#झाले_ब्रह्मरूप_ज्ञानदेव भाग ३-:
“नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्त ।।”
आज कार्तिक कृ्ष्ण त्रयोदशी आज करुणाब्रह्म कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य दिवस. आजच्याच तिथीला म्हणजेच शके बाराशे अठरा कार्तिक वद्य १३ गुरुवार आंग्ल दिनांक १५ ॲाक्टोबर इ. सन १२९६ या दिवशी संजीवन समाधी घेऊन आपले हे अलौकिक अवतार कार्य दृष्य रुपातून गुप्त केले. त्या वेळी माउलींचे वय होते २१ वर्षे ३ महिने व ५ दिवस. म्हणजे हा माउलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा. वयाच्या १५ व्या वर्षी भावार्थदिपीके सारखे ब्रह्मज्ञान प्रगट करणारा हा महायोगी , हा योगीराज , योगीयांचा शिरोमणी,योगीयांचा चक्रवर्ती सम्राट व आमच्या अनाथांचा मायबाप समाधीस्त झाला .खरंसांगू तर हा प्रसंग वाचतांनाही डोळे भरुन येत आहेत. माझ्यासाठी जीवनात माउलींचे समाधी प्रकरण व छत्रपती शंभु महाराजांचे देह ठेवणे हे दोन अत्यंत व्यथित करणारे व अगदी मन हलवून सोडणारे अत्यंत गंभीर ,दुःखद व शब्दांच्या कक्षेत न मावणारे प्रसंग आहेत. शंभु महाराजांचे शेवटचे ४० दिवस तर वाचणे ही अवघड. माउलींनी देह ठेवला तेव्हा “शांतीची पै शांती” असे वर्णन असलेले जगद्गुरु निवृत्तीनाथ ही कळवळले , त्यांच्या ही अश्रुंचा बांध फुटला . जिथे आपल्या लाडक्या ज्ञानेबांचे समाधीत जाणे परब्रह्म भगवान पांडूरंगाला ही सहन न झाल्याने ते ही दुःखाने व्याकुळ झालो तिथे माझ्यासारख्यांचे घुंगरड्याचे काय सांगावे ? आम्हा सर्वांसाठी तर आमच्या ज्ञानाबाई ,आमचे मायबापच आज स्थूल रुपाने अदृष्य झाले. संतकुळ शिरोमणी ज्ञानदेव हे जगातील एकमात्र पुरुष आहेत ज्यांना “माउली” असे संबोधले जाते.कारण ज्ञानोबा माझ्या तुमच्या सारख्या अज्ञानी जीवांच्या उद्धारासाठी अवताराला आले ,आपले संपूर्ण जीवन जे अवघे २१ वर्षाचे होते ते लोकोद्धारासाठी जगले, तुमच्या माझ्या सारख्या अज्ञानी जीवास भावार्थदिपीकेतून ,हरीपाठातून ज्ञानाचा अनुग्रह केला व आपले कार्य पूर्ण होताच समाधीत विश्वरूप झाले. माउलींनी आम्हालाला उद्धाराचा मार्ग दिला ,तो दाखविला व त्यावर चालण्याचा अधिकार दिला म्हणून ही आई आहे जिने प्रत्येकाला आपल्या करुणेच्या पदराखाली घेतले , प्रत्येकाचा उद्धारच केला व आज ही करित आहेत. असो आज आपल्याला माउलींच्या समाधी दिवसाचा प्रसंग बघायचा आहे.त्याचे स्मरण करायचे आहे.त्या दिवशी चे जे वर्णन भक्तशिरोमनी नामदेवरायांनी केले ते बघायचे आहे.
ज्ञानेश्वरीतून जगाला ब्रम्हविद्या सुलभ करुन दिली ,जगातील प्रत्येकाला ज्ञानाचा अधिकार देऊन उद्धाराचा मार्ग दाखविल्यावर , “आपले सर्व अवतार कार्य पूर्ण झाले आता मला सिद्धक्षेत्र अलंकापुरीस समाधी घेण्याची आज्ञा द्यावी” अशी विनंती ज्ञानोबाराय भगवान पंढरीनाथांकडे करतात.तेव्हा आपण स्वतः रुक्मिणी मातेसह आळंदीला ज्ञानोबांना समाधी देण्याकरिता येऊ असे भगवान पंढरीनाथांनी ठरवले. देवांच्या बरोबर तेव्हा त्यांचे सर्व पार्शद आले. गरुड -हनुमंत ,भक्त पुंडलिक -परिसा भागवत व नामदेवराय, देव -गंधर्व , ऋषी-मुनी ,सर्व संत मंडळींसह देव कार्तिक अष्टमीस आळंदीला येऊन पोचले.या सर्वांना घेण्यासाठी , तसेच देवांना सामोरे जाण्यासाठी सोपानदेव पुढे गेले. सोपानदेवांनी देवांना , माता रुक्मिणीस साष्टांग दंडवत घातला व ते सर्वांना घेऊन आळंदीत दाखल झाले.नामदेवरायांनी नारा ,विठा ,गोंदा ,महादा या आपल्या मुलांना समाधी सोहळ्यासाठी काय काय साहित्य लागते ते सर्व आणायला सांगितले. तेव्हा त्याचे प्रमाण व त्याची निवड काय करायची याचे मार्गदर्शन स्वतः भगवान पंढरीनाथांनी केली. आता आपला ज्ञानोबा समाधीस्त होणार या विचाराने ही नामदेवरायांना अपार दुःख होत होते.
