Tuesday, December 20, 2022

ब्रम्हावतार सद्गुरु श्री सोपानदेवांचा ७२७ वा समाधी दिनी🌺🌸🙏🌹

 


#सोपानकाकांचा_७२७वा_समाधी_दिन 🌸🙏
देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा ।
जावे सासवडा उत्सवासी ।।
   
     आज मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी आमच्या सर्वांचे लाडके , संपूर्ण वारकरी संप्रदायाचे काका ,आपल्या ज्ञानदेवांचे धाकटे बंधूराज ,प्रत्यक्ष ब्रह्मावतार असलेल्या सद्गुरु श्रीसोपानदेवांचा समाधी दिन. खरंतर वारकरी संप्रदायासाठी हे वर्ष विशेष महत्वाचे ठरले आहे..करुणाब्रह्म कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती महाविष्णु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींसोबतच इतर बंधू त्रयांचेही हे सप्तशतकोत्तर रौप्य समाधी वर्ष आहे. श्रीसोपानकाकांच्या अधिकाराचे वर्णन करतांना प्रत्यक्ष त्यांचे सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज लिहीतात

"धन्य हा खेचर धन्य हा सोपान । भक्तीचें जीवन जनक हेतु ।। धन्य याचे कुळ पवित्र कुशळ । नित्य हा गोपाळ जवळी असे ।। याचेनी स्मरणें नाशती दारुणें । कैवल्य पावणे ब्रह्यामाजी ।। निवृत्ति म्हणे परब्रह्म हे साकार । तेथील अंकुर उमटले ।।"
                      प्रत्यक्ष आपल्या सद्गुरुरायांनी परब्रह्म म्हणुन ज्यांचा उल्लेख केला आहे अशा सोपानदेवांचा अधिकार आपण काय वर्णावा? निवृत्तीनाथांचा अधिकार,त्यांचे महात्म्यांचे वर्णन माउलींनी ज्ञानदेवीत,आपल्या अभंगातून जागोजागी केलेले आपण सर्वांनी वाचलेले आहेचं पण प्रत्यक्ष निवृत्तीनाथांनी आपल्या धाकट्या भावाच्या अधिकाराचे,शिष्याच्या अधिकाराचे हे वर्णन एकमेवाद्वितीयचं म्हणावे लागेल. शांतिब्रह्म नाथबाबा आपल्या गोड शब्दात म्हणतात
"ब्रह्मा अवतार नाम हे सोपान । केलेसे पावन चराचर ।।"

खरंतर सोपानकाकांचे व इतर भावंडांचे वेगळे असे चरित्र मांडणे शक्य नाही कारण या चारही अवतारांच्या लिला  एकमेकांशी संलग्नच आहेत.त्यामुळे इथे ते मांडण्याची विशेष गरज नाही कारण आपल्याला तो सर्व लिला भाग माहितीच आहे..श्रीविठ्ठलपंत-रुक्मीनी मातोश्रींचे जिवन ,विवाह,संन्यास , गृहस्थाश्रम,त्रंबक यात्रा, निवृत्तीनाथांना भगवान गहिनीनाथांचा अनुग्रह,माता-पित्याचा देहत्याग,शुद्धीपत्र,माउली आदी दोन्ही भावंडांना अनुग्रह, निवृत्तीनाथांच्या आदेशाने माउलींनी पैठणादी ठिकाणी केलेले चमत्कार , नेवासा क्षेत्री ज्ञानदेवीचे अर्थात भावार्थदीपिकेचे प्रगटीकरण या सर्व चरित्रलिला प्रसंगी सोपानदेव ही त्याचा भाग होतेच त्यामुळे वेगळं असं कुणाचही चरित्र नाही.ते एकंदरीत चौघांचे ही चरित्र आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.पण यातही सोपानदेवांवर निवृत्तीनाथांनी अनुग्रह केल्यावर त्यांचे योगमय झालेले जिवन व आत्मज्ञानी ,महायोगी झालेल्या सोपानदेवांचा अधिकार एका विशेष प्रसंगी आपल्याला ठळक दिसुन येतो तो असा की " ज्यावेळी विसोबा चाटी हा चारी भावंडांना अतोनात त्रास देतो आणि मांडे भाजावयास खापर देत नाही त्यावेळी माउली आपल्या योगसामर्थ्याने पाठीवर मांडे भाजतात.त्यानंतर विसोबा हे माउलींना शरणं येतात.हे सर्वश्रुत,सर्वांच्या परिचयाचे आहेचं.पण त्यावेळी माउली किंवा निवृत्तीनाथ त्यांना उपदेश करित नाहीत तर हे काम निवृत्तीनाथ सोपानकाकांवर सोपवतात...
सोपानदेवांनी विसोबांवर अनुग्रह केला तो प्रसंग अतिशय सुंदर शब्दात आहे
"खेचरा हृदयी प्रकाश पडला । गुरुरुपे सोपान सखयाला । साष्टांग नमूनी चरणाला । स्फुंद स्फुंदोनी रडतसे ।। सोपान सखया कृपा करी । अपराधी मी दुराचारी । हस्त ठेविला मस्तकावरी । उपदेशी मम दुर्जना ।। खेचरा होता वैराग्य प्रखर । सोपानदेव शीरी ठेविती कर । महावाक्य मंत्र वारंवार । विसोबा कर्णी ओपीला ।।"
                पुढे खेचराचा सद्गुरु विसोबा खेचर झाले , त्यांनीच पुढे भक्तराज नामदेव रायांना अनुग्रह केला हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. सोपान काकांनी विसोबांवर ज्यावेळी अनुग्रह केले त्यावेळी त्यांचे वय अवघे १७/१८ वर्षाचे असावे. करुणाब्रह्म ज्ञानोबारायांनी देह ठेवल्यावर काही कालाच्या अंतरावरच तिघेही भावंडे समाधीस्थ झालीत.सबंध इतिहासात ही एकमेव , अद्वितीय आणि आश्चर्यजनक गोष्ट आहे.यात माउली नंतर सर्वात प्रथम समाधीस्थ झाले ते सोपानदेव. सोपानकाकांनी माउली समाधिस्थ झाल्यावर अवघ्या एक महिन्यानी जिवंत समाधी घेतली त्यावेळी सोपानकाकांचे वय अवघे २२ वर्ष होते.श्रीसोपानदेवांनी समाधीत चिरकाल वास्तव्यासाठी निवडलेली जागाही अतिशय दिव्य आहे..कर्हा नदीतीरी असलेले सासवड हे गाव व ज्याठिकाणी समाधी घेतली ते ठिकाण म्हणजे चतुर्मुख भगवान श्री ब्रह्मदेवांचे तपस्थान.जणु ब्रह्मदेवांनी  आपल्या आवडत्या स्थानी चिरकाल वास्तव्यास तिचं जागा पुन्हा निवडली. सोपान काकांचे समाधी वर्णन करतांना नामदेवराय लिहीतात

"देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा । जावे सासुवडा उत्सवासी ।।१।। सोपानासी आम्हीं दिधले वचन । चला अवघेजण समुदाय ।।२।। अलंकापुरीची यात्रा केली सांग । मग पांडुरंग सिद्ध झाले ।।३।। दुरोनी पताका दिसती मनोहर । उठावले भार वैष्णवांचे ।।४।। निवृत्ती मुक्ताई घेतला सोपान । जातो नारायण कर्हेतीरीं ।।५।।नामा म्हणे देव गंधर्व सुरगण ।चालिले सोपान समाधीसी ।।६।।
                सोपानकाकांच्या समाधी प्रसंगी प्रत्यक्ष पंढरीनाथ राही, रखुमाई सह तिथे हजर होते.तसेच नामदेवराय,विसोबा, चांगवटेश्वर,सावता महाराज,परिसा भागवत असे सर्व संतजन हजर होते. त्या प्रसंगाचे वर्णन अतिशय सुंदर अभंगातून नामदेवरायांनी केले आहे.त्यातील काही महत्वाच्या घडामोडी अशा की ,एकादशी चे पारणे करण्यासाठी प्रत्यक्ष राही-रखुमाई स्वैपाकाला सिद्ध झाल्या.भगवान पंढरीनाथांनी वैष्णवांना जेवावयास पात्र मांडले. विसोबा खेचर,पुंडलिक ,नामदेवरायांना सोबत घेऊन भगवान पंढरीनाथ पात्र वाढू लागले. पुढे देवांनी नामदेवरायांनकरवी सोपानदेवांना जेवावयास बोलाविले.भक्त पुंडलिकाने त्यांचे पुजन केले व रुक्माईंनी जेवणाचे ताट वाढले .एकादशीचे पारणे फेडल्यावर सर्वांनी द्वादशीला रात्री  किर्तन नामगजरात करुन रात्र व्यतित केली.त्रयोदशीला पहाटे सर्वांनी भोगावती चे स्नान केले आणि सोपानदेव समाधी घेण्यासाठी सज्ज झाले.विसोबांनी गंध ,अक्षता घेऊन सोपानदेवांचे पुजन केले.नारा,विठा,माहादा ,गोंदा यांनी समाधी विवरातील जागा झाडून साफ केली. पुढे सोपानकाका समाधी स्थळी आले .निवृत्तीनाथांनी व पांडुरंगांनी सोपानकाकांचे दोनही कर धरले व त्यांना समाधी स्थळी आसनस्थ केले.हे सर्व दृष्य बघुन मुक्ताई,साधु,संत मंडळी कासावीस झाले ,सर्वांच्या हृदयात घालमेल सुरु झाली.सोपानकाकांच्या विरहाच्या कल्पनेनी सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सर्वांनी सोपानदेवांच्या चरणी प्रणाम केला व सोपानदेवांच्या समाधीचे विवर बंद करण्यात आले..ती तिथी होती मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी या पावन तिथीला ब्रह्मावतार सोपानकाका समाधी स्थळी आसनस्थ झाले व सर्वांच्या कल्याणासाठी चिरकाल त्यांच्या आवडत्या स्थळी अखंड वास्तव्य करते झाले.
सोपानकाकांची साहित्य संपदा-
       सोपानदेवांची सर्वांत महत्वाची रचना म्हणजे "सोपानदेवी" ही श्रीमद् भगवद्गीतेवरील समश्लोकी आहे. गीतेंच्या सातशे श्लोकांवर सोपानदेवांनी ७३९ ओव्या रचल्या आहेत.सोपानदेवीची भाषा अगदी सहज सोपी व प्रवाही आहे. प्रत्येकाला गीतेच्या संस्कृत श्लोकाचा अर्थ सहज समजेल अशा ओव्या सोपानकाकांनी लिहील्या आहेत आणि हे सोपानदेवी वाचतांना लगेच लक्षात येईल. तसेच सोपानकाकांनी रचलेला हरिपाठ सुद्धा संप्रदायात अतिशय महत्वाचा मानला जातो. सोपानकाकां चे हरिपाठाचे अभंग धरुन एकुण रचना म्हणजे ११७ अभंग,१ पद,१ नमन आणि २ आरत्या असे थोडेचं पण अतिशय महत्वाचे लेखन आज उपलब्ध आहे. आज सोपानकाकांचा ७२५ वा सप्तशतकोत्तर रौप्य समाधी उत्सव. आपल्या सर्वांवर सोपानकाकांनी चिरंतन अखंड कृपा करावी हीच एक मागणी त्यांच्या सुकोमल चरणी करतो. श्रीसोपानकाकांनी माउलींची अखंड सेवा करुन घ्यावी हे मागणे मागुन इथेच लेखनिला विराम देतो.
       ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी✒️✍️


Sunday, December 18, 2022

मारोतीरायांचे अवतार नामावतार सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची आज १०९ वी पुण्यतिथी 🙏🌹🌺🚩🌸

 


नमस्कार_त्या_ब्रह्मचैतन्य_मूर्तीं!!! 🙏🌺🌸🚩

              माघ शुद्ध द्वादशी प्रत्यक्ष मारोतीरायांचे अवतार,नामावतार सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची १०९ वी पुण्यतिथी. श्री महाराजांचे नुसते स्मरण केले तरी सर्व जिवनपट हा डोळ्यापुढे तरळायला लागतो.महाराजांचे बालपण ,गुरुभेटीस्तव केलेला गृहत्याग, विविध अवतारी संतांच्या भेटी, सद्गुरु माउली तुकामाईंची भेट,परिक्षा , त्यानंतर तुकामाईंची पूर्ण कृपा ,तप,‌ गोंदवल्यात परतने ,तेथील विविध लिला,मातृ भेट,रामरायांचे आगमन , गृहस्थाश्रम,शिष्य परिवार, अन्न दान ,गोसेवा ,धाकट्या राममंदिराची स्थापना , महाराजांची दिव्य गुरुपरंपरा,अनन्य अशा ब्रह्मानंद बुवांची गुरुभक्ती,रामानंद बुवांचे अलौकिक चरित्र , प्रल्हाद महाराजांचे वैराग्य, तात्यासाहेब ते बेलसरे बाबांचे अतिशय मायाळू शब्द सर्व कसं एका परीकथे सारखं आश्चर्यकारक आहे.ही देव माणसं आपल्यात कधीतरी होऊन गेली, आपल्यासारखेच मानव देहात राहून गेली आणि हो तेही अगदी अलिकडच्या काळात यावर विश्वास बसत नाही."नामा शिवाय तरणोपाय नाहीच, कलियुगात नामस्मरण हीच कामधेनू आहे " या शास्त्रवचनाला सिद्ध करण्यासाठीच जणू मारोतीराय श्रीमहाराजांच्या रुपात अवतरले होते. 


                      श्रीमहाराजांचे चरित्र इतके विलक्षण आहे की यातला कुठला भाग मांडावा आणि काय वगळावे यांच्या विचारानेच मी पुरता गोंधळून गेलो.कारण ज्याला आपण ७/८ वर्षाचे बालपण म्हणतो त्या वयात श्रीमहाराजांनी प्रथम गृहत्याग केला,नंतर ९ व्या वर्षी परत त्यांनी गृहत्याग केल्याची हकिकत वाचली‌ तरी बुद्धी स्तिमीत झाल्या शिवाय राहणार नाही.गुरुभेटीस्तव इतक्या कमी वयात बाळ गणपतींनी संपूर्ण भारत पालथा घातला. कृष्णा-वारणा संगमापासून सुरु झालेला प्रवास पुढे मिरज येथील अण्णाबुवा, सटाणा येथील देव-मामलेदार,तेथून भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांच्याकडे ,तेथून हुमनाबादला माणिकप्रभु महाराजांकडे, या सर्वांनी आशिर्वाद दिल्यावर महाराज अबू पर्वतावर काही काळ राहले.तिथे महाराज योग शिकले व पुढे काशीस आले.तिथे तैलंग स्वामींचा आशिर्वाद भेट घेऊन अयोध्या आणि मग नैमिषारण्यात आले.नैमिषारण्यात काही काळ‌ व्यतित केल्यावर महाराज भगवान रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीसाठी कलकत्ता येथे आले.श्रीठाकुरांची भेट झाल्यावर महाराज दक्षिणेकडे वळले .तिथे त्यांना तुकामाईंकडे जाण्याचा आदेश झाला. श्रीमहाराजांचे वय या प्रवासात अवघे ११/१२ वर्षाचे होते.आपण नकाशा पुढे ठेऊन फक्त एकदा दृष्टीक्षेप जरी टाकला तरी लहानग्या गणपती बुवांनी गुरुभेटीस्तव केलेल्या या खडतर प्रवासाची प्रखरता आपल्याला लक्षात येईल. 

पुढे तुकामाईंची येहेळगावी झालेली भेट ,त्यांनी घेतलेली प्रखर परिक्षा आणि श्रीमहाराजांची विलक्षण गुरुसेवा हा तर श्रीमहाराजांच्या चरित्रातील‌ मेरुमणीच आहे.तुकामाईंनी घेतलेली परिक्षा इतकी विलक्षण आहे की वाचुनच आपला थरकाप उडतो.तुकामाईंनी वर्ष भर परिक्षा घेतल्यावर श्रीमहाराजांना अनुग्रह दिला .अनुग्रह देतांनी तुकामाईंनी श्रीमहाराजांना जो उपदेश केला तो पु.श्रीबाबा बेलसरे यांनी ज्या शब्दात लिहीलाय तो जसाच्या तसा पुढे देतो आहे. अनुग्रह देऊन तुकामाईंनी श्रीमहाराजांना सांगितले की, 

"प्रापंचिक लोकांना-विशेषत: मध्यम स्थितीतील लोकांना -आपल्या प्रपंचामध्येच परमार्थ कसा करावा हे शिकव.राममंदिराची स्थापना करुन राम नामाचा प्रचार कर.माझे महत्व वाढविण्यापेक्षा समर्थांचे महत्व वाढव.लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग दाखव.जे खरे दीन असतील त्यांची सेवा कर,आणि सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर." इतका उपदेश केल्यावर दोघेही परत घरी परतले.श्रीमहाराज आता गुरुकृपेने न्हाऊन निघाले होते.श्रीसद्गुरुंच्या कृपा अनुग्रहाने आता ते स्वत: सद्गुरु स्वरुप झाले होते. श्रीमहाराजांनी आपल्या सद्गुरुंचा हा उपदेश आपल्या संपूर्ण जिवन काळात तंतोतंत पाळला हे आपल्याला चरित्रातून लक्षात येईलच.पुढे अनुग्रहानंतर महाराजांनी सद्गुरुंच्या आज्ञेने तप करण्यासाठी हिमालयात प्रयाण केले.तिथे महाराजांनी प्रखर तप आचरले.तेथुन काही काळाने महाराज नैमिषारण्यात आले. श्रीमहाराज सलग दोन वर्ष नैमिषारण्यातील गुहेत साधनामग्न राहिले.इथेच त्यांची नानासाहेब पेशवे यांच्याशी भेट झाली.श्रीमहाराजांचे नैमिषारण्य हे स्थळ विशेष प्रिय होते. जिवनातील उत्तर काळात गोंदवले सोडून महाराज नैमिषारण्यातच जायला निघाले होते.हा प्रसंग सर्वश्रुत आहेच त्यावेळी रामराय,सितामाई आणि लक्ष्मणजींचे विग्रह रडल्यामुळे त्यांनी ते रहित केले.

               श्रीमहाराजांचे गोंदवल्यात परतने आणि पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश,प्रथम पत्नीचा मृत्यू पुन्हा दुसले लग्न आणि पुन्हा तुकामाईंचे दर्शन हा सगळा कथाभाग चरित्रात आला आहेच‌. श्रीमहाराजांच्या चरित्रातील माझा सर्वात आवडता भाग म्हणजे श्रीमहाराजांची व ब्रह्मानंद बुवांची भेट.ब्रह्मानंदबुवा हे वेदमूर्ती ,शास्त्राभ्यासी आणि विद्वान म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते.त्यांनी या सर्वांचा केलेला त्याग व त्यांची महाराजांच्या चरणी असलेली अनन्य भक्ती ही एकमेवाद्वितीय आहे.तो भाग अतिशय चिंतनीय आणि आचरणीय आहे.ब्रह्मानंदबुवा हे श्रीमहाराजांपुढे कधीही अवाक्षर सुद्धा काढत नसत.आजही आपण श्रीमहाराजां समवेत असलेले ब्रह्मानंद बुवांचे छायाचित्र पाहिले तर ते प्रत्येक छायाचित्रात हात जोडून,खाली मान घालूनच उभे असलेले आपल्याला दिसतील.खरंच प्रत्येक गुरुभक्तासाठी किती चिंतनीय असा हा दृष्टांत आहे.श्रीमहाराजांचा अफाट असा लोकसंग्रह ,अचाट असे कथा प्रसंग आहेत,ज्यात त्यांच्या ठिकाणी झालेले मारोतीरायांचे दर्शन,थोड्याशा अन्नात हजारो लोकांना अन्नदान ,गोसेवा, मंदिर उभारणी व रामरायांचे आगमन अशा एक नाही तर हजारो लिलांचे भाग आहेत.प्रत्येक साधकाने तो भाग प.पू.बाबा बेलसरे यांनी लिहीलेल्या चरित्रात स्वतः वाचावा आणि त्याचा आनंद जरुर घ्यावा. एका लेखातून हे सर्व प्रसंग मांडणे केवळ अशक्य आहे.श्री महाराजांच्या चरित्रातुन त्यांनी दिलेली शिकवणीचे वाचन,मनन आणि चिंतन प्रत्येक व्यक्तीने आवर्जून केलेच पाहिजे कारण सर्व चरित्राचा ,लिलांचा तो गाभा आहे.

