🍃🌺🙏 अलौकीक श्रीस्वामीतनया 🙏🌺🍃
आज अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजे नवरात्रातील ४ था दिवस.आपल्या या "प्रणम्य मातृदेवता" लेखमालेतील चतुर्थ शब्दसुमनांची माळ.ही माळ आपण भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या परंपरेतील अतिशय थोर संत ,महान विभूती असलेल्या भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातु:श्री श्री पार्वती देवी देशपांडे यांच्या चरणी अर्पण करणार आहोत.प.पू.पार्वती मातु:श्री या थोर दत्तावतारी महापुरुष योगीराज सद्गुरु श्री मामा साहेब देशपांडे महाराजांच्या आई आहेत.प.पू.सद्गुरु मातु:श्री या अतिशय प्रसिद्धीपराङमुख अशा विभूती होत्या.त्यांनी आपले दिव्यत्व कधीही कुणालाही कळू दिले नाही.त्यांचे "श्रीस्वामीतनया" हे दिव्य चरित्र प.पू.श्री मामा साहेब देशपांडे महाराजांच्या उत्तराधिकारी व परम शिष्या सद्गुरु मातु:श्री श्री शकुंतला ताई आगटे यांनी लिहिले आहे.एका संतांनी दुसर्या संताचे चरित्र लिहिलेले आहे यावरुन त्या चरित्राचे महत्व लक्षात येते.आपण जरुर एकदा ते चरित्र वाचाच असा मी आग्रह करेल इतके ते विलक्षण आहे.मी मातु:श्रींच्या लेखाला "अलौकिक श्रीस्वामीतनया" असे नाव दिले आहे.त्याचे कारण आपल्या मातु:श्रींचे चरित्र वाचल्यावर जरुर कळेलच.प्रत्यक्ष परब्रह्म श्रीस्वामीरायांनी ज्यांना "माझी लेक" म्हटले अशा मातु:श्रींनी केलेला संसार,केलेली उपासना, त्यांनी केलेली दिव्य साधना, त्यांचे साधनेप्रती असलेले नितांत प्रेम, ज्ञानेश्वरी वर असलेला अधिकार व एकंदरीतच त्यांचा असलेला दिव्य जिवन प्रवास बघितला तर हे कुणालाही अतिशय दिव्य आणि अलौकिकच भासेल.मातु:श्रींच्या या सुंदर चरित्राचे स्मरण आपल्या सर्वांना जिवनातील पाथेयच ठरणार आहे यात शंकाच नाही.या दिव्य चरित्राचे स्मरण करुन आपल्या या आगळ्या वेगळ्या उत्सवाच्या आनंद सोहळ्याला आज द्विगुणित करुयात.
परमपूज्य मातु:श्रींचे घराणे हे मुळचे अक्कलकोट येथील.त्यांचे वडिल श्री नारायण उमाकांत सोनटक्के हे अक्कलकोटच्या राजांचे दरबारी वाकनीसपदी कार्य करीत.ते अतिशय सात्विक वृत्तीचे व धर्मनिष्ठ असे व्यक्ती होते.याच काळात भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज हे सदेही अक्कलकोट येथे वास्तव्य करुन होते.श्रीनारायणराव सात्विक व धार्मिक असल्याने ते श्रीस्वामी चरणी अनन्य शरणागत झाले व त्यांचे परमभक्त बनले.या नारायण रावांना एक मुलगा होता ज्यांचे नाव "नरहरी" व एक मुलगी जिचे नाव "बाई" असे होते.याच बाई म्हणजे आपल्या पार्वती मातु:श्री आहेत.स्वामी कृपेने नारायणभट्टांकडे उत्तम वैभव,संपत्ती स्थिर झाली होती.अंदाजे इ.स १८७७ या साली श्री नारायणभट्ट नेहमी प्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला गेले.त्यांनी स्वामीरायांचे दर्शन घेतले व ते हात जोडून बाजूला उभे राहिले.