सद्गुरु शंकर महाराज धनकवडी यांचे अंतरंग शिष्य सद्गुरु श्री नारायण महाराज म्हणजेच कबुली बाबा पद्मतिर्थ वाशिम यांची आज ७२ वी पुण्यतिथी:-
विदर्भ ही संत भुमी आहे.या भुमीत आजवर हजारो संतांचे वास्तव्य झाले आहे.याच विदर्भातील एक जिल्हा म्हणजे वाशिम.या वाशिम चे पुरातन नाव वत्सगुल्म.ही वाकाटक राजांची राजधानी.अगदी सत्य युगापासून या ग्रामाला इतिहास आहे.वत्स ऋषींची ही तपोभुमी,भगवान आशुतोष महादेवांची प्रिय भुमी,शारंगधर बालाजीचे अतिशय पुरातन क्षेत्र,भगवान नृसिंहाचे क्षेत्र. अशी एक नाही तर अनेक धार्मिक पार्श्वभूमी असलेले, एक धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालेले हे एक विशेष गाव. एकोणिसावे शतक या गावाचे परम भाग्याचे असेच शतक होते कारण त्या काळात एक- दोन नव्हे तर तब्बल ७-८ महापुरुष ,संत मंडळी सदेही वाशिम च्या पावन भुमीत वास करती झाली.एकाच वेळी इतके संत एकाच स्थळी असण्याची ही फार दुर्मिळ बाबा.या संत मंडळींमध्ये श्री नारायण बाबा पद्मतिर्थ,नाथ नंगे बाबा दारिद्र्य हरण तळे, तैलंगी स्वामी महाराज,दिनानाथ बाबा,नाथ नंगे बाबा डव्हा,विश्वनाथ बाबा डव्हा,राजाबाबा महाराज,भालचंद्र महाराज असे श्रेष्ठ संत वास्तव्यास होते.त्याच संत मांदियाळीत आपले पद्मतिर्थ निवासी सद्गुरु श्री नारायण महाराज हे एक संत रत्न आहेत.श्रीनारायण बाबा हे पुण्याचे थोर दत्तावतारी संत सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज धनकवडी यांचे प्रिय शिष्य. आज नारायण बाबा तथा कबुली बाबांची ७२ वी पुण्यतिथी.त्यानिमीत्त श्री बाबांच्या चरित्राचे ओझरते दर्शन आपण करुयात.
सद्गुरु श्री नारायण महाराजांचा जन्म इ.स.१९०५ साली विजयादशमी च्या शुभ मुहूर्तावर सोलापूर जिल्ह्यातील नाईक घराण्यात झाला. हे एक श्रीमंत ,सदाचारी ,धर्मनिष्ठ आणि सावकार घराणे होते.अशी एक मान्यता आहे की बाबांचे घराणे हे कुठेतरी माणिकप्रभु महाराज हुमणाबाद यांच्याशी निगडित आहे.ही ऐकिव गोष्ट आहे याला सध्या तरी काही ठोस पुरावा उपलब्ध नाही.श्रीबाबांचे थोरले बंधू विष्णूपंत नाईक हे हैद्राबाद संस्थानात मोठ्या पदावर कार्यरत होते.श्रीबाबांचे आई- वडिल हे त्यांच्या बालपणीच वारले त्यामूळे श्रीबाबांचा सांभाळ हा त्यांचे दुसरे बंधू श्री शंकरराव नाईक यांनी केला. श्री बाबा हे जन्मसिद्ध अधिकारी महात्मे होते.ते अवतारी संत होते.आपल्या कार्याची रुपरेषा व प्रयोजन हे आधीच ठरलेले असल्यामुळे बाबांचे लहानपण हे सामान्य नव्हते.आज त्यांच्या बालपणाबद्दल जास्त काही माहिती उपलब्ध नाही तरी बाबा हे अंतर्मुख,चिंतनात गढून गेलेले एक दिव्य बालक होते,सदैव ईश्वर चिंतनात निमग्न असलेले बाबांचे बालपण हे त्यांच्या अवतारीत्वाला साजेसे असेच होते. वयात आल्यावर श्री बाबांची ही अंतर्मुखता अधिकच वाढली.