आज श्री महाराजांची पुण्यतिथी महाराजांनी देह ठेवला तो हृदय व श्रीमहाराजांची शिकवण हे दोन्ही प्रसंग परम पूज्य बाबा बेलसरेंनी लिहीलेल्या चरित्रात जसा दिला आहे तसाच पुढे बाबांच्याच शब्दात देतो आहे.

                                  आपल्या आयुष्यातलं अखेरचं निरूपण संपवून महाराज आसनावर बसले तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता. लोकांनी त्यांच्या पायी माथा टेकवून त्यांचं दर्शन घेतलं. नंतर सर्वाना निजावयास सांगून ते खोलीत गेले. तीन-चार भक्तमंडळी त्यांच्याबरोबर होती.पहाटे चार वाजता श्रीमहाराज डाव्या कुशीवर वळले तेव्हा 'श्रीराम श्रीराम' असा माधुर्यानं भरलेला नामोच्चार त्यांच्या मुखातून झाला. पाच मिनिटांनी ते उठून बसले. खोलीतली चार-पाच मंडळी जागतच बसली होती. त्यांच्याकडे एकदा पाहून सिद्धासनात त्यांनी डोळे मिटले. सव्वापाचच्या सुमारास त्यांची समाधी उतरली. मग मंदिरात त्यांनी रामरायाला साष्टांग दण्डवत घातला आणि 'माझ्या माणसांना सांभाळ', अशी प्रार्थना केली. खोलीत परतून ते बसले तेव्हा का कोण जाणे, पण वामनराव ज्ञानेश्वरी यांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले. श्रीमहाराजांनी त्यांच्या डोक्यावर उजवा हात ठेवून त्यांच्याकडे प्रेमानं पाहिलं आणि म्हणाले, ''जेथे नाम तेथे माझा प्राण। ही सांभाळावी खूण।।'' श्रीमहाराजांच्या मुखातून झालेला हा अखेरचा बोध! बाकीच्या भक्तांनीही वामनरावांचं अनुकरण केलं. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून महाराजांनी त्यांना प्रेमभरानं पाहिलं. मग डोळे झाकून घेतले. त्यावेळी 'अमृत' नावाची उत्तम घटिका सुरू झाली आणि श्रीमहाराजांनी आपलं अवतारकार्य संपवलं. 'महाराज गेले' हे शब्द अंत:करण कापत वातावरणात घुमू लागले. आनंदाचा आधारच हिरावला गेल्याचं जहरी वास्तव हे शब्द सांगत होते.. ते ऐकणंदेखील असह्य़ होतं. त्या दिवशी ब्रह्मानंदबुवा कर्नाटकात गदग येथे होते. बेलधडीला जायला म्हणून ते घरातून जाताच गोंदवल्याची तार आली. त्यांचे पुतणे भीमराव ती घेऊन स्फुंदत रडत तसेच रस्त्यानं धावू लागले. दोन-तीन मैल पळत गेल्यावर लांबवर त्यांनी बुवांना गाठलं. धापा टाकत त्यांनी ती तार हाती ठेवली. ती वाचताच ब्रह्मानंदबुवा जमिनीवर कोसळले आणि लहान मुलागत आक्रंदत म्हणाले, ''श्रीमहाराज चालतेबोलते ब्रह्म होते रे! दोन रुपयांचं तिकिट काढलं की डोळ्यांनी पाहायला मिळत होते..'' आज या घटनेला शंभर र्वष लोटली. मार्गशीर्ष कृष्ण दशमी (२२ डिसेंबर १९१३) या दिवशी श्रीमहाराजांनी देहावतार संपविला. श्रीमहाराज गेले.. पण जे सदोदित आहेतच त्यांना कुठलं जाणं-येणं? फक्त त्यांच्या अस्तित्वाची जाणीव टिकायची तर ती नामानंच टिकेल. श्रीमहाराज सांगतात, ''तुम्हाला स्वत:ला कळत नाही इतकं तुमच्या मनातलं मला कळतं. ते ओळखूनही तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागं-पुढं चालतो. नामाची ज्योत जळती ठेवा. मी तुमच्या स्वाधीन होऊन राहीन, नव्हे मी तुमचा ऋणी होईन. तुम्हाला नामाची अत्यंत आवड लागली की माझा आनंद उचंबळून येतो. मग तुमच्यासाठी काय करू अन् काय नको, असं मला होऊन जातं. कारण नामावर प्रेम करणं म्हणजेच माझ्यावर प्रेम करणं! नामात मन ठेवा. हे माझं खरं दर्शन आहे. मी सांगितलेलं स्मरणात ठेवा. माझ्या सांगण्यात मी आहे. मला दुसरं कुठेही पाहू नका.''


श्रीमहाराजांची शिकवण त्यांच्याच शब्दांत जशीच्या तशी देतो आहे :-                 

              रामरायाला अनन्य शरण जाऊन अखंड त्याचे नाम घ्यावे.प्रत्येक माणूस या ना त्या मार्गाने समाधान शोधत असतो. पण सुख दु:खाचे हेलकावे देणे हा प्रपंचाचा मूळ स्वभाव असल्याने त्याच्या आहारी जाणाऱ्या माणसाला प्रापंचिक यश मिळून सुद्धा जीवनाच्या अखेर पर्यंत समाधान मिळत नाही. नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नाही. जनावरे देखील आपापला प्रपंच करतात. आपल्या खऱ्या स्वरूपाचा म्हणजे भगवंताचा विसर पडणे हे सर्व असमाधानाचे मूळ आहे. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली, तरच प्रपंचातील कष्टांचे सार्थक होते. असे श्रीमहाराजांचे अनुभवसिद्ध मत आहे.


अंत:करण शुद्ध होऊन पूर्ण समाधानाचा व खऱ्या आनंदाचा साक्षात्कार होण्यासाठी संताची संगत व भगवंताचे नाम हे दोनच उपाय प्रापंचिकाच्या पचनी पडतात. त्यातदेखील संताची संगत मिळणे व टिकणे कठीण असते. परंतु नामस्मरणाला कसलीही अट नाही, कसलेही बंधन नाही, त्यातच सत्संगती लाभते व भगवंताचे चिंतन आपोआप घडते. चिंतनातून अनुसंधान उदय पावते आणि अनुसंधान पक्के झाले की स्वत:च्या हृदयात भगवंताचे दर्शन घडते. हे श्रीमहाराजांच्या उपदेशाचे सार आहे.


प्रपंचामध्ये का होईना, पण निष्कपट प्रेम करावयास शिकणे हे भगवंतावर प्रेम करावयास शिकण्याची पहिली पायरी आहे. घरच्या माणसांना दीनवाणे व कष्टी कधी ठेवू नये, त्यांची आबाळ कधी करू नये, असे सांगून श्रीमहाराज म्हणत की ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही! नवराबायकोमध्ये, आईबाप व मुलांच्यामध्ये, भाऊबहिणींच्यामध्ये निष्कपट प्रेम असले तर त्यांना त्याचे विशेष कौतुक वाटायचे. सासू-सून प्रेमाने राहिल्या तर ते दोघींचीही स्तुती करीत. ’आपला परमार्थ हा प्रपंचात मिसळला पाहिजे. प्रपंच करीत असताना कर्तव्याची जागृती राखून त्यामध्ये भगवंताची अखंड स्मृती ठेवली तर कोणालाही समाधानाची प्राप्ति होऊ शकते.’ असे महाराजांचे सांगणे आहे.

श्रीमहाराज सांगत,’ बाळ, भगवंताने प्रपंचामध्ये ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवले आहे, तिच्यामध्ये समाधान मानावे आणि त्याच्या नामाला कधी विसरू नये. जो नाम घेईल त्याच्यामागे राम उभा आहे, नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो. एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.’

       अशा नामावतार श्रीमहाराजांनीच आपल्याला नामाची कास धरायची बुद्धी द्यावी, प्रपंच करतांना त्या रामराया चे अखंड स्मरण राहण्याची बुद्धी द्यावी आणि नामावर, सद्गुरु चरणांवर आपल्या सर्वांची निष्ठा उत्तरोत्तर वाढत जाऊन ती दृढ व्हावी हीच अखंड प्रार्थना श्रीमहाराजांच्या सुकोमल चरणी करतो.


✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

 माझे आधी झालेले व पुढील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇


 

!! जयाचा जनी जन्म नामार्थ झाला !

   जयाने सदा वास नामात केला !

   जयाच्या मुखी सर्वदा नाम र्किर्ती !

   नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मुर्ती !!


            !! जय जय रघुवीर समर्थ !!

🙏🌸|| श्रीराम जय राम जय जय राम || 🌸🙏

Tuesday, December 6, 2022

सगुणभगवद्स्वरूप भाग ६:- दत्तस्वरुप नारेश्वरचे नाथ समर्थ सद्गुरु श्री रंगावधूत महाराज.🌿🙏🌸🌺🚩

 



सगुणभगवद्स्वरूप भाग ६:- दत्तस्वरुप नारेश्वरचे नाथ समर्थ सद्गुरु श्री रंगावधूत महाराज.


श्वासे श्वासे दत्तनाम स्मरात्मन्!!!🌸🙏🌿


पंचम दत्तावतार भगवान श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे सत्शिष्य नारेश्वर निवासी सद्गुरु श्री रंगावधूत स्वामी महाराज हे संपूर्ण दत्त संप्रदायातील सर्व मान्य ,सर्व पूज्य अशी श्रेष्ठ विभूती आहेत.श्री थोरल्या स्वामी महाराजांच्या शिष्य प्रभावळीतील हे एक अलौकिक अवधूत संत रत्न.श्री रंगावधूत महाराज अर्थात बापजींचा अधिकार विलक्षण थोर होता.श्री स्वामी महाराजांच्या चरित्रासारखेच प्रखर व दैदिप्यमान,तपोपूत असे श्री बापजींचे चरित्र आहे.संपूर्ण गुजरात राज्यात दत्त भक्तीचा प्राण फुंकण्याचे व सर्व गुजरात मध्ये दत्त भक्ती रुजवून श्रीदत्त संप्रदायाला वर्धीष्णू करण्याचे विलक्षण कार्य बापजींनी केले. बापजींनी केलेली "दत्त बावनी" ही रचना आज सर्व दत्त संप्रदायात सर्व श्रुत आहे.प्रत्येक दत्त भक्तांच्या उपासनेत या रचनेचा समावेश झालेला आहे.बापजींची ही रचना अतिशय प्रासादिक आहे.विलक्षण गुरुभक्ती ,अनन्य मातृभक्ती, थोर दत्तभक्ती अशा अनेक गुणांनी मंडित झालेले बापजींचे चरित्र आपल्या सर्वांना नक्कीच मार्गदर्शक ठरणारे आहे.आज बापजींच्या दिव्य चरित्राचे आपण चिंतन करणार आहोत.


महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवळे हे महाराजांचे मुळ गाव.या गावात ऋग्वेदी अत्रिगोत्री कर्‍हाडे ब्राह्मण कलोत्पन्न श्री जयरामपंत वळामे नावाचे एक सत्शिल व धार्मिक गृहस्थ राहत असत.हे श्रीबापजींचे आजोबा.यांना चार मुलं होती.त्यातील तिसरे विठ्ठलपंत जे थोर विठ्ठल भक्त होते. हे बापजींचे पिताश्री.विठ्ठलपंतांची वृत्ती मुळातच विरक्त होती.ते आई वडिलांचा आशिर्वाद घेऊन भगवंतांच्या कृपा प्राप्ती साठी पंढरपूरास येऊन राहिले होते.अनेक दिवस तेथे अनुष्ठान केल्यानंतर त्यांना देवांनी घरी जाऊन गृहास्थश्रम स्विकारण्याची आज्ञा केली.ते घरी परत आले व त्यांचे लग्न पाली येथील मोघे यांची कन्या काशी यांच्या बरोबर झाला.काशीचे लग्नानंतर चे नाव रुक्मिणी असे ठेवले गेले.पुढे हे दाम्पत्य आपल्या एका स्नेही सरपोतदार यांच्या विनंतीवरुन गुजरात मधील गोधरा येथे विठ्ठल मंदिरात पुजारी म्हणून राहावयास गेले.या सत्शिल धार्मिक दाम्पत्याच्या पोटी कार्तिक शुद्ध नवमी अर्थात कुष्मांड नवमी संवत् १९५५ च्या सोमवारी ता.२१ नोव्हेंबर १८९८ रोजी प्रदोष काळी बापजींचा जन्म झाला.यथाकाळी बाळाचे बारसे केले गेले.भगवान पंढरीनाथांचा प्रसाद म्हणून या बाळाचे पांडुरंग असे नाव ठेवण्यात आले.त्यावेळी गोधरा येथे भिषण महामारी पसरली होती.जन्म होताच काही दिवसातच आई वडिलांना या लहानग्या बाळाला घेऊन जंगलात राहावे लागले.महामारी दूर झाल्यावर सर्वजन गावात परतले. बाळ पांडुरंग एक वर्षाचे झाले आणि सर्व घरावर वर्जाघात झाला.बापजींचे वडिल विठ्ठलपंत यांचे आकस्मित निधन‌ झाले.मातोश्री रुक्माईंना तर हा मोठा धक्का होता पण पाठीमागे दोन पुत्र होते.त्यांना सांभाळण्यासाठी त्या परत खंबीरपणे उभ्या राहिल्या.दिवसांमागून दिवस गेले बाळ पांडुरंग आता आठ वर्षांचे झाले आणि त्यांचे लहान भाऊ नारायण हा सहा वर्षांचा झाला.मातोश्रींनी या दोघांचे मौंजीबंधन करण्याचा विचार केला‌ व त्यासाठी त्या देवळे या आपल्या मुळ गावी आल्या.शुभ मुहूर्तावर दोघांचीही मुंज पार पडली.आता दोघाही बटुंना घेऊन मातोश्रींनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी, औदुंबर येथे दत्त दर्शनाला घेऊन जावे हा विचार केला.मातोश्री त्यांच्या बहिन व मुलं असे मिळून वाडीला आले.त्यावेळी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचा मुक्काम वाडीतच होता.देवांचे दर्शन करुन मातोश्री दोन्ही मुलांना घेऊन श्री स्वामी महाराजांकडे आल्या.बाळ पांडुरंगाने स्वामींना प्रथमच पहिले व जन्मा जन्माचे सद्गुरु प्रेम एकदम उफाळून वर आले.स्वामींनीही आपल्या या प्रिय शिष्याला तात्काळ ओळखले.पांडुरंगाने स्वामींना‌ पाहताच ते अंगावरील कपड्यांसह स्वामींच्या जवळ‌ गेले व त्यांच्या मांडीवर आपले डोके ठेवले.त्यावेळी स्वामी म्हटले "हा बाळ तर आमचाच आहे." हीच बापजींची श्री थोरल्या स्वामी महाराजांशी झालेले प्रत्यक्ष एकमात्र भेट.त्यानंतर सर्वजन घरी परतले.पण सद्गुरु दर्शनानंतर पांडुरंग अगदी अंतर्मुख झाले.त्यांना सतत स्वामी महाराजांची आठवण येऊ लागली.एकदिवस त्यांना थोरल्या स्वामी महाराजांचा पोथीचे पारायण करण्याचा दृष्टांत झाला.पण पोथी कुठली हे कळेना? त्यांच्या मामांनीपांडुरंगांनी गुरुचरित्राचे पारायण करण्यास सुरुवात केली.त्यानंतर त्यांचे मन‌ शांत झाले.तसेच ते धार्मिक ग्रंथ वाचु लागले व अखंड राम नाव लिहून मारोतीरायांना अर्पन करु लागले.याच बरोबर पांडुरंगाचे शालेय शिक्षण ही सुरु होते.ते अतिशय खोडकर विद्यार्थी होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी मध्ये झाले व पुढील शिक्षणासाठी ते अहमदाबाद येथे गेले.पुढील शिक्षणही ते प्रथम श्रेणीत पास झाले.या शिक्षणाच्या काळातही त्यांची साधना अखंड सुरुच होती.रोज साधनेत विलक्षण अनुभूती येत असे व सद्गुरु माउलींच्या कृपेची प्रचिती येत असे.शिक्षण घेत असता पांडुरंगाची गांधीजींशी अनेकदा भेट झाली.त्यांना गांधीजींचे विचार आवडत असत.शिक्षणानंतर काही काळ पांडुरंगाने नोकरीही केली होती.त्यांच्या आईने ज्यावेळी लग्ना बद्दल त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी आईला स्पष्ट सांगितले की मी लहान भाऊ नारायण याचे शिक्षण होईपर्यंत घरात राहील आणि नंतर साधनेला निघून जाणार आहे.यावरुन त्यांना आपल्या जीवनाचे ध्येय स्पष्ट दिसले होते व भविष्यात आपला मार्ग कोणता याचाही दृष्टीकोण स्पष्ट झालेला कळतो.पुढे काही काळाने लहान भाऊ नारायणाचे शिक्षण पूर्ण झाले व त्यांना इंग्रजी शिक्षकाची नोकरी सुरु झाली.


त्यानंतर बापजींनी आपल्या आई कडे जाण्याची परवानगी मागितली.आईला हा वज्राघातच होता तरी त्यांनी आपल्या लाडक्या मुलाला होकार दिला व बाजींच्या दिव्य जिवन प्रवासाला आता खर्‍या अर्थाने सुरुवात झाली.आईला त्यांनी वर्षातून एकदा घरी येऊन तिनं दिवस राहण्याचे व दर महिन्याला पत्र लिहीण्याचे वचन दिले.त्यानंतर साईखेडा येथील धुनीवाले बाबाजी यांना शरणं जाऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे असा बापजींनी विचार केला.ते बाबाजींजवळ गेले व तेथे गेल्यावर बापजींना त्यांनी नर्मदा किनारी गेल्यावर तुझे काम होईल असे सांगितले.पुढे ते मार्गक्रमण करित करित नर्मदातिरावर येऊन पोचले.त्यांना एकाने नर्मदा किनारी नारेश्र्वराची जागा सुचवली. दोन-तीन व्यक्ती त्यांचेबरोबर त्यावेळी होते. त्या साधूस ही जागा पसंत पडली. त्याने आपल्या बरोबरच्या मित्रांना सांगितले की, “आज रात्रभर मी येथे राहतो. तुम्ही तुमचे घरी जा. ही जागा मला पसंत पडल्यास मी येथे वास्तव्य करीन. तुम्ही उद्या या. मी उद्या तुम्हाला निश्र्चित सांगेन.”