( नामदेवरायांच्या मनःस्थितीचे वर्णन त्यांच्या समाधी प्रकरणात वाचल्यावर आपल्याला खरोखर त्या दुःखाची ,व्याकुळतेची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.) स्वतः भगवान पांडुरंगांनी सर्वांना सांगितले की आता दशमीला बाहेर प्रदक्षिणेसाठी निघून एकादशीला रात्रंदिवस हरिनामाचा जागर करा आणि त्यानंतर द्वादशीला पारणे करा. या वेळी स्वःता श्रीहरी सर्व सोहळ्यात ज्ञानोबाराय ,नामदेवरायांसह हजर होते. सर्वात दिव्य आणि अलौकिक बाब अशी की द्वादशीचे पारणे करण्यासाठी स्वतः माता रुक्मिणी ,गंगा , गिरीजा ,सत्यभामा या सर्व स्वयंपाकासाठी सिद्ध झाल्या .त्यांनी आपल्या या साऱ्या लाडक्या लेकरांसाठी विविध खाद्यपदार्थ केले. सर्व लोक इंद्रायणीवर स्नान करुन आले . सर्व वैष्णवांच्या पंक्ती पिंपळाच्या पाराजवळ बसविल्या. स्वतः भक्तवत्सल पांडुरंग परमात्मा सोवळे नेसून सर्व भक्तांना वाढायला लागले. देवांनी रुक्मिणी मातेला ज्ञानोबांच्या ताटात भरभरून वाढायला सांगितले. सर्वांचे जेवणे झाली ,या पंक्तीत देवांनी आपल्या हाताने ज्ञानोबांना भरविले व हे सर्व बघून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रु उभे राहिले.
त्यानंतर सर्व लगबगीने सिद्धेश्वरापाशी आले. देवांनी सिद्धेश्वराचा नंदी बाजूला करुन ज्ञानदेवांचे अनादी असे हे सिद्ध स्थान सर्वांना आधीच दाखविले होते. जेव्हा सर्व मंडळी आत गेली तर तिथे आधीच धुनी,आसन ,मृगाजिन अंथरलेले होते. भगवान श्रीहरी तेव्हा या स्थानाचे रहस्य प्रगट करुन नामदेवरायांना सांगतात की “हे माझेच सर्वात जुने असे समाधीचे स्थान आहे.” ज्ञानेश्वर माउली त्यानंतर आपले ज्येष्ठ बंधू व आपले सद्गुरु श्री निवृत्ती दादांपुढे हात जोडून उभे राहतात.निवृत्तीदादांनी आपल्या या लाडक्या ज्ञानोबाला प्रेमाने आलिंगन दिले. त्यांच्या भावनांचे बांध नेत्रावाटे वाहायला लागला. त्यांची हे ह्रद्य भेट बघून सर्वांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. भगवान परब्रह्म पंढरीनाथांनी सोपानदेव ,मुक्ताईला जवळ घेतले व ते त्यांचे सांत्वन करु लागले. त्यांनी ज्ञानदेवांना आश्वासन दिले की आम्हा स्वतः यांना ब्रह्मस्वरुपाला पोचवू. हे कार्य मी माझ्याकडे घेतो.( त्यामुळे ज्ञानोबांच्या समाधी या तिघाही भावंडांच्या समाधी वेळी भगवान पंढरीनाथ स्वतः हजर होते.)
