सगुणभगवद्स्वरूप भाग ६:- दत्तस्वरुप नारेश्वरचे नाथ समर्थ सद्गुरु श्री रंगावधूत महाराज.
श्वासे श्वासे दत्तनाम स्मरात्मन्!!!🌸🙏🌿
पंचम दत्तावतार भगवान श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे सत्शिष्य नारेश्वर निवासी सद्गुरु श्री रंगावधूत स्वामी महाराज हे संपूर्ण दत्त संप्रदायातील सर्व मान्य ,सर्व पूज्य अशी श्रेष्ठ विभूती आहेत.श्री थोरल्या स्वामी महाराजांच्या शिष्य प्रभावळीतील हे एक अलौकिक अवधूत संत रत्न.श्री रंगावधूत महाराज अर्थात बापजींचा अधिकार विलक्षण थोर होता.श्री स्वामी महाराजांच्या चरित्रासारखेच प्रखर व दैदिप्यमान,तपोपूत असे श्री बापजींचे चरित्र आहे.संपूर्ण गुजरात राज्यात दत्त भक्तीचा प्राण फुंकण्याचे व सर्व गुजरात मध्ये दत्त भक्ती रुजवून श्रीदत्त संप्रदायाला वर्धीष्णू करण्याचे विलक्षण कार्य बापजींनी केले. बापजींनी केलेली "दत्त बावनी" ही रचना आज सर्व दत्त संप्रदायात सर्व श्रुत आहे.प्रत्येक दत्त भक्तांच्या उपासनेत या रचनेचा समावेश झालेला आहे.बापजींची ही रचना अतिशय प्रासादिक आहे.विलक्षण गुरुभक्ती ,अनन्य मातृभक्ती, थोर दत्तभक्ती अशा अनेक गुणांनी मंडित झालेले बापजींचे चरित्र आपल्या सर्वांना नक्कीच मार्गदर्शक ठरणारे आहे.आज बापजींच्या दिव्य चरित्राचे आपण चिंतन करणार आहोत.
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवळे हे महाराजांचे मुळ गाव.या गावात ऋग्वेदी अत्रिगोत्री कर्हाडे ब्राह्मण कलोत्पन्न श्री जयरामपंत वळामे नावाचे एक सत्शिल व धार्मिक गृहस्थ राहत असत.हे श्रीबापजींचे आजोबा.यांना चार मुलं होती.त्यातील तिसरे विठ्ठलपंत जे थोर विठ्ठल भक्त होते. हे बापजींचे पिताश्री.विठ्ठलपंतांची वृत्ती मुळातच विरक्त होती.ते आई वडिलांचा आशिर्वाद घेऊन भगवंतांच्या कृपा प्राप्ती साठी पंढरपूरास येऊन राहिले होते.अनेक दिवस तेथे अनुष्ठान केल्यानंतर त्यांना देवांनी घरी जाऊन गृहास्थश्रम स्विकारण्याची आज्ञा केली.ते घरी परत आले व त्यांचे लग्न पाली येथील मोघे यांची कन्या काशी यांच्या बरोबर झाला.काशीचे लग्नानंतर चे नाव रुक्मिणी असे ठेवले गेले.पुढे हे दाम्पत्य आपल्या एका स्नेही सरपोतदार यांच्या विनंतीवरुन गुजरात मधील गोधरा येथे विठ्ठल मंदिरात पुजारी म्हणून राहावयास गेले.या सत्शिल धार्मिक दाम्पत्याच्या पोटी कार्तिक शुद्ध नवमी अर्थात कुष्मांड नवमी संवत् १९५५ च्या सोमवारी ता.२१ नोव्हेंबर १८९८ रोजी प्रदोष काळी बापजींचा जन्म झाला.यथाकाळी बाळाचे बारसे केले गेले.भगवान पंढरीनाथांचा प्रसाद म्हणून या बाळाचे पांडुरंग असे नाव ठेवण्यात आले.त्यावेळी गोधरा येथे भिषण महामारी पसरली होती.जन्म होताच काही दिवसातच आई वडिलांना या लहानग्या बाळाला घेऊन जंगलात राहावे लागले.महामारी दूर झाल्यावर सर्वजन गावात परतले. बाळ पांडुरंग एक वर्षाचे झाले आणि सर्व घरावर वर्जाघात झाला.बापजींचे वडिल विठ्ठलपंत यांचे आकस्मित निधन झाले.