त्याची मित्रमंडळी आपल्या घरी परत गेली. बापजी तेथेच मुक्कामास राहीला.सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने ती जागा भयानक होती. आजूबाजूच्या ८-१० गावांची स्मशानभूमी येथे होती. पिशाच्चांचे तेथे वास्तव्य होते. उंचच उंच वृक्षांतून सूर्यकिरणे क्वचितच दृष्टोत्पत्तीस पडत होती. रात्री तर भयंकर अंधार असायचा. उजेड नाही. खोली किंवा पर्णकुटी नाही. दिवसा ढवळ्यासुद्धा लोक येथे येण्यास धजत नसत. त्यांच्या असे लक्षात आले की, हिंस्त्र प्राणी, विंचू, इंगळ्या, पाणविंचू, मोर, सर्प इत्यादी तेथे राजरोस फिरत असावेत. बापजींनी तेथे तशीच एक रात्र काढली. रात्री त्याला शंख फुंकण्याचे आवाज तेथे ऐकू आले. डमरूचे डम डम आवाज ऐकू आले. सुमधूर गायनाचा गंधर्वांचा कार्यक्रम चालू असून, त्यांचा उल्हसित करणारा आवाज, त्यांच्या कानावर ऐकू आला. साप-मुंगूस, मोर व साप हे जन्मजात शत्रू असलेले प्राणी तेथे गुण्यागोविंदाने एकत्र आनंदाने खेळत असलेले त्याला दिसले. मंदिरातील घंटेचे आवाज त्यास स्पष्ट ऐकू येत होते. वरील सर्व गोष्टींचा विचार करून देखील त्यांनी ठरविले की, आपण याच जागेवर तपश्चर्या करायची. येथेच उपासना, अनुष्ठान करायचे. दुसरे दिवशी त्यांचे मित्र नारेश्वरी आले. त्यांना बापजींनी सांगितले की, “मला ही जागा पसंत आहे. तपश्र्चर्येसाठी येथेच वास्तव्य करण्याचा माझा विचार आहे”. मार्गशीर्ष महिन्यात श्रीबापजी नारेश्वरच्या पवित्र भूमीवर वास करण्या करिता परतले.त्या काळी नारेश्वर निबीड अरण्य होतं‌.रतनलाल व दासकाका यांना परतवून बापजीं तेथील निवडुंगाखाली आसनस्थ झाले व त्यांच्या कठोर साधनेला सुरुवात झाली.एका झोपडीत राहून बापजींनी जवळपास आठ ते दहा महिन्यांचे अतिशय कठिण अनुष्ठान केले.पुढे दासकाका म्हणून बापजींचे स्नेही होते त्यांनी ही कुटीर पक्की बांधून घेतली.पुढे अवधूतांच्या वास्तव्याची चाहूल जनमानसात पसरली व जसे मधमाश्या पराग कन वेचायला फुलाजवळ येतात तसेच लोक बापजींकडे येऊ लागले.ज्या कडूनिंबाखाली बापूजींनी अनुष्ठान केले तो निंब ही गोड झाला.याच ठिकाणी बापजींना प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय प्रभुंचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते.अनेक लोक या कडूनिंबाचे दर्शन घेऊन दु:खमुक्त होऊ लागले.नारेश्वरी अवधूतांची अखंड तपश्चर्या आणि अनुष्ठान सुरु होते.ते कुणाशीही बोलत नसत.बापजींनी प्राणायामाचा अभ्यास ही नारेश्वरला पूर्ण केला.काही दिवसांनी थोरल्या महाराजांनी बापजींना १०८ दत्त पुराणांचे सप्ताह करण्याची आज्ञा केली.बापजींनी ते पारायणाचे अनुष्ठान पूर्ण केले.पण याचे उद्या पण कसे करावे या विवंचनेत बापजी असता श्री थोरल्या महाराजांनी त्यांना उद्यापन म्हणून १०८ दिवसांत नर्मदा परिक्रमा करण्याचं आज्ञा दिली.पण त्याआधी थोरल्या महाराजांनी बापजींना आदेश दिला की, "हे ब्रह्मचारी ,तु दक्षिण दिशेला जा.तुझी वाट गांडा (योगानंद महाराज) पहात आहे." पण गांडाबुवांची काहीही माहिती बापजींना नव्हती तरी ते गुरु आज्ञा प्रमाण मानून तसेच दक्षिणेकडे निघाले.पुढे तपास करता भरुचच्या एका भक्ता अडून बापजींना गांडा बुवांची माहिती मिळाली.ते काही काळात गांडाबुवांपुढे जाऊन पोचले.इकडे गांडाबुवांनाही थोरल्या महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितले होते की ब्रह्मचारी येतो आहे.दोघेही एकमेकांना चीर परिचीत असल्याप्रमाणे भेटले.पुढे गांडाबुवांनी "श्रीगुरुमूर्ती चरित्र" शुद्धीकरण करण्याची अडचण बापजींना सांगितली .बापजींनी ही शुद्धीकरणाची सेवा करण्याची तयारी दर्शवली व मग गांडाबुवा निश्चिंत झाले.पण त्याआधी आपण नर्मदा परिक्रमा पूर्ण करणार आहोत असे सांगून बापजी परिक्रमेला निघून गेले.हे परिक्रमा साधन रुपी उद्या पण बापजींनी यथासांग पूर्ण केले.या परिक्रमेत बापजींना भगवान वेदव्यासांचे दर्शन घडले होते.(बापजींच्या नर्मदा परिक्रमेवर एक लेख होईल इतका तो विलक्षण प्रसंग आहे.शब्दमर्यादेस्तव ते इथे लिहीता येणे शक्य नाही .)त्यानंतर ते पुन्हा गांडा महाराजांना येऊन भेटले.त्यांनी महाराजांजवळ राहून ते शुद्धीकरणाचे कार्य पूर्ण केले.यानंतर श्रीबापजी व गांडा बुवांचे एकमेकांवर निस्पृह प्रेम जडले.


बापजी सद्गुरु श्री साईनाथ महाराज शिर्डी यांच्याही दर्शनास जाऊन आले होते.गम्मत अशी की सर्वात पहिले मामांनी जी गुरुचरित्राची पोथी बापजींना दिली होती ती पोथी प्रत्यक्ष साईनाथांनीच बापजींच्या मामांना दिली होती.याच दरम्यान बापजींचा नावलौकिक सर्व गुजरातभर पसरला त्यांनी गुजरातीत हजारो पदे दत्तप्रभुंवर रचली.अनेक लोक‌ त्यांच्या दर्शनाला आतुर झालेले असत.४ फेब्रुवारी १९३५ ला उत्तर गुजरात कलोल तालुक्यातील सईज या गावातील सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात श्री.कमलाशंकर त्रिपाठी नावाच्या एका भक्ताच्या धर्मपत्नी सौ. धनलक्ष्मीबाईना पिशाचपीडेतून मुक्त करण्याच्या अवधूतजींनी ५२ ओळींची जी स्तुती रचली तीच आपली श्रीदत्तबावनी. खरोखर तर सौ. धनलक्ष्मीबाई निमित्त करून अवधूतजींनी समस्त मानवजातीवर अहुतकी कृपा वर्षाविली आहे आणि आपल्याला हे अमोघ संकटविमोचनस्तोत्र प्राप्त झाले जे आज श्रीरंगपरिवारात आधि-व्याधि-उपाधीच्या निवारणासाठी दत्तबावनी निश्र्चितपणे फलदायी स्तोत्र ठरले आहे.पुढे कालांतराने बापजींच्या मातोश्री या ही नारेश्वरी येऊन राहिल्या.बापजी हे अनन्य मातृभक्त होते.त्यांनी आपल्या मातोश्री साठी नारेश्वरला उत्तम व्यवस्था केली.त्यांचे लहान‌ भाऊ नारायण हे ही नारेश्वरला आले पण लवकरच त्यांचे देहावसान झाले.नारेश्वरी त्यानंतर दत्तकुटीर तयार झाली.लवकरच बरेच आश्रम ,धर्मशाळा बांधल्या गेल्या.महाराजांचे गुजराती शिष्य बापजींना उत्तम राजैश्वर्यात ठेवित पण बापजीं एक लंगोट लावून सदा आत्मचिंतनात निमग्न असतं.त्यांनी कधीही पैशांना ,धनाला स्पर्श केला‌ नाही.पुढे पुढे तर भगवान रामकृष्ण परमहंस प्रमाणे त्यांना धनाला स्पर्श केला की त्रास होत असे.बापजींनी अनेक उत्सव साजरे करण्याची सुरुवात केली.दत्त जयंती, गुरुपौर्णिमा,गुरु प्रतिपदा, गुरुद्वादशी हे उत्सव‌ तर अतिशय धूमधामित साजरा करित असत.अनेक नास्तिक लोकांना आस्तिक केले,कित्येकांना आधी व्याधी तून मुक्त केले,कित्येकाना दु:ख मुक्त केले,हजारो लोकांना सन्मार्गावर लावले.बापजींनी आपल्या उपास्य दैवत भगवान‌श्री दत्तात्रेय प्रभुंवर १९००५ ओव्यांचा अतिशय प्रभावी ग्रंथाची निर्मिती केली व दत्त भक्तांना अमृतच उपलब्ध करुन दिले.या ग्रंथाचे पारायण करुन अनेक भक्तांनी इहपारलौकिक कल्याण साधले आहे व साधत आहेत.बापजींनी गुजराती,मराठी‌ व हिंदी भाषेत विपूल असे साहित्य निर्माण केले.हजारो प्रसादीक दत्त पदांचे वाचन ,गायन आज गुजरात मध्ये घराघरात केले जाते.पुढे जेष्ठ महिन्यात संवत २०२३ रोजी शुद्ध एकादशीस मातोश्री ब्रह्मलीन झाल्या.बापजींनी सर्व विधी यथासांग केला.प्रथम श्राद्धाच्या दिवशी जवळपास २०/२५ हजार लोकांनी प्रसाद घेतला. बापजींनी भक्तांसी अनेक तिर्थयात्रा केल्या.ते भक्तांना घेऊन गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर, पंढरपूर, अक्कलकोट वैगेरे अनेक ठिकाणी जाऊन आले.त्यांनी माणगावी श्री थोरल्या स्वामींच्या जन्मस्थानी अतिशय मोठ्या प्रमाणात दत्त जयंती साजरी केली होती.


असे भक्त उद्धाराचे प्रचंड मोठे कार्य श्रीबापजींनी केले.बापजींनी खर्‍या अर्थाने सर्व गुजरात दत्त भक्तीने आपल्या अवधूती रंगात रंगवून टाकला.

 ‘हम सदा नि:संगी हैं’ म्हणणारे बापजी आता निर्वाणीची भाषा करु लागले. १९६८ मधील ऑक्टोबर महिन्यात त्यांनी नारेश्वर सोडले ते कायमचेच. हरिद्वारला जावयाचे म्हणून बापजी प्रवासास निघाले.


अवधूतआश्रमाचे ट्रस्टी श्री. मोदीकाका, एक महान् भक्त, कार्यरत सेवक यांना काय कल्पना की, महाराजांचा पार्थिव देह येथे नोव्हेंबरमध्ये परत येणार आहे. नारेश्वर सोडताना महाराज म्हणाले, मी नारेश्वरी आलो तेव्हा एक लंगोटी अंगावर होती. आता जातानाही फक्त लंगोटी अंगावर आहे. सर्व वैभव, राजविलासी ऐश्वर्य सोडून ममत्व न ठेवता महाराज निघाले अनंतात विलीन व्हावयाला ! नारेश्वरनंतर अनेक गावी भक्तांना दर्शन देत देत गुरुद्वादशीला ते अरेरा गावी आले. नडियादजवळ हे गाव आहे. नंतर कापडगंज वगैरे गुजरातेतील गावांनंतर जयपूरला आले. एक भक्त म्हणाला, मी हरिद्वारला तुमच्याबरोबर येतो. महाराज म्हणाले, हरीच्या दारी गेलेला परत येत नाही. यावयाचे असेल तर या ! हरिद्वारला फक्त ४-५ भक्त बरोबर होते. सर्व तीर्थे बघितली. सकाळी साधूंना भोजन दिले. १९ नोव्हेबर, मंगळवारी १९६८ ला रात्री ९ वाजता भक्तांना सांगितले, घशात काहीतरी होत आहे. भक्त मंडळींना कल्पना येण्याच्या आधीच श्रीमहाराज श्रीदत्तचरणी विलीन झाले. लाखो भक्तांचा लाडका संत समाधिस्थ झाला. बडोदा, अहमदाबाद, नारेश्वरला ट्रंक लागले. त्याच दिवशी दिल्ली, अहमदाबाद, बडोदा रेडिओने बातमी दिली. अवघा गुजरात ढसढसा रडावयास लागला. रात्रभर भक्तांना चैन पडेना. श्रीमहाराजांचे अंतिम दर्शन कसे व्हावयाचे याची चिंता लागून राहिली. हरिद्वार शेकडो मैल दूर ! ट्रस्टींनी ठरविले की, महाराजांचा पार्थिव देह नारेश्वरी आणावयाचा ! काही मंडळी हरिद्वारला विमानाने गेली. दिल्लीहून अहमदाबादपर्यंत विमानाने आणले व अहमदाबाद ते नारेश्वर शृंगारलेल्या ट्रकवर आणून लाखो भक्तांना दर्शन दिले. अहमदाबाद, बडोदा, सुरत, नडियात, आणंद कडून दिवसभर २५ हजार भक्त आले. रात्री १२ ला नर्मदामाईच्या स्नानानंतर चंदनकाष्ठावर देह ठेवून अग्निसंस्कार केला. कडक थंडी, पण भक्तांचा महापूर लोटला होता. भक्तांना अंतिम दर्शन मिळाले. १२-१३ दिवसांपर्यंत लाखो भक्त नारेश्वरी य़ेऊन श्रद्धांजली वाहून गेले. 


श्रीमहाराजांच्या प्रथम वर्षश्राद्धदिनी भक्तांनी सुंदर मंदिर बांधले आहे. मातृमंदिरासमोरच मातृभक्त पुत्राचे मंदीर ! श्रीमहाराज लौकिक अर्थाने समाधिस्थ झाले. पण भक्तांच्या ह्रदयात ते आहेत.आजही नारेश्वर च्या परमपावन पवित्र तप भूमीवर बापजींच्या तपाची उर्जा भक्तांना जाणवते.आजही अनेक भक्त नारेश्वर ला जाऊन मन:शांतीचा अनुभव घेतात.बापजींच्या अस्तित्वाची जाणिव आजही नारेश्वरी झाल्याशिवाय राहत नाही.अशा या महान दत्तयोगी सद्गुरु श्री रंगावधूत महाराज खर्‍या अर्थाने सर्व दत्त संप्रदायाचे अध्वर्यू आहेत.ही तोडकी मोडकी शब्दसुमनांजली बापजींच्या चरणी अर्पण करतो आणि आम्हा सर्वांना "श्वासे श्वासे दत्तनाम स्मरात्मन्" या त्यांच्या उपदेशाचे मर्म अंतकरणातून अनुभवायला मिळावे असा आशिर्वाद द्यावा,तसेच आचरण आम्हा सर्वांकडून घडावे ही श्रीचरणांशी कोटी कोटी प्रार्थना..

     ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️


श्रीदत्त शरणं मम्🌿🙏🌸🌺

महाराज ज्ञानेश्वर माउली समर्थ 🌿🙏🌸🌺

Monday, December 5, 2022

सगुणभगवद्स्वरूप भाग ५ :- शांतिसागर दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर.🙏🌸🚩🌿


 

सगुणभगवद्स्वरूप भाग ५ :- शांतिसागर दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर.

शान्तिर्मूर्तिमती तपोबलधुरा ,योगाग्निशुध्दाशय: । 
श्रौतस्मार्तसुकर्ममर्मपरमो वेदान्तविद्योदया: ।।
श्रीमद्सद्गुरुवासुदेव करुणागग्ङाम्बुधाराधर: ।
नानाऽऽप्येकरस:सदा विजयते,नाना तराणेकर: ।।

पंचम दत्तावतार भगवान श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचे एकमात्र गृहस्थाश्रमी अधिकारी शिष्यरत्न म्हणजे सद्गुरु श्रीनाना महाराज तराणेकर. प.पू.श्री नानाचा शिष्य परिवार संपूर्ण जगभरात पसरलेला आहे.मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात दत्त संप्रदायाला पोचवण्याचे प्रचंड मोठे कार्य श्रीनाना माउलींनी केले.थोरल्या स्वामी महाराजांची अतिशय प्रसादीक रचना "करुणा त्रिपदी" आज संपूर्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि जगभरातील दत्त भक्तापर्यंत पोचविण्याचे मोठे श्रेय सद्गुरु श्री नाना महाराजांकडे जाते.आजही "त्रिपदी परिवार" या संघटनेच्या रुपात नानांनी सुरु केलेले हे दत्त संप्रदायाचे भव्य कार्य जोमाने कार्यरत आहे.हे वर्ष सद्गुरु श्री नाना माउलींचे १२५ वे सुवर्ण जन्म वर्ष आहे.त्यानिमीत्त ही शब्दसुमनांजली नानांच्या चरणी अर्पण करुन नानांच्या दिव्य व अलौकिक चरित्राचे आपण चिंतन करुयात.

नाना महाराजांचे मुळ गाव खानदेशातील घाटनांद्रे हे होते.नानांच्या सात पिढ्या आधीचे मोरभट हे त्यानंतर मध्यप्रदेशातील तराणा या गावी आले व तेथेच स्थायिक झाले‌.हेच तराणा येथील जोशी ही होते.ते अतिशय वेदशास्त्रसंपन्न व आचारसंपन्न असे घराणे होते.पू.नानांचे आजोबा आत्माराम शास्त्री हे अतिशय सदाचारी गृहस्थ व आचारसंपन्न गृहस्थ होते.यांना एकून सहा अपत्ये होती त्यातील तिसर्‍या क्रमांकाचे पुत्र म्हणजे शंकर शास्त्री हे नानांचे पिताश्री.हे श्रेष्ठ दर्जाचे उपासक होते.ते उत्तम वैदिक,कर्मकांडावर जास्त भर, याज्ञिक व पुराण सहा शास्रांचे अध्ययन झालेले ब्राह्मण होते.वे.शा.संपन्न शंकरशास्त्री तराणा येथे स्वतः ची वेदपाठ शाळा ही चालवत असत.तराणा येथील एक विठ्ठल मंदिर शंकर शास्त्री यांना दानामध्ये लाभले होते.येथील पंढरीनाथांची मनोभावे ते सेवा करित असत.श्री नानांचे वडिल शंकर शास्त्रींना सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचा अनुग्रह होता. तराणा येथे शंकर शास्त्रींनी इ.स १८८२ मध्ये श्री स्वामी महाराजांच्या हस्ते दत्तमूर्तीची स्थापना केली होती.श्री स्वामी महाराज स्वतः येऊन त्यासाठी तराणा येथे राहिले होते.अशा परमपावन कुळात ज्यावर आधीच श्री थोरल्या स्वामी महाराजांची कृपा होती तेथे शके १८१८ इ.स १३ /८/ १८९६ श्रावण शुद्ध पंचमी,गुरुवार या दिवशी नानांचा जन्म झाला.यथाकाळी या दिव्य बाळाचे बारसे झाले व बाळाचे नाव "मार्तंड" असे ठेवण्यात आले.पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे बाळ मार्तंड वाढू लागला.लहापणी बाळ मार्तंडाचे भजनात तल्लिन होऊन देहभान हरपत असे.वयाच्या आठव्या वर्षी नानांचे मौंजीबंधन झाले.श्रीशंकर शास्त्री नियमांच्या बाबतीत अतिशय कठोर होते.ते नानांकडून त्रिकाल गायत्री जप करुन घेत असत.नानांचे वेदाध्ययन आपल्या पिताश्रींकडेच सुरु झाले.नाना चौथी पर्यंत शाळेतील शिक्षण ही शिकले पण एक प्रसंग घडला व ते परत शाळेत गेले नाही.सन १९०४ साली श्री थोरले स्वामी महाराज हे पुन्हा एकदा तराणा येथे मुक्कामी आले.त्यावेळी ते बाळ मार्तंडाला आपल्या जवळ बसवून घेत,त्याला आपल्या बरोबर नदीवर स्नानासाठी घेऊन जात ,तसेच त्याला आपल्या हाताने प्रसाद देत.जणू यातूनच ते आपल्या या शिष्यावर कृपा अनुग्रह करत होते.पुढे नाना वेदांच्या पुढील अध्ययनासाठी इंदूर च्या नरहर शास्त्रींच्या वेदपाठशाळेत गेले.श्री टेंब्ये स्वामी महाराजांचे शिष्य इंदूर चे तांबे स्वामी हे नानांचे सहाध्यायी होते. वयाच्या अकराव्या वर्षी नानांना सद्गुरु प्राप्तीची विलक्षण ओढ लागली.त्यांनी आपल्या वडिलांना आपल्याला अनुग्रह देण्याची विनंती केली पण शंकर शास्त्रींनी "मी तुझा गुरु नाही,मी इतरांना अनुग्रह देऊ शकतो पण दत्तप्रभु़ची तुला अनुग्रह देण्याची मला आज्ञा नाही." त्यांनी नानांना गुरु प्राप्ती साठी गुरुचरित्राचे सप्ताह करण्याची आज्ञा केली.अकरा वर्षाच्या नानांनी लागोपाठ सहा सप्ताह पूर्ण केले व सातव्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज हे वायुमार्गाने नानांपुढे प्रगट झाले व‌ त्यांनी नानांना अनुग्रह दिला.अनुग्रह देताक्षणीच नाना गाढ समाधीत गेले.श्री थोरल्या महाराजांनी बाळ नानांचे या समाधी तून उत्थान केले व आपल्याला आता मोठे दत्त कार्य करायचे आहे असा उपदेश केला.तेवढ्यात नानांचे वडिल ही तिथे आले.प्रत्यक्ष श्री स्वामी महाराज तिथे आलेले बघितल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला व आपल्या बाळावर झालेली स्वामी कृपा बघून त्यांचे जिवन धन्य झाले. 
(श्री नाना माउलींच्या चरित्रातील हा अतिशय अलौकिक आणि दिव्य प्रसंग आहे.नानांच्या चरित्रातील हा मेरुमणी आहे.प्रसंग अतिशय सुंदर, अलौकिक, चिंतनीय आहे.पण शब्द मर्यादेमुळे तो इथे देणे शक्य नाही.तरी ११ वर्षांच्या नानांना गुरु प्राप्ती साठी  लागलेली तळमळ, बाळ नाना ४९ दिवस सलग गुरुचरित्र पारायण काय करतात आणि स्वामी महाराज प्रगट होऊन त्यांना अनुग्रह काय देतात सर्व काही शब्दातीत आणि अलौकिक आहे.याचा आनंद स्वतः चरित्र वाचल्यावरच येईल.आपण जरुर हा प्रसंग पुढे सविस्तर बघू.)

