🙏🌺🌸 "हम गया नहीं जिंदा है" 🌸🌺🙏
अक्कलकोटस्थ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ माउलींनी प्रज्ञापुरीत आजच्याच तिथीला म्हणजे चैत्र वद्य त्रयोदशीला आपल्या समाधी लिलेचे नाट्य करुन आपला सगुण देह भक्तांच्या नजरेआड केला व समाधीतुन आपल्या पुढील कार्यास प्रयाण केले. वरील सर्वत्र परिचित असलेले " हम गया नहीं जिंदा है" हे अभय वचन आज १४४ वर्षांनीही आपण सर्व लोक अनुभवतोय.श्रीस्वामीरायांची प्रत्यक्ष प्रचिती आजही तेवढ्याच ज्वलंत पद्धतीने येते ,आपल्या शरणागत भक्तांच्या हाकेला ,त्यांचा योगक्षेम चालवायला आजही स्वामीराया तत्पर आहेत आणि याची प्रचिती असंख्य स्वामी भक्तांनी घेतली आहे.आजच्या दिवशी आपण समाधी नंतर घडलेल्या काही मुख्य लिला बघणार आहोत ज्यातुन स्वामीरायांनी आपल्या समाधीचे लिला नाट्यच केले याची कल्पना आपल्या सर्वांना येईल.
१) बिडकर महाराजांना प्रत्यक्ष प्रगटून अभय वचन देणे
२) बाळप्पांना पुढील कार्यास जातोय याची कल्पना देणे
३) समाधी नंतर ५ दिवसांनी प्रगटने
#स्वामी_समाधी_नंतर_स्वामींच्या_अतर्क्य_लिला:-
१) "हम गया नहीं जिंदा है" हे स्वामींचे अभय वचन आपल्या सर्वांना सुपरिचित आहेच.पण या स्वामींच्या अभय वचनाची हकिकतही अतिशय विलक्षण आणि आपल्या सर्वांसाठी खुप आश्वासक आहे.हे वचन एका प्रसंगापुरते मर्यादित नाही तर आजही या वचनाचा अनुभव आपण सर्व लोक घेत आहोत.
भगवान श्री अक्कलकोट स्वामी माउलींचे शिष्योत्तम श्री रामानंद बिडकर महाराज यांच्या संबंधातील अतिशय महत्वाचा प्रसंग समाधी नंतर घडला. श्री बिडकर महाराज यांचे कै.लक्ष्मण बापट यांनी लिहीलेले चरित्र अतिशय दिव्य,प्रत्येकाला मार्गदर्शक आणि अतिशय प्रासादीक असे आहे.आपण सर्वांनी ते जरुर वाचा.(शब्द मर्यादेमुळे इथे महाराजांचे वेगळे असे चरित्र मांडत नाही) तो प्रसंग असा की, श्री बिडकर महाराज ज्यावेळी स्वामी सेवेला अक्कलकोटी जातात तेव्हा स्वामींनी त्यांना "यापुढे पुन्हा इकडे येऊ नये,नर्मदा प्रदक्षिणा करावी" असा आदेश दिला.स्वामीरायांचा स्पष्ट आदेश मिळाल्यामुळे बिडकर महाराज पुन्हा अक्कलकोटला गेले नाही व तिथून ते तडक नर्मदा परिक्रमेला गेले.नर्मदा परिक्रमा सुरु असतांना त्यांना असंख्य दिव्य अनुभव आले, अनेक दर्शने झाली.वाटेतच त्यांना नर्मदा मातेने दर्शन देऊन कृतार्थ केले.अशाप्रकारे पदोपदी गुरुकृपेचा अनुभव घेत महाराजांचे मार्गक्रमण सुरु होते.पुढे प्रवासात महाराज महेश्वर या गावी आले.त्याच ठिकाणी त्यांना 'ज्ञानप्रकाश' या मासिकात श्रीस्वामी समर्थ समाधीस्थ झाल्याची अतिशय दु:खद वार्ता समजली.बिडकर महाराजांवर जणू आकाशच कोसळले.ते लहान मुलांसारखे ओक्साबोक्सी रडू लागले.ही बातमी कळल्यापासून महाराज अतिशय अस्वस्थ आणि विमनस्क स्थितीत होते. त्याच रात्री भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराज श्री बिडकर महाराजांपुढे प्रगटले त्यांना दर्शन देऊन "हम गया नहीं जिंदा है" असे सांगून धीर दिला व जेथे प्रदक्षिणा सुरु केली तेथेच प्रदक्षिणा पुरी करावी अशी आज्ञा करुन ते पुन्हा गुप्त झाले.त्यामुळे बिडकर महाराजांच्या व्यथित मनाला खूप आधार मिळाला. म्हणजे मुळातच स्वामींची समाधी ही एक लिला होती. कारण त्यांनी त्यानंतरही सदेही अनेक ठिकाणी प्रगटून आपण नित्य आहोत याची ग्वाही आपल्या सर्वांनाच जणू दिली आहे.