त्यांच्यातील वैराग्य दुणावले व समर्थ म्हणतात तसे भगवंतांच्या सख्यत्वासाठी त्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला व ते निःसंग होऊन घरादार ,आप्त-परिवार सोडून तपासाठी निघाले.भगवान नृसिंह सरस्वती दत्त प्रभु गाणगापूर, भगवान अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, भगवान सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे श्रीबाबांचे श्रद्धा स्थान.पुण्याच्या सद्गुरु शंकर बाबा महाराजांवर बाबांचे अतिव प्रेम होते.त्यांच्यावर बाबांची अपार श्रद्धा होती.या वैराग्यानिशी बाबांचे तिव्र तप सुरु झाले.त्यांनी क्षिप्रा ,गोदा,तापी ,नर्मदा अशा अनेक नदीकाठी कठोर अशी तपश्चर्या केली.बाबा काही काळ खामगावच्या धर्मभास्कर पाचलेगावकर महाराज यांच्या सोबत हिमालयात ही तपश्चर्येसाठी होते.ही हकिकत स्वतः पाचलेगावकर महाराजांनी सांगितली आहे.आपले हे कठोर तप पूर्ण झाल्यावर बाबा इ.स.१९२५ च्या दरम्यान वाशीम येथील श्री करुणेश्वर मंदिरात प्रगट झाले.करुणेश्वरातील केशवराजांच्या मंदिरात अतिशय तेजस्वी,तप:पुनीत आणि जटाधारी ब्रह्मचारी योगी आल्याची बातमी गावात पसरली.तेव्हा गावातील चिंतामण राव पाटील या सत्शिल गृहस्थांना ही बातमी कळली.त्यावेळी ते व त्यांचे भाऊ अण्णा हे धावतच श्री बाबांच्या दर्शनास गेले.दर्शन घेताच त्यांना अतिशय आनंद झाला.बाबांच्या दर्शनास करुणेश्वराच्या मंदिरात अलोट गर्दी होऊ लागली.यावेळी एक विशेष चमत्कार घडला.या मंदीरातील एक पुजारी श्रीपती यांना ध्यानस्थ अवस्थेतील बाबांचा देह दिड हात उंच जमिनीवर तरंगतांना दिसला.हे दिव्य दर्शन घेतल्यावर श्रीपतींच्या जिवनात अलौकिक बदल झाला.पुढे हेच श्रीपती पुसद या गावातील एक संत सुप्रसिद्ध महंत म्हणून प्रसिद्धीस आले.पण श्री नारायण बाबा मुळातच अंतर्मुख आणि प्रसिद्धीपराङमुख होते त्यामुळे त्यांना आपली झालेली ही प्रसिद्धी काही भावली नाही व त्यांनी तात्काळ वाशिम चा त्याग केला.वाशिम च्या भक्तांनी खुप शोध घेतला पण बाबा काही दिसले नाही.पुढे १९२६ ला बाबा खामगावात प्रगटले.येथील एक भाविक नानाजी भुसारी यांना बाबांचे प्रथम दर्शन घडले.येथेच बाबांना बाबांची मणिराम सर्वप्रथम भेटली.याच मणिराम म्हणजे आपल्या सर्वांच्या वंदनीय माई झामरे होतं.यांनाच बाबांनी आपले नाव "नारायण" हे सर्वप्रथम सांगितले.त्यानंतर श्री बाबांना नारायण याच नावाने संबोधले जात असे.
बाबांचा आज उपलब्ध असलेला पद्मासनातील ,कुबडी सह असलेला मृगाजिनावरील फोटो हा खामगाव येथील एका गुहेतीलच आहे.हा फोटो खामगावचे फोटोग्राफर श्रीमेरीकर यांनी काढला आहे.श्रीबाबा प्रांत:काळी उठून सूर्योदयापूर्वी गावाबाहेरच्या या गुहेत आपली साधना करण्याकरीता जात असत.