सद्गुरु अनुग्रहानंतर नानांच्या कठोर तपाला जणू सुरुवात झाली.नाना रोज गुरुमंत्राचा जप ,नित्य कर्म,गुरुचरित्र,शिवलिलामृताचे वाचन करत असत.यात किंचीत ही तडजोड ते करत नसत.तसेच वडिलांकडून नानांचे वेदाध्ययन,याज्ञिकीचे दीक्षा ग्रहण करणे ही सुरु होते.याचदरम्यान‌ नानांचे गायत्री ची अनुष्ठान ही सुरु होते व श्री स्वामी महाराजांचे नानांना स्वप्नात अखंड मार्गदर्शन ही सुरु होते.काही दिवसांनी नानांच्या वडिलांनी नानांकडून सलग तिनं वर्षे शास्त्रशुद्ध,मम नियम पूर्वक श्री गणेशाची ,रामाची ,कृष्णाची जप अनुष्ठाने करुन‌ घेतली.श्री शंकर शास्त्रींना नियमात व अनुष्ठानात जराही सैलपना चालत नसे.म्हणून की काय नानांच्या जिवन उपासनेने उजळून निघाले.नानांच्या वयाची अठरा वर्षं पूर्ण होताच शंकर शास्त्रींनी इंदूर येथील शंकरराव डाकवाले यांची कन्या भिमाबाई यांच्याशी नानांचा विवाह लावून दिला.भिमाबाईंचे सासरी म्हाळसा हे नाव ठेवण्यात आले.पुढे लवकरच शंकरशास्त्रींनी आपली इहलोकीची यात्रा संपवली व ते दत्त चरणी लीन झाले.हा आघात अचानकच नानांवर झाला.पण पुढे तिनं महिन्यात नानांच्या मातोश्री थोर पतिव्रता श्री लक्ष्मी बाई यांनी ही आपला देह ठेवला.हा जणू वज्राघातच नानांवर झाला.पण सद्गुरुंची इच्छा म्हणून नाना निश्चल व शांत होते.आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यास नाना सज्ज झाले.ऐन तारुण्यात नानांवर वेदपाठशाळा व गावातील जोशीपण सांभाळण्याची जबाबदारी आली.त्यावेळी अनेक प्रयोग नानांना माहिती नव्हते तेव्हा भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु श्री स्वामी महाराजांनी नानांना स्वप्नात येऊन सर्व प्रयोग यथासांग शिकवले होते.
पुढे नानांना एक मुलगा झाला त्याचे नाव शंकर असे ठेवण्यात आले.लवकरच नानांच्या पत्नी म्हाळसा बाई यांचे निधन झाले . या अवघड परिस्थितीत नाना आपल्या धाकट्या भावंडांचे शिक्षण करत होते,मुलाला सांभाळत होते,मंदिरातील पूजा ,घरातील व्यवस्था ,यजमानांच्या पूजा अशा चौफेर जबाबदारी पार पाडत होते.यात नानांना अतिशय कष्ट पडत असत पण त्यांची मन:शांती तुसभरही ढळली नाही.नातेवाईक व आप्तांनी लहान मुलाकरीता तरी लग्न कर असा नानांना आग्रह केला व लहान‌ शंकरासाठी नानांनी १९२४ ला दुसरे लग्न केले.या दुसर्‍या पत्नीचे नाव ही म्हाळसा असेच ठेवण्यात आले.यांना पुढे एक मुलगी झाली व नानांचा संसार पुन्हा आनंदात सुरु झाला.तराण्यातील दत्त मंदिरातील सर्व पूजा व सेवेचे नियम हे गाणगापूर येथील मंदिरानुसार नाना करित असत.पुढे नानांच्या दुसर्‍या पत्नीचे ही अचानक निधन झाले व नानांचा संसार संपुष्टात आला.सद्गुरु माउलींची इच्छा असे समजून नाना शांत होते.त्यांच्या अंतरंगातील शांती अढळ होती.गुरु चरणांवर अढळ श्रद्धेमुळे नाना शांतचित्त होते. काही दिवसांनी नानांच्या दत्त मंदिरात एक महायोगी आले.त्या योग्यांनी नानांना अष्टांग योग शिकवीला.नाना काही दिवसांतच योगांगात निष्णात झाले.पुढे एकदा नर्मदा किनारी त्या योगी साधू ने सांगितलेल्या पत्यावर नाना गेलं तेव्हा माहिती झालं की असा कुणीही योगी या ठिकाणि राहत नाही.नानांच्या लक्षात आले की थोरले स्वामी महाराजांनीच आपल्याला योग शिकविण्यासाठी ही लिला केली होती.हळू हळू काळ पुढे सरकु लागला.नाना आपल्या नित्य अनुष्ठान ,साधनेत निमग्न होते.अचानक एके दिवशी दत्तप्रभुंनी नानांना तिर्थयात्रा करण्याची आज्ञा केली आणि मग नाना माउलींच्या जिवन चरित्रातील एक सुवर्ण यात्रा भाग सुरु झाला.नानांनी आपले दोन्ही लेकरं आपली चुलत बहिण कोंडुताईंच्या हवाली केली व नानांनी तीर्थयात्रेस निघाले.या काळी नानांचा आचारधर्म अतिशय कडक असे.ते कडक सोवळे पाळत असत तसेच साधना,उपासना व नित्यकर्मात कसलीही तडजोड करित नसतं.नानांनी आपला हा नियम तिर्थयात्रेतही मोडला नाही हे विशेष.
{ प.पू.नाना माउलींनी केलेली तिर्थयात्रा हा वेगळा लेखमालेचा विषय आहे.नानांच्या सर्व तिर्थयात्रा या अतिशय विलक्षण आहे.प्रत्येक प्रसंग दिव्यत्वाने आणि दैवी‌शक्ती च्या अलौकित्वाचे प्रगटीकरण आहे.या एका लेखात तरी त्या सर्व तिर्थयात्रांची हकिकत बघणे शक्य नाही तरी थोडक्यात त्यांच्या बद्दल माहिती देतोच.भविष्यात नानांच्या कृपेने त्या वर ही वेगळी लेख माला जर लिहीता आली तर आपल्याला त्याचा ही आनंद घेता येईलच.} 
                      
नानांची पहिल तिर्थयात्रा होती ती म्हणजे काशी ची.गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे नानांनी संपूर्ण काशी‌ यात्रा शास्त्रशुद्ध पद्धतीने केली.त्यावेळी नानांना शिवदर्शनाची विलक्षण ओढ लागली.तेव्हा एका निर्जन स्थळी नाना मंत्र जप करत निर्वाण मांडून बसले.तेव्हा भगवान आशुतोष महादेवांनी नानांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन कृतार्थ केले होते. असेच नाना पुढे नाना मथुरेच्या , वृंदावनाच्या यात्रेला गेले असता कृष्ण स्मरणाने व्याकुळ झाले.नाना भगवंतांच्या विरहात बेभान झाले व देवांच्या दर्शनास आतुर झाले.नानांनी देव दर्शन देत नाही मग जगून काय फायदा म्हणून यमुनेत प्राण त्याग करण्याचा विचार केला.नानांची निष्ठा आणि अनन्य भाव बघून भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभु आपल्या दिव्य सुकुमार बाल गोपाल रुपात प्रगट झाले.नानांशी थोडे बोलून देवांनी नानांच्या हातावर आपल्या झारीतील तिर्थ घातले व नानांना प्रगाढ समाधी लागली.असे सुंदर गोपाल कृष्णाचे ही दर्शन नानांना झाले होते. श्री थोरल्या स्वामी महाराजांनी नानांना नर्मदा परिक्रमा यम नियमांसह करण्याची आज्ञा केली.नानांनी अतिशय दुर्गम अशी जलेरी नर्मदा परिक्रमा आचरली.यावेळी नानांनी अतिशय कडक असे शास्त्र नियम पाळले.याच दरम्यान एकदा नानांना भोवळ आली व ते एका झाडाखाली बसले तेव्हा प्रत्यक्ष भगवती नर्मदा माईंनी बाल रुपात येऊन नानांना‌ सोन्याच्या लोट्यात दूध पाजले होते.याच परिक्रमेत नानांनी एका निर्मनुष्य मंदिरात राहणार्‍या ब्रह्म पिशाच्च्याला मुक्ती दिली होती. एका यात्रेत नाना हिमालय,केदारनाथ ,बद्रिनाथांच्या दर्शनास गेले होते.पर्वतातून फिरत असता नाना गुरुकृपेने रस्ता इ
चुकले‌ व एका भव्य गुंफेपुढे येऊन पोचले.त्या गुफेत आत गेले असता त्यांना महाभारत काळातील एका योग्याचे दर्शन ,भेट व मार्गदर्शन लाभले होते.हा योगी महाभारतातील एक सैनिक होता व भगवान श्रीकृष्णांनी त्याला हिमालयात योग साधना करण्याची आज्ञा केली होती त्यामुळे तो तिथे वास्तव्यास होता.नानांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली हा संवाद जवळपास तीन दिवस अखंड सुरु होता.हा प्रसंग अतिशय दिव्य आणि अलौकिक आहे.एकदा गिरणारी दत्त दर्शनाला गेले असता ,नानांना दत्त शिखराच्या ही वरती गुप्त स्थानी असलेल्या नवनाथांच्या साधनेची जागा बघायची होती.तेव्हा प्रत्यक्ष दत्त प्रभुंनी गुराख्याचे रुप घेऊन नानांना त्या स्थानापर्यंत नेले होते. तसेच नाना जवळपास सन १९६१ पर्यंत आपल्या सद्गुरु माउली श्री टेंब्ये स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला दर वर्षी न चुकता जात असत.तसेच उत्तर आयुष्यात नाना आपल्या भक्तांसह एकदा अनसुयामातेच्या  क्षेत्राची यात्रा करण्यास गेले होते तेव्हा प्रत्यक्ष भगवती अनसुया मातोश्रींनी नानांना दर्शन दिले होते.अशा अनेक विलक्षण यात्रा केल्या नंतर नानांना दत्त क्षेत्राला जाऊन काहितरी अनुष्ठान करावे असे सतत वाटत असे.नानांनी गाणगापूर येथे ५१ गुरुचरित्राचे पारायण करण्याचा संकल्प केला व ते गाणगापूर येथे गेले.यथावकाश गाणगापूर ला राहून नानांनी ५१ पारायण पूर्ण केले.नानांचा मुक्काम गाणगापूरी होता व गुरुप्रतिपदेचा उत्सव जवळ‌ आला.या उत्सवात गाणगापूर ला यति पूजनाचा सोहळा पार पडला जातो.त्यावेळी संन्यासी जनांचे पाद्य पूजन करतात.भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पुजार्‍याला दृष्टांत दिला आणि सांगितले की या या ठिकाणी मार्तंड तराणेकर नामक व्यक्ती मुक्काम करुन आहेत,त्यांना मठात बोलावून त्यांची पाद्यपूजा यति पूजन करावे.त्या वर्षी गृहस्थाश्रमी नानांचे गाणगापूर येथे यति पूजन झाले होते.तसेच ग्वाल्हेर कडे अवधूत वृत्तीत फिरत असता नानांना एका राम मंदिरात प्रत्यक्ष भगवान रामरायांचे व लक्ष्मणजींचे दर्शन झाले होते.

पूर्वायुष्यात नानांनी अनेक मोठं मोठे यज्ञ संपन्न केले होते.नानांनी जवळपास बत्तीस यज्ञ केले होते.एका विष्णू याग यज्ञ प्रसंगी नाना एका खेड्यात गेले होते.तेथे विस्तव मिळाला नाही व यज्ञाचा मुहूर्त ही टळून चालला होता तेव्हा सर्व लोकांपुढे नानांनी समीधेवर फक्त आपली दृष्टी टाकली आणि यज्ञ प्रज्वलित केला होता.हा प्रसंग अनेक लोकांनी बघितला होता.तसेच नानांना अनेक संतांचा सहवास लाभला होता.धार मध्यप्रदेश येथील नित्यानंद महाराज हे नानांना भेटायला‌ येऊन गेले होते.तसेच बडे दादाजी धुनीवाले यांचा तर नानांवर विशेष स्नेह होता.पुण्याचे सद्गुरु श्री गुळवणी महाराज व नानांचा हृद्य संबंध होता.वज्रेश्वरीचे नित्यानंद महाराज,नाशिकचे गणेशबाबा,नारेश्वरचे रंगावधूत महाराज,नागपूरचे बापुमहाराज खातखेडकर,देवासचे शीलनाथ,इंदूर चे माधवनाथ,मामा साहेब दांडेकर,धुंडा महाराज देगलूरकर या सर्वांचे नानांशी अतिशय प्रेमाचे नाते होते.या सर्व संत मंडळी व नाना अनेकदा भेटले होते.एकदा त्यांचा येथील दत्त जन्माच्या उत्सवात तूप कमी पडले.सर्वत्र पाने मांडली गेली ,लोक जेवायला बसले.सर्वजन गोंधळात सापडले.तेव्हा नानांनी नदीतील पाणी घागरीत भरुन आणण्यास सांगितले.तसे केल्या क्षणी ते पाणी तुपात रुपांतरीत झाले होते.उत्सव झाल्यावर नानांनी तेवढ्याच घागरी तूप नदीत सोडण्याची आज्ञा भक्तांना केली होती. पुढे नाना तराणा सोडून इंदूर येथे राहण्यास गेले.सुरवातीच्या काळात ते भाड्याच्या घरात राहत असत.नंतर त्यांनी‌ आपल्या नुतन वास्तुत प्रवेश केला.इंदूर येथे नानांनी अनेक लिला चमत्कार केले,अनेक भक्तांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले.नानांचा अनेक ठिकाणि मुक्काम व दौरा होत असे.मुंबई, पुणे ,नाशिक अशा विविध ठिकाणी नानां भक्तांसाठी जात असत.नानांचा नावलौकिक व प्रभाव इतका प्रचंड होता की नाना जिथे ही जात तिथे त्यांच्या दर्शनाला हजारो भक्तांची रांग लागत असे.नानांच्या कृपा करुणेच्या हकीकती आजही अनेक ग्रंथांतून शब्द बद्ध केल्या आहेत.त्यांचा उल्लेख जरी केला तरी अनेक लेख लिहावे लागतील.पू.नानांनी घराघरात त्रिपदी व दत्त उपासना पोचवली.अनेकांना सन्मार्गाला लावले ,अनेकांचे दु:ख दूर केले.नानांनी हेच तेज आपल्या शिष्यात ही समाविष्ट केले.खामगावचे आगाशे काका, वाशिम चे पंडित काका धनागरे ,भुसावळचे पेटकर काका हे नानांचे मुख्य शिष्य.या शिष्यांनी ही नानांच्या नावाची पताका व दत्त भक्ती चे‌,दत्त संप्रदायाचे भक्त कार्य भविष्यात केले.अशा या दत्त संप्रदायातील थोर विभूतींनी शुक्रवार दिनांक १६/४/१९९३ चैत्र वद्य दशमी या दिवशी आपला देह दत्त चरणी लिन केला. नानांनी नागपूर येथे ज्या ठिकाणी देह ठेवला त्या ठिकाणी आज नानांचे भव्य पादुका मंदिर व स्मारक उभे राहिले आहे. खरंतर नानांच्या चरित्रावर लिहीण्यासाठी एक लेख अपुराच आहे.ही शब्दसेवा नाना माउलींच्या चरणी अर्पण करतो व नानांनी आम्हा सर्वांना दत्तचरणाची अखंड सेवा करण्याची बुद्धी‌ द्यावी ही श्रीचरणांशी कोटी कोटी प्रार्थना...
     ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

श्रीदत्त शरणं मम 🙏🌸🌿
महाराज ज्ञानेश्वर माउली समर्थ 🙏🌸🌿

Sunday, December 4, 2022

सगुणभगवद्स्वरूप भाग ४:-योगीराज समर्थ सद्गुरु श्री गुळवणी महाराज.🌸🌿🙏🚩

 


सगुणभगवद्स्वरूप भाग ४:-योगीराज समर्थ सद्गुरु श्री गुळवणी महाराज.


शक्तिपाताचा महामेरु | बहुत जनांसी आधारु | 

ब्रम्हस्थितीचा निर्धारु | शांभव योगी ||


पंचम दत्तावतार भगवान श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचे परमशिष्य योगीराज श्री वामनरावजी गुळवणी महाराज हे श्री स्वामी महाराजांच्या शिष्य प्रभावळीतील एक अलौकिक संत रत्न आहेत.श्रीगुळवणी महाराज हे अखंड ब्रह्मचारी व महायोगी होते. श्री महाराजांचे संपूर्ण कुळच हे परमदत्त भक्त व सर्व घरावर नृसिंहवाडीच्या देवांची परमकृपा होती.सद्गुरु योगीराज गुळवणी महाराजांचे जिवन चरित्र इतकं विलक्षण आहे की कुणालाही ते अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही.श्री महाराज समाजात अगदी सामान्य शिक्षक म्हणून वावरले ,इतकेच काय तर सोबतच्या लोकांनाही कळतं नसे की ते महायोगी व हजारो शिष्यांचे गुरुस्थान आहेत.पुण्यातील गोवईकर चाळीतील दहा बाय दहाच्या घरात राहणारे महाराज वाचले की आश्चर्याने सुन्न व्हायला होतं.महाराजांचे चरित्र जिवनाला दिशा देण्याचे रसायन आहे.एका लेखात ते मांडता येणारच नाही. तरी संकल्पानुसार त्यांच्याच कृपेने संक्षिप्त चरित्राचे स्मरण करण्याचा प्रयत्न करित आहे.महाराजांची निस्पृह वृत्ती , दत्तभक्ती,गुरु चरणी अनन्य निष्ठा , साधना व नित्य कर्मावरील श्रद्धा असे अनेक गुण आपल्याला चरित्रात बघायला मिळतात.त्यातील काही भागाचे आज आपण संक्षिप्त रुपात चिंतन करणार आहोत.


दक्षिण महाराष्ट्र व कोंकण यांच्या सिमेवर , कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भोगावती नदीच्या खोर्‍यात वसलेले कौलव या गावी दोनशे वर्षांपूर्वी गुळवणी हे कुटुंब वसत असे.हे वासिष्ठ गोत्रीय ,वैदिक आचारसंपन्न ब्राह्मण कुटुंब होते.या गावात श्रीगुरु महाराज म्हणजे गुळवणी महाराजांचे पणजोबा वेदमूर्ती नागेश भटजी राहत असत.संपूर्ण कौलव गावात हे एकमात्र ब्राह्मण कुटुंब होते.श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला ज्यांची पूजा देवांच्या ही आधी होते ते सद्गुरु श्री नारायण स्वामी महाराज हे नागेश भटजींचे सद्गुरु.

(श्रीनारायण स्वामींच्या चरित्रात नागेश भटजींच्या सह झालेले स्वामींचे लिला प्रसंग विस्तृत रुपात आले आहेत.शब्दविस्तारास्तव येथे ते देत नाही .त्यासाठी आपण कृपया श्री स्वामी महाराजांचे चरित्र जरुर वाचा.)