२) बाळाप्पा महाराजांना समाधी घेतल्यावर पुन्हा जागृत होऊन मार्गदर्शन:-
भगवान श्री अक्कलकोट स्वामी माउलींचे उत्तराधीकारी श्रीबाळप्पा महाराज यांच्या चरित्रातील स्वामी समाधी लिलेसंदर्भातील एक विलक्षण हकिकत आहे.श्री स्वामीरायांनी समाधी घेण्याआधी बाळप्पांना आपल्या उजव्या हातातल्या करांगुलीतील "श्रीस्वामी समर्थ" नाम कोरलेली अंगठी स्वतः बाळप्पांच्या हातात घातली व म्हटले , 'माझे शिक्कामोर्तब तुला देत आहे.माझा शिक्का यावच्चंद्रदिवाकरौ तू पुढे चालव.' असा आशिर्वाद दिला व बाळप्पांना आपल्या बाजुला आपल्या आसनावर बसविले.आपल्या कंठातील रुद्राक्ष त्यांच्या गळ्यात घातला.अंगावर छाटी घातली.हातात भगवे निशाण दिले.प्रसाद म्हणून चरण पादुका दिल्या व मस्तकावर वरदहस्त ठेवून , 'औदुंबर छायेत बस.स्वतंत्र मठ स्थापना करुन पादुकांची प्रतिष्ठापना कर.' असा आदेश दिला.
पुढे श्रीस्वामी महाराजांनी चैत्र वद्य त्रयोदशीला समाधी लिला केली.त्यावेळी बाळप्पा तिथेच होते. चोळप्पांच्या घराजवळील ध्यान गुंफेत स्वामींना समाधीत बसवण्यात आले.त्यावेळी स्वामींना अत्तर लावावे अशी बाळप्पांची तिव्र इच्छा झाली.काही काळाने बाळप्पा अत्तर कुपी घेऊन समाधी गुंफेत गेले ,स्वामींना मनसोक्त अत्तर लावले व बाहेर येणार तेव्हढ्यात श्रीस्वामीरायांनी आपले नेत्रकमल उघडले व म्हणाले ,"काय ,झाले ना समाधान? आता गुंफा बंद करावी आम्हाला आता येथून उत्तर हिंदुस्थानात पुढील कार्यासाठी गमन करावयाचे आहे." स्वामींच्या समाधी गुंफेचे द्वार बंद करण्यात आले.स्वामीरायांची सगुण देहाच्या लिला मात्र अक्कलकोटच्या धरणीवर आता बंद झाल्या होत्या.यामुळे बाळाप्पा अतिशय खिन्न झाले होते.बाळप्पांनी अन्न पाण्याचा त्याग केला व विरहाकुल अवस्थेत ते समाधीसमोर दिवसरात्र बसून राहिले.अचानक त्यांच्या समोर श्रीस्वामी समर्थ माउली प्रगट झाले व म्हणाले , "तुला मी ज्या पादुका दिल्या आहेत,तेथे चैतन्यरुपाने मी प्रत्यक्ष वास करीत आहे.या पुढे तेथेच मी तुझी सेवा घेईन.पूर्वीप्रमाणे माझी सेवाशुश्रुषा करीत जा." श्रीस्वामी समर्थ महाराज सदेह प्रकटल्यानंतर बाळप्पांच्या मनातील उरलासुरला संदेह मिटला व ते स्वामीरायांनी दिलेल्या कार्यासाठी तत्पर झाले.
