Wednesday, February 23, 2022

समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांचा १४४ वा प्रगटदिन🌸🙏🚩

 


अवतरलासी_भूवरी_जढ_मुढ_ताराया !!!

                                आज सकल संत चुडामणी, आमच्या विदर्भवासीयांचे आराध्य दैवत शेगांव निवासी,परब्रह्म, ब्रह्मांडनायक, भक्तवत्सल समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचा १४४ वा प्रगट दिन.आजच्याच पावन तिथीला सद्गुरु श्री गजानन महाराज हे शेगावच्या पावन भूमीवर प्रगट झाले आणि १४४ वर्ष लोटली तरी आजही आपल्या शरणागत भक्तांच्या हाकेला तात्काळ धावून जातात.आजही "आम्ही गेलो ऐसे मानु नका" या त्यांच्या वचनाचा सर्व लोक अनुभव घेत आहेत.


शेगांवी माघमासी। वद्य सप्तमी ज्या दिवशी।

हा उदय पावला ज्ञानराशी। पदनताते तारावया।।


श्रीदेवीदास पातुरकारांच्या वाड्याबाहेर माघ वद्य सप्तमी तिथीला हे संतचुडामनी अवतरले.श्रीमहाराज अवतरले तेव्हा ते अगदी तेजस्वी व तरुण होते. दासगणू महाराज लिहीतात , 

ऐन तारुण्याभीतरीं । गजानन आले शेगावनगरी । शके अठराशाभीतरी । माघ वद्य सप्तमीला ।।

                  फार पूर्वी शेगांव संस्थानाने प्रकाशित केलेला "श्रीगजानन चरित्र कोष" या ग्रंथात श्रीविवेक जी वैद्य यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व संशोधक पूर्वक असे मांडलेले आहे की श्री महाराज हे अगदी ७/८ वर्षाच्या कोवळ्या वयात परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या भेटीसाठी अक्कलकोट येथे गेले होते.स्वामी आज्ञेने तिथून ते सटाणा येथील थोर महापुरुष सद्गुरु श्री देव मामलेदार यांच्याकडे गेले.श्री सद्गुरु देव मामलेदार यांनी श्रीगजानन बाबांना नाशिकजवळील अपिलधारा या तिर्थावर तपाकरीता पाठवले.कपिलधारेवर श्रीमहाराजांनी विघ्नहर्ता विनायकाची स्थापना केली व पुढील १२ वर्ष तिथेच त्यांनी तप केले.हे स्थान आज गजानन महाराजांची तपोभूमी या नावाने प्रसिद्ध आहे.श्रीदेव मामलेदार यांच्या चरित्र ग्रंथांत हा सर्व कथाभाग आलेला आहे.आजही महाराजांच्या या तप:स्थलीवर श्रीगजानन महाराज संस्थानाने "तपोभूमी" नामक महाराजांचे भव्य दिव्य असे मंदिर व साधना भवन उभारले आहे. कपिलधारेवरील आपले तप पूर्ण करुन महाराजांनी आपल्या पुढील कार्यासाठी विदर्भ भूमि निवडली असावी असे वाटते. श्रीगजानन बाबा देहात असतांना सद्गुरु श्री साईनाथ महाराज शिरडी, सद्गुरु श्रीताजुद्दीन बाबा नागपूर,सद्गुरु श्रीशंकर महाराज पुणे, सद्गुरु श्री माधवनाथ महाराज चित्रकुट,श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज करवीर असे असंख्य अवतारी महापुरुष महाराष्ट्र सदेही उपस्थित होते ,एवढेच काय तर महाराजांचे त्यांच्याशी अतिशय प्रेमाचे व आदराचे नाते होते. विदर्भ भूमिला आपल्या पदस्पर्शाने पावन करण्यासाठी महाराजांनी ही भूमी निवडली व पुढे आजिवन आपले सदेह वास्तव्य याच भूमीत केले यावरुन याची कल्पना येते.महाराज तिर्थयात्रा सोडून कधीही विदर्भ सोडून इतरत्र गेल्याचे आढळत नाही.तरीही साईनाथ महाराज,माधवनाथ महाराज,ताजुद्दीन बाबा,रामानंद बिडकर महाराज,नाशिकचे गोपाळबुवा महाराज यांच्याशी त्यांचा पूर्वापार परिचय होता ,हे सर्व महाराजांना मोठ्या भावासारखा मान द्यायचे हे विशेष आहे.