मातोश्री रुक्माईंना तर हा मोठा धक्का होता पण पाठीमागे दोन पुत्र होते.त्यांना सांभाळण्यासाठी त्या परत खंबीरपणे उभ्या राहिल्या.दिवसांमागून दिवस गेले बाळ पांडुरंग आता आठ वर्षांचे झाले आणि त्यांचे लहान भाऊ नारायण हा सहा वर्षांचा झाला.मातोश्रींनी या दोघांचे मौंजीबंधन करण्याचा विचार केला व त्यासाठी त्या देवळे या आपल्या मुळ गावी आल्या.शुभ मुहूर्तावर दोघांचीही मुंज पार पडली.आता दोघाही बटुंना घेऊन मातोश्रींनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी, औदुंबर येथे दत्त दर्शनाला घेऊन जावे हा विचार केला.मातोश्री त्यांच्या बहिन व मुलं असे मिळून वाडीला आले.त्यावेळी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचा मुक्काम वाडीतच होता.देवांचे दर्शन करुन मातोश्री दोन्ही मुलांना घेऊन श्री स्वामी महाराजांकडे आल्या.बाळ पांडुरंगाने स्वामींना प्रथमच पहिले व जन्मा जन्माचे सद्गुरु प्रेम एकदम उफाळून वर आले.स्वामींनीही आपल्या या प्रिय शिष्याला तात्काळ ओळखले.पांडुरंगाने स्वामींना पाहताच ते अंगावरील कपड्यांसह स्वामींच्या जवळ गेले व त्यांच्या मांडीवर आपले डोके ठेवले.त्यावेळी स्वामी म्हटले "हा बाळ तर आमचाच आहे." हीच बापजींची श्री थोरल्या स्वामी महाराजांशी झालेले प्रत्यक्ष एकमात्र भेट.त्यानंतर सर्वजन घरी परतले.पण सद्गुरु दर्शनानंतर पांडुरंग अगदी अंतर्मुख झाले.त्यांना सतत स्वामी महाराजांची आठवण येऊ लागली.एकदिवस त्यांना थोरल्या स्वामी महाराजांचा पोथीचे पारायण करण्याचा दृष्टांत झाला.पण पोथी कुठली हे कळेना? त्यांच्या मामांनीपांडुरंगांनी गुरुचरित्राचे पारायण करण्यास सुरुवात केली.त्यानंतर त्यांचे मन शांत झाले.तसेच ते धार्मिक ग्रंथ वाचु लागले व अखंड राम नाव लिहून मारोतीरायांना अर्पन करु लागले.याच बरोबर पांडुरंगाचे शालेय शिक्षण ही सुरु होते.ते अतिशय खोडकर विद्यार्थी होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी मध्ये झाले व पुढील शिक्षणासाठी ते अहमदाबाद येथे गेले.पुढील शिक्षणही ते प्रथम श्रेणीत पास झाले.या शिक्षणाच्या काळातही त्यांची साधना अखंड सुरुच होती.रोज साधनेत विलक्षण अनुभूती येत असे व सद्गुरु माउलींच्या कृपेची प्रचिती येत असे.शिक्षण घेत असता पांडुरंगाची गांधीजींशी अनेकदा भेट झाली.त्यांना गांधीजींचे विचार आवडत असत.शिक्षणानंतर काही काळ पांडुरंगाने नोकरीही केली होती.त्यांच्या आईने ज्यावेळी लग्ना बद्दल त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी आईला स्पष्ट सांगितले की मी लहान भाऊ नारायण याचे शिक्षण होईपर्यंत घरात राहील आणि नंतर साधनेला निघून जाणार आहे.यावरुन त्यांना आपल्या जीवनाचे ध्येय स्पष्ट दिसले होते व भविष्यात आपला मार्ग कोणता याचाही दृष्टीकोण स्पष्ट झालेला कळतो.पुढे काही काळाने लहान भाऊ नारायणाचे शिक्षण पूर्ण झाले व त्यांना इंग्रजी शिक्षकाची नोकरी सुरु झाली.
