![]() |
| उमदीश्वर श्रीगुरु महाराज |
चैत्र_शुद्ध_नवमी_रामनवमी_समर्थ_सद्गुरु_श्रीभाऊसाहेब_महाराज_उमदीकर_यांची_१७८वी_जयंती:-
भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज आपल्या एका प्रवचनात भारत भूमी चे महत्व प्रतिपादन करतांना म्हणतात की," ज्याप्रमाणे घरात एक देवघर,देवपाट असतो त्याप्रमाणे ही भूमी या सबंध जगाचे देवपाट आहे." या पुण्यभूमीत असंख्य संत,सिद्ध,महासिद्ध, महापुरुष,अवतार आजवर होऊन गेले.अनेक गुरुपरंपरेनी ही भुमी मंडीत झाली आहे.त्यातीलच एक श्रेष्ठ आणि दिव्य परंपरा म्हणजे निंबर्गी परंपरा आणि त्या निंबर्गी परंपरेचे आधारवट म्हणजे समर्थ सद्गुरु श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर.सर्वच संत सत्पुरुष हे नित्य वंदनीय,नित्य स्मरणिय असतातच पण प्रत्येकाच्या मनामध्ये काही संतांची विशेष छाप पडलेली असते.तशीच काही संतांच्या विलक्षण चरित्राची गहरी छाप माझ्या मनावर पडली आहे त्यातीलच एक संत म्हणजे भाऊसाहेब महाराज.अतिशय दिव्य चरित्र,अनन्य गुरुनिष्ठा ,अत्यंत नामनिष्ठा, अगदी सामान्य जिवन पण असामान्य व्यक्तिमत्व अशा अनेक गुणांनी मंडित असलेले भाऊसाहेब महाराजांचे चरित्र वाचल्यावर कुणीही स्तिमीत झाल्याशिवाय राहणार नाही.अतिशय लोकविलक्षण महापुरुष असलेल्या महाराजांची नामावरील निष्ठा,श्रद्धा ही एकमेवाद्वितीयच आहे.खरंतर चरित्रावर लिहीतांनी अंतिम संदेश हा शेवटी लिहायचा असतो पण मी मुद्दाम तो आधी लिहीतोय कारण त्या एका वाक्यातुन महाराजांनी आपल्याला परमार्थाचे सारंच सांगितले आहे.महाराज म्हणतात "आकाशातून वीज कडाडून अंगावर कोसळली,धरणी दुभंगली ,आकाश कोसळले, तरी तुम्ही नाम सोडू नका." आपल्या संपूर्ण जिवन कालात महाराजांनी हीच एकमात्र शिकवण ,हेच तत्व ,याचेच प्रात्यक्षिक केल्याचे आपल्याला दिसेल.महाराजांनी हे फक्त सांगितले नाही तर महाराजांनी याचे स्वतः आचरण करुन दाखविले.आपल्याला सर्वश्रुत असलेले,महाविद्वान व भारतातील सर्वमान्य महापुरुषांपैकी एक असलेले श्री गुरुदेव रानडे हे सद्गुरु भाऊसाहेब महाराजांचेच शिष्य.
