पैजारवाडीचे दत्तप्रभु भक्तवत्सल भक्तभिमानी सद्गुरु माउली श्री चिले देवांची ३६ वी पुण्यतिथी :-
सद्गुरु_श्रीचिले_महाराज_आणि_सद्गुरु_श्रीकृष्ण_सरस्वती_दत्त_महाराज :-
श्रीपैजारवाडीचे दत्त श्रीचिले महाराज यांना श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजां बद्दल अनन्य प्रेम व आदारभाव होता. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज तथा कुंभार स्वामी महाराज यांना चिले देव "आबासाहेब" याच नावाने सदैव संबोधत असत हे विशेष.त्याला कारण ही तसेच कारण श्रीकृष्ण सरस्वती दत्त प्रभु हे प्रत्यक्ष भगवान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्य आणि चिले महाराज स्वामी माउलींबद्दल वडिलांसमान आदर आणि पुज्यभाव ठेवीत.त्यामुळे आपल्या गुरुपरंपरेतील प्रभावळीतील जेष्ठ म्हणून चिले महाराज कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा अतिशय आदर करीत असत.आपल्याकडे दर्शनाला हार फुले घेऊन आलेल्या असंख्य भक्तांना ते कुंभार गल्लीतील "आबासाहेबांच्या" समाधी मंदिरात तो हार ,पुजा साहित्य अर्पण करण्यास सांगत असत.करवीरात ते आबासाहेबांच्या वैराग्य मठी म्हणजे समाधी मठीच्या पायर्यावर कित्येकदा बसुन राहत.
आबासाहेबांबद्दलचा आत्यंतिक आदर आणि प्रेमभाव प्रकट होणारा एक विलक्षण प्रसंग चिले देवांच्या चरित्रात घडला आहे तो असा की, एकदा कुणा एका नतद्रष्ट माणसाने आबासाहेबांच्या समाधी मठीच्या पायरीवर रात्रीच्या अंधारात येऊन घाण टाकली व ही बातमी चिले महाराजांना अंतर्ज्ञानानेच कळली..ते तडक कुंभारगल्लीत आले ,आपल्या सोबतच्या भक्ताला लक्स साबन आणायला लावले व आपल्या हाताने ती घाण साफ करुन सर्व पायर्या व संपूर्ण कुंभार गल्ली धुऊन काढली. असे विलक्षण प्रेम आणि आदर भाव चिले देवांचा श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांबद्दल होता.


No comments:
Post a Comment