तोच स्वामी महाराजांनी त्यांच्या कडे बघितले व एकदम आदेश दिला, "ए नाऱ्या ! इथून ऊठ,निघ आणि जा पुण्याला.येथे राहू नकोस.!" नारायणराव हे तयारीचे शिष्य होते.आपल्या सद्गुरुंची आज्ञा त्यांनी तात्काळ मान्य केली.पण सद्गुरुंचा वियोग होणार या कल्पनेने त्यांना एकदम रडूच कोसळले.ते तात्काळ घरी आले व आल्या पत्नी ,मुलांना बरोबर घेऊन मठात परतले.उभयता दाम्पत्यांनी श्रीस्वामीरायांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत घातला व पुण्यास जाण्याची आज्ञा मागितली.त्यांची निष्ठा बघून श्रीस्वामीरायांना अपार आनंद झाला.अतिव प्रेमाने त्यांनी नारायणरावांना जवळ घेतले व त्यांच्या मस्तकी पूर्ण शक्तीयुक्त कृपाहस्त ठेवला.त्याच वेळी त्यांनी नारायण भट्टांवर पूर्ण कृपा केली.तसेच परंपरेचे अधिकारही त्यांना स्वामींनी दिले होते.त्यांना आशिर्वाद, प्रसाद देऊन पुण्यास जाण्याची परवानगी दिली.तेवढ्यातच स्वामीरायांनी लहानग्या बाईस आपल्या उजव्या मांडीवर बसविले.कौतुकाने तिचा चेहेरा कुरवाळला व म्हणाले , "ही आमची पोर आहे बरे का!" पुढे स्वामींनी अक्कलकोट संस्थानच्या महाराजांचे धाकटे बंधू तुळोजीराव यांना सांगून नारायणभट्ट व परिवाराची पुण्यात पूर्ण व्यवस्था करण्याची आज्ञा केली.पुण्यात कसबा पेठेतील अक्कलकोटकरांच्या वाड्यात ही सर्व मंडळी राहू लागली.श्रीनारायणराव येथेही आपल्या नित्य साधनेत,धर्मकार्यात मग्न असत.हेच संस्कार दोन्ही मुलांवर ही होत होते.बाईं तर आधीच सात्विक वृत्तीच्या होत्या त्यामुळे लहानपणीच त्यांना भगवद्गीता,रामरक्षा अनेक स्तोत्रे तोंडपाठ होते.आईने त्यांना कामात ही निष्णात केले होते. शके १८०० चैत्र वद्य त्रयोदशीला ,मंगळवारी सायंकाळी स्वामींनी आपला लौकिक दृष्ट्या देह ठेवला.त्यानंतर नारायण भट्टांना आपल्या दोन्ही पोरांना अनुग्रह दिक्षा देण्याची आज्ञा केली.एके दिवशी पुनर्वसु नक्षत्र होते.अतिशय उत्तम मुहूर्त होता.श्रीनारायण भट्टांनी आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे बाईला व नरहरी ला शक्तिपात दीक्षा दिली.अनुग्रहा नंतर बाई साधनेत व ईश्वर स्मरणात राहू लागल्या.त्या अधिकच गंभीर व अंतर्मुख झाल्या.
यथावकाश बाईचे वय नऊ वर्षांचे झाले.त्यामुळे नारायणरावांना आता त्यांच्या विवाहाचा विचार करु लागले.शोधाशोध केल्यावर नसरापूरच्या राघो निळोपंत देशपांडे यांचे घराणे मिळाले .त्यांचा मुलगा "श्रीदत्तोपंत" हा अतिशय धार्मिक व सात्विक वृत्तीचा असल्याची माहिती नारायणरावांना मिळली.विवाहाची बोलणी सुरु झाली आणि बाईचा व दत्तोपंतांचा विवाह ठरला.बाई लग्न करुन देशपांडे यांच्या घरात सुन म्हणुन आल्या.लग्नानंतर गृहप्रवेश करतांना त्यांचे नाव "पार्वती" असे ठेवण्यात आले.श्रीदत्तोपंत हे अतिशय धार्मिक,सरळ व सात्विक वृत्तीचे होते.श्रीदत्तोपंतांना सर्व लोक "दत्तूअण्णा" म्हणत असत.