प.पू.श्रीभाऊसाहेब महाराजांचा जन्म शके १७६५ इ.स १८४४ ला रामनवमी च्या परमपावन पुण्यदिनी उमदी या गावी झाला.त्यांचे नाव व्यंकटेश असे ठेवण्यात आले पण सर्व त्यांना भाऊराव याच नावाने हाक मारीत व पुढे तेच रुढही झाले.भाऊसाहेब महाराजांचे कुटुंब अतिशय सुखवस्तू होते.अतिशय सत्शिल व सुखी कुटुंबात महाराजांचा जन्म झाला होता.त्यामुळे देवपुजा,भक्ती याचे संस्कार महाराजांवर बालपणापासून झाले होते.महाराजांची लहानपणापासून श्रीमारोतीरायांवर अतिशय भक्ती होती.महाराज सगुण उपासनेला विशेष महत्त्व द्यायचे.सकाळी स्नान झाले की ते सोवळं नेसुन, पुजा साहित्य घेऊन आधी गावातील मारोती मंदिरात जायचे ,देवांची पुजा केल्यावरच ते बाकी काम करीत.अगदी लहानपणापासून त्यांचा हा नियम होता.उमदी गावातील मारोतीचे देऊळ हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.महाराजांचा रोज देवपुजा , प्रदक्षिणा असा अत्यंत आखिव कार्यक्रम ठरलेला असे.त्याच काळात त्या मंदिरात साधुबुवा महाराज तथा रघुनाथप्रिय महाराजांचे वास्तव्य होतं असे.श्रीसाधुबुवा या लहानग्या भाऊरायाला बघत असतं.त्यांनी या भावीक मुलाची योग्यता ओळखली व त्याचे मन सगुणातुन निर्गुणाकडे ओढून घेण्यासाठी कार्यरत झाले.ते १४ वर्षांच्या भाऊरायांचे खुप कौतुक करीत ,त्याला म्हणत काय तुझी श्रेष्ठ भक्ती!काय तु पुण्यवान ! असे म्हणून ते त्याच्या पायाही पडत. असे करता करता त्यांनी भाऊसाहेब महाराजांचे मन सगुणातुन निर्गुणाकडे वळविले व १८५७ साली ते भाऊरायाला घेऊन निंबर्गी महाराजांकडे गेले. महाराजांनी या लहानग्या भाऊरायाला बघताच त्याचा अधिकार जाणला व त्याला नाम देऊन , अनुग्रह देऊन कृतार्थ केले.निंबर्गी महाराजांनी आशिर्वाद देऊन भाऊरायाला सांगितले की ,"भाऊराया तुला दिलेले नाम हे माझे नव्हे, ते स्वर्गातून आले आहे.तुझे त्याकडे निरंतर ध्यान असु दे." त्यादिवशी पासून त्यांनी आपल्या सद्गुरुंची आज्ञा तंतोतत पाळली. निंबर्गीकर महाराजांची गुरुपरंपरा ही नाथ परंपरा.नवनाथांतील भगवान श्री रेवणनाथ यांच्या पासून ही परंपरा सुरु झाली.निंबर्गी संप्रदायाची परंपरा पुढील प्रमाणे आहे
भगवान रेवणनाथ - श्रीकाडसिद्धरामेश्वर महाराज - निंबर्गी महाराज - श्री भाऊसाहेब उमदीकर महाराज - श्रीअंबुराव महाराज/श्रीगुरुदेव रानडे.
नाम मिळाल्यापासून अत्यंत निग्रहाने व निश्चयाने त्यांनी उमदीस नामस्मरण (नेम) करण्यास सुरुवात केली.सकाळी दूर गावाबाहेर रानात नेमास जात,ते मध्यान्हीच स्नान करुन परत येत.आल्यावर पोथी,भजन आणि भोजन झाले की थोड्या वेळात आपले सर्व लौकिक कामे उरकून घेत व पुन्हा नेमाला बसत. याप्रमाणे पुढील १८ वर्ष शरीराची पर्वा न करता त्यांनी अखंड त्रिकाल नेम केला.जसेजसे नाम वाढु लागले तसा तसा अनुभव त्यांना येत गेला.त्यामुळे त्यांच्या अंगी प्रखर वैराग्य बाणत गेले.पुढे निंबर्गीकर महाराजांनी त्यांना अनुग्रह देण्याचा व संप्रदाय वाढविण्याची आज्ञा दिली.संप्रदायाची पूर्ण जबाबदारी भाऊसाहेब महाराजांवर देऊन पुढे १८८५ ला निंबर्गीकर महाराज समाधिस्थ झाले.सद्गुरुंच्या निर्याणानंतर महाराज अतिशय विव्हळ झाले.पण या विव्हळतेनी महाराज खचले नाहीत तर महाराजांनी आपले साधन दुपटीने वाढविले.श्रीसद्गुरुरायांनी सांगितलेले साधन अधिक दृढतेने ,अधिक प्रखरतेने करु लागले. आता महाराज रोज दिवसातील १२-१३ तास नेम करु लागले.हा काल थोडा थोडका नसुन तब्बल १८ वर्षाचा होता. १८ वर्ष अहोरात्र महाराज साधनामग्न होते.दिवसभर ते नेम ,पोथी ,भजन यातच जास्तित जास्त वेळ रममाण झाले.बाकीच्या वेळात देव करील तेच होणार या निष्ठेने आपल्या प्रपंचाची कामे करत.पण या सर्वात आपल्या नेमाची वेळ ते काटेकोर पाळीत.या सर्वांमुळे महाराजांना अद्वैतसिद्धी प्राप्त झाली.त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली.