पुढे गरुड - हनुमंत, मुक्ताई- सोपान, देव- साधूजन, सकल संत -वैष्णव पताक्यांचे भार घेऊन ज्ञानोबांच्या पुढे मागे चालू लागले. ज्ञानदेवांना मध्यभागी घेऊन मिरवणूक निघाली. टाळ ,मृदुंग,वीणे यांच्या साथीने गायन कीर्तन सुरु झाले.सर्व मंडळी आपल्या लाडक्या ज्ञानोबांना घेऊन समाधी विवराभोवती बसली. ज्ञानेश्वर माउली समाधी साठी सिद्ध झाले. तेव्हा एक नवल घडले. माउलींनी आपल्या हातातील एक काठी मातीत रोवली व ती रोवल्या बरोबर त्याला पालवी फुटली. ती काठी होती अजान वृक्षाची. ज्या काठीला पालवी फुटली तो आपण आज बघतो आहे तो अजानवृक्ष आहे. राही , रखुमाबाई , सत्यभामा यांनी ज्ञानोबांना ओवाळले.या प्रसंगी ज्ञानोबांनी देवांची पाद्यपुजा केली व ते पदतीर्थ प्राशन केले. त्यानंतर स्वतः भगवान पंढरीनाथांनी ज्ञानोबांची पाद्यपूजा केली व त्यांचे पदतीर्थ स्वतः प्राशन केले.भगवंतांनी भक्ताचे पदतीर्थ प्राशन करावे हा जगातील एकमात्र प्रसंग असावा.
नारा ,विठा,गोंदा,महादा या नामदेवरायांच्या पुत्रांनी ज्ञानोबाची भेट घेतली.विसोबा खेचर,चांगा वटेश्वर ,परसा भागवत सर्व संतांनी ज्ञानोबांना नमस्कार केला.या प्रसंगी सावता माळी महाराज,गोरोबा काका लहान लेकरासारखे तळमळत होते. ज्ञानदेवांनी समाधी स्थानाची प्रदक्षिणा केली. देवांनी व निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांचे दोन्ही हात धरले व आता ते समाधीत जाण्यासाठी सिद्ध झाले.हे दृष्य बघून सर्वत्र दुःखाश्रुंचा बांध फुटला. लहानगे सोपानदेव-मुक्ताईंना अतिशय दुःख झाले.देवांनी आपल्या प्राणसख्या ज्ञानोबांना समाधी स्थानी आसनावर बसविले. नंतर ज्ञानदेवांनी देवांना त्रिवार नमन केले आणि मग आपले डोळे झाकून घेतले. या प्रसंगांचे वर्णन करतांना नामदेवराय म्हणतात “नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्त॥” हा ज्ञानप्रकाश तेज सूर्य आज लोपला ,आज दृष्टीआड गेला . हा आमचा बाप ज्ञानदेव आज समाधिस्त झाला.
ज्ञानदेव समाधीस्त झाल्यावर पांडूरंग व निवृत्तीनाथ विवराच्या बाहेर आले .त्यानंतर समाधीची शिळा बंद करण्यात आली.सोपानदेव , मुक्ताईंनी नंतर जमिनीवरच अंग टाकले. निवृत्तीनाथांनी ही ज्ञानोबांच्या नावाने टाहो फोडला. देवांनी या सर्वांना पोटाशी धरले व सर्वांचे सांत्वन केले.आता लवकरच संवत्सरगावी म्हणजे सासवडला जाण्याचा संकेत या भावंडांना दिला. तेव्हा ही सर्व भावंडे शांत झाली. त्यानंतर सर्व इंद्रायणीवर आले , सर्वांनी आचमन केले. अमावस्येला गोपाळकाला करण्यात आला. हा सर्व सोहळा पाच दिवस झाला. त्यानंतर भगवान पंढरीनाथ व सर्व संत मंडळी आपल्या स्वस्थानी परतली. आपला प्राणसखा असलेल्या ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यामुळे भगवान पंढरीनाथ खुप व्याकूळ झाले.ते मंदिरात न जाता चंद्रभागेच्या काठी वनात जाऊन खिन्न वदनाने जाऊन बसले होते. ज्यांच्या समाधीमुळे भगवंतांनाही दुःख झाले अशा ज्ञानोबांची ख्याती आपण काय वर्णन करणार. खरं सांगू तर हे समाधी प्रकरण माझ्या कडून लिहीले जाईल का? हीच मला शंका होती पण त्या मायबाप ज्ञानोबांनी ही सेवा घडवून आणली .या लेखाचा शेवट नामदेवरायांच्या अभंगाने करतो.
( वेळे अभावी व शब्द मर्यादेस्तव हे समाधी प्रकरण अगदी थोडक्यात मांडले आहे.खरंतर संपूर्ण समाधी प्रकरणावर अनेक लेख होतील इतका तो विलक्षण आहे.) तरी ही मोडकी तोडकी सेवा ज्ञानाईच्या चरणी अर्पण करतो व इथेच थांबतो.
काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविले ॥१॥
कोठवरी वानूं याची स्वरुप स्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥
अविद्या मायेचा लागों नेदी वारा । ऐसें जगदोद्वारा बोलविलें ॥३॥
नामा म्हणे यांनीं तारिले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥
✍🏻🖋️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी


No comments:
Post a Comment