श्री सद्गुरु नारायण स्वामी महाराजांची या संपूर्ण घरावर पूर्ण कृपा होती.यांच्याच कृपेने नागेशभट्टांना पुत्र प्राप्ती झाली होते आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलाचे नाव "नारायण" असे ठेवले होते.हे श्री गुळवणी महाराजांचे आजोबा.पुढे यांचा वंशविस्तार झाला व त्यांना चार पुत्र व तीन कन्या झाल्या.जेष्ट अपत्य होते वेदमूर्ती दत्तंभट.हेच योगीराज श्री गुळवणी महाराजांचे पिताश्री.पुढे दत्तंभट हे कौलव‌ गाव सोडून कुडुत्री या गावी आले.दत्तंभट हे पौरोहित्य करणारे दत्तभक्त व परम सात्विक असे ब्राह्मण होते.यथावकाश कुडुत्री येथील उमाबाईंशी‌ त्यांचा विवाह झाला.या श्री गुळवणी महाराजांच्या मातोश्री.हे सत्शिल दत्तभक्त दाम्पत्य सदैव दत्तभक्तीत तल्लीन असत.दर पौर्णिमेला श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे जाण्याचा या दोघांचा ही नियम होता.उमा माता गरोदर होत्या व त्यामुळे त्यांना नृसिंहवाडी येथे देवांच्या दर्शनाला जाणे शक्य नव्हते.त्यामुळे देवांचा पादुका प्रसाद मिळावा म्हणून त्यांनी प्रायोपवेशन सुरु केले आणि आश्चर्य असे की त्यांच्या निष्ठेला प्रसन्न होऊन भक्तवत्सल भक्ताभिमानी कृपासिंधु भगवान श्री नृसिंह सरस्वती दत्त प्रभुंनी त्यांना स्वतः येऊन प्रसाद‌ पादुका दिल्या होत्या.( आजही त्या पादुका पुण्यातील वासुदेव निवासात स्थानापन्न आहेत.) अशा या थोर दत्त भक्तांच्या पोटी मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी शके १८०८ , २३ डिसेंबर १८८६ रोजी गुरुवारी रात्री दत्तसंप्रदायातील या महान विभूतीचा जन्म झाला.या बाळाचे नाव वामन असे ठेवण्यात आले.कुडुत्रीच्या घरातच महाराजांचे बालपण अगदी आनंदात व भक्ती पूर्ण वातावरणात व्यतीत झाले. याचदरम्यान उमा मातोश्रींना कर्करोग झाला.त्यानंतर मातोश्रींनी नृसिंहवाडी येथे जाऊन देवांच्या सेवेत काळ घालवण्याचा निश्चय केला.महाराजांचे मोठे भाऊ शंकर शास्त्री यांनीही मातोश्रींसह वाडीला जाऊन दत्तसेवा करण्याचे ठरविले.पुढे काही दिवसांनी प्रत्यक्ष भगवान दत्तप्रभुंनी संन्यासी रुपात येऊन मातोश्रींच्या हातावर तिर्थ दिले व ते प्राशन करता क्षणी मातोश्रींची पोटातील गाठ फुटली व तो रोग नाहिसा झाला.( हा प्रसंग अतिशय अलौकिक व दिव्य आहे.मी अगदी थोडक्यात दिला पण आपण विस्तृत रुपात जरुर वाचाचं.) या प्रसंगा नंतर काही काळाने महाराजांची सन १८९४ ला मुंज झाली व त्यांचे धार्मिक शिक्षण घरीच सुरु झाले.वैदिक सुक्त, नित्यकर्म बाल वामन शिकला व त्याचबरोबर तारळे या गावे शालेय शिक्षण ही सुरु झाले.या शाळेत श्रीमहाराज इयत्ता चौथी पर्यंत शिकले व पुढील शिक्षण घेण्यासाठी ते कोल्हापूर येथे राजाराम शाळेत गेले.या शाळेत त्यांचे नववी पर्यंत शिक्षण झाले.महाराजांना चित्रकलेत उपजतच गती होती.त्यांनी दोन चित्र कलेच्या परिक्षा ही दिल्या व पहिल्या दोन श्रेणीत ते उत्तीर्ण ही झाले.तृतीय श्रेणीच्या परिक्षेसाठी त्यांनी मुंबई च्या जे.जे.आर्ट स्कुल मध्ये प्रवेश मिळवला.


याच दरम्यान थोरले स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज हे संन्यास घेतल्यानंतर दुसर्‍यांदा नृसिंहवाडी येथे आले होते.महाराजांचे मोठे भाऊ शंकर शास्त्री‌ यांनी वामनांना महाराजांची आज्ञा घेऊन वाडीला बोलवून‌ घेतले.हीच या दिव्य गुरु - शिष्याची प्रथम भेट. यानंतर इ.स १९०९ च्या सुमारास श्रीमहाराजांच्या वडिलांचे निधन झाले.वडिलांचे क्रियाकर्म आटोपून काही काळ गेला तोच श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज हे विदर्भातील पवनी या क्षेत्री चातुर्मासासाठी मुक्कामी आहेत असे शंकरशास्त्रींना कळले.ते लगेच पवनीला गेले.श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेने त्यांनी श्री वामनरावजी गुळवणी महाराज,मातोश्री व त्यांच्या लहान भगीनी गोदूताई यांना पवनीला बोलावून घेतले.चातुर्मास्य समाप्तीच्या आदल्या दिवशी अनंत चतुर्दशीला या तिघांनाही श्री थोरल्या स्वामी महाराजांनी मंत्र दिक्षा देऊन कृतार्थ केले. पुढे श्री गुळवणी महाराज गाणगापूर येथे सात गुरुचरित्र सप्ताह करण्यासाठी जातात ,सहा सप्ताह पूर्ण झाल्यावर एक रमल‌ ज्योतिष तेथे आला त्याला महाराजांनी , "मला पुन्हा सद्गुरुंची भेट केव्हा होईल?" हा प्रश्न विचारला त्याने उत्तर दिले , "झाले तर सहा महिन्यांत होईल नाहीतर कधिच नाही." हे ऐकून त्यांना धक्का बसला.सातवा सप्ताह एका दिवसात पूर्ण करुन महाराज ऐकीव माहितीच्या आधारे दक्षिणेकडे पैदल निघाले.जवळपास सातशे कि.मी पैदल प्रवास व सातशे कि.मी वाहनात असा प्रवास करत महाराज हावनूर ला श्री थोरल्या स्वामी महाराजांकडे पोचले.( हा गुरु भेटीचा प्रवास मला महाराजांच्या चरित्रातील मेरुमणी वाटतो.पूर्ण विस्तृत प्रसंग वाचल्यावर आपल्याला महाराजांच्या ठाई असलेली विलक्षण गुरुभक्ती दिसुन येईल.असद्भुत असा हा प्रसंग आहे.) पुढे हावनूर ला महाराजांना श्री थोरल्या स्वामी महाराजांचा जवळपास पंधरा दिवस एकांतात सहवास लाभला.यात त्यांनी श्री स्वामी महाराजांची अनन्य सेवा केली.याच वेळी श्री स्वामी महाराजांनी गुळवणी महाराजांना आपल्या हृदयात दत्तप्रभुंचे दर्शन घडविले होते.त्यावंतर पुन्हा श्री गुळवणी महाराजांना श्रीथोरल्या स्वामी महाराजांचा ओंढ्या नागनाथ येथे सहवास लाभला.पुढे श्री स्वामी महाराजांनी त्यांना दत्त माला मंत्राचे अनुष्ठान करण्यास सांगितले.श्री गुळवणी महाराजांनी श्रीक्षेत्र औदुंबर येथे हे अनुष्ठान ४० दिवसात पूर्ण करुन एक पुरश्चरण पूर्ण केले. सन १९१३ च्या वैशाखात श्री गुळवणी महाराज श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे येऊन सद्गुरु चरणी सेवारत झाले.या वेळी श्री महाराजांनी थोरल्या स्वामी महाराजांची अपार सेवा केली.ही सेवा इतकी विलक्षण होती की आपल्या सर्वांसाठी तो एक आदर्श आहे.( शब्दमर्यादेस्तव तो संक्षिप्त रुपात मांडला आहे.)

पुढे महाराज घरी परतले व लवकरच सन १९१४ साली आषाढ शुद्ध १ रोजी थोरले स्वामी महाराज समाधिस्थ झाले. 

        

यानंतर ३-४ वर्ष महाराज कोल्हापूर येथे होते.तेथे त्यांनी छायाचित्रांचा व्यवसाय केला,त्यातून पैसा व नावलौकिक ही मिळाला.छत्रपती शाहू महाराज यांचाही आश्रय लाभला. सन १९१७ साली श्री महाराजांना बार्शीच्या शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी लागली.त्यावेळी ते वैद्यमास्तरांकडे राहत होते.ते पंढरीचे वारकरी होते.यामुळे श्रीमहाराजांचा पू.श्रीदासगणू महाराज,पू.सोनुमामा दांडेकर, पू.केशवराव देशमुख महाराज,गुरुदेव‌ रानडे हे सत्पुरुषांचा सहवास लाभला.या शाळेत महाराजांनी १० वर्ष काम केले.याच दरम्यान महाराजांचा योगाभ्यास अखंड चालूच होता.पुढे कुंडलीनी जागृती व त्यातील अभ्यास जाणून घेण्यासाठी त्यांनी आपले जेष्ठ गुरुबंधू सिप्रिचे पू.गोविंदमहाराज पंडित यांना पत्र लिहीले.गोविंद महाराजांनी त्यांना पुढील अभ्यास शिकविण्यास होकार दिला.त्यासाठी सन १९२२ च्या गणेशचतुर्थीला महाराज होशंगाबाद येथे येऊन पोचले.ह्यास काळात होशंगाबाद येथे प.पू. स्वामी चिन्मयानंद सरस्वती हे तरुण बंगाली संन्यासी मंगळवार घाटावर उतरले होते. हेच महाराजांचे शक्तिपाताचे दिक्षा गुरु सद्गुरु प.प.श्री लोकनाथ तिर्थ महाराज.( यांच्या संक्षिप्त चरित्राचा लेख आपण जरुर‌ ब्लॉगला वाचा.) यांच्याशी श्री गुळवणी महाराजांचा परिचय झाला.पुढे कालांतराने ते महाराजांच्या घरी मुक्कामी राहण्यास आले.(प्रसंग व होशंगाबादची हकिकत बरीच मोठी आहे त्यामुळे ती गाळतो आहे.)पुढे लवकरच श्री चिन्मयानंद सरस्वती स्वामी महाराजांनी श्री वामनरावजी गुळवणी महाराजांना शक्तीपाद वेध दिक्षा देऊन कृतार्थ केले.हा चरित्र भाग म्हणजे महाराजांच्या अवताराचे पुढील उत्तर आयुष्यातील दिव्य कार्याचे दर्शन आहे.यात प.पू. चिन्मयानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या या शक्तीपात रुपी गंगेचा प्रवाह महाराजांनी आपल्या डोक्यावर धारण केला व त्या गंगोदकाची धारा दक्षिणेकडे प्रवाहित केले.या शक्तीपात साधनाचा अनुग्रह शेकडो लोकांना देऊन महाराजांनी त्यांना कृतार्थ केले.इ.स १९२४ ला स्वामी चिन्मयानंद सरस्वतींनी गुळवणी महाराजांना दीक्षा गुरुत्व प्रदान केले व संप्रदायाचे कार्य शक्ती कृपेने वर्धिष्णू करण्याची आज्ञा केली.१९२४ साली चिन्मयानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या आज्ञेने महाराजांनी सौ.गोपीकाबाई या एका सुवासिनीला पहिली दिक्षा दिली. महाराजांना नूतन महाविद्यालय पुणे या शाळेत चित्रकला शिक्षकाची नोकरी लागली.पुढे १९२५ नंतर महाराज लवकरच पुण्यात राहण्यास आले.

पुण्यात महाराज नारायण पेठेत असलेल्या गोवईकर चाळीत स्थिरावले.ही पुण्यातील एक सर्वसामान्य चाळ होती.पण महाराजांच्या वास्तव्याने या जागेचे ही भाग्य उजळले.दहा बाय दहाच्या दोन खोल्या म्हणजे महाराजांचा आश्रमच झाला.या दोन खोल्यांत अनेक संत महापुरुष येऊन गेले होते.येथेच सद्गुरुंच्या अनेक जयंती व पुण्यतिथी चे उत्सव साजरे झाले.येथूनच भारतातील लाखो लोकांना दिक्षा प्राप्त झाली होती. पुढे १९६४ साली वासुदेव निवासात स्थानांतरीत होईपर्यंत महाराजांनी इथे वास्तव्य केले होते. नू.महाविद्यालयात नोकरी करतांना कुणालाही कधीही कळले नाही की आपल्या बरोबर काम करणारे गुळवणी मास्तर हे कुणी मोठे महायोगी आहेत.इतकी महाराजांची साधी राहणी असे.१९२७ साली चिन्मयानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी श्रीशंकर पुरुषोत्तम तिर्थ यांच्या कडून दंड घेतला‌ व ते लोकनाथ तिर्थ स्वामी महाराज झाले.१९२८ च्या उन्हाळ्यात यांचा महाराजांच्या याच घरी दोन महिने मुक्काम झाला. पुढे १९५१ पर्यंत वर्षातून एकदा तरी श्री लोकनाथ तिर्थ स्वामी महाराज हे पुण्यास येत असत. एकदा महाराज लोकनाथतिर्थ स्वामी महाराजांच्या नव्या आश्रमाच्या निमित्ताने काशीस गेले.तेथे ते दोन‌ महिने मुक्कामी होते. यावेळी परमगुरु १०८ शंकर पुरुषोत्तम तिर्थ स्वामी महाराजांच्या दर्शनास ते गेले.मग पुढे कधी कधी ते परमगुरुंच्या आश्रमात साधनेला ही जात असत. एकदा महाराज सकाळी पाच वाजता साधनेला बसले असता त्या साधना समाधी तून महाराजांचे उत्थान जवळपास १४ तासांनी सायंकाळी सात वाजता झाले.महाराजांचा इतका विलक्षण अधिकार होता.


महाराजांच्या जिवनातील दोन महत्वाचे कार्य म्हणजे त्यांच्या गुरुसेवेचा मुकुटमणीच आहेत.एक म्हणजे थोरले स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांच्या समग्र साहित्य ग्रंथाचे प्रकाशन व दुसरे म्हणजे नृसिंहवाडी येथील श्री दत्तप्रभुंच्या घाटावरील देवळात सभामंडपाचे बांधकाम.महाराजांचे दिक्षा कार्य ,साधना ,आयुष्यातील सर्व इतर कार्य सुरु होतेच पण आपल्या गुरुस्थानी देवांच्या पालखी मार्गावर छत असायला हवे ही तळमळ अनेक वर्ष महाराजांना होतीच व यथावकाश त्यांनी आपली सर्व मिळकत खर्च करुन तो भव्य दिव्य मंडप उभारला.आजही महाराजांची ही सेवा डौलाने दत्त चरणी सेवेत रुजू आहे.तसेच जवळपास चार वर्ष अथक परिश्रम करुन श्री थोरल्या स्वामींचे सर्व ग्रंथ महाराजांनी प्रकाशित केले.१९६१ साली पानशेतचा प्रलय झाला.यात महाराजांनी प्रकाशित केलेले ग्रंथ आणि बरेच सामान खराब झाले‌.पण यानंतर अनेक शिष्य व जवळच्या मंडळींनी पादुकांसाठी तरी एक स्थान असावे असा आग्रह धरला व नाईलाजाने महाराजांनी मग होकार दिला व वासुदेव निवासाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.१९६५ साली ही भव्य वास्तु बांधून तयार झाली व महाराज आपल्या प्राणप्रिय प्रसाद पादुकांसह आश्रमात वास्तुशांती विधी पूर्ण करुन प्रवेश करते झाले.या भव्य दिव्य आश्रमात भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज ही राहून गेले होते.औरवाडच्या श्री टेंब्ये स्वामी महाराजांच्या एकमेव पादुका चार महिने राहून गेल्या होत्या.

ऑगस्ट १९७३ मध्ये प.पू. योगीराज गुळवणी महाराजानी आपल्या जवळील सर्व चांदीची भांडी तसेच त्यांच्या रौप्य तुलेतून जमा झालेली सर्व चांदी मंडप शिल्पाचे इंजिनियर साहेब श्री. वि. मो. वैद्य यांच्याकडे दिली व सांगितले की ही सर्व भांडी आटवून वाडीच्या देवाचे दरवाजे चांदीने मढवा. हीच सर्व चांदी आटवून प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या इच्छेप्रमाणे श्री. दत्तप्रभूंचे दर्शनी दरवाजे चांदीने मढवलेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी आपल्या इष्टदेवासाठी सर्वस्व वेचले पण कुठे ही वाच्यता नाही ! जाहिरात नाही !

पुढे २/३ वर्षानी महाराजांची प्रकृती बिघडू लागली. किरकोळ आजार ताप वगैरे वाढू लागले. भीष्माप्रमाणे महाराज उत्तरायण सुरु होण्याची वाट पाहु लागले. सारे क्लेश शांतपणे सहन करीत होते. विद्या नावाच्या मुलीचा उघड नयन देवा हा अभंग ऐकताना टेंबेस्वामींचे दर्शन होत आहे, असे महाराज म्हणाले आणि लगेचच १५/०१/१९७४ ला दुपारी पाऊण वाजता चिरविश्रांती घेतली. रेडिओवर बातमी आली. सगळीकडे हाहाकार झाला. दुसरे दिवशी अभूतपूर्व व प्रचंड अंत्ययात्रा निघाली व त्यांना आदरांजली वाहण्यात आली.ही मोडकी तोडकी शब्दसुमनांजली श्रीगुरु महाराजांच्या चरणी अर्पण करतो.श्री गुरु महाराजांच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करुन प्रार्थना करतो की त्यांनी आम्हा पामरांकडून साधन करुन घ्यावं व दत्तचरणी ,माउली ज्ञानराजांच्या चरणी आजिवन सेवा करवून घ्यावी.

(खरंतर महाराजांचे चरित्र संक्षिप्त रुपात लिहीने अतिशय अवघड आहे.प्रत्येक प्रसंग‌ हा मला अतिशय प्रिय व चिंतनीय वाटतो.हा लेख म्हणजे महाराजांच्या चरित्राचे अगदी ओझरते दर्शन आहे.महाराजांच्या दिव्य चरित्रातील काहीच घटनांचा धावता उल्लेख केला आहे त्यामुळे तो कुठेतरी तोकडा व अपुरा वाटेल त्याबद्दल क्षमस्व 🙏)

    ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️


श्रीदत्त शरणं मम 🙏🌸🌿

महाराज ज्ञानेश्वर माउली समर्थ 🙏🌸🌿

Friday, December 2, 2022

सगुणभगवद्स्वरूप भाग ३ :-योगीराज समर्थ सद्गुरु श्री सिताराम महाराज टेंब्ये.

 


सगुणभगवद्स्वरूप भाग ३ :-योगीराज समर्थ सद्गुरु श्री सिताराम महाराज टेंब्ये.

                            

सीतारामो योगिवरो ब्रह्मचारी कवीश्वर : । 

गुरुपादार्पिततनु: समदृग्गुरुतांगत: ।।


                                  आमचे आराध्य दैवत पंचम दत्तावतार भगवान प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे धाकटे बंधू व शिष्योत्तम ब्रह्मचारी राजयोगी योगीराज श्री सिताराम महाराज टेंब्ये ही लोकविलक्षण विभूती स्वामी महाराजांच्या दैदिप्यमान शिष्य परंपेतील एक महापुरुष आहेत.भगवान श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या शिष्य प्रभावळीतील एक अलौकिक रत्न , महाराजांच्या शिष्य परंपरेतील नैष्ठीक ब्रह्मचारी शिष्यांपैकी एक असे योगीराज श्री सिताराम महाराज म्हणजे दत्तसंप्रदायातील एक विलक्षण अधिकारी असे महापुरुष आहेत. श्रीमहाराजांचे चरित्र हे थोरले स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या चरित्राशी अगदी संलग्न आणि अंतर्भूतच आहे.तरीही सिताराम महाराजांच्या जिवनातील काही घटना या अतिशय विलक्षण आणि दिव्य अशा आहेत. मग त्यात हिंगोलीच्या हेमराज मारवाड्याला आपले आयुष्य दान करणे असो की, सद्गुरुंच्या समाधी नंतर त्यांचे सगुण रुपात दर्शन असो किंवा राजूर चा भव्य दिव्य याग असो सर्व अगदी विलक्षण आणि दिव्य आहे.

                          श्री सिताराम महाराजांचा जन्म चैत्र शुद्ध पंचमी या दिवशी माणगाव येथे झाला.