                    गेल्या शतकात होऊन गेलेल्या लोकात्तर अध्यात्मिक महापुरुषांच्या मांदियाळीत सद्गुरु श्री गजानन महाराज हे अग्रगण्य आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.श्रीसद्गुरु गजानन बाबांचा भक्त परिवार हा महाराष्ट्रच काय तर भारतभर व जगभर विखुरलेले आहे. प.पू.श्रीदासगणू महाराजांनी लिहिलेला "श्रीगजानन विजय" नामक चरित्र ग्रंथ हा आम्हा सर्व भक्तांसाठी अमृतवल्लीच आहे. या ग्रंथात महाराजांच्या सर्व लिला अतिशय रसाळ ओव्यात शब्दबद्ध केलेल्या आहेत. श्रीगजानन बाबांच्या चरित्रा संबंधी विचार केला तर, सर्व लिला प्रसंग अगदी प्रगटदिना पासून ते समाधी लिले पर्यंत सर्वत्र एक समान दुवा आढळतो आणि तो म्हणजे महाराजांनी आपल्या प्रत्येक कृतीतून भक्तांना ,जगाला, संपूर्ण मानवजातीला काहीतरी शिकवणच दिली आहे. मग ते देविदास पातुरकरांच्या वाड्याबाहेर शिते वेचुन "अन्नम ब्रह्मेती" असो किंवा बापुना काळेला विठ्ठल दर्शन असो.प्रत्तेक कृतीत काहीतरी विशेष रहस्य असायचे.श्रीदासगणु महाराजांनी सद्गुरु बाबांच्या प्रगटीकरणावर फार सुंदर ओव्या रचल्या आहेत ,ते म्हणतात,

"त्या शेगांव सरोवरीं भले । गजानन कमल उदया आले । जें सौरभे वेधिते झालें । या अखिल ब्रह्मांडा ।।"

          खरंच श्रीगजानन महाराजांच्या या दिव्य प्रभेने सामान्य भक्तांनाच काय तर लोकमान्य टिळकांसारख्या युगपुरुषाला, सद्गुरु श्रीमाधान निवासी गुलाबराव महाराज, दत्तावतारी श्री टेंबे स्वामी महाराजांसारख्या जगविख्यात संतमंडळींनाही आपल्याकडे आकर्षित केले होते.ही काय सामान्य बाब नव्हे.असे अनेक संत मंडळींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महाराजांची भेट घेतली होती  किंवा त्यांच्या बद्दल प्रेम व्यक्त केलेले होते. त्यातील असाच एक दिव्य प्रसंग म्हणजे, 

श्रीगजानन बाबांनी ऋषी पंचमीला आपला देह अनंतात विलीन केला व ते वैश्विक देह धारण करते झाले.त्याच वेळी इकडे शिर्डीत सद्गुरु साई समर्थांनी जमिनीवर लोळण घेत दु:खाने आक्रोश केला होता."माझा भाऊ देह ठेऊन जातोय " म्हणून ते रडत होते.दुसर्या दिवशी त्यांनी आपले मुंडन केले व भक्तांकरवी नारळ फोडुन गुळ खोबरे वाटले होते.हा प्रसंग खुप काही सांगुन जातो.अकोट चे नरसिंग महाराज हे ही बाबांना मोठा भाऊ मानत असत.

                              आज श्रीगजानन बाबांचा प्रगट दिन त्यामुळे त्यांच्या चरित्राचे स्मरण करणे हे क्रमप्राप्त आहेच.मला बाबांच्या चरित्रातील भावलेले दोन‌ प्रसंग जे आजवर माझ्या जिवनातील पाथेयच झाले आहेत ते इथे मांडतो.पहिला म्हणजे बंकटलाल यांच्या शेतातील मका खाण्याचा प्रसंग आणि दुसरा बापुना काळे यांना श्रीमहाराजांच्या जागी झालेले विठ्ठल दर्शन.हे दोन्ही प्रसंग सर्वांनाच माहिती आहेत असे मी गृहीत धरतो म्हणून ते सविस्तर वर्णन करत नाही.तरी यातील जो भाग मला भावला तो मांडतो. श्रीमहाराज जेव्हा बंकटलालच्या विनंतीला मान्य करून त्याच्या शेतात मक्याची कणसे खाण्यास जातात.कणसे शेकोटीवर भाजतांनी वरील गांधील माशीच्या पोळातील माशा उठतात व तो पूर्ण जत्था तेथील माणसांवर हल्ला करतो.त्यावेळी श्री महाराज तेथे अगदी निवांतपणे बसलेले असतात.कुणीही महाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न ही करत नाहीत.सर्व आपल्याला माशी चावणार नाही यासाठी धडपडत असतात.या सर्व प्रकारात एकमात्र बंकटलाल मनातुन दु:खी होतो व श्रीमहाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो.श्रीमहाराजांनाही त्याच्या मनातील शुद्ध भावाची जाणिव होते व ते त्या माशांना पुन्हा आपल्या जागेवर जाण्याची आज्ञा करतात.त्यावेळी श्रीमहाराज बंकटलालला उपदेश करतात तो खरच चिंतनीय असा आहे.श्रीमहाराज म्हणतात, 