पंचम दत्तात्रेय अवतार सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचा पूर्ण कृपानुग्रह त्यांना प्राप्त झाला होता.भोरच्या "दत्तमहाराजांकडे" त्यांचे वरचेवर जाणे असे.श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दर पौर्णिमेला वारीला जाण्याचा दत्तूअण्णांचा नित्यनेम होता.असे हे परम धार्मिक भगवंतांच्या स्मरणात रंगलेले दाम्पत्य आनंदी व समाधानी जिवन व्यतित करु लागले.पार्वती मातु:श्रींच्या सासुबाई जानकीबाई या अतिशय उत्तम व्यक्तीमत्वाच्या स्त्री होत्या.त्यांना समाजकार्य करण्याची अतिशय आवड होती.त्यांना औषधांचे उत्तम ज्ञान होते.त्या नाडी परिक्षण करुन अनेकांना औषध देत.त्यामुळे कित्येक लोकं व्याधीमुक्त झाले.पुढे त्यांनी ही आपली विद्या पार्वती मातोश्रींना दिली होती.एकदा त्यांनी परिक्षा घेण्याकरिता पार्वती मातोश्रींना विचारले, "तुला ह्यातले काय हवे ते सांग.मी देते.!" त्यावर मातोश्री म्हटल्या , "सासूबाई ,मला तेवढी देव्हार्यातील मारुतीची मुर्ती द्याल का?" हे उत्तर ऐकून जानकी बाईंना सुखद धक्काच बसला.आपल्या सात्विक सुनेचे हे उत्तर ऐकून हीच आपली विद्या देण्यास योग्य आहे हे त्यांनी तात्काळ ओळखले.दत्तूअण्णांचा अधिकार इतका विलक्षण होता की ,ते पुजा करत असले की प्रत्यक्ष देव प्रगट होऊन त्यांच्याशी वार्तालाभ करित असत आणि मातोश्री त्यांचा हा संवाद नित्य ऐकत अस. पण या आनंदी संसाराला एकच शल्य होते ते म्हणजे यांना होणारी संतती ही अल्पायुषी ठरत होती.दत्तूअण्णांची नृसिंहवाडीची पौर्णिमेची वारी सुरुच होती.यावेळी ते पार्वती मातुश्रींना बरोबर घेऊन नृसिंहवाडी येथे गेले.उभयतांनी श्रीपादुकांसमोर आपल्या हृदयातील गार्हाने मांडले.मातोश्रींना तात्काळ श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांकडे जाण्याचा आदेश मिळाला.दोघेही ब्रह्मानंद स्वामींच्या मठात आले व त्यांनी आपल्या मनातील शल्य स्वामी महाराजांपुढे मांडले.त्यानंतर श्री स्वामी महाराजांनी उभयतांना , "काळजी करु नये.दिर्घायू अपत्यप्राप्ती होईल." असा आशिर्वाद दिला.पार्वती मातु:श्रींना काही काळाने गर्भ राहिला.यथावकाश प्रसुतीची वेळ आली.पोट दुखण्यास सुरुवात झाली.प्रसुती कळा असह्य झाल्यावर मातोश्रींनी श्रीस्वामी महाराजांचे स्मरण केले.तोच स्वामी महाराज मातु:श्री समोर प्रगटले व "गुरुवारी आमच्याच पूर्णांशाने मुलगा होईल.काळजी करु नकोस.त्याचे नाव श्रीपाद ठेवा!" असे सांगितले.इकडे नर्मदा तिरी ,स्वामी महाराज प्रतिपदा सुरु होताच समाधिस्थ झाले व इकडे त्याच क्षणी मातोश्रींनी एका मुलाला जन्म दिला.जे पुढे प.पू.श्रीमामा साहेब देशपांडे या नावे जगविख्यात झाले.मातु:श्रींना श्रीस्वामी महाराजांचा आशिर्वाद ज्ञात होताच आणि त्यांना माहिती होतेच की श्रीपाद हे स्वामी महाराजांचा आशिर्वाद आहे आणि पुढे जाऊन हा मुलगा मोठा थोर कार्य करणार आहे.
