Sunday, February 13, 2022

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची १७७ वी जयंती.


 नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्तीं!!! 🙏🌺🌸🚩

              माघ शुद्ध द्वादशी प्रत्यक्ष मारोतीरायांचे अवतार,नामावतार सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची १७७ वी जयंती. श्री महाराजांचे नुसते स्मरण केले तरी सर्व जिवनपट हा डोळ्यापुढे तरळायला लागतो.महाराजांचे बालपण ,गुरुभेटीस्तव केलेला गृहत्याग, विविध अवतारी संतांच्या भेटी, सद्गुरु माउली तुकामाईंची भेट,परिक्षा , त्यानंतर तुकामाईंची पूर्ण कृपा ,तप,‌ गोंदवल्यात परतने ,तेथील विविध लिला,मातृ भेट,रामरायांचे आगमन , गृहस्थाश्रम,शिष्य परिवार, अन्न दान ,गोसेवा ,धाकट्या राममंदिराची स्थापना , महाराजांची दिव्य गुरुपरंपरा,अनन्य अशा ब्रह्मानंद बुवांची गुरुभक्ती,रामानंद बुवांचे अलौकिक चरित्र , प्रल्हाद महाराजांचे वैराग्य, तात्यासाहेब ते बेलसरे बाबांचे अतिशय मायाळू शब्द सर्व कसं एका परीकथे सारखं आश्चर्यकारक आहे.ही देव माणसं आपल्यात कधीतरी होऊन गेली, आपल्यासारखेच मानव देहात राहून गेली आणि हो तेही अगदी अलिकडच्या काळात यावर विश्वास बसत नाही."नामा शिवाय तरणोपाय नाहीच, कलियुगात नामस्मरण हीच कामधेनू आहे " या शास्त्रवचनाला सिद्ध करण्यासाठीच जणू मारोतीराय श्रीमहाराजांच्या रुपात अवतरले होते.

             श्रीमहाराजांचे चरित्र इतके विलक्षण आहे की यातला कुठला भाग मांडावा आणि काय वगळावे यांच्या विचारानेच मी पुरता गोंधळून गेलो.कारण ज्याला आपण ७/८ वर्षाचे बालपण म्हणतो त्या वयात श्रीमहाराजांनी प्रथम गृहत्याग केला,नंतर ९ व्या वर्षी परत त्यांनी गृहत्याग केल्याची हकिकत वाचली‌ तरी बुद्धी स्तिमीत झाल्या शिवाय राहणार नाही.गुरुभेटीस्तव इतक्या कमी वयात बाळ गणपतींनी संपूर्ण भारत पालथा घातला. कृष्णा-वारणा संगमापासून सुरु झालेला प्रवास पुढे मिरज येथील अण्णाबुवा, सटाणा येथील देव-मामलेदार,तेथून भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांच्याकडे ,तेथून हुमनाबादला माणिकप्रभु महाराजांकडे, या सर्वांनी आशिर्वाद दिल्यावर महाराज अबू पर्वतावर काही काळ राहले.तिथे महाराज योग शिकले व पुढे काशीस आले.तिथे तैलंग स्वामींचा आशिर्वाद भेट घेऊन अयोध्या आणि मग नैमिषारण्यात आले.नैमिषारण्यात काही काळ‌ व्यतित केल्यावर महाराज भगवान रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीसाठी कलकत्ता येथे आले.श्रीठाकुरांची भेट झाल्यावर महाराज दक्षिणेकडे वळले .तिथे त्यांना तुकामाईंकडे जाण्याचा आदेश झाला. श्रीमहाराजांचे वय या प्रवासात अवघे ११/१२ वर्षाचे होते.आपण नकाशा पुढे ठेऊन फक्त एकदा दृष्टीक्षेप जरी टाकला तरी लहानग्या गणपती बुवांनी गुरुभेटीस्तव केलेल्या या खडतर प्रवासाची प्रखरता आपल्याला लक्षात येईल. 