पुढे इ.स १९२८-२९ ला बाबा अकोला येथे आले.याच वर्षी आलेल्या गुरुपौर्णिमेला बाबांनी आपल्या काही मोजक्या भक्तांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले.श्री बाबांनी अगदी बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना अनुग्रह दिला त्यातील हे काही परमाग्यशाली भक्त ठरले.अकोल्यात बाबांचा काही निस्सीम असा भक्त परिवार तयार झाला.या सर्व भक्तांकडून बाबा , "ॐ नारायणं देवं सच्चिदानंदं सद्गुरुम्" हा महामंत्र म्हणवून घेत.येथेच बाकी रोड वरील एका विहीरीतील खोलीवजा गुंफेत बाबा साधना करीत.साधने व्यतिरीक्त बाबा "दत्त महात्म्य, ज्ञानेश्वरी,गुरुगीता" इत्यादी ग्रंथ नेहमी वाचत असत.त्यांच्या पुजेत दत्त महाराज आणि शंकर महाराजांचा फोटो असे.या अकोला मुक्कामा दरम्यान अनेक लिला चमत्कार घडले.राजंदा येथील राजेंदेकरांच्या धाकटे बंधू बाबू याचे अर्धशिशी चे दुखने बाबांनी फक्त त्याच्या डोक्याला पाय लावून ते दुखने कायमचे घालवले.त्यानंतर भौरद येथील मुक्कामात एका ब्रह्मसंमंधाला बाबांनी मुक्ती दिली ,तसेच गणेशराव कुलकर्णी भौरद यांच्या मुलाला सटवीच्या आजारातून मरणाच्या दाढेतून ओढून बाहेर काढले. १९३३ साली अकोला येथील सेवानिवृत्त जेलर श्री अण्णासाहेब टेकाडे यांना श्रीबाबांच्या ठाई दत्त दर्शन झाले होते.अशा अनेक लिला बाबांनी केल्या .यातील काही प्रसंग मोठे आहेत तसेच काही अप्रकाशित घटनाही आहेत पण शब्दमर्यादेस्तव त्या सध्या तरी इथे देता येणार नाही.
तिर्थयात्रा करत करता बाबा सोलापूर येथे आले.जवळपास दिड तप तपश्चर्या आणि योगसाधना करुन आता बाबा सिद्ध योगी बनुन घरी परतले होते.शंकर महाराजांच्या आज्ञेने श्रीबाबांना गृहस्थाश्रमाचा स्विकार करावा लागला.बाबांचा विवाह इंडी तालुक्यातील इंगळगी या खेड्यातील वतनदार कुलकर्णी यांच्या कन्या प्रमिला यांच्याशी झाला.हे अतिशय धर्मपरायण आणि आचारनिष्ठ कुटूंब होते.हे सर्व कुटुंब भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे भक्त.लग्न हे वामनराव कुलकर्णी यांच्या सासुरवाडीला म्हणजे अक्कलकोट ला करण्याचे निश्चित झाले.पण लग्नाप्रसंगी मुसळधार पाऊस सुरु झाला व बाबांचे लग्न हे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मठात श्रीस्वामीरायांपुढे पार पडला.पुढे श्री बाबा सौ.आईंना म्हणजे नववधू सौ.प्रमिलांना घेऊन सद्गुरु शंकर महाराजांच्या भेटीला मुंबई येथे घेऊन गेले.तिन दिवस सतत फिरल्यावर चवथ्या दिवशी महाराज बाबांना भेटले.तेथे शंकर बाबांनी सौ प्रमिला मातोश्रींच्या पोटाला एक चिमटा काढला व त्या क्षणीच मातोश्रींना काष्ट समाधी लागली.सद्गुरु शंकर बाबांनी जणु मातोश्रींच्या शरीरात तत्क्षणी शक्तीसंक्रमीत केली असावी.ज्याला शक्तीपात अशी ही एक संज्ञा आहे.लग्नानंतर बाबांचे आपल्या पत्नी सह विदर्भात पुन्हा आगमन झाले.अकोल्यास आल्यावर ते प्रथम दादा डांगे यांच्या कडे आले.तेथे आले हे समजल्यावर सर्व भक्त मंडळी धावतच तेथे आली.अकोल्यात त्यांचा मुक्काम श्रीडांगे यांच्याकडेच होता.या मुक्कामात त्यांनी मरणासन्न अवस्थेत पडलेल्या भैया राजंदेकरांची प्रकृती एका स्पर्शाने दूर केली.इ.स १९३५-३६ ला बाबा आईसह वाशिमला आले.त्यांचा मुक्काम अण्णा पाटील यांच्याकडे होता.त्यांतर त्यांनी टिळक चौकात एक खोली भाड्याने घेतली.काही काळ वाशिम ला राहून बाबा पुढे तिनं वर्ष वर्ध्याला राहिले.या वेळी त्यांनी अनेक लिला केल्या.भक्तांचे दु:ख दूर केले.अधून मधुन बाबा गाणगापूर,अमरावती,अकोला , वाशिम या आपल्या आवडत्या ठिकाणी जाऊन येत.