निंबर्गीमहाराजांच्या निर्याणानंतर लगेच काही काळाने महाराजांनी उमदी येथे नाम सप्ताह सुरु केला.हा सप्ताह १८८५ पासून १९०३ पर्यंत असा १८ वर्षे महाराजांच्या वाड्यात ते स्वखर्चाने करीत.त्यावेळी बरेच साधक हे आपले साधन वाढविण्यासाठी येत म्हणून याला 'साधना सप्ताह' असे म्हणत.या सप्ताहातील सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी सहा ते दुपारी तिनं वाजेपर्यंत तब्बल सलग ९ तास आलेले साधक महाराजांसोबत नेमाला बसत. एका साधकाकडे पोथी वाचण्याचे काम असे.या सप्ताहात सर्व जेष्ठ व अधिकारी साधक भाग घेत ज्यात प.पू.श्री अंबुराव महाराज, शिवलिंगाव्वा अक्का आणि श्रीभाऊराव सवळसंग यांचा आवर्जुन सहभाग असे. आपल्या वाड्यातील एक खोली महाराजांनी आवर्जून नित्य नेमासाठी वेगळी ठेवली होती.आपल्या नेमाच्या खोलीच्या भिंतीला लागून मध्यभागी एका मनुष्यास उभे राहण्याइतकी रुंदीची जागा सोडून दोन फुट अंतरावर दुसरी भिंत महाराजांनी बांधून घेतली होती.आपल्या खांद्याच्या उंचीबरोबर,मध्ये एक माणूस उभा राहू शकेल इतकी जागा सोडून दोन्ही भिंतीत दोन बांबु बसवून घेतले होते.या बांबुच्या मध्ये उभे राहुन रात्री १२ ते २ कठोर साधना महाराजांनी १८ वर्ष केले.शरीर धर्माची तमा न बाळगता महाराजांनी कठोर साधना केल्यामुळे त्यांच्या अंगी प्रखर वैराग्य बाणले होते.या वैराग्याबरोबर त्यांनी आत्मसाक्षात्काराचे शिखर गाठले. महाराजांनी या नेमाच्या खोलीतील अणु-रेणुतही भगवंत पाहिला होता. आपल्या सद्गुरुरायाचे सुंदर समाधी मंदिर बांधावे व त्यावर आपण कळस चढवावा ही महाराजांची इच्छा होती व त्यामुळे महाराजांनी पांडुरंगाकडे साकडे ही घातले होते.हा त्यांचा संकल्प पूर्ण झाल्यावर महाराज शिष्यांना घेऊन आपला नवस फेडण्यासाठी १९१० ला पंढरपूरला गेले होते. या भेटीचे वर्णन महाराजांच्या थोर शिष्या शिवलिंगव्वा अक्का यांनी आपल्या पत्रात केले आहे ,त्या लिहीतात, "पंढरपूरास गेल्यावर महाराजांनी दंडवत घालून आपला नवस फेडला.नमस्कार घालून झाल्यावर महाराजांनी विठु माउलीला कडाडून आलिंगन देऊन भेट घेतली.ही भेट म्हणजे एक सोहळाच होता.महाराज विठ्ठल भेटी झाली.आकाशातून पुष्प वर्षाव झाला,तो सोहळा वर्णन करता येत नाही.ज्यांनी दृष्टी देऊन पाहिजे त्यांना ते दिसले.महाराज पांडुरंग एक झाले." पंढरपूरातुन महाराजांनी अंबुराव महाराजांना पत्र लिहीले त्यात ते लिहितात , "देवाचा नवस फेडला संपूर्ण आनंदी आनंद जाहला.