श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे हे सर्वात धाकटे बंधू.घरातील सर्वात लहान अपत्य असल्यामुळे महाराज सर्वांचे खुप लाडके होते‌.त्यांना सर्व लाडाने भलोबा म्हणत असत.श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे व‌ सिताराम महाराज यांच्या वया मध्ये २० ते २२ वर्षाचे अंतर होते. यथावकाश वयाच्या आठव्या वर्षी वासुदेवशास्त्री म्हणजे थोरल्या महाराजांनी भलोबाचे उपनयन संस्कार केले.प.पू.श्रीथोरल्या स्वामींनीच त्यांना ( थोरले स्वामी म्हणजे दत्तावतार प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ) नित्यसंध्या,वैदिक सुक्ते,वैश्वदेव ,देवपुजा इत्यादी सर्व तसेच वेदाध्ययन शिकविले.थोरल्या स्वामींचे भलोबांवरती एवढे प्रेम होते की भलोबांना गायनाची ,तबला वादनाची प्रचंड आवड आहे हे जाणल्यावर त्यासाठी महाराजांनी त्यांना तीस रुपये महिन्याची संगीत गायनाची व वादनाची शिकवणी लावली त्याकाळातील तिस रुपये म्हणजे आजची किती मोठी रक्कम आहे याचा विचार केला की खरंच आश्चर्य वाटतं.पुढे भलोबा अर्थात सिताराम हे गायन व वादनात अतिशय तरबेज झाले.लहानपणापासूनच श्रीसितारामांना उत्तम वस्त्र परिधान करण्याची सवय होती.लहानपणी त्यांचा धोतर ,टोपी ,अंगरखा आणि उपरणे असा वेष असायचा.त्यांची ही आवड बघुन महाराज त्यांना वेलबुट्टी असलेला अंगरखा,कलाकुसर केलेली ,गोंडे व रंगीत चकत्या असलेली टोपी बनवून घेत. श्री महाराज भलोबांवर अतिशय जास्त प्रेम करतं असत आणि भलोबांचेही थोरल्या महाराजांवर खुप प्रेम व त्यांच्या प्रती फार आदरभाव व विश्वास होता.भलोबा हे श्री महाराजांशिवाय राहत नसत.पुढे श्रीथोरल्या स्वामी महाराजांनी माणगावात दत्त मंदिर स्थापन केल्यावर त्या मंदिराची व तेथील सर्व उत्सव ,सोहळे ,पालखी, महाप्रसाद यांची सर्व जबाबदारी भलोबांवर होती.सिताराम महाराज वयाने जरी लहान‌ असले तरी श्रीवासुदेव महाराज आपल्या भलोबाचाच सल्ला घेत असत. उत्सवाच्या निमित्ताने माणगावात आलेल्या साधुसंतांच्या सेवेची ,व्यवस्थेची सर्व जबाबदारी ही भलोबांवरच महाराजांनी सोपवली होती.यावरुन

ते थोरल्या स्वामी महाराजांना किती प्रिय होते हे लक्षात येतं.गोर्यापान वर्णाच्या भलोबांना अर्थात सिताराम महाराजांना श्रीथोरले स्वामी महाराज आपल्या मांडीवर बसवून आपल्या हाताने त्यांच्या भ्रुमध्यात तुळशीच्या हिरव्या पानांच्या रसाची टिकली काढत असत.ती टिकली भलोबांना फार शोभून दिसत असे.त्यांचे ते मुखकमल बघुन स्वामी महाराज प्रेमाने व कौतुकाने म्हणायचे , "पाहा आमचा भल्या देवासारखा कसा सुंदर दिसतो!" श्रीस्वामी महाराजांना माणगावात सात वर्ष पूर्ण झाल्यावर भगवान दत्तात्रेय प्रभुंनी त्यांना गृहत्याग करण्याची आज्ञा केली व उत्तरेकडे जाण्याचे सांगितले.ही बातमी हा हा करता सर्व पंचक्रोशीत पसरली.भलोबांना या गोष्टीचे अपार दुःख झाले.भलोबा स्वामी महाराजांच्या बरोबर जाण्यासाठी हट्ट करु‌ लागले पण हा हट्ट पुरविण्यासारखा नव्हता.स्वामी महाराज त्यांना म्हणाले , "तु अजुन लहान आहेस,शिवाय तुला दररोज दूधभात लागतो,उत्तम पोषाख लागतात तो तुला कोण देणार ? मी पायी व अनवाणी पायाने खडतर असा प्रवास करणार आहे.तो प्रवास तुला झेपणार नाही .तु घरी राहूनच मातोश्रींची सेवा कर." श्री स्वामी महाराजांनी भलोबांची कशीबशी समजूत काढली व ते उत्तरेकडे निघून गेले‌. सद्गुरु आज्ञा म्हणून मातोश्रींची पुढे पाच वर्ष त्यांनी सेवा केली.घरी राहुनच ते नित्य देवपुजा,पंचयज्ञ,आरती, पंचपदी नित्य नियमाने करु लागले.श्रीथोरले स्वामी महाराज ज्या पद्धतीने देवांची सेवा ,उपासना करायचे तेच सर्व शास्त्र नियम सिताराम महाराज पाळायचा पूर्ण प्रयत्न करु लागले.पण त्यांचे मन मात्र गुरु भेटीस्तव आसुसलेले होते.पुढे पाच वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी घरी सतत सांगुन त्यांच्या दादांना म्हणजे श्री स्वामी महाराजांना भेटण्यासाठी जाण्याची परवानगी मिळविली.


                           एक दिवस ते बाहेर जातो म्हणून माणगाव सोडून वासुदेव भेटीसाठी निघाले.श्रीसिताराम महाराज गुरुभेटीस्तव अतिव तळमळीने सर्वसंगपरित्याग करुन वन्य, हिंस्र पशूंचे वास्तव्य असलेल्या जंगलातून व घाटातून अनवानी पायाने जाऊ लागले.तेथून ते दरमजल करत श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे येऊन पोचले.तिथे त्यांची प.पू.श्रीनारायण दिक्षीत महाराजांची भेट झाली.दिक्षीत महाराजांनी त्यांना आपल्या घरी नेले ,त्यांची गुरुबंधू म्हणून उत्तम प्रकारे मेजवानी केली.श्रीदिक्षीत स्वामी महाराजांनी प.पू.श्रीस्वामी महाराजांनी गंगाखेड येथे संन्यास आश्रम स्विकारला व ते आता दंड ग्रहण करण्यासाठी उज्जैन या क्षेत्री गेले आहेत असे श्रीसिताराम महाराजांना सांगितले .ही माहिती मिळताच श्रीसिताराम महाराज हे दिक्षीत स्वामी महाराजांची अनुमती घेऊन पुढील प्रवासास निघाले.उज्जैन येथे पोचल्यावर त्यांना श्री स्वामी महाराज कोठे आहेत याची काहीही माहिती मिळेना.तेथून ते ग्वाल्हेर येथे आले.राजाश्रयामुळे तेथे संस्कृत वेदपाठशाळा होत्या.तेथील ब्राह्मण समाज पण सनातन वैदिक पद्धतीने शास्त्राचार पाळुन जिवन जगताना बघुन त्यांना अतिशय आनंद झाला.अशा पवित्र जागी काही काळ राहुन शास्राभ्यास करण्याचे त्यांनी ठरवले.तेथुल गुरुजनांना भेटुन त्यांनी आपला मनोदय सांगितला.लागलीच तिथे‌ त्यांची सर्व व्यवस्था झाली व श्रीसिताराम महाराजांचा नित्यक्रम ,शास्त्राभ्यास सुरु झाला.रोज जपजाप्य,स्नानसंध्या, गुरुचरित्राचे पारायण असा नित्यक्रम करुन महाराज गुरुजींपाशी शास्त्राध्ययन करीत असत.जे अध्ययन पूर्ण होण्यास बारा वर्षे लागतात ते सिताराम महाराजांनी तिनं वर्षात पूर्ण केले.यावरुन श्री सिताराम महाराजांचा अधिकार लक्षात येतो.त्यांचा अधिकार बघुन काही वर्षे आपल्याकडे राहुन पुढील ग्रंथांचे अध्ययन करण्याचे गुरुजनांनी सुचवले पण "आता आपणाला यापेक्षा अधिक काव्य,नाटक,साहित्यादी शिकण्याची जरुरी नाही.ही सर्व शास्त्रे व साहित्य शिकुन आपणाला जगात पंडित म्हणून मिरवायचे नाही.जरी चारी वेद,सर्व शास्त्र मुखोद्गत झाले,किंवा पांडित्याने जगात किर्ती पसरली अथवा अथांग असे कवित्व आले तरी देखील आपले मन श्रीगुरुचरणकमली संलग्न झाले नाही तर त्या षडवेदांगाचा,त्या पांडित्याचा काय उपयोग?संसारसागरातून तारुन नेणार्या ब्रह्मनिष्ठ पुरुषोत्तममूर्तीची कृपा संपादन करणे,यातच नर जन्माचे खरे साफव्य आहे," हा आपला विचार गुरुजनांना सांगुन श्रीसिताराम महाराज पुढील प्रवासास निघाले.ग्वाल्हेर सोडल्यावर कोठेतरी एकांत स्थानी राहून योगाभ्यास करण्याची महाराजांची तिव्र इच्छा होती.श्रीथोरल्या महाराजांकडुन त्यांना त्रोटक प्राणायाम व योगाची माहिती होती.काही काळ अरण्यात राहुन त्यांनी योगाभ्यास केलाही पण त्यांना लक्षात आले की हठयोगाचा बिकट अभ्यास हा सद्गुरु सान्निध्यातच योग्य रितीने आक्रमिला जाऊ शकतो हा पंथ स्वतंत्र चालता येत नाही.त्यामुळे जंगलातील आपला मुक्काम त्यांनी हलविला व सद्गुरु श्री वासुदेवांचा ठावठिकाणा विचारत उत्तरेकडे श्रीक्षेत्र हरिद्वार या ठिकाणी येऊन पोचले.तिथे त्यांना समाधी अवस्था प्राप्त असणारे महायोगी श्री.जालवणकर महाराज भेटले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिताराम महाराजांनी आपला योगाभ्यास सहज व जलद पूर्ण केला.अगदी थोड्या अवधीत ते समाधी अवस्थेला पोचले.आपला योगाभ्यास पूर्ण करुन ते श्रीक्षेत्र ब्रह्मावर्त या ठिकाणी आले.तिथे गेल्यानंतर श्री सद्गुरु माउली वासुदेवांची चौकशी केली.भगवत सद्गुरु कृपेने तेथील राममंदिरात महाराजांचे प्रवचन सुरु असल्याचे त्यांना कळले.थोरले स्वामी महाराज राम मंदिरातच राहत असत.दुसर्या दिवशी सिताराम महाराज श्रीथोरल्या महाराजांना भेटायला मंदिरात गेले.त्यावेळी प्रवचन सुरु होते त्यामुळे एका कोपर्यात जाऊन बसले.प्रवचन सुरु असतांनी श्रीथोरल्या स्वामींनी सर्व श्रोत्यांवर दृष्टीक्षेप टाकला होताच त्यामुळे त्यांना लगेच लक्षात आले होतेच की आपला लाडका भलोबा ब्रह्मावर्ताला आला आहे पण महाराज त्यांना न भेटताच आपल्या मठीत निघून गेले.दुसर्या दिवशी व तिसऱ्या दिवशी ही असेच झाले.त्याचे कारण ही तसेच होते कारण महाराज आता संन्यासी श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी होते आणि संन्यासाला नाते संबंध काही नसतात.शास्त्र ज्यांचा श्वास आहे त्या स्वामी महाजांचे हे वागणे आश्रमाला अनुसरूनच होते आणि हे श्रीसिताराम महाराजांना लक्षात आले असेलच यात नवल नाही.शेवटी श्री सिताराम महाराजांची मनोदशा व कळकळ ओळखून प्रत्यक्ष दत्तप्रभुंनी श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना आदेश दिला की आपले पूर्वाश्रमीचे बंधु आले आहेत त्यांना आपल्या मातेचे कुशल विचारावे.आता देवांच्या आज्ञेमुळे महाराजांनी सितारामांकडे बोट दाखवून "त्यांना बोलविले आहे म्हणून सांगा," अशी एका निकटवर्तीयाला आज्ञा केली.सिताराम महाराज श्रीस्वामी महाराजांचे समोर हात जोडून उभे राहिले.मातेचे वृत्त विचारल्यावर त्यांनी आईचे देहावसान झाल्याचे श्रीस्वामी महाराजांना सांगितले.आपल्या मातु:श्रींच्या मृत्यू ची बातमी ऐकताच स्वामी महाराज आपला दंड घेऊन श्रीगंगेवर स्नानासाठी गेले व शुद्ध होऊन आले.त्यानंतर श्री सिताराम महाराजांना त्यांनी आपल्या जवळच ठेऊन घेतले.श्रीथोरल्या स्वामी महाराजांनी त्यांना गायत्री पुरश्र्चरण करण्याची आज्ञा केली.त्यावर श्रीसिताराम महाराजांनी स्वामी महाराजांपुढे लडिवाळपणे एक अट टाकली, "माझे पुरश्र्चरण होई पर्यंत आपण येथेच राहावे.आपण अन्यत्र कुठेही जाऊ नये.तसे स्पष्ट अभिवचन मला मिळाले पाहिजे नाहीतर मला पुरश्र्चरण करण्यात रस नाही.असे अभिवचन मिळाल्यास मी पुरश्चरणास आरंभ करतो." आपल्या लाडक्या शिष्याचा हा हट्टही स्वामींनी मान्य केला व स्वामी महाराजांनी सर्व अटी मान्यही केल्या.श्रीसिताराम महाराजांनी स्वामी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपले पुरश्र्चरण सुरु केले.

                         एक दिवस सिताराम महाराज सायंकाळच्या वेळेस शिरोळचे शंकरराव कुलकर्णी यांचेबरोबर सायंसंध्या करण्यासाठी नदीवर स्नानासाठी गेले होते. शिरोळचे शंकरराव कुलकर्णी वेदांतशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी वासुदेवशास्त्र्यांकडे ब्रम्हावर्तास गेलेले होते. सिताराम महाराज व कुलकर्णी दोघेही स्वामींकडे वेदांताचा पाठ घेत असत. त्या दिवशी अचानक वादळ सुरु झाले. संध्या करायला बसले असता त्या वादळात हे दोघेही सापडले. त्या वादळाला त्या देशात “आंधी“ असे म्हणतात. आंधीत सापडलेला मनुष्य त्याच्या नाकातोंडात, कानाडोळ्यात वाळू शिरुन गुदमरुन मरतो व वा-याबरोबर उडून जाऊन गंगाप्रवाहात किवा कोठेही वारा नेईल तिकडे कोठेही जाऊन पडतो. असा अंधीचा महाभयंकर परिणाम मनुष्याला भोगावा लागतो. अशा या मरणप्रसंगात सापडलेले सीताराम महाराज व कुलकर्णी मृत्यूमुखीच पडले असते पण त्यांचे पाठीराखे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचेवर नितांत श्रध्दा असल्याने व गुरुकृपेने ते या संकटातून तरुन गेले.या पुरश्र्चरणाच्या काळात थोरले स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे सिताराम महाराजांबरोबर अडीच ते तिन वर्ष ब्रह्मावर्त या क्षेत्री होते.या काळात श्री स्वामी महाराजांनी खुप मोठी ग्रंथ रचना केली.पुरश्चरण पूर्ण झाल्यावर श्रीस्वामी महाराज हे नृसिंहवाडीस आले व श्रीसिताराम महाराजांज हे देशसंचार करु लागले.पुढे प्रवास करता करता पुन्हा श्रीसिताराम महाराज श्रीथोरल्या स्वामी महाराजांना पवनी या क्षेत्री येऊन भेटले.श्रीस्वामी महाराजांच्या संपूर्ण चातुर्मासात अतिशय भव्य दिव्य असा चातुर्मास याच क्षेत्री झाला होता.याच ठिकाणी योगीराज गुळवणी महाराज यांना श्रीस्वामी महाराजांनी अनुग्रह दिला होता.पवनीला रोज हजारो पंगती उठत असतं.हजारो लोक प्रसाद घेऊन तृप्त झाले होते.या सर्वांची व्यवस्था ही श्रीसिताराम महाराजांकडे होती.येथुन पुढे श्रीस्वामी महाराज नृसिंहवाडी येथे आले.मागाहून श्री सिताराम महाराज ही वाडी क्षेत्री येऊन पोचले.तेथील चार महिन्यांच्या वास्तव्यात अनंत लिला चरित्र घडले शब्द मर्यादेस्तव ते इथे घेत नाही.

                           पुढे श्रीसिताराम महाराजांनी राजुर या श्रेत्री मला मोठा स्वाहाकार यज्ञ करण्याचे योजले.या स्वाहाकारात प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्या सर्व शिष्य मंडळींच्या समवेत स्वतः हजर होते.हे प्रथमतःच घडले होते.हा यज्ञ इतका मोठा होता की फक्त जेवण वाढणारे जवळजवळ एक हजार लोक होते.इतक्या प्रचंड प्रमाणात अन्नशांती झाली होती.दहा-दहा हजार लोकांची एक पंगत बसत असे.सूर्यास्तापर्यंत किती पंगती उठत होत्या यांची मोजदाद नव्हती.टाकळीचे दाजीमहाराज व अन्य १५ यती हे स्वामी महाराजांच्या समवेत पंगतीला हजर असत.सिताराम महाराजांच्या चरणी अष्टमहासिद्धी या हात जोडून सेवेला उभ्या असायच्या.राजुरला ज्या निंबाच्या झाडाखाली महाराज बसायचे त्या वृक्षाची पाने आजही गोडच लागतात.श्री सिताराम महाराजांच्या तप सामर्थ्याने कडू निंबवृक्षानेही आपला कडवट गुण सोडला होता.आजही याची प्रचिती त्या ठिकाणी येते.श्रीसिताराम महाराजांना कसलाही लोभ नव्हता.ते अतिशय उदार होते.आपल्या जवळील द्रव्य व वस्त्रे केव्हा एकदा उधळून टाकीन असे त्यांना झाले होते.श्रीसीताराम महाराजांनी पुष्कळ लोकांना ओंजळ ओंजळ भरुन रुपये वाटले होते.त्याचप्रमाणे त्यांनी ताट भरुन रुपये जगद्गुरुंच्या पुढे ठेवले होते.श्रीसिताराम महाराजांनी गोरगरिबांना पुष्कळ द्रव्य दिले व कित्येक कर्जबाजारी लोकांना कायमचे कर्जमुक्त केले. 

                        पुढे श्रीथोरले स्वामी महाराज श्री सिताराम महाराजांना राजुरलाच राहण्याची आज्ञा करुन गरुडेश्वरी निघून गेले.राजुरला दोन वर्ष श्रीसीताराम महाराजांचा मुक्काम होता.या काळात अनंत आर्त ,मुर्मुक्षू जिवांना सिताराम महाराजांनी दु:ख मुक्त केले.पुढे दोन वर्षांनंतर "आषाढ शुद्ध प्रतिपदा या दिवशी श्रीस्वामी महाराज श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे समाधीस्थ झाले," अशा मजकुराचे पत्र सीताराम महाराजांच्या हातात पडले.हे वाचुन त्यांच्यावर जणू वज्राघातच झाला.अतिशय अनावर अतिव दु:खी अंत:करणाने ते गंगेवर स्नानास गेले व येऊन खिन्न अंतःकरणाने बसुन राहिले. नेत्रातून दु:खाश्रुंचा पूर वाहू लागला. आपले मायबाप आपल्याला कायमचे अंतरले. मला त्यांची भेट होणार नाही, या विचाराने अस्वस्थ झाले. तुला मी पुन्हा भेट देऊन तुझी ईच्छा पूर्ण करीन असे अभिवचन थोरले स्वामी महाराजांनी त्यांना दिले होते. त्याचे काय? महाराजांनी माझी ईच्छा पूर्ण केली नाही. त्याना या अभिवचनाचा विसर कसा पडला? त्यानी माझ्यावर अनंत उपकार करुन माझे जीवन आनंदमय केले होते. त्यांचा मी कसा उतराई होऊ या विचारांनी त्यांचे मन विषण्ण झाले. त्यांना आणखी दहा वर्षे आयुष्य मर्यादा पत्रिकेत स्पष्ट असताना इतक्या लवकर गुरुनी देहविसर्जन का केला? आपण निरामय आनंद स्वरुपात बसून मला मात्र असे दु:ख समुद्रात लोटून दिले. त्याचे काय कारण असावे? माझा अधिकार नाही म्हणून त्यांनी माझी उपेक्षा केली का? अशा अनेक प्रकारचे चिंतन करीत सिताराम महाराज तापी नदीच्या तिरावर काळ कंठत फिरत राहिले. फिरता फिरता, बारालिंग क्षेत्रामध्ये मुकुंदराज योग्यांचे समाधी मंदिर जंगलात आहे. तेथे एकटेच बसून राहू लागले. सदैव गुरुमहाराजांचे नाम घेऊन त्यांना आठवून शोक करीत बसावे, खाणे पिणे सोडून दिले होते. ब्रह्मज्ञानी पुरुषाला सध्या अज्ञानी जनाप्रमाणे साकार स्वरुपाचे इतके प्रेम असणे हे भगवंताचे लक्षणच मानले आहे. आपले गुरु आपल्याला लवकर दर्शन देत नाहीत म्हणून मनाला फार तळमळ लागून राहिली होती व अत्यंत कासावीस होत होते व आता धीर सुटू लागला होता. वासुदेव वासुदेव... असा कंठशोष करुन लेकराप्रमाणे रडायला सुरुवात केली व थोड्याच वेळात मूर्च्छित झाले. मूर्च्छा ही अर्धी मरणावस्थाच होय. एवढ्याच गुरु महाराज गरुडेश्र्वरहून धावत येऊन सीताराम ! ऊठ मी आलो आहे. माझ्याकडे डोळे उघडून बघ म्हणून हाक मारली. हाक मारावी अन झोपेतून जागे व्हावे तसे ते एकदम सावध झाले व डोळे उघडून पहातात तर आपली आराध्य मूर्ती आपल्यासमोर उभी ! आपण स्वप्न तर पाहत नाही ना ! असे वाटले. तोच भल्या, सिताराम ! तू शुध्दीवर आहेस ना? मग असा संशयात का पडलांस? तुला मी पुन्हा भेट देईन व तुझी कोणती ईच्छा असेल ती पूर्ण करीन असे अभिवचन दिले होते ना? ते पूर्ण करण्यासाठींच मी आलो आहे. तुझी काय ईच्छा आहे? तुला काय विचारायचे आहे? सांग, विचार ! असे म्हणून त्यांनी सितारामाना ह्रदयाशी घट्ट आवळून धरले. दोघाही देवभक्तांना परमानंद झाला. 

