Thursday, February 24, 2022

"दासनवमी" समर्थांची ३४० वी पुण्यतिथी 🙏🚩🌺🌸

 

आज दासनवमी समर्थांची ३४० वी पुण्यतिथी :-

                                     महाराष्ट्रातील संत परंपरेतील अग्रगण्य असलेले युगपुरुष ज्यांनी जगाला परमार्थाच काय तर प्रपंच ही नेटाने कसा करावा हे शिकविले.ज्यांनी जगाला धर्माचे पालन करणे तर शिकविलेच पण त्याबरोबर धर्म रक्षणासाठी हातात वेळे प्रसंगी शस्त्र घेऊन धर्मरक्षणाचा धडा ही दिला.समर्थांबद्दल म्हटले जाते की ज्यांचे शुक महामुनींसारखे पूर्ण वैराग्य आहे,जे वसिष्ठ महामुनींसारखे महाज्ञानी आहेत,ज्यांचे कवित्व हे वाल्मिक ऋषींसारखे सर्वमान्य आहे आणि या सर्वांची प्रचिती आपल्याला समर्थांच्या चरित्रातून येतेच येते.अतिशय विलक्षण अशा समर्थ चरित्राचे चिंतन केल्यावर लक्षात येईल की  धर्मकार्यासाठी , धर्मरक्षणासाठी स्वतः मारोतीरायच समर्थरुप धारण करते झाले होते. बालपणीच समर्थांना प्रभु श्रीरामरायांचा झालेला अनुग्रह, बालपणीच केलेला गृहत्याग,समर्थांचे बुद्धी थक्क करणारे अनुष्ठान,मारोतीरायांचे दर्शन ,अचाट असा भारत प्रवास ,विलक्षण असे धर्मकार्य ,एकमेवाद्वितीय असा 'दासबोध' सर्वांचे अवलोकन केल्यावर समर्थांच्या अवतार कार्याची पुसटशी कल्पना येईल.आज समर्थांची ३४० वी पुण्यतिथी.एवढा प्रदिर्घ काळ लोटला तरी दासबोध ,आत्माराम ,मनाचे श्लोक या सर्व रुपात समर्थ नित्य आपले कार्य करीत आहेत. समर्थांच्या कृपेची प्रचीती आजही प्रत्येक भक्ताला येतेच, अगदी अलिकडच्या काळात भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांना समर्थांनी प्रत्यक्ष प्रगट होऊन अनुग्रह दिला होता.समर्थांच्या निर्वाणानंतर समर्थ रोज उद्धवस्वामी, कल्याणस्वामी आणि अक्काबाई यांना मानसपुजेवेळी समर्थांचे दर्शन होत असे अशी नोंद आहे.

समाधी प्रकरण :-
                     जेष्ठ बंधू श्रेष्ठ श्री गंगाधर स्वामींचे महानिर्वाण,पुढे संत वेणाबाईंचे निर्वाण व त्यानंतर छत्रपती शिवरायांचे निर्वाण या तिन्ही घटना काही काळाच्या अंतरावर घडल्या.अंताजी गोपाळ कुडाळकर हे शिवाजी महाराजांच्या पदरी वाकेनीस होते त्यांनी एक अद्भुत नोंद करुन ठेवली आहे.इ.स १६८० साली माघ पौर्णिमेला शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी सज्जनगडावर येऊन गेले होते.गृहकलहाने महाराज फार व्यथित झाले होते व त्यातुन बाहेर पडण्यासाठी ते समर्थ दर्शनाला आले होते.त्या दिवशी महाराज समर्थांच्या शेजघरात समर्थांच्या समोर ध्यानाला बसले.तीन तास शिवाजी महाराज ध्यानस्थ होते.समर्थांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना देहबोधावर आणले.शिवाजी महाराज प्रसाद घेऊन रायगडावर निघाले तेव्हा समर्थ त्यांना पोचवायला महाद्वारापर्यंत गेले.महाराज निघून गेल्यावर समर्थांच्या डोळ्यात अश्रू आले.समर्थांशेजारी उभे असलेल्या उद्धव स्वामींनी याचे कारण विचारले तेव्हा समर्थ म्हणाले, "राजा शिवाजी भोसले यांचा अंतकाळ जवळ आला आहे." उद्धव स्वामींनी विचारले "किती दिस?" समर्थांनी उत्तर दिले , "साठ दिस" या घटनेनंतर बरोबर साठाव्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या पावन दिनावर दुपारी बारा वाजता शिवछत्रपतींनी देह ठेवला.
                       शिवरायांच्या निर्वाणानंतर समर्थांना विलक्षण दु:ख झाले.त्यांनी त्यानंतर अन्न-पाणी वर्ज्य केले. गिरीधर स्वामी लिहीतात-