त्यानंतर बापजींनी आपल्या आई कडे जाण्याची परवानगी मागितली.आईला हा वज्राघातच होता तरी त्यांनी आपल्या लाडक्या मुलाला होकार दिला व बाजींच्या दिव्य जिवन प्रवासाला आता खर्या अर्थाने सुरुवात झाली.आईला त्यांनी वर्षातून एकदा घरी येऊन तिनं दिवस राहण्याचे व दर महिन्याला पत्र लिहीण्याचे वचन दिले.त्यानंतर साईखेडा येथील धुनीवाले बाबाजी यांना शरणं जाऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे असा बापजींनी विचार केला.ते बाबाजींजवळ गेले व तेथे गेल्यावर बापजींना त्यांनी नर्मदा किनारी गेल्यावर तुझे काम होईल असे सांगितले.पुढे ते मार्गक्रमण करित करित नर्मदातिरावर येऊन पोचले.त्यांना एकाने नर्मदा किनारी नारेश्र्वराची जागा सुचवली. दोन-तीन व्यक्ती त्यांचेबरोबर त्यावेळी होते. त्या साधूस ही जागा पसंत पडली. त्याने आपल्या बरोबरच्या मित्रांना सांगितले की, “आज रात्रभर मी येथे राहतो. तुम्ही तुमचे घरी जा. ही जागा मला पसंत पडल्यास मी येथे वास्तव्य करीन. तुम्ही उद्या या. मी उद्या तुम्हाला निश्र्चित सांगेन.”
त्याची मित्रमंडळी आपल्या घरी परत गेली. बापजी तेथेच मुक्कामास राहीला.सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने ती जागा भयानक होती. आजूबाजूच्या ८-१० गावांची स्मशानभूमी येथे होती. पिशाच्चांचे तेथे वास्तव्य होते. उंचच उंच वृक्षांतून सूर्यकिरणे क्वचितच दृष्टोत्पत्तीस पडत होती. रात्री तर भयंकर अंधार असायचा. उजेड नाही. खोली किंवा पर्णकुटी नाही. दिवसा ढवळ्यासुद्धा लोक येथे येण्यास धजत नसत. त्यांच्या असे लक्षात आले की, हिंस्त्र प्राणी, विंचू, इंगळ्या, पाणविंचू, मोर, सर्प इत्यादी तेथे राजरोस फिरत असावेत. बापजींनी तेथे तशीच एक रात्र काढली. रात्री त्याला शंख फुंकण्याचे आवाज तेथे ऐकू आले. डमरूचे डम डम आवाज ऐकू आले. सुमधूर गायनाचा गंधर्वांचा कार्यक्रम चालू असून, त्यांचा उल्हसित करणारा आवाज, त्यांच्या कानावर ऐकू आला. साप-मुंगूस, मोर व साप हे जन्मजात शत्रू असलेले प्राणी तेथे गुण्यागोविंदाने एकत्र आनंदाने खेळत असलेले त्याला दिसले. मंदिरातील घंटेचे आवाज त्यास स्पष्ट ऐकू येत होते. वरील सर्व गोष्टींचा विचार करून देखील त्यांनी ठरविले की, आपण याच जागेवर तपश्चर्या करायची. येथेच उपासना, अनुष्ठान करायचे. दुसरे दिवशी त्यांचे मित्र नारेश्वरी आले. त्यांना बापजींनी सांगितले की, “मला ही जागा पसंत आहे. तपश्र्चर्येसाठी येथेच वास्तव्य करण्याचा माझा विचार आहे”. मार्गशीर्ष महिन्यात श्रीबापजी नारेश्वरच्या पवित्र भूमीवर वास करण्या करिता परतले.त्या काळी नारेश्वर निबीड अरण्य होतं.