योगी पुरुष जिवंत असताना कारण पडल्यास दुसरा देह धारण करतो. देह विसर्जन केल्यावर तसा तो करीत नाही. पण श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वतीनी गरुडेश्र्वरी देह विसर्जन करुन माझ्यासाठी आज दुसरा देह किंबहुना दुसरा अवतारच धारण केला आहे. कलियुगात असा दुसरा अवतार घेणारा एक श्री दत्तभगवानच आहे. श्री वासुदेवानंदानी त्यांची समजूत घालून सांत्वन करुन ५ घटिका आत्मबोध उपदेश केला व त्यांचे मन शांत केले व महाराज अदृश्य झाले. श्री सिताराम महाराजाना बालपणापासून केवळ सदगुरुची भक्ती केली व मी सदगुरुंचा सेवक असून त्याची मी सेवा करीत आहे. अशा बुध्दीने सदगुरु संतोषनार्थच सर्व कार्य केले. 

                        व-हाड प्रातांत हिंगोली येथे हेमराज मुंदडा नामक मारवाडी सावकार होता. तो श्री वासुदेवानंद सरस्वतींचा एकनिष्ठ भक्त होता. त्यांनी टेंब्ये स्वामींच्या आशीर्वादाने व अनुज्ञेने तेथे एक सुंदर श्री दत्त मंदिर बांधले आहे. हिंगोलीच्या गुरुभक्तांच्या आग्रहावरुन श्री सिताराम महाराज श्रीदत्तजयंतीच्या उत्सवास तिथे आले होते. तेथील उत्सव उरकून पुढे जाण्याच्या त्यांचा मानस होता. त्याप्रमाणे ते निघाले. पण हेमराजा आकस्मिक रोगाने एकाएकी भयंकर दुखणाईत पडला व आसन्नमरण झाला. श्रीमंतीच्या जोरावर पुष्कळ वैद्य डॉक्टरांकडून उपचार घेऊनसुध्दा बरा होण्याची लक्षणे दिसतात. 

सीताराम महाराजांनी अनेकांना असाध्य दुखण्यांतून बरे केल्याचे हेमराजने एकले होते. त्यामुळे त्याने सीताराम महाराजांनाच शरण जाण्याचे ठरविले. सेवकानी त्याला उचलून सीताराम महाराजांच्या समोर आणून अंथरुणावर झोपविले. हेमराज असाध्य दुखणाईमुळे प्रेततुल्य मरणोन्मुख झालेला होता. त्याने महाराजांना केविलवाण्या नजरेने पाहिले व दीनमुख पसरुन हात जोडून म्हणाला, दयावंत महाराज आपण मज दिनावर दया केलीत तरच मी गुरुमहाराजांची सेवा करीन त्यापेक्षा परलोकांत जाईन. मला या आजारातून बरा करण्यास आपणांवाचून दुसरा कोणीही समर्थ नाही. असे म्हणून महाराजांची अनन्यभावे प्रार्थना केली. मनुष्यांपेक्षा किंवा देवांपेक्षाही ज्यांचा अधिकार थोर आहे असे सुबुध्द साधुसंत महात्म्ये कोणाही प्राणिमात्राचा द्रोह, मत्सर बिलकुल करीत नाहीत. कारण हरी वाईट कृती ही जड कलेवराकडूनच होत असते. ती आत्म्याची कृती नसते. म्हणून संत हे निर्वेर बुध्दीचे असतात असे व्यास म्हणतात हेमराजांची कष्टी, दु:खी, दीन अवस्था पाहून व दीनवाणी एकून सिताराम महाराज द्रवले, हळहळले व त्यांचेकडे पाहून करुणापूर्ण दृष्टीने अतिशय गोडवाणीने त्याचे समाधान करुन त्याला धीर दिला. तुम्ही मलाजी विनंती करत आहात ती आम्हा दोघांच्याही पाठीराख्या श्री वासुदेवानंद सदगुरुनांच करा व त्यांचे तीर्थ व अंगारा प्रेमपूर्वक सेवन करीत जा. ते तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून ओढून काढती हेमराजांनी सांगितले ते आणि तुम्ही वेगळे नाहीतच, एकच आहात. असे म्हणून पुन: पुन: आपणांस पूर्ण बरे करण्याबद्दल विनवणी केली. मी पूर्ण बरा झाल्याशिवाय आपण इथून जाऊ नये असे सांगितले. 

रोग्याचे मरण समजले तरी वैद्याने रोग्यास ते न सांगता उपचार करीत रहावे. तसे त्यांना श्री वासुदेवनंदाच्या पादुकांने तीर्थ दिले व आपल्या झोळीतील भस्म दिले व बरा होशील असा आशीर्वाद देऊन घरी जाण्यास सांगितल. हेमराज म्हणाले मला रोज येथे येणे शक्य होणार नाही तेव्हा माझ्या घराला आपले पावन चरण कमल लावून मला निजदर्शन देऊन आनंद द्यावा ही विनंती आहे. त्याप्रमाणे सिताराम महाराज रोज त्यांचे घरी जाऊन औषध बदलून देऊ लागले. आयुष्य संपत आल्यावर एक दिवस आधी हेमराजाला सांगितले व भगवत नामस्मरण करीत रहा असे सांगितले. त्यानेही मला १०-१५ वर्षे गुरुसेवा करण्याची ईच्छा प्रदर्शित केली व काकुळतीने विनवणी केली. महाराज आपल्या मुक्कामी गेले व वासुदेवानंदाची मनोमन प्रार्थना केली, ते प्रगट होऊन सीतारामा! नसलेला भेदभाव मानून अज्ञानाप्रमाणे तू वागतोस याचे मला नवल वाटते. तू निर्बल नाहीस पण व्यर्थ अज्ञानात शिरु नको व यमाचे निवारण कर, म्हणून माझ्यामागे पोराप्रमाणे लागू नको. आम्ही सर्व भानगडी सोडल्या आहेत. तुला जसे वाटेल तसे तू करु शकशील. पुन्हा आम्हाला अशी गळ घालू नको. तुला सर्व अधिकार दिले आहेत. तू जे मनांत आणशील ते होईल असे म्हणून ते गुप्त झाले.


इकडे सिताराम महाराजांना याची मृत्यु घडी जवळ आल्याने याला आता कसे जगवावे याच्या विचारात मग्न होते त्यामुळे त्यांना येण्यास उशीर झाला. नंतर मनाशी एक निश्चय करुन ते शेटजींकडे जाण्यास निघाले. शेवटचा दिवस उजाडला. शेटजी खुपच बेचैन होऊ लागले. मधून मधून मुर्च्छा येऊ लागली. सीताराम महाराज न आल्याने बेचैन झाले व त्यांना पुन्हा पुन्हा बोलावणे पाठवले. थोड्या वेळाने ते आले. व शेटजींची मुर्च्छावस्था पाहून अंगारा लावला व मोठ्याने कानात महाराज आल्याचे सांगितले. तेव्हा शुद्धित आले व शेटजी परिस्थिती कशी आहे असे विचारले. तेव्हा ते म्हणाले महाराज, मला नेण्याकरिता कोणी तरी दिव्य पुरुष आले असून मला पाशांनी बांधले आहे. त्यांचे वर्णन करण्यास महाराजांनी सांगितले. शेटजी म्हणाले- ते शिवचिन्ह धारण केलेले आहे. महाराज म्हणाले, ते शिवदूत आहेत. तुमचा दक्षिणेकडील यम मार्ग बंद झाला आहे. तुम्ही भाग्यवान आहांत. नंतर शिवदुतांशी महाराजांनी संभाषण करुन एक घडी याला मुक्त करा किंवा थांबा असे सांगितले पण शिवदूत म्हणाले एकदा वेळ टळली की आम्हांला स्पर्श करतां येणार नाही व आताच सोडले तर शिवजी आम्हाला शिक्षा करतील यास्तव आम्ही याला घेऊनच जाणार. 


महाराज म्हणाले यांच्या पत्रिकेवरुन अजून १६ वर्षे आयुष्य आहे. शिवदूत म्हणाले आम्हालाही पत्रिका ज्ञान आहे. आजच त्यांच्या आयुष्य समाप्तीचा दिवस आहे. शिवदुतांना महाराज म्हणाले आमच्या विचाराने तो खोटा आहे. शिवदूत म्हणाले खोटा कसा ते दाखवा, म्हणजे आम्ही याला पाश मुक्त करतो. असा बराच संवाद झाला हेमराजला महाराजांनी विचारले तुला गुरुसेवेसाठी जगण्याची इच्छा आहे ना? तो होय म्हणाल्यावर ती तुझी इच्छा आज आम्ही पूर्ण करणार असे निर्धाराने म्हणाले. मी माझी उर्वरीत सोळा वर्षे तुला अर्पण करतो. 


त्याला उठवून बसवले व उजवा हात पुढे कर म्हणून आमच्या पंचपात्रातील पाणी मी माझे राहीले ते १६ वर्षांचे आयुष्य हेमराजला अर्पण करत आहे असा मोठ्याने संकल्प करुन हेमराजाच्या हातावर पाणी सोडले व शिवदुतांना म्हणाले कि याचा आयुष्य लेख पहा. त्यांनी पाहिल्यावर आणखी १६ वर्षे आयुष्य वाढल्याचे दिसून आले. सिताराम महाराजांनी शिवदुतांचा लेख खोटा करुन दाखविला व आता तरी त्याला पाशमुक्त करा असे सांगितले एवढी मोठी महती होती त्यांची. शिवदुतांनी लगेच त्याला पाशमुक्त करुन महाराजांना नमस्कार करुन १६ वर्षांनी परत न्यायला येतो असे सांगितले. महाराज म्हणाले, तोपर्यंत वासुदेवभक्त वासुदेव (विष्णू) स्वरुप झाला नाहीतर या आणि याला शिवरुप बनवा. 


श्री सिताराम महाराजांनी हेमराजाला निमित्त करुन आपला अवतार समाप्त केला. हेमराजाला महाराजांचे उपकार कसे फेडावे तेच समजेनासे झाले, तो म्हणाला- 


खरा तेजस्वी तूं अससी । जगीं अज्ञान हरणा ।। खरा ओजस्वी तूं भजक । जन मृत्यु प्रहरणा ।। 

खरा दाता तुंचि वितरशी । निजायुष्य सगळे ।। तुला सीतारामा स्मरती । तदहंता पुरी गळे ।। 


सिताराम महाराजांना सांगितल्या प्रमाणे त तिथे असतानांच त्यांच्या समक्ष श्री वासुदेवानंद सरस्वती व श्री दत्तमंदिरासाठी पुजा-अर्चा, नैवेद्य वगैरे खर्चाकरिता सर्वे नं.८ ची जमीन तसेच एक पुष्पवाटिका व एक रु. पन्नास हजार चे कापड दुकान श्री गुरुचरणी अर्पण केले. त्यामुळे श्री सीताराम महाराजांनाही आनंद वाटला. हेमराजाला “तुम्ही दुखण्यातून बरे झाल्यावरच मी इथून जाईन तोपर्यंत इथे राहीन” असे अभिवचन दिले होते. त्याची पूर्तता स्वतःचे उर्वरित आयुष्य त्याला देऊन केली, व पुढे निघुन गेले. सर्वांना वाईट वाटले. हेमराजाला सुद्धा आतां तुम्ही जा असे म्हणता येत नव्हते.


महाराज हुसंगाबादला जातो म्हणून निघाले मार्गात थकवा फार आला, ज्वर येवू लागला तरी हळुहळु चालत चालत हुशंगाबाद वरुन बढणेरीस आले बढने-याला एका भक्ताने दिलेले ताक घेतले त्याला आशिर्वाद दिला व वडाच्या झाडाखाली बसून राहिले. उरलेले आयुष्य दान केल्याने आता त्यांना त्राण राहीले नव्हते. श्रीवासुदेवांचे चिंतन व नामस्मरण करीत उत्तराभिमुख बसून समाधि लावली, व योगमार्गाने सच्चिदानंद ब्रह्मपदी विराजमान झाले तो दिवस होता फाल्गुन शु. ८ शके १८४०. या दिवशी त्यांनी आपले अवतार कार्य संपवून ब्रह्मानंदी लीन झाले. अशा या राजयोगी, महायोगी, थोर गुरुभक्ती असलेल्या सद्गुरु सिताराम महाराजांच्या चरणी माझे शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करतो.त्यांनी ही आपल्या सर्वांना सद्गुरु चरणांशी अनन्यभावाने सेवा करण्याची बुद्धी द्यावी ही त्यांचा सुकोमल चरणी प्रार्थना.


( श्री थोरल्या स्वामी महाराजांनी गरुडेश्वरी देह ठेवल्यावर पुन्हा देह धारण करुन श्री सिताराम महाराज यांना भेट दिल्याचा प्रसंग व हिंगोली येथे हेमराज मारवाड्याला आपले उर्वरीत आयुष्य दान करण्याचा प्रसंग मी चरित्र ग्रंथातुन जसाच्या तसा घेतला आहे.त्यापेक्षा वेगळ्या शब्दात लिहून त्या अतिशय अलौकिक आणि दिव्य प्रसंगाचे गांभीर्य व दिव्यत्व कमी करण्याचे धाडसचं झाले नाही आणि त्यांचे वेगळे वर्णन मला तरी करणे अशक्यप्राय झाले होते तरी सर्वांची त्याबद्दल क्षमा मागतो.)

✍️✒️अक्षय जाधव आळंदी/वाशिम ✒️✍️



।। अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।।

#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🌺

सगुणभगवद्स्वरूप भाग २ :- श्रीमद प.प सद्गुरु श्री योगानंद सरस्वती तथा गांडा स्वामी महाराज.

 


🙏 सगुणभगवद्स्वरूप भाग २ :- श्रीमद प.प सद्गुरु श्री योगानंद सरस्वती तथा गांडा स्वामी महाराज.

तो वै भूमा तत्सुखं त्वेतिगीतं गेयातीतं ध्यानगम्यं मुनीन्द्रम् । भक्तैकार्यं ह्यात्त मानुष्यमूर्तिं योगानन्दं तं यतीन्द्रं नतोऽस्मि ।।

थोरल्या स्वामी महाराजांच्या शिष्य प्रभावळीतील द्वितीय दैदिप्यमान संन्यासी शिष्य असलेले श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री योगानंद सरस्वती तथा गांडा स्वामी महाराज म्हणजे गुरुसेवा,गुरु निष्ठेचे मुर्तिमंत सगुण स्वरुपी होते.श्री स्वामी महाराजांची प्रत्यक्ष सेवा आणि मोठा काळ सहवास लाभलेल्या भाग्यवान शिष्या पैकी एक असलेले गांडा बुवा हे महायोगी होते.श्रीगांडाबुवांनी केलेली गुरुसेवा म्हणजे प्रत्येक गुरुभक्तासाठी एक मार्गदर्शनाची संहिता च आहे.गुजराती असलेल्या गांडाबुवांनी लिहीलेला "गुरुमूर्ती चरित्र" हा मराठी प्राकृत ग्रंथ बघितला तरी त्यांच्या विद्वत्तेची,अधिकाराची जाणिव झाल्याशिवाय राहत नाही.

             गुजरात राज्यातील सुरत जवळील तलंगपूर या छोट्या गावामध्ये प.प.सद्गुरु श्रीयोगानंद स्वामी महाराजांनी, शके १७९० मध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी म्हणजे दत्तजयंती च्या परमपावन दिनी मानवी रूपाने अवतार धारण केला. त्यांच्या आईचे नांव सौ.काशिबाई होते व वडिलांचे नांव श्री डाह्याभाई होते.हे दाम्पत्य अतिशय धर्मपरायण आणि मोठे शिवभक्त होते.डाह्याभाई चे वडिल श्रीशंकरभाई लालजी हे भगवान निलकंठेश्वर महादेवांचे अनन्य भक्त होते. हेच भगवान निलकंठेश्वर महादेव या कुळाचे आराध्य ही होते.त्यांच्या कुळातील शिवभक्ती जणू फलस्वरुपच  गांडा  बुवांच्या रुपात जन्माला आली..श्रीदत्तजयंतीच्या दिवशी दत्तजन्माच्या वेळीच पुत्ररत्न प्राप्त झाल्याने देसाई परिवार आनंदाने न्हाऊन गेला.बाराव्या दिवशी ज्योतिषाला बोलावण्यात आले.त्याने पंचांगानुसार बाळाचे जातक पाहिले.कुंडलितील ग्रहस्थिती नुसार फलश्रुती सांगितली ती अशी की,हा मुलगा कुळाचा उद्धार करील, भवसागरात,संसारसागरात बुडालेल्या आर्तजनांचे दु:ख दूर करील.हे ऐकून डाह्याभाईंच्या आनंदाला पारावार उरला नाही.नंतर या भाग्यशाली बाळाचे "कल्याण" असे नाव ठेवण्यात आले.कल्याण बालेंदुवत् वाढू लागला.योगभ्रष्ट महात्मा असल्याने त्यांचे बालपण ही तेवढेच विलक्षण असेच होते.त्यांना बालपणीच शिवपूजनाची गोडी वाटू लागली.ते एकांतात ध्यानमग्न स्थितीत रमून जात असत.वयाच्या आठव्या वर्षी बाळ कल्याण चे मौंजीबंधन करण्यात आले.त्यानंतर ते नित्यकर्म शिकले. स्नान , संध्या , शिवपूजन, श्रीरुद्राभिषेक ते अतिशय तन्मयतेने तल्लीन होऊन करु लागले.सवंगड्यांसह खेळण्याबागडण्याच्या वयात एकांतात रमण्याची त्यांची वृत्ती दिसत होती. त्यामुळे घरातील वडीलधाऱ्यांनी लाडाने त्यांचे नांव गांडा असे ठेवले. (गुजराती भाषेत गांडा या शब्दाचा अर्थ भोळा असा होतो.) त्याकाळी शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता. तलंगपूर येथे एक गावठी शाळा होती. त्या शाळेतच कल्याणजींचे शिक्षण झाले. व्यवहारासाठी आवश्यक असणारे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या , लौकिक शिक्षणाची इतिश्री झाली. त्यानंतर सद्ग्रंथांचे वाचन करण्याचा छंदच त्यांच्या मनाला लागला. यातून अनेक ग्रंथाचे वाचन घडले. पूर्वजन्मीच्या संस्कारांनी चित्त शुद्ध होतेच, त्यात अशा धार्मिक संस्काराची व कृतीची जोड मिळाली.

            त्या काळातील रुढीप्रमाणे कल्याणजींचे लग्न सौ.केसरबाई यांच्याशी झाला. पुढे वय वाढले तशी कौटुंबिक, जबाबदाऱ्यांची जाणीव कल्याणजींच्या मनात झाली. कुटुंबाच्या मिळकतीत हातभार लावावा म्हणून सचिन संस्थानातील एका शाळेत शिक्षकाची नौकरी त्यांनी पत्करली. प्रमाणिकपणाने अध्यापनाचे कार्य करावे आणि उरलेल्या वेळात शिव-आराधना व धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे असे दिवस जाऊ लागले. संसारही जगरहाटीप्रमाणे चाललेला होता. पुढे डाह्याभाईंनी त्यांना शिक्षकाची नौकरी सोडून शेतीच्या कामात लक्ष घालण्याची आज्ञा केली. त्यानुसार कल्याणजींनी शिक्षकाची सोडली व ते शेतीच्या कामात लक्ष घालू लागेल. शेतीची कामे करावीत आणि उरलेल्या वेळी भगवान नीळकंठेश्वराची आराधना करावी असा कल्याणजींचा दिनक्रम सुरू झाला. तसा त्यांच्या मनात प्रापंचिक गोष्टींना थारा नव्हता. मन शिव-आराधनेत तल्लीन होऊ पाहत होते. म्हणूनच श्री नीकंठेश्वराची षोडशोपचारे पूजा करण्याचा त्यांचा नियम कधीच चुकत नव्हता. प्रतिवर्षी श्रावणमासात सव्वालक्ष बिल्वपत्रे महादेवास अर्पण करण्याचा नियम कटाक्षाने पाळला जात होता.श्रीकल्याणजी हे संसारात राहून सारी गृहकृत्ये करीत होते तरीही पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे त्यांच्या मनात अनुसंधान सतत आत्मोपलब्धीकडेच असे.