३) समाधी नंतर सदेही भक्ताघरी प्राकट्य:-
श्रीस्वामी माउलींनी समाधी घेण्याआधी घडलेली विलक्षण आणि एकमेवाद्वितीय अशी अतर्क्य हकिकत. अक्कलकोट जवळील निलेगाव येथील जहागिरदार सांडणीस्वार यांना स्वामीरायांनी आम्ही शनिवारी तुमच्या घरी येऊ असे वचन दिले होते. पण स्वामी महाराज हे मंगळवारीच आपली समाधी लिला करते झाले.त्यामुळे सेवेकर्यांना असे वाटले की आता हे काही शक्य नाही.परंतु पाच दिवसांनी स्वामीराज एकटेच नाही तर आपल्या संपूर्ण भक्त परिवारासह निलेगावात अवतरले.ही आजवर घडलेली एकमेवाद्वितीय अशी लिला आहे कारण स्वामी एकटेच नाही तर सेवेकरी,गाई,गुरे एवढेच काय तर अक्कलकोटातील निर्जीव भासणारा मेणा,मंचक आदी साहित्यासह स्वामी तिथे प्रगट झाले होते.निलेगावातील गढीबाहेर स्वामीराय आल्याचे वृत्त कळताच स्वतः भाऊसाहेब जहागिरदार धावत श्रींच्या दर्शनासाठी पुढे गेले.त्यांनी सहकुटुंब दर्शन घेतले.निलेगावातील ग्रामस्थांनीही स्वामींचे दर्शन घेतले.नंतर त्या सर्वांना श्रीस्वामीरायांनी आज्ञापिले, 'सर्वांनी भोजनार्थ आपल्या घरी जावे.' भाऊसाहेबांना स्वामीराज म्हणाले की , 'उद्या तुमच्या घरी येऊ.' तरीही भाऊसाहेब रात्री भोजन झाल्यावर काही गावकर्यांना सोबत घेऊन स्वामीरायांना ,सेवेकर्यांना काही हवे नको ते पाहावे म्हणून गढीबाहेर आले.पण तिथे पोचल्यावर पाहतात तर काय ! स्वामी माउली तेथून निघून गेले होते.त्यांनी काही लोकं स्वामी शोधार्थ पाठवले पण हाती काहीच लागले नाही.दुरदूर पर्यंत कुठेही स्वामींरायांचा वा सेवेकर्यांचा थांगपत्ता नव्हता.दुसर्या दिवशी भाऊसाहेब जहागिरदार श्रींची वाट पाहून भोजनार्थ बसले असता अचानक महाराज भोजनाच्या खोलीत प्रगटले.काहीही संभाषण न करता गुप्तही झाले.हे सर्व अघटीत पाहून भाऊसाहेब गडबडून गेले.तो थोड्या वेळानंतर एक घोडेस्वार स्वामींच्या समाधीचे वृत्त घेऊन गढीत शिरला आणि स्वामीराज समाधीस्थ झाल्याची बातमी जहागिरदारांना दिली.जहागिरदारांना या स्वामीकृपेच्या अद्भुत आणि विलक्षण लिलेमुळे गहिवर आला.स्वामींनी आपल्या भक्ताला दिलेले वचन पूर्ण करण्यास्तव इतका त्रास घेतला या विचारांनी त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.दुसर्या दिवशी जहागिरदार अक्कलकोटला जातात व हे वृत्त सेवेकर्यांना सांगतात तर सेवेकरी ही स्तब्ध होतात आणि अक्कलकोट येथील स्वामी समाधी बघून जहागिरदार तर अवाक् होतात.कारण जनमानसासाठी समाधी झाल्याचा एकीकडे प्रसंग ,तर दुसरीकडे दर्शनाच्या ग्वाहीनुसार निलेगावात प्रकट होणे! मग समाधी कसली?? ही तर "हम गया नहीं जिंदा है" हा अभयवचनाची प्रत्यक्ष प्रचितीच.