याच अकोल्यातील मुक्कामात बाबांना श्री सद्गुरु ताज बाबा नागपूरहून अकोला येथे भेटण्यास येत असत.याला पुरावा प्रत्यक्ष आईसाहेब होत्या.आईंनी ही भेट स्वतः बघितली ,ती चर्चा स्वतः ऐकली होती.पहाटे आईसाहेब स्वैपाक करुन या दोघांनाही जेवण्यास देत व मग ताज बाबा परत नागपूर ला जात.श्रीबाबांच्या या सर्व मुक्कामात सद्गुरु शंकर बाबा हे वाशिम ,अकोला ,अमरावती अशा विविध ठिकाणी बाबांना भेटायला येतच असत.इ.स१९३९ ला बाबांच्या मोठ्या मुलाचा म्हणजे श्रीपाद यांचा जन्म झाला.पुढे यांनाच राजाभाऊ असे म्हणत.एकदा अकोल्यात बाबा अण्णांना घेऊन शालिनी टॉकीज (प्रभात) या ठिकाणी सिनेमा पहाण्यास गेले.त्याच वेळी अण्णा आपल्या जागेवर आले नव्हते.तोच एक दारुडा तिथे येऊन बसला.पू.बाबांनी जोरदार "अल्लख" अशी आरोळी दिली.त्या धारदार तिव्र आवाजाने संपूर्ण टॉकीज दणाणून सोडली.लोक सैरावैरा धावत सुटले.पोलिसांनी बाबांना धरले व जेलमध्ये टाकले.त्या दिवशी रात्री कोठडीत बाबांनी आपले डोके भिंतीवर घेतले.दुसर्या दिवशी बाबांना बाहेर काढण्यात आले. काही दिवसा नंतर अकोला येथील बाबूराव व अण्णा हे श्री शंकर महाराजांच्या दर्शनाला मुंबईस गेले.तेव्हा ते त्यांना म्हणाले, " तुमच्या बाबांनी तेथे जे डोके घेतले त्यामुळे ( आपल्या डोक्यावरील टेंगुळास हात दाखवित) येथे हे पहा माझ्या डोक्यावर टेंगूळ आले आहे.तुमच्या बाबांनी मला हिमालयात पळविले." असे म्हटल्यावर सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले.इतका बाबांचा आणि शंकर महाराजांचा अनन्य संबंध होता.
पुढे बाबांनी आपला मुक्काम अमरावतीस हलवला.या ठिकाणी आपल्या पुसदच्या भक्ताला बाबांनी आपल्या ठाई वटपत्रावर पहूडलेल्या बाल कृष्णा चे दिव्य दर्शन घडविले होते.पुढे अमरावतीस बाबांना बालोन्मत्त पिशाच्च वृत्ती वा अवस्था प्राप्त झाली.या अवस्थेत बाबा काही महिने अखंडीत होते.ही उन्मनी अवस्था इतकी विलक्षण होती की त्या अवस्थेत बाबा आपले दोन्ही हात पलंगावर जोरजोराने आपटीत,पलंग तुटत.त्यांचे हात सुजत.मोठ्यामोठ्याने ते अगम्य भाषेत गर्जना करीत.ही विलक्षण बालोन्मत्त पिशाच्च अवस्था होती.पण यामुळें सर्व भक्त चिंतातुर झाले.ही अवस्था सद्गुरु शंकर महाराजांच्या कानावर घालण्यासाठी डॉ खरे व अण्णा महाराजांना भेटायला पुण्यात आली.शंकर महाराजांनी विभूतीचा गोळा अण्णाजवळ दिला.त्यातील चिमूट ही पेलाभर पाण्यात टाकून बाबांना देण्यास सांगितले.परंतु बाबांना ही गोष्ट कळली .ते या दोघांच्याही नावे खूप शिव्याही देत,रागवत ही.पण या दोघांनीही शंकर महाराजांनी सांगितल्या प्रमाणे रोज चिमुटभर भस्म बाबांनी दिले.पुढे हळूहळू बाबांची ही अवस्था कमी होत गेली.पुढे १९४५ ला वाशिम येथील केकत उमरा या खेड्यात सद्गुरु शंकर महाराजांनी सहस्त्रचंडी याग करण्याचे ठरविले.हा केकत उमरा येथील प्रसंग मोठा दिव्य आहे आणि यावर एक स्वतंत्र लेख लिहीण्याची माझी इच्छा आहे.पुढे महाराजांनी लिहुन घेतला तर तो समोर येईलच.असो! या यज्ञाचे यजमान हे स्वतः श्री नारायण महाराज व सौ.आईसाहेब होत्या. ( यज्ञ प्रसंगा विषयी अगदी थोडक्यात लिहीले असले तरी तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.लेख आधीच खुप मोठा झाला असल्याने आता हा प्रसंग या लेखात देणे शक्य नाही.) यज्ञ झाल्यावर ही ४-५ वर्ष पू.बाबांचा मुक्काम अकोला येथेच होता.इ.स १९४७ ला सद्गुरु शंकर महाराजांनी समाधी घेतली.या चार पाच वर्षात बाबांनी अनेकांवर कृपा केली.आपल्या भक्तांचे दुःख,व्याधी तून रक्षण केले.