यानंतर ही मातु:श्रींचा नित्यनेम चालू होताच.त्या अतिथी अभ्यागताचे आगत्य सेवाभावाने करीत असत.सर्वांचे जेवण उरकल्यावर त्यांचा रोज नित्यनेमाने देवदर्शनाला जाण्याचा नेम होता.त्या रोज बनेश्वर महादेव व विठोबाच्या दर्शनासाठी जात.त्यांची कुत्री चंपा ही त्यांच्या बरोबर जात असे.मातु:श्री सोवळ्यात असल्याने चंपीला त्या न शिवण्याचे सांगत व ती कुत्री प्राणी असल्यावरही एखाद्या शहाण्या सारखे मातोश्रींचे ऐकत असे.परत येऊन घरातील आवर सावर झाली की मातोश्री एकांतात बसुन ध्यान,मनन,चिंतन करित असत.योग्यांची सर्व लक्षणे मातोश्रींच्या ठाई प्रगट रुपाने वास्तव्य करुन होते.त्या कुठल्याही स्थितीत अत्यंत शांत असत.त्यांची साधना कधीही कसल्याही प्रसंगी चुकली नाही.त्यांचा अधिकार इतका विलक्षण होता की श्री भगवंत त्यांच्या बरोबर नित्य अखंड असत.फावला वेळ मिळाला की त्या श्रीभगवंतांशी संवाद साधत असत.सद्गुरु मामांवर अतिशय कटाक्षाने त्यांचे लक्ष असे.आई वडिलांच्या उत्तम संस्कारात श्रीपादांची उत्तम प्रकारे जडण घडण होत होती.पार्वती मातु:श्रींचा अधिकार किती विलक्षण होता याचे एक उत्तम उदाहरण चरित्रात आले आहे.शेजारील नायगांव गावातील काही मंडळी एका मुलाला घेऊन पार्वतीबाईंकडे आली.तेव्हा तो मुलगा उपचारा पलीकडे गेला होता.तरी सुद्धा यावर एक विशिष्ट औषध मिळते का? हे बघण्यासाठी त्यांनी श्रीपादास गावात पाठवीले.ते न मिळाल्याने मातोश्रींनी गाणगापूर चे भस्म सद्गुरुंचे स्मरण करुन त्या मुलाला लावले व पुडी बरोबर दिली.याने मृत्यू च्या दारात गेलेला तो मुलगा काही वेळातच परतला.मंडळी हसत खेळत मुलाला घेऊन घरी परतली.त्या आपल्या या वैद्यकीय ज्ञानाने निःशुल्क सर्वांना मदत करित असत.तसेच दुपारी गावातील स्त्रीयांना त्या ज्ञानेश्वरी चा अर्थ अगदी सोप्या शब्दात समजावून सांगत असत.विशेष म्हणजे त्या हा अर्थ शिकायला कुठेही बाहेर गेल्या नव्हत्या.त्यांना हा गुढार्थ आपल्या अखंड चिंतन व मननातून उलगडला होता.साधनेतून याला त्यांना स्वानुभवाची ही जोडी मिळत गेली होती.लौकिकात तर पार्वती मातु:श्री निरक्षर होत्या.पण त्यांना ज्ञानेश्वरी वर बोट ठेवल्याबरोबरच कुरुक्षेत्रावरील दृश्य दिसत असे.हेच त्यांच्या निरीक्षर असुनही ज्ञानेश्वरी वाचता लिहीता येण्याचे गुढ होते व त्याचा अनुभव त्यांनी बाळ श्रीपादला ही दिला होता.अखंड साधना, तपश्चर्येमुळे मातु:श्रींना वाचासिद्धी प्राप्त झाली होती.आपल्या सासुबाईकडून त्यांना ज्योतिष विद्या मिळली होतीच.त्यामुळे त्यांचा होरा हा तंतोतंत खरा होत असे.