मुळातच श्रीस्वामी भगवंत अक्कलकोटला अवतरले त्यावेळी त्यांची काया ही पुराण वटवृक्षाप्रमाणे होती. स्वामी माउलींच्या अवतार संबंधी स्वामीसुत महाराज आणि श्री आनंदनाथ महाराज वेंगुर्ले यांनी ठळकपणे माहिती दिली आहेच आणि त्याला श्रीस्वामीरायांनीही दुजोरा ही दिला आहे.त्यामुळे स्वामींचे प्राकट्य हे इ.स. ११४९ रोजी पंजाब मधील छेली खेडे ग्रामी झाले होते.अक्कलकोटला स्वामी प्रगटले त्यावेळी त्यांचे वय हे ७०० वर्षांहून अधिक होते. याविषयीचा स्वामी प्रगटदिनाच्या वेळी मी एक स्वतंत्र लेख लिहीला आहे. त्या लेखाची लिंक खाली देतो आहे आपण जरुर वाचा.
https://akshayrjadhav.blogspot.com/2022/04/blog-post.html
त्यामुळे स्वामी माउली त्याच देहाने गेली अनेक शतकं लिला करते झाले होते व पुढील कार्यास जातो असे बाळाप्पा महाराजांना सांगितले म्हणजे ते समाधी तून गुप्त झाले होते. या सर्व लिलेतुन एक गोष्ट लक्षात येते की समाधी लिला अथवा देहत्याग ही स्वामींचीच माया. आपल्या सर्वांना भुलविण्यासाठी त्यांनी हा खेळ रचला होता आणि त्यानंतर ते पुढील कार्यासाठी निघून गेले. समाधी घेतांनी स्वामीरायांनी गितेतील जो श्लोक निवडला तो त्यांच्या अभय वचनाला सार्थ करुन जातो."हम गया नहीं जिंदा है" पण केव्हा आणि कुणासाठी तर , "जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योग-क्षेम मी सांभाळतो" म्हणजे अनन्य भक्ती करणार्यांसाठी. स्वामीरायांनी निलेगावात केलेली लिला ही अतिशय विलक्षण आणि अघटित अशीच आहे.अशीच एक घटना परब्रह्म पूर्णब्रह्म भगवान श्री कृष्णचंद्र प्रभुंनी गोकुळात केली होती.श्रीभगवंतांनी गोप-गोपी, गाय-वासरु आपल्या योगमायेने पुन्हा निर्माण केले व वर्षभर त्यांना सोबत घेऊन लिला केल्या होत्या.हीच लिला श्री भगवंतांनी पुन्हा स्वामी अवतारात प्रज्ञापुरीत केली.
"हम गया नहीं जिंदा है" आज या अभयदानाला १४४ वर्ष उलटून गेले तरी हे अभयदान आजही नित्य नुतन,अखंड आणि अक्षय्य आहे. श्रीस्वामी रायांच्या चरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम करुन प्रार्थना करतो की त्यांनीच आपल्या सर्वांकडून त्यांच्या सुकोमल श्रीचरणांची सेवा करुन घ्यावी व श्रीचरणांना अनन्य शरण जाण्याची बुद्धी द्यावी.
🌸🌺"श्री स्वामी समर्थ" 🌺🌸


अंतःकरणापासून केलेली भक्ती,पूजा,जप,सेवा व घातलेली साद स्वामींपर्यंत पोहोचतेच.ते भक्तांचे पाठीशी आहेत यावर माझा ठाम विश्वास आहे. मग कसली काळजी व कसले संकट? जय स्वामी समर्थ.
ReplyDeleteखुप खुप छान
Delete