रतनलाल व दासकाका यांना परतवून बापजीं तेथील निवडुंगाखाली आसनस्थ झाले व त्यांच्या कठोर साधनेला सुरुवात झाली.एका झोपडीत राहून बापजींनी जवळपास आठ ते दहा महिन्यांचे अतिशय कठिण अनुष्ठान केले.पुढे दासकाका म्हणून बापजींचे स्नेही होते त्यांनी ही कुटीर पक्की बांधून घेतली.पुढे अवधूतांच्या वास्तव्याची चाहूल जनमानसात पसरली व जसे मधमाश्या पराग कन वेचायला फुलाजवळ येतात तसेच लोक बापजींकडे येऊ लागले.ज्या कडूनिंबाखाली बापूजींनी अनुष्ठान केले तो निंब ही गोड झाला.याच ठिकाणी बापजींना प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय प्रभुंचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते.अनेक लोक या कडूनिंबाचे दर्शन घेऊन दु:खमुक्त होऊ लागले.नारेश्वरी अवधूतांची अखंड तपश्चर्या आणि अनुष्ठान सुरु होते.ते कुणाशीही बोलत नसत.बापजींनी प्राणायामाचा अभ्यास ही नारेश्वरला पूर्ण केला.काही दिवसांनी थोरल्या महाराजांनी बापजींना १०८ दत्त पुराणांचे सप्ताह करण्याची आज्ञा केली.बापजींनी ते पारायणाचे अनुष्ठान पूर्ण केले.पण याचे उद्या पण कसे करावे या विवंचनेत बापजी असता श्री थोरल्या महाराजांनी त्यांना उद्यापन म्हणून १०८ दिवसांत नर्मदा परिक्रमा करण्याचं आज्ञा दिली.पण त्याआधी थोरल्या महाराजांनी बापजींना आदेश दिला की, "हे ब्रह्मचारी ,तु दक्षिण दिशेला जा.तुझी वाट गांडा (योगानंद महाराज) पहात आहे." पण गांडाबुवांची काहीही माहिती बापजींना नव्हती तरी ते गुरु आज्ञा प्रमाण मानून तसेच दक्षिणेकडे निघाले.पुढे तपास करता भरुचच्या एका भक्ता अडून बापजींना गांडा बुवांची माहिती मिळाली.ते काही काळात गांडाबुवांपुढे जाऊन पोचले.इकडे गांडाबुवांनाही थोरल्या महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितले होते की ब्रह्मचारी येतो आहे.दोघेही एकमेकांना चीर परिचीत असल्याप्रमाणे भेटले.पुढे गांडाबुवांनी "श्रीगुरुमूर्ती चरित्र" शुद्धीकरण करण्याची अडचण बापजींना सांगितली .बापजींनी ही शुद्धीकरणाची सेवा करण्याची तयारी दर्शवली व मग गांडाबुवा निश्चिंत झाले.पण त्याआधी आपण नर्मदा परिक्रमा पूर्ण करणार आहोत असे सांगून बापजी परिक्रमेला निघून गेले.हे परिक्रमा साधन रुपी उद्या पण बापजींनी यथासांग पूर्ण केले.या परिक्रमेत बापजींना भगवान वेदव्यासांचे दर्शन घडले होते.(बापजींच्या नर्मदा परिक्रमेवर एक लेख होईल इतका तो विलक्षण प्रसंग आहे.शब्दमर्यादेस्तव ते इथे लिहीता येणे शक्य नाही .)त्यानंतर ते पुन्हा गांडा महाराजांना येऊन भेटले.त्यांनी महाराजांजवळ राहून ते शुद्धीकरणाचे कार्य पूर्ण केले.यानंतर श्रीबापजी व गांडा बुवांचे एकमेकांवर निस्पृह प्रेम जडले.