पुढे लवकरच बाबांनी आपला नश्वर देहाचा त्याग केला .
#श्रीनारायण_बाबांच्या_देहत्यागाची_विलक्षण_हकीकत :-🙏🌼☘️
गृहस्थाश्रमात राहून नि:संगपणा , अनासक्तता व देहदशेच्या पलीकडे असणार्या जीवन्मुक्त अवस्थेत श्रींचा विहार सुरु असायचा. भाविक भक्तांचा कळवळा येऊन कधी-कधी त्यांचे भोग आणि रोगही अंगावर घेत . १९५० साली अशीच कु्ण्या एका भक्ताची व्याधी त्यांनी स्विकारली. पोटात ,मानेवर व उजव्या तळहातावर मोठे गळू (फोड) आले. त्यावर अकोल्यात सर्वोतोपरी उपचार सुरू होते.भक्त मंडळी नामस्मरण व ईश्वयाचा धावा करू लागले.दिवसेंदिवस प्रकृती खूप क्षीण होत चालली. केकत उमर्यास जाऊन यज्ञभूमीच्या दर्शनासाठी प.पु.बाबा ,आईसह वाशीमला आले.अण्णा पाटलांकडे (तुकाराम महाराजांच्या मठात) त्यांचा मुक्काम होता.डॉ.खरे `श्रीं' च्या दर्शनास आले.त्यांची प्रकृती तपासून औषधापचाराची योजना ठरवली. पू.आईंना ते म्हणाले , "या फोडांना चिरे देऊन त्यातील पू,दूषित रक्त काढणे आवश्यक आहे.मी रोज सर्व तयारीसह येथे उपचार करीन." गोळ्या ,इंजेक्शन सुरु झाले.चिरे देतांना व ड्रेसिंग करताना जीवघेण्या वेदना होतात.तेव्हा डॉ.खरे म्हणाले, "बाबा,तुम्हाला सुंघणी देऊ का?" पू.बाबा म्हणाले , "भाऊ, त्याची आवश्यकता नाही.तू तुझे काम कर.मी माझे काम करतो." हूं की चूं न करता तास-तास पू.बाबा सर्व उपचार करु देत होते.त्यावेळी ते जणू काही भावसमाधीत असतं. डॉ.खरे व दर्शनाला येणार्या भक्तांशी बाबा आनंदाने बोलत.घरी रोज नामस्मरणाचा,भजनाचा सपाटा सुरु असायचा.पू.बाबाही त्यात सहभागी होत. २०/२५ दिवसांनी बाबांची प्रकृतीस बराच आराम पडला. श्रींचे आज्ञेनुसार आषाढ महिना संपण्यापूर्वी यज्ञभूमीचे दर्शनास त्यांनी केकत उमर्यास रघुनाथसिंह या भक्तासोबत प्रस्थान केले. ४-५ दिवसांनंतर पू.बाबा अस्वस्थ असल्याचा निरोप आला.अण्णांनी अमरावती,अकोला,अकोट ,खामगाव व आजूबाजूच्या भक्त मंडळींना कळविले.नागपंचमीला अण्णा सहकुटुंब केकत उमर्यास गेले. त्याच वेळी बाबुराव कुलकर्णी, चिंतामण काका, गणेशराव कुलकर्णी ,जानबा, रघुनाथ टेकाडे व इतर भक्त मंडळी उमर्यास पोहोचली.पू.बाबा जरी क्षीण झाले तरी सर्वांकडुन पूजा,आरत्या ,भजन व "ॐ नारायणन" मंत्राचा जप करुन घेत. रघुनाथ सिंह एकदा बाबांना म्हणाले , "बाबा ,आपण सर्व समर्थ आहात.अनेकांना आपण वाचविले .आपल्या स्वास्थ्यासाठी आपल्या शक्तीचा आपण वापर करावा.निदान या मुलाबाळांसाठी तरी तसे करावे." पू.बाबा जोराने हसले व म्हणाले ,"काका (आकाशाकडे बोट दाखवत) तो समर्थ आहे.मला चिंता करण्याचे काहीच कारण नाही."