आम्ही पौष शुद्ध ३ अगर ४ ला इंचगेरीस येत आहोत.साक्षांत विठ्ठलराजास आणीत आहोत.तुमचे भक्तीने विठुराया येत आहेत." आपल्या सद्गुरुंच्या सगुण रुपातील समाधी बरोबर नित्य पांडुरंगाची सेवा घडावी या भावनेने महाराजांनी विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची स्थापना निंबर्गीकर महाराजांच्या समाधी मंदिरातील गाभार्यात मागील भिंतीतील कोनाड्यात केली.अशा रितीने श्रीनिंबर्गीकर महाराजांनी देह ठेवल्यावर तब्बल २८/२९ वर्षे भाऊसाहेब महाराजांनी संप्रदायाचे ,भक्ती प्रसाराचे कार्य उत्कृष्टपणे केले. श्री भाऊसाहेब महाराजांनी आपला देह परमार्थाच्या प्रसारासाठी चंदनाप्रमाणे झिजविला व शेवटी वयाच्या ७१ वर्षी ता.२९ /०१/ १९१४ रोजी माघ शुद्ध तृतीया शके १९३५ रोजी इंचगेरी येथे ते समाधिस्थ झाले.आत्मसाक्षात्कारी पुरुष देवाचा अनुभव घेत देह कसा ठेवतो हे महाराजांच्या निर्याणसमयी दिसून आले.
#ते_देवाकडून_आले_व_देवाकडे_गेले🌸🚩🙏
महाराजांचा नित्यक्रम आवर्जुन लक्षात घेण्यासारखा आहे.
पहाटेचा नेम ५ ते ८ ,सुर्योदय झाला की काही वेळ माडीवर जाऊन सूर्याकडे पाहत नेम करीत असत. या नेमानंतर गुरु आज्ञेप्रमाणे १०० ओव्या ज्ञानेश्वरीच्या ,१०० ओव्या दासबोधाच्या ,३० मनाचे श्लोक असे त्यांचे रोजचे पारायण असे.त्यानंतर कापुर लावून ५ नमस्कार घालीत.दुपारच्या जेवणानंतर १ तास नेम असे.त्यानंतर पत्रव्यवहार व हिशोब पाहत.संध्याकाळी ५ वाजता पोथी,भजन, आरती होतं असे.संध्याकाळी ६ ते ९ असा ३ तासांचा नेम असे.नंतर भजन ,आरती होतं असे.त्यानंतर १२ ते २ असा दोन तासांचा नेम.प्रवासात ही ते नेमाची वेळ अजिबात चुकवित नसत.खाता जेवता नाम विसरु नये.समर्थांच्या या वचनाप्रमाणे अखंड नामस्मरणाचे शिखर महाराजांनी गाठले होते.बैलगाडीतुन प्रवास करतांना तोंडावर पांघरूण घेऊन महाराज नेम साधीच.घोड्यावर बसल्या बसल्या नेम करीत असत.श्रीभाऊसाहेब महाराजांएवढी विलक्षण नामनिष्ठा क्वचितच इतरत्र बघायला मिळते.ही साधनेवरील निष्ठा प्रत्येक साधकाला नित्य मार्गदर्शक आहेच यात तुसभर ही शंका नाही.अशा दिव्य महापुरुष समर्थ सद्गुरु श्री भाऊसाहेब महाराजांच्या परमपावन चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम. महाराजांच्या चरित्रातुन थोडी जरी साधने विषयी ,नेमा विषयी आपल्याला निष्ठा घेता आली तर आपल्या जिवनाचे नक्कीच सोने झाल्याशिवाय राहणार नाही.
✍️✒️ त्यांचाच अक्षय जाधव आळंदी ✒️✍️


No comments:
Post a Comment