पुढे तुकामाईंची येहेळगावी झालेली भेट ,त्यांनी घेतलेली प्रखर परिक्षा आणि श्रीमहाराजांची विलक्षण गुरुसेवा हा तर श्रीमहाराजांच्या चरित्रातील‌ मेरुमणीच आहे.तुकामाईंनी घेतलेली परिक्षा इतकी विलक्षण आहे की वाचुनच आपला थरकाप उडतो.तुकामाईंनी वर्ष भर परिक्षा घेतल्यावर श्रीमहाराजांना अनुग्रह दिला .अनुग्रह देतांनी तुकामाईंनी श्रीमहाराजांना जो उपदेश केला तो पु.श्रीबाबा बेलसरे यांनी ज्या शब्दात लिहीलाय तो जसाच्या तसा पुढे देतो आहे. अनुग्रह देऊन तुकामाईंनी श्रीमहाराजांना सांगितले की, 

"प्रापंचिक लोकांना-विशेषत: मध्यम स्थितीतील लोकांना -आपल्या प्रपंचामध्येच परमार्थ कसा करावा हे शिकव.राममंदिराची स्थापना करुन राम नामाचा प्रचार कर.माझे महत्व वाढविण्यापेक्षा समर्थांचे महत्व वाढव.लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग दाखव.जे खरे दीन असतील त्यांची सेवा कर,आणि सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर." इतका उपदेश केल्यावर दोघेही परत घरी परतले.श्रीमहाराज आता गुरुकृपेने न्हाऊन निघाले होते.श्रीसद्गुरुंच्या कृपा अनुग्रहाने आता ते स्वत: सद्गुरु स्वरुप झाले होते. श्रीमहाराजांनी आपल्या सद्गुरुंचा हा उपदेश आपल्या संपूर्ण जिवन काळात तंतोतंत पाळला हे आपल्याला चरित्रातून लक्षात येईलच.पुढे अनुग्रहानंतर महाराजांनी सद्गुरुंच्या आज्ञेने तप करण्यासाठी हिमालयात प्रयाण केले.तिथे महाराजांनी प्रखर तप आचरले.तेथुन काही काळाने महाराज नैमिषारण्यात आले. श्रीमहाराज सलग दोन वर्ष नैमिषारण्यातील गुहेत साधनामग्न राहिले.इथेच त्यांची नानासाहेब पेशवे यांच्याशी भेट झाली.श्रीमहाराजांचे नैमिषारण्य हे स्थळ विशेष प्रिय होते. जिवनातील उत्तर काळात गोंदवले सोडून महाराज नैमिषारण्यातच जायला निघाले होते.हा प्रसंग सर्वश्रुत आहेच त्यावेळी रामराय,सितामाई आणि लक्ष्मणजींचे विग्रह रडल्यामुळे त्यांनी ते रहित केले.

               श्रीमहाराजांचे गोंदवल्यात परतने आणि पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश,प्रथम पत्नीचा मृत्यू पुन्हा दुसले लग्न आणि पुन्हा तुकामाईंचे दर्शन हा सगळा कथाभाग चरित्रात आला आहेच‌. श्रीमहाराजांच्या चरित्रातील माझा सर्वात आवडता भाग म्हणजे श्रीमहाराजांची व  ब्रह्मानंद बुवांची भेट.ब्रह्मानंदबुवा हे वेदमूर्ती ,शास्त्राभ्यासी आणि विद्वान म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते.त्यांनी या सर्वांचा केलेला त्याग व त्यांची महाराजांच्या चरणी असलेली अनन्य भक्ती ही एकमेवाद्वितीय आहे.तो भाग अतिशय चिंतनीय आणि आचरणीय आहे.ब्रह्मानंदबुवा हे श्रीमहाराजांपुढे कधीही अवाक्षर सुद्धा काढत नसत.आजही आपण श्रीमहाराजां समवेत असलेले ब्रह्मानंद बुवांचे छायाचित्र पाहिले तर ते प्रत्येक छायाचित्रात हात जोडून,खाली मान घालूनच उभे असलेले आपल्याला दिसतील.खरंच प्रत्येक गुरुभक्तासाठी किती चिंतनीय असा हा दृष्टांत आहे.श्रीमहाराजांचा अफाट असा लोकसंग्रह ,अचाट असे कथा प्रसंग आहेत,ज्यात त्यांच्या ठिकाणी झालेले मारोतीरायांचे दर्शन,थोड्याशा अन्नात हजारो लोकांना अन्नदान ,गोसेवा, मंदिर उभारणी व रामरायांचे आगमन अशा एक नाही तर हजारो लिलांचे भाग आहेत.प्रत्येक साधकाने तो भाग प.पू.बाबा बेलसरे यांनी लिहीलेल्या चरित्रात स्वतः वाचावा आणि त्याचा आनंद जरुर घ्यावा. एका लेखातून हे सर्व प्रसंग मांडणे केवळ अशक्य आहे.श्री महाराजांच्या चरित्रातुन त्यांनी दिलेली शिकवणीचे वाचन,मनन आणि चिंतन प्रत्येक व्यक्तीने आवर्जून केलेच पाहिजे कारण सर्व चरित्राचा ,लिलांचा तो गाभा आहे.