बापजी सद्गुरु श्री साईनाथ महाराज शिर्डी यांच्याही दर्शनास जाऊन आले होते.गम्मत अशी की सर्वात पहिले मामांनी जी गुरुचरित्राची पोथी बापजींना दिली होती ती पोथी प्रत्यक्ष साईनाथांनीच बापजींच्या मामांना दिली होती.याच दरम्यान बापजींचा नावलौकिक सर्व गुजरातभर पसरला त्यांनी गुजरातीत हजारो पदे दत्तप्रभुंवर रचली.अनेक लोक त्यांच्या दर्शनाला आतुर झालेले असत.४ फेब्रुवारी १९३५ ला उत्तर गुजरात कलोल तालुक्यातील सईज या गावातील सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात श्री.कमलाशंकर त्रिपाठी नावाच्या एका भक्ताच्या धर्मपत्नी सौ. धनलक्ष्मीबाईना पिशाचपीडेतून मुक्त करण्याच्या अवधूतजींनी ५२ ओळींची जी स्तुती रचली तीच आपली श्रीदत्तबावनी. खरोखर तर सौ. धनलक्ष्मीबाई निमित्त करून अवधूतजींनी समस्त मानवजातीवर अहुतकी कृपा वर्षाविली आहे आणि आपल्याला हे अमोघ संकटविमोचनस्तोत्र प्राप्त झाले जे आज श्रीरंगपरिवारात आधि-व्याधि-उपाधीच्या निवारणासाठी दत्तबावनी निश्र्चितपणे फलदायी स्तोत्र ठरले आहे.पुढे कालांतराने बापजींच्या मातोश्री या ही नारेश्वरी येऊन राहिल्या.बापजी हे अनन्य मातृभक्त होते.त्यांनी आपल्या मातोश्री साठी नारेश्वरला उत्तम व्यवस्था केली.त्यांचे लहान भाऊ नारायण हे ही नारेश्वरला आले पण लवकरच त्यांचे देहावसान झाले.नारेश्वरी त्यानंतर दत्तकुटीर तयार झाली.लवकरच बरेच आश्रम ,धर्मशाळा बांधल्या गेल्या.महाराजांचे गुजराती शिष्य बापजींना उत्तम राजैश्वर्यात ठेवित पण बापजीं एक लंगोट लावून सदा आत्मचिंतनात निमग्न असतं.त्यांनी कधीही पैशांना ,धनाला स्पर्श केला नाही.पुढे पुढे तर भगवान रामकृष्ण परमहंस प्रमाणे त्यांना धनाला स्पर्श केला की त्रास होत असे.बापजींनी अनेक उत्सव साजरे करण्याची सुरुवात केली.दत्त जयंती, गुरुपौर्णिमा,गुरु प्रतिपदा, गुरुद्वादशी हे उत्सव तर अतिशय धूमधामित साजरा करित असत.अनेक नास्तिक लोकांना आस्तिक केले,कित्येकांना आधी व्याधी तून मुक्त केले,कित्येकाना दु:ख मुक्त केले,हजारो लोकांना सन्मार्गावर लावले.बापजींनी आपल्या उपास्य दैवत भगवानश्री दत्तात्रेय प्रभुंवर १९००५ ओव्यांचा अतिशय प्रभावी ग्रंथाची निर्मिती केली व दत्त भक्तांना अमृतच उपलब्ध करुन दिले.या ग्रंथाचे पारायण करुन अनेक भक्तांनी इहपारलौकिक कल्याण साधले आहे व साधत आहेत.बापजींनी गुजराती,मराठी व हिंदी भाषेत विपूल असे साहित्य निर्माण केले.हजारो प्रसादीक दत्त पदांचे वाचन ,गायन आज गुजरात मध्ये घराघरात केले जाते.पुढे जेष्ठ महिन्यात संवत २०२३ रोजी शुद्ध एकादशीस मातोश्री ब्रह्मलीन झाल्या.बापजींनी सर्व विधी यथासांग केला.प्रथम श्राद्धाच्या दिवशी जवळपास २०/२५ हजार लोकांनी प्रसाद घेतला. बापजींनी भक्तांसी अनेक तिर्थयात्रा केल्या.ते भक्तांना घेऊन गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर, पंढरपूर, अक्कलकोट वैगेरे अनेक ठिकाणी जाऊन आले.त्यांनी माणगावी श्री थोरल्या स्वामींच्या जन्मस्थानी अतिशय मोठ्या प्रमाणात दत्त जयंती साजरी केली होती.
असे भक्त उद्धाराचे प्रचंड मोठे कार्य श्रीबापजींनी केले.बापजींनी खर्या अर्थाने सर्व गुजरात दत्त भक्तीने आपल्या अवधूती रंगात रंगवून टाकला.
‘हम सदा नि:संगी हैं’ म्हणणारे बापजी आता निर्वाणीची भाषा करु लागले. १९६८ मधील ऑक्टोबर महिन्यात त्यांनी नारेश्वर सोडले ते कायमचेच. हरिद्वारला जावयाचे म्हणून बापजी प्रवासास निघाले.