श्रावण शुद्ध नवमी दि.२१ ऑगस्ट १९५० चा सोमवार उजाडला. "सर्वांनी स्नान ,पूजा,आरत्या करुन दुपारपर्यंत सोमवारचा उपास सोडा."अशी पू.बाबांनी आज्ञा दिली.दुपारनंतर पू.बाबा रघुनाथसिंहांना म्हणाले, "काका, दमनी जुंपा.मला आजच येथून वाशिमला जायचे आहे." त्यांची प्रकृती क्षीण झालेली पाहून काका व इतर भक्त मंडळींनी तेथे आराम पडेपर्यंत राहण्याचा आग्रह केला; पण पू.बाबांचे शब्द म्हणजे रामबाण .बाबा म्हणाले ,"चला आता भराभर,वाशीमला अण्णाच्या घरी मला विश्रांती घ्यायची आहे." नाईलाजाने पू.बाबांना दमणीत गादी लोडावर बसविले.बाबूरावांच्या मांडीवर श्री चरण होते.अण्णांनी पू.बाबांना सावरुन धरले.रघुनाथसिंह काका दमणीच्या धुर्यावर बसले. दुपारी ५ चे सुमारास पू.बाबा तेथून निघाले. त्यांचे बरोबर सर्व भक्त मंडळी सहकुटुंब सहपरिवार नामघोष करीत वाशीमला निघाली.रस्ता गोटाडीचा होता.बालभक्तासह सर्व जण दमणी समोरील रस्त्यातील दगड,गोटे दूर करु लागले.उमरा वाशीमच्या मध्यावरील एका बारवेवर थोडा आराम घेऊन पू.बाबांना ग्लुकोज व साखर-पाणी दिले.बारवेजवळ थोडे थांबून दमणी निघाली.पू.बाबांनी अण्णांना धुर्यावर बसण्यास सांगितले. खणखणीत आवाजात सांगितले, "अण्णा ,तो बघ चालला.गाडी लवकर हाकल." सर्वांना भुरळ पडली. "आपली माऊली ठणठणीत बरी होणार" असा सर्वांचा आशावाद म्हणून वाक्याचा बोध कुणाला झाला नाही.
४-५ दिवस घर बंद होते.म्हणून अण्णांनी सुधाकरला घर गाठून साफ-सफाई दिवाबत्ती करण्यास पाठवले.त्यानुसार सुधाकर,मधुकर,रामभाऊ पळत-पळत घरी गेले.झाडझूड,साफसफाई, दिवाबत्ती केली.पू.बाबांचा पलंग,बिछाना स्वच्छ करुन मच्छरदानी वैगेरे लावली. रात्री ७ ते ८ च्या दरम्यान घराच्या मागच्या दाराशी दमणी आणून उभी केली.पू.बाबांना प्रवासात श्रम झाले म्हणून थोडे थांबले. "आईसाहेब भक्त मंडळी मागाहून येत आहेत ते आल्यावर श्रींना घरात हळूच न्यावे" असा विचार दमणीतील भक्तांनी केला. पण पू.बाबा थोडे रागावले .त्यांनी दमणीखाली पाय सोडले.उतरण्याची तयारी करु लागले तेव्हा नाईलाजाने रघुनाथ सिंह ,बाबूराव ,अण्णा व जानबा यांनी त्यांना हळूच उचलून घरातील पलंगावर आणून बसवले. बाबूरावांना हाक मारली.त्या वेळी पू.बाबांनी उजव्या हातांनी स्वस्थ राहा,शांत राहा म्हणून खुण केली.तितक्याच अतिशय शांतपणे पू.बाबा अनंतात विलीन झाले. थोड्या वेळात आईसाहेब व इतर मंडळी घरी येऊन पोचले. बाबा सर्वांना सोडुन गेल्याचे कळताच सर्वांनी दु:खाने हंबरडाच फोडला.जणू काही सर्वांच्या शरीरातील त्राण, चैतन्यच गेल्यासारखे वाटले. हां हां म्हणता ही बातमी गावात पसरली.रात्रीच भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली.दुसरे दिवशी सकाळी १० चे दरम्यान शोकाकुल भक्तमंडळी टाळ,मृदुंगासह नामघोष करीत पू.बाबांची महाप्रस्थानयात्रा पद्मतिर्थावरील उत्तरभागी पोहोचली. चि.राजाभाऊ (बाबांचे जेष्ठ पुत्र) वयाने लहान असल्यामुळे पू.आईंच्या इच्छेने श्री.बाबुरावांचे हस्ते अग्निसंस्कार व पुढील उत्तरक्रिया विधी पार पडला.तो विधी कै.नानाजी शास्त्री धनागरे यांनी सांगितला. ज्या ठिकाणी अग्निसंस्कार झाले तेथे भक्तांनी श्रींची समाधी बांधली.आजही असंख्य भक्तांना श्रींनी दर्शन ,दृष्टांत आणि साक्षात्कार देऊन मार्गदर्शन केले आहे.आजही श्रींचे कार्य मोठ्या प्रमाणात चालु आहे.श्रींच्या समाधी स्थानी आजही श्रींच्या निर्गुण अस्तित्वाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
#समाधी_नंतरची_लिला :- रोज पर्याय:काळी भारत मंडळी पद्मतिर्थावर स्नानास व श्रींच्या दर्शनास जाऊ लागली.अतिशय दु:खात पण पू.बाबांच्या स्मरणात ,भजनात हा काळ व्यतित केला.शुद्ध श्राद्धाचे दिवशी सकाळी ४ वाजता लीला (बाबांच्या परम भक्त) उठली व रडत-रडत सांगू लागली.तिला दृष्टांतात पू.बाबा दिसले व खणखणीत शब्दात म्हणाले , "अरे मी मेलोच नाही तर श्राद्ध कुणाचे करता? बरे करता तर करा.पण तुम्ही आता तीर्थावर स्नानास ,दर्शनाला जाल.काल जमलेले दुधाचे पैसे अण्णांनी तुझ्याजवळ दिले ते कुठे ठेवले? ते शोधुन अण्णाजवळ दे.ते गौळीपुर्यात दुध आणायला जातील.पैसे दिल्याशिवाय दूध कसे मिळणार?" हे ऐकून सर्वांना आनंद झाला ,सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. "ॐ नारायणं देवं सच्चिदानंदं सद्गुरुम् " या मंत्र्यांचे भजनच सर्वांनी सुरु केले.
अलिकडे काही वर्षाआधी समाधीस्थानी पद्मतिर्थावर भव्य असा श्रीदत्त याग केला गेला. त्यावेळी कित्येक भक्तांना बाबांच्या खडावांचा,बुटांचा रात्रीला आवाज आला.त्यांनी रात्री यज्ञरक्षणासाठी स्वत: आपल्या निर्गुण रुपाची ग्वाही दिली. एक नागपुरचे परमभक्त काही वर्षाआधी कुवेत /दुबई या भागात कामा निमीत्त राहायला गेले होते.त्यांना बाबांनी दुबई ला सदेही दर्शन दिले.ही अगदी २०१० नंतरची लिला आहे. अशे प्रत्यक्ष नारायण स्वरुप श्री नारायण बाबा आजही भक्तांच्या हाकेला धावतात.आजही त्यांचे भक्त तारण्याचे ,भक्त कल्याणाचे कार्य अखंड ,अविरत सुरू आहे. श्री बाबांच्या पुण्यतिथी च्या मंगल दिनी आपण त्यांचे स्मरण करु व आपल्या हातुनही अखंड गुरुसेवा घडावीचे हेच अक्षय्य मागणे श्रीचरणांसी मागुयात.
#श्री_स्वामी_समर्थ🌸🙏🌺
#जय_शंकर🙏🌺🌸
#ॐ_नारायणं_देवं_सच्चिदानंदं_सद्गुरुम्🙏🌺🌸
✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव वाशिम/आळंदी✒️✍️


No comments:
Post a Comment