श्रीमहाराजांची शिकवण त्यांच्याच शब्दांत जशीच्या तशी  देतो आहे :-                 

              रामरायाला अनन्य शरण जाऊन अखंड त्याचे नाम घ्यावे.प्रत्येक माणूस या ना त्या मार्गाने समाधान शोधत असतो. पण सुख दु:खाचे हेलकावे देणे हा प्रपंचाचा मूळ स्वभाव असल्याने त्याच्या आहारी जाणाऱ्या माणसाला प्रापंचिक यश मिळून सुद्धा जीवनाच्या अखेर पर्यंत समाधान मिळत नाही. नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नाही. जनावरे देखील आपापला प्रपंच करतात. आपल्या खऱ्या स्वरूपाचा म्हणजे भगवंताचा विसर पडणे हे सर्व असमाधानाचे मूळ आहे. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली, तरच प्रपंचातील कष्टांचे सार्थक होते. असे श्रीमहाराजांचे अनुभवसिद्ध मत आहे.


अंत:करण शुद्ध होऊन पूर्ण समाधानाचा व खऱ्या आनंदाचा साक्षात्कार होण्यासाठी संताची संगत व भगवंताचे नाम हे दोनच उपाय प्रापंचिकाच्या पचनी पडतात. त्यातदेखील संताची संगत मिळणे व टिकणे कठीण असते. परंतु नामस्मरणाला कसलीही अट नाही, कसलेही बंधन नाही, त्यातच सत्संगती लाभते व भगवंताचे चिंतन आपोआप घडते. चिंतनातून अनुसंधान उदय पावते आणि अनुसंधान पक्के झाले की स्वत:च्या हृदयात भगवंताचे दर्शन घडते. हे श्रीमहाराजांच्या उपदेशाचे सार आहे.


प्रपंचामध्ये का होईना, पण निष्कपट प्रेम करावयास शिकणे हे भगवंतावर प्रेम करावयास शिकण्याची पहिली पायरी आहे. घरच्या माणसांना दीनवाणे व कष्टी कधी ठेवू नये, त्यांची आबाळ कधी करू नये, असे सांगून श्रीमहाराज म्हणत की ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही! नवराबायकोमध्ये, आईबाप व मुलांच्यामध्ये, भाऊबहिणींच्यामध्ये निष्कपट प्रेम असले तर त्यांना त्याचे विशेष कौतुक वाटायचे. सासू-सून प्रेमाने राहिल्या तर ते दोघींचीही स्तुती करीत. ’आपला परमार्थ हा प्रपंचात मिसळला पाहिजे. प्रपंच करीत असताना कर्तव्याची जागृती राखून त्यामध्ये भगवंताची अखंड स्मृती ठेवली तर कोणालाही समाधानाची प्राप्ति होऊ शकते.’ असे महाराजांचे सांगणे आहे.

श्रीमहाराज सांगत,’ बाळ, भगवंताने प्रपंचामध्ये ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवले आहे, तिच्यामध्ये समाधान मानावे आणि त्याच्या नामाला कधी विसरू नये. जो नाम घेईल त्याच्यामागे राम उभा आहे, नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो. एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.’

       अशा नामावतार श्रीमहाराजांनीच आपल्याला नामाची कास धरायची बुद्धी द्यावी, प्रपंच करतांना त्या रामराया चे अखंड स्मरण राहण्याची बुद्धी द्यावी आणि नामावर, सद्गुरु चरणांवर आपल्या सर्वांची निष्ठा उत्तरोत्तर वाढत जाऊन ती दृढ व्हावी हीच अखंड प्रार्थना श्रीमहाराजांच्या सुकोमल चरणी करतो.

✍✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

  

 जयाचा जनी जन्म नामार्थ झाला !

   जयाने सदा वास नामात केला !

   जयाच्या मुखी सर्वदा नाम र्किर्ती !

   नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मुर्ती !!


            !! जय जय रघुवीर समर्थ !!

🙏🌸|| श्रीराम जय राम जय जय राम || 🌸🙏

3 comments:

  1. सुरेख.. तुझे विचार, अभ्यास, चिंतन, मनन, संतांचरणी श्रद्धायुक्त लीनभाव नि यातून घडणाऱ्या लेखनरूपी सेवेमधून तुझी भक्ती आणि निष्ठा अशीच वृद्धींगत होवो हिच सदिच्छा 😊

    ReplyDelete
  2. खुप छान दादा असच आम्हाला मार्गदर्शन करावे

    ReplyDelete

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...