अवधूतआश्रमाचे ट्रस्टी श्री. मोदीकाका, एक महान् भक्त, कार्यरत सेवक यांना काय कल्पना की, महाराजांचा पार्थिव देह येथे नोव्हेंबरमध्ये परत येणार आहे. नारेश्वर सोडताना महाराज म्हणाले, मी नारेश्वरी आलो तेव्हा एक लंगोटी अंगावर होती. आता जातानाही फक्त लंगोटी अंगावर आहे. सर्व वैभव, राजविलासी ऐश्वर्य सोडून ममत्व न ठेवता महाराज निघाले अनंतात विलीन व्हावयाला ! नारेश्वरनंतर अनेक गावी भक्तांना दर्शन देत देत गुरुद्वादशीला ते अरेरा गावी आले. नडियादजवळ हे गाव आहे. नंतर कापडगंज वगैरे गुजरातेतील गावांनंतर जयपूरला आले. एक भक्त म्हणाला, मी हरिद्वारला तुमच्याबरोबर येतो. महाराज म्हणाले, हरीच्या दारी गेलेला परत येत नाही. यावयाचे असेल तर या ! हरिद्वारला फक्त ४-५ भक्त बरोबर होते. सर्व तीर्थे बघितली. सकाळी साधूंना भोजन दिले. १९ नोव्हेबर, मंगळवारी १९६८ ला रात्री ९ वाजता भक्तांना सांगितले, घशात काहीतरी होत आहे. भक्त मंडळींना कल्पना येण्याच्या आधीच श्रीमहाराज श्रीदत्तचरणी विलीन झाले. लाखो भक्तांचा लाडका संत समाधिस्थ झाला. बडोदा, अहमदाबाद, नारेश्वरला ट्रंक लागले. त्याच दिवशी दिल्ली, अहमदाबाद, बडोदा रेडिओने बातमी दिली. अवघा गुजरात ढसढसा रडावयास लागला. रात्रभर भक्तांना चैन पडेना. श्रीमहाराजांचे अंतिम दर्शन कसे व्हावयाचे याची चिंता लागून राहिली. हरिद्वार शेकडो मैल दूर ! ट्रस्टींनी ठरविले की, महाराजांचा पार्थिव देह नारेश्वरी आणावयाचा ! काही मंडळी हरिद्वारला विमानाने गेली. दिल्लीहून अहमदाबादपर्यंत विमानाने आणले व अहमदाबाद ते नारेश्वर शृंगारलेल्या ट्रकवर आणून लाखो भक्तांना दर्शन दिले. अहमदाबाद, बडोदा, सुरत, नडियात, आणंद कडून दिवसभर २५ हजार भक्त आले. रात्री १२ ला नर्मदामाईच्या स्नानानंतर चंदनकाष्ठावर देह ठेवून अग्निसंस्कार केला. कडक थंडी, पण भक्तांचा महापूर लोटला होता. भक्तांना अंतिम दर्शन मिळाले. १२-१३ दिवसांपर्यंत लाखो भक्त नारेश्वरी य़ेऊन श्रद्धांजली वाहून गेले.
श्रीमहाराजांच्या प्रथम वर्षश्राद्धदिनी भक्तांनी सुंदर मंदिर बांधले आहे. मातृमंदिरासमोरच मातृभक्त पुत्राचे मंदीर ! श्रीमहाराज लौकिक अर्थाने समाधिस्थ झाले. पण भक्तांच्या ह्रदयात ते आहेत.आजही नारेश्वर च्या परमपावन पवित्र तप भूमीवर बापजींच्या तपाची उर्जा भक्तांना जाणवते.आजही अनेक भक्त नारेश्वर ला जाऊन मन:शांतीचा अनुभव घेतात.बापजींच्या अस्तित्वाची जाणिव आजही नारेश्वरी झाल्याशिवाय राहत नाही.अशा या महान दत्तयोगी सद्गुरु श्री रंगावधूत महाराज खर्या अर्थाने सर्व दत्त संप्रदायाचे अध्वर्यू आहेत.ही तोडकी मोडकी शब्दसुमनांजली बापजींच्या चरणी अर्पण करतो आणि आम्हा सर्वांना "श्वासे श्वासे दत्तनाम स्मरात्मन्" या त्यांच्या उपदेशाचे मर्म अंतकरणातून अनुभवायला मिळावे असा आशिर्वाद द्यावा,तसेच आचरण आम्हा सर्वांकडून घडावे ही श्रीचरणांशी कोटी कोटी प्रार्थना..
✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️
श्रीदत्त शरणं मम्🌿🙏🌸🌺
महाराज ज्ञानेश्वर माउली समर्थ 🌿🙏🌸🌺


No comments:
Post a Comment