" अरे ते जिव विषारी । बैसले माझ्या अंगावरी । माझ्यापासून झाले दूरी । लड्डूभक्त येधवा ।।२८।।

 याचा करी विचार । संकट आल्या कोणावर । 

कोणी न साह्य करणार । एका ईश्वरावाचुनी ।।२९।। "


              या दोन ओव्यात संपूर्ण जिवन प्रवासाचा सारचं सांगितला आहे.जिवनभर आपण कुठल्यातरी व्यक्तीसाठी,गोष्टीसाठी आसक्त असतो.त्या आसक्तीने आपला विवेक आणि अमुल्य असा वेळ आपण गमावून बसतो आणि एक दिवस जरा,व्याधीने ,संकटाने ग्रासल्यावर लक्षात येतं की 'माझा माझा' म्हणून मी ज्या नश्वर गोष्टींसाठी बेधुंद झालो होतो ,ज्या ऐहीकाच्या मागे जिवनभर वेळ व्यर्थ घालवला‌ ते सर्व संकटकाळी आपल्या सोडुन गेलेले असतात.कुणीही आपल्यासोबत संकटकाळी नसतात.हा अनुभव प्रत्येकाच्या जिवन प्रवासात कधीतरी आलेला असतोच आणि हे माहिती असुनही आपली बुद्धी भगवंतांच्या ,ईश्वराच्या चरणी वळवण्याची इच्छा कुणीही करत नाही.फक्त लड्डू भक्तासारखे त्यांच्याकडुन काहीतरी मिळवण्यासाठी आपणं फक्त मंदिराचे उंबरे झिजवत असतो. 

दुसरा प्रसंग श्रीगजानन महाराज आपल्या शेगांवच्या भक्त मंडळींसमवेत जेव्हा आषाढी वारी करीता पंढरपूर येथे गेलेले होते.त्यावेळी बापुना काळे या गरीब भक्ताची चुकामुक झाल्यामुळे त्याला पांडुरंगाचे दर्शन घडतं नाही.दर्शन न झाल्यामुळे तो अतिशय खिन्न व उदास अंत:करणाने दिवसभर बसून असतो.सर्व लोक त्याची टिंगल टवाळी करत असतात आणि श्रीमहाराज खोलीतील त्यांच्या आसनावरून हा सर्व प्रकार बघत असतात. बापुनांच्या मनातील शुद्ध भक्ती,शुद्ध भाव बघून महाराज त्याच्या पुढे उभे राहतात व त्याला आपल्या ठिकाणी विठुरायाचे तेच मंदिरातील सगुण रुपाचे दर्शन घडवतात. आता यापुढे जेव्हा इतरही भक्त त्यांना असे दर्शन घडविण्याची विनंती करतात तेव्हा त्या सर्वांना महाराज म्हणतात,


ऐसें ऐकतां भाषण । बोलते झाले गजानन ।

बापुनासारिखें आधीं मन । तुम्ही करा रे आपुलें ॥४९॥ते

 तसें झाल्यावरी । दर्शन घडवीन निर्धारीं ।

ही दर्शन वस्तु खरी । काय मिळे बाजारांत ? ॥१५०॥

 म्हणून ती आणून । देऊं तुम्हांकारण ।

निष्पाप करा आधीं मन । तरीच पुढचें घडेल हें ॥५१॥

                    

