजांच्या ठिकाणी आले.आश्चर्य असे की एवढी रात्र झाल्यावरही श्रीमाळीबाबा हातात कंदील घेऊन दारात नारायण महाराजांची वाट बघत उभे होते.महाराजांना बघताच ते म्हणाले, "सांजपासून तुमची वाट पाहून राहिलो आहे की हो.इतका उशीर का हो केला?" त्यांनी श्री नारायण महाराजांना आपल्या मठीत नेले व जवळ बसविले. श्री महाराजांना लगेच भावसमाधी लागली.तसे होताच माळी बाबा त्यांच्या कानात हळूच म्हणाले , "अहो, अगुदर आम्ही काय सांगतो ते ऐका व मग समाधी सुखात रंगून जा.तुम्हाला एकट्याला हा आनंद नाही मिळवायचा बरं का हो.दुसर्यिलाही हा आनंद द्यायचा आहे तुम्हाला." हे ऐकताच श्री महाराज आपल्या पूर्वावस्थेत आले.तेव्हा माळी बाबा परत म्हणाले , "तुम्ही बेटावरील औदुंबर वृक्षाखाली काही दिवस सेवा करावी व मग कार्याला लागवे. ते ठिकाण सिद्धाचे आहे.तेथे तुमच्या अनुष्ठानाला तात्काळ फळ मिळणार आहे." हे ऐकल्यावर श्री नारायण महाराजांनी एक हार माळी बाबांच्या गळ्यात घातला,नारळ ठेवला व त्यांना वंदन करुन दुसरा हार त्यांच्या गुरुंच्या समाधीला घालणार इतक्यात 'थांबा! त्या हाराचे मला काम आहे." असे म्हणून श्रीमाळीबाबांनी श्रीमहाराजांचे हातातून हार घेतला व "आजपासून तुम्ही श्री नारायण महाराज झालात व हा हार श्री नारायण महाराज म्हणून आम्ही तुम्हांस घालतो." असे म्हणून त्यांनी श्रीमहाराजांचे गळ्यात तो हार घातला व त्यांना आशिर्वाद दिला.

                             श्री नारायण महाराज हे लोकविलक्षण सत्पुरुष होते.त्यांचा प्रचंड अधिकार आणि त्यांचे नावलौकिक सामान्य माणसांनीच काय तर संतांनी ही धन्योद्गाराने गौरविले होते.महाराजांबद्दल चा असाच एक विलक्षण प्रसंग चरित्रात आला आहे.बेलापूर बनातील श्रीमत परमहंस श्री विद्यानंद स्वामी महाराज हे श्रीमहाराजांचे समकालीन होते.ते अतिशय प्रसिद्ध महायोगी होते.या योगी श्री विद्यानंद स्वामी महाराजांनी सन १९०५ ला आपले अवतारकार्य संपविण्याचा निर्णय घेतला.त्यांनी आपल्या प्रमुख शिष्यांना बोलाविले.त्यांना महत्वाच्या सुचना‌ दिल्या.ते म्हणाले , "मी आता समाधी घेणार आहे.तुम्हाला बजावून सांगतो की , कोणीही माझ्या देहावर समाधी,छत्री,देऊळ वैगेरे बांधू नका.मी येथे येण्यापूर्वी ही जमिन गोचर म्हणजे गाईच्या चरण्यायोग्य होती.ती तशीच रहावी अशी माझी इच्छा होती.मी आता झोपतो.माझे घोरणे बंद झाले की माझा प्राण गेला‌ असे समजा.काही वेळातच १९०६ साली त्यांनी आपला देह ठेवला.समाधीस्थ होण्यापूर्वी त्यांनी आपल्या शिष्यांना अजुन एक महत्वाची सुचना दिली.ते म्हटले , "मी या पुढे कर्नाटकात जन्म घेणार आहे.व बालस्वरुपात प्रकट होणार आहे." नंतर एक दिवस ते म्हणाले , "मला नारायणाच्या शरीरात प्रवेश करायचा आहे,कारण ते शरीर अतिशय पवित्र आहे.पण तेथे पूर्वीच दुसरा दिव्य महात्मा येऊन बसला आहे.या वरील विधानांमुळे सर्व भक्तांची श्रद्धा आणि ठाम विश्वास बसला की नारायण महाराज हेच विद्यानंदांचे अवतार आहेत.तसेच एक विलक्षण घटना ही घडली होती.ज्यावेळी विद्यानंदांनी समाधी घेतली,त्याच दिवशी त्याच वेळेस इकडे श्री नारायण महाराज काही काळ अचेतन अवस्थेत होते.थोडा वेळ ते तसेच निर्जीव होते व त्या नंतर त्यांचे शरीर सचेतन झाले. श्रीविद्यानंद स्वामी महाराजांच्या भक्तांना अनेक अनुभव आले होते.त्यापैकी एक म्हणजे श्रीविद्यानंदाचे भक्त भोरचे श्री नानासाहेब गांडेकर यांना विद्यानंद महाराजांनी आपली एक तपकिरी ची डबी ठेवावयास दिली व म्हणाले, "आम्ही मागू तेव्हा ती आम्हाला परत द्याल." जेव्हा पुढे नारायण महाराज भोरला नानासाहेबांच्या घरी गेले,तेव्हा त्यांनी नानासाहेबांना म्हटले, "आम्ही तुमच्याजवळ आपली तपकिरीची डबी दिली होती ती आम्हास परत द्या." असे म्हणतात नानासाहेबांना नारायण महाराजांची ओळख पटली.असाच एक अनुभव मायजी गावचे स्टेशनमास्तर यांनाही आला होता.त्यामुळे विद्यानंद स्वामी महाराजांचे सर्व शिष्य महाराजांना शरणं आले व त्यांची सेवा करु लागले. यामुळे बेटात गुरुपौर्णिमेचा उत्सवाची ही विलक्षण पद्धत सुरु झाली.विद्यानंदांचीच पूर्ण विभुती हे नारायण महाराज आहेत ही ओळख पटल्यावर सर्व शिष्यांनी महाराजांच्याकडेच म्हणजे बेटावरच गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे ठरविले होते‌.पण श्री विद्यानंद स्वामी महाराजांनी आषाढ शुद्ध पौर्णिमेलाच समाधी घेतली होती.त्यामुळे सर्व शिष्य मंडळी श्रीविद्यानंदांच्या समाधी उत्सवाला बेलापूर येथे जात असल्यामुळे त्यांना आषाढ पौर्णिमेला बेटावर येणे शक्य नव्हते.म्हणून श्री नारायण महाराजांची गुरुपौर्णिमा ही भाद्रपद म्हणजे प्रौष्ठपदी पौर्णिमेला होऊ लागली.तेव्हापासून बेटावर गुरुपौर्णिमेचा उत्सव हा भाद्रपद पौर्णिमेला साजरा केला जाऊ लागला. आजही बेटावर गुरु पौर्णिमेचा उत्सव हा भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्याचा प्रघात आहे. असे श्री महाराजांचे दिव्य चरित्र आहे.आजच्या पुण्यपावन दिनी श्रीमहाराजांच्या चरित्राचे व त्यातील‌ काही लिलांचे आपण स्मरण करुन आपली स्मरण सेवा श्रीचरणी रुजू करुयात.श्रीमहाराजांच्या चरणी मी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो व ही शब्दसुमनांजली आपल्या सर्वांच्या तर्फे श्रीचरणी अर्पण करतो.

          ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

No comments:

Post a Comment

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...