समर्थ स्वप्रकाशे अंधारी तीन मास बैसताती ।
मरुमपात्रे उदके सेविताती ।
शकलपात्रे घेऊनी धावताती ।
अरण्याकडे दुश्चीन्हे ।।
                   याचा अर्थ शिवराय गेल्यानंतर समर्थ तिनं महिने कुणालाही भेटले नाही.ते अंधारात बसून आत्मचिंतन करत राहीले.मातीच्या भांड्यातून पाणी पिऊ लागले.परळीत भिक्षेसाठी गेले तर फुटके भांडे बरोबर नेत.लहानपणापासून समर्थांना विश्वाची चिंता लागली होती आणि शिवराय हे या चिंतेवरील उपाय होते.अवघ्या पन्नासाव्या वर्षी शिवाजी महाराज गेले याचे अतिशय तिव्र दु:ख समर्थांना झाले होते यात शंकाच नाही.त्यानंतर समर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना गद्य व पद्य असे पत्रव्यवहार केलेले आहेत.त्यात त्यांनी स्वराज्या संदर्भात श्रीशंभूराजांना मार्गदर्शन केले व चाफळ येथील उत्सवासंदर्भातही कळविले. यानंतर समर्थांनी देह त्याग करण्याचे ठरविले.ते रामरायांचा निरोप घेण्यासाठी चाफळला आले.रामरायांचे दर्शन निरोप घेऊन समर्थ गडावर परतले.देहत्यागाच्या पंधरा दिवस अगोदर आपल्या शिष्यांसमवेत ते बसले होते.त्यांनी एका श्लोकाचे चरण मोठ्याने म्हटले -