                    संपूर्ण परमार्थाचे सार यात आले आहे.वरील प्रसंग पाहता एक गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे तेथील सर्व लोक आधीच पांडुरंगाचे दर्शन करुन आले होते पण महाराज म्हणातात, "निष्पाप करा आधी मन" मनात पाप ,इर्षा , द्वेष ,कपट आणि ढोंग करुन केलेली प्रत्येक कृती ही फक्त बाह्य दिखावाच ठरतो मग ती पुजा असो,जप असो,देव दर्शन असो वा आणखी काही साधन असो.बापुनासारखे निष्पाप मन झाले तर प्रत्यक्ष भगवंतही पुढे उभे राहतात.हीच गोष्ट भगवान रामकृष्णांनी आपल्या भक्तांना सांगितली होती ,'तुमचे मन आधी निष्पाप करा ,लहान बाळ आपल्या आईच्या भेटीसाठी ज्या आकांताने रडतो ,त्याच्या मनात आईच्या भेटीशिवाय इतर कुठलाही भाव नसतो ,तसे निष्पाप अंतःकरणाने जर भक्ताने भगवंताला आळवलं तर तो धावुन येतोच यात शंका नाहीच." सर्व संतांनी एकमुखाने याची ग्वाही दिली आहे. महाराज म्हणातात परमार्थ हा काही व्यापार नव्हे, मी पाच वार्या करेन,एक नारळ चढवेल,अमुक दक्षिणा देईल ,अमुक पुजा करेन आणि मग भगवंत मला दर्शन देतील ,कृपा करतील तर हे अशक्यप्राय आहे. कारण जोवर बापुना सारखे शुद्ध ,निष्पाप मन होत नाही तोवर सर्व बाह्य अवंडंबराशिवाय काही नाही.

                          खरंतर महाराज सर्वांचेच आहेत , त्यांना महाराष्ट्र,भारत अशा प्रांतात आपण वाटु शकत नाही.ते या अखिल ब्रह्मांडाचे नायक आहेत.तरीही आम्हा विदर्भीय लोकांसाठी श्रीगजानन महाराज हे आराध्य दैवतच आहेत.लग्न झालं की आधी गजानन बाबांचे दर्शन ,बाळ जन्माला आलं की पहिलं दर्शन बाबांचे, सुट्टीत देवदर्शन म्हणजे आधी शेगांव, घरातील मुख्य संत ज्यांना आम्ही महाराज न म्हणता आमचे बाबाच मानतो ते म्हणजे गजानन महाराज.कुठल्याही शुभ प्रसंगी महिला मान तो गजानन बाबांनाच. आता ही एक पद्धत न राहता हा एक संस्कारच झाला आहे.

आज प्रगटदिनाला आणि ऋषीपंचमीच्या दिवशी अगदी गल्लीबोळात ठिकठिकाणी महाप्रसाद, पुजा , पारायण , उत्सव असतो. आम्हाला देव ,संत हे कळतही नव्हते तेव्हापासून ते आपल्या घरातील एक व्यक्ती आहेत ,आपले बाबा आहेत हा विचार नकळत आम्हा सर्वांच्या अंतर्मनावर बिंबविल्या जातो.तो एक भावनीक संस्कराच मनावर अधिराज्य करतो आणि हे सर्व देव व संतांच्या बाबतीत नसुन श्रीमहाराजांच्याच बाबतीत आहे हे विशेष.सर्व संतामध्ये बाबा म्हणजे कुठेतरी माझे हक्काचे आहेत हा भाव प्रत्येक विदर्भवासीयाच्या मनात असतोच. अशा या परब्रह्म भगवंतांचा आज १४४ वा प्रगट दिन आणि याच परमपावन तिथीचे महात्म्य आमच्यासाठी द्विगुणित झाले आहे कारण दत्तसंप्रदायातील अतिशय विलक्षण थोर संत भक्तवत्सल भक्तभिमानी सद्गुरु माउली श्रीशंकुतला ताई आगटे यांची ही पुण्यतिथी.याच तिथीला प.पू सद्गुरु श्री शका ताई आपल्या निजधामास गेल्या.आज मातोश्री ताईंचे ४ थे पुण्यस्मरण.सद्गुरु ताईंच्या ,समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबांच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि त्यांनी आपल्या सर्वांना सद्गुरुप्रदत्त मार्गावर चालण्याची बुद्धी द्यावी हीच प्रार्थना करतो           ✍️✒️त्यांचाच अक्षय जाधव आळंदी/वाशिम ✍️✒️




.

1 comment:

  1. खूपच सुरेख भावूक अभिव्यक्ती, अंतःकरणात भिडणाऱ्या भावना आणि लिखाण , अश्रू अनावर होतात वाचताना

    ReplyDelete

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...