यथावकाश मोठा मुलगा गोविंद याचे लग्न झाले व सुन आली.मुलगी अनसुया यांचे लग्न बेळगाव येथील कुलकर्णी यांच्याकडे झाले.मातु:श्री प्रपंच अगदी नेटाने व शांत राहून करीत.कुठल्याही प्रसंगी त्यांचा समतोल ढळलेला दिसत नाही.हे सर्व त्यांनी अखंड साधनेने मिळवले होते.अखंड भगवद स्मरणात राहल्याने त्यांच्या वृत्तीही भगवतरुपच झाल्या होत्या.आपली आई एकांतात काय साधन करते हे मामांना बघायचे होते.त्यांनी रात्री एकांतात मातु:श्री जपास बसल्या की बघण्याचे ठरविले.रात्री बघतात तर मातु:श्रींच्या ठाई मोठा प्रकाश झोत प्रगट झालेला होता.त्या प्रकाशात भगवान श्रीकृष्ण गोपीकांसमवेत फेर धरुन नाचत होते व त्यात मातु:श्री ही होत्या.मामांनी नंतर मातु:श्रींना याबाबत विचारले तेव्हा त्यांनी याची वाच्यता न करण्यास मामांना सांगितले.सन १९२८ साली दत्तूअण्णांनी देवांच्या आज्ञेनुसार योग मार्गाने आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.त्यानंतर मातु:श्रींना आपल्या अंगावरील कपड्यानिशी घरदार सारे सोडावे लागले.पण इतक्या भिषण स्थितीत ही त्या डगमगल्या नाहीत. "हरीची इच्छा" असे म्हणून त्या शांत होत्या.अशातच भगवान अक्कलकोट स्वामी महाराज प्रगटले व मातु:श्रींना म्हणाले, "बाई आता तुला दारिद्र्याचे दशावतार बघायचे आहेत." त्यावर मातु:श्री म्हणाल्या, "देवा आपण सोबत असता मी दारिद्र्याचे दशावतार काय तर शतावतार ही आनंदाने बघेल." हे आपले शब्द मातु:श्रींनी तंतोतंत खरे करुन दाखविले.त्या मुठभर पोहे खाऊन राहिल्या ,वेळेप्रसंगी पाण्यावर राहिल्या पण त्यांनी कुणाही पुढे हात पसरविला नाही.घरातून निघाल्यावर मातु:श्री पुण्यात आपल्या भावाकडे आल्या.चहुकडून संकट कोसळत होते.दत्तूअण्णा गेलेले, दोन मुले १४ चा श्रीपाद आणि ५ वर्षांचा यशवंत,एक नातू घरात कर्ते कुणीही नाही .अशा परिस्थितीत त्यांनी मार्ग मिळावा यासाठी स्वामीरायांचे ध्यान आरंभिले.काही वेळाने स्वामी प्रगटले व "आम्ही पाठीशी आहोत" असे आश्वासन देऊन गुप्त झाले.मातु:श्रींना या मुळे मोठा धीर मिळाला .अशा बिकट परिस्थितीत ही त्या मामांना म्हणजे श्रीपादा ला उत्तम पारमार्थिक शिक्षण त्या देतच होत्या.अगदी समाधानी वृत्तीत मातु:श्री सर्व संसार करित होत्या.आलेल्या परिस्थितीला धीरोदात्त पद्धतीने सामोरे जाऊ लागल्या.मामा मोठे झाल्यावर वेगवेगळ्या नोकरी करुन आपल्या आईला हातभार लावू लागले.त्यानंतर थोडी परिस्थिती ठिक झाली. एवढ्या बिकट परिस्थितीत ही त्यांची बैठक साधना कधीही चुकली नाही.हीच साधनेची गोडी त्यांनी मामांनाही अनुभव देऊन लावली. नागपंचमीला नागनाथ पार येथे नाथपंथी साधुंना शिधा देण्याची प्रथा मामांकडे होती.नरहरी मामा ती शिधा नागनाथपार ला घेऊन जात असत.रात्री श्री स्वामी महाराज स्वतः मातु:श्रींकडे प्रगट होत व शिधा पोचल्याची पावती देत.मामांनी आपल्या आईला पार्वती मातु:श्रींना एकटे रिकामे कधीही बघितले नव्हते.त्या सदैव काहीतरी करत असत.त्यांचा रात्रीचा दिनक्रम असा की ,रात्री आठ ते अकरा त्या वेळेस बैठकीस बसत असतं.अकरा वाजता उठून हातपाय धुवून थोड पाणी पित व नामस्मरण करित येरझारा घालित. परत रात्री साडेअकरा ते अडीच साधना मग परत पाणी पिऊन येरझार्या.त्यानंतर तिन ते पाच पुन्हा साधन. दत्तूअण्णा गेल्यावर मातु:श्रींनी जमिनीला कधीही परत पाठ लावली नाही.इतके कठोर साधना त्यांनी आजिवन पुढे केले होते.मातु:श्री तिर्थयात्रेला गेल्यावर त्यांनी मामांना तेथुन ध्यानात आपली सर्व तिर्थयात्रा ,तेथील क्षेत्र दाखविले होते.त्यांनी मामांना ज्योतिष शास्त्राचे ही मार्गदर्शन केले होते.त्यांनी मामांचे त्याकाळी लग्नं ही लावून दिले होते.