रघुकुलटिळकाचा वेध सन्निद्ध आला ।
तदुपरी भजनाचा पाहिजे चांग केला ।।

उद्धावाने हा श्लोक ताबडतोब पूर्ण केला -

अनुदिन नवमी हे मानसी आठवावी ।
बहुत लगबगीने कार्य सिद्धी करावी ।।
             उद्धव स्वामींनी समर्थ देह लवकरच ठेवणार हे ओळखले.सगळे शिष्य या विचारानेच व्याकुळ झाले होते.समर्थांनी तंजावर येथील अरणीकर नावाच्या अंधळ्या कारागिराला दृष्टी देऊन राम,लक्ष्मण,सीता व हनुमान या चौघांच्या पंचधातूच्या मूर्ती करायला सांगितल्या होत्या.त्या मूर्ती माघ वद्य पंचमीस सज्जन गडावर पोचल्या.देहत्यागापूर्वी पाच दिवस आधी रामराय गडावर आले हे पाहून समर्थांना खुप संतोष वाटला.त्यांनी आशिर्वाद दिला की जो कुणी मनोभावे या रामाची सेवा करेल त्याचे कल्याण होईल.हळूहळू समर्थांनी अन्नपाणी वर्ज्य केले.शरीर थकत चालले होते.समर्थ मौनात प्रवेशले होते.देहत्यागापूर्वीच त्यांनी आपल्या आवडत्या शिष्य कल्याण स्वामींना आपल्या पासून दूर पाठवले होते.माघ वद्य अष्टमीला समर्थांच्या मुखातून दोन गुढवाक्ये बाहेर पडली . ते म्हणाले १) देवद्रोहीयांचा नाशचि आहे.
२) समुद्रतीरस्थांचा नाश आहे.
समर्थ देह ठेवणार याची कुणकुण अनेक ठिकाणी पोचली होती आणि त्यामुळे समर्थांच्या दर्शनासाठी सज्जनगडावर गर्दी झाली होती.समर्थांनी कुणालाही जवळ येऊ दिले नाही.ते शेजघरातून बाहेर पडले नाही.योगायोगाने तंजावर मठाधिपती भीम स्वामी समर्थांच्या अंतकाळी गडावर होते.त्यांनी तो प्रसंग अतिशय सुंदर ५० ओव्यात लिहून ठेवला आहे.त्याचा भावार्थ मांडतो.
शनिवार ,माघ वद्य नवमी दिवस उजाडला,ज्या दिवशी दोन प्रहरी समर्थांनी स्वधामी प्रयाण केले.समर्थ पलंगावरुन उतरले,त्यांनी आपल्या खडावा परिधान केल्या,आणि उत्तरेकडे तोंड केले.भक्त म्हणू लागले की पलंगावर बसा,पण समर्थ म्हणाले, "आता माझ्याच्याने तिथे बसणं होणार नाही तुम्हाला शक्य असल्यास मला तिथे नेऊन बसला." समर्थांनी असे म्हटल्यावर दहा सशक्त शिष्य पुढे आले आणि समर्थांना उचलायचा प्रयत्न करु लागले पण समर्थ जागचे तुसभरही हलले नाहीत.शेवटी दमून ते शिष्य बाजुला झाल्यावर समर्थ त्यांना म्हणाले , "बाहेर जाऊन बसा.अनेकांनी जे‌ जे काही प्रश्न विचारले त्यांची उत्तरं मी पूर्वीच दिली आहेत,आता सांगण्यासारखे माझ्याकडे काहीच राहिलं नाही.पण ,माझं  हे शरीर आणि माझी वाणी गेली तरी मी इथेच ,या जगात कायम आहे हे लक्षात ठेवा.आत्माराम आणि दासबोध ही माझीच सगुण रुप आहेत हे ध्यानात ठेवा.तेव्हा मी नसल्याचा खेद कुणीही करू नका." यानंतर समर्थांनी तीन वेळ रामनामाचा घोष केला.त्यांच्या पाठोपाठ भक्तांनीही जयघोष केला याने सारा आसमंत रामनामाने दुमदुमून गेला.समर्थांची प्राणज्योत शरीरातून बाहेर पडली‌ आणि तंजावरहून आणलेल्या राममूर्तीत प्रविष्ट झाली.दुपारी साडेबारा वाजता समर्थांनी देह ठेवला.समर्थांनी देह ठेवला ही बातमी सर्वत्र पोचली.संभाजी महाराज आणि दिवाकर गोसावी रात्रीतून निघाले‌ व सकाळी सज्जनगडावर पोचले.मठाच्या उत्तरेला एक खड्डा होता,तिथली स्थलशुद्धी करुन ,तिथे बिल्वदल ,तुलसी पत्रे,चंदन ,तुलसीकाष्ठे व इतर सुवासीक द्रव्यांनी चिता तयार करण्यात आली.उद्धव स्वामींनी समर्थांना अग्नी दिला. छत्रपती संभाजी महाराजांनी समर्थांचे अंतिम दर्शन घेतले व गडावर भलेमोठे राममंदिर  बांधण्याचे आपले वचन पूर्ण केले.तिसर्या दिवशी अस्थी गोळा करण्यासाठी शिष्य जमा झाले तेव्हा समर्थांची स्वयंभू समाधी आपोआप जमिनीतून वर आली.खाली समर्थांची समाधी व वरती तंजावरहून आणलेल्या रामाआदी मूर्तींची स्थापना करण्यात आली.हे सर्व बांधकाम छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधले आहे.
                    समर्थांच्या निर्वाणाची बातमी परांडा येथे कल्याण स्वामींना जाऊन धडकली.हे कळताच एखाद्या वार्यासारखे अतिशय दु:खी अंत:करणाने कल्याण स्वामी सज्जनगडावर दाखल झाले.कल्याण स्वामी समाधीसमोर आले व धाय मोकलून रडू लागले.समर्थांनी आपल्या देहत्याची आधी कल्पनाही आपल्याला देऊ नये याचे त्यांना फार वाईट वाटले.जोपर्यंत सगुण दर्शन होत नाही तोपर्यंत अन्न पाणी घ्यायचे नाही असा त्यांनी निश्चय केला.त्यांचा तो दृढनिश्चय पाहून समर्थ समाधीतून प्रगट झाले.त्यांनी कल्याण स्वामींना दर्शन दिले.कल्याण स्वामींची समजूत घालून समर्थ पुन्हा समाधीमध्ये प्रविष्ट झाले.कल्याणस्वामींनी समाधीचे दर्शन घेऊन सज्जनगड सोडला तो नंतर ते पुन्हा कधीही गडावर आले नाहीत.कारण त्यांच्या हृदय सिंहासनावरच प्रत्यक्ष समर्थांना बसवून ते परतले होते यात शंका नाही. अशा समर्थांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्याच अखेरच्या संदेशाचे स्मरण आपण सर्व करुयात

माझी काया आणि वाणी । गेली म्हणाल अंत:करणी ।
परी मी आहे जगज्जीवणी । निरंतर ।।
आत्माराम दासबोध । माझे स्वरुप स्वतः सिद्ध ।
असता न करावा हो खेद । भक्तजनी ।।
नका करु खटपट । पहा माझा ग्रंथ नीट ।
जेणे सायोज्यतेचि वाट । गवसेल की ।।
             समर्थांच्या या वचनाप्रमाणे दासबोध आत्मारामाचे चिंतन करण्याची सद्बुद्धी आपल्या सर्वांना मिळो , समर्थांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा आपल्याला समर्थ चरित्रातून मिळत राहो हीच प्रार्थना श्रीरामरायांच्या आणि समर्थांच्या चरणी करतो.
✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️

#जयजयरघुवीरसमर्थ 🙏🌸🚩
#श्रीरामजयरामजयजयराम 🙏🌸🚩
#श्रीदत्त_शरणं_मम 🙏🌸🚩


2 comments:

  1. *दास डोंगरी राहतो।*
    *उत्सव देवाचा पाहतो।।*
    *🙏🏻जय जय रघुवीर समर्थ🚩*
    *श्री समर्थ रामदास स्वामींना त्रिवार वंदन🚩🙏🏻*

    ReplyDelete

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...