        कल्याणजी आपला शिवपूजनाचा नियम कटाक्षाने पाळित असत. एकदा कल्याणजींना त्यांच्या भाच्याच्या लग्नास जावे लागले.ते लग्न तलंगरपूरपासून वीस-पंचवीस मैल दूर असलेल्या पिंपळदरा या गावी  होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच शिवरात्र होती आणि शिवरात्रीस, मध्यरात्री शिवपूजन करण्याचा त्यांचा नियम होता. तलंगपूरला पोहोचता आले नाही. तर इतके दिवस निष्ठेने पाळलेले शिवरात्र व्रत भंग होणार होते. आजच्या सारखी प्रवासाची साधने त्या काळी नव्हती. त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच गावाकडे परत जाण्याचा निश्चय कल्याणजींनी केला. दुसरे दिवशी पायी निघून ते अमलसाड स्टेशनवर आले, पण गाडी निघुन गेली होती. अन्य कोणतेही प्रवासाचे साधन नव्हते. त्यांनी शरीरास पडणाऱ्या कष्टांचा विचार केला नाही. सरळ पायी चालत २० मैलांचे अंतर कापून कल्याणजी रात्री अकरा वाजता तलंगपूरास पोहोचले. मध्यरात्री भगवान नीळकंठेश्वराची प्रतिवर्षाप्रमाणे त्यांनी यथासांग षोडशोपचारे पूजा केली. केलेला नियमु कोणत्याही परिस्थितीत पाळणे हे त्यांचे ब्रीदच होते. अशा कर्मनिष्ठ,शास्त्रनिष्ठ व व्रतस्थ साधकाला श्री थोरल्या स्वामी महाराजांसारखे सद्गुरु लाभणारच यात नवल तरी काय!! केवढी ती विलक्षण धर्मनिष्ठा, कर्मनिष्ठा!!!

            वडिलांनी शेती करण्यास सांगितले म्हणून कल्याणजी शेती करु लागले खरे पण त्यांचे मन मात्र त्यात रमत नव्हते. आध्यात्मिक जिवनात प्रगती कशी साधता येईल याचाच ध्यास त्यांच्या मनास सतत लागला होता. संत सहवास, सद्गुरु सहवासा शिवाय ते शक्य नाही हे त्यांना ठाऊक होते.  त्यासाठी तलंगपूर कसे सोडता येईल याचा विचार कल्याणजींनी मनात सुरू झाला. पुढे नोकरी करिता कल्याणजी मद्रासला ही गेले.त्यांना जसे हवे होते तसेच घडून आल्यामुळे कल्याणजी आनंदात होते.पुढे मद्रास ला अनेक घडामोडी घडल्या.त्यानंतर  नाशिकला संत सहवासात राहण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली. एका महात्म्याचा सहवास त्यांना लाभला. संत सहवासाने त्यांचे मन अत्यानंदाने भरून गेले. प्रवासाने आलेला शीण, थकवा कुठल्याकुठे पळून गेला. भूक, तहानही ते विसरून गेले. या काळात त्यांनी त्या संत महात्म्याची अनन्यभावे व नि:स्वार्थवृत्तीने सेवा केली.  त्या संतांनी कल्याणजींना रामेश्वराची पायी यात्रा कर म्हणजे आत्मिक सन्मार्गाचा लाभ होईल असे मार्गदर्शन केले. त्यानुसार संताचा आशीर्वाद घेऊन ते पायीच रामेश्वरला जाण्यासाठी निघाले. ती यात्रा करुन ते मद्रासला परतले.काही काळ नोकरी केली पण पुन्हा त्यानंतर तलंगपूरास परतले.तिथे कपड्यांचे दुकान टाकले.ते दुकान ही उधारी थकल्यामुळे दुकान बंद करावे लागले. पुढे कल्याणजींनी चुलत भावाबरोबर भागिदारी करून निकोरा या गावी गुळ व तंबाखूचा व्यापार सुरू केला. सौ.केसरबाईसह निकोरा येथे घरही थाटले. तेथे त्यांचा व्यापार जोरात चालू लागला. पैसा हाती येत होता पण लागलीच खर्चही होत होता. व्यापारी वृत्तीने पैशाचा धनसंचय करण्याची मुळातच त्यांची वृत्ती नसल्याने दीनदुबळ्यांना, गरजू लोकांना दान दिले जाई. पुढे कल्याणजींच्या मनातील वैराग्याने उचल खाल्ली आणि त्यांना आपल्या संसाराचा ,घराचा त्याग केला.मुळ प्रवृत्ती ही संन्यस्थच होती त्यामुळे ते संसारात खूप काळ रमणारच नव्हते याची कल्पना आपल्याला येईलच.

घर सोडल्यावर ते प्रवास करीत करीत ते नर्मदा किनारी येऊन पोहचले. सद्गुरु शोधार्थ त्यांनी नर्मदा परिक्रमा सुरु केली.या दरम्यान गांडाबुवांनी कठोर तप आचरले.त्यांना श्रीभगवंतांनी अगदी निःसंग करुन सोडले.इतके की परिक्रमेत त्यांच्या अंगावरील वस्त्र ही भिल्लांनी काढून त्यांना नागवा केले.ऐवढेच काय तर गळ्यातील जान्हवे ही दोरा शिवण्यास उपयोगी पडेल म्हणून काढून घेतले.अशा कठोर परिक्षेत गांडाबुवा डगमगले नाही.त्यांनी सद्गुरुंच्या शोधार्थ भ्रमण सुरु ठेवले.या दरम्यान नर्मदा मैयाने अनेक प्रकारे गांडाबुवांवर कृपा केली.(शब्दमर्यादेस्तव तो भाग इथे देता येणार नाही.)नर्मदा किनारी असलेले महान सत्पुरुष पांडुरंग बाबा यांच्या कृपेने गांडाबुवांना आपल्या सद्गुरु स्थानाचा ठाव ठिकाणा गवसला. सद्गुरु माउली श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज मार्कंडेश्वराच्या मंदिरात वास्तव्यास होते. तेथे गुरुदेवांना पाहताच त्यांच्या मनात दिव्यानंद दाटून आला. त्यावेळी गुरुदेवांचे गीतेवर प्रवचन चालू होते. अंतर्ज्ञानाने त्यांनी सगळे जाणले पण प्रत्यक्ष ओळख मात्र दाखविली नाही. एक आठवडा असाच गेला. एके दिवशी गुरुदेवांनी ‘तू येथे का बसून राहतोस? असे विचारले. तेव्हा अत्यंत नम्रभावाने हे समर्थ पाय माझा उद्धार करतील याच विश्वासाने मी या पायाजवळ शरण आलो आहे असे गुरुदेवांना विनवले व आपली सारी जीवनकथाही सांगितली. ते गुरुदेवांसोबत अठरा दिवस सिनोर येथे राहिले. या काळात त्यांनी अत्यंत एकनिष्ठेने गुरुदेवांची सेवा केली. गुरुदेवांच्या सान्निध्यात त्यांच्या मनातील विशाद नष्ट झाला व त्यांचे मन अखंड प्रसन्नतेने भरले. आत्मबोधाच्या साक्षात्कारासाठी ऋतंभराप्रज्ञा जागृत करणे आवश्यक असे. त्या करता योगाभ्यास करण्याची आज्ञा गुरुदेवांनी केली. मार्कंडेश्वराच्या मंदिरातच त्यांचा योगाभ्यास सुरू झाला.पुढे स्वामींच्या आज्ञेने आई वडिलांची स्वामी महाराजां बरोबर राहण्याची परवानगी त्यांनी घेतली.पत्नि व मुलाची ही व्यवस्था लावली आणि स्वामी महाराजांकडे परतले.पुढे श्री स्वामी महाराजांची द्वारका येथे गांडा बुवांनी अनन्य सेवा केली.श्री थोरल्या स्वामी महाराजांच्या "महदपूर" येथील चातुर्मासात ही गांडा बुवा सेवेला सोबत होतेच.
                                स्वामी महाराजांच्या सान्निध्यात गांडा बुवांना सद्ग्रंथाचे श्रवण आणि मनन घडत होते. शास्त्रप्रणालीनुसार प्रत्यक्ष गुरुमुखातून ज्ञान ग्रहण करण्याचे परमभाग्य त्यांना लाभले होते. गुरु आणि शिष्य तेवढेच अधिकारी होते. त्यांचा योगाभ्यासही व्यवस्थित चालू होता. पण ऋतंभरा प्रज्ञा जागृत व्हावी म्हणून गुरुदेवांनी त्यांना खेचरी मुद्रा करण्यास सांगितले. त्यासाठी जिभेच्या खालची एक सुक्ष्म शीर छेदावी लागते म्हणून गुरुदेवांनी त्यांना गुणाछावनी येथे असलेल्या डॉ.विश्वनाथ ताटके यांच्याकडे पाठविले. शिरोच्छेदन करतांना खूप रक्तस्त्राव झाला. शेवटी गुरुदेवांनी येऊन त्यावर उपचार केला. तेव्हाच रक्तस्त्राव थांबला. गांडाबुवांची प्रकृती खालावली. गुरुदेवांनी नंतर ब्रम्हावर्ताकडे प्रयाण केले व सद्गुरु गांडा महाराज भडोच येथे आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी आले.गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे खेचरी योगमुद्रेचा अभ्यास चालू होता. गुरुदेवांनी सांगितलेल्या सुचनेप्रमाणे आहार व विहार यांचे नियमन गांडाबुवा करीत होते. त्यामुळे प्रकृतीत चांगली सुधारणा झाली व सद्गुरूंनी धर्मजागृतीच्या कार्यास प्रारंभ केला. ते पळसाना, टिंबरवा साकी येथे जाऊन राहिले व तेथील लोकांमध्ये धर्मजागृती केली. तेथून ते भडोच येथे साधनेसाठी परत आले.

एके रात्री गुरुदेवांनी स्वप्नात येऊन सांगितले की तुझी माता आणि भावजय यांनी बिमारीमुळे अंथरून धरले आहे. दुसऱ्या दिवशीच सद्गुरु तलंगूपर येथे पोहोचले. त्यांनी आईची सेवा केली तिच्याकडून दानधर्म करविला. अंतिम क्षणी दत्तप्रभुंचे ध्यान व नामस्मरण करण्यास सांगितले. मातोश्रींनी दत्तनामाचा उच्चार करीत करीत माघ शुद्ध पौर्णिमेस (संवत् १९५९) पार्थीव शरीराचा त्याग करून चिरकाल सौभाग्य प्राप्त केले. त्यानंतर गांडाबुवांनी मातोंश्रीचे उत्तरकार्य व्यवस्थितपार पाडले व त्या वर्षीचा चातुर्मास अश्विनीकुमार येथे केला. पुढे गांडा बुवा‌ वाडीहून श्री स्वामी महाराजां सोबत शृंगेरीला ही गेले.तसेच कुरूगड्डी म्हणजे कुरवपूर येथील चातुर्मासात ही स्वामी सेवेत हजर झाले.हा चातुर्मास पूर्ण झाल्यावर श्री थोरले स्वामी महाराज व गांडाबुवा राजुर येथील यज्ञात उपस्थित राहण्यासाठी निघाले.श्री स्वामी महाराजांच्या उपस्थितीत पार पडलेला हा यज्ञात एकमेवाद्वितीय असा होता.या फक्त यज्ञ प्रसंगावर एक छोटेखानी लेख लिहीता येईल इतका तो विलक्षण आहे.
पुढे श्री स्वामी महाराजांनी गांडा बुवांना नर्मदा किनारी एकांत गाठून वेदांत ज्ञानाचे चिंतन करण्याची आज्ञा केली.पुढे‌ स्वामी महाराजांचा देह ठेवण्याचा काळ जवळ आला तेव्हा‌ही गांडा बुवा महाराजांसमवेतच होते.पुढे श्री थोरल्या महाराजांनी दाखवलेल्या संन्यास मार्गाचा अवलंबन करण्याचे ठरविले.स्वामींच्या दृष्टांतानुसात त्यांनी संन्यास व दंड दिक्षा घेतली आणि योगानंद सरस्वती हे नाम धारण केले.दंड धारण केल्यानंतर सद्गुरु योगानंद स्वामी महाराजांनी पहिला चातुर्मास भडोच येथे केला (शके १८४१) त्यांचा शके १८४२ चा दुसरा चातुर्मास नाशिक येथे झाला. तिसरा चातुर्मास श्री क्षेत्र अनावल श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर (जे अनावील ब्राह्मणांचे कुलदैवत आहे) येथे संपन्न झाला. येथे सद्गुरूंनी योगसुत्रांवर एक पुस्तक लिहिले पण ते सध्या उपलब्ध नाही.पुढे १९४४ मध्ये वैशाखमासाच्या शुक्ल पक्षात सद्गुरु योगानंद महाराज पाथरीकर चौधरी मंडळीसह गुंज येथे आले. तेथे श्री सिध्देश्वर महादेव मंदिरात त्यांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. सद्गुरु श्री प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पाय या स्थानास लागताच त्याचा पांग फिटला. ती जागा स्वच्छ करण्यात आली. सद्गुरूंचे दर्शन घेण्याकरता दररोज अनेक गावांहून लोक येऊ लागले. सावलीसाठी मंडप टाकण्यात आला. अन्नदान होऊ लागले. भजन, किर्तन, पंचपदीच्या गजराने गोदामातेचा पवित्र तीर दुमदुमूनि जाऊ लागला. हे वातावरण भक्तिमय होऊन गेले. शके १९४४ चा दशहरा व चातुर्मास सद्गुरूंनी गुंज येथेच केला.चातुर्मासानंतर सद्गुरु पाथरी व रेणापूरला गेले व तेथून श्री बाबा कल्हे यांच्या विनंतीनुसार ते मानवतला आले. मानवत येथे श्रीदत्त मंदिर नव्हते. तेथे दत्त मंदिर व दत्त पादुका असाव्यात अशी भक्तांची इच्छा होती. त्यानुसार श्री बाबा कल्हे यांनी पुढाकार घेतला. व श्री प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या सानिध्यात शके १८४४ मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीस श्रीदत्तप्रभुंच्या मुर्तिची व पादुकांची प्रतिष्ठापना मानवत येथील राममंदिरात करण्यात आली. सुरुवातीची अकरा आवर्तने होईपर्यंत सद्गुरूंनी कमंडलुतील पाण्याने स्वतः दत्तप्रभुंच्या मूर्तिस अभिषेक केला. मानवतला सद्गुरुंचे वास्तव्य असतांना तेथे पाण्याची तीव्र टंचाई होती. श्रीरंगनाथ जोशी यांच्याकडे आड होता. पण त्यात पाणी नव्हते. सद्गुरूंना हे कळाले तेव्हा त्यांच्या कमंडलुतील पाणी त्या आडात टाकले आणि त्या आडास पुरेपुर पाणी आले.मानवतहून सद्गुरु जिंतूर येथील येथे आले. तेथे श्रीदत्त मंदिरात त्यांनी मुक्काम केला. हे दत्तमंदिर पावसाळ्यात गळत असल्यामुळे खराब झाले होते. त्यामुळे सद्गुरूंनी नाराजी व्यक्त केली व भक्तमंडळीच्या हाताने या मंदिराचा जीर्णोद्धार करून घेतला.
            शके १८४५ चा दशहरा गोपेगांव येथे झाला तर चातुर्मास गुंज येथे झाला. याच काळात श्री गुरुमूर्तिचरित्र या ग्रंथाच्या लिखाणास प्रारंभ झाला. सिद्धेश्वराच्या देवालयात बसून सद्गुरु सांगत व गुंज येथील श्री कृष्णाबुवा रामदासी लिहून घेत. श्रीगुरुमूर्ति चारित्राचे पंधरा अध्याय या काळात लिहून पूर्ण झाले.पुढे यथावकाश वाकडी येथे हा पूर्ण झाला.१४,८८३ ओव्यांचा व १३५ अध्यायांचा हा भव्यदिव्य ग्रंथ सर्वांच्या कल्याणासाठी सद्गुरूंनी मराठीत तयार केला. ग्रंथ तर तयार झाला पण आता त्यांच्या शुद्धिकरणाची तळमळ सद्गुरूंना लागून राहिली. इकडे नारेश्वर येथे श्रीरंगअवधूत महाराजांना गुरुदेव श्री प.प.स.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा दृष्टांत झाला की, ब्रह्मचारी, गांडा तुझी वाट पहात आहे. त्यानुसारे श्रीरंगावधूत महाराज वाकडी येथे आले. त्यांनी शुध्दीकरणाचे कार्य पूर्ण केले व नर्मदेस परिक्रमा केल्यानंतर त्यांनी भडोच येथे सहा महिने मुक्काम केला व ग्रंथाची मुद्रीते स्वत: तपासून त्याचे पारायणही स्वत: केले. या कार्यास प.प.श्री.योगानंद महाराजांचे पुर्वाश्रमातील मेहुणे श्री कल्याणजी भाई यांनी खूप मदत केली.

पुढे सद्गुरु योगानंद महाराजांची प्रकृती अस्वस्थ झाली. गुजरातमध्ये ही वार्ता पसरली. सद्गुरूंचे पुर्वाश्रमातील कनिष्ठ बंधू श्री रघुजीभाई, श्री प्रभाशंकर ब्रह्मचारी, प.पू.श्री रंगवधूत महाराज सद्गुरूंच्या सेवेसाठी गुंजेस आले. एक दिवस सद्गुरूंनी भक्तांना बोलावले व सर्वांना आपले मनोगत सांगितले की दत्त संप्रदायाचे कार्य, धर्मजागृती व अन्नदान या गोष्टी गुंज येथे अव्याहतपणे चालू राहाव्यात. या दृष्टिने येथे दत्त मंदिर बांधून संस्थानच्या दृष्टिने आखणी व्हावी. दत्त प्रभुंची कृपा व गुरुदेवांचे आशीर्वाद पाठीशी राहतीलच. कोणतीही शंका मनात आणू नये. एकदा कामाला लागलात म्हणजे कशाचीही कमतरता पडणार नाही. देवांचे नित्यपूजन, करूणात्रिपदी, पालखी, शंकराची अव्याहतपणे बिल्वपत्रांनी पूजा व अभिेषेक यात खंड पडू देऊ नये. पंच नेमून कमिटीद्वारा सर्व हिशेब व्यवस्थित ठेवावा. होणारी मालमत्ता संस्थानच्या नावावर करावी. एवढे सांगून सद्गुरूंनी संन्यासाश्रमात अंत्यविधी कसा करावा लागतो याची कल्पना भक्तांना दिली.
            पुढे सद्गुरूंच्या अंगावरची सूज खूप वाढली. शरीराला पडून राहणेही कष्टदायक वाटू लागले. प.पू.श्री रंगावधूत महाराजांनी एका पोत्यात साळीचा भुसा भरून मऊ मऊ गादीसारखा बिछाना तयार केला ते रात्रंदिवस सद्गुरूंच्या सेवेत राहू लागले. पण त्यांचा भाऊ मुंबई येथे आजारी असल्याचा दृष्टांत झाल्याने प.पू. श्री.रंगावधूत महाराज मुंबईकडे रवाना झाले. अवतार त्यागाचा समय आलेला जाणून श्री प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांनी शके १८५० च्या फाल्गुन वद्य द्वादशीस पहाटे ४ वाजता पद्मासन घालून बैठक स्थित केली. प्राणायाम केला. ध्यान लावले. गुरुदेवांचे दर्शन घडल्यानंतर श्रीदत्तप्रभू दिसू लागले आणि त्यांची प्रणवउच्चार करून भौतिक देहास सोडून ते स्वस्वरूपात विलीन झाले.ही शब्दसुमनांजली श्रीचरणी अर्पण करून या सेवेला विराम देतो व श्रीदत्त चरणांची सेवा अखंडपणे करवून घ्यावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना.
     ✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️
            ।। श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ।।

श्रीदत्त: शरणं मम्🙏🌿🌸🚩


कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...