एके दिवशी मातु:श्री विलक्षण आनंदात होत्या त्यांनी मामांना जवळ बसविले व डोळे मिटण्यास सांगितले."डोळे मिट"म्हटल्यावर मामांनी डोळे मिटले व मातु:श्रींनी त्यांच्या डोक्यावर आपला कृपेचा सिद्धहस्त ठेवला.तत्क्षणी मामांचे देहभान हरपले व ते प्रगाढ समाधीत स्थिर झाले.मामांना निर्विकल्प समाधी लागली होती.ते त्या अवस्थेत जवळपास पाच तास होते.त्यानंतर अतिव आनंदात त्यांनी डोळे उघडले व समोर बसलेल्या मातु:श्रींच्या चरणी आपले मस्तक ठेवले.पुढे बारा वर्षांनी तुला असाच अनुभव एका महापुरुषाच्या सानिध्यात येईल व तेच तुझे सद्गुरु.स्त्रीयांना शक्तीपात दिक्षा देण्याचा अधिकार आहे पण बिज मंत्र देता येत नाही.त्यामुळे ते सत्पुरुष तुला परंपरेचा बिज मंत्र देतील व कृतार्थ करतील.मातु:श्रींचे दोनच शिष्य होते एक तर झाडूवाली महारीण व दुसरे प्रत्यक्ष मामा.त्या झाडूवाल्या बाईचे निस्सीमपणे भगवत स्मरणात स्थिर असणे हा एक अलौकिक चमत्कारच होता. त्यांनी मातु:श्रींची कृपा संपादन केली होती. मोठ्या मोठ्या महापुरुषांनाही कठीण अशा प्रकारे मातु:श्रींनी योग मार्गाने देह ठेवला.
२७ नोव्हेंबर १९४१ साली मातु:श्री मामांना म्हणाल्या , "सख्या तुला योगी कसा देह ठेवतात हे पहायचे आहे ना? मग बस इथे निट ध्यान लावून बघ." स्वतः पार्वती माता ऊर्ध्व मुद्रा लावून बसल्या.थोड्याच वेळात त्यांच्या मस्तकातून एक निळ्या तेजाची ज्योत आकाशाकडे जाता़ंना दिसली.हा सर्व दुर्लभ सोहळा बघतांना ,मामांना कुठेही जाणवले नाही की हा तर "मृत्यू" आहे.त्यांच्या डोळ्यासमोर फक्त ते तेजच तरळत होते.यातून बाहेर आल्यावर त्यांच्या लक्षात आले की आपल्या मातु:श्रींनी सिद्धमार्गाने आपले प्राण अनंतात विलीन केले आहे.मामांवर जणू अचानक दु:खाचा डोंगरच कोसळला पण यातून ही सावरत त्यांनी आपल्या आईचे और्ध्वदेहीक यथाशास्त्र पार पाडले.मातु:श्रींची चिता जळत असतांना सबंध आसमंतात दिव्य चंदनाचा सुंगंध सुटला होता.तो सुगंध इतका तिव्र होता की दूरुन लोक तो सुगंध कुठून येतो आहे हे बघायला धावले. या दु:खाचा आवेग काही केल्या कमी होत नव्हता.अशा मनस्थितीत मामा एकदा नसरापूर येथील स्मशाना जवळील नदीकाठी जाऊन बसले.त्यांचा दु:खातिरेक कमी होत नव्हता तेव्हा अशातच त्यांच्या पुढे वृंदावनात सुरु असलेली भगवतांची रास लिला प्रगट झाली.मामांनी ते दिव्य दृश्य बघितल्यावर त्यांचे दु:ख कमी झाले.हे घडविण्यामागेही मातु:श्रींचीच लिला होती.पुढे ही मातु:श्री मामांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी त्यांना दर्शन ,दृष्टांत देत असत. पुढे बरोबर बारा वर्षांनी मामांना त्यांचे सद्गुरु योगीराज श्री गुळवणी महाराज भेटले व त्यावेळी ते मामांना म्हणाले होते की, "तुमच्यावर सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज व आपल्या मातु:श्रींची पूर्ण कृपा आहे!" अशा प्रकारे अनंत गुणांनी मंडित असलेल्या या मातु:श्री आपल्या सर्वांना साधना मार्गावर अविरत चालण्याची बुद्धी देवोत हीच माझी श्रीचरणी प्रार्थना.
✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️
#श्रीदत्त_शरणं_मम🌸🌿🙏🚩
#महाराज_ज्ञानेश्वर_माउली_समर्थ🌸🌿🙏🚩


Good
ReplyDelete